रविवार, ३० जून, २०१३

स्वतंत्र कोकण राज्य झालेच पाहिजे...! अजुन किती दिवस कोकणी लोक घाट्यांची 'दादा'गिरी सहन करणार आहेत...???

जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प कोणत्याही परिस्थितीत करुनच दाखवु, अशी धमकी 'घाटावरचा टग्या' ऊर्जामंत्री आपणा सर्व कोकणी लोकांना कोकणात येऊन देऊन जातो आणि आपण कोकणी लोक स्वाभिमान विकल्यासारखे मुग गिळुन गप्प बसतो, याचीच मला एक कोकणी म्हणुन लाज वाटते. या पश्चिम महाराष्ट्रातील घाटी नेत्यांनी आजपर्यँत कोकणचे फक्त शोषणच केले आहे आणि कोकणी लोकांची कधीच एकजुट नसल्याने यापुढेही असेच शोषण होत राहिल. कोकणी लोकांनी पुर्वापार दाखवलेल्या या शंडपणामुळे आज देशातील काँग्रेसी सरकारची आणि खास करुन या घाट्यांची आपली स्वतःची वीजेची गरज भागवण्यासाठी कोकणवर औष्णिक आणि अणुऊर्जा प्रकल्प जबरदस्तीने लादुन निसर्गरम्य कोकणची राखरांगोळी करण्याची हिँमत होते. आपली स्वतःची वीजेची गरज भागवण्यासाठी कोकणला बळीचा बकरा बनवत आहोत या गोष्टीची त्यांना लाज देखील वाटत नाही. आता अन्यायाला वाचा फोडायची असेल तर यापुढे एकच पर्याय कोकणच्या लोकांसमोर दिसतोय तो म्हणजे "स्वतंत्र कोकण राज्य..." या एकाच गोष्टीसाठी एकत्रितपणे लढा द्यायचा. मी जेव्हा पहिल्यांदा ही संकल्पना फेसबुकवर सर्वाँसमोर मांडली त्यावेळी अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी या लेखात करत आहे. पटल तर स्वतंत्र कोकण राज्याच्या प्रस्तावाला जरुर पाठिँबा द्या.

1) एवढे छोटे राज्य होईल का...? 

स्वातंत्र्योत्तर कालखंडात छत्तीसगड, झारखंड, मिझोरम, इत्यादी दहा छोट्या राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गोवा हे सिँधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा लहान राज्य आहे मग सिँधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई पर्यँत कोकण प्रदेशाचे राज्य का होणार नाही...?
 

2) राज्य चालवायला पैसा कोठुन आणणार...?
कोकण विभागातुन महाराष्ट्र शासनाला सुमारे 26000 कोटी महसुल मिळतो. त्यातुन सुमारे 8000 कोटी रुपये कोकणावर खर्च करुन बाकीचा पैसा उर्वरीत महाराष्ट्राकडे वळविला जातो. त्यातील काही पैसा महाराष्ट्र शासनाकडे... तर काही पैसा केँद्र शासन व देशातील दुर्बल राज्ये बिहार, उत्तर प्रदेश इत्यादीकडे वळविला जातो. केवळ मुंबईचाच वार्षिक महसुल 65000 कोटी रुपये आहे. तात्पर्य कोकण स्वतःचे राज्य चालवायला समर्थ आहे. 

3) महाराष्ट्राचे किती तुकडे पाडायचे...? 

मुळ महाराष्ट्राचे मुळीच तुकडे पाडावयाचे नाहीत. कोकण प्रदेश हा मुळ स्वतंत्र देश असल्याचे ऐतिहासिक पुरावे सापडतात. विदर्भ, मराठवाडा हे मराठी भाषिक म्हणुन संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी महाराष्ट्...राला जोडण्यात आले. ह्या तिन्ही प्रदेशांचे पश्चिम महाराष्ट्र आर्थिक शोषण करीत असल्याने ते महाराष्ट्राशी एकरुप झाले नाहीत. ते महाराष्ट्राशी एकरुप न झाल्याने ते तुकडेच आहेत. वेगळे तुकडे पाडण्याची गरजच नाही. प्रत्येक प्रदेशाचे खास वैशिष्ट्य आहे.


4) राष्ट्रीय एकात्मतेला तडे जातील...?

ही सगळी भावनिक भाषा आहे. भारत आणि पाकिस्तान असे हिँदुस्तानचे तुकडे झाले त्याला राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणे म्हणतात. येथे विकासासाठी प्रशासन सुलभ व्हावे म्हणुन राज्याचे विभाग केले जातात. देशाच्या विक...ासासाठी तीस राज्ये निर्माण केली आहेत. आणखीही निर्माण केली जातील. भावनिक प्रश्न निर्माण करुन रोजी रोटीचा प्रश्न सुटत नाही. कोकणासमोर आज रोजीरोटीचे, बेरोजगारीचे व विकासाचे प्रश्न आ वासुन उभे ठाकले आहेत. घाटी लोक कोकणचे शोषण करत आहेत. आता अन्याय सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने भुमिपुत्रांच्या विकासासाठी स्वतंत्र कोकण राज्य करावेच लागेल.

5) मुंबई कोकणला देतील का...?

मुंबई हा कोकणचा अविभाज्य भाग आहे. मुंबई कोकणला देण्याच प्रश्नच येत नाही कारण ती कोकणताच आहे. कोकणी भुमिपुत्रांनीच ती विकसीत केली. भौगोलिकद्रुष्ट्या तसेच मालकी व वहिवाटीच्या द्रुष्टीने मुंबई कोकणाची आहे. गोवा रज्य सिँधुदुर्ग जिल्ह्याएवढे आहे. गोव्यात मुंबई नसली तरी गोव्याचा उत्कर्ष झाला आहे. गोवा राज्याचे बजेट सुमारे 1500 कोटी तर तेवढाच असलेल्या सिँधुदुर्ग जिल्ह्याचे बजेट सुमारे 15 कोटी आहे. गोवा स्वतंत्र राज्य आहे तर कोकण परतंत्र आहे. स्वतंत्र कोकण राज्य आल्यानंतर गोव्यापेक्षाही अधिक विकास कोकणचा होईल कारण विजयदुर्गसारखे जगातले पहिल्या नंबरचे बंदर कोकणात आहे. जागतिक दर्जाची कोकणात 15-20 तरी बंदरे आहेत. बंदर, पर्यटन, उद्योगधंदे विकसित केल्यानंतर संपुर्ण कोकणच मुंबई होणार आहे. तेव्हा मुंबई कोकण राज्यात असणार का याची व्यर्थ चिँता करण्यात काहीच अर्थ नाही.


6) विदर्भला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जात नाही मग कोकणचे स्वतंत्र राज्य करायला केँद्र शासन मंजुरी देईल का...? 

स्वतंत्र विदर्भ राज्याची एकमुखी मागणी नाही आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य चालविता येईल एवढी विदर्भाकडे नैसर्गिक साधनसंपत्ती व आर्...थिक क्षमता नाही. पावसाअभावी विदर्भात दरवर्षी हजारो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. विदर्भापेक्षा कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. विलासराव देशमुखांच्या म्हणण्यानुसार कोकणात महाराष्ट्राचे अर्थकारण बदलुन महाराष्ट्राला देशात अग्रेसर ठेवण्याची ताकद आहे. असे स्वतंत्र कोकण राज्य दिमाखात चालेल यात वादच नाही. आर्थिकद्रुष्ट्या सक्षम असलेल्या प्रदेशांनी स्वतंत्र घटक राज्याची मागणी केल्यास त्यांचा केँद्र सरकारकडुन गांभीर्याने सकारात्मक विचार केला जातो. छोटी छोटी राज्ये विकासाला पोषक ठरत असल्याने केँद्रशासन अशी राज्ये निर्माण करायला उत्सुक आहे.



7) स्वतंत्र कोकण राज्याचा भुमिपुत्रांना काय फायदा होणार...?

स्वतंत्र कोकणात 100% नोक-या भुमिपुत्रांनाच मिळतील. सध्या महाराष्ट्र शासन कांदा, द्राक्षे, कापुस शेतक-यांच्या हितासाठी झटतेय. कोकणी शेतकरी उपेक्षित राहिला आहे. उर्वरित महाराष्ट्रा...चे नेत्रुत्व आर्थिक कोँडीत सापडलेल्या कोकणी शेतक-यांच्या जखमेवर फक्त मीठ चोळण्याचे काम करीत आहे. स्वतंत्र कोकण राज्य शेतीबरोबरच पर्यटन विकास, बंदर विकास, उद्योगधंदे, पाटबंधारे, नैसर्गिक आपत्ती व आग लावुन होणारे जळीत शेती बागायतीची 100% नुकसान भरपाई इत्यादी सारे करील ते भुमिपुत्रांची भरभराट करण्यासाठी.

 ‎8) महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेऊनही राज्याचा कारभार चालवीत असताना वेगळे कोकण राज्य मागणे योग्य आहे का...?
महाराष्ट्र शासनाने नाबार्ड, रिझर्व्ह बँक, जागतिक बँक इत्यादीँकडुन 1 लाख 34 हजार कोटीहुन अधिक कर्ज घेतले आहे ते उर्वरित... महाराष्ट्राच्या विकासासाठी, कोकण विकासासाठी नव्हे...! त्याचे कोट्यावधी रुपयांचे व्याज कररुपाने कोकणी माणसालाही भरावे लागत आहे. नवजात बालकापासुन आजोबांपर्यँत प्रत्येक कोकणी माणसाच्या डोक्यावर 13000 रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती झाल्यास ह्या कर्जापासुन मुक्ती मिळेल आणि कोकण विकासासाठी आवश्यक वाटल्यास कर्ज घेऊन सम्रुद्ध कोकण निर्माण करता येईल.

9) नामदार नारायण राणेँनी विकासाचे आश्वासन दिले असताना स्वतंत्र कोकण राज्याची गरज आहे का...?
गेली कित्येक वर्षे कोकणला फक्त विकासाची आश्वासने दिली जात आहेत पण त्यानुसार विकास मात्र झाला नाही. अंतुले आणि राणेँसारखे कोकणातले कर्तुत्वान मुख्य...मंत्री घाट्यांच्या कुटील राजनितीमुळे फार काळ त्या पदावर राहु शकले नाहीत.अगदी राहिले असते तरी काही किँवा सर्वच गोष्टी कोकणात आणुच शकणार नाहीत. उदा. कोकणात D.Ed, B.Ed, DOCTORS किँवा पोलीस यांच्यापैकी कोणाचीही नोकरभरती असो, वशीलेबाजी करुन किँवा दबाव आणुन 80-90 टक्के लोक साले घाटावरचेच असतात तर उर्वरित 10-20 टक्के उमेदवार फक्त कोकणातले असतात. 100 टक्के नोक-या व प्रवेश कोणता मुख्यमंत्री कोकणातील तरुणांना देऊ शकेल...? अर्थातच कोणीही नाही. भव्य क्रिकेट स्टेडियम, के.ई.एम. समकक्ष सुसज्ज रुग्णालय, कोकणातील सर्व जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास इत्यादी सर्व आपण स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती करुनच एकाच वेळी आणु शकतो. जे राज्य करील ते एकटा मुख्यमंत्री करील काय...?? नाही! नक्कीच नाही!!

10) वैधानिक विकास मंडळाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असताना स्वतंत्र कोकण राज्याची गरजच काय...?
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर सर्वाधिक आर्थिक विकास या घाट्यांचा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा झाला. कोकण, विदर्भ व मराठवाडा या...ंच्यावर आर्थिक अन्याय झाल्याचे धनंजयराव गाडगीळ व वि.म.दांडेकर यांच्या समित्यांनी स्पष्ट केले आहे. हा BACKLOG भरुन काढण्यासाठी विदर्भ, मराठवाड्या बरोबर फक्त कोकणला वैधानिक विकास मंडळ मंजुर करणे आवश्यक होते परंतु प्रत्यक्षात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला वैधानिक विकास मंडळ निर्माण करुन कोकणला अक्षरशः दडपुन टाकले. कोकणला देण्यात आलेले पैसे पश्चिम महाराष्ट्राकडे गेले आणि या स्वार्थी घाटबांनी त्यातील फुटकी कवडीही कोकणला दिली नाही. या अन्यायाविरुद्ध कोकणाने जबरदस्त आवाज उठविणे आवश्यक होते आणि आहे परंतु कोकणी लोकांचा संयमी स्वभाव आणि कोकणी नेत्यांनी घाट्यांसमोर नांगी टाकली, ही खरच संतापजनक गोष्ट आहे. कोकणची अशी क्रुर चेष्टा सुरु असताना स्वतंत्र कोकण राज्याची निर्मिती करणे हेच स्वाभिमानी कोकणी जनतेचे कर्तव्य आहे.
 

11) स्वतंत्र राज्यनिर्मिती न करता दबावगट निर्माण करुन कोकणचा विकास होणार नाही का...?
गेली कित्येक वर्षे कोकणातील कातडी बचावु नेते असल्याच वल्गना करत आहेत परंतु आजपर्यँत कोणीच दबावगट निर्माण केला नाही. संघर्षासाठी मानसिक तयारी व आत्मविश्वास नसलेले कोकणचे नेते घाटी नेत्यांशी चांगले संबंध ठेवुन फक्त स्वतःचाच राजकीय स्वार्थ साधत आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात...! प्रादेशिक दबावगट निर्माण करण्यासाठी पक्षाचे बुरखे फाडून एका व्यासपीठावर आले पाहिजे. केवळ दबावगट निर्माण करुन विकास साधता आला असता तर मिझोरम, नागालँड, उत्तरांचल, झारखंड, मेघालय इत्यादी दहा राज्याची निर्मिती झाली नसती. वरील स्वतंत्र झालेल्या राज्याप्रमाणे दबाव गट हवा. गोव्यात भुमिपुत्रांचा विकास होतो कारण गोव्यात निर्माण झालेली संपत्ती गोव्यातच राहते. त्याप्रमाणेच कोकण विकासातुन निर्माण झालेली संपत्ती कोकणी भुमिपुत्रांसाठी वापरली पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासासाठी नेता येणार नाही. ह्या पद्धतीने युद्धपातळीवर कोकण विकास करा अन्यथा स्वतंत्र राज्य द्या. "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला" अशी रोखठोक मागणी हवी. कोकणातील भ्याड नेत्यांकडुन ती अपेक्षा करणच चुकीच आहे आणि म्हणुनच कोकणच्या जनतेने कालापव्यय न करता स्वतंत्र कोकण राज्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी लढा दिला पाहिजे.


(या लेखातील काही भाग प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या पुस्तकातून घेतला आहे. )

सर्चलाईट :- 'विजय' तरुण भारतचा...

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या इतरत्र पोहोचाव्यात अशी सामान्य लोकांची इच्छा असते पण प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला सर्वाँसमोर व्यक्त होणे शक्य होत नाही आणि मनातल्या मनात धुमसत राहणा-या त्या अव्यक्त शब्दांना कुणा त्रयस्थाने समाजासमोर आणणे निकडीचे होऊन जाते. अशा वेळी रंजलेले-गांजलेले लोक एका निर्भीड पत्रकाराकडेच आशाळभुत नजरेने पाहतात. अलीकडच्या काळात एक तर पत्रकारच कुणा राजकीय नेत्याचे हस्तक बनलेले आहेत किँवा राजकीय नेतेच स्वतःची वर्तमानपत्रे काढतायेत. असल्या तथाकथित 'राजकीय वर्तमानपत्रा'मध्ये आपापल्या पक्षाच्या धोरणांकडे पाहुन त्या त्या विषयाची एकांगी बाजु मांडली जाते. नाण्याप्रमाणे प्रत्येक विषयाला नेहमी दोन बाजु असतात आणि लोकांच्या दुर्देवाने मिँध्या पत्रकारितेपायी विषयाची दुसरी बाजु नेहमीच अंधारात राहते. मग दुसरी बाजु लोकांपुढे आणायची कोणी...? लोकांच्या समस्यांना वाचा फोडायची कुणी...?? फक्त प्रिँट मिडीया नव्हे तर काही टी.व्ही.वरील न्युज चँनेल्स सुद्धा जग जिँकण्याच्या बाता करतात.त्यांचे संपादक स्वतःच जगातील एकमेव निर्भीड पत्रकार शिल्लक राहिले आहोत असा आव आणतात आणि चँनेलचा मालक कोळसा घोटाळ्यात अडकला की निर्भीड पत्रकारिता बाजुला सारत कोळशाने तोँड काळे करुन कोणत्या तरी बिळात दडुन बसतात. सर्वत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळत असताना सिँधुदुर्गात तो आजही टिकुन आहे कारण बाळशास्त्री जांभेकरांची परंपरा कायम राखत लोकांसाठी आपल्या लेखणीची धार नेहमीच तीक्ष्ण करणारे 'विजय शेट्टी' आज दैनिक तरुण भारतचे संपादक म्हणुन कार्यरत आहेत.

पत्रकाराने निःपक्ष राहुन पत्रकारिता करावी असा समाजाचा अलिखित नियम असतो पण प्रत्येक वेळी निःपक्ष राहणे शक्य होईलच असे नाही. शेवटी पत्रकार हा देखील एक माणुस असतो, स्वतंत्र भारताचा नागरिक असल्याने त्याची देखील काही स्वतंत्र मते असतात. पत्रकाराने आपली मते वर्तमानपत्रात जरुर मांडावीत कारण तेच निर्भीड पत्रकारितेचे एक जीवंत लक्षण आहे परंतु ती लोकांवर लादु नयेत. पत्रकाराने आपली मते 'मांडणे' आणि 'लादणे' यात पुसटशी रेषा असते आणि ती ज्या पत्रकाराला ओळखता येते तोच समाजात एक 'यशस्वी पत्रकार' म्हणुन ओळखला जातो.सिँधुदुर्गात विजय शेट्टी आज सर्वोत्क्रुष्ट पत्रकार म्हणुन ओळखले जातात कारण ते आपली मते अगदी लोकांच्या काळजाला भिडणा-या शब्दात व्यवस्थितपणे मांडतात पण आपण मांडलेले मतच अंतिम सत्य आणि योग्य आहे, असा दुराग्रह करताना ते कधीच दिसत नाही.
तरुण भारतमध्ये 'सर्चलाईट' या सदरात विजय शेट्टी आपली परखड मते मांडत असतात. एरव्ही बातम्यांमधील वैविध्य जपण्यासाठी प्रसिद्ध असणा-या तरुण भारतमध्ये जेव्हा विजय शेट्टीँचा 'सर्चलाईट' समाविष्ट असतो तेव्हा तर 'दुग्धशर्करा' योगच असतो. सर्चलाईट सदरातुन सिँधुदुर्गातील महत्वपुर्ण विषयांवर लेखन करताना शेट्टीनी अनेक विषय हाताळले आहेत.

गाडगीळ अहवालावेळी लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवुन सत्ताधा-यांनी लोकांच्या द्विधा मन:स्थितीचा फायदा घेत सत्ताधा-यांनी महामोर्चा काढला, तेव्हा ठराविक अपवाद वगळता अनेक पत्रकार सत्ताधा-यांच्या शक्तीपुढे गलितगात्र होऊन आपली लेखणीरुपी तलवार म्यान करुन बसले. लोकांमधील संभ्रम दुर करण्याची नितांत गरज असताना शेवटी विजय शेट्टीच आधुनिक महाभारतात अभिमन्यु बनुन कौरवांनी रचलेला चक्रव्युह भेदण्यासाठी पुढे सरसावले. 'गाडगीळ अहवाल : सत्य आणि भ्रम' असे सलग तीन लेख लिहुन शेट्टीँनी लोकांमधील संभ्रम दुर करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर भानु तायल नामक कोकण रेल्वेच्या अधिका-याने नियमावली पुढे करत कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँचे तैलचित्र कोकण रेल्वेच्या स्थानकातुन काढुन टाकण्याचा विचित्र फतवा काढला. बाकीच्या वर्तमानपत्रांनी बातमीपुरती बातमी देऊन आपले कर्तव्य पार पाडले परंतु आदरणीय मधु दंडवतेँच्या अशा अपमानानंतर एका संवेदनशील पत्रकाराचे मन थंड राहणे शक्यच नव्हते. 'घरात बापाचा फोटो लावायला कोणता नियम आड येतो...?' अशा शीर्षकाखाली शेट्टीँनी सनसनाटी लेख लिहिला. दंडवतेँच्या अपमानाची जाणीव झाल्यावर त्यांच्या कार्यावर, कर्तुत्वावर आणि व्यक्तिमत्वावर निस्सिम प्रेम करणा-या कोकणी माणसांच्या भावना दुखावल्या. खडबडुन जाग आलेल्या खासदार निलेश राणेँनी दंडवतेँचे तैलचित्र रेल्वेस्थानकात पुन्हा लावले. विजय शेट्टीँनी लगेचच निलेश राणेँचे आभार मानताना एकेकाळी दंडवतेँचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याँनी 'दंडवतेँचा विजय असो...', 'दंडवते अमर रहे...' अशा घोषणा दिल्या, हे आवर्जुन नमुद केले. ज्या काँग्रेस पक्षाने दंडवतेँना राजकीय जीवनात नेहमीच विरोध केला आज त्यांच्यांवरच दंडवतेँचा जयजयकार करण्याची वेळ आली आणि म्हणुनच दंडवतेँना 'मतांपलीकडचा नेता' म्हणतात, असेच काहीसे शेट्टीँना सुचवायचे असेल.

मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकरांनी कणकवली नगरपालिकेत मनसेचे डिपाँझिट जप्त झालेले असताना फक्त काँग्रेस नगराध्यक्षांवर आरोप करण्यासाठी किँवा त्यांची निष्क्रियता दाखवण्यासाठी कणकवली नगरपालिका आपल्या हातात द्या असे अर्धवट वक्तव्य केले तेव्हा लोकशाही म्हणजे काय असते याचे खडे बोल 'छोटा राजन' या लेखात विजय शेट्टीनीच राजन दाभोलकरांना सुनावले.देवगडात फळांवर प्रक्रिया करणारा कारखाना काढुन आंबा उत्पादकांचे कष्ट कमी करुन त्यांचा विकास करणा-या आमदार प्रमोद जठार यांना 'येस वुई कँन' लेख लिहुन शेट्टीँनी प्रोत्साहन दिले. तसेच जठारांची सिँधुभुमी संस्था अडल्या-नडलेल्या गरीबांना कशी मदत करते हे सिँधुदुर्गातील लोकांना कळावे यासाठी 'नमस्कार, मी आमदार प्रमोद जठारांकडुन आलोय' असा प्रशंसा करणारा लेख लिहिला.

केवळ स्वतःपुरता 'सर्चलाईट' सदर लिहुन शेट्टी थांबले नाहीत.
सिँधुदुर्गातील लोकांना गुरुविषयी वाटणारा आदर, त्यांच्या आपल्या गुरुप्रती असणा-या भावना, त्या गुरुचे विविधांगी पैलु सर्वाँसमोर यावेत यासाठी त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात 'गुरवे नमः' हा नवीन सदर सुरु केला. माझ्यासारख्या कित्येक लोकांनी आपल्या तोडक्यामोडक्या लिखाणाने गुरुवंदना दिली. ज्या गुरुला इतकी वर्षे ह्रुदयाच्या कप्प्यात आदराचे स्थान दिले होते त्या गुरुची ओळख अख्ख्या जगाला करुन देण्याचे भाग्य मिळवले.

ज्या विजय शेट्टीँमुळे हे सर्व काही साध्य झाले त्या विजय शेट्टीँचा परवाच 19 जुन रोजी वाढदिवस होता.MBA प्रवेश प्रक्रियेत व्यस्त असल्याने मी विजय शेट्टीँना त्या दिवशी हा लेख लिहुन शुभेच्छा देऊ शकलो नाही. प्रभाकर सावंतांनी अतिशय सुंदर लेख लिहुन शेट्टीँना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाला लेख लिहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी अजुन 1 वर्षे वाट पाहु इच्छित नाही. म्हणुनच 2 दिवस उशीराने का होईना विजय शेट्टीँना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर त्यांनी असेच लिखाण करुन पत्रकारितेत एक आदर्श प्रस्थापित करावा आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम पत्रकारात आपले स्थान मजबुत करावे. माझ्यासारख्या कित्येक चाहत्यांच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत नेहमीच राहतील.

(ता.क. फक्त कधीतरी सर्चलाईट सदर लिहिण्यापेक्षा तो नियमित करता येईल का, याचा विचार विजय शेट्टीँनी नक्की करावा. त्यांच्या एका चाहत्याची ही तक्रारवजा विनंती समजा.)

प्रमोद जठार साहेब कोणाला श्रद्धांजली देत आहात….?

विलासराव देशमुखांचा अस्थिकलश संपूर्ण राज्यात फिरवून भावनेच्या लाटेवर स्वार होत सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस करत होती, त्यामुळे विलासरावांना अमरात्वही मिळाले आणि मते सुद्धा मिळाली. या अगोदर राजीव गांधींच्या वेळी असलीच थेड कॉंग्रेसने केली होती. जणू काही एखादा संत किंवा महात्मा गेला या प्रकारे विरोधी पक्षाचे आमदार प्रमोद जठार सुद्धा भ्रष्टाचारी विलासरावांच्या अस्थिकालाशाच्या दर्शनासाठी गेले. मृत्यू एखाद्याचे जीवन संपवतो त्यामुळे तो वाईट असतोच .पण केवळ मृत्यू झाला म्हणून एखादा माणूस महापुरुष,युगपुरुष ठरू शकत नाही .
विलासराव देशमुखाना अशा उपाध्या लावणे हे भाबडेपणाचे आहे .माध्यमाना काही औचित्य ,संकेत बाळगावे लागतात पण तशी अपरिहार्यता सामान्य माणसास नसते .

विलासरावांनी महाराष्ट्र सरकारमधील जवळपास सर्व मंत्रीपदे,कालावधीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपद सांभाळली .पण या त्यांच्या कालावधीतील केवळ ५ धोरणात्मक आणि पुरोगामी निर्णय विचारले ज्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला तर त्याचे उत्तर शून्य असे द्यावे लागेल. या उलट ५ भ्रष्टाचाराची प्रकरणे सांगा म्हणलं तर सहज सांगता येतील. त्यांनी एक वेगळाच आदर्शघालून दिलेला आहे आणि तो घातक आहे. मुख्यमंत्र्याचे काम सर्व खात्यांवर देखरेख ठेवणे,महसुली उत्पन्न वाढवणे,जनहिताचे निर्णय घेणे आणि ते राबवणे ,कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेणे हे असते .परंतु त्यानी मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त एफ.एस.आय वाढवणे,मोकळे भूखंड बिल्डर्स च्या घशात घालणे आणि काँग्रेस पक्षासाठी आणि स्वतःसाठी मलिदा कमावणे हे काम निष्ठेने केले.नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याने त्याची सर्व जबाबदारी यांची होती.त्या बदल्यात बिल्डर्स नी मुंबई,पुणे नाशिक सारख्या शहरातील घर बांधणी क्षेत्रातील प्रत्येक स्क्वेअर फुट मागे ५०० रुपये या यंत्रणेस दिले .त्यातील २०० रुपये काँग्रेस च्या निवडणूक फंडात ,२०० रुपये सोनिया गांधीच्या स्विस खात्यात आणि १०० रुपये याच्या स्विस खात्यात गेले .हिरानंदानी बिल्डर ने पवई येथे सर्व सामान्यांसाठी स्वस्तात लहान घरे बांधण्याचा प्रस्ताव देऊन तो मान्य करून घेऊन प्रत्यक्षात धन दांड्ग्यांसाठी मोठी घरे बांधली आणि हे विकास आराखडे मंजूर होत असताना ,अवैध बांधकाम होत असताना नगर विकास खाते शांत बसून होते .मा.उच्च न्यायालयाने या संदर्भात अत्यंत कडक ताशेरे ओढले आहेत.
फंड रेझिंग मध्ये निष्णात असल्या कारणाने काँग्रेसने ही त्यांची नेहमी पाठराखण केली .

आदर्शला नियमबाह्य परवानगी देणे,रस्ता रुंदी बाबतचा नगर विकास सचिवांचा शेरा रद्द करणे ,सी .आर.झेड. नियम उल्लंघन करणे हे सर्व निर्णय यांनी तत्परतेने घेतले आणि असे करताना शहिदांच्या वारसानसाठी असलेल्या जागेचा आपण गैरवापर करत आहोत,राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणत आहोत याचे देखील नैतिक भान राखले नाही .मालाड ,वर्सोव्या जवळील अनाथ,अंध मुलींच्या वसतीगृहासाठी राखीव असलेला भूखंड ,त्याचे आरक्षण बदलून स्वतःच्याच ट्रस्ट’ (या ट्रस्ट ची नोंदणी देखील अवैध असल्याचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने दिला आहे ) ला कवडी मोल दराने (५३ रुपये पर स्क्वेअर फुट मुंबई मध्ये) देणे आणि तेथे धन दांड्ग्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारणे हे यांचे समाजकार्य...!
आपल्या मुलाला फिल्म देण्याच्या बदल्यात चित्र नगरीतील भूखंड सुभाष घईला नियम डावलून देणे हे यांचे सांस्कृतिक कार्य...!!
दिलीप सानंदा या उद्दाम आमदारकम सावकाराच्या सावाकारीने नाडलेल्या ,खंगलेल्या आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा बायको पोलिसात तक्रार देत असता आणि कर्तव्यदक्ष अधिकारी ती नोंदवून घेत असता थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून ती तक्रार नोंदवून न घेण्याचा आदेश देणे हा यांचा शेतकर्‍याबाबतचा कळवळा...!!!

याबाबत सर्वोच्च न्यायालयानेराजधर्माचे पालन केले नाही असे कडक ताशेरे ओढून दंड म्हणून १०,००,००० रुपये महाराष्ट्र सरकारला भरायला लावले आणि सरकारने ते जनतेच्या खिशातून भरले. या सर्व संदर्भात त्यांना प्रतिक्रिया विचारली असता चेहऱ्यावरचा मिश्कीलपणा किंचीत कमी होऊ न देता माणूस चुका करतो, चुका करून माणूस शिकतोअसे उत्तर देणारे हे गेंड्याच्या कातडीचे तत्कालीन केंद्रीय ग्राम विकास मंत्री....!!!!

सहकार हद्दपार आणि नामशेष करण्याचे काम यांनी मराठवाड्यात जातीने केले. कापूस एकाधिकार योजनेचे तीन तेरा वाजले .मुख्यमंत्री मराठवाड्याचा असून ही त्याचा अनुशेष कधिही भरून निघाला नाही .सिंचनात वाढ झाली नाही.बोगस नोंदणी झालेले सर्वाधिक मजूर मराठवाड्यात निघाले आणि रोजगार हमी योजनेची पूर्ण वाट लावण्याचे काम या दिवंगत नेत्यांच्या कारकीर्दीत झाले .
आघाडीचे सरकार आणि महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती हे मान्य केले तरी सहकार खाते प्रथम पासून काँग्रेस कडे होते .यांच्या कारकीर्दीत सहकारी पतपुरवठयाच्या यंत्रणेचे तीन तेरा वाजले,राष्ट्रवादीने सहकारी ब्यांका लुबाडणे आधीच चालू केले होते ,त्यात त्रिस्तरीय पतरचना कोलमडून पडली आणि सावकारी फोफावली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत लक्षणीय वाढ झाली ,पुन्हा या ब्यांकानी दिलेल्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडला .या वेळी रिझर्व ब्यांकेने वेलो वेळी दिलेले इशारे केराच्या टोपलीत टाकले गेले .
पूर्वी लातूर प्याटर्न नावाचा शैक्षणिक प्रकार १९९५ ते १९९९ मध्ये जोरात होता .यात ९ वी तील मुलांना मे महिन्यात १-२ आठवडे सुट्टी देऊन १० वी चा अभ्यास सुरु केला जात असे .या प्याटर्न मधून अनेक मुले लातूर परिसरातून मेरीट मध्ये आली .हा प्याटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांनी राबवला होता .यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांचे खच्ची करण करणे ,निधी अडवणे आणि आपल्या टिल्लू-पिल्लुंच्या खासगी महागड्या इंग्रजी शाळांना मान्यता देण्याचे धोरण अवलंबले आणि ते राबवले (हे धोरण आता महाराष्ट्रात सर्वत्र राबवले जात आहे ).त्या मुळे शिक्षणाचा दर्जा अमुलाग्र घसरला .सामान्य प्रशासन विभाग थेट मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतो .सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीतयांनी सरसकट कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना साईड पोस्टींग ला टाकण्याचे आणि मर्जीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवाजेष्टता डावलून महत्वाच्या पदावर नेमले .चंद्रशेखर यांसारखे अधिकारी याच काळात सरकारी नोकरी ला राम राम करून निघून गेले .या मुळे धोरणात्मक पातळीवर गोंधळ होताच पण प्रशासन सुस्त आणि अकार्यक्षम झाल्याने अंमलबजावणी चा ही बोजवारा उडाला .
कृपाशंकरसिंह सारख्या व्यक्ती मोठ्या झाल्या त्या यांच्या कारकीर्दीत...!!! .


२६/११ ची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने यांची होते.आपल्या ४-४ वर्षाच्या २ टर्म मध्ये एकदाही वरिष्ठ पोलीस अधिकारी,गुप्त वार्ता विभाग आणि गृह विभाग यांची संयुक्त बैठक घेतली गेली नाही .माणसे मेली,पोलीस मेले आणि कसलीही चाड न बाळगता हे मुलाला आणि राम गोपाल वर्मा ला घेऊन शुटिंगलोकेशन बघायला गेले .शेवटी हाय कमांड ने सांगितल्यावर राजीनामा दिला ..पण चेहऱ्यावर निर्लज्जपणा तसाच ठेवून...!!!
पुढे फंड रेझिंग ची आणि शरद पवार यांना शह देण्याची क्षमता लक्षात घेवून काँग्रेसने त्यांचे राज्यसभेत पुनर्वसन केले .विधिमंडळातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाशवी बहुमतामुळे त्यांचा विजय निश्चित होता पण शिवसेना-भाजपाने ऐनवेळी उमेदवार मागे घेऊन अशा माणसाची बिनविरोध निवड होऊ दिली .केंद्रात अवजड उद्योग खात्यचा भार स्वीकारताना हा माणूस व्हीअशी खूण करत माझे कोणी काही उपटू शकत नाही आशा आविर्भावात जनतेला समोरा गेला. मराठवाडा मराठेशाहीचा भाग कधीच होऊ शकला नाही याचे कारण यांच्या पूर्वजांनी देखील स्वधर्म,स्वभाषा,स्वदेश यांना महत्व न देता आपली देशमुखी टिकवण्यात धन्यता मानली .बॉम्बस्फोट होवोत,अतिरेकी हमले होवोत ,राज्यात दुष्काळ पडो,विजेची अभूतपूर्व टंचाई निर्माण होवो,शेतकरी आत्महत्या करोत,सामान्य माणूस रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करो ..म्हणजेच काहीही होवो पण चेहऱ्यावरची स्मितहास्य रेषा ढळू न देणे..कोणत्याही प्रश्नाला हसण्यावारी नेणे किंवा सोडवायचा प्रयत्न करतो असे दाखवत तो टोलावणे आणि पूर्णपणे विधिनिषेध शून्यता बाळगणे हे यांच्या स्वभावाचे आणि कारकीर्दीचे व्यवछेदक् लक्षण म्हणावे लागेल ! त्यांच्या कडे उमदेपणा,दिलखुलासपणा,दिलदारपणा असेल पण सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीची समाजाप्रती असलेली बांधिलकी,निष्ठा,कर्तव्यदक्षता,जबाबदारीचे भान इ.गुणांच्या संदर्भात त्यांच्या इतर गुणांचा उल्लेख आणि आदर करणे क्रमप्राप्त ठरते .यांचे सामाजिक मूल्यमापन करता जमा शून्य असल्याचे खेदाने म्हणावे लागेल .अशा माणसासाठी ज्याने ज्या मूल्यांवर आधुनिक भारताची उभारणी झाली त्या मुल्यांचा ऱ्हास केला त्या माणसा साठी तिरंगा अर्ध्यावर फडकावा,सरकारी इतमाम आणि बंदुकीच्या फैरी झाडाव्या हे या देशाचे दुर्दैव आहे .पण हे दुर्दैव येथेच थांबणार नाही ..व्यक्ती पूजेचे स्तोम माजलेल्या या देशात यांची पोकळी लवकरच भरून निघेल ..हे या देशाचे अधिक मोठे दुर्दैव आहे...!!!

सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांनी जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी लढ्यात का सामील झाले पाहिजे, यावर माझा हा लेख...


सिंधुदुर्गात गिर्ये येथे सरकार जेव्हा औष्णिक ऊर्जाप्रकल्प रेटु पाहत होते तेव्हा देवगडच्या जनतेने आणि आंबा उत्पादकांनी आपल्या लाडक्या जगप्रसिद्ध हापुस आंब्याच्या रक्षणाखातर सरकारचा हा प्रयत्न हाणुन पाडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच...! गिर्येतील त्या प्रस्तावित औष्णिक प्रकल्पामुळे आजुबाजुच्या परिसरातील उष्णता वाढुन त्याचा थेट परिणाम हापुस आंब्याच्या उत्पादनावर होणार होता. उत्पादन घटल्याने किंवा हापुस आंब्यावर काळे डाग पडल्याने आंबा उत्पादकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले असते. माझ्या या सर्व आंबा उत्पादक बांधवांच्या माहितीसाठी सांगु इच्छितो, गिर्येच्या ज्या प्रकल्पाला तुम्ही कडाडुन विरोध केलात तो 4000 M.W. क्षमतेचा औष्णिक प्रकल्प प्रत्यक्षात 8000 M.W. उष्णता निर्माण करुन परिसराचे तापमान वाढवणार होता मात्र ज्या जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यास तुम्ही टाळाटाळ करत आहात तो 10000 M.W. क्षमतेचा अणुप्रकल्प गिर्ये प्रकल्पापेक्षा जवळपास 4 पट जास्त तब्बल 30000 M.W. उष्णता निर्माण करणार आहे. सरळ रेषेत अंतर मोजायला गेलो तर गिर्येपासुन फक्त 10 ते 20 कि.मी.च्या परिसरात हा जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प उभारला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फार मोठा भाग आणि खास करुन देवगडची हापुस आंब्याची मोठी लागवड या प्रकल्पाच्या प्रभावित क्षेत्रात येते. फक्त जैतापुर रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या प्रकल्पापासुन कोणताच धोका नाही या जाणीवपुर्वक पसरवलेल्या गैरसमजाला बळी पडुन आज आपले आंबाउत्पादक मुग गिळुन गप्प बसले आहेत. अजुन काही दिवस ही शांतता अशीच राहिली तर मग पश्चाताप करण्याशिवाय अजुन कोणतीच गोष्ट आपल्या हाती राहणार नाही. जैतापुर अणुऊर्जाप्रकल्प विरोधीच्या लढ्यात सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांनी का सक्रिय सहभाग घ्यावा, याबाबतची कारणे मी पुढे नमुद करत आहे. तुम्हाला ती पटली तर नक्कीच जैतापुरच्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमच्यासोबत या.
 
1) अणुवीज प्रकल्प हा जेवढी वीज निर्माण करतो त्याच्या तिप्पट उष्णता निर्माण करतो. अणुवीज मुळातच औष्णिक वीज (THERMAL POWER) आहे. किंबहुना आम्ही म्हणतो ती HIGH THERMAL POWER आहे कारण इतर औष्णिक प्रकल्प (कोळसा, तेल, वायु, इत्यादी) जेवढी वीज निर्माण करतात त्याच्या साधारणपणे दुप्पट उष्णता निर्माण करतात तर अणुप्रकल्प तिप्पट उष्णता निर्माण करतात. मुळात अणुवीजेला विरोध असण्याचे हे एक मुख्य कारण आहे आणि गंमत म्हणजे हेच अणुप्रकल्प ग्लोबल वार्मिंगवर उपाय म्हणुन आपल्या गळी उतरवले जात आहेत. याप्रमाणे जैतापुरचा 10000 M.W.चा हा महाप्रकल्प 30000 M.W. उष्णता निर्माण करणार आहे. किंबहुना प्रत्यक्षात तो यापेक्षा जास्त उष्णता निर्माण करील कारण यात 1650 M.W. च्या 6 E.P.R. अणुभट्ट्या बसवण्यात आल्या आहेत त्या HIGH BURN प्रकारात मोडतात. पण समजा सरकारी अहवालाप्रमाणे 30000 M.W. उष्णतेचीच निर्मिती झाली तरी त्यातील 10000 M.W. चीच वीज मिळेल. उरलेली 20000 M.W. उष्णता जैतापुरच्या समुद्रात सोडली जाईल. बरे ही उष्णता समुद्र काही आपल्या पोटात साठवुन ठेवणार नाही किंवा ती पाण्यात विरघळुनही जाणार नाही ती पुन्हा वातावरणातच येणार. या उष्णतेमुळेच सिंधुदुर्गातील तापमान देखील प्रचंड प्रमाणात वाढेल आणि ही गोष्ट आपल्या लाडक्या हापुस आंब्याच्या उत्पादनासाठी कर्दनकाळ ठरु शकेल. 
 
2) जैतापुर अणुप्रकल्प उद्या सुरु झाला की त्यात निर्माण होणारी 10000 M.W. वीज देशात अन्य ठिकाणी वाहुन न्यावी लागेल. त्यासाठी वीज वाहुन नेणा-या तारा, ट्रान्सफाँर्मर, सबस्टेशन, इत्यादी आपल्या शेतातुन आणि बाजारातुन जाणार आहेत. प्रकल्पाला सगळीकडुनच कडाडुन विरोध होईल या भितीपोटी सरकारने याबाबत आपल्याला अद्याप कोणतीही कल्पना दिलेली नाही. आज तुम्ही तुमच्या कसदार जमिनीत भरघोस पिक घेताय पण जेव्हा या HIGH TENSION वीजेच्या तारा तुमच्या लागवडीखालील जमिनीवरुन जातील तेव्हा तुम्हाला तुमची जमीन हवी तशी वापरता येणार नाही. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर त्या तारांखाली कोणतेही बांधकाम करता येणार नाही. 

3) जैतापुर अणुप्रकल्पातील किरणोत्सारी अणुकच-याचे काय केले जाणार आहे याबाबत प्रकल्प अहवालात कुठे चकार शब्द काढलेला नाही मात्र भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुकराराप्रमाणे देशातील सर्व प्रकल्पाचा अणुकचरा कोणत्याही एकाच ठिकाणी पुरावा लागणार आहे. जर ते ठिकाण जैतापुर बाहेर कुठेतरी असेल तर जैतापुरातील जळलेले किरणोत्सारी इंधन कोकणातील रस्त्यातुन किंवा समुद्रातुन वाहुन नेले जाईल. जर ते ठिकाण खुद्द जैतापुर असेल तर भारतातील इतर अणुप्रकल्पातील अणुकचरा जैतापुरात वाहुन आणला जाईल. काही झाल तरी या कच-याच्या वाहतुकीमुळे आपल्या सिंधुदुर्गचे जे किरणोत्सारी प्रदुषण होणार आहे त्याचा धोका फक्त हापुस आंब्यालच नव्हे तर तुमच्या आमच्या जीवालाही तितकाच आहे  

4)जैतापुर अणुप्रकल्पामुळे कोकणचा किंवा स्थानिकांचा नेमका काय विकास होणार आहे याबद्दल बोलणे कोणताही प्रकल्पसमर्थक कटाक्षाने टाळतो कारण या प्रकल्पाने स्थानिकांना रोजगार मिळवुन देण शक्य नाही. अणुप्रकल्प हा केँद्र शासनाच्या अखत्यारीत असतो. हेल्पर, रीगर, शिपाई यापेक्षा जास्त कुशल कामगारांची भरती ही सर्व देशभरातून अर्ज मागवुन केली जाते. अणुवीज केँद्रापासून दहा किलोमीटरवर अणुकेँद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वसाहत असेल. एक रुग्णालय असेल, तेथे घरगडी, मोलकरीण, आया, शिपाई असे हंगामी रोजगार मिळू शकतील.म्हणजेच संपूर्णपणे नवीन असलेला एखादा रोजीरोटीचा मार्ग त्यांच्यावर लादला जाईल. ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतोय तिकडच्या गावक-यांना मत्स्योत्पादनाशिवाय पोटापाण्याचा दुसरा उद्योग माहित नाही. त्यांना प्रकल्प आल्यानंतर दूध, भाजी, इस्त्रीच्या दुकानांचे परवाने देण म्हणजे स्थानिकांचा विकास काय...? सरकारने आजपर्यँत प्रकल्पापुर्वी खोटी आश्वासने देऊन प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर तारापुर वीज प्रकल्पग्रस्त, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त, विविध धरण प्रकल्पग्रस्त यांचा विश्वासघात करत त्यांचे प्रश्न अनुत्तरीत ठेवले, ही उघड वस्तुतिथी आहे. त्या सरकारला जैतापुर प्रकल्पग्रस्तांना आश्वासने द्यायचा नैतिक अधिकारच नाही अणुप्रकल्पाच्या आसपासच्या प्रदेशातील विकास थांबवला जातो. अणुप्रकल्पापासुन 50 कि.मी त्रिज्येच्या परिसरात विमानतळ, रेल्वेस्टेशन, मोठे उद्योगधंदे आणले जात नाहीत. कोणतेही मोठे शहर वसवले जात नाही. या परिसरातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणले जाते. थोडक्यात अणुप्रकल्प येतात तेथील भागाचा विकास होत तर नाहीच किंबहुना तो थांबवला जातो. 

 5) देव न करो पण जैतापुर अणुप्रकल्पात जपानमधील फुकुशिमासारखा अणुभट्टीचा स्फोट होऊन एखादी दुर्घटना झालीच तर कोकणचा विनाश अटळ आहे. जपानसारखा तंत्रज्ञानात प्रगत असणारा देश जो अणुअपघात टाळु शकला नाही तो भारतासारख्या भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात कधीच होणार नाही हे प्रकल्प समर्थकांच म्हणण हास्यास्पद आहे. अगदी ते खर धरल तरी एक गोष्ट त्यांनी ध्यानात घ्यावी की , अणुभट्टी शांतपणे चालु आहे असे वाटले तरी ती सतत किरणोत्साराचे उत्सर्जन व प्रसारण करीत असते. भट्टीतील किरणोत्सारी वायु व द्रव्ये वातावरणात सोडली जातात तर किरणोत्सारी गंज तसेच किरणोत्सारी पाणी नजीकच्या समुद्रात सोडले जाते. किरणोत्साराने प्रदुषित झालेल्या या वातावरणाने अथवा पाण्याने जीवनाचे मूळ घटक असलेल्या पेशीँवर आघात होतो. त्यामुळे कर्करोगाचे विविध प्रकार, जन्मजात व्यंगे, इंद्रिये निकामी होणे, मतिमंदत्व, अभ्रके - बालकांमधील पुढील असंख्य पिढ्यांमधील दोष व व्यंग, मासिक पाळीविषयी समस्या, वंध्यत्व, अशक्तपणा अशा अनेकानेक व्याधी होतात. मुंबईत असलेल्या "भाभा अणुसंशोधन केँद्र (B.A.R.C.)पासुन जर मुंबईला कोणताच धोका उद्भवला नाही त्यामुळे जैतापुरला प्रकल्पापासून काहीच धोका नाही असा प्रचार प्रकल्पसमर्थक शास्त्रज्ञ करताना दिसतात पण तेच लोक B.A.R.C.च्या कर्मचा-यांच्या वसाहतीमध्ये किरणोत्साराने बाधित होऊन मतिमंद झालेल्या मुलांच्या शाळेचा उल्लेख करणे कटाक्षाने टाळतात. किरणोत्साराचा प्रभाव होऊन जर एक शाळा सुरु करण्याइतपत जास्त मतिमंद मुले B.A.R.C.मध्ये कर्मचा-यांच्या एका छोट्याशा वसाहतीत जन्माला येत असतील तर जैतापुर प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर कोकणच्या पुढच्या पिढीला मतिमंद करुन सरकार मतिमंद मुलांच्या शाळा कोकणात काढणार आहे का...? यावरुन एकच गोष्ट सिद्ध होते की अणुअपघातापुरतीच नव्हे तर एरव्ही शांतपणे चालणारी अणुभट्टी तेवढीच घातक आहे. 

6)किरणोत्साराची गळती सर्व अणुप्रकल्पातुन होतच असते. कोणताही अणुप्रकल्प त्याला अपवाद नाही. जैतापुर अणुप्रकल्पातुन जो किरणोत्सार बाहेर पडेल त्यामुळे एकंदरीतच रत्नागिरी, राजापुर आणि देवगडमधील हापुस आंबे किरणोत्सारबाधित होतील. आज या तिन्ही ठिकाणच्या हापुस आंब्याला जागतिक बाजारपेठ आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत या हापुस आंब्यांला देवगड हापुस किंवा राजापुर हापुस किंवा रत्नागिरी हापुस अशी वेगवेगळी ओळख न मिळता, एकत्रितपणे "कोकणचा हापुस आंबा" अशी ओळख मिळते. आम्ही कितीही पोटतिडकीने सांगितले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापुर अणुप्रकल्पाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही वाईट परिणाम होणार नाही असे तुमचे ठाम मत बनले असेल तर ते काही वेळासाठी मान्य करुया. जैतापुर अणुप्रकल्पातील किरणोत्सारामुळे रत्नागिरी आणि राजापुरातला हापुस आंबा नक्कीच किरणोत्सारबाधित होईल यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही.उद्या जागतिक बाजारपेठेत 100 आंब्यांपैकी 25 ते 30 आंबे जरी किरणोत्सारबाधित आढळले तरी जागतिक बाजारपेठेत बदनामी फक्त रत्नागिरी किंवा राजापुरच्या हापुसची होणार नाही तर मघाशी सांगितल्याप्रमाणे एकत्रिपणे कोकणच्या हापुस आंब्याची बदनामी होईल कारण जागतिक बाजारपेठेत हापुस आंब्याची वेगळी वर्गवारी केली जात नाही.किरणोत्सारबाधित हापुस आंबा खाल्ल्याने कर्करोगासारखे दुर्धर आजार उद्भवतील या भीतीने लोक आंबा खाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. अशा प्रकारे देवगडच्या हापुसला बाजारपेठच उपलब्ध होणार नाही आणि आंबा उत्पादक देशोधडीला लागतील. काही वर्षाँपुर्वी कोँबड्यांना झालेला 'बर्ड फ्ल्यु' रोग तुम्हाला ऐकुन माहितच असेल. त्यावेळी तो रोग काही देशातील सर्वच कोँबड्यांना झाला नव्हता.फक्त काही कोँबड्याच त्या रोगाला बळी पडल्या होत्या तरी देखील जीवाला धोका नको म्हणुन संपुर्ण देशभर अगदी सिंधुदुर्गातही लोकांनी कोँबड्या खाणच सोडुन दिल. कित्येक पोल्ट्रीधारक कंगाल झाले परंतु सुदैवाने तो रोग संपुष्टात आल्यावर लगेचच पोल्ट्रीचा व्यवसाय पुर्वपदावर आल्याने ते बरबादीपासुन बचावले. उद्या हापुस आंबा किरणोत्साराने बाधित झाला तर आंबा उत्पादकांची हालत याच पोल्ट्रीधारकांप्रमाणे होईल पण तुमच्या दुर्देवाने किरणोत्साराचा हा राक्षस एखाद्या रोगासारखा ठराविक काळापुरती मर्यादित नसुन कायमस्वरुपी टिकत असल्याने देवगडमधील हापुस आंब्याचा व्यवसाय कायमस्वरुपी संपुष्टात येईल. जैतापुरचा हा विनाशकारी अणुप्रकल्प ज्या माडबन परिसरात होऊ घातलाय तिकडचे आपले कोकणी बांधव गेली 4 वर्षे अगदी प्राण पणाला लावुन लढा देत आहेत. पुरुषांसोबत स्त्रियांनीसुद्धा अनेकदा तुरुंगवास भोगलाय. तबरेज सायेकर नावाचा आपल्यातलाच एक युवक आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आपल्या प्राणाला मुकलाय, अनेक जण जखमी अवस्थेत आहे. एवढे अत्याचार होऊनही फक्त आपल्या कोकणचा विनाश होऊ नये या एकाच ध्यासापायी त्या लोकांनी हा सुरु ठेवलाय मात्र कोकणातील बाकीच्या भागातुन काहीच पाठिँबा मिळत नसल्याने अजुनपर्यँत जैतापुरच्या आंदोलनाला हवे तेवढे यश मिळाले नाही. आज जर सिंधुदुर्गात आपण सगळे मिळुन जैतापुर अणुप्रकल्पविरोधी आंदोलन उभारु शकलो तर गेली 4 वर्षे एकाकी लढणा-या या लोकांना बळ आणि स्फुर्ती मिळेल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातुन या विनाशकारी अणुप्रकल्पाला कडाडुन विरोध झाला तर सरकारलाही तो रद्द करावा लागेल. अजुनही वेळ गेलेली नाही. आता फक्त कोकणी लोकांची एकजुटच आपल्याला या नवीन संकटातुन वाचवु शकते.