बुधवार, ३ जुलै, २०१३

स्वर्गीय आबा कोंड्ये ….

मळगाव...! नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव....!! मात्र ८०-९० च्या दशकात सिंधुदुर्गचा सांस्कृतिक वारसा जपण्यात महत्वाची भूमिका याच गावाची होती. एका छोट्याश्या गावाला जिल्ह्यात एक वेगळे अस्तित्व मिळवून देण्यासाठी जे मळगावकर लक्षवेधी प्रयत्न करत होते त्यातील सर्वात महत्वाचे नाव होते स्वर्गीय आबा कोंड्ये यांचे..!

२० नोवेम्बरला स्वर्गीय आबा कोंड्ये यांचा प्रथम स्मृतिदिन होता आणि आजचा माझा लेख ते केवळ माझ्या आत्येचे मिस्टर म्हणजेच माझे काका होते म्हणून नव्हे, तर मळगावचा एक नागरिक या नात्याने मी कृतज्ञतापूर्वक  लिहित आहे.
जेणेकरून  सद्गृहस्थांना मळगावच्या वैभवशाली परंपरेचा अंदाज येईल आणि जे मळगाव किंवा आबा कोंड्येना ओळखणारे लोक माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये आहेत त्यांना ते मळगावचे मंतरलेले दिवस आठवण्यास मदत होऊन जुन्या आठवणींना उजाळा देता येईल. १९७७ मध्ये मळगावात "परिमल कला आणि क्रीडा मंडळ" या मंडळाची स्थापना झाली आणि त्यावेळी स्व.आबा कोंड्ये, स्व.उदय खानोलकर, रमेश कासकर, रविंद्रनाथ कांबळी, विलास मळगावकर इत्यादी धडपड्या मंडळीनी प्रा.विजयकुमार फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उडी घेतली. या मंडळाचे अध्यक्षपद अर्थातच आबा कोंड्येना देण्यात आले आणि येथूनच नाट्यचळवळीला प्रोत्साहन दिले गेले. फुलाला सुगंध मातीचा, दुरितांचे तिमिर जावो, अपराध मीच केला, मन पाखरू पाखरू, वाहतो हि दुर्वांची जुडी, किरवंत, माणूस नावाचे बेट, चांदणे शिंपित जाशी, देव नाही .  देव्हाऱ्यात, दिवा जाळू दे सारी रात, इत्यादी एकापेक्षा एक सरस नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागली. स्व.आबा कोंड्ये यांचे या नाटकांमधील योगदान सांगण्यासाठी मी तेव्हा जन्मालाच आलो नव्हतो परंतु जेव्हा समज येऊ लागली तेव्हा एक गोष्ट चांगलीच लक्षात आली की, मळगाव, मळेवाड, तळवडे, कोनापाल, निरवडे, माजगाव येथील लोकांना त्यांचा आमदार कोण हे कदाचित माहित नसेल पण आबा कोंड्ये कोण हे नक्कीच माहित होते. आबा कोंड्ये आणि नाटक या गोष्टी एकमेकांशी एवढ्या समरस झाल्या होत्या की अभिनय, दिग्दर्शक, नेपथ्य असे नाटकाचे कोणतेही अंग असो त्यात आबा कोंड्येनी प्रविणता मिळवली होती. मला अगदी लहान असताना असताना एकदा या सगळ्या मंडळींचे 'दुरितांचे तिमिर जावो' हे नाटक पाहण्याचा योग आला. त्यात दिगुची गाजलेली भूमिका माझे सख्खे काका रविंद्रनाथ कांबळी करत असत. तर सांगायची गोष्ट अशी की, त्या नाटकात समाविष्ट असलेले 'आई, तुझी आठवण येते' गाणे सुरु झाले की आजूबाजूचे सगळे लोक आपली दुकाने बंद करून नाटक बघायला येत आणि अक्षरशः ढसाढसा रडत. आबा कोंड्येनी साकारलेला 'वेडा वृंदावन' मधील वृंदावन पाहणे ही नाट्यरसिकांसाठी पर्वणीच असायची. १९९५-९६ च्या सुमारास "परिमल कला आणि क्रीडा मंडळ" आणि त्याचे अध्यक्ष आबा कोंड्ये यांचा 'परिमल' सर्वत्र पसरला होता. आबांनी व्यावसायिक नाटकात पण भरपूर यश मिळवले होते. नंतर तब्येत खालावल्याने ते स्वतः अभिनय करत नसत पण त्यांनी केलेले नेपथ्य आणि दिग्दर्शन एवढे उत्कृष्ट असायचे की लोक त्यासाठी सुद्धा नाटक बघायला यायचे. नाटकासोबत आबा कोंड्ये एक उत्कृष्ट चित्रकार आणि मूर्तिकार होते. दरवर्षी गणपतीची मूर्ती तयार करण्याचे सत्कार्य ते करत होते. अगदी शेजारील गोवा राज्यातून सुद्धा लोक गणपतीची मूर्ती घेण्यासाठी आबांकडे येत असत. गणपतीची रेखणी स्वतः आबा लाजवाब करत असत...!

आता ही सगळीच मंडळी थकली होती आणि मळगावचा नाट्यपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारसा पुढे असाच चालू ठेवण्यासाठी नव्या उमेदीची पिढी तयार करणे काळाची गरज होती आणि हे शिवधनुष्य पेलले ते प्रा.विजय फातर्पेकर आणि सचिन धोपेश्वरकर या द्वयींनी...!
फातर्पेकर सर आणि सचिन धोपेश्वरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मळगावची तरुण पिढी नाटकांचे धडे गिरवू लागली. शहरांच्या धर्तीवर मळगाव सारख्या छोट्याश्या गावात सुरु केलेल्या या "बाल नाट्य प्रशिक्षण" शिबिराच्या प्रयोगाला शहरांपेक्षा जास्त असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यातीलच एक शिबिरार्थी मी सुद्धा होतो याचा मला सुद्धा सार्थ अभिमान आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून 'चेटकिणीच्या बंगल्यात' ही एकांकिका बरिस्तर नाथ पै एकांकिका स्पर्धेत सादर केली. आबा कोंड्ये यांचा पुतण्या असून नाट्य क्षेत्रात फार काही करू शकलो नसलो तरी त्या एका एकांकिकेचा मी भाग होतो याचे मला समाधान आहे. नंतर पुढे जाऊन विजय फातर्फेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली एक 'श्रुतिका' सुद्धा आम्ही रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रात सादर केली. सगळे उपक्रम सुरळीत चालू असतानाच अचानक उदय खानोलकर यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता आणि सिंधुदुर्गच्या क्षितिजावरील नवोदित लेखक प्रसिद्ध होण्याअगोदरच काळाच्या पडद्या आड गेला.
अगदी कमी काळातच उदय खानोलकरांनी 'कोकणातील दशावतार','गाठोड' अशी पुस्तके लिहिली पण 'गाठोड' पुस्तकच प्रकाशन करायला ते या जगात राहिले नाहीत. आपल्या लाडक्या उदयचे पुस्तकांप्रती असलेले प्रेम पाहून मळगावकरांनी त्याच्या स्मरणार्थ "कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय" स्थापन केले आणि नाट्यचळवळी सोबत वाचन चळवळीने देखील मळगावात जोम धरला. "कुमार वाचक मेळावा" घेतला गेला. त्यात लहान लहान मुले कमी वयातच चांगली नावाजलेली पुस्तके वाचू लागली. मी सुद्धा त्यांच वाचकांपैकी एक होतो. खेळायच्या वयात मृत्युंजय, छावा, पानिपत, अग्निपंख, महानायक, संभाजी यांसारखी पुस्तके अगदी अधाशासारखी वाचून काढली. आज मी जे काही थोडे बहुत लिहू शकतो ती या सर्वांचीच कृपा आहे. माझे तुम्हा सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे की, एकदातरी मळगावच्या वाचनालयाला जरूर भेट द्या. जिल्ह्यातील इतर वाचनालयसारखी फक्त ग्रंथसंख्या वाढवणे हा उद्देश या ग्रंथालयाने कधीच बाळगला नाही. बहुतेक नावाजलेली पुस्तके तुम्हाला येथे पाहायला मिळतील. अजय कांडर, अजय वैद्य यांसारख्या कविवर्यांचे काव्य वाचनाचे कार्यक्रम देखील याच वाचनालयाने आयोजित केले. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने लहान गावातील या वाचनालयाचे भेट देत तोंड भरून कौतुक केले आहे.अशा सांस्कृतिक वारसा असलेल्या मळगाव गावात मी जन्म घेतला हे स्वताचे खूप मोठे भाग्य समजतो. स्वर्गीय आबा कोंड्ये सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सहवास मला लाभला,त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडत होतो पण माझ्या दुर्दैवाने म्हणा ते मला खूप लवकर सोडून गेले. आज त्यांना जाऊन एक वर्ष लोटलं तरी त्यांची आठवण मनात अजून तशीच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा