बुधवार, ३ जुलै, २०१३

दिग्दर्शक सतीश राजवाडेँची प्रेमाची गोष्ट अनुपमच्या नजरेतून…

गेल्या काही वर्षात "श्वास" चित्रपटाच्या आँस्करवारीनंतर मराठी चित्रपटात एक अनोखेच पर्व सुरु झाले आहे.इतकी वर्षे दर्जाच्या बाबतीत हिँदी चित्रपटांच्या तुलनेत खिजगणतीतही नसलेला मराठी सिनेमा आता शेरास सव्वाशेर ठरु लागलाय.मराठी चित्रपटाने हल्लीच्या काळात जी काही कात टाकली आहे त्याला कारणीभुत आहेत नवा विचार, नवा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येण्याचे धारिष्ट्य दाखवणारे नव्या धाटणीचे, नवे दिग्दर्शक आणि ही यादी सतीश राजवाडेँच्या नावाशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.
करियरच्या सुरुवातीलाच असंभव,अग्निहोत्र, गुंतता ह्रुदय हे अशा मालिकांमधुन दणक्यात पदार्पण करणा-या दिग्दर्शक सतीश राजवाडेँना खरी ओळख करुन दिली ती "मुंबई-पुणे-मुंबई" या अत्यंत फ्रेश अशा प्रेमकथेनेच...! त्यानंतर राजवाडेँनी मागे वळुन पाहिलेच नाही. "एका लग्नाची, दुसरी गोष्ट" या मालिकेत आगळीवेगळी प्रेमकथा घेऊन राजवाडे लोकांसमोर आले आणि या मालिकेने "न भुतो, न भविष्यती" यश संपादन करत झी मराठीच्या इतिहासातील सुवर्णपान हा किताब देखील पटकावला.सतीश राजवाडे हे नाव आबालव्रुद्धांच्या तोँडी बसलेले असतानाच 1 फेब्रुवारीला "प्रेमाची गोष्ट" चित्रपट प्रदर्शित झाला.
चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लगेचच लक्षात येईल की, सतीश राजवाडेँना मराठी चित्रपटांच्या क्षितीजावरील उगवता तारा का म्हणतात...!
राजवाडेँची प्रेमाबद्दलची समज आता खुपच प्रगल्भ झालेली दिसते. राजवाडेँना नातेसंबंधांच्या गोष्टी सांगायला फार आवडतात कारण त्यांच्या मते असल्या गोष्टी प्रत्येकाला आपल्याशाच वाटु लागतात. राजवाडेँना स्त्री-पुरुष नातेसंबंधामधील गंमत लवकरच कळते पण प्रत्येक वेळी या नातेसंबंधांची एक वेगळी चौकट घेऊन नवनवीन प्रकार हाताळण्याची काळजीही राजवाडे घेतात. जशी आपल्याला बहुतांश वेळी एकाच विषयावरील वेगवेगळी पुस्तके वाचायला आवडतात अगदी तसेच राजवाडेँनाही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करायचे असतात. राजवाडे नेहमी सांगतात की प्रेक्षकांना साध्या सरळ गोष्टीच हव्या असतात. आधीच आपल्या अवतीभोवती एवढा ताण आहे की प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन विकतच दुखण घ्यायच नसत. त्यामुळेच राजवाडेँच्या सगळ्या चित्रपटात मानवी नातेसंबंध खुप महत्वाचे दाखवले आहेत. काही वर्षापुर्वी रोमान्सची जी जादु यश चोप्रांनी हिँदी चित्रपटांवर केली होती, राजवाडे आज त्याच मार्गावरुन जाताना दिसतायेत अन् यशस्वीही होतायेत.

"प्रेमाची गोष्ट" ही कथा आहे राम (अतुल कुलकर्णी) आणि सोनल (सागरिका घाटगे) या दोघांची..! राम सुब्रमण्यम हा चित्रपटांसाठी प्रेमकथा लिहिणारा लेखक आहे तर त्याची बायको रागिणी (सुलेखा तळवलकर) एक यशस्वी अभिनेत्री..! रामचे लिखाण कितीही प्रभावी असले तरी निर्मात्यांच्या मागणीपुढे कराव्या लागणा-या तडजोडीँमुळे तो ते लोकांसमोर आणु शकत नाही. काही कारणास्तव राम-रागिणीमध्ये भांडणे होतात आणि त्यांचे लग्न घटस्फोटापर्यँत येऊन पोहचते. आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत असलेला राम शेवटचा पर्याय म्हणुन लग्न टिकवण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतो पण रागिणीच्या नकारात्मक प्रतिसादामुळे त्याचे हे प्रयत्न देखील अपुरे पडतात. घटस्फोटाच्या तारखेसाठी कोर्टात गेलेल्या रामची ओळख चित्रपटाची नायिका सोनलशी होते.सोनलने एकदा घटस्फोट घेऊन ती चुक सुधारण्यासाठी दुसरे लग्न केलेले असते पण ते लग्न सुद्धा टिकत नाही आणि घटस्फोटासाठी तिला देखील कोर्टाच्या पाय-या घासाव्या लागतात. दोन घटस्फोट घ्यायची वेळ आल्याने एकंदरीतच लग्न या संकल्पनेबद्दल सोनलच्या मनात फार घ्रुणा निर्माण होते आणि रामला ती हे सगळ तिथल्या तिथे बोलुन देखील दाखवते.
रामच्या लग्नाबाबतच्या संकल्पना मात्र खुपच वेगळ्या असतात.
रामच्या मते,

"लग्न संपल तरी नात उरत आणि नातही संपल तरी प्रेम हे उरतच...!
आपल्याला कोणीतरी हव असत, आपला हात हातात धरणारं,
आपली स्वप्न शेअर करुन त्याच स्वप्नात जगणार..."

त्यामुळे घटस्फोटानंतरही एक घाव दोन तुकडे न करता आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करणारा राम, शेवटपर्यँत ती आपल्याकडे पुन्हा परतेल या विश्वासाने उर्वरीत आयुष्य जगायच ठरवतो. त्याच्या या निर्णयाने त्याची आई (रोहिणी हट्टंगणी) देखील हैराण होते आणि रागिणीच्या चुकांची पाटी वाचुन दाखवते, तेव्हा बायकोवर निस्प्रुहपणे प्रेम करत असलेला राम तिच्या सर्व चुकांचे खापर आपल्या माथी घेत आईला म्हणतो-
"आई, सगळ तिचच कशावरुन चुकल असेल...? माझ्या हातुनही काही चुका झाल्या असतीलच ना...??"

रामला आता लेखनाचे आपले काम करण्यासाठी एका सहाय्यकाची गरज असते तर इकडे दुसरा घटस्फोट घेणा-या सोनलला नोकरीची भ्रांत असते. योगायोगाने सोनल रामकडे मुलाखतीला जाते आणि त्याची साहाय्यक बनुन काम करते. घटस्फोटानंतरही आपल्या प्रिय पत्नीचा फोटो नेहमी नजरेसमोर ठेवुन काम करणारा शांत चित्ताच राम सोनलला विचित्रच वाटतो.
एकदा कामानिमित्त रामचा लँपटाँप ढवळत असताना सोनलला रामने लिहिलेली गोष्ट सापडते. ती गोष्ट वाचल्यानंतर रामच्या प्रेमाप्रती असलेल्या संकल्पना, आयुष्यात नाती टिकवण्याचे रामने नमुद केलेले महत्व पाहुन आपोआपच ती रामकडे आकर्षिली जाते. कोणताही निर्माता या कथेवर चित्रपट करायला एका पायावर तयार होईल, असे प्रोत्साहन देत ती खचलेल्या रामचा आत्मविश्वास वाढवते.
एकदा राम तिला काहीही न सांगता सबंध दिवस गायब होतो, तेव्हा त्याच्या काळजीपोटी सोनल खुप अस्वस्थ होते. रामच्या आईला, त्याचा जीवनकंठश्च मित्र स्वराजला (सतीश राजवाडे) फोन करते. त्यावेळीच सोनल रामच्या प्रेमात पडलेली असते.

दुसरीकडे रामला देखील सोनल आवडु लागलेली असते पण मनाच ऐकायच की बुद्धीच या द्वंद्वात राम नेहमीच अडकलेला असतो आणि त्यामुळेच इतके दिवस रागिणीसाठीच राखुन ठेवलेली जागा कुठेतरी सोनलने घेतली आहे, हे वास्तव स्वीकारण्यास तो तयार होत नाही. त्याचा मित्र स्वराजच्या नजरेतुन रामची सोनलशी वाढत असलेली जवळीक सुटत नाही. तो जेव्हा रामला याबद्दल विचारतो तेव्हा "सोनल माझी फक्त मैत्रीण आहे" हे ठेवणीतले उत्तर प्रतिसादादाखल रामकडुन मिळते
त्यावेळी स्वराज रामला "रागिणी रामची कधीच चांगली मैत्रीण बनु शकली नाही" या रामच्याच वाक्याची आठवण करुन देतो.

( दिग्दर्शकाला या प्रसंगातुन हेच सुचवायचे आहे की, लग्न यशस्वी होण्यासाठी बायकोशी असलेले संबंध मैत्रीणीसारखे असले तर संसारासाठी चांगले असते किँवा तुमची एखादी खास मैत्रीण जर पुढे जाऊन तुमची पत्नी होणार असेल तर त्याला दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.)

एव्हाना रामला एका स्त्रीप्रधान चित्रपटाची पटकथा लिहण्याची आँफर येते आणि ती अधिक प्रभावी ठरण्यासाठी आपली सहाय्यक सोनलनेच ती कथा लिहावी असा आग्रह तो करतो. याअगोदर लेखनाचा कोणताच अनुभव नसल्याने घाबरलेल्या सोनलची समजुत काढताना तो सांगतो,
"चित्रपट करण म्हणजे वेगळ काही करायच नसत. आपल्या आजुबाजुला घडणा-या गोष्टी संवादातुन प्रेक्षकांसमोर आणायच्या असतात आणि त्याच गोष्टी लोकांना आवडतात. अवास्तव, कल्पनेपलीकडचे क्रुत्रिम प्रसंग कितीही मीठमसाला लावुन दाखवले तरी ते प्रभावी ठरु शकत नाहीत."

( ख-या आयुष्यात सतीश राजवाडे याच धाटणीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याचे सिनेमे, मालिका लोकांना आपलेसे वाटत असल्याने लोक त्यांना भरभरुन प्रतिसाद देतात.)
(कदाचित या सिनेमात अतुलच्या तोँडुन सतीश राजवाडे आपल्याच यशाचे गमक लोकांना सांगत असावा.)

रामच्या पाठिँब्यानंतर सोनल नव्या चित्रपटाच संवाद-लेखन करण्यास प्रारंभ करते. रामच्या प्रेमात आकंठ बुडालेली असल्यामुळे ती अगदी सहजपणे संवाद लिहिते आणि आपला पहिला प्रसंग रामला वाचुन दाखवत आनंदाने त्याला मिठी देखील मारते. सोनलविषयी नुकतेच मनात प्रेमाचे अंकुर फुटत असलेला राम तिने अचानक मारलेल्या या मिठीमुळे भांबावुन जातो. "ओल्या सांजवेळी..." या अर्थपुर्ण आणि श्रवणीय गाण्यात त्या दोघांची मानसिक अवस्था विशद केलेली आहे. त्यानंतर लगेचच रामने मनापासुन लिहिलेली कथा एका निर्मात्याला खुप आवडते आणि तो तिच्यावर लगेचच चित्रपट काढायला तयार होतो. सोनलने प्रोत्साहन देताना काढलेले शब्द रामला त्यावेळी आठवतात आणि तो तिला प्रपोज करणार एवढ्यातच सोनलचा नवरा थेट रामच्या आँफिसमध्ये येतो आणि सोनलने त्याला सुधारण्याची एक संधी द्यावी म्हणुन तिच्यासमोर गयावया करु लागतो.
रामच प्रपोजर बाजुलाच राहत. इतकी वर्षे चित्रपटांसाठी प्रेमाच्या कथा लिहीणारा राम सोनलच्या "मी माझ्या नव-याला एक संधी द्यावी का...?" या एकाच प्रश्नाने पुरता भांबावुन जातो कारण जिच्यावर तो आत्ताच कुठे प्रेम करु लागला होता, तिलाच नव-याकडे परत जा, अस तो तरी कस काय सांगु शकला असता...?

रामच्या बायकोला म्हणजेच रागिणीलाही दरम्यानच्या काळात आपल्यावर जीवापाड प्रेम करणा-या रामच्या भावना उमजतात, त्याचा प्रामाणिकपणा, खरेपणा तिला पुन्हा रामकडे आकर्षित करु लागतो.
इकडे रामचा निर्माता त्याच्या नव्या चित्रपटासाठी रागिणीचीच निवड करतो. चित्रपटाचा पटकथालेखकच असल्याने राम-रागिणीच्या भेटीगाठी रामच्या आँफिसात सोनलसमोरच वाढु लागतात. रामला त्याच्या पत्नीसोबत पाहुन जीवाची घालमेल होत मनातुन तडफडणारी सोनल रामपासुन दुरावा राखण्यासाठी तिच्या नव-याच्या घरी पुन्हा एकदा जाते. रागिणी मात्र रामला आपला संसार पुन्हा एकदा नव्याने सुरु करु म्हणुन मागे लागते. इतके दिवस रागिणीची चातकासारखी आतुरतेने वाट पाहणारा राम आता नकळतपणे सोनलच्या प्रेमात पडल्याने पत्नीच्या नजरेला देखील नजर भिडवायला धजत नसतो.
उशीरा का होईना रामचा स्वभाव ओळखु लागलेली त्याची बायको त्याच्या मनातील ही घालमेल समजते आणि रामला सोनलकडेच जाण्याचा सल्ला देते आणि चित्रपट संपतो.

दिग्दर्शक सतीश राजवाडेँचा चित्रपट म्हटला की तुम्ही कितीही ठरवलेत तरी थिएटरच्या बाहेर पडल्यावर मनात आपोआपच प्रश्नांचा कल्लोळ निर्माण होतो.

चित्रपटाच्या शेवटी पश्चाताप होऊन अश्रु ढाळणारी रागिणी सुद्धा योग्यच वाटते आणि त्या रागिणीच्याच दुर्देवासाठी आपल्या डोळ्यात अश्रु तरळु लागतात. जेव्हा रागिणीला पश्चाताप होतो, तिला रामच खर प्रेम,स्वभावातील प्रामाणिकपणा समजतो, तिला आता संसाराबरोबरच रामचा सहवास देखील हवाहवासा वाटतो, तेव्हा बुद्धी सांगते रागिणीलाच राम पुन्हा मिळायला पाहिजे होता, अन् त्याच वेळी मनात लगेचच प्रश्न देखील येतो,
"पण मग सोनलच काय..?
तिची तरी चुक कोणती...??
रामच्या आयुष्यात केवळ दुर्देवाने ती रागिणीच्या आधी नाही येऊ शकली ही तिची चुक तर नाही ना होऊ शकत...???
उलट दुस-यांदा येऊन जर रागिणीपेक्षा जास्त प्रेम तिने रामवर केल असेल, रामच्या डोळ्यातील प्रेम, त्याची नात्यांबाबतची समज, जी रागिणीला उभ्या आयुष्यात कधीच समजली नाही ती सोनलने घेतली असेल,
रामवर अक्षरशः जीव ओवाळुन टाकला असेल तर मग रामवर सोनलचाच अधिकार असायला हवा.
रागिणीला पुढे पश्चाताप झाला हे मान्य पण त्याचे प्रायश्चित तिला रामचे प्रेम गमावुनच भोगावे लागले. काही गोष्टी, काही निर्णय योग्य वेळीच लक्षात यावे लागतात अन्यथा पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही, हेच कदाचित राजवाडेँना दाखवायचे असेल.

आयुष्यात बहुतांश वेळा हि-याची किँमत असणारा माणुस आपल्या आजुबाजुसच वावरत असतो पण ज्याप्रमाणे चंदनाच्या जंगलात लोकांना चंदनाच्या लाकडाची किँमत कळत नाही आणि त्या लाकडांचा उपयोग ते जळावासाठी करतात अगदी तसेच आपल्यासोबत सतत राहणा-या त्या हि-याची खरी किँमत आपल्याला कधीच कळत नाही. आपण आयुष्यभर साध्या दगडातच हि-यांचा शोध घेत वेळ फुकट घालवतो. अन् एक दिवस एखादा रत्नपारखी आपल्यासोबत असणा-या त्या हि-याची योग्य ती पारख करतो आणि आपल्याकडुन तो हिरा हिरावुन नेतो. त्यावेळी पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नसतो. कारण ज्याला तुम्ही इतके दिवस सामान्य दगड समजत आलात त्याची खरी किँमत त्या रत्नपारख्यानेच ओळखलेली असते आणि त्यामुळेच त्या हि-यावर तुमचा नाही तर फक्त आणि फक्त त्या रत्नपारख्याचाच अधिकार असतो.
रागिणीच्या नशीबीही ती कधीच न पारखु शकलेला राम नावाचा हिरा गमावण्याची वेळ आली.

कोणतही नात, विशेषतः नवरा बायकोच किँवा स्त्री पुरुषाच नात हे खुपच गुंतागुंतीच आणि खुप पापुद्रे असलेल असच असत. ते खुप खाजगी देखील असत आणि अशी गुंतागुंतीची नाती सहज साध्या पद्धतीने पडद्यावर मांडायला दिग्दर्शक सतीश राजवाडेच लागतो. राम आणि सोनल ज्या वयोगटात आहेत, त्या वयोगटातील प्रेमाची हुरहुर, त्यांच्या आयुष्यातील ताण या सगळ्यांची मांडणी करण खुप कठीण काम होत. ते करत असताना घटस्फोटांसारखा संवेदनशील विषय हाताळण्याच शिवधनुष्य राजवाडेँनी अगदी उत्तम प्रकारे पेलुन दाखवल.

नवीन लग्न झालेल्यांपैकी मराठी कुटुंबामध्ये घटस्फोटांच प्रमाण वाढत आहे. आकडेवारी पाहिली तर 45% मराठी जोडप्यांचा घटस्फोट होतो. मुंबई-पुणे या भागात हा सगळा प्रकार जास्त वाढला आहे. म्हणजे हा विषय समाजात आधीच खोलवर गेला असल्याने आकडेवारी द्यायच टाळत जे घडतय ते दाखवण्यावर राजवाडेँनी जास्त भर दिला. नातेसंबंधातला समजुतदारपणा किँवा सहनशक्ती कशी कमी झाली आहे, याबाबत कोणतही सामाजिक भाष्य निदान संवादाच्या माध्यमातुन तरी केलेल नाही.
या सगळ्या गोष्टीचा शेवट अत्यंत बोधक (म्हणजे रागिणीला नात्याची महती पटुन ती परत रामकडे येईल आणि तोही तिला स्वीकारेल) वगैरे करण्याची खुप संधी होती पण तो मोह टाळत अत्यंत साधी, सरळ आणि सोपी प्रेमाची गोष्ट घेऊन सतीश लोकांसमोर आला. शेवटी मनोरंजन ही एक जबाबदारी आहे हे आपल्या प्रत्येक कलाक्रुतीतुन राजवाडेँनी दाखवुनच दिल आहे.

भांडण झाल्यानंतर वेगळ होताना केवळ ते जोडपच नाही तर त्यांची कुटुंबही अध्याह्रुत असतात. लग्न ही शेवटी माणसाने तयार केलेली सिस्टिम आहे. त्यात प्रवाह असण आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार या लग्नसंस्थेत बदल व्हायलाच हवेत. आताचा काळ तर खुपच महत्वाचा आहे कारण सध्या स्त्री ही आर्थिकद्रुष्ट्या सक्षम झाली आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये अस्वस्थता आहे. इतकी वर्ष जेव्हा स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते तेव्हा पुरुषच सगळ बघत होते. परिणामी लग्न 70-70 वर्षे टिकायची. पण त्या लग्नांना टिकण म्हणायच का...? चित्रपटात रामच्या आईच्या तोँडी एक खुप छान वाक्य आहे-

"जर तुम्ही आहे तसेच ओढत राहिलात तर संसार होईल, सहवास नाही."
बांधीलकी आहे म्हणुन नात जपत बसायच का...? की पटत नाही तर वेगळे होऊन पुढे सरकू, या मताने पुढे जायच? अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या काळात आजकालची तरुणाई वावरत आहे. समाजातील एक घटक हा मन आणि बुद्धी या वादात नेहमीच बुद्धीला महत्व देणारा आहे पण प्रेमात मनाच कोणीच ऐकत नाही. आता माझ्याकडची सायकल कधीही पंक्चर होऊ शकते, अगदी तसच माझ लग्नही कधीही पंक्चर होऊ शकत. घटस्फोट घेण्यासाठी म्हणुन जगात कोणीच लग्न करत नाही ना...! पण मग त्या पायरीपर्यँत एखाद नात पोहोचल असेल तर मग आयुष्यच संपल्यासारख वाटत. कुठेतरी खचल्यासारख होत. आयुष्यातील अत्यंत महत्वाची, एकमेकांवर तुटुन प्रेम करायची सोन्यासारखी वर्षे कोर्टात भांडण्यात वाया जातात. पण मग नात तोडुन वेगळ होण्यापेक्षा जोडीदाराला पुढे जाऊ देत आपुलकी तशीच ठेवुन वेगळ होण्यात काय चुक आहे. यदाकदाचित पुढे जाऊन जोडीदाराला त्याची चुक समजली, पश्चाताप झाला आणि निर्णय बदलला तर संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणताही येते. किँबहुना तशी धुसर शक्यता तरी नक्कीच दिसत राहते. दिग्दर्शक सतीश राजवाडेला आपल्या प्रेमाच्या गोष्टीत हेच दाखवायच होत आणि तो ब-याच प्रमाण यशस्वी देखील झाला.
चित्रपटाची समीक्षा करायची म्हणाल तर या चित्रपटाला मी **** देईन. कथानकाच्या बाबतीत सतीश राजवाडेच्याच मुंबई-पुणे-मुंबईच्या तुलनेत प्रेमाची गोष्ट काहीसा सरस ठरतो मात्र एकंदरीतच एक संपुर्ण चित्रपट म्हणुन पाहाल तर त्याचा प्रभाव मुंबई-पुणे-मुंबईच्या पेक्षा थोडा कमीच वाटतो. त्याला कारणही तशीच आहेत. त्या चित्रपटात स्वप्निल जोशी-मुक्ता बर्वेची जोडी एवढी छान जमली होती की ते दोघे जणु काही एकमेकांसाठीच बनले आहेत असेच वाटायचे. प्रेमाची गोष्टमध्ये एकीकडे अतुल कुलकर्णीसारखा कसलेला अभिनेता आणि त्याच वेळी दुसरीकडे खुपच नवखी अशी सागरिका घाटगे असल्याने एक जोडी म्हणुन त्यांचा प्रभाव तितकासा वाटला नाही. रोमँटिक चित्रपटात अतुल कुलकर्णी कशाला म्हणुन नाके मुरडणा-या टिकाकारांना अतुलने आपल्या अभिनयाच्या ताकदीने सणसणीत चपराक दिली आहे. संपुर्ण चित्रपटात अतुल अक्षरशः रामची भुमिका जगला आहे. अतुलचा अभिनय खुपच चांगला असला तरी नवखी सागरिकाही काही एकदमच वाईट नाही. तिने आपल्या परीने सोनलची भुमिका अगदी चांगल्या प्रकारे निभावुन नेली आहे, फक्त ती अतुलच्या तुलनेत थोडी फिकी वाटते.
तरी मनात कुठेतरी खटकतच राहते की नीट मराठी बोलताही न येणा-या सागरिका ऐवजी राजवाडेँनी पल्लवी सुभाष किँवा मुक्ता बर्वे यापैकी कोणा एकाची निवड केली असती तर चित्रपट मुंबई-पुणे-मुंबई पेक्षाही चांगला झाला असता. मात्र अतुलच्या निवडीला इतर कोणताही अभिनेता पर्यायच देऊ शकला नसता. जणु काही रामचा रोल त्याच्यासाठीच बनला होता. बाकी सुलेखा तळवलकर, सतीश राजवाडे, रोहिणी हट्टंगणी यांनीही आपापल्या भुमिका अतिशय योग्य प्रकारे निभावल्या आहेत. खास करुन नेहमी गंभीर राहणा-या किँवा तशाच भुमिका करणा-या सतीश राजवाडेला थोड्याशा विनोदी भुमिकेत पाहुन आश्चर्य वाटते.

या चित्रपटाची सर्वात ताकदवान गोष्ट आहे त्याची पटकथा, संवाद आणि गाणी...!
प्रथितयश सतीश राजवाडेच पटकथालेखक असल्याने त्याबद्दल आणखी काय बोलणार...! मात्र चिन्मयने त्या कथेवर लिहिलेल्या संवादांमध्ये शब्दांची जी काही खैरात केली आहे की केवळ ते संवाद ऐकुन थिएटरमध्ये व्वा... व्वा... असे शब्द आपसुकच ज्येष्ठ मंडळीँच्या तोँडी येतात.मराठी भाषेचे शब्दांमधील सामर्थ्य हेच खरे वैशिष्ट्य आहे आणि तेच सामर्थ्य चित्रपटात अनुभवायचे असेल तर प्रेमाची गोष्ट एकदा तरी नक्कीच पाहा.
फक्त संवादांमध्येच नव्हे तर या चित्रपटातील गाण्यांमध्येही याच शब्दांची किमया पाहायला मिळते. सतीश राजवाडेँनी नेहमीप्रमाणेच गाण्यांच्या बाबतीतही आपला चोखंदळपणा दाखवत कवयित्री अश्विनी शेँडेकडुन चित्रपटातील दोन्ही गाणी अप्रतिमरीत्या लिहुन घेतली आहेत.
"ओल्या सांजवेळी..." चित्रपटाच्या प्रदर्शनाअगोदरच खुप प्रसिद्ध झाल्याने दुसरे गाणे "हरवतो सुखाचा..." थोडेसे झाकोळले गेले मात्र जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा "हरवतो सुखाचा..." हे गाणे आणि त्यातील कैलाश खेरच्या त्या दोन ओळी काळजात चर्रर करुन जातात. अविनाश-विश्वजीतच्या संगीतालाही दाद द्यावीशी वाटते. गाणी ऐकल्यानंतर गायिका बेला शेँडेला मराठीतील श्रेया घोषाल का म्हणु नये हा प्रश्न देखील मनात येतो...? स्वप्नील बांदोडकर आणि ह्रुषिकेश रानडे यांनीही आपापल्या गाण्यांना पुरेपुर न्याय दिलाय.

एकंदरीत पटकथा, संवाद, संगीत, अभिनय या सर्वच आघाड्यांवर मला तरी "प्रेमाची गोष्ट" हा चित्रपट प्रशंसनीय वाटला.

1 टिप्पणी: