बुधवार, ३ जुलै, २०१३

खुपते तिथे गुप्ते…


"खुपते तिथे गुप्ते " कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात नामदार नारायण राणेंनी अगदी दणक्यात सुरु करून दिली.
पर्यावरणाच्या सगळ्या अति झुगारून देत जो "लवासा" प्रकल्प उभारला जातोय त्यावर राणेंना प्रश्न केला असता,
"
आदिवासी लोकांच्या जमिनी हिसकावून घेत 'लवासा' प्रकल्पाला मीच मान्यता दिली." असे बेधडक वक्तव्य त्यांनी केले. त्याच बरोबर आदिवासी लोकांनी त्यांना देऊ केलेले पैसे घेतले नाहीत अशी पुष्टीही जोडून टाकली.

त्यानंतर गुप्तेंनी जैतापूरच्या विनाशकारी अणुप्रकल्पाबाबत कोकणचे लोक करत असलेल्या विरोधाबाबत विचारले असता राणेंनी रोजच्याच शैलीत उत्तर दिले,

"
जैतापुरात पुणे, रायगड असे बाहेरचे लोक येऊन विरोध करतात. कोकणात वादळ आले किंवा पूर आला कि हे लोक कोठे असतात...? तेव्हा मीच मदत करतो.परदेशी लोक त्यांना त्यासाठी पैसा पुरवतात. जैतापूर प्रकल्प पूर्ण झाला कि कोकणात १० ते २० हजार रोजगार तयार होतील."

माननीय राणे साहेब उद्या जैतापुरच्या अणुभट्टीत एखादा अपघात झाला तर त्याचे परिणाम फक्त जैतापुरच्या लोकांनाच भोगावे लागणार नाहीत तर जैतापूर सहित सबंध कोकण ज्यात रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि तुमचा स्वताचा सिंधुदुर्ग जिल्हा येतो त्या सर्वांचा विनाश निश्चित आहे. जर अपघाताची तीव्रता अधिक असेल तर संपूर्ण महाराष्ट्रला या अपघाताचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. २६ फेब्रुवारी २०१० ला जैतापूरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत लाखोंच्या संख्येने उपस्तीथ राहून ज्या लोकांनी प्रथमच कोकणात तुमचा जाहीरपणे हुर्यो उडवला ते सगळे बाहेरचेच होते का...? भाषण अर्धवट टाकून सभेतून पळ काढायची वेळ आयुष्यात पहिल्यांदाच जैतापूर मध्ये तुमच्यावर आली होती हे एवढ्या लवकर कसे विसरलात...?? आधी 'बाहेरचे लोक' या व्याख्येत कोण येतात ते नक्की ठरवा आणि मग बोला. सिंधुदुर्गात राहून मी जर जैतापूर प्रकल्पाला विरोध करताना बाहेरचा होणार असेल तर तुम्हीसुद्धा सिंधुदुर्गातच राहता मग तुम्ही आतले कसे काय झालात...???
अजून एक मला परदेशातून कोणी पैसा पुरवला ते देखील पुरावे देऊन स्पष्ट करा कारण त्या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांपैकी मी देखील एक आहे. जर सिद्ध करू शकला नाहीत तर असे सरसकट वक्तव्य केल्या प्रकरणी तुम्हाला जाहीरपणे माफी मागावी लागेल.
कोकणात वादळ आले किंवा पूर आला कि मदत करणे हे फक्त तुमचेच कर्तव्य आहे कारण तुम्ही कोकणातून निवडून गेलेले मंत्री आहात. जर मंत्री बनून एवढा गडगंज पैसा कमावल्यावर देखील मदत करणे जड वाटत असेल तर राजकारणातून निवृत्ती घ्या आणि मंत्रिपद आमच्याकडे सुपूर्त करा, मग आम्ही सुद्धा मदत करून दाखवतो...!
आता तुम्ही जैतापूर प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर कोकणात १० ते २० हजार रोजगार निर्माण होतील असे हास्यास्पद वक्तव्य केलात त्याबद्दल बोलू. जरा विस्तृतपणे सांगू शकाल का ते रोजगार कोणते असतील...? तुम्ही तरी कस सांगाल कारण ते रोजगार ऐकून कोकणातले लोक तुम्हाला तोंडावर शिव्या देतील. त्यामुळे तुमच्या वतीने हे सत्कार्य मीच करतो. जैतापुर अणुप्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळवुन देण शक्य नाही. अणुप्रकल्प हा केँद्र शासनाच्या अखत्यारीत असतो. हेल्पर, रीगर, शिपाई यापेक्षा जास्त कुशल कामगारांची भरती ही सर्व देशभरातून अर्ज मागवुन केली जाते. अणुवीज केँद्रापासून दहा किलोमीटरवर अणुकेँद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक वसाहत असेल. एक रुग्णालय असेल, तेथे घरगडी, मोलकरीण, आया, शिपाई असे हंगामी रोजगार मिळू शकतील.म्हणजेच संपूर्णपणे नवीन असलेला एखादा रोजीरोटीचा मार्ग त्यांच्यावर लादला जाईल. ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतोय तिकडच्या गावकऱ्याना मत्स्योत्पादनाशिवाय पोटापाण्याचा दुसरा उद्योग माहित नाही. त्यांना प्रकल्प आल्यानंतर दूध, भाजी, इस्त्रीच्या दुकानांचे परवाने देण म्हणजे स्थानिकांचा विकास काय...? तुमच्या सरकारने आजपर्यँत प्रकल्पापुर्वी खोटी आश्वासने देऊन प्रकल्पाच्या पुर्णत्वानंतर तारापुर वीज प्रकल्पग्रस्त, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त, विविध धरण प्रकल्पग्रस्त यांचा विश्वासघात करत त्यांचे प्रश्न अनुत्तरीत ठेवले, ही उघड वस्तुतिथी आहे. त्या सरकारला जैतापुर प्रकल्पग्रस्तांना आश्वासने द्यायचा नैतिक अधिकारच नाही.सरकारने एकीकडे प्रकल्पग्रस्तांना कंगाल केले तर दुसरीकडे भोपाळ वायुगळतीला जबाबदार असणा-या अँडरसनला अमेरिकेत पळुन जाण्यास मदत केली. कोकणची जनता दुधखुळी नाही. असल्या लबाड सरकारवर कोकणच्या जनतेने का म्हणुन विश्वास ठेवावा...? कोकणी लोकांच्या हिरवाकंच निसर्ग आणि शेती बागायतीवर नुकसान ओढवणार, उपजीविकेची सर्व पारंपारिक साधनं गमावली जाणार तर दुस-या बाजूला रोजगारासाठी आलेल्या बाहेरच्या मंडळींमुळे अपु-या नागरी सोयीसुविधांवर ताण पडणार, वाढते सामाजिक ताणतणाव, जीवनमान उंचवणार म्हणण्यापेक्षा आधीच्या तुलनेत ते कैकपटीने महागडे बनणार, तत्सम सारे समाजशास्त्रीय परिणाम ग्रामीण भागात जाणा-या प्रकल्पांबाबत आजवर अभ्यासण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर लाभ मिळण्यापेक्षा ती जनता देशोधडीला लागण्याची उदाहरणे अधिक आहेत. भारतात सहा अणु प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यातल्या कोणत्या एका प्रकल्पात वीस हजार लोक काम करतात ते तरी सांगायचे. सगळ्या सहा प्रकल्पात मिळून सुद्धा वीस हजार नोकर्‍या निर्माण झाल्या नाहीत. अगदी भांडी घासणार्‍या बायका, ड्रायवर, माळी धरले तरी एका प्रकल्पाचा आकडा दोन तीन हजाराच्या वर जाणार नाही.

बाकी तुमचा कितीही कट्टर विरोधक असलो तरी कालच्या भागात माननीय बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी तुम्ही जी चिंता दाखवली ते पाहून गहिवरून आले. बाळासाहेबांवर तुम्ही जेवढ प्रेम केल तेवढ त्यांच्या नातलगांपैकी कोणी केल नसणार याची मला खात्री आहे. बाळासाहेब पण तुम्हाला आपल्या मुला इतकेच जपायचे पण जेव्हा स्वताचा मुलगा आणि स्वताचा सच्चा भक्त यात निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तुम्हाला बाजूला करत उद्धवची निवड केली. दुसरा 'नारायण राणे' तयार न झाल्याने शिवसेनेची झालेली वाताहात पाहून त्यांना देखील पश्चाताप झाला असेल पण हा कठोर निर्णय घेताना त्यांचा सुद्धा नाईलाज होता. आजवर एक आक्रमक नेता एवढीच राणेँची ओळख आपणा सर्वाँना माहित होती पण कालच्या भागात पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे, एवढी सगळी सुखे पायाशी लोळत असताना पत्नीच्या हातच्या जेवणाला प्राधान्य देणारे, कुटुंबाला राजकरणापेक्षा जास्त महत्व देणारे, बाळासाहेबांविषयी आजही मनात नितांत आदर असुन त्यांच्या तब्येतीची काळजी करत भावुक होणारे आणि 7 वर्षे काँग्रेसमध्ये काढली तरी मनाने मात्र "शिवसैनिक" राहिलेले नारायणराव सर्वाँसमोर आले.


अवधूत गुप्तेंना मनापासून धन्यवाद...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा