बुधवार, ३ जुलै, २०१३

दोडामार्गचे ग्रहण कधी सुटलेच नाही...

कळणे... कधीकाळी निसर्गसौँदर्यासाठी प्रसिद्ध असलेले परंतु आज मायनिँगच्या भक्ष्यस्थानी पडलेले दुर्देवी गाव...!

दोडामार्ग आणि कळणे परिसरातच मायनिँगविरुद्ध आंदोलनाची पहिली ठिणगी पडली, सिँधुदुर्गात पर्यावरणच्या व्यापक चळवळीला जन्म झाला आणि कस्तुरीरंगन अहवालाने मात्र सिँधुदुर्गातील 192 गावे इको सेँसिटीव्ह घोषित करताना त्यातुन पुर्ण दोडामार्ग तालुकाच वगळुन सगळ्यांना 'आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी' म्हणीचा प्रत्यय घडवला.
एकीकडे कस्तुरीरंगन यांनी सावंतवाडी, बांदा असा शहरी भाग इको सेँसिटीव्ह घोषित करुन लोकांच्या अडचणी विनाकारण वाढवल्या आणि दुसरीकडे पशु-पक्षी, घनदाट झाडे, नदी, इत्यादी नैसर्गिक संपत्तीने खचाखच भरलेल्या दोडामार्ग तालुक्याला इकोसेँसिटीव्ह घोषित न करता, आधीच मायनिँग करुन दोडामार्गच्या निसर्गाचा घास गिळु पाहणा-या लांडग्यांना रान मोकळे करुन दिले.
गंमत म्हणजे जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत कस्तुरीरंगन यांना जाब विचारणे सोडाच, तोँडातुन चकार शब्दही बाहेर काढला नाही.

यावरुनच नेतेमंडळीँची पर्यावरणाप्रती असलेली आस्था आपल्याला दिसुन येते. गाडगीळ अहवालाबाबत मत जाणुन घेण्यासाठी जेव्हा कस्तुरीरंगन कमिटी फेब्रुवारीमध्ये सिँधुदुर्गात आलेली तेव्हा जिल्ह्याधिका-यांपासुन अगदी सगळ्याच लोकप्रतिनिधीँनी गाडगीळ अहवालविरोधी रडगाणे गाऊन, प्रसंगी पर्यावरणवाद्यांची मुस्कटदाबी करत त्यांना त्यांची बाजु मांडु न देता, आपला हेतु साध्य करुन घेतला. त्यामुळे कस्तुरीरंगन अहवालातुन दोडामार्ग तालुका गायब करण्यात कोणत्या नेत्याचा तर 'हात' नाही ना, या शंकेस वाव मिळतो.

गाडगीळ अहवाल लागु झाला असता तर कळणे मायनिँगसारखे विनाशकारी प्रकल्प आपोआप बंद पडले असते म्हणुनच गाडगीळ अहवाल रद्द करण्यासाठी चिरे खाणीँच्या मुद्दयाची ढाल करुन मोठे मायनिँग प्रकल्प जाणीवपुर्वक वाचवले गेले. चिरे खाणीँना गाडगीळ अहवालात कुठेही विरोध करण्यात आला नव्हता. पर्यावरणासाठी लढा देणा-या कोणत्याही व्यक्तीचा चिरेखाणीँना अजिबात विरोध नाही कारण साधारण 5 फुट खोल असलेल्या चिरेखाणीँमध्ये पावसाचे पाणी साचुन झिरपल्याने भुजल पातळी वाढते. त्यामुळे पर्यावरणाच्या द्रुष्टीने चिरे खाणी उपयुक्तच असतात.
उलटपक्षी 250 ते 400 फुट खोल खणल्या गेलेल्या कळण्यासारख्या लोहखनिजांच्या खाणीँमुळे, आजुबाजुच्या गावातील पाण्याचा प्रवाह त्या खाणीँच्या दिशेने वाहु लागतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच खाणीशेजारील गावांमधील सर्व विहिरी, बोअरवेल कोरड्या पडुन त्यांचे पाणी या खाणीँमध्ये जमा होते. 30 ते 40 फुट खोली असलेल्या विहिरी 250 ते 400 फुट खोल असलेल्या खाणीँसमोर कधीच तग धरु शकत नाहीत. त्यामुळे यापुढील काळात मायनिँगविरोध तीव्र झाला नाही तर लवकरच गावातील विहीरी आटत जाऊन पाण्याचे दुर्भिक्ष जाणवु लागेल आणि भविष्यातील प्रत्येक उन्हाळ्यात सिँधुदुर्गात दुष्काळसद्रुश परिस्थिती निर्माण होईल. लोहखनिज मायनिँगच्या भविष्यात होणा-या भीषण परिणामांचा लवकरच अंदाज आल्याने, सिँधुदुर्गच्या भुमीत धुडगुस घालणा-या या खाणमाफियांना कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठीच माधवराव गाडगीळांसारखा देवमाणुस पुढे सरसावला होता. मात्र या खाणमाफियांनी सर्वपक्षीय नेतेमंडळीँनाच हाताशी धरुन, धादांत खोटे बोलत, गौणखनिज व्यावसायिकांची माथी भडकवण्याचे काम केले.
गाडगीळ अहवाल रद्द करण्यासाठी साक्षात माधवराव गाडगीळांनाच
'सिँधुदुर्गच्या विकासाच्या आड येणारा नरकासुर' अशी प्रतिमा देत त्यांची नाहक बदनामी करण्यात आली. त्यामुळेच सिँधुदुर्गचा निसर्ग टिकवुन भावी पिढीला कोकणचे कोकणपण दाखवण्यासाठी आता कोणत्याही राजकीय पक्षावर अवलंबुन न राहता, समस्त जनतेलाच दोडामार्ग तालुक्याचे खाणमाफियांपासुन रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन लढा द्यावा लागेल. अन्यथा सिँधुदुर्गच्या आधुनिक महाभारतात, हिरवा शालु नेसलेल्या निसर्गरुपी द्रौपदीचे, वस्त्रहरण करण्यासाठी, दुर्योधन आणि कंपनी, केव्हाच सज्ज झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा