रविवार, ३० जून, २०१३

सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांनी जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी लढ्यात का सामील झाले पाहिजे, यावर माझा हा लेख...


सिंधुदुर्गात गिर्ये येथे सरकार जेव्हा औष्णिक ऊर्जाप्रकल्प रेटु पाहत होते तेव्हा देवगडच्या जनतेने आणि आंबा उत्पादकांनी आपल्या लाडक्या जगप्रसिद्ध हापुस आंब्याच्या रक्षणाखातर सरकारचा हा प्रयत्न हाणुन पाडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच...! गिर्येतील त्या प्रस्तावित औष्णिक प्रकल्पामुळे आजुबाजुच्या परिसरातील उष्णता वाढुन त्याचा थेट परिणाम हापुस आंब्याच्या उत्पादनावर होणार होता. उत्पादन घटल्याने किंवा हापुस आंब्यावर काळे डाग पडल्याने आंबा उत्पादकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले असते. माझ्या या सर्व आंबा उत्पादक बांधवांच्या माहितीसाठी सांगु इच्छितो, गिर्येच्या ज्या प्रकल्पाला तुम्ही कडाडुन विरोध केलात तो 4000 M.W. क्षमतेचा औष्णिक प्रकल्प प्रत्यक्षात 8000 M.W. उष्णता निर्माण करुन परिसराचे तापमान वाढवणार होता मात्र ज्या जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यास तुम्ही टाळाटाळ करत आहात तो 10000 M.W. क्षमतेचा अणुप्रकल्प गिर्ये प्रकल्पापेक्षा जवळपास 4 पट जास्त तब्बल 30000 M.W. उष्णता निर्माण करणार आहे. सरळ रेषेत अंतर मोजायला गेलो तर गिर्येपासुन फक्त 10 ते 20 कि.मी.च्या परिसरात हा जैतापुरचा विनाशकारी प्रकल्प उभारला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फार मोठा भाग आणि खास करुन देवगडची हापुस आंब्याची मोठी लागवड या प्रकल्पाच्या प्रभावित क्षेत्रात येते. फक्त जैतापुर रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या प्रकल्पापासुन कोणताच धोका नाही या जाणीवपुर्वक पसरवलेल्या गैरसमजाला बळी पडुन आज आपले आंबाउत्पादक मुग गिळुन गप्प बसले आहेत. अजुन काही दिवस ही शांतता अशीच राहिली तर मग पश्चाताप करण्याशिवाय अजुन कोणतीच गोष्ट आपल्या हाती राहणार नाही. जैतापुर अणुऊर्जाप्रकल्प विरोधीच्या लढ्यात सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांनी का सक्रिय सहभाग घ्यावा, याबाबतची कारणे मी पुढे नमुद करत आहे. तुम्हाला ती पटली तर नक्कीच जैतापुरच्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमच्यासोबत या.
 
1) अणुवीज प्रकल्प हा जेवढी वीज निर्माण करतो त्याच्या तिप्पट उष्णता निर्माण करतो. अणुवीज मुळातच औष्णिक वीज (THERMAL POWER) आहे. किंबहुना आम्ही म्हणतो ती HIGH THERMAL POWER आहे कारण इतर औष्णिक प्रकल्प (कोळसा, तेल, वायु, इत्यादी) जेवढी वीज निर्माण करतात त्याच्या साधारणपणे दुप्पट उष्णता निर्माण करतात तर अणुप्रकल्प तिप्पट उष्णता निर्माण करतात. मुळात अणुवीजेला विरोध असण्याचे हे एक मुख्य कारण आहे आणि गंमत म्हणजे हेच अणुप्रकल्प ग्लोबल वार्मिंगवर उपाय म्हणुन आपल्या गळी उतरवले जात आहेत. याप्रमाणे जैतापुरचा 10000 M.W.चा हा महाप्रकल्प 30000 M.W. उष्णता निर्माण करणार आहे. किंबहुना प्रत्यक्षात तो यापेक्षा जास्त उष्णता निर्माण करील कारण यात 1650 M.W. च्या 6 E.P.R. अणुभट्ट्या बसवण्यात आल्या आहेत त्या HIGH BURN प्रकारात मोडतात. पण समजा सरकारी अहवालाप्रमाणे 30000 M.W. उष्णतेचीच निर्मिती झाली तरी त्यातील 10000 M.W. चीच वीज मिळेल. उरलेली 20000 M.W. उष्णता जैतापुरच्या समुद्रात सोडली जाईल. बरे ही उष्णता समुद्र काही आपल्या पोटात साठवुन ठेवणार नाही किंवा ती पाण्यात विरघळुनही जाणार नाही ती पुन्हा वातावरणातच येणार. या उष्णतेमुळेच सिंधुदुर्गातील तापमान देखील प्रचंड प्रमाणात वाढेल आणि ही गोष्ट आपल्या लाडक्या हापुस आंब्याच्या उत्पादनासाठी कर्दनकाळ ठरु शकेल. 
 
2) जैतापुर अणुप्रकल्प उद्या सुरु झाला की त्यात निर्माण होणारी 10000 M.W. वीज देशात अन्य ठिकाणी वाहुन न्यावी लागेल. त्यासाठी वीज वाहुन नेणा-या तारा, ट्रान्सफाँर्मर, सबस्टेशन, इत्यादी आपल्या शेतातुन आणि बाजारातुन जाणार आहेत. प्रकल्पाला सगळीकडुनच कडाडुन विरोध होईल या भितीपोटी सरकारने याबाबत आपल्याला अद्याप कोणतीही कल्पना दिलेली नाही. आज तुम्ही तुमच्या कसदार जमिनीत भरघोस पिक घेताय पण जेव्हा या HIGH TENSION वीजेच्या तारा तुमच्या लागवडीखालील जमिनीवरुन जातील तेव्हा तुम्हाला तुमची जमीन हवी तशी वापरता येणार नाही. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर त्या तारांखाली कोणतेही बांधकाम करता येणार नाही. 

3) जैतापुर अणुप्रकल्पातील किरणोत्सारी अणुकच-याचे काय केले जाणार आहे याबाबत प्रकल्प अहवालात कुठे चकार शब्द काढलेला नाही मात्र भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुकराराप्रमाणे देशातील सर्व प्रकल्पाचा अणुकचरा कोणत्याही एकाच ठिकाणी पुरावा लागणार आहे. जर ते ठिकाण जैतापुर बाहेर कुठेतरी असेल तर जैतापुरातील जळलेले किरणोत्सारी इंधन कोकणातील रस्त्यातुन किंवा समुद्रातुन वाहुन नेले जाईल. जर ते ठिकाण खुद्द जैतापुर असेल तर भारतातील इतर अणुप्रकल्पातील अणुकचरा जैतापुरात वाहुन आणला जाईल. काही झाल तरी या कच-याच्या वाहतुकीमुळे आपल्या सिंधुदुर्गचे जे किरणोत्सारी प्रदुषण होणार आहे त्याचा धोका फक्त हापुस आंब्यालच नव्हे तर तुमच्या आमच्या जीवालाही तितकाच आहे  

4)जैतापुर अणुप्रकल्पामुळे कोकणचा किंवा स्थानिकांचा नेमका काय विकास होणार आहे याबद्दल बोलणे कोणताही प्रकल्पसमर्थक कटाक्षाने टाळतो कारण या प्रकल्पाने स्थानिकांना रोजगार मिळवुन देण शक्य नाही. अणुप्रकल्प हा केँद्र शासनाच्या अखत्यारीत असतो. हेल्पर, रीगर, शिपाई यापेक्षा जास्त कुशल कामगारांची भरती ही सर्व देशभरातून अर्ज मागवुन केली जाते. अणुवीज केँद्रापासून दहा किलोमीटरवर अणुकेँद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वसाहत असेल. एक रुग्णालय असेल, तेथे घरगडी, मोलकरीण, आया, शिपाई असे हंगामी रोजगार मिळू शकतील.म्हणजेच संपूर्णपणे नवीन असलेला एखादा रोजीरोटीचा मार्ग त्यांच्यावर लादला जाईल. ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतोय तिकडच्या गावक-यांना मत्स्योत्पादनाशिवाय पोटापाण्याचा दुसरा उद्योग माहित नाही. त्यांना प्रकल्प आल्यानंतर दूध, भाजी, इस्त्रीच्या दुकानांचे परवाने देण म्हणजे स्थानिकांचा विकास काय...? सरकारने आजपर्यँत प्रकल्पापुर्वी खोटी आश्वासने देऊन प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर तारापुर वीज प्रकल्पग्रस्त, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त, विविध धरण प्रकल्पग्रस्त यांचा विश्वासघात करत त्यांचे प्रश्न अनुत्तरीत ठेवले, ही उघड वस्तुतिथी आहे. त्या सरकारला जैतापुर प्रकल्पग्रस्तांना आश्वासने द्यायचा नैतिक अधिकारच नाही अणुप्रकल्पाच्या आसपासच्या प्रदेशातील विकास थांबवला जातो. अणुप्रकल्पापासुन 50 कि.मी त्रिज्येच्या परिसरात विमानतळ, रेल्वेस्टेशन, मोठे उद्योगधंदे आणले जात नाहीत. कोणतेही मोठे शहर वसवले जात नाही. या परिसरातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणले जाते. थोडक्यात अणुप्रकल्प येतात तेथील भागाचा विकास होत तर नाहीच किंबहुना तो थांबवला जातो. 

 5) देव न करो पण जैतापुर अणुप्रकल्पात जपानमधील फुकुशिमासारखा अणुभट्टीचा स्फोट होऊन एखादी दुर्घटना झालीच तर कोकणचा विनाश अटळ आहे. जपानसारखा तंत्रज्ञानात प्रगत असणारा देश जो अणुअपघात टाळु शकला नाही तो भारतासारख्या भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात कधीच होणार नाही हे प्रकल्प समर्थकांच म्हणण हास्यास्पद आहे. अगदी ते खर धरल तरी एक गोष्ट त्यांनी ध्यानात घ्यावी की , अणुभट्टी शांतपणे चालु आहे असे वाटले तरी ती सतत किरणोत्साराचे उत्सर्जन व प्रसारण करीत असते. भट्टीतील किरणोत्सारी वायु व द्रव्ये वातावरणात सोडली जातात तर किरणोत्सारी गंज तसेच किरणोत्सारी पाणी नजीकच्या समुद्रात सोडले जाते. किरणोत्साराने प्रदुषित झालेल्या या वातावरणाने अथवा पाण्याने जीवनाचे मूळ घटक असलेल्या पेशीँवर आघात होतो. त्यामुळे कर्करोगाचे विविध प्रकार, जन्मजात व्यंगे, इंद्रिये निकामी होणे, मतिमंदत्व, अभ्रके - बालकांमधील पुढील असंख्य पिढ्यांमधील दोष व व्यंग, मासिक पाळीविषयी समस्या, वंध्यत्व, अशक्तपणा अशा अनेकानेक व्याधी होतात. मुंबईत असलेल्या "भाभा अणुसंशोधन केँद्र (B.A.R.C.)पासुन जर मुंबईला कोणताच धोका उद्भवला नाही त्यामुळे जैतापुरला प्रकल्पापासून काहीच धोका नाही असा प्रचार प्रकल्पसमर्थक शास्त्रज्ञ करताना दिसतात पण तेच लोक B.A.R.C.च्या कर्मचा-यांच्या वसाहतीमध्ये किरणोत्साराने बाधित होऊन मतिमंद झालेल्या मुलांच्या शाळेचा उल्लेख करणे कटाक्षाने टाळतात. किरणोत्साराचा प्रभाव होऊन जर एक शाळा सुरु करण्याइतपत जास्त मतिमंद मुले B.A.R.C.मध्ये कर्मचा-यांच्या एका छोट्याशा वसाहतीत जन्माला येत असतील तर जैतापुर प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर कोकणच्या पुढच्या पिढीला मतिमंद करुन सरकार मतिमंद मुलांच्या शाळा कोकणात काढणार आहे का...? यावरुन एकच गोष्ट सिद्ध होते की अणुअपघातापुरतीच नव्हे तर एरव्ही शांतपणे चालणारी अणुभट्टी तेवढीच घातक आहे. 

6)किरणोत्साराची गळती सर्व अणुप्रकल्पातुन होतच असते. कोणताही अणुप्रकल्प त्याला अपवाद नाही. जैतापुर अणुप्रकल्पातुन जो किरणोत्सार बाहेर पडेल त्यामुळे एकंदरीतच रत्नागिरी, राजापुर आणि देवगडमधील हापुस आंबे किरणोत्सारबाधित होतील. आज या तिन्ही ठिकाणच्या हापुस आंब्याला जागतिक बाजारपेठ आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत या हापुस आंब्यांला देवगड हापुस किंवा राजापुर हापुस किंवा रत्नागिरी हापुस अशी वेगवेगळी ओळख न मिळता, एकत्रितपणे "कोकणचा हापुस आंबा" अशी ओळख मिळते. आम्ही कितीही पोटतिडकीने सांगितले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापुर अणुप्रकल्पाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही वाईट परिणाम होणार नाही असे तुमचे ठाम मत बनले असेल तर ते काही वेळासाठी मान्य करुया. जैतापुर अणुप्रकल्पातील किरणोत्सारामुळे रत्नागिरी आणि राजापुरातला हापुस आंबा नक्कीच किरणोत्सारबाधित होईल यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही.उद्या जागतिक बाजारपेठेत 100 आंब्यांपैकी 25 ते 30 आंबे जरी किरणोत्सारबाधित आढळले तरी जागतिक बाजारपेठेत बदनामी फक्त रत्नागिरी किंवा राजापुरच्या हापुसची होणार नाही तर मघाशी सांगितल्याप्रमाणे एकत्रिपणे कोकणच्या हापुस आंब्याची बदनामी होईल कारण जागतिक बाजारपेठेत हापुस आंब्याची वेगळी वर्गवारी केली जात नाही.किरणोत्सारबाधित हापुस आंबा खाल्ल्याने कर्करोगासारखे दुर्धर आजार उद्भवतील या भीतीने लोक आंबा खाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. अशा प्रकारे देवगडच्या हापुसला बाजारपेठच उपलब्ध होणार नाही आणि आंबा उत्पादक देशोधडीला लागतील. काही वर्षाँपुर्वी कोँबड्यांना झालेला 'बर्ड फ्ल्यु' रोग तुम्हाला ऐकुन माहितच असेल. त्यावेळी तो रोग काही देशातील सर्वच कोँबड्यांना झाला नव्हता.फक्त काही कोँबड्याच त्या रोगाला बळी पडल्या होत्या तरी देखील जीवाला धोका नको म्हणुन संपुर्ण देशभर अगदी सिंधुदुर्गातही लोकांनी कोँबड्या खाणच सोडुन दिल. कित्येक पोल्ट्रीधारक कंगाल झाले परंतु सुदैवाने तो रोग संपुष्टात आल्यावर लगेचच पोल्ट्रीचा व्यवसाय पुर्वपदावर आल्याने ते बरबादीपासुन बचावले. उद्या हापुस आंबा किरणोत्साराने बाधित झाला तर आंबा उत्पादकांची हालत याच पोल्ट्रीधारकांप्रमाणे होईल पण तुमच्या दुर्देवाने किरणोत्साराचा हा राक्षस एखाद्या रोगासारखा ठराविक काळापुरती मर्यादित नसुन कायमस्वरुपी टिकत असल्याने देवगडमधील हापुस आंब्याचा व्यवसाय कायमस्वरुपी संपुष्टात येईल. जैतापुरचा हा विनाशकारी अणुप्रकल्प ज्या माडबन परिसरात होऊ घातलाय तिकडचे आपले कोकणी बांधव गेली 4 वर्षे अगदी प्राण पणाला लावुन लढा देत आहेत. पुरुषांसोबत स्त्रियांनीसुद्धा अनेकदा तुरुंगवास भोगलाय. तबरेज सायेकर नावाचा आपल्यातलाच एक युवक आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आपल्या प्राणाला मुकलाय, अनेक जण जखमी अवस्थेत आहे. एवढे अत्याचार होऊनही फक्त आपल्या कोकणचा विनाश होऊ नये या एकाच ध्यासापायी त्या लोकांनी हा सुरु ठेवलाय मात्र कोकणातील बाकीच्या भागातुन काहीच पाठिँबा मिळत नसल्याने अजुनपर्यँत जैतापुरच्या आंदोलनाला हवे तेवढे यश मिळाले नाही. आज जर सिंधुदुर्गात आपण सगळे मिळुन जैतापुर अणुप्रकल्पविरोधी आंदोलन उभारु शकलो तर गेली 4 वर्षे एकाकी लढणा-या या लोकांना बळ आणि स्फुर्ती मिळेल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातुन या विनाशकारी अणुप्रकल्पाला कडाडुन विरोध झाला तर सरकारलाही तो रद्द करावा लागेल. अजुनही वेळ गेलेली नाही. आता फक्त कोकणी लोकांची एकजुटच आपल्याला या नवीन संकटातुन वाचवु शकते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा