गुरुवार, ४ जुलै, २०१३

नामदार नारायण राणे साहेबांना जाहीर पत्र....

पत्रास कारण की, गाडगीळ अहवालाला समर्थन आणि जैतापूरच्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी माझ्याकडून जे लेख लिहिले गेले त्यावरून नकळत का होईना माझी प्रतिमा कट्टर राणे विरोधक अशी बनली. हल्ली तर अगदी रस्त्यावर माझ्या ओळखीचे लोक मला इंजिनीरिंग सोडून राजकारणात पडलास का अस विचारू लागले, त्यामुळेच सर्वांसमक्ष जाहीररित्या मी सांगू इच्छितो,माझा नारायण राणे या व्यक्तींना कधीच विरोध नव्हता आणि पुढेही कधी नसणार. मुळातच विरोध हा कधी कोणत्या व्यक्तीला असूही नये, विरोध हा त्या व्यक्तीच्या विचारांना असावा, त्याने राबविलेल्या धोरणांना असावा.
सिंधुदुर्गची रत्नागिरीपासून वेगळा बनवून एक जिल्हा म्हणून निर्मिती झाल्यावर सर्वात जास्त काळ मंत्रिपद राणे साहेब तुमच्याकडेच होते, तुम्ही किती विकास केला आणि किती विकास होणे अपेक्षित होते यावर मत-मतांतरे असू शकतात पण एक गोष्ट नक्की की महाराष्ट्राच्या राजकारणात सिंधुदुर्गला जी काही ओळख आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे. बाकी आमदार शंडासारखे गप्प बसून विधानसभेत बाक तापवत असताना आपल्या आक्रमकतेचा वापर करून जिल्ह्यासाठी निधी आणलात तो तुम्हीच...! कोकणसाठी ५००० कोटी रुपयांचे "कोकण पेकेज" तुमच्या याच आक्रमकतेमुळे आमच्या पदरात पडले पण पुढे त्या निधीचे वाटप करण्यात मात्र तुम्ही थोडे कमी पडला आणि त्यामुळेच कोकणचा हवा तसा विकास आपण करू शकलो नाही.
हल्लीच एक शिपाई भेटला होता तो सांगत होता, मंत्रालयात काम होत नाही म्हणून जीव मेटाकुटीस आलेला, तेवढ्यातच राणे साहेब समोरून येताना दिसले आणि त्यांना पाहून फक्त लांबूनच सलाम केला. कदाचित त्यांनी सुद्धा ओळखले की आपल्या कोकणातला कोणी तरी बांधव दिसतोय आणि स्वतः येऊन चौकशी करत काय काम होते ते विचारले. काम होत नाही हे लक्षात आल्यावर तिकडच्या अधिकाऱ्याला त्यांनी फोन करून खडसावले आणि १ तासात काम झाले. कोकणातल्या अशा कितीतरी अडलेल्या-नडलेल्यांची कामे तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून केल्याचे कित्येक किस्से मी ऐकले आहेत. तुमचे राजकीय गुरु बाळासाहेबांकडूनच तुम्ही हा गुण घेतलेला असणार याबाबत खात्री आहे आणि त्यामुळेच तुमच्याबद्दल वैयक्तिक आदर आहे. कोकणातली माणस फणसासारखी असतात, वरून कितीही कडक दिसत असली तरी मनातून खूप गोड असतात आणि त्याच कोकणी मांसाच प्रकटीकरण तुम्ही करता याचा अभिमान वाटतो.

मला आक्षेप आहे तो तुमच्या विकासाच्या संकल्पनेवर...! तुमच अस ठाम मत आहे की सिंधुदुर्गातील लोकांच दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे तरच त्यांचा विकास झाला अस म्हणता येईल पण याबाबत तुम्ही सिंधुदुर्गातल्या लोकांची मते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाहीत किंवा त्यांची मानसिकता देखील कधीच विचारात घेतली नाही. सिंधुदुर्गातल्या लोकांची जडण-घडण ही सुरवातीपासूनच हिरव्यागार अशा निसर्गात झाली आहे. त्यांना त्या पर्यावरणाविषयी ओढ आणि आपुलकी असणे स्वाभाविकच आहे. सिंधुर्गातील लोक शेतीतून आणि रोजच्या कामधंद्यातून मिळणाऱ्या थोडक्या पैशात "समाधानी" आहेत आणि कोणत्याही दरडोई उत्पन्नापेक्षा हे समाधान महत्वाच असत आणि पैशांचे ढीगच्या ढीग रचून अंबानी सारख्या धनदांडग्यांना पण हे समाधान विकत घेता येत नाही. कोकणच्या माणसाच्या सुखी आणि समाधानी आयुष्याचे रहस्य त्याच्या आजूबाजूच्या शांत पर्यावरणात आहे. शहरातील वाहनांच्या आणि इतर कर्ण-कर्कश आवाजाला कंटाळून आजही तिकडचे लोक कोकणच्या याच शांत पर्यावरणात कोकिळेची कुहू-कुहू आणि चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी इकडे ४-५ दिवस येऊन राहतात आणि जाताना फ्रेश होऊन जातात. यालाच पर्यावरणातून मिळणारे समाधान म्हणतात आणि कोकणात राहणाऱ्यांना ते वर्षाचे ३६५ दिवस मिळते. आता विकासाच्या नावाखाली तुम्ही जर हेच पर्यावरण नष्ट करू पाहणार असाल तर स्थानिक लोक त्या विकासाला सुद्धा विरोध करणारच ना...? तुमच्या दृष्टीने जो विकास आहे तो सामान्य लोकांच्या दृष्टीने विनाश आहे आणि या विकास आणि विनाश यांच्या दरम्यान जी पुसटशी रेषा आहे ती जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत वाद होतच राहणार. जर कोकणच्या लोकांना विनाशकारी प्रकल्पांद्वारे केलेला विकास नकोच असेल, "ठेविले अनंते तैसेची राहावे" अशीच त्यांची मानसिकता असेल तर त्या लोकभावनेचा आदर करून ते सर्व प्रकल्प सरकारला मागे घ्यायला लावणे हे कोकणचा नेता म्हणून तुमचे प्रथम कर्तव्य आहे. लोक तुम्हाला आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठीच विश्वासाने मते देऊन निवडून देतात. जर खरच तुम्हाला विकास करायचा असेल तर सिंधुदुर्गचा पर्यटनातून विकास करा. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी "सिंधुदुर्ग गाईड" ही भन्नाट कल्पना तुम्ही अस्तित्वात आणली. खर तर १ वर्ष अगोदर जिल्ह्यातील दुसऱ्या एका आमदारासमोर मीच ती कल्पना सर्वप्रथम मांडली होती पण अशी विकासकामे त्वरित करायची असतील तर ती फक्त नारायण राणेच करू शकतील अस माझ आता ठाम मत बनल आहे. तिचा जास्तीत जास्त विस्तार करा जेणेकरून कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळतील. विरोधी पक्षाचे आमदार प्रमोद जठारांनी कोकण दुध, फळांवर प्रक्रिया करणारा कारखाना, गुळाचा कारखाना असे नवीन उद्योग जिल्ह्यात आणले आणि त्यांना कोणीही विरोध केला नाही. कोकणच्या लोकांना विकास पाहिजे आहे पण तो पर्यावरण पूरक पाहीजेय. तुम्ही पर्यावरणाला पूरक असे कोणतेही उद्योग आणाल तर लोक त्यांचे स्वागतच करतील मात्र औष्णिक प्रकल्प किंवा अणुउर्जा असे विनाशकारी प्रकल्प आणून त्याला वर विकास असे संबोधणार असाल तर त्याला विरोध होणारच....!
माननीय नामदार नारायण राणे साहेबांना जाहीर विनंती आहे की आता तरी नालायक कोंग्रेस पक्षाचा नाद सोडा आणि ज्या कोकणच्या लोकांनी तुम्हाला राजकारणात एवढे मोठे केले त्या कोकणी लोकांसाठी पुन्हा एकदा सरकारशी दंड थोपतुन उभे रहा. ती पांढऱ्या पायांची इटालियन अवदसा कोकणच्या लोकांचा सत्यानाश करू पाहत आहे आणि तिच्या नादाला तुम्ही लागू नका. बालासाहेबांच्या तालमीत तयार झालेले तुम्ही एक सच्चे शिवसैनिक आहात. मागे एकदा कोंग्रेस मधून बाहेर पडल्यावर तिला कोकणच पाणी दाखवला होता. नारायण राणे फक्त बालासाहेबाना साहेब मानतात बाकी कुणाला नाही हे तुमच वाक्य तेव्हा सगळ्या देशाने ऐकल होत. कोंग्रेसच्या १२५ वर्षाच्या इतिहासात त्यांच्या पक्षाध्यक्षाला सबंध देशासमोर शिव्या देत लायकी काढायची हिम्मत आजपर्यंत कोणालाच झाली नाही ती कोकणच्या वाघाने करून दाखवली याचा एक कोकणी म्हणून माला सार्थ अभिमान आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुम्ही सिंधुदुर्गात कोंग्रेसविरोधी लावलेली "रक्तालालेले हात" ही पोस्टर सर्वांच्या अजुनही लक्षात आहेत.


माझा विरोध नारायण राणेंना नव्हे तर कॉंग्रेसला आहे कारण माझ्या मते तरी कॉंग्रेस एक राजकीय पक्ष नसून ती एक लुटारूंची संघटना आहे. त्यांच्या टोळीत जो कोणी नेता जातो तो आपोआपच बदलू लागतो. शिवसेनेत असताना जे नारायण राणे होते ते कधीही जनविरोधी निर्णय घेत नसत कारण तो पक्षच लोकांसाठी होता. शिवसेना सोडताना तुमची राजकीय अपरिहार्यता मी समजू शकतो त्यामुळे पुन्हा त्या पक्षात जा अशी अवास्तव अपेक्षा मी तुमच्याकडून करणार नाही. फक्त कॉंग्रेस मध्ये राहून त्या पक्षाला खुश करण्यासाठी आमच्या लोकांवर जैतापूर सारखे विनश्काअरि प्रकल्प लादु देऊ नका.

उद्या या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर होणारा कोकणचा विनाश बघायला कदाचित तुम्ही नसाल आणि मी सुद्धा नसेन पण किरनोत्साराने मतीमंद, कर्करोगाने ग्रस्त झालेल्या कोकणच्या पुढच्या पिढ्या आपल्याला जाब विचारतील आणि त्यावेळी ते त्यांच्या बरबादीस तुम्हाला जबाबदार धरतील. ज्या नारायण राणेंनी कोकणच्या विकासाचा पाया घातला त्याच नारायण राणेंच्या माथी एका इटालियन बाईमुळे लाग्लीला हा कलंक मला तरी पाहावणार नाही. राणे साहेब तुम्ही एका गरीब कुटुंबातून पुढे आले आहात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या राजकारण्याला गरिबांच्या व्यथा कधी समजत नाहीत पण तुम्हाला नक्कीच समजतात असे मी तरी मानतो. त्या गरिबीत तुम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असायची. उद्या जर हा जैतापूर प्रकल्प पूर्ण झाला तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील गरीब मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. आंबा बागायतदार देशोधडीला लागतील. या सर्वांसाठीच मी तरी या प्रकल्पाला विरोध करतोय. त्यांची पोटे उपाशी ठेऊन माझ्याने तरी अन्न खाववणार नाही. बाकी माझा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही. मी एक इंजिनीर आहे आणि माझ्या क्षेत्रात मी खुश आहे. शक्य असेल तर या गरिबांचे संसार वाचवण्यासाठी जैतापुर्च्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमच्यासोबत या. जैतापूर प्रकल्प रद्द केलात तर हा कोकण सदैव तुमचा ऋणी राहील. तुमची देव रामेश्वरावर खूप श्रद्धा आहे आणि तुम्हाला त्या रामेश्वराचीच शप्पथ आहे. देव रामेश्वर तुम्हाला सुबुद्धी देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे पत्र इथेच थांबवतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा