बुधवार, ३ जुलै, २०१३

न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या 'अनुपम' आठवणी...!

"शाळा" चित्रपटाचे मोठेपण आजपर्यँत ब-याच मित्रांकडुन ऐकले होते. मुद्दामच वेळ काढुन तो चित्रपट पाहिला आणि अचानक शाळेच्या त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आजपर्यँत वैचारिक विषयांवर खुप लिखाण केले पण आजचा माझा हा लेख खास माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणीँसाठी...!

ओरोसला आल्यावर लगेचच जवळच्या गुळवणी बाईँच्या बालवाडीत दाखल झाल्याने माझा शैक्षणिक प्रवास ख-या अर्थाने तिथेच चालु झाला. दंगामस्ती करुन मुळाक्षरे गिरवीपर्यँतच बालवाडी संपली आणि आमची स्वारी पहिल्या इयत्तेत "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओरोस" मध्ये दाखल झाली. पहिलीतच फटके देणा-या केणी बाई भेटल्या पण अभ्यासातील प्रगती समाधानकारक असल्याने जास्त मार खायची वेळ आली नाही पण जेव्हा पुर्ण वर्गाचा सामुहिक चोप काढला जायचा त्यावेळी चांगलाच तीर्थप्रसाद मिळायचा. इयत्ता दुसरीतील एक गोष्ट प्रकर्षाने आठवते, तेव्हा ऋषिकेश गोसावी या माझ्या मित्राने शाळेत प्रथमच प्रवेश घेतला होता. आमची शाळा पहिली ते दहावी पर्यँत असल्याने आम्हा लिँबुटिँबु जोडीची गाठ त्यावेळी दहावीतील एक मुलगा, जो त्यावेळी शाळेचा मुख्यमंत्री होता, त्याच्याशी पडली. मुख्यमंत्री असल्याचा माज आणि मुळातच उर्मट स्वभाव असल्याने तो आपल्या मित्रांच्या चांडाळचौकडीसहीत आमचा दोघांचा टाईमपास म्हणुन छळ करु लागला. मी शाळेचा मुख्यमंत्री आहे असे रुबाबात सांगु लागला. पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळेच्या मागच्या बाजुचा रस्ता उताराचा आणि निसरडा झाला होता. त्या उताराच्या कडेवर तो उभा होता. ऋषिकेशने आपल्या कमी उंचीचा फायदा घेत त्याच्या पायांना एकच जोरदार धक्का दिला. तो सरळ घसरत जाऊन उताराच्या दुस-या बाजुला पडला. चिखलातुन घसटत गेल्याने त्याची पँट फाटली आणि पार्श्वभाग चिखलाने माखला. त्याच्याच वर्गातील पोरीँसमोर अब्रु गेल्याने आमची पाठलाग करायच सोडुन तो घरीच गेला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हा आयुष्यातला पहिला धडा मी त्यादिवशी माझ्या जिवलग मित्राकडुन शिकलो. पण त्या पोराचा माज बघुन एक गोष्ट मनात तेव्हाच पक्की केली होती की या शाळेचा "मुख्यमंत्री" मी बनणारच...! पुढे ती गोष्ट खरी देखील करुन दाखवली.
त्यानंतर तिसरी आणि चौथी ही दोन्ही वर्ष माझ्याच नव्हे तर आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वोत्क्रुष्ट वर्षे असतील कारण त्यावेळी आमचे लाडके ढवळे गुरुजी आमच्यासोबत होते. त्यांच्या आगमनानंतर सकाळी 10:30 ला भरणारी शाळा आमच्यासाठी 9:30 लाच भरायची. दुपारी जेवायच्या सुट्टीत खेळ आणि संध्याकाळी शेवटचा एक तास त्यांना न विचारताच खेळायला जायचो. गुरुजीँना आमच्यासोबत क्रिकेट खेळायची खुप आवड होती. मी त्यांना बाँलिँग टाकावी असा त्यांचा नेहमीच आग्रह असे आणि मी त्यावेळी ठोकी गोलंदाजी करण्यात मी शोएब अख्तरचा देखील बाप असल्याने एकदा मी टाकलेला चेँडु दगडावर आदळला आणि सरळ गुरुजीँच्या डोळ्यावर बसला. बिचारे गुरुजी दयाळु असल्याने आपला सुजलेला डोळा घेऊन तसेच वर्गात गेले पण रागावलेल्या वर्गातील पोरीँनी मात्र माझा योग्य शब्दात समाचार घेतला.चौथीपर्यँत सर्व आयुष्य टिँगल टवाळ्या करण्यातच जात होते. बाबांनी सांगितले म्हणुन चौथीत स्काँलरशिपला बसलो आणि गमतीजमतीँना अचानक विश्रांती मिळाली. कुडाळमध्ये बिर्जे गुरुजी स्काँलरशिपचे क्लास घ्यायचे. त्या वटव्रुक्षाच्या छायेत मी दाखल झालो आणि त्यापुढील आयुष्यात आपोआपच अभ्यासाची आवड निर्माण झाली. बिर्जे गुरुजीँची गणित शिकवण्याची अनोखी पद्धत पाहुन तो विषय माझा लाडकीचा झाला. बघताबघता स्काँलरशिप परिक्षेत मी जिल्ह्यात 26 वा आलो. स्वर्गीय बिर्जे गुरुजी आज माझ्यासोबत नाहीत पण त्यांच्याकडुन शिकलेली विद्या एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे सदैव मला पुढचा रस्ता दाखवत आहे. एखाद्या इमारतीचा पाया जसा मजबुत असावा लागतो त्याप्रमाणे बिर्जे गुरुजीँच्या सहवासात माझ्या आयुष्याचा पाया मी मजबुत करुन घेतला.
प्राथमिक शिक्षण आटोपल्यावर आता वेळ होती पाचवीत प्रवेश घ्यायची. ढवळे गुरुजीँचा इतका लळा लागला होता की चौथीत नापास होऊन पुन्हा एकदा प्राथमिक शाळेत बसायची इच्छा तीव्र झालेली. पाचवीतील मुलांना फर्नाँडीस सरांकडुन छडीने तुफान मार खाताना एक दोनदा दर्शन घेतले होते त्यामुळे पुढे जायची हिँमत होत नव्हती पण पाचवीच्या सुरुवातीलाच पुर्ण वर्गात मला एकट्यालाच चौथी स्काँलरशिप मिळाल्याने शिक्षकांचा माझ्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलला आणि पाचवीच्या सुरुवातीला इतरांच्या तुलनेत थोडा कमीच मार खाल्ला पण त्यावर्षी फेब्रुवारीत गिते सरांच्या रुपाने एक वादळ आमच्या शाळेत नव्याने दाखल झाल आणि त्याचा सर्वात पहिला फटका आमच्या वर्गालाच बसला. गिते सर विज्ञान हा एकच विषय शिकवायचे पण शिकवतानाच मध्येच असे काही प्रश्न विचारायचे की त्याच उत्तर वर्गात कोणालाच माहित नसायचं. ते आपल्यासोबत मारण्याच्या नवनवीन पद्धती देखील घेऊन आलेले. कधी संपुर्ण वर्गाच्या कानाखाली मारून आमच थोबाड लाल करायचे तर कधी मुलांच्या दोन्ही कल्ल्यांना धरुन वर उचलायचे. त्यांच्या आगमनानंतर आमच्या शाळेत मुलांमध्ये केस कापतानाच कल्ले पुर्णपणे गुळगुळीत करुन टाकायची नवीन स्टाईल आली. मी तर घाबरुन केस पण बारीकच कापायचो. कितीही मार दिला तरी गिते सरांची शिकवण्याची पद्धत आणि स्वभाव मला खुप आवडायचा आणि त्यामुळेच एवढा मार खाऊनसुद्धा ते माझे लाडके सर होते. आमची पाचवी आटोपल्यानंतर गिते सरांच वादळ 8 वी ते 10 वी ला शिकवण्यासाठी वरच्या वर्गात दाखल झाल आणि आम्ही पुढची दोन वर्षे निर्धास्त झालो. सहावीत गेल्यावर मात्र कसालकर मँडम या गमतीशीर बाई आम्हाला शिकवायला आल्या. भूगोल शिकवताना त्यांनी प्रुथ्वीवर दिवस-रात्र 12-12 तासांचे असतात अस एक आक्षेपार्ह विधान केल आणि माझी त्यांच्यासोबत वर्गातच खडाजंगी जुंपली. जी गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही तिला कोणालाही न घाबरता विरोध करायचा गुण अगदी लहानपणापासूनच माझ्या रक्तात भिनला होता. माझ म्हणण होत की जर त्यांच्या विधानात तथ्थ्य असेल तर नेहमीच सुर्योदय पहाटे 6 वाजता झाला तर सुर्यास्त संध्याकाळी 6 वाजताच झाला पाहिजे पण तसे होत नसते. कधी कधी सूर्यास्त ५:४५ वाजताच होतो तर कधी कधी तो ६:४५ ला देखील होतो. उत्तरायण आणि दक्षिणायन हे प्रकार तेव्हा मला माहिती नव्हते. शेवटी माझ म्हणण पटवुन देण्यात मी यशस्वी झालो. त्यापुढे जाऊन इतिहास शिकवताना त्यांनी सर्व मर्यादाच ओलांडल्या. "भुतदया" या शब्दाचा अर्थ पटवुन देताना त्या म्हणाल्या की, सम्राट अशोकाने कलिँगच्या युद्धात भरपुर संहार केला, त्या सगळ्या लोकांची भुते तयार झाली आणि या युद्धानंतर सम्राट अशोकला पश्चाताप झाल्याने त्याने भुतदया हा गुण अंगिकारला. बाकी मुलांच्या काहीच लक्षात न आल्याने त्यांनी "होय महाराजा..." करत आपल्यां माना डोलावल्या पण सुरुवाती पासूनच मराठीचे वाचन करायची आवड असल्याने मला 'भूतदया' शब्दाचा खरा अर्थ खात्रीशीर रित्या माहित होता. मी पुन्हा त्यांच्याशी वाद सुरु केलेत. नंतर दळवी सरांच आगमन झाल. ते जरा चंचल स्वभावाचे होते. आमच्या वर्गाची आणि खासकरून माझी, कसालकर बाईँकडुन पुर्वकल्पना मिळाल्याने आम्हाला थोडे दचकुनच असायचे आणि मी सुद्धा अपेक्षेप्रमाणे त्यांना खूप पिडल. दहावी आटोपल्यानंतर एकदा सहज दळवी सरांना मी विचारलं, "तुम्हाला माझा कधी राग नाही आला...?" दळवी सर बोलले, "लहान मुलांचे चिडवण मनाला लाऊन घेत रागावण मला शोभत नाही.मला कृषी क्षेत्रात खूप आवड होती पण प्रतिकूल परिस्थितीमुळे मला शिक्षकी पेशा स्वीकारावा लागला. तुम्ही मुल अजून खूप लहान आहात आणि अजून आयुष्यातील कित्येक अनुभव तुम्हाला घ्यायचे आहेत. ज्यावेळी तुला आयुष्य समजेल त्यावेळी परिस्थितीचा सामना करताना काय काय कराव लागत ते देखील समजेल." दळवी सर त्यावेळी नकळतपणे मला खूप काही शिकवून गेले आणि त्याचा अर्थ मला आता या क्षणी समजतोय. एकेकाळी यशाच्या सर्वौच्च शिखरावर होतो आणि आता मोठ्या प्रमाणात अपयश पाहून देखील माझी जिद्द हिम्मत, आशावाद अजूनही तशीच शाबूत राहिलीय त्याला कारण दळवी सरांचे ऐकलेले ते अनुभव माझ्यापाशी आहेत. आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळी जे पाहिजे ते त्या त्या वेळी मिळेलच असे नाही. जसे यश मिळते तसे अपयश देखील पाचवीला पुजलेले असते. यश मिळाल्यावर हुरळून जायचे नाही आणि अपयश मिळाल्यावर खचून जायचे नाही तरच आयुष्याचे समीकरण आपल्याला सोडवता येते. आज दळवी सर त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत आणि आपणा सर्वांना एकच गोष्ट शिकवत आहेत की आयुष्य जसे आहे तसे स्वीकारायला शिका,आपल्याला जे करायचं आहे ते करायला मिळाल नाही म्हणून खचून जाऊ नका. ती गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघा आणि ती संधी जेव्हा कधी तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा मात्र सर्वांना यशस्वी होऊनच दाखवा. तुमच्यावर टिका करणाऱ्यांची, तुम्हाला हिणवनाऱ्यांची तोंडे आपसूकच बंद होतील.

सातवीत पुन्हा एकदा स्काँलरशिपची परीक्षा असल्याने जास्त खोड्या न करता मी अभ्यासाला लागलो. कुडाळमध्ये नाईक सरांचे क्लास त्यासाठी सुरु केले. त्यांच्यासोबत बिर्जे गुरुजीही तिकडे मराठी हा विषय शिकवायचे. आज फेसबुकवर भरपुर जण माझी मराठी लिखाणाची शैली पाहुन माझं कौतुक करताना दिसतात पण माझ्या या प्रभावपुर्ण मराठीच संपुर्ण श्रेय फक्त आणि फक्त स्वर्गीय बिर्जे गुरुजींनाच जात. सातवीत मराठी शिकवताना मराठी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार आणि खासकरुन व्याकरण यांचा आपल्या रोजच्या आयुष्यात वापर करायची जी काही गोडी बिर्जे गुरुजीँनी मला लावली त्यामुळे सातवीत स्काँलरशिपला त्यांच्या मराठी या विषयात 94 गुण मिळवत संपुर्ण सिँधुदुर्ग जिल्ह्यात त्या विषयात मी पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये होतो आणि राष्ट्रीय शिष्यव्रुत्तीचा मानकरी ठरलो. कर्करोगाशी झुंज देत असलेले आदरणीय आबा नाईक सर गेल्या वर्षीच आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेले पण त्यांचे योगदान माझ्या आयुष्यात अमुल्य आहे. माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांबरोबर मी नाईक सर आणि बिर्जे गुरुजी यांचा सदैव ऋणी राहिन कारण त्यावेळी केवळ आणि केवळ त्यांनी घेतलेल्याच अपार मेहनतीमुळे मी यशाची गोड फळे चाखु शकलो.

आठवीतच वर्ष माझ्या पुर्ण करियरमधील सर्वोत्क्रुष्ट वर्ष म्हणायला हरकत नाही. सिँधुदुर्गात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या 'सिंधुदुर्ग टालेंट सर्च' या परीक्षेत मी जिल्ह्यात ९ वा आलो. माझे लाडके गिते सर यावेळी आम्हाला पुन्हा एकदा शिकवायला आले होते आणि त्यावर्षी होणा-या विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांनी माझी आशिष रासमसोबत निवड केली. आम्ही तिघांनी मिळुन "नेसो ३ इन १" हे उपकरण तयार केले आणि त्याला तालुक्यात प्रथम क्रमांक आणि पुढे जाऊन जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळाल्यामुळे मी हे उपकरण घेऊन शाळेतुन पहिल्यांदाच बुलढाणा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सामील झालो. आठवीपर्यँत थोडाफार खोडकर असलो तरी स्वभावाने मी मुळातच लाजाळु आणि घाबरट होतो. वाढदिवसाला वर्गात चाँकलेट वाटण्याची पद्धत होती पण माझ्या याच घाबरट स्वभावामुळे माझी खेचण्यासाठी वर्गातील पोरी चाँकलेट दिल्यावर शुभेच्छा देण्यासाठी मुद्दाम माझा हात हातात मागत आणि मी पुढे केलेला थरथरणारा हात बघुन माझी टिँगल करीत. पण त्यावेळी कुणास ठाऊक होते की, आता शांत आणि घाबरट वाटणारा अनुपम अवघ्या एका वर्षात शाळेतुन ओवाळुन टाकलेल्या विद्यार्थ्याँच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाईल...! अगदी मलासुद्धा इयत्ता आठवीत असताना स्वप्नात देखील ही गोष्ट खरी वाटली नसती पण आजुबाजुची परिस्थिती इतक्या झपाट्याने बदलली की माझ्या नकळत मी नववीत अशा काही चुका केल्या की बघताबघता आठवीतील वर्गाचा नायक आता पुर्ण शाळेतील खलनायक बनु लागला.
आठवीत मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आयुष्याच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालो होतो पण माझा स्वभाव पहिल्यासारखाच थंड आणि थोडा खोडकर होता. त्याच खोडकरपणामुळे शाळेतील सगळ्या शिक्षकांना मी आणि माझ्या मित्रांनी टोपणनावे ठेवली. त्यातील फक्त 2-3 टोपणनावे मी स्वतः ठेवली होती आणि बाकी मित्रांची कर्मे होती. कोणत्याही शिक्षकाचा जाणीवपुर्वक अपमान करावा असा घाणेरडा हेतु आमच्यापैकी कोणाच्याच मनात नव्हता कारण आमच्या शाळेतील शिक्षकांसारखे प्रेम देणारे शिक्षक क्वचितच पाहायला मिळतील. फक्त काहीतरी खोड्या करायच्या म्हणुन केलेले ते उद्योग होते. शिवाय शिक्षकांना ते कधी समजणारच नाही या भ्रमात आम्ही होतो. पण तितक्यातच वर्गातील एका पोरीने शिक्षकांपाशी जाऊन चुगली केली. शिक्षकांनाही ते प्रकरण आपला जाणीवपुर्वक अपमान करण्याचे कारस्थान वाटल्याने त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली गेली. संशयित आरोपी म्हणुन मी आणि माझे दोन मित्र यांना बोलावणे आले. अर्थातच मी त्यावेळी घाबरट असल्याने गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. बाकीच्या दोघांनीही माझीच री ओढत नकार दिला पण त्याचा परिणाम नेमका उलट झाला. मला काहीच मार न देता सोडुन देण्यात आले पण त्या दोघांना बेदम मारले. दिवसेँदिवस हे प्रकरण गंभीर बनत गेल. कदाचित माझ्या पुर्वाश्रमीच्या यशामुळे शिक्षकांनी मला दया दाखवली असावी पण ती दाखवलेली दयाच माझ्या मनात अहंकाराचे बीज रुजवुन आणण्यास कारणीभुत ठरली. माझ्यासाठी जीव की प्राण असलेल्या माझ्या मित्रांचा शिक्षकांच्या मारापासुन बचाव करण्यासाठी सगळ्या शिक्षकांना टोपणनावे मी एकट्यानेच ठेवली, हा आरोप मी माझ्यावर ओढवुन घेतला आणि सर्व शिक्षकांनीही त्याला माझ्या प्रामाणिकपणाचे विशेषण देत मला शिक्षा करायची सोडुन उलट माझी पाठच थोपटली. मला या एवढ्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा फक्त सर्व शिक्षकांची वर्गात माफी मागणे एवढीच मिळाली याउलट माझ्या मित्रांनी मात्र मार खाल्ला होता. ही गोष्ट त्या अहंकाराला खतपाणी घालणारी ठरली. कोणताही खेळाडु खेळापेक्षा मोठा नसतो त्याप्रमाणे कोणताही विद्यार्थी शाळेच्या शिस्तीपेक्षा मोठा नसतो. मला माझ्या चुकीचा साक्षात्कार झाल्याने मी पुढे सुधारेन या उदात्त अपेक्षेपायीच शिक्षकांनी मला सुट दिली होती पण त्याचा नेमका उलटा अर्थ मी घेतला होता. पुढेपुढे हा अहंकार इतका वाढत गेला की मी शाळेत काहीही केल तरी आता माझ कोणी काहीच वाकड करु शकत नाही या निष्कर्षाप्रत येऊन मी पोहोचलो. ते वयच घसरण्याच होत आणि एव्हाना मी सावरण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलो होतो. जेव्हा अहंकाराच विष आपल्या आत्म्यात प्रवेश करत तेव्हा आपोआपच यश दुर जाऊ लागत. आज या क्षणाला खरोखरच मनापासुन वाटत की जर त्यावेळीच कोणत्यातरी शिक्षकाने माझ्या कानाखाली दोन-चार लगावली असती तर आज माझ आयुष्य एका वेगळ्याच वळणावर असल असत परंतु या सगळ्या जर...तर च्या गोष्टी आहेत. दिवसेँदिवस माझी उन्मतगिरी वाढु लागली होती. तेवढ्यातच नववीचा स्काउटचा कँम्प निघाला होता. 'कोकण टालेंट सर्च' या परीक्षेत माझी सिँधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातुन निवडलेल्या 50 बुद्धिवान विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली होती आणि पुढील निवडीसाठी रत्नागिरीत मुलाखतीला बोलावले. आमच्या वर्गातुन मी एकटाच या मुलाखतीस पात्र ठरलेलो आणि कँम्प त्या मुलाखतीच्या दिवशीच जाणार होता. मला मुळातच कँम्प वगैरे गोष्टीँचा कंटाळा यायचा त्यामुळे मी तात्काळ नकार कळवुन मुलाखतीच्या तयारीला लागलो.आठवीत असताना काहीतरी खोटी कारण देतच मी कँम्पला जायचे टाळले होते त्यामुळे यावेळेस सगळेच मित्र निकराचा आग्रह करु लागले. शेवटी त्यांच्या आग्रहात्सव मी त्यात सामील झालो पण कँम्पलीडर आणि ग्रुपलीडर ही दोन्ही पदे माझा जीवकंठश्च मित्राकडे होती. खर तर कँम्पलीडर सर्वात प्रतिष्ठेच पद असत पण काही खास कारणात्सव मला ग्रुपलीडर पदात खुपच रस होता. माझा खास मित्र असल्याने तो मला ते आनंदाने देईल यात शंकाच नव्हती पण त्याने नकार दिला. अहंकाराच्या आगीत मी इतका होरपळलो होतो की त्यावेळी "नाही" शब्द ऐकायची मला कधी सवयच नव्हती. मी सरळ कँम्पचे प्रमुख गोसावी सरांशी संपर्क साधला आणि त्यांनी सुद्धा माझ्या मित्राशी विचारपुस देखील करण्याची तसदी न घेताते पद अगदी उदारपणे मला बहाल केले. मला जे मिळवायच होत ते मी मिळवल पण कँम्पला आमच्या ग्रुपची एकीच नष्ट झाल्याने शेवटचा क्रमांक मिळाला. मला त्या शेवटच्या क्रमांकाचीदेखील फिकीर नव्हती कारण पुन्हा एकदा वर्गात माझ वर्चस्व मी सिद्ध केल होत. आता माझ नावसुद्धा मी "अनुपम-द ग्रेट" याच पद्धतीत लिहायचो.
पहिली ते आठवीपर्यँत परीक्षेत वर्गातील पहिल्या तीन जणांमध्ये असणारा माझा क्रमांक नववीत 12 वा आला. तरीदेखील नववीच्या निकालादिवशी मला निर्लज्जपणे हसताना बघुन माझे वर्गशिक्षक मळगांवकर सर व्यथित झाले. त्यांनी पुर्ण वर्गात मला सुनावले की, "या अहंकारात आंधळा होऊ नकोस. एकदा शर्यतीतुन बाहेर पडल्यावर पुन्हा पुनरागमन करण खुप कठीण असत. भल्या-भल्यांना ते जमलेलं नाही. तुझ्यात एवढीच हिँमत असेल किंवा तुझ्या हुशारीवर तुला इतकीच घमेंड असेल तर दहावीच्या पहिल्या तिमाही परीक्षेत प्रथम तीन क्रमांकात तरी येऊन दाखव." आता स्वताविषयी अतिआत्मविश्वास असल्याने असली चँलेज घेण माझ आवडीच काम बनल होत त्यामुळे त्या अहंकारात मी देखील त्यांना चँलेँज दिल की, तिसरा नंबर सोडा. फक्त तिमाहीच नाही तर दहावीच्या शाळेत जेवढ्या परीक्षा होतील त्यात पहिलाच नंबर मिळवेन आणि बोर्डात देखील शाळेत पहिलाच येऊन दाखवेन. त्यानंतर मी पुन्हा एकदा जोरात अभ्यासाला लागलो. शाळेचा मुख्यमंत्री बनण्याच स्वप्न मी इयत्ता दुसरीत असताना बाळगल होत आणि ते पद मीच मिळवणार या भ्रमात होतो पण त्याच वेळी स्काऊटच्या त्या काम्प मधील माझ्या उन्मत्गिरी नंतर वर्गात काही मुलांना माझी एकाधिकारशाही खुपत होती. पण मला थेट आव्हान देऊन पराजित करणे त्यावेळी केवळ अशक्य होते याची देखील त्यांना जाणीव होती. त्यांनी मला अद्दल घडवून माझ गर्वहरण करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली अन मला काही कळु न देताच यांनी आपला उमेदवार अचानकपणे मोक्याच्या क्षणी उभा केला. एवढा कट करुनदेखील माझ्यासाठी जीवाला जीव देणारे जे माझे मित्र होते ते यांच्या कारस्थानांना भुलले नाहीत आणि हे सगळे लोक तोँडावर पडले. मीच वर्गातुन निवडुन गेलो आणि मुख्यमंत्रीसुद्धा झालो. पुन्हा एकदा मला जे पाहिजे होत ते मी मिळवूनच दाखवलं.आता माझ्या या अहंकाराचे परिणाम सर्व वर्गाला भोगावे लागत होते. ज्यांनी ही कट -कारस्थाने केली त्यांना धडा शिकवण्याच्या दृष्टीने इतके दिवस एकसंध असलेल्या वर्गात मी दोन तट पाडू लागलो पण नियतीचा खेळ असा असतो की त्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच दोन-तीन आठवड्यात मला कडाक्याचा ताप आला. टायफाँईड असल्याने पुरते दोन महिने मी आजारी पडलो. डाँक्टरनी सक्तीची विश्रांती दिल्याने मी घरीच बसुन होतो. शाळेत गेल्याशिवाय चैन पडत नव्हती परंतु अजुन कोणताच पर्याय नव्हता. शेवटी ज्यांच्याशी भांडणे झाली होती ते सुद्धा एके-काळाचे माझे मित्रच होते. मी आजारी पडल्याचे समजताच सगळे वाद बाजूला सारून ते माझ्या घरी मला भेटायला आले आणि आमचा वर्ग पुन्हा एकदा एकसंध झाला. जेव्हा तिमाही परीक्षा जवळ येऊ लागली तसतशी मला मळगांवकर सरांना दिलेल्या चँलेँजची आठवण होत होती. माझी प्रकृती गंभीर असल्याचे समजताच मळगावकर सर देखील मला घरी येउन भेटून गेलेले. दोन महिने पुर्णपणे झोपुन असल्याने पाठदुखीचा त्रास व्हायचा आणि हात आखुडल्याने लिहीता पण येत नव्हते. शिक्षकांनी परिक्षेला न येण्याचा सल्ला दिला पण मनात जी एक सुप्तशक्ती असते त्याचा प्रत्यय मला त्या परीक्षेवेळी आला. कोणत्याही परिस्थितीत मी परीक्षेला जाणारच या माझ्या हट्टापुढे बाबांनीही नमते घेतले आणि सकाळी गरम पाण्याने पुर्ण हात शेकुन काढल्यावर मराठीचा पेपर द्यायला मी पोहोचलो. दहावीचा थोडा अभ्यास मी नववीत असताना पुर्ण केला होता त्याचा फायदा आता होत होता. दोन महिन्यानंतर प्रथमच पेन हातात घेतले होते आणि ते सुद्धा मराठीच्याच पेपरला...! तरी सुद्धा ती जिद्दच एवढी होती की मराठीचा थापडपसारा असणारा पेपर त्या परीक्षेवेळी धड-धाकात असणारे बाकीचे मित्र पूर्ण करू शकले नाही पण त्या परिस्थितीत मी पुर्ण करुन दाखवला आणि त्यात सर्वाधिक गुण देखील मिळवले. शेवटी तिमाही परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याने मळगांवकर सरांना दिलेल माझ चँलेँज मी अबाधित ठेऊ शकलो. आयुष्यात त्या परीक्षेचा अनुभव मी कधीच विसरणार नाही कारण जेव्हा जेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा मी स्वतःला या परीक्षेची आठवण करुन देतो मग आपोआप लढण्याचे बळ मिळते. दहावीत असताना त्यापुढेही जाऊन सहामाही, पुर्व परीक्षा आणि अंतिम परिक्षेत मी प्रथमच क्रमांक मिळवला. मळगांवकर सरांचे मला आज खुप आभार मानावेसे वाटतात कारण त्या भयाण टायफाँईडमध्ये दोन महिने पुस्तक हातात घेण्याची ताकद पण माझ्यात राहिली नव्हती पण त्या चँलेँजची आठवण असल्याने मानसिकद्रुष्ट्या मी शेवटपर्यँत कणखर राहिलो. या खडतर काळात मला साईल सरांची पद्धत कामी आली. सर बीज-गणित शिकवताना नेहमी सांगायचे की एकाच प्रकारची १०० गणिते सोडवत बसण्यापेक्षा त्यातले एकाच गणित अगदी परफेक्ट करा म्हणजे बाकीची गणिते आपोआप सुटतील.युक्तीने अनेक कठीण गोष्टी सोप्या करता येतात आणि हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल.

कांबळे सरांचा उल्लेख केल्याशिवाय माझी गोष्ट संपुच शकत नाही. नववीत असताना कांबळे सर दर गुरुवारी मुल्यशिक्षणच्या वेळी काहीतरी वादविवादाचा विषय घेऊन येत. बाकीच्या मुलांना इतिहासात फारसे स्वारस्य नसे त्यामुळे ते दुर्लक्ष करत. मला वाद घालायची मुळातच आवड असल्याने मी नेहमीच उत्सुक असायचो. एकदा कांबळे सरांनी "राम श्रेष्ठ की रावण" हा विषय चर्चेला आणला. मी तो लगेचच उडवुन लावला आणि म्हटल राम हा देव होता आणि रावण राक्षस होता. त्यांच्यात राम श्रेष्ठ हे कोणीपण सांगेल. त्यात वाद कसला होणार...? तेव्हा कांबळे सरांनी रावणाची जी काही वकीली आमच्यासमोर केली ती पाहुन आम्हा रामभक्तांची बोलतीच बंद झाली. इतिहासाला नाण्याप्रमाणे दोन बाजु असतात आणि नेहमीच एका बाजूचा इतिहास रंजक करुन सांगला जातो या गोष्टीचा अनुभव मला तेव्हाच पहिल्यांदा आला. तेव्हापासुन मला एक छंदच लागला की इतिहासाने ज्यांना खलनायक ठरवले त्यांची वकीली करुन लोकांना त्या महापुरुषांच इतिहासातील कार्य पटवुन द्यायचं. प्रवाहाच्या दिशेने सगळेच पोहू शकतात पण खरी मजा तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यात असते. त्या दिवसापासुन माझ्या अवांतर वाचनाचा वेग मी जबरदस्त वाढवला. आज हिटलरची, कर्णाची एवढ्या चांगल्या प्रकारे मी जी वकीली करतो त्याच खर श्रेय कांबळे सरांनाच मी देईन. गेल्या वर्षी जेव्हा मी महाभारत आणि हिटलर या विषयांवर लेख लिहिले तेव्हा सर्वप्रथम कांबळे सरांची भेट घेऊन त्यांच्या समोर ठेवले. लेख वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील तो आनंद मलाच नजरेत साठवून ठेवावासा वाटत होता. मला मराठी आणि इतिहास हे दोन्ही विषय नुसते शिकवण्यापेक्षा त्यात स्वारस्य निर्माण करणारे कांबळे सरच होते. आपण पेरलेल्या बीजाचे वृक्ष होताना पाहून सर मोठ्या अभिमानाने मला म्हणाले, "पुढे यापेक्षा चांगले चांगले लेख असेच लिहित रहा. आपण शिकवलेला पोरगा त्याच विषयांवर लेख लिहितो हे पाहून शिकवण्याचे सार्थक झाल्याचे समाधान तू आज मला मिळवून दिलेस." खर सांगतो कांबळे सरांच्या या स्तुतीपर शब्दांपेक्षा दुसर कोणताही बक्षीस मला आजही खूप फिक वाटेल. शाळा सोडून आज ६-७ वर्षे झाली तरी जेव्हा कधी आयुष्यात खचल्यासारखे वाटते किंवा अपयशाच्या गर्तेत मी अडकलेला असतो तेव्हा याच शिक्षकांची अजूनही मी भेट घेतो. त्यांचे प्रोत्साहनपर शब्द मला पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज करतात. मी गेल्या जन्मात खरच काहीतरी मोठ पुण्य केल असेन आणि त्यामुळेच माझ्या नशिबी असे गुणी शिक्षक आलेत. त्या सर्वांना आज मी कृतज्ञतापूर्वक प्रणाम ____/\_____ करतो.

आज काही लोक माझा हा लांबलचक लेख वाचताना कंटाळतील याची मला जाणीव आहे पण शाळेतील आठवणीच एवढ्या आहेत की त्यांच्याबद्दल लिहायच म्हटल तर शब्द अपुरे पडतील. माझ्या मित्रमैत्रिणीँपैकी अजुन कोणाला आपल्या बाकी आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की कमेँट करा. आज भरपुर दिवसांनी मनात दाटलेल्या आठवणी शब्दरुपी मुक्त केल्यावर खुप छान वाटतय. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा कारण न्यु इंग्लिश स्कुल ओरोस मध्ये शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आपल्या शाळेसाठी एक कप्पा नेहमीच राखीव असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा