रविवार, ३० जून, २०१३

कर्मयोगी मधु दंडवतेँच्या नशीबी नेहमीच क्रुतघ्नता का यावी...?


 कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे सावंतवाडी स्थानकावरील तैलचित्र कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानु तायल यांनी राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र रेल्वेस्थानकाच्या आवारात लावता येत नाही हा रेल्वेमंत्रालयाचा नियम पुढे करत तडकाफडकी काढुन टाकले. आदरणीय मधु दंडवते कोकणच्या जनतेसाठी किँवा साक्षात कोकण रेल्वेसाठी कोण होते, हे जाणुन घेण्याचा साधा प्रयत्न देखील कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला नाही. कदाचित भानु तायल यांना कोकण रेल्वेसाठी दंडवतेँचे असणारे योगदान माहित नसेल असे ग्रुहित धरु पण कोकणातील किती तरुणांना "दंडवते कोण होते?" या प्रश्नाच उत्तर देता येईल. तैलचित्राच्या निमित्ताने का होईना कोकणातील तरुणाईला दंडवतेँची खरी ओळख पटावी आणि दंडवते कार्यरत असतानाच्या कोकणच्या वैभवशाली राजकीय परंपरेचा इतिहास त्यांना समजावा, यासाठीच लेखाच्या माध्यमातुन हा छोटासा प्रयत्न करत आहे.
माझे वय 22 वर्षे असल्याने दंडवतेँच्या रामराज्याचा भाग बनण्याचे भाग्य माझ्या नशीबी कधी आले नाही पण दंडवतेँचे राजकरण त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आजुबाजुच्या वरिष्ठ मंडळीँकडुन समजावुन घेतल्यावर, दंडवतेँवर लिहिले गेलेले लेख, पुस्तके वाचल्यावर "दंडवते कोण होते?" या प्रश्नाच उत्तर मला हळुहळु उलगडत गेल आणि दंडवतेँच राजकरण ज्यांना अनुभवण्यास मिळालं त्या लोकांचा हेवा देखील वाटु लागला. दंडवतेँना अभ्यासल्यावर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या-
नैतिकता हरवत चाललेल्या काळात विचारांच आदर्शवत राजकरण करणारे दंडवते होते...!
"
साधी राहणी, उच्च विचारसरणी" या तत्वाचे खरे उपासक दंडवते होते...!!
कोकण रेल्वेचं अशक्यप्राय स्वप्न पाहुन ते सत्यात उतरवताना विरोधकांची बोचरी टिका अगदी हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहुन सहन करणारे आधुनिक युगातील 'महात्मा' दंडवतेच होते...!!!
एक काळ असा होता की, प्रा.मधु दंडवते, बँ.नाथ पै या नावातच अवघे कोकण सामावलेले असायचे. शब्द आणि वक्त्रुत्व यांचा सर्वोत्क्रुष्ठ मिलाफ असलेली या मंडळीँची संसदेतील भाषणे आजही अभ्यासाकरिता जतन करुन ठेवलेली आहेत आणि त्यांच्या याच कर्तुत्वामुळे देशभरात राजापुर मतदारसंघाची ख्याती 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' अशी पसरली होती. आजही मुंबई, पुण्यासारख्या एखाद्या शहरात गेलात आणि तिथल्या कोण्या आजी-आजोबांना सांगितले की मी कोकणातुन आलोय तर त्यांच्या तोँडुन आपसुकच उद्गार येतील-
"
कोकण...? म्हणजे दंडवतेँच्या मतदारसंघातील आहात तर...??"
देशाचे अर्थमंत्री, रेल्वेमंत्रीपद भुषविलेल्या आमच्या लाडक्या नानांच्या पुण्याईमुळेच आजही देशभरात कोकणी माणसाकडे आदरयुक्त नजरेने पाहिले जाते आणि त्याचे अभिमानाने वर्णन करताना डोळ्यात आनंदाश्रु आल्यावाचुन राहत नाहीत. मधु दंडवते या माणसाचे कार्य, राहणीमान एवढे उच्च दर्जाचे होते की ते लोकांच्या स्मरणात राहावे म्हणुन स्मारके उभारण्याची, तैलचित्र लावण्याची कधी गरजच भासली नव्हती आणि यापुढेही भासणार नाही. आयुष्यभर पुतळे, स्मारके यांना विरोध केलेल्या दंडवतेँनादेखील हा पोरखेळ कधीच मान्य झाला नसता. फक्त ज्या माणसाने स्वप्नवत वाटणारी कोकण रेल्वे अथक परिश्रम करुन प्रत्यक्षात साकारली त्याबद्दल उपकार म्हणुन नव्हे तर क्रुतज्ञता म्हणुन तरी दंडवतेँचे तैलचित्र कोकण रेल्वेच्या आवारात लावणे गरजेचे होते पण दंडवतेँच्या नशीबी इथेही क्रुतघ्नताच आली. तसा क्रुतघ्नता आणि दंडवतेँचा खुप जवळचा संबंध आहे. प्रा.मधु दंडवते पाच वेळा राजापुर मतदारसंघातुन खासदार म्हणुन निवडुन गेले होते मात्र ज्यावेळी त्यांनी कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न केवळ कोकणी लोकांसाठी पुर्णत्वास नेऊन दाखविले, हव तर त्याचीच परतफेड म्हणा, कोकणी लोकांनी दंडवतेँना त्यानंतर लगेचच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये क्रुतघ्नपणाचा कळस गाठत पराभुत केले. कोकणी लोकांचा दळभद्रीपणा म्हणा किँवा दुर्देव, कर्मधर्मसंयोगाने नेमकी त्याच वेळी दंडवतेँना पंतप्रधान बनण्याची नामी संधी चालुन आली. महाराष्ट्रच नाही तर सगळा देश कोकणचा नेता देशाचा पंतप्रधान बनेल म्हणुन अवाक झाला होता. पंतप्रधानपदासाठी कोणत्याही आघाडीत उड्या मारण्यास तयार असणारे महाराष्ट्राचे तथाकथित जाणते राजे त्यावेळी दंडवतेँच्या जागी असते तर त्यांनी एव्हाना सगळ्या तत्वांना जागीच तिलांजली देत राज्यसभेवर निवडुन जात पंतप्रधानपदाची माळ आपल्या गळ्यात पाडुन घेत क्रुतक्रुत्य झाले असते. नितीमत्ता गहाण ठेवलेल्या दंडवतेँच्या काही सहका-यांनी सुद्धा त्यांना राज्यसभेवर निवडुन जात पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले दिले. आयुष्यभर प्राणापेक्षा जास्त जपत आलेल्या तत्वांशी फारकत घेत तडजोड करण दंडवतेँच्या स्वभावातच नव्हे तर रक्तात देखील नव्हत. तत्वांच्या या पुजा-याने अगदी विनम्रतापुर्वक पंतप्रधानपद नाकारताना सांगितल-
"
मागच्या दरवाजाने (राज्यसभेतुन निवडुन जात) पंतप्रधान स्वीकारण मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारल तिथेच माझ राजकरण संपल."
केवढा हा त्याग...? कधी बघितली आहे का राजकरणात अशी त्यागमुर्ती...??
जीवंतपणी जपलेला हा त्याग मरणानंतरही कायम ठेवत नानांनी आपले शरीर दान केले. कोकण रेल्वेच्या पुर्णत्वानंतर पत्काराव्या लागलेल्या आकस्मिक पराभवामुळे दंडवतेँसारखा कर्मयोगी मनातुन अस्वस्थ झाला होता.
"
मंदिराच्या पुर्णत्वानंतर शिल्पकाराची गरज भासत नाही" हे दंडवतेँचे उद्गार याचीच तर साक्ष देतात.
का झाला असेल दंडवतेँचा पराभव...? का झाले असतील कोकणचे विचारी लोक इतके बेईमान...??
असे कित्येक प्रश्न मनात आल्यावाचुन राहत नाहीत आणि जेव्हा त्यांच्या मुळाशी जाऊन निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा नव्वदच्याच दशकात कोकणात नव्याने उदयास येऊ लागलेली चंगळवादी राजकीय संस्क्रुती या प्रश्नांच्या उत्तरादाखल मिळते.
नव्वदच्या दशकापर्यँत तात्विक वादाने खेळल्या जाणा-या निवडणुका आता राजकीय वादाचे उग्र रुप घेऊ लागल्या. निवडणुकीनंतर लगेचच आरोप-प्रत्यारोप विसरुन एकमेकांना अलिँगन देत खुल्या मनाने अभिनंदन करणारे उमेदवार आता निकालापुर्वीच विरोधी उमेदवाराचे खुन पाडु लागले. हिरवा शालु नेसलेली कोकणी माती प्रथमच रक्ताने लाल झाली. या प्रव्रुत्तीँना त्याच वेळी ताबडतोब लगाम लावणे जरुरीचे होते मात्र निवडणुकांच्या आदल्या दिवशी मिळणारे मटणाचे तुकडे, दारुच्या बाटल्या, बाज्यापेट्या आणि पैशांची बंडले पाहुन इतकी वर्षे मुद्दे पाहुन मतदान करणा-या कोकणी लोकांची टाळकी एकाएकी फिरली. नेता, त्याचे चेले आणि कार्यकर्ते अशी निर्माण झालेली साखळीच कोकणच्या वैचारिक -हासास कारणीभुत ठरली. स्वतःला लोकनेते घोषित करणारे हे तथाकथित कंत्राटदार आपल्याच चेल्यांना आणि कार्यकर्त्याँना कंत्राटे मिळवुन देत गेले. शासकीय कामात घोटाळे करुन स्वतःदेखील श्रीमंत झाले. याच काळ्या पैशातील थोडाफार पैसा निवडणुकांच्या काळात गरीब जनतेला देत त्यांची मते विकत घेत पुन्हा निवडुनही येऊ लागले. पैशांच्या सामर्थ्यापुढे दंडवतेंच्या तत्वांची पुण्याई अक्षरशः धारातीर्थी पडली आणि अखेर निवडणुकीत दंडवते पराभवला सामोरे गेले. "कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली..." या सुरेश भटांच्या ओळी दंडवतेँच्या बाबतीत अगदी तंतोतंत ख-या ठरल्या.
दंडवते कधीही कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे करत नसत. माझ्या शिफारसीमुळे जर माझ्या कार्यकर्त्याच काम होणार असेल आणि त्याच वेळी नियमात वागणा-या अन्य कुणाच नुकसान होणार असेल तर ते कधीही योग्य नाही. कोकण रेल्वेची कंत्राटे अशा शिफारसी करत जर दंडवतेँनी आपल्या कार्यकर्त्याँना मिळवुन दिली असती तर कोकण रेल्वे साकारणारे इंजिनियर ई.श्रीधरन सर्वशक्तिनीशी काम करुच शकले नसते. आदर्श नेता आणि कार्यक्षम अधिकारी एकत्रित आले तर काय कमाल करु शकतात याचे कोकण रेल्वे जीवंत उदाहरणच म्हणावे लागेल. दंडवतेँनी राजकरणातुन कधी स्वतःसाठी पैसा कमावला नाही आणि आपल्या कार्यकर्त्याँनाही पैसा उभारु दिला नाही. देशाचे अर्थमंत्रीपद भुषविलेला नेता स्वतःसाठी गाडी विकत घ्यायला कर्जाकरीता बँकेची पायरी चढतो यातच सर्व काही सामावलेल आहे. आजकाल साधे राज्यमंत्री सुद्धा सोबत दोन-चार गाड्यांचा ताफा घेऊन मोठ्या ऐटीने हिँडताना दिसतात मात्र केँद्रात मंत्रीपदे भुषवुन बस थांब्यावर बसची वाट पाहत रांगेत उभे राहणारे दंडवते इतरत्र कुठेच दिसत नाहीत. सामान्यांमध्येच वावरत असल्याने दंडवतेँना सामान्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यांची चांगलीच जाण असायची. दंडवतेँकडे रेल्वेमंत्रीपद येण्यापुर्वी लोकांना रेल्वेत लाकडी बाकावर बसुन क्लेशकारक प्रवास करावा लागायचा. रेल्वेमंत्री झाल्यावर लगेचच दंडवतेँनी रेल्वेची बैठकव्यवस्था कुशनची करत सामान्यांना दिलासा दिला. कार्यकर्त्याँची वैयक्तिक कामे करण्यापेक्षा सर्वसमावेशक लोककल्याणावर दंडवतेँनी भर दिला आणि जनतेने निवडुन दिलेला सेवक याची नेहमीच जाणीव ठेवत अगदी न चुकता दरवर्षी स्वतः केलेल्या कार्याचा अहवाल लोकांसमोर ठेवला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील एका आदर्श लोकप्रतिनिधीचे दंडवते एक जिवंत प्रतिक होते.
शेवटी एखाद्या पिढीतील लोकांची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. पैशांसाठी हपापलेल्या कोकणातील तरुण पिढीने दंडवतेँसारखा आदर्श नेता कोकणच्या राजकरणातुन कायमचा संपवुन टाकला आणि सत्तापिपासु गोचिडांना जन्म दिला. आज लोकांनीच जन्माला घातलेले हे असुर इतके माजले आहेत की, कोकणातील हिरवागार निसर्ग, पर्यावरणप्रेमी सामान्य जनता या सगळ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ पाहतायेत. या स्वयंघोषित हुकुमशहांना आता कोणाचीच भीती राहिली नाही. चारी बाजुंनी संकटात सापडलेल्या कोकणच्या जनतेला अशा बिकट परिस्थितीत या हुकुमशहांच्या विळख्यातुन वाचवण्यासाठी आणि हिरवा शालु नेसलेल्या कोकणच्या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी माधव गाडगीळांसारखा कुणीतरी पर्यावरणवादी आयुष्यभर जपलेल्या आपल्या तत्वांची शिदोरी घेऊन पुढे सरसावला तर त्या देव माणसाला देखील झुंडशाहीच्या जोरावर 'कोकणच्या विकासाच्या आड येणारा नरकासुर' हे रुपक देऊन प्रस्थापित हुकुमशहा 'लोकांसाठी झटणारे नेते' झाले. लोकशाहीची यापेक्षा आणखी वेगळी विटंबना अजुन काय असु शकते...? झुंडशाहीसमोर आपला एकट्याचा निभाव लागणार नाही याची खात्री पटल्याने पर्यावरणाविषयी तळमळ वाटणारे सामान्य लोकदेखील घरात बसुन निसर्गाच्या विनाशाचा बिनपैशाचा तमाशा अगदी शांतपणे बघत आहेत. मात्र ही शांतता अशीच राहिली तर ती जीवघेणी ठरु शकते हे त्यांना कोणी समजवावे...? आता एकत्रित येऊन लढा दिला नाही तर पुन्हा कधी एकत्रित व्हायची वेळदेखील येणार नाही. सगळच संपलेल असेल...! "कु-हाडीचा दांडा, गोतास काळ" या म्हणीप्रमाणे तरुणांनी ज्या नेत्यांना मते देऊन पोसले तेच त्यांच्या विनाशाचे कारण ठरतील हे सूर्यप्रकाशाइतक लख्ख दिसतय पण पैशांच्या म्रुगजळात मश्गुल असलेल्या तरुणांना याची किंचीतही जाणीव नाही. दंडवतेँसारखा निस्प्रुह नेता कोकणच्या राजकीय क्षितीजावर कधी काळी अढळ ध्रुवता-याप्रमाणे चमकत होता, या गोष्टीवरही पुढच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. कोकणात "दंडवतेँचे सुवर्णपर्व" पुन्हा आणणे कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. दंडवतेँचे विचार एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आपल्या सोबत राहुन पुढचा मार्ग दाखवतील, मात्र गरज आहे ती या विचारांना कालबाह्य न मानता, वर्तमानातील गडद अंधारातुन, उज्वल भविष्याकडे नेणारे मानणा-या समविचारी लोकांच्या एकजुटीची...!
महान तत्ववेत्ता कार्लाईलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देत मी माझा लेख संपवतो-

"
खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या होऊ लागल्या की सुर्यास्ताची वेळ जवळ आली, असे समजावे..."

दंडवतेँच्या राजकीय अस्तानंतर आज कोकणात देखील खुज्या माणसांच्या सावल्या इतक्या प्रचंड प्रमाणात मोठ्या होऊ लागल्या आहेत की कोकणचा अस्त सुद्धा नजीकच भासु लागलाय. मात्र 'कोकणास्त' होऊ देण आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही...!!!


1 टिप्पणी:

  1. "कोकण...? म्हणजे दंडवतेँच्या मतदारसंघातील आहात तर...??"
    .
    .
    हा डायलॉग आता जुना झालाय राव ! लोक रत्नागिरी ते मुंबई हे अंतर केवळ ५५-६० रुपयात पार करता येते इतकेच पाहतात .. ना लोकांना रुळाच्या खालील आवाज दबलेल्या अवस्थेतील दंडवते साहेब दिसत ना रेल्वे मुळे भूमिहीन झालेले शेतकरी दिसत ! दुनिया है | चलता है |
    .
    आपल्या पिढीला पण प्रा. दंडवते आठवत नसतील .. इतकी शोकांतिका दंडवते सरांची झालेली आहे !!

    उत्तर द्याहटवा