बुधवार, ३ जुलै, २०१३

राजकारण आणि मी….

"कोकणच्या राजकरणाबद्दल एवढ्या तडफेने बोलणारा अनुपम कोकणच्या राजकरणात आम्हाला कधी दिसणार आहे...?
कोकणच्या पर्यावरणाला वाचवायचे असेल तर तुझ्यासारख्या तरुणांनी राजकरणात सक्रिय सहभाग घ्यायलाच हवा."
अशा आशयाचे मेसेज अलीकडच्या काळात मला फेसबुकवरील मित्रांकडुन मिळु लागले. कोकणच्या राजकरणात मी पडु इच्छित नाही असे उत्तर देऊनही कित्येकांचे समाधान होऊ शकले नाही. खास त्यांच्या आग्रहास्तव माझी बाजु स्पष्टीकरणासाठी तुमच्यासमोर मांडत आहे.
गेले एक ते दिड वर्षे फेसबुकच्या नव्या व्यासपीठावर कोकणच्या राजकरणावर तोडक्या-मोडक्या भाषेत मी माझी मते मांडायला सुरुवात केली. कित्येकांना ती खुपच आवडली, त्यांनी पाठिँबाही दिला, तथाकथित "स्वाभिमानी" समर्थकांनी संपवुन टाकण्याच्या किँवा आयुष्य उद्धस्त करण्याच्या धमक्या देखील दिल्या पण कोणत्याही प्रसंगी माघार घेणे हा गुण रक्तातच नसल्याने आणि जैतापुरच्या विनाशकारी अणुप्रकल्पाबाबत पुर्ण अभ्यास केल्यानंतर या प्रकल्पाने फक्त कोकणचा विनाशच होईल याची खात्री पटल्याने, कोणाच्याही धमक्यांना भिक न घालता मी माझे काम सुरु ठेवले. कालांतराने कोकणच्या राजकरणात सक्रिय असणा-या समविचारी राजकरण्यांसोबत फेसबुकवर मैत्रीही झाली, पुढे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मी त्यांच्याशी "जैतापुरला विरोध" या विषयवार चर्चा देखील केली पण मी तुझ्या "पाठीशी" आहे अशी खोटी आश्वासने देणारे भरपुर भेटले, मात्र माझ्या "सोबत" आहेत सांगणारे फारच कमी होते.
सगळ्यांशी चर्चा केल्यावर एक गोष्ट लक्षात आली आताच्या काळात राजकरण निव्वळ एक धंदा बनलाय. प्रत्येक गोष्टीत मतांचा हिशोब करायची सवय राजकरण्यांच्या अंगवळणी पडलीय. मतांपुढे तत्वांना, विचारांना तिलांजली देण्यास सगळेच नेते एका पायावर तयार असतात. गाडगीळ अहवालावेळी महामोर्चा काढणा-या काँग्रेसच सोडुनच द्या पण कोकणातील विरोधी पक्षांनी देखील या अहवालाला पुर्णपणे समर्थन द्यायचा प्रयत्न केला नाही कारण त्यांचा एक डोळा डंपरवाल्यांच्या मतांवर होता. आता गाडगीळ अहवालाला पाठिँबा म्हणजेच मायनिँगला विरोध, म्हणजेच डंपरवाल्यांचा रोष ओढवुन घ्यायचा आणि त्यांची मते फुकट घालवायची. त्यापेक्षा गाडगीळ अहवाल कोकणच्या हितासाठी का असेना त्यालाच विरोध केला की डंपरवाल्यांची मते आपली झाली हे सोपे गणित मांडुन आमचे नेते मोकळे झाले.
जैतापुर अणुप्रकल्पाच्या विरोधाची बाजु मी विरोधी पक्षांना पटवुन दिली. त्यांना अगदी मनापासुन वाटले की हा प्रकल्प कोकणच्या विनाशास कारणीभुत ठरेल, अगदी सिँधुदुर्गातील आंबा बागायतदार, मच्छिमार सुद्धा देशोधडीस लागतील मात्र आपल्या पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर या विनाशकारी प्रकल्पास पाठिँबा आहे त्यासाठीच आमचा स्थानिक आमदार सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवुन मत देणा-या लोकांच्या भवितव्याखातर रस्त्यावर उतरुन जैतापुर प्रकल्पाला विरोध करायची हिँमत करेना. इकडे त्याची पक्षनिष्ठा आड येऊ लागली. माझी निष्ठा फक्त आणि फक्त कोकणप्रती आहे आणि ती कोणत्याही राजकीय पक्षासाठी मी गहाण ठेवणार नाही आणि त्यामुळेच राजकरणात उतरण्याची मला अजिबात इच्छा नाही.
'यथा राजा, तथा प्रजा' ही म्हण आताच्या काळात बदलून 'यथा प्रजा, तथा राजा' अशी झाली आहे. एखाद्या प्रदेशातील लोकांची जशी लायकी असते तसेच राज्यकर्ते त्यांच्या नशिबी पडतात. कोकणातील आमच्या आधीची पिढी निस्वार्थी भावनेने मतदान करायची म्हणूनच त्यांच्या नशिबी मधु दंडवते, नाथ पै यांच्यासारखे निस्वार्थी नेते आलेत. आताच्या तरुण मतदानाच्या आदल्या दिवशी दारू पिउन, मटणाचे तुकडे खाउन किंवा पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी आपले बहुमुल्य मत देऊन टाकतात. आता असल्या करंट्याच्या नशिबी तसेच नेते येणार ना...? बर ह्या करंट्या नेत्यांनी विकासाचे असे काही मृगजळ तयार केले आहे कि तरुणांना शाश्वत विकास कोणता आणि आपल्याला विकासाच्या नावाखाली जे काही खपवल जातंय तो खरच विकास आहे का, हे देखील कळेनास झालंय. बर ह्या करंट्या नेत्यांनी विकासाची व्याख्याच बदलून टाकली आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सध्या गल्ली-बोळात राजकारणी लोक क्रीडा-विकासाच्या नावाखाली भरवत असलेल्या क्रिकेट किंवा कबड्डी स्पर्धा आहेत. ही नेते मंडळी या स्पर्धांना ५००० ते १००००० पर्यंत बक्षिसे देतात. भ्रष्टाचाराने माखलेल्या नेत्यांसाठी ही रक्कम फार मोठी नसते पण आमच्या अर्धवट पोरांना त्यात एवढे काही अप्रूप वाटते कि फक्त त्या एका क्रिकेट स्पर्धेखातर आपल्या गावातील सगळी मते हे तरुण या नालायक लोकांना देऊन मोकळे होतात. नेतेमंडळी आपल्या जिल्ह्यातले तरुण देशपातळीवर जाउन क्रिकेट खेळावेत म्हणून आपण अशी भरघोस बक्षिसे देत असल्याच्या बढाया मारतात.अशी पैशाची लालच दाखवून उद्याचे खेळाडु घडवणार आहात...? क्रिकेट म्हणजे राजकारणाचा खेळ नाही तो मैदानात जाउन खेळावा लागणारा खेळ आहे. जर खरेच देशाच्या पातळीवर घडणारे खेळाडू सिंधुदुर्गात तयार करायचे असतील तर अगोदर त्या दर्जाची मैदाने तयार करा. जिल्ह्यात १-२ अपवाद वगळता अशी किती मैदाने इकडच्या तथा-कथित क्रीडाप्रेमी नेते-मंडळींनी बनवली आहेत...? मोठे आलेत क्रीडा-विकासाच्या बाता करायला....!
आज सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात सगळे उपचार जिल्ह्यातच होतील असे सोयीसुविधांनी युक्त एकही हॉस्पिटल नाही. मोठा अपघात झाला तर लोकांना गोव्यातील बाम्बुलीच्या हॉस्पिटलमध्ये जाव लागतंय. हार्टच्या पेशंटला बेळगाव किंवा कोल्हापूरला न्याव लागत. परिस्थिती असली तर अर्ध्या वाटेतच त्या पेशंटचा वाटेतच मृत्यू होतो. असे कित्येक लोक वर्षानुवर्ष माझ्या जिल्ह्यात मारत आहेत पण २० वर्षे एकहाती सत्ता असलेल्या नेत्याला चांगले हॉस्पिटल अजून पर्यंत का झाले नाही, हा जाब विचारण्याचा कोणी साधा प्रयत्न देखील केला नाही. कदाचित लोकाना स्वताच्या जिवापेक्षा क्रिकेटच्या स्पर्धा जास्त महत्वाच्या वाटू लागल्या आहेत. अपघातांनी जीव गेला तरी चालेल पण आमचा जो कोणी क्रिकेटच्या माध्यमातून मोठमोठी बक्षिसे देऊन विकास करेल त्यालाच आम्ही मत देऊन नेता बनवू अशी संकुचित मानसिकता असलेला एक मोठा वर्ग निर्माण झाला आहे. याच वर्गाचे चोचले पुरवताना नेतेमंडळी दिसतात. यांच्यासाठी फक्त क्रिकेटच्या स्पर्धा नव्हे तर विविध महोत्सव देखील आयोजित केले जातात. त्या महोत्सवात सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे यांच्यासारख्या अप्सरा या मंडळीना नेत्रसुख देऊन कृतकृत्य करतात. मग काय जो नेता असे तमाशाचे फड भरवतो त्याला मत द्यायला आम्ही मोकळे...! हव तर यालाच सिंधुदुर्गचा 'सांस्कृतिक विकास' म्हणा ना...! असले तमाशाचे फड भरवण्यासाठी मी राजकारणात पडावे अशी तुमची इच्छा आहे का...? मला असली "राजकीय नौटंकी" करण जमणार नाही.
सिंधुदुर्गच्या शेजारील गोवा राज्य पर्यटनावर आपली पूर्ण अर्थव्यवस्था साम्भालतय मग सिंधुदुर्गचा पर्यटनाने विकास कधी होणार आहे..? तीन आमदार पैकी कोणाकडे पर्याटनाने विकास करायचा आराखडा आहे...? असल्यास त्या दृष्टीने आजपर्यंत कोणते प्रयत्न त्यांनी केली आहे. सिंधुदुर्गचा विकास पर्यटनानेच होवू शकतो या माझ्या मतावर मी आजही ठाम आहे आणि तसा आराखडाही मी तयार करून ठेवलाय. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा विकास मला करायचा नाही तर शाश्वत विकास मला योग्य वाटतो. पण मुळात शाश्वत विकास काय असतो हे सिंधुदुर्गच्या लोकांना कळणे जरुरीचे आहे, त्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे लागेल आणि ही एक खूप मोठी प्रक्रिया असेल नकारात्मक विचार करून पाल काढणारा मी नाही. यदाकदाचित पुढील काळात लोकांना शाश्वत विकासाचे, आपल्या अवती-भोवतीच्या अमुल्य पर्यावरणाचे महत्व पटू लागले आणि अशा वेळी या गोष्टींना प्राधान्य-क्रम देणारा नेता त्यांना पाहिजे असेल तर असेल ते सगळे करियर बाजूला ठेऊन मी माझ्या कोकणसाठी राजकारणात उतरेन याची खात्री देतो. पण परिस्थिती आज आहे तशीच पुढेही सुरु राहिली तर म 'ये रे माझ्या मागल्या...'  बाकी काही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा