रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

प्रेमरंगांची दुनियादारी...

'दुनियादारी' चित्रपट सुपरहिट झाला कारण यात दाखवलेली श्रेयस आणि डीएसके यांची अतुट मैत्री तरुणांना खुपच भावली. श्रेयस-शिरीनची लव्ह स्टोरीही तितकीच आवडली पण मैत्रीच्या छायेत 'दुनियादारी' चित्रपटात दाखवलेल्या वेगवेगळ्या जोडप्यांमधील लव्हस्टोरीजचे विविध पैलु निश्चितच झाकोळले गेले. 'दुनियादारी' चित्रपटाचा एकंदरीत एक संपुर्ण चित्रपट म्हणुन विचार करण्यापेक्षा त्यात दाखवलेल्या श्रेयस, शिरीन, मीनु, डीएसके आणि एमके यांचा त्यांच्या त्यांच्या जागी विचार केला किँवा त्यांच्या मनात नक्की काय चालले असेल याचा विचार केला तर प्रेमाचे विविध पैलु उलगडण्यास आणि समजुन घेण्यास मदत होते. स्वतःच्या आयुष्यातही विशिष्ट परिस्थितीत आपण त्यांचा उपयोग करुन त्याप्रमाणे वागु शकतो. चित्रपटातील पात्रांच्या भावना शब्दात लिहुन दाखवणे खरच खुप कठीण काम आहे पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. चला तर मग.

1) श्रेयसचा भाबडेपणा स्वप्नील जोशीने अतिशय सुंदर पद्धतीने साकारलाय. श्रेयसच शिरीनवर प्रेम असत आणि त्याला तिच्याशीच लग्न करायच असत. मीनुच्या वडिलांचा बदला घेण्याच्या उद्देशाने श्रेयसचे मित्र त्याला मीनुसोबत प्रेमाचे नाटक करायला सांगतात. इच्छा नसताना श्रेयस यात फुकटचा भरडला जातो. कालांतराने मीनु श्रेयसमध्ये गुंतु लागते. इकडे शिरीनच श्रेयसवर प्रेम असत आणि मीनु श्रेयसच्या जवळ गेली की तिचा जळफळाट होतो. त्याच रागात श्रेयसला लहान मुलगा संबोधत ती त्याला कँडबरी चाँकलेट आणि बिस्किट यातील एकाची निवड करता येत नाही असे सांगते. त्यावेळी श्रेयसला शिरीनच दिर्घ चुंबन घेत मिठीत घेऊन आपल्या प्रेमाची कबुली द्यावी लागते. जेव्हा मीनु घरदार सोडुन श्रेयससोबत लग्न करायला येते त्यावेळी तो तिचा गैरफायदा घेऊ शकला असता पण मीनुला शिरीनवरील आपल्या प्रेमाची प्रामाणिकपणे कबुली देत तो तिला पुन्हा घरी जायला सांगतो. पुढच्या आयुष्यात शिरीन जोडीदार म्हणुन मिळणार की नाही याची श्रेयसला खात्री नसते पण त्यामुळे मीनुला खोट्या प्रेमात अडकवुन तो लग्न करत नाही.शेवटी कितीही झाल तरी मुळातच शिरीनवर प्रेम असल्यामुळे तो लग्नानंतरही मीनुवर प्रेम करु शकलाच नसता. निर्णायक वेळ येते त्यावेळी जीवावर उदार होत श्रेयस आपल्या ख-या प्रेमाला म्हणजेच शिरीनला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतो. दुनियादारीतील श्रेयस आपल्याला एवढच शिकवतो की जर तुम्ही प्रेम केलेली व्यक्ती काही अपरिहार्य कारणांमुळे तुमची जोडीदार होऊ शकत नसेल तर लगेच दुस-या कोणाला होकार कळवु नका. आपल्या प्रेमाशी प्रामाणिक राहा आणि तुमच प्रेम खर असेल तर मार्ग नक्कीच सापडतील. स्वतःला स्वतःच प्रेम मिळत नसेल तर दुस-या कोणासोबत प्रेम नसताना लग्न करुन त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद करण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. कदाचित त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुसरा कोणी खर प्रेम करणारा भेटला तर तिच्या आयुष्याचे नंदनवन होऊ शकते. जसे मीनुवर तिच्या नव-याने खुप प्रेम केले पण स्वतःचे खरे प्रेम नसताना एखाद्याशी लग्न करुन आपण त्याचे आयुष्य बरबाद करु नये.

2) शिरीनबद्दल बोलायच तर प्रेम आणि लग्न यांच्या गुंत्यात अडकलेल्या मुलीच्या भुमिकेला सई ताम्हणकरने योग्य न्याय दिला आहे. शिरीन श्रेयसवर प्रेम करते खरी पण घरातल्यांच्या दबावाखाली किँवा इच्छेखातर तिला खलनायकाशी म्हणजेच जितेँद्र जोशीशी लग्न करायची वेळ आलेली असते. तिला श्रेयसच प्रेमही कळत असत, त्याच वेळी तिच देखील श्रेयसवर प्रेम असत पण स्वतःच्या ठरलेल्या लग्नामुळे ती श्रेयसला मीनुच प्रेम स्वीकारुन तिच्याशी लग्न करायचा सल्ला देते. वर वर कितीही दाखवल तरी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला दुस-यासोबत बघुन जीव तुटायचा तो तुटतोच. त्यामुळेच सगळ्या परिस्थितीची जाण असली तरी मीनुसोबत श्रेयसला पाहुन शिरीनला दुःख होत. आपल्याला दुस-या कोणाशी लग्न करायच आहे याची जाण असताना ती श्रेयसच्या प्रेमात वाहत जाते. त्याला दिर्घ चुंबन घेऊ देते, त्याच्या मिठीत शिरते. डाँक्टर असल्यामुळे श्रेयसच्या आजाराबद्दल समजल्याने तो वर्षभरात मरणार याची तिला जाणीव असते पण त्यामुळे शिरीनच श्रेयसवरील प्रेम तसुभरही कमी होत नाही. शेवटी श्रेयसशीच लग्न करुन त्याच्या निधनानंतर मुलांसमवेत श्रेयसच्या आठवणीत जगण शिरीन पसंत करते.

3) मीनुची सोज्वळ भुमिका उर्मिला कानेटकरने साकारलीय. श्रेयसच्या मित्रांनी रचलेल्या सापळ्यात अडकुन ती श्रेयसच्या खोट्या प्रेमाचा स्वीकार करते पण कालांतराने ती श्रेयससारख्या गुणी मुलावर जीव उधळुन प्रेम करु लागते. त्याच्यासोबत लग्नाची स्वप्ने बघते. इतकेच काय श्रेयससाठी घरदार सोडुन लग्नासाठी पळुन देखील येते. ज्यावेळी श्रेयस मीनुला त्याच्या आणि शिरीनच्या नात्याबद्दल सांगतो तेव्हा मीनु म्हणते, "तुझ शिरीनवर प्रेम मला माहित होत पण आयुष्यात कधीतरी तु माझ्यावर देखील प्रेम करशील या भावनेनेच मी तुझ्यावर प्रेम करत होते." मीनुकडुन आपणा सर्वाँना प्रेमातील त्याग शिकता येतो. प्रत्येक वेळी तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमची होईलच असे नाही. काही वेळा जर त्या व्यक्तीच्या ह्रुदयात कोणी दुसरच असेल तर त्या व्यक्तीच्या भावनांचा सन्मान करत कोणतीही कुरकुर न करता आपण बाजुला व्हावे. जसे श्रेयसने लग्नाचे प्रपोजर नाकारल्यावर कोणतीही तक्रार न करता मीनु बाजुला गेली.

4) डीएसपी बाबत काय बोलायच...? टपोरी, दंगेखोर परंतु तितकाच हळवा, लव्हर बाँय डीएसपी अंकुश चौधरीने साकारलाय. त्याच्या प्रेयसीवर तो खुप प्रेम करतो परंतु त्याच्या गुंडगिरीमुळे तिचे वडील तिच लग्न दुस-यासोबत करुन देतात. त्यानंतर आपल्या घरच्यांना त्रास न देण्याच आणि तिने त्याला लिहिलेली पत्रे जाळुन टाकण्याच वचन ती त्याच्याकडुन घेते. डीएसपी गुंड असल्याने तो तिच्या नव-याला आरामात मारु शकला असता किँवा तिने लिहिलेली लव्हलेटर्स तिच्या नव-याला दाखवुन तिच लग्न मोडु शकला असता पण एक गुंड असुनही डीएसपी तस वागला नाही. आपल्या प्रेयसीच लग्न झाल आहे हे सत्य त्याने स्वीकारल. स्वतःला झालेल दुःख स्वतः सहन केल पण आपल्या प्रेयसीच्या संसारात खडे टाकले नाहीत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सुखात आपल सुख आहे याची शिकवण यातुन मिळते. फक्त आपल्या प्रेयसीच कुणा दुस-यासोबत लग्न झालय म्हणुन वेगवेगळ्या कुरापती करुन तिला त्रास देत दुःख देणार असाल तर 'प्रेम' शब्द तोंडात घ्यायची सुद्धा आपली लायकी नाही, एवढ नीट लक्षात घ्या.

5) संदीप कुलकर्णीने साकारलेला एम.के.ची भुमिका कितीही छोटी असली तरी ती दुर्लक्षित करता येत नाही. खासकरुन त्याने शेवटी श्रेयसला सांगितलेली ही वाक्ये आयुष्यातील प्रेमाबद्दलचे कटु सत्य सांगुन जातात. "जेव्हा कोणी आपल तोँड दाबत तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी आपण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो पण हाच प्रयत्न जेव्हा आपल प्रेम वाचवण्याची वेळ येते तेव्हा आपण करत नाही."

श्रेयसच्या आईवर म्हणजेच वर्षा उसगावकरवर एम.के. खुप प्रेम करतो पण एका उद्योगपतीशी (श्रेयसच्या बाबांशी) लग्न करुन ती एम.के.चे प्रेम नाकारते. केवळ पैशांखातर आपल प्रेम नसलेल्या व्यक्तीशी प्रेम करण आणि त्यानंतर त्याच्याशी शारिरिक संबंध ठेवुन मुलांना जन्म देण म्हणजे समाजमान्य बलात्कार आहे, हे ती श्रेयससमोर मान्य करते. पैशांच्या हव्यासापोटी ख-या प्रेमाशी प्रतारणा करुन खोट्या सुखाच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर दुःखच वाट्याला येते कारण खर सुख तर ख-या प्रेमातच दडलेल असत ना....! ज्याच्यावर खर प्रेम असेल त्याच्याशी लग्न केल आणि पुढे कितीही खडतर दिवस आले तर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सानिध्यात आपणाला त्या दिवसातही सुखच मिळत.

(ता.क.- काही चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच एवढे गाजतात की ते प्रदर्शनानंतर सुपरहिटच होतील याची खात्री असते. 'दुनियादारी' चित्रपट याचेच एक उदाहरण आहे. सुहास शिरवळकरांची दुनियादारी कादंबरीच इतकी गाजली होती की त्यावर आधारित चित्रपटच सुपरहिट व्हायलाच पाहिजे होता.

एखादा चित्रपट जेव्हा सुपरहिट होतो तेव्हा तो चांगलाच असतो याची खात्री देता येत नाही. आता यातील 'चांगला' शब्दाचा अर्थ व्यक्तीसापेक्ष बदलत जातो. चेन्नई एक्सप्रेस, दबंग, वाँटेड, एक था टायगर सारखे टुकार चित्रपट जेव्हा 100-200 कोटीँचा धंदा करुन सुपरहिट म्हणुन गणले जातात तेव्हा त्यांना कोणत्या नजरेने चांगल म्हणाव हाच प्रश्न मला पडतो. पुढच्या पिढीला रफी, किशोरदा, आशाताई लता मंगेशकरांपेक्षा मिका सिँग, यो यो हनी सिँगच गायक म्हणुन 'चांगला' वाटणार, या वाक्यावरुन मला काय म्हणायच ते समजुन घ्या.

असो, हल्लीच्या काळात एकापेक्षा एक मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. अगदी श्वास चित्रपटापासुन दुनियादारी पर्यँत कित्येक चांगले चित्रपट निर्माण झाले आणि त्या सगळ्यांमध्ये मला 'डोँबिवली फास्ट' सर्वात जास्त आवडला.जेव्हा मी एखादा नवीन मराठी चित्रपट पाहतो तेव्हा त्याचे मुल्यमापन मी 'डोँबिवली फास्ट'चा तराजु लावुनच करतो. प्रेक्षकांनी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' किँवा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'बालक पालक' चित्रपटांना भरघोस पैसे मिळवुन लोकप्रियतेची पावती दिली पण माझ्या लेखी हे दोन्ही चित्रपट 'डोँबिवली फास्ट'च्या आसपास सुद्धा पोहोचत नव्हते. अशातच दुनियादारीने 22 कोटीँचा धंदा करत मराठी चित्रपटातील एव्हरेस्ट गाठले पण तो चित्रपट तरी चांगला असेल का नाही याबद्दल मी साशंक होतो. दुनियादारी प्रदर्शित झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर काल खास वेळ काढुन बघितला. त्यावेळी खात्री पटली की 'दुनियादारी' चित्रपट 'डोँबिवली फास्ट' इतकाच चांगला आहे. नव्हे, उत्क्रुष्ट संगीत दिग्दर्शनामुळे तो डोँबिवली फास्टपेक्षाही सरस ठरतो.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा