बुधवार, ३ जुलै, २०१३

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे...

मित्रांनो, आज-काल फेसबुकवर सरकारने किँवा एकंदरीत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या नावाने गळे काढुन रडताना आपण सर्वजण दिसतो. नेत्यांबद्दलचा संताप जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी त्यांना शिव्या-शाप देखील देतो. काही जणांना तर आपण फार मोठे देशकार्य करत असल्याचा आभास होतो. सगळीकडे अंधारमय भविष्य दिसत असताना जेव्हा एखादे अण्णा हजारे किँवा विजय पांढरे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतात तेव्हा कुठे आपल्याला आशेचा किरण दिसु लागतो. मग काय अचानक आपल्यातली देशभक्ती जागरुक होते, "विजय पांढरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा आशयाचे स्टेटस सगळीकडे दिसु लागतात पण प्रत्यक्षात जेव्हा विजय पांढरेंसाठी रस्त्यावर उतरायची वेळ येते तेव्हा यातलेच मोजकेच लोक मोर्चामध्ये दिसतात. याला अपवाद होते अण्णांचे जंतरमंतर आणि रामलीला मैदानावरील उपोषण...! त्यावेळी अगदी बरेचजण देशप्रेमापोटी रस्त्यावर उतरले पण ते का त्यावेळीच का उतरले...? नंतर MMRDA वर झालेल्या उपोषणाच्या वेळी हे लोक कुठे गेले...?? एकंदरीतच नीट निरिक्षण केल्यावर लक्षात येईल की भारताची युवा पिढी ही कळपातल्या मेँढरांप्रमाणे वागु लागली आहे.अण्णा प्रथमच जेव्हा जंतरमंतरवर जनलोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसले त्याअगोदर 2-3 दिवस भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिँकला होता. क्रिकेटच्या निमित्ताने का होईना एरव्ही झेँड्याचे रंग देखील न आठवणारा तरुण वर्ग बाईकवरुन झेँडे फडकवत आपले देशाप्रती प्रेम व्यक्त करु लागला होता. योगायोगाने त्याच दरम्यान हे उपोषण सुरु झाल्याने अंगात देशभक्ती संचारलेली ही तमाम मंडळी जंतरमंतरवर जमा झाली. जंतरमंतरच्या यशस्वी उपोषणानंतर अण्णा हजारेँना पाठिँबा दिला की ताबडतोब भ्रष्टाचार नाहीसा होईल या भ्रमात तरुणवर्ग वावरत होता. अण्णांनी रामलीला मैदानावरील उपोषणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्रदिनाच्या दुस-या दिवशीचा अचुक मुहुर्त धरला. आदल्या दिवशी स्वातंत्र्यदिन असल्याने पुन्हा एकदा देशभक्ती आपोआपच संचारली होती आणि त्यात भर पडली ती काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारीने उधळलेल्या मुक्ताफळांची...!अगोदरच काँग्रेस सरकारविषयी अमर्याद असंतोष असणारा देशातील युवा वर्ग पेटुन उठला. समस्या एवढीच होती बर्गर-पिझ्झा या फास्टफुडच्या जमान्यातील पोरांना आंदोलन काय असते याचीच मुळी कल्पना नव्हती. ATM मध्ये कार्ड टाकल्यावर पैसे बाहेर पडावेत त्याप्रमाणे 12 दिवस रस्त्यावर उतरुन भ्रष्टाचार मुळापासुन नाहीसा होईल या भ्रमात ते होते आणि एवढी मोठी क्रांती करुनदेखील जनलोकपाल विधेयक संमत होत नाही हे पाहिल्यावर त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. त्यामुळेच हताश झालेला हा तथाकथित क्रांतीकारी युवावर्ग MMRDA वर झालेल्या अण्णांच्या उपोषणाला कुठे दिसलाच नाही आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एवढ्या दशकांनंतर दिसणारा आशेचा किरणदेखील हळुहळु अंधुक होऊ लागला.एवढी वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसी नेत्यांनी युवा वर्गाची नाडी अचुक ओळखली होती आणि त्यामुळेच सोयीस्कररित्या दिरंगाई करुन त्यांनी एका आंदोलनाच्या नरडीचा घोट घेतला.मित्रांनो, आता आपल्या हातात काहीच शिल्लक नाही असं म्हणत हताश होण्याची ही वेळ नाही कारण भ्रष्ट राज्यकर्त्याँनी लोकांना हतबल करुन देशाला लुटायची योजनाच तयार केली आहे. आपली निराशा त्यांच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. कित्येक वर्षानंतर जन्माला आलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा अस्त करुन आपण काँग्रेसी असुरांना विक्रुत हास्य करायची संधी द्यायची नाही. पण त्यासाठी आपण सामान्य लोक काय करु शकतो...???आजच्या घडीला दस्तरखुद्द अण्णा हजारे आणि त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय अरविँद केजरीवाल या दोघांचीही तोँडे विरुद्ध दिशांना आहेत पण मला वाटत दोघेही आपापल्या जागी योग्य आहेत. अरविँद केजरीवाल राजकरणाच्या आखाड्यात उतरुन भ्रष्टाचाराच्या चिखलाने बरबटलेल्या डुकरांना पर्याय देऊ पाहत आहेत कारण केजरीवालांच्या मते फक्त आंदोलन करुन काहीच होणार नाही. मला खेदाने सांगावे लागते की, केजरीवालांसारख्या उच्चशिक्षित माणसाची मानसिकता एखाद्या उथळ माथ्याने विचार करणा-या युवकासारखी आहे. फक्त 16 महिन्यात कोणतेही आंदोलन यशस्वी किँवा अयशस्वी होत नसते. त्यासाठी वाट पाहुन संघर्ष देण्याची तयारी ठेवावी लागते. आजपर्यँत RTI सारखे कितीतरी लोकोपयोगी कायदे संमत झालेत ते फक्त लोकांनी केलेल्या आंदोलनामुळेच आणि हेच आपल्या लोकशाहीच वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे आंदोलन मोडीत काढुन फक्त राजकीय पक्ष काढुन राजकरणात उडी मारणे स्वागतार्ह नाही पण कायदे शेवटी संसदेतच संमत होतात. त्यामुळे एक स्वतंत्र पक्ष काढुन राजकरणात उतरणं योग्यच आहे. जर जनहितकारी कायदे संमत करावयाचे असतील तर राजकरणात पडुन संसदेत आपला दबावगट प्रस्थापित करणे योग्य ठरते. अण्णांच्या मते कोणताही पक्ष न काढता स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांचा प्रचार करावा. मग प्रश्न हा उद्भवतो की, उमेदवार कितीही स्वच्छ असला तरी लोकसभेत ठराव संमत करताना त्या उमेदवाराला पक्षाशीच बांधील राहावे लागते. मग तो पक्षादेश झुगारुन जनहितार्थ मतदान करेल याची खात्री कुणी द्यावी...? किँवा अण्णा म्हणतायेत त्याप्रमाणे एखाद्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार करुन त्याला निवडुन दिले आणि जर तो निवडुन गेल्यावर आपले कारनामे दाखवु लागला तर जबाबदारी स्वीकारायची कोणी...?? हल्लीच आमच्या सिँधुदुर्गात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नारायण राणेँना पाडुन घालण्यासाठी बाकी सगळे पक्ष एकत्र आले. राणेँच्या गुंडगिरीला कंटाळलेल्या लोकांनी त्यातील काही उमेदवारांना निवडुनही दिले पण आता तेच उमेदवार निवडुन आल्यावर पुन्हा राणेँशी हातमिळवणी करत आहेत.त्यासाठीच केजरीवाल जर एखादा नवीन पक्ष काढत असतील तर त्यांच्या पक्षातर्फे निवडणुकीला कोणी उभ राहाव हे आपण सर्वजण ठरवु शकतो. त्यांचा प्रचार करुन निवडुन आणल्यावर ते सर्व सांसद संसदेत पक्षाच्या ध्येयधोरणांशी अनुरुप काम करायला नेहमीच बांधील राहतील. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याच राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ममता बँनर्जीँच्या TMC सारखे प्रादेशिक पक्ष फक्त 18-20 खासदारांच्या जोरावर जुलमी निर्णयांविरुद्ध संपुर्ण सरकारला झुकायला लावत आहे. पहिल्याच निवडणुकीत केजरीवालांच्या पक्षाला बहुमत देऊन आपली सत्ता आणु अशी खोटी आशा बाळगणे मुर्खपणाचे ठरेल पण त्यांचे संपुर्ण देशात 50-75 खासदार जरी निवडुन आले तरी कोणत्याही सरकारवर कायदे मंजुर करताना दबाव आणण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील. सगळ्या पक्षांचे सगळेच नेते काही भ्रष्ट नाहीत. त्यामुळे फार फार तर जी नेतेमंडळी स्वच्छ चारित्र्याची, बेदाग आणि मुख्य म्हणजे क्रियाशील आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्याविरुद्ध या नवीन पक्षाने उमेदवार उभा करु नये.आता मी महत्वाच्या मुद्द्यावर बोलतो. लोकसभेच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रातुन तब्बल 48 खासदार निवडुन जातात. आपला खासदार सोडुन बाकी राहिलेल्या 47 जणांपैकी कित्येक जणांना आपण ओळखत देखील नाही. आज जेव्हा महाराष्ट्रातील खासदारांची यादी पाहिली तेव्हा त्यात सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरुन झगडणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे राजु शेट्टी, गोपीनाथ मुंडे अशी मोजकीच नावे सापडली. त्याउलट शरद पवार, सुरेश कलमाडी, प्रफुल्ल पटेल, समीर भुजबळ, पद्मसिँग पाटील, सुशीलकुमार शिँदे यांच्यासारखी 'आदर्श' भ्रष्टाचारी मंडळी मोठ्या प्रमाणात आढळली. एक मराठी माणुस म्हणुन मला याची लाज वाटते. या तथाकथित दिवट्यांना दारु,पैसे आणि गुंडगिरीच्या जोरावर निवडणुका जिँकायच्या कशा याची सगळी तंत्र माहित आहेत. आपण सर्वाँनी फेसबुकवर या हरामखोरांना शिव्या देऊन वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. कोडगेपणा कोळुन प्यायलेल्या या भ्रष्ट नरकासुरांवर आणि पैशापायी लाचार होऊन त्यांचा प्रचार करणा-या त्यांच्या चेल्यांवर आपल्या शिव्यांचा काहीच परिणाम होणार नाही. त्यापेक्षा या 48 जागांवर निवडुन जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात कोण योग्य आणि प्रबळ दावेदार आहे याची चर्चा करु. त्यानुसार आपल्याला योग्य वाटणा-या उमेदवारांची यादी तयार करुया आणि निवडणुकांच्या वेळी फक्त त्याच 48 जणांचा फेसबुकवर प्रचार करुयात. फक्त माझी एकच विनंती आहे की अशी यादी तयार करताना कोणत्याही पक्षाचा मुखवटा घालुन आपलाच पक्ष चांगला कसा असल्या वायफळ गप्पा कोणी इकडे करु नका. काँग्रेसकडे भ्रष्टाचारी म्हणुन सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण असले तर भाजपकडे सुद्धा येडिरुप्पा, गडकरी आहेत. राष्ट्रवादीकडे तर दस्तरखुद्द शरद पवार आहेत. शिवसेना आणि मनसे अध्यक्ष हप्तेबाज म्हणुनच प्रसिद्ध आहेत. सांगायचा भावार्थ एवढाच की सध्या देशात कोणताच पक्ष धुतल्या तांदळाचा नाही आणि कार्यकर्त्याँचा वापर प्रत्येक पक्ष आपापल्या स्वार्थासाठी करीत असतो.कोणत्यातरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन मतप्रदर्शन करण्यापेक्षा भारतमातेच्या रक्षणासाठी तळमळीने धडपडणारा देशभक्त म्हणुन मत नोँदवा. निवडणुकीनंतर पश्चातापाने "विठ्ठला, कोणता हा झेँडा घेऊ हाती" रडण्यापेक्षा अगोदरच भारतमातेचा तिरंगा हाती घेणे केव्हाही चांगले...!!! आता महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार शोधायचा कसा...? अण्णा हजारेँप्रमाणे आयुष्यात 10 रुपयांचा देखील भ्रष्टाचार न केलेला माणुस शोधायला गेलो तर आपल्याला खाली हातानेच परतावे लागेल. त्यामुळे "दगडापेक्षा वीट मऊ" या तत्वानुसार जो उमेदवार त्यातल्या त्यात चारित्र्यवान असेल त्याला निवडणे योग्य ठरेल. त्याचबरोबर त्याची विद्वत्ता, सामाजिक जाणीव, त्याने आजपर्यँत केलेले एखादे चांगले लोकोपयोगी काम याचा देखील विचार केला जावा. जर कोणाला या पोस्टवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर त्याने सर्वप्रथम आपला मतदारसंघ आणि आपल्याला योग्य वाटणा-या खासराचे नाव लिहावे. त्यानंतर तीच व्यक्ती का योग्य आहे याचे मजबुत कारणांसहीत स्पष्टीकरण द्यावे. ज्या लोकांना तो उमेदवार त्या भागाचा खासदार म्हणुन योग्य वाटतो त्यांनी कमेँट LIKE करुन पसंती दाखवावी किँवा तो उमेदवार का योग्य नाही याची कारणीमांसा करावी. तुम्ही निवडलेल्या व्यक्तीला राजकीय पार्श्वभुमी असलीच पाहिजे याची सक्ती नाही. जर एखाद्या राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या परंतु समाजकार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तीला जास्त लोकांची संमती मिळाली तर मान्यवरांच्या मदतीने त्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेऊन आपण त्यांना निवडणुकीस उभे राहण्याची विनंती करु शकतो. अजुन किती दिवस आपण देशात काहीतरी चांगली सुरुवात करण्यासाठी अण्णा हजारे किँवा विजय पांढरे तयार होतात याची वाट पाहत बसणार आहोत...?अण्णा आणि विजय पांढरेँचा आदर्श घेऊन भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सिँहाचा नाही पण खारीचा वाटा उचलणे हे एक भारतीय म्हणुन आपले कर्तव्य नव्हे...??मला वाटत दिवसभर फेसबुकवर रिकामी बसुन काँग्रेसच्या फालतु नेत्यांना अश्लील शिव्या देत लोकांना देशासमोर काय समस्या आहेत याचे विवेचन देत बसण्यापेक्षा त्या समस्यांवर उपाय काय याची चर्चा करणे केव्हाही चांगले...! पोस्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त SHARE करा जेणेकरुन महाराष्ट्रातील कानाकोप-यात राहणा-या जनतेला कोणता नेता खासदार म्हणुन योग्य वाटतो ते आपणा सर्वाँना कळेल आणि महाराष्ट्रातील भावी 48 खासदारांची यादी तयार करण सोप होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा