रविवार, ३० जून, २०१३

शालेय शिक्षणापलीकडचे वास्तव दाखवणारा व्यासंगी 'गुरु'....

'शिक्षकी पेशा' एक व्रत समजुन विद्यार्थ्याँना घडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा शिक्षक, चेह-यावर दाट दाढी आणि त्या दाढीतुन कळीप्रमाणे उमलणारे ते स्मितहास्य, धारदार परंतु कानाला गोड वाटणारा आवाज असे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या 'न्यु इंग्लिश स्कुल ओरोस'चे मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर...!!!
"गुरुः ब्रम्हा, गुरुः विष्णु, गुरुः देवो महेश्वरा, गुरुः साक्षात परब्रम्ह, तस्मैश्री गुरवे नमः..."
या एका श्लोकात गुरुची महती सांगितली आहे आणि ज्यांच्या नावाची सुरुवातच 'गुरु' या पवित्र शब्दाने होते असे 'गुरुदास कुसगावकर' सर मला गुरु म्हणुन लाभले.
न्यु इंग्लिश स्कुल ओरोस' ही आमची शाळा आजही जिल्हा परिषदेच्या भाड्याच्या इमारतीत भरते, 'धी कसाल पंचक्रोशी संस्था' शाळेची स्वतःची नवीन इमारत उभी करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करत आहे पण शाळेची खरी ओळख भव्य-दिव्य इमारतीवर अवलंबुन नसते तर त्या शाळेत दिल्या जाणा-या शिक्षणाच्या दर्जावर अवलंबुन असते, हे वेळीच ओळखुन मोजक्या जागेत, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून, प्रशालेचे मुख्याध्यापक या नात्याने गुरुदास कुसगावर सरांनी आपले कार्य सुरु केले आणि आज त्यांनी आमच्या शाळेला फक्त पंचक्रोशीतच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कुसगावकर सरांचे वडील गोविंद कुसगावकर हे देखील शिक्षक होते आणि हा शैक्षणिक वारसा कुसगावकर सरांना नक्कीच आपले वडील 'कुसगावकर गुरुजी' यांच्याकडुनच मिळाला असणार.
जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीतच आमची शाळा असल्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातुन नोकरीपायी सिंधुदुर्गनगरीत राहणा-या अधिकारी, शिपाई, पोलिस, डॉक्टर्स लोकांची मुले आमच्या शाळेत येतात तर दुसरीकडे ओरोसमधील स्थानिक शेतकरी, पदाधिकारी, प्रतिष्ठित मंडळी यांची मुलेही आमच्याच शाळेत शिकतात. सांस्क्रुतिकद्रुष्ट्या आणि मुख्य म्हणजे आर्थिकद्रुष्ट्या फार मोठे अंतर असणा-या या मुलांना एकत्रितरित्या शिकवणे फार कठीण काम असते पण कुसगावकर सरांनी आपल्या अंगीभुत कौशल्याने हा ताळमेळ देखील अगदी योग्य प्रकारे घडवुन आणला आहे. सकाळी दारोदारी पेपर टाकुन पैसे कमावत शिक्षण घेणारा एक स्थानिक मुलगा आमच्या शाळेत शिकत होता पण कालांतराने ही तारेवरची कसरत करणे त्याला जमत नसल्याने तो शाळेत यायचाच बंद झाला. आजुबाजुला श्रीमंत घरातील शिक्षण घेणारी मुले पाहुन त्या वयात मानसिक खच्चीकरण होणे देखील स्वाभाविकच होते. अशा कठीण प्रसंगी कुसगावकर सरांनी त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेत सांगितले की, शाळेतील बाकीची मुले आई-वडीलांनी केलेल्या कमाईवर शिकतात मात्र तु एकटाच स्वकष्टाने केलेल्या कमाईवर शिकतोस, याचा खर तर तुला अभिमान वाटायला हवा. गरीब म्हणुन जन्माला येण यात आपली कोणतीच चुक नसते पण परिस्थितीत कोणतीही सुधारणा न करता आपण गरीब म्हणुन मेलो तर ती सर्वस्वी आपलीच चुक असते. जीवनातील या अमुल्य अशा तत्वज्ञानाची सरांनी त्या मुलाला जाणीव करुन दिली, गरीबीतुन बाहेर काढुन विजयपथावर नेण्याचा राजमार्ग शिक्षणातच असतो असा सल्ला देखील दिला. सरांनी दिलेल्या या प्रोत्साहनानंतर तो पोरगा नियमित शाळेत येऊ लागला. या आणि अशा गरीबीत होरपळणा-या कितीतरी मुलांना कुसगावकर सरांनी अनेक वेळा आर्थिक मदत देखील केली आहे. आर्थिक कुचंबनेपायी कोणी शिक्षणापासुन वंचित राहु नये एवढा एकच उदात्त हेतु यामागे होता.
सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना आहे, असे कुसगावकर सर नेहमी म्हणायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर टपोरे असावे यासाठीच त्यांनी पांग्रडचे हस्ताक्षरतज्ञ धोँडी सावंत यांना पाचारण करुन शाळेत 'हस्ताक्षर मोहिम' राबवली. माझे हस्ताक्षर अतिशय खराब असल्यामुळे कुसगावकर सरांनी वैयक्तिक लक्ष देऊन माझ्याकडुन दुसरी-तिसरीच्या मुलांसाठी उपलब्ध असणा-या सुलेखनपुस्तिका इयत्ता नववीत गिरवुन घेतल्या आहेत. मळगावला कुसगावकर सरांचे गुरु प्रा.विजय फातर्पेकर यांनी 'कुमार वाचक शिबीर' हा अभिनव उपक्रम सादर केला होता. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन असेल तरच त्यांचा सर्वाँगिण विकास होऊ शकतो त्यामुळे उन्हाळी सुट्टीत कुसगावकर सरांनी फातर्पेकर सरांच्या धर्तीवर 'वाचाल तर वाचाल' हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवुन आपल्या विद्यार्थ्याँसाठी वाचन शिबीर आयोजित केले.

आपले विद्यार्थी फक्त अभ्यासातच नव्हे तर सांस्क्रुतिक किंवा नाट्यक्षेत्रातही पुढे असायला हवेत यासाठी कुसगावकर सरांनी नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला दरवर्षी आमच्या शाळेची एकांकिका पाठवण्यास सुरुवात केली आणि त्यातुनच प्रेरणा घेऊन रंगमंच गाजवणारे कितीतरी विद्यार्थी आज आमच्या शाळेने तयार केले आहेत.
पैसा आणि करियरला 'अनिवार्य' समजुन त्याच्या मागे सुसाट धावणा-या आमच्या पिढीला देशभक्ती 'ऑप्शनल' वाटु लागली आहे. भविष्यात याचे दुरगामी परिणाम आपल्याला निश्चितच भोगावे लागतील मात्र या सामाजिक ऱ्हासास आपली शिक्षणपद्धती तितकीच जबाबदार आहे. देशभक्तीच्या संस्काराचे झरे शाळेतच पाझरावे लागतात आणि बऱ्याच शाळांमध्ये एव्हाना ते आटले असले तरी आमच्या शाळेत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी देशभक्तीपर गीतांची समुहगान स्पर्धा घेऊन ते पाझरत ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम कुसगावकर सरांनी हाती घेतला.
पगारातुन मिळणा-या पैशापेक्षा किंवा शासनाकडुन मिळणा-या 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'पेक्षा विद्यार्थ्यांच्या ह्रुदयात कायमस्वरुपी मजबुत केलेले स्थान हीच एका शिक्षकाची खरी कमाई असते आणि आमचे कुसगावकर सर याबाबतीत तर खुपच श्रीमंत आहेत. ओरोस हायस्कुलच्या स्नेहसंमेलनाला माजी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती याचाच तर पुरावा आहे. दरवर्षी शाळेतुन बाहेर पडलेल्या कोणत्या ना कोणत्या बँचचे विद्यार्थी कुसगावकर सर आणि शाळेवरील प्रेमापायीच शाळेत जमुन 'गेट टु गेदर' करतात. आजही जेव्हा आयुष्यातील महत्वपुर्ण निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा कुसगावकर सरांचा सल्ला घेण्यासाठी पाऊले आपोआपच शाळेच्या दिशेने वळतात. शिक्षक-विद्यार्थ्याँमध्ये मित्रत्वाचे नाते असायला हवे असा कुसगावकर सरांचा नेहमी आग्रह असायचा आणि त्यामुळेच दरवर्षी आमच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याँना निरोप देताना 'शिक्षक विरुद्ध विद्यार्थी' असा मैत्रीपुर्ण क्रिकेट सामना खेळवला जातो.
सध्या इंग्रजी आणि सेमी-इंग्रजी माध्यमांचे भुत लोकांच्या डोक्यावर बसले आहे, कळपातील मेँढरांप्रमाणे वागायची सवय असलेले लोक मराठी माध्यमात मुलांना शिकवणे कमीपणाचे मानु लागले आहेत. त्यामुळे सगळीकडेच मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्याँची लक्षणीय घट होत आहे पण पालक एक गोष्ट विसरतायेत की इंग्रजी माध्यम विद्यार्थी घडवत नाहीत तर ते परिक्षार्थी तयार करण्याचा कारखाना बनले आहे. 'विद्यार्थी' आणि 'परिक्षार्थी' या दोन शब्दांमध्ये पुसटशी रेषा असते. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहावे कारण परिक्षार्थी बनुन शिक्षण कधीच घेता येत नाही. आपल संपुर्ण आयुष्य हिच खर तर एक परिक्षा असते. दहावी-बारावी अशा अनेक लढाया जिंकत यशाचे शिखर गाठायचे असते. प्रत्येकवेळी यश मिळेलच असे नाही, कित्येकदा अपयश पाचवीला पुजलेले असते मात्र अपयश मिळल्यानंतरही खचुन न जाता जो आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहतो तोच अंतिमतः विजयी होतो. प्रत्येक लढाई जिंकता येईलच असे नाही मात्र अंतिम युद्ध जिंकणे अत्यावश्यक असते. दहावी बारावीची मार्कलिस्ट करियच्या द्रुष्टीने निश्चितच महत्वाची असतात पण त्यांनाच सर्वस्व समजुन जीवाचा आटापिटा करण्यात काहीच अर्थ नसतो. आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर जेव्हा तुम्ही मागे वळुन पाहता तेव्हा एक माणुस म्हणुन तुम्ही किती यशस्वी झालात यातच तुमची आयुष्याची खरी मिळकत असते.
कोणताही विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश करतो तेव्हा तो इवल्याशा रोपट्यासारखा असतो. त्या रोपट्याला संस्कारांचे खतपाणी देऊन, त्याची जोपासना करत मोठ्या वृक्षात रुपांतरीत करण्याचे कार्य शिक्षक करतो आणि त्या वृक्षाला लागलेली गोड-गोड फळे मात्र सर्व समाजाला चाखायला मिळतात म्हणुनच एक शिक्षक समाजकार्यच करत असतो. कुसगावकर सर आम्हाला दहावीच्या निरोप समारंभावेळी दिलेल्या भाषणात म्हणाले होते की, "तुम्ही विद्यार्थी हे आमच्यासाठी आरशासारखे आहात. तुमची समाजातील वागणुक, मुल्ये, प्रामाणिकपणा यात समाज तुम्हाला घडविणा-या शिक्षकांना पाहत असतो."
आज ओरोस हायस्कुलच्या कितीतरी विद्यार्थ्याँनी अनेक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे आणि त्या सर्वाँच्या पंखात भरारी घेण्याचे सामर्थ्य देण्याचे काम निश्चितच कुसगावकर सरांनी केले आहे. कुसगावकर सरांनी निर्माण केलेल्या या अनेक आरशांमध्ये लोक त्यांची प्रतिमा नक्कीच पाहत असतील. यापुढच्याही कारकिर्दीत त्यांनी पैलु पाडुन असेच अनेक हिरे निर्माण करावेत याकरीता त्यांच्याच तालमीत तयार झालेला एक विद्यार्थी म्हणुन मनःपुर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत इथेच थांबतो.
अशा हरहुन्नरी, कर्तुत्ववान, कर्तव्यदक्ष 'गुरु'वर्याबद्दल आणखी मी तरी काय लिहु...???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा