बुधवार, ३ जुलै, २०१३

हत्ती इलो...

सध्या सिँधुदुर्गात होणारी राजकीय पक्षपक्षांतरे पाहुन अजय कांडर यांच्या "हत्ती इलो" कवितेत मला काही ओळी नव्याने समाविष्ट कराव्याशा वाटतात.


"एकेकाळी हत्तीच्या विरोधात दंड ठोपटुन ठामपणे उभे ठाकलेले त्याचे विरोधक,
आज हत्तीच्याच सामर्थ्यासमोर मिँधे ठरले,
हत्तीफौजेत जाहीर प्रवेशाचे सोहळे करुन हत्तीच्याच गळ्यात गळे घालुन फिरु लागले,
आता आपले भवितव्य त्यांना हत्तीच्याच फौजेत दिसु लागले,
हत्तीलाच "द्रोणाचार्य" मानत ते स्वतःला "अर्जुन" समजु लागले,
राजकरणाच्या या महाभारतात पाप-पुण्याच्या सीमारेषाही स्वतः पापांचा महामेरु असलेला हत्तीच आखुन देऊ लागला,
हत्ती सांगेल तेच कौरव,
हत्ती सांगेल तेच पांडव,
हत्तीचे पाठिराखे पांडवांनाच कौरव संबोधत स्वतः स्वयंघोषित "धर्मराज" बनु लागले,
पाप-पुण्याच्या या लढाईत हत्तीची पापे पुण्यामध्ये गणली जाऊ लागली,
विरोधकांच्या फौजेतील समावेशानंतर
हत्ती इतका निर्ढावला...
इतका निर्ढावला...
आता हत्तीच्या विध्वंसक चालींमध्येच सामान्य लोकांना सभोवतालच्या निसर्गरम्य प्रदेशाचा विनाश सुर्यप्रकाशाइतका लख्ख दिसु लागला.

देव्हा-यातुन देव कधीचेच गायब झाले,
त्यांची देव्हा-यातील जागा आता हत्तीच्या फोटोने घेतली,
संध्याकाळी हत्तीच्या फोटोसमोर हात जोडुन लहान मुले प्रार्थना म्हणु लागली,
हत्ती माझी आई...
हत्ती माझा पिता...
सगळ्यांचाच सखा...
आपला हत्ती...
सगळीकडे हत्तीच्या वाढदिवसाचे सोहळे साजरे केले जाऊ लागले,
वर्तमानपत्रात सर्वत्रच शुभेच्छांसहित 'निष्ठावान' हत्तीसमर्थकांचे चेहरे दिसु लागले,
निष्ठेच्या व्याख्या देखील कालागणीक बदलु लागल्या,
लोभाच्या म्रुगजळात गुरफटलेले लाचार लोक 'हत्तीचे निष्ठावान' म्हणुन मिरवु लागले.
समाजातील प्रतिष्ठितांनी सुद्धा हत्तीसमोर आपली बुद्धी गहाण ठेवली,
हत्तीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करणे हेच आपल्या आयुष्यचे एकमेव ध्येय ती मानु लागली,
हत्तीने केलेल्या विध्वंसाला आपल्या विद्वत्तेच्या जोरावर विकासाचे रुपक द्यायचे काम ही प्रतिष्ठित मंडळी करु लागली,
तत्वांशी एकनिष्ठ असलेली मंडळी मात्र हत्तीविरोधी लेखणी उचलण्याचा केविलवाणा प्रयत्न करु लागली,
मात्र त्यांना जीवाचीच धमकी देत हत्तीने त्यांची लेखणी देखील हिरकावुन घेतली,
आता आमच्या भागात सर्वत्र एकच जयघोष दुमदुमत असतो-
हत्तीसेनेचा विजय असो..."



अवैध मायनींग व्यवसाय जोरात सुरु असल्याने कळणे परिसरातून खनिज वाहून नेणारे डंपर बेफान वेगाने रस्त्यावरून धावत आहेत... गेल्या एकाच वर्षात १८ लोकांना डंपर खाली चिरडले गेल्याने लोक आता भयभीत होऊन रस्त्यावरून फिरत आहेत... त्या सामान्य लोकांच्या व्यथा मालवणी बोलीभाषेतूनच व्यक्त करण्याचा प्रयत्न मी पुढील कवितेतून केलाय....!!!

"डंपर इले...
डंपर इले...
डंपर इले...

डंपर कळण्यातुन इले,
डंपर झोळंब्यातुन इले,
डंपर केसरीतुन इले,
डंपर तिरोड्यातुन इले.

प्हाटे-प्हाटेक पक्ष्यांचो,
किलबिलाटच नाहीसो झालो,
डंपरांचो कर्कश हाँर्न,
साखरझोपेतच ऐकाक येवक लागलो

शाळेत जाणारी पोरा,
डंपरांका भियाकं लागली,
रस्त्यार फिरणा-या म्हाता-यांका तर,
डंपरातच यमाची प्रतिमा दिसाक लागली

डंपरच्या धुळीनं,
तांबडे केले गाव,
मेले रस्त्यार पाणी टाकुन आणतत,
समाजसेवेचो आवं

देवा गाववाल्यांनी आमच्या,
अशी खयची चुक केली,
आमच्याच मागे डंपरची,
चाळेगत कशी काय लागली...?

कधीकाळी हिरव्यागार दिसणा-या कळण्याचा,
बोडक्या करुन वाळवंट झाला,
मायनिँग नको म्हणणा-याचा,
ताटाखालचा मांजर झाला

डंपरच्या किलेसाक कंटाळानं,
गाववाले त्यांच्याविरोधात एक झाले,
हातपाय तोडूची धमकी मिळाल्यार,
गपचुप जावनं घरात दडले

गाडगीळ अहवाल येता म्हटल्यार,
माजलेले डंपरवाले अचानक बिचारे झाले,
पर्यावरण सोडुन डंपरवाल्यांच्या रक्षणासाठी,
सगळेच पक्ष पुढे धावले

गावात रात्री फिरणा-या देवचारासारखे,
डंपरवाले दिवसाढवळ्या तुफान वेगात फिराक लागले,
रस्त्यार किड्या-मुंग्यांप्रमाणे चिरडले जाणारे गाववाले मात्र,
डंपरखाली आपल्या मरणाची वाट बघुक लागले..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा