गुरुवार, ४ जुलै, २०१३

कोकणचा विकास प्रदुषणकारी प्रकल्पातुन नव्हे तर पर्यटनातुन शक्य...


जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प कोकणात का नको, या लेखात शास्त्रीय कारणे देऊन सुद्धा प्रकल्पाच्या समर्थकांनी मला खेकडा प्रव्रुत्तीचा म्हटले. काहीँनी मी विरोधासाठी विरोध करतोय अशा वल्गना केल्या.
कोकणातील एक अडाणी नेता ज्याला अणुऊर्जेतला '' कळत नाही तो लोकांना प्रकल्प कोकणवासियांच्या भल्यासाठी आहे अशी खात्री देतो आणि आपली अक्कल गहाण ठेवुन कोकणची जनता त्याच्या भुलथापांना फसते याच मला आश्चर्य वाटत.
आजचा लेख मी माझ्यावर झालेल्या आरोपांचे प्रत्युत्तर म्हणुन लिहीत आहे.
कोकणवर मी जिवापाड प्रेम करतो आणि कोकणच्या विकासाची "BLUE PRINT" तुमच्यासमोर ठेवत आहे.
यापुढे मी फक्त प्रकल्पांचा विरोधक आहे आणि कोकणच्या विकासाचे कोणतेही PLANS माझ्यापाशी नाहीत अशी टिका होणार नाही एवढी अपेक्षा करतो.

कोकणच्या विकासावर बोलण्याआधी सर्वप्रथम माझ्या कोकणच्या भुमीविषयी जाणुन घेणे महत्वाचे आहे.
कोकण ही परशुरामांची भुमी म्हणुन ओळखली जाते. सारी स्रुष्टी दान केल्यानंतर स्वतःला राहायला जागा उरली नाही म्हणुन समुद्र मागे हटवुन परशुरामांनी ही भुमी तयार केली अशी आख्यायिका आहे.
कोकण म्हणजे निसर्ग आनंद, प्रसन्नता लाभलेले वैभवसंपन्न प्रदेश आहे. हिरव्यागार वनस्पतीँनी बहरलेले सदाहरीत डोँगर, तितक्याचा अंगावर शहारा आणणा-या खोल द-या, त्यातुन वाहणारी नदीची पात्र, त्यांनी सम्रुद्ध केलेली भाताची खाचरे, इथल्या खाड्या, रुपेरी वाळुचे सागरकिनारे या सा-यांनी कोकणला स्वर्गरुप देखणेपण दिले आहे. या देवभुमीत काजु, फणस, आंबा आणि कितीतरी झाड मुक्तपणान डोँगरात वाढतात. मनाला भुरळ पडावी अशा हिरव्यागार मखमली झालरीची शाल घेऊन इथली प्रत्येक वस्ती वसली आहे. निसर्गनिर्मात्याच्या कुंचल्यातुन विविध रंगाच्या फुलांची उधळण, लाल पिवळी जास्वंद, गुलमोहोर आणि त्यांच्या साथीला आहेत पक्षीरुपी देवदुत. इथल्या निसर्गसौँदर्याबरोबर गड,किल्ले, लेणी, गुहा, प्राचीन मंदिरे, बंदरे अशी ऐतिहासिक स्थान ही आपल्याला पाहता येतात. कोकणचा परिसर आपल्या निसर्गामुळे पाहणा-यांच्या नजरेला सौंदर्याचे निराळेच परिणाम देतो. स्वर्गसुखाचा अनुभव नाही नाहीतर तीच उपमा दिली असती. खरच माझ कोकण म्हणजे जणु काही परमेश्वराला पहाटेच पडलेल एक गोड स्वप्न...


 महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर देशावरच्या काही शहरांनी कात टाकुन विकासास हातभार लावला. त्या द्रुष्टीने कोकण तस मागेच पडल. छोट्या छोट्या वाड्यावस्तीँमध्ये विखुरलेल्या कोकणात ना वीज होती ना उद्योगधंदे होते. ना रस्ते होते ना वाहतुकीची साधन. शेती... आणि मासेमारी हाच पोट भरण्यापुरता उद्योग, डोँगरद-यांचा दुर्गम प्रदेश, त्यात वाट रोखुन पसरलेल्या नद्या आणि भरपुर पाऊस अशा परिस्थितीत कस येणार कोण वर...???
त्या वेळी चाकरमान्यांच्या MONEYORDER वर जगणारा कोकण अशी एक उपहासात्मक पण सत्य परिस्थिती होती. जलवाहतुक हा प्रवासाचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. कोकण रेल्वेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण पुर्ण देशाशी जोडल गेल आणि MONEYORDER वर जगणारा हा शिक्का पुसत कोकणाने आपले अस्तित्व ठळकपणे दाखवायला सुरुवात केली.

 "स्वर्गीय सौँदर्याचा अविष्कार" असलेल्या भारतीय राजकरणातील विक्रुतीने संपुर्णतः नासवुन टाकण्याचा विडा उचलला आहे. कोकणातील रासायनिक उद्योग, तत्सम वीज प्रकल्प यांतुन होणा-या प्रदुषणाची पाहणी कराल तर कोकण विनाशाकडे वाटचाल करत असल्याच जाणवेल. क...ोणत्याही परिस्थितीत कोकणातील कष्टकरी उपाशी मरणार नाही याची काळजी स्वतः निसर्गानेच घेतली होती पण कोकणचा विकास केवळ 'वाढ म्हणजे विकास' या संकल्पनेवर झाल्याने कोकणचे मुळ सौँदर्य हरवले आणि सिमेँट वाळुच्या क्रुत्रिम सौँदर्याला महत्व प्राप्त झाले. ज्या कोकणकडे शांत, निसर्गसुंदर, प्रदुषणविरहीत वातावरणासाठी पाहिले जात असे त्याच कोकणात आज प्रदुषणकारी रासायनिक कंपन्यांच्या आकाशात धुर सोडणा-या चिमण्या दिसु लागल्या. प्रचंड प्रमाणात होणारी व्रुक्षतोड आणि प्रदुषणकारी प्रकल्प यांमुळे कोकणची राखरांगोळी झाली तरी शासनाचे कोकणात प्रकल्पावर प्रकल्प आणायचे धोरण काही थांबायला तयार नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात आज आम्हाला चळवळी उभाराव्या लागत आहेत. अत्यंत गलितगात्र होऊन स्थानिकांना प्रदुषणाविरोधात संघर्ष करावा लागत आहे.
श्वासोच्छवासासाठी लागणारी शुद्ध हवा आणि पाणीसुद्धा विकत घेण्याची पाळी कोकणवर येऊन ठेपली त्यावेळी कोकणी माणुस जागा झाला आहे. स्वतःच्या हक्कासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार झाला आहे. जैतापुर आंदोलनात बळी पडलेला तबरेज त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्याचप्रमाणे शासनाने कोकणवर आजपर्यँत केलेल्या अत्याचाराबाबत कोकणी माणसात शासनाविषयी असणा-या असंतोषाचे देखील हे उदाहरण आहे.


 आज कोकणामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या औष्णिक व अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध रास्त आहे. जरी वीज महत्वाची असली तरी श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा त्यापेक्षा कितीतरी पटीने महत्वाची आहे. जनतेचा लढा चालु असताना जैतापुर प्रकल्प कोणत्या...ही परिस्थितीत करणारच असे म्हणणा-या शासनाकडुन जनतेने काय आदर्श घ्यावा...?
स्थानिकांबरोबरची चर्चा चालु असताना निर्णय होण्यापुर्वीच प्रकल्पाचे बांधकाम सुरु असेल तर आंदोलकांचा असहकारावरचा तोल सुटला तर त्याला सरकार जबाबदार आहे त्याचा दोष आंदोलकांचा कसा काय असु शकतो...??
कायदा हातात घेतला म्हणुन तबरेजवर गोळी झाडुन त्याचे प्राण घेतले जातात आणि बंदुक हातात घेऊन शेकडो निरपराध्यांची हत्या करणारा कसाब बिर्याणी खातो. त्याला जर शासनाचे संरक्षण मिळत असेल तर आपल्या मागण्या लोकांनी कशा मान्य करुन घ्याव्यात...???
गाडगील समितीने सरकारी दबावाला बळी न पडता कोकणवरील अन्यायाचा पर्दापाश केला तर त्या समितीचा अहवालच डावलण्यात येतो. चुकांच्या दुरुस्ती करण्याची तयारी दाखवण्याची ताकद जर सरकारमध्ये नाही तर शासनाच्या नवीन चुकांसाठी जनतेने सरकारला का साथ द्यावी...???


 उर्वरित महाराष्ट्रात वा देशात ज्या भागात ऊस, कापुस वा तत्सम पिके मजबुत प्रमाणात घेतली जातात तिथेच नजीक असे रासायनिक प्रदुषण करणारे प्रकल्प किती प्रतिशत आहेत हे शासनाने सप्रमाण जाहिर करायला हवे.
कोकणातल्या वसईची केळी यापुर्वीच जळगावला गेलीत.... डहाणुचा चिकु गायब झाला. उद्या हापुस निकालात निघाला तर आश्चर्य वाटायला नको. या सर्वाना शासनाइतकेच आपण कोकणवासिय जबाबदार आहोत. बिघडत्या पर्यावरणीय समतोलामुळे मच्छीची आवक घटलेली आहे. रत्नागिरीतील मच्छीमारांनी तर मत्स्यदुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली आहे.

देशातील पहिले प्रक्रीया उद्योग प्रशिक्षण क्रुषी विद्यापीठ कोकणातील दापोली येथे उभे राहिले परंतु आम्हाला एकही मोठा प्रक्रिया उद्योग उभारता आला नाही.

48 बंदये आणि त्यांना जोडणारे 210 हुन अधिक धक्के यांच्या साक्षीने असंख्य मच्छिमारांचा संसार उभा आहे. त्यांना याच व्यवसायात स्थिरावण्यासाठी हजार कोटी रुपये टाकायला शासन तयार नाही कारण त्यातुन भुधारक स्थानिकांचा मुलतः विकास होणार आहे. कोकणबाबत हा दुजाभाव का...???

एकुणच या स्थितीमुळे कोकणात होऊ घातलेला विकास काहीँना अर्थकारणामुळे सम्रुद्ध भासतो आहे त्याचवेळी काहीँना आपली जीवनशैली उद्धस्त करणारा सापळा वाटतो आहे.


 1980 च्या दशकात कोकणचा कँलिफोर्निया करण्याचे स्वप्न त्यावेळच्या राज्यकर्त्याँनी पाहिले पण त्याद्रुष्टीने आवश्यक असलेला विकास आराखडा मात्र तयार झाला नाही. तेव्हापासुन आजपर्यँत "कोकणचा कँलिफोर्निया" या दोन शब्दातच कोकणातील जनतेला अक्षरशः गुंडाळले आहे.

जैतापुरप्रमाणे कोकणात 500 कि.मी. च्या परिसरात 14 औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात एवढ्या उर्जाप्रकल्पांची आवश्यकता आहे का? आणि ते सामावुन घेण्याची कोकणची ताकद आहे का?? याचा विचारही शासनाने केला नाही हे दुर्देव...!

कोकणचे भौगोलिक स्थान हे या प्रकल्पांमागचे मुख्य कारण आहे. ऊर्जाप्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. ती गरज किनारपट्टीच्या भागात भागवली जाऊ शकते. या एकमेव कारणामुळे 14 औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात आले आहेत. महाराष्ट्राची सध्याची वीजेची गरज 5000 M.W इतकी आहे. कोकणातील प्रस्तावित उर्जाप्रकल्पातुन 33000 M.W. इतकी ऊर्जानिर्मिती पुढील 10 वर्षात होणार आहे. म्हणजेच भारतातील जास्त औष्णिक वीज प्रकल्प असलेला प्रदेश म्हणुन कोकणची ओळख प्रस्थापित होणार आहे.


 एकीकडे वीजप्रकल्पांसाठी कोकणचा वापर केला जात आहे पण स्वतः कोकण जाणीवपुर्वक विकासाच्या बाबतीत शासनाकडुन मागास ठेवले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा सागरी महामार्ग दोन दशकांहुन अजुनही प्रलंबित आहे. कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग कधी ...दुपदरी होणार हा प्रश्न आहे. त्यातच कोकण रेल्वे कोल्हापुरला जोडण्याची घोषणा गेल्या अर्थ संकल्पात केली होती त्याच्या सर्वेक्षणाचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यावर्षी राजापुर-कोल्हापुर रेल्वे मार्गाची घोषणा झाली.
मुंबईची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी सुद्धा कोकणातील वशिष्ठी नदीचे पाणी वापरण्याची नामी कल्पना आली आहे. कोयनेच्या या अवजलाच्या प्रकल्पावर कोकण क्रुषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु श्रीरंग कद्रेकर यांनी ब-याचवेळा सुचना करुन देखील काही विचार झाला नाही. कोयना जलविद्युत प्रकल्पातुन सोडले जाणारे हे अवजल वशिष्ठ नदीतुन पुढे समुद्राला मिळते. त्याचा वापर कोकणात जलसिँचनासाठी झाला असता तर शेती विकास झाला असता. कोकणातील प्रश्नावर कोकणचे स्थानिक आमदार एक होत नाहीत हेही कोकणचे दुर्देव...!


 कोकणचा कँलिफोर्निया करण्याचे मनसुबे सरकारचे असु शकतात पण कोकणी माणसाला तसे वाटत असेलच असे नाही. विकासाच्या बाबतीत स्थानिक लोक व सरकार यामध्ये भिन्न मतप्रवाह असु शकतात. याचा अर्थ कोकणी माणुस विकासविरोधक किँवा "ठेविले अनंते तैसेची रहावे" या पव्रुत्तीचा आहे असा होत नाही. परंतु त्याच्या संकल्पनेतील विकास हा चिरकाल टिकणारा व प्रदुषणविरहीत असा असेल तर तो त्याचा दोष आहे असे म्हणता येणाय नाही. पाश्चात्य संस्क्रुती निसर्गाला ओरबाडुन जगण्याची चंगळवादी व्रुत्ती शिकविते तर भारतीय संस्क्रुती निसर्गाने आपल्याला दिलेला ठेवा पुढच्या पिढीकडे आहे तसा हस्तांतरित करायला शिकवते.कोकणी माणुस याच संस्क्रुतीला मानतो परिणामी कोकणचा विकास करताना विकासाच्या संकल्पना मुंबई पुण्यासारख्या शहरातील AC त बसुन न ठरवता त्या स्थानिकांना विचारात घेऊनच ठरवाव्यात जेणेकरुन शासन व स्थानिक जनता यांच्यामध्ये वादाचे प्रसंग न उद्भवता कोकणचा विकास शांततेच्या मार्गाने होईल त्यातुन कोकणचे मुळ सौँदर्य कायम टिकेल.


 शेती आणि मासेमारी व्यतिरिक्त इतर काही किरकोळ व्यवसाय वगळता पर्यटन व्यवसायाचा एक समर्थ पर्याय आत्ता कोकणच्या विकासासाठी खुला झाला आहे. कोकणात पर्यटन रुजवण्यामागे सर्वात महत्वाचा घटक हा तेथील निसर्ग, समुद्र अन् संस्क्रुती हाच आहे.मात्र त्याला... शिस्तबद्ध तिलांजली दिली जात आहे. कोकणात पर्यटनाची लाट आली आहे. दिवसागणीक ती वाढतच जाणार आहे. मुळात पर्यटन क्षेत्राची खुप मोठी व्याप्ती आहे. त्याचे KNOWLEDGE असणारी मंडळी जाणीवपुर्वक ग्रामस्तरापासुन देशस्तरापर्यँतच्या विविध नियोजनात सहभागी असायला हवीत मात्र गलिच्छ राजकरणात ते घडताना दिसत नाही. बारामती, लातुर या शहरांचा गेल्या काही वर्षातील विकास कोकणातील विकसित मेँदुला प्रश्न विचारतो.
कोकणच्या विकासाचा बिघडणारा समतोल अनेक समस्या जन्माला घालतो आहे.
आपला राष्ट्रीय महामार्ग क्र 17 हा सुद्धा असाच एक प्रश्न बनुन राहिला आहे. कोकणच्या विकासाला हातभार लावणारे "क्रषी पर्यटन प्रकल्प" सध्या आकाराला येत आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातुन तेवढ्या परिसरात का होईना सम्रुद्ध पर्यावरणाचा सुखद अनुभव घेता येणार आहे. कोकणातील भौगोलिक रचना धरणांना जन्म देऊ शकणारी आहे. त्या शेजारी तितक्याच प्रमाणात जैवविविधता नांदु शकते. निसर्ग, जंगल, क्रुषी आदि पर्यटन बहरु शकते. आपल्या सर्वाँच्या हातात तेवढेच शिल्लक आहे. आपापला परिसर जरी हिरवागार राहिला तरी कोकणची पर्यटनात्मक वाटचाल कायम राहिल.


 मी ज्या जिल्ह्यात राहतो तो "सिँधुदुर्ग जिल्हा" 30 एप्रिल 1997 रोजी पर्यटन जिल्हा म्हणुन घोषित करण्यात आला. सावंतवाडीपासुन अवघ्या 30 किलोमीटरवर आंबोलीसारखे हिलस्टेशन आणि अवघ्या 20 कि.मी. वर वेँगुर्लेचा समुद्रकिनारा अशी निसर्गाची विविधता 50 क...िलोमीटरमध्ये अजुन कुठेही पाहता येणार नाही. सह्याद्रीपासुन समुद्रापर्यँतचे अलौकिक स्रुष्टीसौँदर्य, 121 कि.मी. चा नयनरम्य समुद्रकिनारा आणि 32 किल्ल्यांचे वैभव अंगाखांद्यावर खेळवणा-या सिँधुदुर्गची पर्यटन विकासातुन सुवर्णभुमी व्हायला वेळ लागणार नाही.येथे सह्याद्रीपासुन समुद्रापर्यँतची विशालता आणि हत्तीपासुन डाँल्फिनपर्यँतची जैवविविधता एकाच ठिकाणी पाहता येते.
सिँधुदुर्ग जिल्ह्यातील सागरकिनारी वसलेल्या मालवण, देवगड, वेँगुर्ले या प्रत्येक तालुक्यामध्ये बघण्यासारखे किमान 6 ते 7 बीच, जलदुर्ग, सागरकिनारे, कोटकिल्ले, ऐतिहासिक मंदिरे आहेत. मालवण समुद्रात शिवाजी महाराजांनी बांधलेला सिँधुदुर्ग किल्ला स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असुन त्यात महाराष्ट्रातील एकमेव 'शिवराजेश्वर मंदिर' आहे.
मराठी साम्राज्याचे आणि इतिहासाचे हे शिलेदार आता मात्र ढेपाळु लागले आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटन जिल्ह्यातील काही गडकिल्ले तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

 मुंबईच्या समुद्रात 300 कोटी खर्चुन भव्य शिवस्मारक नजीकच्या काळात उभ राहतय. अभिमान आणि आनंद आहे. विदेशी पर्यटक मुंबईत उतरले की त्यांच्यासाठी ते एक आकर्षण असेल. आता थोडा पुढे विचार करु, ते भव्य स्मारक पाहिल्यावर त्यांनी जर किल्ले पाहायची इच्छ...ा व्यक्त केली तर त्यांना आपण काय दाखवणार? पडक्या तटबंद्या, ढासळलेले बुरुज, त्यातल्या इमारतीँचे भग्नावशेष, किल्लाभर माजलेली गच्च झाडी आणि शेकडो वर्षे झुंजलेल्या पत्थरांना वेढणारा हिरवा कँन्सर? कशाच्या आधारावर वैभवशाली इतिहास सांगणार? तो इतिहास घडविणा-या युगपुरुषाचचं स्मारक आपण उभारतोय ना!
दस्तरखुद्द शिवाजी महाराजांनी मोठ्या दुरद्रुष्टीने उभा केलेला मालवण समुद्रातील सिँधुदुर्ग किल्ला ढसळत असताना शासनस्तरावरुन किल्ला संवर्धनासाठी काही तातडीने उपाययोजना होताना दिसत नाहीत. तीच अवस्था देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याची आहे. जिल्ह्यातील 32 गड किल्ल्यांचे जरी शासनाने योग्य प्रकारे संवर्धन केले तरी सिँधुदुर्गच्या विकासाला वेगळीच उंची प्राप्त होईल. मात्र पुरातत्व विभाग आपल्या ताब्यात असलेल्या गड किल्ल्यांच्या बाबतीत स्वतः काहीही करत नाही आणि दुस-यांनाही काही करु देत नाही. समुद्रकिनारे आणि निसर्गसौँदर्य जगात सर्वत्र आहे. आपल्या सिँधुदुर्गाच वेगळेपण आणि इतिहास यांच्या सुंदर मिलाफात आहे.


 मालवण समुद्रतळाखालीच 10 K.M. परिसरात जागतिक स्तरावर दुर्मिळ अशी जैवविविधता आहे. विविध प्रकारचे प्रवाळ, जलचरांच्या विविध दुर्मिळ प्रजाती या ठिकाणी आहेत. माशांच्या पुनरुत्पत्तीचे हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळेच केँद्र शासनाने 19 एप्रिल 1987... च्या शासनपत्रकात मालवण येथे सागरी अभयारण्याची घोषणा केली होती. ते अद्याप झालेली नाही. विजयदुर्गापासुन रत्नागिरीतील नाटेपर्यँतच्या समुद्रकिनारी भागात आंग्रिया नावाचे अदभुत बेट आहे. विविध प्रकारचे प्रवाळ आणि माशांच्या प्रजाती या ठिकाणी पाहता येतात. येथील पर्यटन विकास अजुनही प्रलंबितच आहे. तसेच शिरोड्यानजीकचा समुद्रकिनारी पाण्याचा भाग अगदी पारदर्शक आहे. स्वच्छ, सुंदर, निर्मनुष्य समुद्र किना-यामुळे या ठिकाणी "सी-वर्ल्ड"चा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. मात्र सागरी पर्यटन आणि पर्यावरण विकासाशी संबंधित बहुतेक सर्वच प्रकल्प शासनस्तरावर मागे पडले आहेत. त्याउलट ग्रामस्थांचा विरोध असले खनिज आणि औष्णिक प्रकल्प पर्यटन जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असले तरी शासन पुढे रेटत आहे. सिँधुदुर्गाच्या विकासाचा खेळखंडोबा करण्यापेक्षा सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील काही भाग इकोसेँसेटीव्ह जाहीर करावा अशी मागणी पुढे येत आहे.
जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ब-याच घोषणा झाल्या. 4500 कोटीँचे पँकेज जाहिर झाले. सिँधुदुर्गचा पर्यटन विकास गतीने व्हावा म्हणुन पर्यटन विकास कंपनी स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. या घोषणांचे पुढे काय झाले हे तपासुन बघण्याची गरज आहे. या पँकेजमधील कोट्यावधीचा निधी कोठे आणि कसा खर्च झाला याचा अनुभव फारसा चांगला नाही. त्यामुळे निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे होऊनसुद्धा जिल्हा पर्यटन विकासाच्या बाबतीत असलेला अनुशेष आणि यामागील झारीतील शुक्राचार्य शोधुन काढल्याशिवाय सिँधुदुर्गची सुवर्णभुमी शापमुक्त होणार नाही.


 कोकणात पर्यटनाबाबत गेल्या 5-7 वर्षात वेगाने वाढ होत आहे. हा वेग अनियंत्रीत होण्याआधीच त्यास योग्य दिशा द्यायला हवी. वाढ आणि विकास यांच्यामध्ये मुलभुत फरक आहे. वाढ ही प्रसंगी उद्देशहीन, दिशाहीन व बेशिस्त असु शकते तर विकास हा एका निश्चित दिशे...ने केलेला ठोस प्रवास असतो. एखाद्या ठिकाणी प्रचंड संख्येने पर्यटक येतात म्हणजे त्या स्थानाचा विकास झाला ही समजुत करुन घेणे संकुचित ठरेल.
केवळ मौजमजा म्हणजे पर्यटन या संकल्पनेला डोळस आणि सजग जाणीवांचा आधार दिला तर ते विकासाच्या दिशेने पडलेले दमदार पाऊल असेल. यामध्ये पर्यावरण, स्थानिकांचे हित, ऐतिहासिक व सांस्क्रुतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि स्थानिकांसाठी रोजगार या बाबी प्रामुख्याने यायला हव्यात.
मालवणचा सिँधुदुर्ग किँवा मुरुडचा जंजिरा पाहायला गेली अनेक वर्षे लाखो पर्यटक येत आहेत. ते येत आहेत म्हणुन त्यांच्या गरजा पुरवणारे छोटे मोठे व्यावसायिक तिथे उभे राहिले आहेत. अशा शेकडो ऐतिहासिक वस्तु या किनारपट्टीवर उभ्या आहेत ज्यामुळे खरतर त्या परिसरातल्या पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे.
एखाद्या ठिकाणच पर्यटन महत्व केवळ सोयी सुविधांनी वाढत नाही तर मुळात जिथे निसर्ग आणि इतिहास यांची सांगड घातली जाते त्या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाचे कसदार बीज रोवले जाऊ शकते.

 रायगड,रत्नागिरी आणि सिँधुदुर्ग जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त समुद्रकिनारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पर्यटनाचा बहर का दिसत नाही? जिथ ऐतिहासिक वास्तु किँवा धार्मिक स्थळ आहेत तिथे त्या केँद्रस्थानी ठेऊन पर्यटनात वाढ होत आहे. ज्या मुळ वारश्यांच्या... आधाराने पर्यटन व्यवसायाचे बीज रोवले गेले आहे त्या स्थानांच्या जतनाचे काय? त्या वास्तु उन्हापावसात, वादळवा-याच्या तडाख्यात नष्ट होत आहेत. शिवाजी महाराजांनी एका प्रसंगी म्हटले होते की, गड कोट ही पिढ्यांची मिरासदारी... हाच विचार पुढे चालायला हवा. कोकण पर्यटनात स्थानिकांच्या पुढच्या पिढ्यांचाही विचार व्हायला हवा. त्यांना अधिकाधिक संख्येने पर्यटन व्यवसायात येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे. त्यासाठी ऐतिहासिक वस्तुंचे महत्व स्थानिकांच्या मनी ठसाला हवे. ही स्थाने स्फुर्तीदायी ठरायला हवीत. त्यापासुन योग्य फायदाही करुन घ्यायला हवा.
अनेक दुर्लक्षित दुर्ग आणि वास्तु या किनारपट्टीवर आहेत. त्यांचे संवर्धन करुन पुरेशा सोयी सुविधा निर्माण करुन त्याच योग्य मार्केटिँग करायला हवे.
शिवस्मारकासाठी मंजुर केलेल्या 300 कोटीँबरोबरच कोकण किनारपट्टीवरील सुमारे 70 किल्ल्यांपैकी 30 किल्ले निवडलेले आणि त्या प्रत्येकांच्या जतन संवर्धनासाठी प्रत्येकी काही कोटी सुरुवातीला खर्च केले तर कोकण पर्यटन विकासाच्या कक्षा नक्कीच रुंदावतील.


 आणखी एक विषय नेहमी चर्चेत येतो की, कोकणचा गोवा व्हायला पाहिजे. मुठभरांच्या फायद्यासाठी गोव्यात काही ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली चाललेला चंगळवाद स्वैराचार आपल्याकडे आणायचा आहे का? रेव्ह पार्ट्या हळुहळु सिँधुदर्गाकडे सरकु लागल्या आहेत. याला व...ेळीच पायबंद घातला गेला पाहिजे. कोकणच्या आणि गोव्याच्या संस्क्रुतीत फरक आहे तो समजुन घ्यायला हवा. गोव्याकडुन केवळ पर्यटनाची मानसिकता स्वीकारावी.

संपुर्ण कोकण दर्शनाची एक भोज्या सहल काही ट्रँव्हल एजन्सीज आयोजित करत असतात. वास्तविक 5-6 दिवसांच्या कमीत कमी 5-6 सहली आयोजित करता येतील इतकी ऐतिहासिक व नैसर्गिक संपन्नता आपल्या कोकणात आहे. अशा वेळी एकाच सहलीमध्ये संपुर्ण कोकणचे धावते दर्शन घडवुन मिळणा-या आर्थिक फायद्याच्या एक चतुर्थाँश फायदाच पदरात पडतो.

बहुतेकांच्या मते कोकणात जायच, समुद्रकिनारी मनसोक्त खेलायच, आकंठ पिऊन झुलायच आणि त्यावर मच्छीच भरपेट जेवण जेवायच एवढीच मर्यादित संकल्पना असते. स्थानिकांनी याचा विचार करावा. सर्वाँगिण विकासासाठी कल्पक आणि ठोस उपाययोजनांची गरज आहे. विकासाच्या ओघात निसर्ग, पर्यावरण आणि ऐतिहासिक ठेव्यांची जपणुक करणे आवश्यक आहे.
कोकणवासियांना त्यांच्या भुमीचा योग्य मोबदला तर जाऊ देत पण तोँडचा घास काढुन घ्यायचे प्रयत्न काही ठिकाणी होताना दिसत आहेत. जोपर्यँत स्थानिक भुमिपुत्र मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यँत सर्वँकष विकासाचे प्रयत्न अपुरे आहेत. निश्चित ध्येय धोरणे ठरवुन पर्यटन व्यवसायास जाणीवपुर्वक दिशा दिल्यास हे साध्य होऊ शकते.



कोकण पर्यटन विकासाच्या द्रुष्टीकोनातुन काही प्रस्ताव...


1) किल्ले व ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन व संरक्षणाची दिर्घकालीन व्यवस्था करुन त्यांचे महत्व पर्यटकांपर्यँत पोहोचवण्यासाठी प्रभावी यंत्रणा असावी त्यासाठी काही योजना राबवता येतील.
a) संबंधित खात्यातर्फे संपुर्ण डागडुजी व दुरुस्ती करुन ती वास्तु एखाद्या संस्थेला दत्तक द्यावी.ती संस्था स्वखर्चाने अथवा स्वप्रयत्नाने निधी उभारुन त्या वास्तुची देखभाल, स्वच्छता हे सर्व पाहिल.
b) त्या वास्तुचा इतिहास सांगणारे स्लाईड शो तयार केले जावेत. तेही सशुल्क दाखवता येतील.
c) महामार्ग व राज्यमार्गावर बोर्ड उभे करुन त्यावर त्या वास्तुची संपुर्ण माहिती लिहावी.
d) मुंबई ते मालवण अशी किनारे किनारे जलसफर करावी.
e) मध्यवर्ती ठिकाणी कोकणचा इतिहास आणि संस्क्रुती सांगणारी म्युझिअम्स उभारली जावीत.
f) महाराष्ट्रातील महाविद्यालयातुन या विषयांवरचे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना दिले जावेत.
g) स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रशिक्षित गाईड्स तयार केले जावेत.
h) S.T. बरोबर छोट्या खाजगी वाहनांना पर्यटकांच्या मर्यादित वाहतुकीचा परवाना दिला जावा.
i) त्या वास्तुच्या परिसरात फक्त स्थानिक खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देणारे स्थानिकांचेच स्टाँल्स असावेत.
j) महत्वाचे म्हणजे सर्व ठिकाणी स्वच्छताग्रुहांची सोय असायला हवी.
j) समुद्रकिना-यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जँकेट्स उपलब्ध करणे गरजेचे आहे.
k) या सर्व पर्यटनाभिमुख योजना राबवताना स्थानिक भुमीपुत्रांना प्राधान्य मिळुन रोजगार वाढेल याची काळजी घ्यायला हवी.

2) कोकणात अनेक प्रकारच्या दशावतारासारख्या लोककला आहेत पण अशिक्षित कलाकारांमुळे त्या व्यावसायिक द्रुष्टीने सादर केल्या जात नसल्याने त्यांना प्रतिसाद मिळत नाही. शासनाने कलाकारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उत्तेजन दिल्यास लोककलेच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

3) परदेशातील पक्षी अभयारण्यांप्रमाणे एखाद्या दिड दोनशे एकर जमिनीवर नैसर्गिकरित्या असलेल्या व्रुक्ष लागवडीवर नायलाँनचे जाळे पसरवुन पक्षांना अभय दिल्यास पक्षी अभयारण्य विकसित होईल.

4) कोकणातील एखादे पारंपारिक खेडे आहे तसेच ठेवण्याच्या द्रुष्टीने (उदा. अंगण, चि-याच्या अरुंद विहीरी, माडापोफळीच्या बागा, गावातील कच्चे रस्ते, बैलगाड्या) कायदा करण्यात यावा. जिल्ह्यात 1-2 ठिकाणी अशी पारंपारिक खेडी जपल्यास पर्यटक नक्कीच ती पाहायला येतील.

5) मुंबई गोवा महामार्गानजीक 8 ते 10 K.M. चा प्रभाग अविकासित क्षेत्र म्हणुन आरक्षित करण्यात यावा जेणेकरुन पुरातन कोकण फक्त पुस्तकात चित्ररुपाने पाहायची वेळ येणार नाही.

6) गणपतीपुळे हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासारखे आहे.... किमान 2000 पर्यटक दिवसभर गणपतीपुळे येथे थांबुन श्रीँचे दर्शन व समुद्रकिना-याचा आनंद लुटुन परत जातात. गणपतीपुळे पर्यटक निवासात एक कायमस्वरुपी हेलापँड उतारल्यास 1 तासात मुंबईतुन पर्यटक येथे येऊ शकतात. यासाठी ही जबाबदारी खाजगी हेलिकाँप्टर कंपनीवरती सोपविण्यात यावी. अशा प्रकारची सेवा तारकर्ली. हरिहरेश्वर, आंबोली इत्यादी ठिकाणी करता येऊ शकेल.

7) भविष्यात कोकणातील पर्यटन स्थळे अधिकाधिक देशी व विदेशी पर्यटक पाहुण्यांपर्यँत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, खाजगी पर्यटन उद्योजक यांची एकत्रितपणे मोट बांधणे आवश्यक आहे.

8) कोकण ही नररत्नांची खाण आहे. टिळक, साने गुरुजी, आंबेडकर, सावरकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, अनंत कान्हेरे, वासुदेव बळवंत फडके, विनोबा भावे, गोळवल गुरुजी याशिवाय अनेक नररत्ने या कोकणात जन्मली आहेत. त्यांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्यासाठी त्यांची मुळ गावे सामाजिक तीर्थक्षेत्रे म्हणुन विकसित होणे गरजेचे आहे.


 9) ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा यास नजरकैदेत ठेवण्यासाठी भव्य राजवाडा बांधला. या राजवड्यात सध्या पुरातत्व खात्याचे वस्तु संग्रहालय आहे. हा राजवडा पर्यटन महामंडळाकडे हस्तांतरित केल्यास तेथे हेरिटेज हाँटेल बांधता येईल. त्यात मँनेजमेँट ...व ट्रँव्हल आणि टुरिझम सारखे अल्प कालावधीचे कोर्सेस सुरु करुन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कोकणातील विद्यार्थ्याँना पुणे मुंबईला न जाता रत्नागिरी येथेच हाँटेल मँनेजमेँट आणि कँटरिँगचे शिक्षण उपलब्ध होईल.

10) देवबाग व मोबार या गावात स्थानिकांशी चर्चा करुन संपुर्ण मालकी हक्क जमिन मालकाकडे ठेवत त्यांची घरे तळमजला व 1ला मजला अशी बांधावीत. 1 मजला घरमालकाकडे देऊन 1 मजला महामंडळाकडे ठेवत पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वापरावा. त्यामुळे पर्यटन क्षेत्र म्हणुन देवबाग, मोबारचा विकास होईल आणि स्थानिकांना भाड्यातुन उत्पन्न मिळेल.

11) पर्यटन महामंडळाने सन 1995 पासुन शिरोडा, वेळाघर, मिठबाव, मोचेमाड इत्यादी ठिकाणच्या जागा खाजगी उद्योजकांना दिल्या. दुर्देवाने त्यांनी गेल्या 15 वर्षात अजुन काहीच विकास केला नाही. यासाठी एकतर या खाजगी उद्योजकांना या जागेचा विकास करण्यासाठी प्रव्रुत्त करावे अन्यथा या जागा पर्यटन महामंडळाने परत घेऊन त्यांचा विकास करावा.

12) सिँधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात वनस्पती मिळाल्याने स्नाँर्कलिँग व स्कुबा ड्रायविँग हा प्रकल्प राबविण्यात यावा. तीवरी बंदर येथे अतिशय चांगले समुद्रतळातील जैविक विविधता आढळुन आली आहे.

13) ज्यासाठी पर्यटक पाहुणे कोकणात येतात ते प्रामुख्याने सागरकिनारी माडापोफळीच्या बागा, येथील प्रदुषणमुक्त हवा शांतता व निवांतपणा या गोष्टी जपुन ठेवण्यासाठी सर्व सागरकिनारे स्वच्छ व अतिक्रमण मुक्त ठेवणे गरजेचे आहे.

14) कोकणमध्ये सध्या नैसर्गिक व भौगोलिक सुबत्ता आहे. या पार्श्वभुमीवर सिँधुदुर्ग पर्यटन जिल्हा तसेच रत्नागिरी क्रुषी व फलोत्पादन जिल्हा म्हणुन जाहीर झाला आहे.
या दोन्ही जिल्ह्यात फक्त पर्यटनविषयी प्रकल्प राबविण्यात यावे.

 15) पर्यटन महामंडळाने महाप्रयासाने कितीही पर्यटन स्थळे विकसित केली परंतु त्यांची जर प्रसिद्धी केली नाही तर ही पर्यटन स्थळे विकली जाणार नाहीत व त्यातुन महामंडळ व एकुणच कोकणला काहीच आर्थिक फायदा होणार नाही.

16) शालेय अभ्यासक्रमातुन पर्यटन व... पर्यटन संस्क्रुती याचे धडे देणे गरजेचे आहे. याबाबत शासनस्तरावरुन विचार व्हावा. देशी विदेशी पर्यटकांचे स्वागत 'अतिथी देवो भव' या जाणीवेतुन होणे गरजेचे आहे.

17) कोकणातील प्रत्येकाला आपल्या स्वतःबाबत व आपल्या पर्यटन स्थळांबाबत अभिमान निर्माण केला गेला पाहिजे. कोकणातील प्रत्येक ग्रामस्थाने कोकण पर्यटनाचे मार्केटिँग केले पाहिजे. पर्यटनाशी संबंधित विकासाचे स्वागत केले पाहिजे.

18) सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 110, सिँधुदुर्ग जिल्ह्यात 68 आणि रायगड जिल्ह्यात 73 निवासी न्याहारी योजना उपलब्ध आहेत. ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही ठराविक निकष लावुन लाभार्थीँना 40 ते 50% अनुदान दिल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी तयार होऊ शकतात. एकाच उद्योजकाने 200 खोल्यांचे पर्यटक निवास बांधण्याऐवजी 200 लोकांनी आपापल्या घरी निवासी व न्याहारी योजना राबविल्यास 200 कुटुंबांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.


19) सध्या कोकणमध्ये काही ठिकाणे वगळता फेरीबोट सेवा उपलब्ध नाहीत. सागरी मार्गावर खाजगी तत्वावर सागरी फेरीबोट सेवा सुरु केल्यावर फार मोठे आकर्षण निर्माण होईल.

20) रत्नागिरी येथे कोकण महोत्सव आयोजित करण्यात यावा. यामध्ये इतर महोत्सवांप्रमाणे...च जागतिक किर्तीचे कलाकार निमंत्रित करण्यात यावेत. जेणेकरुन कोकणातील पर्यटन स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळेल व कोकण पर्यटन विकासाला वेगळीच झळाळी प्राप्त होईल.

21) खाद्यमहोत्सव पर्यटकांना मोठी पर्वणी ठरु शकेल व त्यायोगे कोकणामध्ये अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील व स्थानिक महिला वर्गाना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल.

22) कोकण रेल्वेला 'कोस्टल टुरिझम ट्रेन' सुरु करण्यात यावी. ज्याप्रमाणे माथेरानची ट्रेन जगप्रसिद्ध आहे त्याप्रमाणे कोस्टल टुरिझम ट्रेन देखील जगप्रसिद्ध होईल.

22) गोवा व केरळ राज्यात पर्यटनाने फार मोठी क्रांती केली आहे. कोकणात पर्यटनाची क्रांती करण्यासाठी रत्नागिरी, सिँधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरी रस्ते, पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय, दळणवळणाची साधने, चौवीस तास वीजपुरवठा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुलभुत सुविधा शासनाने पुरवणे क्रमप्राप्त आहेत.
* कोकणात पर्यटन उद्योगासाठी सुरुवातीला 3 ते 5 वर्षे बिगर व्याजी कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा
* पर्यटन प्रकल्पासाठी पुर्वीप्रमाणे 25 ते 30% राज्य शासनाचे अनुदान व 10 ते 15% केँद्र शासनाचे अनुदान मिळाल्यास आर्थिकद्रुष्ट्या कमकुवत असलेल्या उद्योजकांना आपापले पर्यटन प्रकल्प सुरु करणे शक्य होईल.
* आवश्यक ती सगळी कागदपत्रे पर्यटन उद्योजकाने सादर केल्यानंतर त्यांना सर्व परवानग्या एकाच कार्यालयातुन उपलब्ध करुन द्याव्यात. त्यामुळे उद्योजकांची वेगवेगळ्या कार्यालयाकडे होणारी धावपळ कमी होऊन त्यांचा वेळ व पैसा वाचेल.

 23) आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाल्यास कोकणात पंचतारांकीत प्रकल्प येऊ शकतील. त्यानंतरच कोकणचा खरा विकास शक्य आहे. यासाठी सिँधुदुर्गातील चिपीचे विमानतळ लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे.

24) प्रत्येक पर्यटन स्थळाची पर्यटन क्षमता लक्षात घेण...े गरजेचे आहे. पर्यटन क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक त्या पर्यटनस्थळी आल्यास पर्यटकांची संख्या असह्य होते. त्याचप्रमाणे कोकणच्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात यावी.

25) सध्या पर्यटन स्थळांच्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न फारसे नसल्याने पर्यटन स्थळी सार्वजनिक स्वच्छता ग्रुहे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, सागरी सुरक्षितता, आरोग्य सेवा ग्रामपंचायतीँना पुरवणे शक्य होत नाही. यासाठी पर्यटन स्थळांच्या ग्रामपंचायतीँना विशेष आर्थिक अनुदान देऊन व पर्यटन कर लावल्यास अनुमती देऊन ग्रामपंचायतीँचे उत्पन्न वाढु शकते. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.


जगभरात पर्यटन व्यवसायाला प्रचंड चालना आहे. काही राष्ट्रे तर फक्त पर्यटन व्यवसायावर चालवली जातात इतकी या क्षेत्राची ताकद आहे. आज गोवा राज्याचे अर्थकरण मुख्यतः पर्यटनावर आधारलेले आहे. निसर्गाने भरभरुन दिलेले असुनही आपला महाराष्ट्र मात्र पर्यट...नाने मागासलेला म्हणुन परिचीत आहे. खरतर भारत देशाच्या भौगोलिक रचनेमुळेच आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतु अनुभवणा-या जगातील मोजक्याच राष्ट्रांमध्ये येतो. निसर्ग रचनेचे काम करणा-या युनेस्को सारख्या संस्थांनी कोकणातील वनांना 'जागतिक संरक्षित वनांचा' दर्जा दिला आहे. येथील काही प्राण्यांच्या प्रजाती, काही वनस्पतीँची जैविकता प्रुथ्वीतलावर फक्त येथेच पहावयास मिळते. निसर्ग अबाधित राखुन जर विकासाचा चतुःसुत्री अराखडा जर कार्यान्वित केला तर पर्यटनाच्या माध्यमातुन कोकणच्या विकासाला सर्वाँगिण चालना मिळेल.

निसर्गाने भरभरुन दिलेल्या कोकणात जर नियोजनबद्ध आराखडा मांडत विकास कार्यक्रम राबवला तर पर्यटनाच्या उद्योगातुन कोकण अर्थकरणाचा एक चांगला पर्याय महाराष्ट्राच्या आर्थिक सुबत्तेला मिळवुन देईल. शिवाय पर्यटनामुळे येणा-या पुरक व्यवसायामुळे कोकणी मा...णसाच्या अर्थार्जन क्षमतेला नवीन बळ मिळुन त्या प्रांतात सम्रुद्धी येईल. बर हे सगळ करत असताना ग्लोबल वार्मिँग सारख्या जागतिक समस्येत भर घालण्याऐवजी निसर्ग संवर्धनातुन त्या समस्येत एक सक्षम पर्याय निर्माण केल्याचे माँडेला तयार करता येईल ज्यात अखिल मानवजातीचे कल्याण लपले आहे.
तेव्हा समाजसुधारणी राज्यकर्त्याँनी, शासनाने व सामान्य जनतेने या सा-याचा विचार करुन निसर्गाने भरभरुन दिलेल्या या कोकणचा पर्यटनाच्या माध्यमातुन विकास करायचा की विनाशकारी प्रकल्पांच्या दुराग्रही हट्टापायी कोकणचा सत्यानाश करायचा हे ठरवण्याची ही योग्य वेळ आहे. अजुनही ही वेळ गेलेली नाही.

खरोखर कोकणला परमेश्वराने मोठ्या प्रमाणात भरभरुन खुप काही दिले आहे. मात्र गरज आहे ती मानवी प्रयत्नांची! अशा प्रकारे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन उद्योजक व कोकणातील सर्व जनता यांनी एकमेकांच्या हातात हात दिल्यास श्री समर्थाँनी सांगितल्यानुसार-

"सामर्थ्य आहे चळवळीचे !
जो जो करील तयाचे !!"

या उक्तीनुसार सर्वाँनी चळवळ केल्यास पर्यटन ही "कोकण विकासाची गुरुकिल्ली" ठरल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा