गुरुवार, ४ जुलै, २०१३

हिँदु लोकांच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीचा वापर केला तर...

आज मी जो लेख लिहीतोय त्याच्याकडे धार्मिक नजरेने न पाहता पर्यावरणाच्या नजरेने पाहाल तर माझ म्हणण तुम्हाला नक्की पटेल.

     आपल्या हिँदु धर्मात एखादी व्यक्तीच्या निधनानंतर तिचे अंत्यसंस्कार करताना तिला स्मशानात नेऊन तिचे दहन करण्यात येते. दहन करताना अर्थातच लाकडांची गरज असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते. फक्त एखाद्या व्यक्तीला दहन करण्यासाठी लागणा-या लाकडांची गरज एवढ्या संकुचित द्रुष्टीकोनातुन या घटनेकडे पहाल तर तुम्हाला ती लाकुडतोड शुल्लक वाटेल पण सर्व हिंदुंच्या दहनासाठी होणा-या लाकुडतोडीकडे पहाल तेव्हा तुम्हाला माझ्या मुद्द्यातील गांभीर्य लक्षात येईल. पुण्यासारख्या शहरात एका वर्षात केवळ लोकांच्या पार्थिवाचे दहन करण्यासाठी 1300 टन लाकुड जाळले जाते.

हिँदु धर्माचे कट्टर समर्थक सांगतात की, अंत्यविधीसाठी जे संस्कार पार पाडले जातात त्यावेळी म्रुत व्यक्तीबरोबर सामान्य लोकांच्या आणि त्याच्या घरच्यांच्या भावना जोडलेल्या असतात.
मी त्यांना एवढच विचारु इच्छितो की, एखाद्या झाडावर शेकडो पक्षी राहत असतात. त्यांना निवा-यासाठी ते झाड आश्रय असते. ते झाड तोडल्यावर त्या पक्षांच्या भावना दुखावल्या जात नसतील...? का तुमच्या मते माणुस सोडुन अन्य कोणत्या सजीवाला भावनाच नसतात...??
अरे पक्षांच सोडा ज्या झाडांना तुम्ही तोडता त्या झाडांनाही भावना असतात हे जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध केले आहे.
"व्रुक्षवल्ली आम्हा सोयरे..." हा तुकाराम महाराजांनी सांगितलेला मंत्र हिँदु लोक जाणीवपुर्वक का विसरले...? जर तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे व्रुक्ष आपले मित्र असतील तर मानवाच्या मरणाची शिक्षा तो व्रुक्ष आपले कट्टर दुश्मन असल्यासारखे त्या मुक्या गरीब व्रुक्षांना म्रुत्युदंड देऊन का देतो...??

जर कट्टर हिँदुत्वाच बोलायच म्हटल तर ज्या भुमीवर आपण अंत्यसंस्कार करतो त्या भुमीला "स्मशानभुमी" म्हणण चुकीच ठरेल कारण "स्मशान" हा संस्क्रुत शब्द असुन त्याचा अर्थ पुरण्याची जागा असा होतो, जाळण्याची नव्हे. प्राचीन हिँदु संस्क्रुतीत जाळण्याची नव्हे तर पुरण्याची प्रथा होती. काही इतिहासकारांच्या मते ब-याच संतांना पुरले नसुन जाळण्यात आले आहे.
दफन केल्यानंतर शरीराच्या अस्थीचे जतन करणे गरजेचे होते. सदर म्रुत व्यक्तीच्या शरीराचा अवमान होऊ नये अशा प्रकारे योग्य ठिकाणी दफन करावे लागते. तो त्या व्यक्तीच्या नातलगाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनु शकतो.
महत्वाचा मुद्दा हाच आहे की, दहन केल्याने म्रुत शरीराची लगेच विल्हेवाट लागते तर दफन केल्याने त्याची विल्हेवाट लावायला उशीर होतो. त्यामुळे बरेच जण दहन करण्यास प्राधान्य देतात.


काही जण कट्टर हिँदुत्वाचे कारण देत धर्मात दिलेल्या विधीँचे पालन करण्यासाठीच अंत्यविधीत दहनाची आवश्यकता सांगताना दिसतात. मग ज्या ठिकाणी वारंवार बर्फव्रुष्टी होत असते त्या ठिकाणी दहनात व्यत्यय येत असल्याने म्रुतदेह दफन करण्यात येतो. मग त्या ठिकाणचे हिँदु कट्टर नाहीत का...? वाळवंटात लाकडांची उपलब्धता नसल्याने दहन करण्यात व्यत्यय येतो व पर्यायी पद्धत वापरावी लागते.वाळवंटी प्रदेशातील हिँदुंना मग काय म्हणाल...??

आज अंत्यविधीसाठी किँवा अन्य कोणत्याही कारणासाठी होणारी व्रुक्षतोड पाहता भविष्यात प्रेत दहनाकरीता लाकुड मिळणेच कठीण होऊन जाईल आणि त्यावेळी दफन करणे आणि विद्युतदाहीनी हे दोनच पर्याय उरतील. मी मघाशीच सांगितल्याप्रमाणे दफन करुन प्रेताची विल्हेवाट लावताना उशीर होत असल्याने विद्युतदाहीनी हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल.
आताच शहरात दहनासाठी लाकडांची कमतरता जाणवत असल्याने विद्युतदाहीनीचा पर्याय अंत्यविधीसाठी वापरण्यात काहीच गैर नाही.
धार्मिक भावनांच्या बाबतीत म्हणायच तर दहनामागे म्रुत शरीराची विल्हेवाट योग्य प्रकारे सन्मानाने व्हावी एवढा एकच हेतु असतो कारण म्रुत शरीरातुन दुर्गंधी निघत असते. त्यात जीवजंतु निर्माण होऊ शकतात. जे आजुबाजुच्या प्राण्यांना मनुष्यवस्तीला हानीकारक ठरु शकतात.
सध्याच्या काळात धार्मिक चालीरिती आणि बंधन पाळायची तेवढीशी गरज राहिली नाही कारण आता पुर्वीसारखी एखाद्या कुटुंबाची त्यांच्या समाजाशी म्हणावी तेवढी नाळ जोडलेली नसते. समाजपद्धती विभक्त बनली आहे. तसही केवळ समाजाला दाखवण्यासाठी काही रिती पाळुन पर्यावरणाची हानी करण्यात काहीच व्यवहार्यता नाही.त्यासाठी मनोभावना गरजेची आहे.

काही जणांच्या मते भारतात दहनासाठी जी लाकुडतोड होते ती इतर गोष्टीँसाठी केलेल्या लाकुडतोडीच्या तुलनेत नगण्य आहे. दहनासाठी जेवढी झाडे तोडली जातात तेवढी एका कारखान्यासाठी एका दिवसात तोडली जातात.
मुंगीचे चावणे आणि सापाचे चावणे एवढा फरक या दोन ला...कुडतोडीमध्ये आहे.
त्या सर्वाँना मी एवढच सांगेन की, मानव हा एक सामाजिक घटक म्हणुन पर्यावरणात वावरत असतो. त्यामुळे त्या पर्यावरणाप्रती त्याच्या काही नैतिक जबाबदा-या असतात. पर्यावरणात फक्त मनुष्य प्राणीच नाही तर अनेक प्रकारचे पशु-पक्षी आणि किटक गुण्यागोविँदाने राहत असतात. अनेक गोष्टीँसाठी ते वनांवर अवलंबुन असतात. मग अशा वनांची तोड करुन त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा नैतिक अधिकार माणसाला कोणी दिला...? "जगा आणि जगु द्या" हे बोधवाक्य आपण पुस्तकापुरतेच मर्यादित ठेवायचे का...??
कारखान्यासाठी वनांची तोड करण केव्हाही निँदनीयच आहे आणि ते करणारा देखील माणुसच आहे. जर अंत्यसंस्कारासाठी विद्युतदाहिनीचा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करताना लाकुडतोड थोड्या प्रमाणात का होईना कमी करुन आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करण्यात खारीचा वाटा उचलता येत असेल तर सुरुवात करायला काय हरकत आहे...?
दुस-या गोष्टीँकडे बोट दाखवुन मुळ समस्या सुटत नसते ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आज जगभर माणसाकडुन होत अमर्याद वनतोडीमुळे "ग्लोबल वार्मिँग" सारखी भीषण समस्या जगासमोर उभी ठाकली आहे. माणसाच्या या क्रुत्यांचा परिणाम त्याच्यासोबत पर्यावरणातील बाकीचे निरपराध जीव देखील मुकपणे सहन करत आहेत. सर्वशक्तिमान असल्यामुळे मानवाने इतर प्राण्यांवर केलेला हा अन्याय नव्हे का...?
आता तुम्हीच सांगा जर आपल्या धार्मिक चालीरिती थोड्याफार प्रमाणात बदलुन विद्युतदाहिनीचा वापर केल्यास आपलेच पर्यावरण सुरक्षित राहणार असेल तर मनाचा मोठेपणा दाखवुन आपल्या चालीरितीत थोडे बदल करणे आपले नैतिक कर्तव्य नव्हे का...??
शिवाय अंत्यसंस्कारावेळी दहन केल्यामुळे हवेचे जे प्रदुषण होते ते देखील आपल्याला टाळता येईल. भौतिक गोष्टीँना नियंत्रित करण्यासाठी सरकार काही संस्था नियंत्रित करु शकते. धार्मिक बाबतील स्वतः नियंत्रण करणे हाच चांगला उपाय असतो कारण धार्मिक गोष्टीत सरकारने ढवळाढवळ करु नये या मताचा मी आहे.

विद्युतदाहिनीचा वापर करु नये म्हणुन जे लोक हिँदु धर्मशास्त्राचे कारण देतात त्यांना अभिमानाने सांगेन की कट्टर हिँदुत्ववादी नेते खुद्द विनायक दामोदर सावरकरांनी असे सांगितले होते की, माझ्या निधनानंतर काहीही विधी करत बसु नका. माझ्या प्रेतावर का...ही सोपस्कार करु नका. माझे प्रेत सरळ उचलुन विद्युतदाहिनीत फेकुन द्या.कोकणचे ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवतेँनी देखील अंत्यसंस्कारांसाठी विद्युतदाहिनीचाच मार्ग स्वखुशीने स्वीकारला होता.

मुळात आपल्या हिँदु संस्क्रुतीतच प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर हिँदु धर्माला श्रेष्ठ मानतो तर त्यामागे एकच कारण आहे की हा धर्म कोणाच्या सांगण्यानुसार किँवा एखाद्या ग्रंथाच्या उत्पत्ती बरोबर जन्माला आला नसुन पिढ्यानपिढ्या नवीन विचार आणि आचरण पद्धती घेऊन हा धर्म उत्क्रांत होत गेला आहे. कालानुरुप योग्य ते बदल यात होत गेले आहेत. निसर्ग आणि शास्त्र यांचा अपुर्व संगम या धर्माच्या चालीरितीत आढळुन येईल. आता आपण सर्व हिँदुधर्मवासियांनी निसर्गाची आणि काळाची गरज समजुन विद्युतदाहिनी प्रक्रियेचा अंत्यसंस्कारासाठी वापर करत इतर धर्माँपुढे एक नवीन आदर्श घालुन दिला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या हिँदुना पाहुन इतर धर्माच्या लोकांमध्ये आपल्या हिँदु धर्माविषयीचा आदर कित्येक पटीने वाढेल आणि आम्ही पुढारलेले हिँदु आहोत हे आपण सर्व हिँदु अभिमानाने सांगु शकु...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा