रविवार, ३० जून, २०१३

महाभारत खरच 'धर्मयुद्ध' होत...?

महाभारताचा उल्लेख नेहमीच 'धर्मयुद्ध' असा केला जातो. धर्मयुद्ध म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी धर्माच्या मार्गाने लढले गेलेले युद्ध...! मला तर महाभारत हा भगवान श्रीक्रुष्णांनी धुर्तपणाने रचलेला खेळ वाटतो. भगवंतांनी कौरवांचा विनाश करुन धर्माच्या रक्षणासाठी ते युद्ध रचले याबाबत  मनात तिळमात्रही शंका नाही.
ते युद्ध ज्या पद्धतीने खेळले गेले त्याबाबत मनात आक्षेप म्हणता येणार नाही पण  तीव्र नाराजी आहे.

1) युद्धापुर्वी भगवान श्रीक्रुष्णांनी युद्धात फक्त पांडवांचे सारथ्य करण्याचे आणि  हाती शस्त्र न घेण्याचे वचन कौरवांना दिले होते. जेव्हा पितामह भीष्मांनी पांडवांवर जोरदार चढाई केली तेव्हा स्वतः भगवंतांनी  दिलेले वचन मोडीत काढत रथाचे चाक हाती घेऊन ते भीष्मांच्या अंगावर धावुन  गेले.

2) पितामह भीष्मांचा वध करणे अर्जुनाला शक्य नाही हे लक्षात आल्यावर  श्रीक्रुष्णांनी द्रौपदीला भीष्मांच्या शयनकक्षात जाऊन अजाणतेपणी "अखंड  सौभाग्यवती हो" असा आशीर्वाद घेण्यास सांगितला.
त्यानंतर युद्धात भीष्मांसमोर शिखंडीसारखा त्रुतीयपंथी उभा करुन अर्जुनाला मागुन  बाण चालवण्यास सांगितले. मला प्रश्न हाच पडतो की, जर अर्जुनाच्या बाणांमध्ये भीष्मांना मारण्याची क्षमताच  नव्हती तर पांडव युद्धात उतरलेच कशाला...???

3) गुरु द्रोणाचार्याँचा अंतही असाच दुर्भाग्यपुर्ण झाला. द्रोणांच्या श्रेष्ठ युद्ध  कौशल्यापुढे अर्जुनाची उडालेली घाबरगुंडी पाहुन श्रीक्रुष्णांनी स्वतः धर्मराज  युधिष्ठीरालाच असत्य कथन करण्याचा सल्ला दिला. युधिष्ठीर यापुर्वी आयुष्यात  कधीच असत्य बोलला नव्हता. त्यानुसार अश्वत्थामा हत्ती मेलेला असताना युधिष्ठीराने जाणीवपुर्व त्यांना हत्ती  मेल्याची खबर न देता "अश्वत्थामा" मेला एवढच सांगितल आणि पुढे दबक्या  आवाजात "नरोवा कुंजरोवा" बोलला. काही जण याच लंगड समर्थन करताना त्याला असत्य न म्हणता 'अर्धसत्य'  म्हणतात. त्यांना एवढच सांगेन की युधिष्ठीर पांडवांचा सेनापती असल्यामुळे 
द्रोणांना फसवण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर संमत झाला. भीमाने हत्तीला मारले  तेव्हा युधिष्ठीर स्वतः तिथे हजर होता. मग त्याला "नरोवा कुंजरोवा" म्हणायची गरज काय...? उगाच याला 'अर्धसत्य' म्हणत धर्मराजाची चुक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न  करु नये

 4) भोळ्या गुरु द्रोणाचार्यांनी आपला शिष्यावर विश्वास टाकला आणि पुत्रविरहाचे  दुःख सहन न झाल्यामुळे शस्त्र खाली ठेवुन रणभुमीवर निस्तब्ध होऊन बसले. युद्धात जो निःशस्त्र असेल त्यावर वार करायचा नाही हा नियम पहिल्या दिवशीच  करण्यात आला होता पण पांडवांनी या नियमाचे पालन न करता निःशस्त्र अशा द्रोणाचार्याँचा  ध्रुपदाने अत्यंत क्रुरपणे शिरच्छेद केला.
याच समर्थन करताना काही जण सांगतात की, अभिमन्युला कौरवांनी युद्धाचे कोणतेही नियम न पाळता निर्दयपणे मारले म्हणुन  पांडवांनीही द्रोणांना त्याच प्रकारे मारले. अभिमन्युची गोष्ट मान्य कारण कौरव मुळातच अधर्मी होते. म्हणुनच तर  भगवान श्रीक्रुष्ण कौरवांचा समुळ विनाश करत धर्माचे राज्य प्रस्थापित करु पाहत  होते. आता जर पांडवांच वर्तनही अधर्मी कौरवांप्रमाणे असेल तर मग पांडव आणि कौरव  यांच्यात फरक तो काय...???

‎5) दानवीर कर्णाचे आयुष्य सुरुवातीपासुनच ज्याप्रमाणे उपेक्षित होते तसेच ते  शापांनी वेढलेले देखील होते.
कर्ण कौँतेय असुन नेहमीच त्याला सुतपुत्र म्हणुन हिणवले गेले. जर त्याचा  परममित्र दुर्योधनाने त्याच्यावर उपकार करुन त्याला अंग देशाचा राजा बनवल  नसत तर संपुर्ण आयुष्य हा दानवीर, शुर योद्धा 'अंगराज कर्ण' पुकारण्याऐवजी  ‘सुतपुत्र कर्ण' असा हिणवला गेला असता. दुर्योधनाच्या या उपकाराखालीच कर्ण आयुष्यभर दबला गेला आणि त्या उपकारांची  परतफेड करायची सुवर्ण संधी म्हणुन आपसुकच या युद्धात कौरवांच्या बाजुने  ओढला गेला. कर्णाची भगवान श्रीक्रुष्णांवर भरपुर श्रद्धा होती त्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्धात  उतरणे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे याची पुरेपुर कल्पना त्याला होती. तरी कर्ण  खाल्ल्या मिठाला जागणारा होता. शिवाय संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र  हे तत्व त्याने आयुष्यात खाली पडु दिले नाही आणि परममित्र दुर्योधनाच्या बाजुने  युद्धात उतरला. मला एकच गोष्ट खटकली की कर्णाला पांडवांच्या बाजुने ओढुन घेण्यासाठी  श्रीक्रुष्णांनी युद्धाच्या आदल्या रात्री तो कौँतेय असल्याची गोष्ट सांगितली. शिवाय  अर्जुन सोडुन अजुन कोणत्या पांडवाचा वध करणार नाही हे वचन देखील माता  कुंतीला देण्यास भाग पाडले. जर श्रीक्रुष्णांना कर्ण कौँतेय आहे ही गोष्ट माहित  होती तर अगोदरच सांगायची होती. कर्णाने आयुष्यभर नाहक बदनामी सहन केली.  युद्धाच्या आदल्या रात्री आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ सत्य ऐकल्यामुळे  आपोआपच युद्ध खेळताना हा शुर योद्धा दबावाखाली आला. त्याच वेळी श्रीक्रुष्णांनी दुजाभाव करत अर्जुनाला कर्ण त्याचा ज्येष्ठ बंधु आहे  याची जाणीव करुन दिलीच नाही. त्यामुळे अर्जुन पुर्ण ताकदीनिशी युद्धात उतरला. श्रीक्रुष्णांच्या या चालीमुळे बाकी चार पांडवांचा जीव वाचला. नाहीतर कर्णाने  त्यांना केव्हाच संपवले असते.

6) श्रेष्ठतम धनुर्धारी कोण म्हणुन पहिल्यपासुनच कर्ण आणि अर्जुन यांमध्ये  स्पर्धा असायची. कर्ण कौरवांचा सेनापती घोषित झाल्यावर हे युद्ध जे नियम पितामह भीष्मांनी  आखुन दिले त्याप्रमाणेच होईल याची त्याने घोषणा केली. नुसतीच घोषणा करुन तो थांबलानाही तर जेव्हा अर्जुन आणि कर्णामध्ये  पहिल्या दिवशी युद्ध पेटले तेव्हा अर्जुन कर्णासमोर हतबल ठरला. अर्जुनाचे मरण  समोर दिसत असतानाच कर्णाने त्याला जीवनदान दिले. सुर्यास्तानंतर युद्ध खेळले जाता कामा नये हा युद्धाचा नियम होता आणि त्याचे  पालन करताना आपला बाण केवळ सुर्यास्तापुर्वी अर्जुनापर्यँत पोहोचु शकत नाही हे  लक्षात आल्यावर कर्णाने त्याला जीवनदान दिले. नाहीतर त्याच दिवशी अर्जुनाला मारुन कर्ण "श्रेष्ठतम धनुर्धर" ठरला असता. दुस-या दिवशी मात्र कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतल्याने तो आपले शस्त्र  खाली ठेवुन ते चाक काढण्यासाठी खाली उतरला. निःशस्त्र योद्ध्यावर वार करु  नये, हा युद्धाचा नियम अर्जुनाला सांगत थोडावेळ वाट पाहण्याची अर्जुनाला विनंती  केली. परंतु अर्जुनाने सगळे नियम धाब्यावर बसवुन भ्याडपणे कर्णासारख्या महान  योद्ध्याचा वध केला. काहीजण याच समर्थन करताना सांगतात की, अभिमन्युला निर्दयपणे मारण्यात आले त्यावेळी कर्ण उपस्थित होता. त्यांना एवढेच सांगेन की, अभिमन्युच्या वधावेळी कर्ण कौरवांचा सेनापती नव्हता  पण कौरवांच्या सेनेचा भाग असल्यामुळे त्या क्रुत्यात सहभागी होण्यावाचुन  त्याच्याकडे दुसरे कुठचे गत्यंतर नव्हते. शिवाय अर्जुनाने कर्णाच्या मुलाचा द्रौपदी स्वयंवरावेळी झालेल्या चकमकीत  कोणताच दोष नसताना वध केला होता. 


‎7) कर्णाला त्याच्या जन्मावेळीच त्याचा पिता सुर्यदेवाने कवचकुंडले प्रदान केली  होती. ती असेपर्यँत कर्णाला परास्त करणे कोणालाच शक्य नव्हते. आपला मानसपुत्र अर्जुनाला वाचवण्यासाठी कर्णाकडुन ती कवचकुंडले काढुन  घेण्याचे कपटकारस्थान इंद्र करत होता.  कर्ण जेव्हा पहाटे अभ्यंगस्थान करायचा तेव्हा तो नेहमी दानधर्म करत असे. कर्णाच्या या दानशुरपणाचा फायदा घेण्याचे इंद्राने ठरवले. सुर्यदेवाने इंद्राचे हे कपटकारस्थान अगोदरच कर्णाला सांगितले. आयुष्यभर दानशुरपणाचा धर्म निभावत आलेल्या कर्णाने आपले मरण समोर  दिसत असताना दानधर्माला जास्त महत्व देत कर्णाने आपली कवचकुंडल दान  केली आणि एक माणुस तो किती श्रेष्ठ होता हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

‎8) कवचकुंडलांच्या बदल्यात इंद्राने कर्णाला दिव्यास्त्र बहाल केले होते ज्याचा  वापर कर्ण ज्याच्यावर करेल त्याचा म्रुत्यु निश्चित होता. अर्जुनाचे प्राण वाचवण्यासाठी श्रीक्रुष्णांनीच भीमाचा राक्षस पुत्र मायावी  घटोत्कचाला कौरवांविरुद्ध युद्ध करण्यास पाठवले. माझ एवढच म्हणण आहे की, मानवी युद्धात एका मायावी असुराला समाविष्ट करणे योग्य आहे का...??? कर्णाला त्या दिव्यास्त्राचा वापर शेवटी नाईलाजाने मायावी असुराविरुद्ध करावा  लागला. काही जण म्हणतात कर्णाला जे शाप होते त्यानुसार ऐन युद्धात निर्णायक क्षणी  तो सगळे मंत्र विसरणार होता आणि त्याच्या रथाचे चाक जमिनीत रुतणार होते. हे सगळ मान्य पण मग त्याला असलेल्या शापांमुळे युद्धातील नियमांचे पालन न  करता त्याचा वध करणे योग्य आहे का...???


9) म्रुत्युच्या वेळी असह्य वेदना होत असताना देखील कर्णाने आपला दानधर्म  निभावताना एका भिक्षुकाला त्याच परिस्थितीत दातांवर दगड मारायला सांगुन  आपला सोन्याचा दात काढुन दिला. कर्णाच्या म्रुत्युनंतर स्वतः श्रीक्रुष्णांनीच अर्जुनाला सांगितले की कर्ण हा  तुझ्यापेक्षा श्रेष्ठतम धर्नुधर होता. युद्धात जरी कर्णाचा पराभव झाला असला तरी त्यात अर्जुनाचे कर्तुत्व कमी आणि  कर्णाभोवती नेहमी असलेल्या शापांचा परिणाम अधिक होता. याचा पुरावा देताना श्रीक्रुष्णांनी अर्जुनाला सांगितले की तुझ्या रथावर स्वतः हनुमान विराजमान होते अन्यथा कर्णाच्या तेजस्वी अस्त्रांनी तो  केव्हाच जळुन खाक झाला असता. कर्णाच्या रथावर जेव्हा अर्जुन बाण मारायचा तेव्हा तो 10-12 पावले मागे  सरकायचा पण अर्जुनाच्या रथावर स्वतः महाशक्तीशाली भगवंत श्रीक्रुष्ण आणि  वीर हनुमान विराजमान असताना तो 2 पावले मागे सरकत होता. यातच कर्णाच  माहात्म्य दिसुन येत.

10) आपल्या 99 मुलांच्या म्रुत्युनंतर आपला वंश टिकवुन ठेवण्यासाठी युद्धाच्या  एका रात्री राजमाता गांधारी दुर्योधनाकडे गेली. तिने दुर्योधनाला गंगा नदीवर जाऊन अंघोळ करुन एकही वस्त्र अंगावर न घालता  पुर्णपणे नग्न तिच्या समोर येण्यास सांगितले.अर्थातच भगवान श्रीक्रुष्णांच्या लगेच लक्षात आले की गांधारीच्या मनात काय  चालु आहे. ते दुर्योधन अंघोळीला गेल्यावर लगेचच गांधारीँची भेट घेण्यासाठी आले. क्रोधित  झालेल्या गांधारीने श्रीक्रुष्णांना शाप दिला की ज्याप्रमाणे श्रीक्रुष्णांमुळे तिच्या पुर्ण  वंशाचा नाश झाला त्याचप्रमाणे श्रीक्रुष्णांचा वंशाचा कुलक्षय होईल. श्रीक्रुष्ण जेव्हा शापित होऊन बाहेर पडले तेव्हा अंघोळ आटपुन दुर्योधन पुर्णतः  नग्न होऊन आईकडे जात होता. श्रीक्रुष्णानी मुद्दाम त्याला चिडवले की हस्तिनापुरचा युवराज नग्न होऊन का  फिरत आहे...? त्यावेळी लज्जित होऊन दुर्योधनाने कमरेभोवती केळीची पाने गुंडाळली आणि तो  आईसमोर केला. गांधारीला एक शक्ती प्राप्त होती. त्यामुळे डोळ्यावरील पट्टी काढल्यावर  दुर्योधनाच्या शरीराचा जो भाग तिच्या नजरेला दिसेल त्यावर कितीही प्रहार केले  तरी त्याला काही झाल नसत.पण श्रीक्रुष्णांच्या धुर्तपणामुळे आणि दुर्योधनाच्या मुर्खपणामुळे त्याने शरीराचा जो  कमरेखालील भाग केळीच्या पानांनी झाकला होता तो भाग नेमका असुरक्षित  राहिला. आता दुर्योधनाला मरण आले नसते कारण तो बाकी नग्न असल्यामुळे सुरक्षित  होता आणि युद्धाच्या नियमानुसार कमरेखाली वार करता येत नसे. श्रीक्रुष्णांना गांधारीच गुपित माहित होत त्यामुळे ज्यावेळी भीम आणि  दुर्योधनातील युद्धात दुर्योधन काही केल्या मरेना तेव्हा त्यांनी भीमाला त्याने  केलेल्या पणाची आठवण करुन देत त्याच्या मांडीवर वार करायला सांगितले आणि  पुन्हा एकदा नियम धाब्यावर बसवुन दुर्योधनाचा वध करण्यात आला.  धरतीवर धर्माच राज्य प्रस्थापित होण्यासाठी कौरवांचा विनाश होणे आवश्यकच  होते पण युद्धातील सर्व नियम मोडीत काढत किँवा नवेनवे युक्तिवाद लढवत  पितामह भीष्म, गुरुवर्य द्रोणाचार्य आणि अंगराज कर्ण या महान आत्म्यांना ज्या  प्रकारे पांडवांनी मारले त्याबद्दल माझ्या मनात नाराजी आहे.

11) भगवान श्रीक्रुष्ण तर महाशक्तिशाली होते. फक्त कौरवांचा विनाश करुन जर  धरतीवर धर्माच राज्य प्रस्थापित होणार होत तर त्यांनी सुदर्शन चक्राचा वापर  करुन 100 कौरवांना मारायला हव होत. त्यासाठी एवढ मोठ विनाशकारी युद्ध  रचायची काहीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे युद्धात वीरगतीला प्राप्त झालेल्या लाखो सैनिकांचे प्राण वाचले असते  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भीष्म, द्रोण आणि कर्ण यांसारख्या थोर लोकांचा  सहवास आपणा सर्वाँना अधिक काळ लाभला असता.

माझे सगळे मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवले आता तुम्हीच ठरवा महाभारत खरच  धर्मयुद्ध होत की नाही...???

1 टिप्पणी: