रविवार, ३० जून, २०१३

सर्चलाईट :- 'विजय' तरुण भारतचा...

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या इतरत्र पोहोचाव्यात अशी सामान्य लोकांची इच्छा असते पण प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला सर्वाँसमोर व्यक्त होणे शक्य होत नाही आणि मनातल्या मनात धुमसत राहणा-या त्या अव्यक्त शब्दांना कुणा त्रयस्थाने समाजासमोर आणणे निकडीचे होऊन जाते. अशा वेळी रंजलेले-गांजलेले लोक एका निर्भीड पत्रकाराकडेच आशाळभुत नजरेने पाहतात. अलीकडच्या काळात एक तर पत्रकारच कुणा राजकीय नेत्याचे हस्तक बनलेले आहेत किँवा राजकीय नेतेच स्वतःची वर्तमानपत्रे काढतायेत. असल्या तथाकथित 'राजकीय वर्तमानपत्रा'मध्ये आपापल्या पक्षाच्या धोरणांकडे पाहुन त्या त्या विषयाची एकांगी बाजु मांडली जाते. नाण्याप्रमाणे प्रत्येक विषयाला नेहमी दोन बाजु असतात आणि लोकांच्या दुर्देवाने मिँध्या पत्रकारितेपायी विषयाची दुसरी बाजु नेहमीच अंधारात राहते. मग दुसरी बाजु लोकांपुढे आणायची कोणी...? लोकांच्या समस्यांना वाचा फोडायची कुणी...?? फक्त प्रिँट मिडीया नव्हे तर काही टी.व्ही.वरील न्युज चँनेल्स सुद्धा जग जिँकण्याच्या बाता करतात.त्यांचे संपादक स्वतःच जगातील एकमेव निर्भीड पत्रकार शिल्लक राहिले आहोत असा आव आणतात आणि चँनेलचा मालक कोळसा घोटाळ्यात अडकला की निर्भीड पत्रकारिता बाजुला सारत कोळशाने तोँड काळे करुन कोणत्या तरी बिळात दडुन बसतात. सर्वत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळत असताना सिँधुदुर्गात तो आजही टिकुन आहे कारण बाळशास्त्री जांभेकरांची परंपरा कायम राखत लोकांसाठी आपल्या लेखणीची धार नेहमीच तीक्ष्ण करणारे 'विजय शेट्टी' आज दैनिक तरुण भारतचे संपादक म्हणुन कार्यरत आहेत.

पत्रकाराने निःपक्ष राहुन पत्रकारिता करावी असा समाजाचा अलिखित नियम असतो पण प्रत्येक वेळी निःपक्ष राहणे शक्य होईलच असे नाही. शेवटी पत्रकार हा देखील एक माणुस असतो, स्वतंत्र भारताचा नागरिक असल्याने त्याची देखील काही स्वतंत्र मते असतात. पत्रकाराने आपली मते वर्तमानपत्रात जरुर मांडावीत कारण तेच निर्भीड पत्रकारितेचे एक जीवंत लक्षण आहे परंतु ती लोकांवर लादु नयेत. पत्रकाराने आपली मते 'मांडणे' आणि 'लादणे' यात पुसटशी रेषा असते आणि ती ज्या पत्रकाराला ओळखता येते तोच समाजात एक 'यशस्वी पत्रकार' म्हणुन ओळखला जातो.सिँधुदुर्गात विजय शेट्टी आज सर्वोत्क्रुष्ट पत्रकार म्हणुन ओळखले जातात कारण ते आपली मते अगदी लोकांच्या काळजाला भिडणा-या शब्दात व्यवस्थितपणे मांडतात पण आपण मांडलेले मतच अंतिम सत्य आणि योग्य आहे, असा दुराग्रह करताना ते कधीच दिसत नाही.
तरुण भारतमध्ये 'सर्चलाईट' या सदरात विजय शेट्टी आपली परखड मते मांडत असतात. एरव्ही बातम्यांमधील वैविध्य जपण्यासाठी प्रसिद्ध असणा-या तरुण भारतमध्ये जेव्हा विजय शेट्टीँचा 'सर्चलाईट' समाविष्ट असतो तेव्हा तर 'दुग्धशर्करा' योगच असतो. सर्चलाईट सदरातुन सिँधुदुर्गातील महत्वपुर्ण विषयांवर लेखन करताना शेट्टीनी अनेक विषय हाताळले आहेत.

गाडगीळ अहवालावेळी लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवुन सत्ताधा-यांनी लोकांच्या द्विधा मन:स्थितीचा फायदा घेत सत्ताधा-यांनी महामोर्चा काढला, तेव्हा ठराविक अपवाद वगळता अनेक पत्रकार सत्ताधा-यांच्या शक्तीपुढे गलितगात्र होऊन आपली लेखणीरुपी तलवार म्यान करुन बसले. लोकांमधील संभ्रम दुर करण्याची नितांत गरज असताना शेवटी विजय शेट्टीच आधुनिक महाभारतात अभिमन्यु बनुन कौरवांनी रचलेला चक्रव्युह भेदण्यासाठी पुढे सरसावले. 'गाडगीळ अहवाल : सत्य आणि भ्रम' असे सलग तीन लेख लिहुन शेट्टीँनी लोकांमधील संभ्रम दुर करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर भानु तायल नामक कोकण रेल्वेच्या अधिका-याने नियमावली पुढे करत कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँचे तैलचित्र कोकण रेल्वेच्या स्थानकातुन काढुन टाकण्याचा विचित्र फतवा काढला. बाकीच्या वर्तमानपत्रांनी बातमीपुरती बातमी देऊन आपले कर्तव्य पार पाडले परंतु आदरणीय मधु दंडवतेँच्या अशा अपमानानंतर एका संवेदनशील पत्रकाराचे मन थंड राहणे शक्यच नव्हते. 'घरात बापाचा फोटो लावायला कोणता नियम आड येतो...?' अशा शीर्षकाखाली शेट्टीँनी सनसनाटी लेख लिहिला. दंडवतेँच्या अपमानाची जाणीव झाल्यावर त्यांच्या कार्यावर, कर्तुत्वावर आणि व्यक्तिमत्वावर निस्सिम प्रेम करणा-या कोकणी माणसांच्या भावना दुखावल्या. खडबडुन जाग आलेल्या खासदार निलेश राणेँनी दंडवतेँचे तैलचित्र रेल्वेस्थानकात पुन्हा लावले. विजय शेट्टीँनी लगेचच निलेश राणेँचे आभार मानताना एकेकाळी दंडवतेँचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याँनी 'दंडवतेँचा विजय असो...', 'दंडवते अमर रहे...' अशा घोषणा दिल्या, हे आवर्जुन नमुद केले. ज्या काँग्रेस पक्षाने दंडवतेँना राजकीय जीवनात नेहमीच विरोध केला आज त्यांच्यांवरच दंडवतेँचा जयजयकार करण्याची वेळ आली आणि म्हणुनच दंडवतेँना 'मतांपलीकडचा नेता' म्हणतात, असेच काहीसे शेट्टीँना सुचवायचे असेल.

मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकरांनी कणकवली नगरपालिकेत मनसेचे डिपाँझिट जप्त झालेले असताना फक्त काँग्रेस नगराध्यक्षांवर आरोप करण्यासाठी किँवा त्यांची निष्क्रियता दाखवण्यासाठी कणकवली नगरपालिका आपल्या हातात द्या असे अर्धवट वक्तव्य केले तेव्हा लोकशाही म्हणजे काय असते याचे खडे बोल 'छोटा राजन' या लेखात विजय शेट्टीनीच राजन दाभोलकरांना सुनावले.देवगडात फळांवर प्रक्रिया करणारा कारखाना काढुन आंबा उत्पादकांचे कष्ट कमी करुन त्यांचा विकास करणा-या आमदार प्रमोद जठार यांना 'येस वुई कँन' लेख लिहुन शेट्टीँनी प्रोत्साहन दिले. तसेच जठारांची सिँधुभुमी संस्था अडल्या-नडलेल्या गरीबांना कशी मदत करते हे सिँधुदुर्गातील लोकांना कळावे यासाठी 'नमस्कार, मी आमदार प्रमोद जठारांकडुन आलोय' असा प्रशंसा करणारा लेख लिहिला.

केवळ स्वतःपुरता 'सर्चलाईट' सदर लिहुन शेट्टी थांबले नाहीत.
सिँधुदुर्गातील लोकांना गुरुविषयी वाटणारा आदर, त्यांच्या आपल्या गुरुप्रती असणा-या भावना, त्या गुरुचे विविधांगी पैलु सर्वाँसमोर यावेत यासाठी त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात 'गुरवे नमः' हा नवीन सदर सुरु केला. माझ्यासारख्या कित्येक लोकांनी आपल्या तोडक्यामोडक्या लिखाणाने गुरुवंदना दिली. ज्या गुरुला इतकी वर्षे ह्रुदयाच्या कप्प्यात आदराचे स्थान दिले होते त्या गुरुची ओळख अख्ख्या जगाला करुन देण्याचे भाग्य मिळवले.

ज्या विजय शेट्टीँमुळे हे सर्व काही साध्य झाले त्या विजय शेट्टीँचा परवाच 19 जुन रोजी वाढदिवस होता.MBA प्रवेश प्रक्रियेत व्यस्त असल्याने मी विजय शेट्टीँना त्या दिवशी हा लेख लिहुन शुभेच्छा देऊ शकलो नाही. प्रभाकर सावंतांनी अतिशय सुंदर लेख लिहुन शेट्टीँना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाला लेख लिहुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी अजुन 1 वर्षे वाट पाहु इच्छित नाही. म्हणुनच 2 दिवस उशीराने का होईना विजय शेट्टीँना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर त्यांनी असेच लिखाण करुन पत्रकारितेत एक आदर्श प्रस्थापित करावा आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम पत्रकारात आपले स्थान मजबुत करावे. माझ्यासारख्या कित्येक चाहत्यांच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत नेहमीच राहतील.

(ता.क. फक्त कधीतरी सर्चलाईट सदर लिहिण्यापेक्षा तो नियमित करता येईल का, याचा विचार विजय शेट्टीँनी नक्की करावा. त्यांच्या एका चाहत्याची ही तक्रारवजा विनंती समजा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा