बुधवार, ३ जुलै, २०१३

गुंतता हृदय हे...

उदयोन्मुख पण तरीही परिपक्व अशा दिग्दर्शक सतीश राजवाडेना मी काय उपमा देऊ तेच काळात नाही. राजवाडेची प्रत्येक मालिका आणि चित्रपट कोणतातरी नवीन विषय घेऊन येतो आणि बाघानार्याची इच्छा असो व नसो तो त्याला विचार करायला भाग पाडतो. आजपर्यंत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सगळ्या मालिका मी बघत आलो. राजवाडे खऱ्या अर्थाने 'एका लग्नाची, दुसरी गोष्ट' या मालिकेमुळे सामन्यातील सामन्यात प्रसिद्ध झाले पण त्या अगोदर त्यांची अजून एक मालिका झी मराठीवर अधिराज्य गाजवत होती आणि तिचे नाव होते- 'गुंतता हृदय हे...' .खर तर या मालिकेच्या स्टारकास्टची घोषणा होताच मी आनंदाने उड्या मारल्या कारण 'अवंतिका' मध्ये गाजलेली जोडी संदीप-मृणाल कुलकर्णी त्यात महत्वाच्या भूमिकेत होती. मृणाल कुलकर्णींचे आता वय झाले असे बहुतेक जणांचे मत असेल पण खर सांगतो इतर कोणत्याही नटीपेक्षा मृणालचे नैसर्गिक मराठमोळे मनमोहक सौंदर्य आणि तिचे स्मितहास्य आजही मला घायाळ करते. कतरिना कैफ किंवा दीपिका पदुकोन यांसारख्या हिंदीतील नट्या या मराठी अप्सरेसमोर माती खातात. तर अशा या अभिनयाने कसलेल्या संदीप-मृणाल सोबत नवखी पल्लवी सुभाष मुख्य भूमिकेत होती तरीसुद्धा ती कुठेही फिकी वाटली नाही.
मालिकेच्या सुरुवातीलाच विक्रम(संदीप कुलकर्णी) आणि नयना(मृणाल कुलकर्णी) आणि त्यांची छोटी मुलगी देवी, सासू-सासरे असे छोटेसे कुटुंब दाखवलेले. अनन्या(पल्लवी सुभाष) ही अतिशय हुशार तरुणी विक्रमच्या ऑफिसात कामाला असते. तीचासुद्धा प्रेमविवाह असतो पण नवरा जहाजावर कामावर असल्याने कधीतरीच घरी येतो आणि अनन्या आपल्या सासऱ्यांसोबत राहत असते. तिचे सासरे(मोहन आगाशे) एक रिटायर लष्करी अधिकारी असतात. एका युद्धात त्यांची दृष्टी गेलेली असली तरी त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती. कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून कितीही लपवली तरी यांना त्याचा लगेच अंदाज यायचा. आपल्या सुनेचे आणि मुलाचे फोनवर रोज उडत असणारे खटके त्यांच्या लक्षात आले होते. अनन्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असून देखील विक्रमच्या व्यक्तिमत्वावर भाळली होती. स्वतःच्या नवऱ्याची कधीतरी होणारी भेट आणि त्यातही भेट झाल्यावर सतत होत असणारी भांडणे यामुळे त्याचं प्रेमविवाह असून देखील तिला विक्रम बाबत आकर्षण वाटू लागले. इकडे विक्रमची परिस्थिती काही वेगळी नव्हती. नयनाचा पहिला प्रियकर अविनाश(तुषार दळवी) विषयी त्याला लग्नाअगोदर माहिती होती तरीही नयना पतिव्रता स्त्री असल्याने त्याला तिच्याबद्दल कधीच संशय आला नाही. परंतु आजकाल अविनाशचे जे नयनाला त्याच्या घरी फोन येत होते त्यामुळे तो थोडा अस्वस्थ असायचा. जेव्हाा विक्रमाला अनन्याला आपल्याबद्दल वाटत असलेल्या आकार्षाणाविषयी समजले तेव्हा आपल्या बायकोवरील असलेल्या प्रेमाचा त्याला विसर पडला आणि साहजिकच तो अनन्याकडे ओढला गेला. अविनाशने नयनाच्या घराकडे तरुणपणी जे काही तमाशे केले त्यामुळेच तिने त्याच्याशी लग्न केले नव्हते पण तिच्या मनातील त्या प्रेमाच्या भावना कधीच पूर्णपणे विझल्या नव्हत्या. जेव्हा अविनाशच्या आईकडून नयनाला समजले की अविनाशला कर्करोग झालाय आणि तो आता फार काळ जगू शकत नाही हे समजल्यावर पतिव्रता असलेली नयना आपल्या भावना नियंत्रित करू शकली नाही आणि विक्रमच्या नकळत अविनाशला भेटू लागली. अशा रीतीने वर-वर आदर्श वाटत असणारे नयना-विक्रम हे जोडपे एकमेकांशी विश्वासघात करू लागले. जेव्हा नयनाला आणि अनन्याच्या नवऱ्याला विक्रम-अनन्याच्या विवाहबाह्य संबंधांविषयी समजले तेव्हा त्यांनी त्या दोघांना धडा शिकवण्यासाठी प्लान केला आणि मालिकेच्या शेवटी दोन्ही जोडप्यांना आपापली चूक समजली आणि ते पुन्हा एकत्र नांदू लागली. या मालिकेने भरपूर प्रश्न माझ्यासमोर उपस्तीथ केले.

१) अनन्या विक्रमकडे आकर्षित झाली याला सर्वस्वी तिची चूक कशी म्हणता येईल...? प्रेम-विवाह केला म्हणजे प्रेम निभावल अस थोडच आहे. तिच्या नवऱ्याने तिला वेळ द्यायला नको होता का...?? फक्त व्यावहारिक गरजाच महत्वाच्या नसतात, त्याचसोबत भावनिक आणि शारीरिक गरजा देखील असतात आणि अनन्याच्या या गरजा तिच्या नवऱ्याकडून पूर्ण होत नसतील तर तिने त्या गरजांच्या पूर्ततेसाठी एका पर-पुरुषाची मदत घेतली यात तिची नेमकी चूक काय...??? पुरुषप्रधान संस्कृतीत प्रत्येक जण संस्कृतीच्या नावाने बोंबा मारत अशा परिस्थितीत स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मोकळे होतात. ते कारण खूप सहन देखील असत. ती स्त्री प्रकरण उघडकीस आल्यावर सगळी बोचरी टीका सहन देखील करते पण हे दुष्कृत्य करताना तिची मानसिक स्थिती समजून घ्यायचा प्रयत्न आपल्यापैकी कितीजण करतात...???? म्हणूनच म्हणतात जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

२) नयनासारख्या पतीव्रता स्त्रीची लग्नानंतर अविनाशला मिळालेली सहानुभूती आपल्यापैकी किती जणांना योग्य वाटते....? लग्न झाल म्हणून पहिल्या प्रेमाच्या त्या नाजूक भावना कायम-स्वरूपी मनातून काढून टाकता येतात का...?? जर मनावर कोणाच नियंत्रण नसत तर मग त्या मनातील भावनांवर तरी कोणी नियंत्रण कसा काय मिळवेल...??? नयनाने आपल्या पतीच्या नकळत तिच्या पूर्वीच्या प्रियकराला भेटायचा निर्णय घेतला तो योग्यच म्हणावा लागेल. तरी सुद्धा तिच्या मनात काही पाप नव्हत तर तिला विक्रमला सांगायला काय हरकत होती...???? नवरा-बायकोच नात विश्वासावर आधारलेलं आहे अस म्हणतात. मग अशा या नात्यामध्ये विक्रमने आपली प्रामाणिक बायको नयनावर पूर्वी एवढा विश्वास ठेवला नसता का...???

३) मालिकेचा नायक मला खलनायक वाटतो पण त्याला नायक म्हणून सर्वांसमोर आणण हे एकच गोष्ट सिद्ध करते की भारतात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच आहे.एका पुरुषाने एकाच वेळी दोन बायका फिरवल्या तर तो त्याचा पुरुषार्थ ठरतो...! विक्रमशी शारीरिक संबंध ठेवण अनन्यासाठी शारीरिक गरज असेल पण नयनासारखी सुंदर बायको घरी असताना विक्रमसाठी तो संभोग गरज नक्कीच नव्हती. तरी सुद्धा तो अनन्यावर मनापासून प्रेम करत होता. आता स्वतःची बायको असताना पर-स्त्रीवर मनापासून प्रेम कारण गुन्हा ठरू शकतो का...?? प्रेम तर कधी ठरवून करता येत नाही आणि ठरवून ते नाकारता देखील येत नाही.

संस्कृतीच्या दृष्टीने विचार केला तर वरचे सगळे प्रश्न निरर्थक वाटतात आणि 'जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा ' या एका निकषावर फटाफट उत्तरे देखील मिळवून देतात. पण याच सर्व प्रश्नांचा भावनिक पातळीवरील गुंतागुंतीवर विचार करायचा म्हटला तर नेमकी उलट उत्तरे मिळतात. दिग्दर्शक सतीश राजावाडेंनी कार्यक्रमाच्या शेवटी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांना चांगलीच शिकवण दिली.
जेव्हा अनन्या आणि नयना मध्ये एकाची निवड करायची वेळ येते तेव्हा अनन्यावर कितीही जीवापाड प्रेम असले तरी विक्रम नायानाचीच निवड करतो. 'घरोघरी मातीच्या चुली' या तत्वानुसार ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे की जेव्हा बायको आणि प्रेयसी यात एकाची निवड करयची वेळ येते तेव्हा बहुतेक पुरुष आपल्या बायकोची निवड करून प्रेयसीला उघड्यावर टाकून मोकळा होतो. तेव्हा कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीशी अजिबात पटत नसेल तर सरळ त्याच्याशी फारकत घ्यावी आणि मोकळे व्हावे पण खोट्या सुखाच्या मागे लागून कोणत्याही अनैतिक संबंधांचा आधार घेऊ नये. शेवटी पश्चाताप करणेच आपल्या हातात उरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा