शनिवार, ६ जुलै, २०१३

"क्रुषी, ग्रामीण व पर्यावरणपुरक विकासात गुजरातचे योगदान..." * लेखक- नरेँद्र मोदी (मा.मुख्यमंत्री, गुजरात)

'वनराई'चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मोहन धारियाजी यांच्या उत्साहाचा मी नेहमीच अनुभव घेत आलो आहे. गुजरातबद्दल काही चांगले ऐकले की त्वरीत त्यांचा मला फोन येत असतो. अभिनंदन करणे, उत्साह वाढविणे, सार्वजनिक जीवनात चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे ही सर्व त्यांच्या जीवनाची विभिन्न अंगे आहेत. मोहन धारियाजी पुण्याचे किँवा महाराष्ट्राचे नाहीत असे मी म्हणु शकत नाही पण एवढे निश्चित सांगु शकतो की ते गुजराथीही आहेत. मुडासा येथे त्यांचे पूर्वज राहत होते.मोहन धारियाजी यांच्या नेत्रुत्वाखाली वनराई संस्था पर्यावरण आणि ग्रामीण विकासामध्ये खुप मोठे काम करीत आहे. वनराई संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वनराई बंधा-याची चळवळ चालते, त्याप्रमाणे आमच्याकडे गुजरातेत 'बोरी बांध' अशी एक चळवळ चालते. बोरी बांधच्या चळवळीत मे-जुन महिन्यात सिँमेटच्या रिकाम्या पोत्यात दगड, वाळू, माती भरुन पाणी अडविण्याचे काम केले जाते आणि ते सुद्धा लाखोच्या संख्येने. काही नद्या अशा आहेत ज्यांच्यावर आम्ही दोन-दोन कि.मी. वर लहान-लहान बोरी बांध बनविले आहेत. त्यामुळे आठ-आठ, दहा-दहा कि.मी. हुन अधिक साठवलेले पाणी जवळ जवळ जानेवारी-फेब्रुवारीपर्यँत वापरता येते. याद्वारे आता ब-याच ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत.

* वर्षा जलसंचय-संरक्षण

गुजरातने 'वर्षा जलसंचय-संरक्षण व सिँचन' यामध्ये खुप काम केले आहे. यासाठी सहा लाखांहुन अधिक बांधकामे गेल्या 10 वर्षात उभी केली आहेत. मजेची गोष्ट अशी की, या सर्व चळवळी, सर्व कामे सरकारी आणि खासगी या दोघांच्या भागीदारीने चालली आहेत. यामध्ये 60% सरकार गुंतवते व 40% लोक गुंतवतात. लोकांच्याच हाताने, त्यांच्याच देखरेखेखाली व त्यांच्याच गावात काम होत असते. गुजरातमध्ये 10 वर्षातील 7 वर्षे दुष्काळच असतो. त्यामुळे साहजिकच पाण्याचाही मोठा अभाव असतो. येथे नर्मदा नदीशिवाय बारा महिने वाहणारी दुसरी कोणतीही नदी नाही. असे असूनही जलसंचयामुळे गुजरातचा क्रुषी विकासदर 11 टक्के आहे. भारताचा क्रुषी विकासदर 3 टक्के आहे. गेले 20 वर्षे भारताचा क्रुषी विभाग 4 टक्के क्रुषी विकासदराचे उद्दिष्ट निश्चित करत आहे. यासाठी प्रत्येक वेळी योजना बनविली जाते परंतु आजपर्यँत 3 टक्क्यांच्या पुढे विकासदर जाऊ शकलेला नाही. गुजरात याला अपवाद आहे. देशातील क्रुषी प्रधान मानल्या गेलेल्या राज्यांमध्ये गुजरातचे नाव कधीच नव्हते. यात पंजाब, हरियाणा, गंगा-यमुनेचे किँवा गोदावरी क्रुष्णेलगतचे प्रदेश येत होते परंतु आज संपुर्ण देशात गुजरात हरितक्रांतीचे नेत्रुत्व करत आहे. त्याचे एक कारण वर्षा जलसंचय संरक्षण.

*ठिबक सिँचनाची चळवळ

आमच्याकडे गेल्या 40-50 वर्षात ठिबक सिँचनाचे काम केवळ हजार-दीड हजार हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. आपले अधिकांश पाणी पाटाच्या जलप्रवाह सिँचन पद्धतीमुळे खर्च होते. जलप्रवाह सिँचन पद्धती थांबविल्याशिवाय आणि सुक्ष्म सिँचनाशिवाय आपण पाणी वाचवू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्याने ठिबक सिँचनाची चळवळ सुरु केली. याद्वारे 20 वर्षात सुमारे चार लाख एकरापर्यँत आम्ही पोहोचलो आहोत. आपल्या देशात अशी समजूत होती की, उसाचे पीक जलप्रवाह सिँचनपद्धती शिवाय घेता येणार नाही. मात्र आम्ही उसाचे पीक पुर्णपणे तुषार सिँचनाने पाणी देऊन घेत आहोत. आमच्याकडे उत्पादित होणा-या उसात साखरेचे प्रमाण अधिक आहे.या सर्व गोष्टीँचा आम्हाला खुप फायदा झाला आहे.

* नदीजोड प्रकल्प-:

आमच्याकडील साबरमती नदी आपण पाहिली असेल. शाळेतील एखाद्या मुलाला साबरमती नदीवर निबंध लिहावयास सांगितले तर तो काय लिहिल...?तो लिहिल- 'नदीत वाळु असते. नदीत सर्कस येते. नदीत क्रिकेट खेळण्यासाठी चांगले मैदान असते.' कारण नदीत पाणी असल्याचे त्याने कधी पाहिलेले नाही. साबरमती नदीची ही भयावह अवस्था होती. आम्ही नदीजोडचा प्रयोग केला. नर्मदा नदीचे पाणी साबरमतीला जोडले. आज आपण अहमदाबादला आलात तर 365 दिवस, 24 तास साबरमती नदी पाण्याने भरलेली दिसेल मात्र या नदीतील पाणी नर्मदेचे आहे. साबरमती नदी आता पुर्णपणे वाहत आहे. एवढेच नाही तर त्याचा परिणामही पाहण्यासारखा आहे. या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही 'इंडियन इन्स्टिट्युट आँफ मँनेजमेँट'ला सांगितले. त्यांनी या भागाचा सामाजिक आर्थिक व राजकीय सर्व्हे केला. या अभ्यासातुन मोठे आश्चर्यकारक परिणाम समोर आले. नर्मदेचे पाणी साबरमतीत सोडल्याने अहमदाबादेच्या सभोवताली सर्वत्र वाँटर टेबल तयार झाले. अहमदाबाद म्युनिसिपल काँर्पोरेशनला शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पाणी खेचण्याचा जो एका वर्षाचा 15 करोड रुपये वीज खर्च करावा लागत होता,तो पाण्याची पातळी वर आल्यामुळे कमी झाला. वर्षाला 15 कोटीची बचत! एवढेच नाही तर लहान-लहान हौसिँग सोसायट्यांच्या स्वतःच्या ट्युबवेलचे वीज बिल जे पुर्वी दोन हजार किँवा अडीच हजार येत होते, ते बिल आज पाण्याची पातळी वर आल्यामुळे 400, 500, 600 रुपये येऊ लागले. अहमदाबादला दुसरे नाँर्थ गुजरातचे पाणी आहे. आम्ही 2500 पी.एच. पाणी पितो. साबरमतीत नर्मदेचे आलेले पाणी सुमारे 100 पी.एच. बिसलरीसारखे शुद्ध व नैसर्गिक आहे. शुद्ध पाण्यामुळे थोड्याफार प्रमाणाक रोगप्रतिकारक शक्ती वाढुन त्याचा आरोग्यासाठी फायदा होत आहे.

* स्वच्छ व शुद्ध पाण्यामुळे आरोग्य रक्षण-:
आमच्या राज्यात कधी चार-पाच दिवस सतत पाऊस झाला तर प्रत्येक गरिबाच्या घरी, झोपडपट्टीत आजारांची रांग लागत असे. वर्तमानपत्रात फोटो छापुन येत की, हाँस्पिटलमध्ये रुग्णांना झोपायला जागा नाही. लोक गँलरीत पडुन आहेत. एकेकाळी ही परिस्थिती होती. मात्र या शुद्ध पाण्यामुळे गेल्या आठ वर्षात एकही साथीचा रोग पसरला नाही. आजारी लोकांच्या रांगा लागल्याचा किँवा हाँस्पिटलमध्ये खाली झोपावे लागल्याचा एकही फोटो एकाही वर्तमानपत्रात छापुन आला नाही. 

* स्वतंत्र हवामान बदल विभाग-:
गुजरातने नैसर्गिक साधनसामग्रीची विशेष काळजी घेऊन भरपुर काम केले आहे. सध्या भारतात गुजरात हे असे एकमेव राज्य आहे की, जेथे स्वतंत्र 'हवामान बदल विभाग' आहे. जगात अशी केवळ चार सरकारे आहेत. हवामान बदल विभाग असणा-या जगातील या चारांपैकी गुजरात एक असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राज्याचा स्वतंत्र हवामान बदल विभाग असल्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीकडे पर्यावरणपूरक विकासाच्या द्रुष्टीकोनातून पाहतो. त्याचा एक परिणाम असा दिसून आला की गेल्या तीन वर्षाँपासुन भारत जो कार्बन क्रेडिट मिळवितो, त्याच्या 70-80 टक्के कार्बन क्रेडिट एकटा गुजरात मिळवितो.

* स्थलांतराची समस्या : गुजरातचा प्रयोग

मोहन धारियाजीँनी सार्वजनिक जीवनाला नवीन वळण दिले आहे. सतत संशोधन करणे, प्रयोग करणे, गावांना व लोकांना जाग्रुत करणे हे त्यांनी केलेले फार मोठे कार्य आहे. 'गावातून शहराकडे होणारे स्थलांतर' ही आमच्या येथीलही समस्या असली तरी गुजरातमध्ये आता एक नवीन वातावरण तयार होत आहे कारण आम्ही 'ज्योतिग्राम' या नावाची योजना आणली आहे. या योजनेद्वारे आम्ही प्रत्येक गावात 24 तास वीज पुरवतो. संपुर्ण देशात गुजरात कदाचित एकटे राज्य आहे, जेथे वीज बंद पडत नाही. 24 तास वीज उपलब्ध झाल्यामुळे येथील ग्रामीण जीवनमानात मोठा फरक पडला आहे. याद्वारे गावातुन शहराकडे जाणा-यांची संख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. तसेच ग्रामीण भागातही आता आम्ही 'ब्राँडब्रँड' जोडणी केली आहे. इंटरनेट व टी.व्ही सारख्या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे पुर्वी गावात न राहणारे डाँक्टर्सही आता गावातच राहु लागले आहेत. एकुणच जीवनाचा दर्जा बदलल्यामुळे ग्रामीण भागात सर्व सुख सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आता आम्ही ग्रामीण भागात एक नवी सेवा देणार आहोत. 'दुर शिक्षण योजना'.याद्वारे गावातील मुलांना त्यांच्या गावातच चांगले शिक्षण मिळु शकेल. या दुर शिक्षण योजनेद्वारे शहरातील उत्तमात उत्तम शिक्षक व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातुन गावातील मुलांनासुद्धा शिकवतील.

* सोलर पाँलिसी-:

सोलर पाँलिसी म्हणजेच सौर योजना आणणारे देशातील आमचे पहिले राज्य आहे. वीज साधारणपणे साडेतीन ते साडेचार रुपये युनिटप्रमाणे मिळते. असे असताना या योजनेद्वारे आम्ही लोकांना आश्वासन दिले की तुम्ही सौर ऊर्जा निर्माण केलीत तर आम्ही तुमच्याकडुन 13 रुपये दराने वीज खरेदी करण्यास तयार आहोत. सध्या प्रसारमाध्यमांचे युग आहे, हे आपण जाणताच. अशा परिस्थितीत ही 13 रुपयांची गोष्ट जाहीर करताच माझ्यावर किती आणि कशी टिका झाली असेल, कल्पना करा. मोदी स्वतःला काय समजतात? 13 रुपयांनी वीज घेणार, आता गुजरातचे दिवाळे निघेल. असे बरेच काही बोलले गेले; परंतु आपणास भावी पिढीला वाचवायचे असेल तर काही कठोर पावले उचलावीच लागतील हे मी जाणुन होतो. कारण जे आपले आहे ते खाण्याचा अधिकार आपणास आहे; परंतु भावी पिढीच्या हिश्श्याचे गिळंक्रुत करण्याचा अधिकार ईश्वराने आपणास दिलेला नाही.भावी पिढीसाठी नैसर्गिक संसाधने राखून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ती ईश्वरदत्त जबाबदारी आहे आणि आपण ती पुर्णपणे पार पाडली पाहिजे. या भावनेतुन आम्ही कठोर पावले उचलली आणि सौर योजना राबविली.

* आशियातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती-:

माझे दुर्भाग्य की आमच्यानंतर भारत सरकारने सोलार पाँलिसी आणली. आम्ही 13 रुपये म्हणालो होतो, भारत सरकारने तो दर 19 रुपये केला. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो की आता 13 रुपयांमध्ये वीछ द्यायला आमच्याकडे कोण येईल? जेथे 19 रुपये मिळतील, सर्व लोक तिकडे म्हणजेच भारत सरकारकडेच जातील, असा आम्ही विचार केला; परंतु आपणास आश्चर्य वाटेल की अधिक पैसे देण्याच्या प्रस्तावानंतरसुद्धा संपुर्ण देशात भारत सरकारच्या नेत्रुत्वाखाली सौर ऊर्जानिर्मिती 120 M.W. होत आहे. याऊलट कमी पैसे देत असुन सुद्धा गुजरातची सौर ऊर्जा निर्मिती 650 M.W. आहे. ही सौरऊर्जेद्वारा होणारी आशियातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती आहे.

* गुजरात : सौर राजधानी-:

नजीकच्या काळात तर गुजरात जगात सौर राजधानी मानली जाईल. आम्ही 3000 M.W. सौर शक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. मोबाईल फोनची सेवा आपल्याकडे उपलब्ध झाली तेव्हा एक काळ असा होता, एका मिनिटासाठी 16 रुपये, 18 रुपये, 20 रुपये दर द्यावा लागत असे, आज 18 पैसे सुद्धा लागत नाहीत. सौर ऊर्जा क्षेत्रात गुजरातने मोठे धाडस दाखविले आहे. यामुळे ऊर्जेच्या क्षेत्रातील एक मोठी अडचण दुर झाली आहे. उपकरणे-सामग्री यात वाढ झाली असून, साधनसामग्रीच्या किमती ब-याच खाली आल्या आहेत. तंत्रज्ञानात संशोधन झाले आहे. या सर्वाँचा सर्वँकष परिणाम असा की कदाचित 2013 येता येता आम्ही जी खरेदी 13 रुपये व भारत सरकारने 19 रुपये युनिटने सुरु केली होती, ती कदाचित आम्ही 8 व 9 रुपयांच्या मध्ये आणू शकु. हे ऊर्जा क्षेत्रातील फार मोठे योगदान असेल. ज्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत, त्याने 2014 च्या शेवटी किँवा 2015 पर्यँत कदाचित गँस किँवा कोळशाने औष्णिक वीज पाच रुपयात तर सौर शक्तीने सहा रुपयात मिळेल, असे द्रुश्य मी पाहतो आहे. ही फार मोठी क्रांती होणार आहे.

* सौर ऊर्जेत भारताने पुढाकार का घेऊ नये...?
जी-7 शिखर परिषदेच्या वेळी मी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. या परिषदेत जग ऊर्जा संकटावर चर्चा करणार होते. जगातील सर्व प्रमुख राष्ट्रे एकत्र आली होती. त्या परिषदेला पंतप्रधान चालले होते, तेव्हा जाण्यापुर्वी त्यांना एक प्रस्ताव द्यावा असे मला वाटले. कारण जगात देशांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत. पेट्रोलियम उत्पादन करणा-या देशांच्या ओपेक कंट्री, सार्क कंट्री. जी-7 शिखर परिषद असे अनेक प्रकारचे वेगवेगळे गट बनले आहेत. ते आपाआपल्या द्रुष्टीने महत्वाच्या असणा-या मुद्द्यांवर उहापोह करतात. म्हणुन मी असे सुचविले की सौर ऊर्जेच्या क्षेत्रात आता भारताने का पुढाकार घेऊ नये? आपण जेथे सर्वात जास्त सौर विकिरण (रेडिएशन) आहे, अशा देशांची एक संघटना बनवावी. या देशांचे एक निगम (कार्पोरेशन) बनवावे. आपण सौर आणि रेडिओ लहरी ऊर्जा क्षेत्रात संशोधन करावे. जगात आपल्या जवळ ही ताकद आहे. ज्यांच्या जवळ पेट्रोलिअम आहे ते पेट्रोलियमच्या बळावर उड्या मारतात मग आपण सौर ऊर्जेच्या बळावर उड्या का मारु शकत नाही...? मी पंतप्रधानांना याबाबतीत खुप आग्रह केला पण असो.आपण पुढाकार घेऊ शकतो अशी अनेक क्षेत्रे आहेत. भारतीय लोकांना नैसर्गिक वस्तुंचा परिचय करुन देण्यासाठी आपणास अतिरिक्त कष्ट पडणार नाहीत. अनेक शतकांपासुन या गोष्टी आपल्या रक्तात भिनलेल्या आहेत. आपण थोडेसे मार्गच्युत झालो आहोत. आपल्याला मुख्य मार्गावर यायचे आहे. गुजरातमध्ये मला या क्षेत्रात खुप सफलता मिळत आहे. आदरणीय धारियाजी माझ्याकडे अनेक वेळा आले आहेत. त्यांनी फार बारकाईने या गोष्टीँचे निरिक्षण केले आहे. त्यांच्याकडुन गुजरातला भेट देण्यासाठी बरेच लोक आले आहेत, वारंवार येतात, त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः पाहिली आहे.
गाव वाचविण्यासाठी, गावाला सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा भरपुर उपयोग केला जाऊ शकतो आणि यातुन फार मोठे परिवर्तन केले जाऊ शकते. या दिशेने आम्ही प्रयत्न करीत आहोत.मला पुर्ण विश्वास आहे की धारियाजीँची तपश्चर्या, त्यांचे संशोधन यामुळे भविष्यात लोकांना त्यांच्या विचारसरणीची एक फार मोठी ताकद मिळेल. समाजासाठी हे त्यांचे फार मोठे योगदान असेल. या वयातील त्यांचा उत्साह, त्यांचे सदा हसतमुख राहणे या गोष्टी फार मोठी प्रेरणा देणा-या आहेत. माझा विश्वास आहे की, मुलभुत उद्दिष्टांना धरुन आपण सर्वाँनी एकत्रित वाटचाल केली तर याचा निश्चितच फार मोठा फायदा होईल. धारियाजीँना व त्यांच्या वनराईच्या कार्याला माझ्या खुप खुप शुभेच्छा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा