बुधवार, ३ जुलै, २०१३

'यश' राज समाप्त…

'यश चोप्रा' हे नाव माहित नसेल असा चित्रपट रसिक भारतात मिळणे विरळच...! दिवार, सिलसिले, त्रिशूल, चांदणी, डर, वीर झारा, दिल तो पागल है यांसारखे एकापेक्षा एक 22 चित्रपट गेली ५० वर्षे यश चोप्रांनी भारतीय चित्रपट सृष्टीला दिले आणि ही सेवा ते आयुष्याच्या अखेरपर्यंत अगदी मनोभावे करत राहिले. त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट "जब तक है जान" १३ नोवेंबरला प्रदर्शित होतोय. प्रतिष्टेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविले गेले, फिल्मफेयर पुरस्कार तर त्यांनी तब्बल ११ वेळा मिळवला. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना यथायोग्य सन्मान दिला. त्याबदल्यात यश चोप्रांनी चित्रपट सृष्टीला जे दिले ते मला नाही वाटत दुसरा कोणी देऊ शकला असता.
सिने-सृष्टीत "शहेनशहा" म्हणून गौरविल्या गेलेल्या अमिताभ बच्चनला पैलू पाडून हिरा बनवले ते यश चोप्रांनीच...! यश चोप्रांच्या 'दिवार' चित्रपटानंतरच अमिताभ बच्चन "ANGRY YOUNG MAN" म्हणून ओळखले जाऊ लागले. "मेरे पास मा है..." हा DIALOUGE कोणी कसा विसरू शकेल...? अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्रच चालू होती पण ही अजरामर प्रेम कहाणी पडद्यावर जिवंत करून दाखवली ती यश चोप्रांनीच...! फक्त अमिताभच नाही तर सिने-सृष्टीचा "बादशहा" शाहरुख खान याच यश चोप्रांनी दुनियेला दिला...!! यश चोप्रांच्या 'डर' चित्रपटात खलनायकाची भूमिका करत "तू है मेरी किरण..." म्हणत प्रेमासाठी तडफडणारा शाहरुख सर्वांनाच बेचैन करून जातो. खलनायकाला प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचे कसब शिकावे तर यश चोप्रांकडूनच....! 'दिल तो पागल है' मध्ये शेवटपर्यंत मनात शाहरुख असताना अक्षय कुमारशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करणारी माधुरी, दुसरीकडे शाहरुख वर जीवापाड प्रेम करणारी करिष्मा आणि या त्रिकोणात माधुरीची अखेरपर्यंत वाट बघणारा शाहरुख दाखवण फक्त यश चोप्रांनाच जमत. 'वीर झारा' चित्रपटात पाकिस्तानात राहणारी प्रीती झिंटा आणि भारतात राहणारा शाहरुख यांची अनेक अडथळे असलेली प्रेम कहाणी बघताना आपोआप डोळे पाणावतात. लग्नानंतर आपल्या प्रेयसीच्या चारित्र्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून पाकिस्तानातल्या तुरुंगात २२ वर्षे खितपत पडलेला शाहरुख प्रेमात सामील असणाऱ्या त्यागाची किंमत तरुणीला शिकवतो. प्रेम हि नैसर्गिक भावना असते हे मान्य पण ते आपल्या प्रेयसी किंवा प्रियाकारासमोर कस व्यक्त करायचं ते फक्त आणि फक्त तुम्हीच तरुणाईला शिकवलात. पडद्यावर प्रणय कसा साकारायचा असतो हे खर तर नवीन दिग्दर्शकांनी तुमच्याकडून शिकाल पाहिजे होत पण तुमचे चित्रपट कमी झाल्यावर प्रेमाची परिभाषाच बदलून गेली. तोकड्या कपड्यांवर अंगप्रदर्शन करणाऱ्या नट्यांनी चित्रपटांचा पडदाच नासवून टाकला. सध्या समाजात वाढत असलेले बलात्कार, चंगळवाद, याच नासक्या दिग्दर्शकांची फळे आहेत. पूर्वी प्रणय हि कथानकाची गरज असायची पण आता प्रणय हि चित्रपटाचीच गरज बनली आहे. "जब तक है जान" चित्रपटाद्वारे तुम्ही पुन्हा पुनरागमन करत आहात ही बातमी ऐकून पुन्हा एकदा चांगले चित्रपट पाहायला मिळतील अशी अशा निर्माण झाली होती पण काळाने अचानक केलेल्या आघाताने ती देखील गमावली. चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्कीच बघू आणि मला वाटत हीच तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल. आज खरोखरच यश चोप्रांच्या रुपात रोमान्सचा बादशहाच आमच्यातून निघून गेला. शेवटी एवढच म्हणेन "ऐसे यश चोप्रा होणे नाही...!!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा