रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

म्रुगजळ रोजगाराचे...

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांच्या पुर्ततेसाठी माणसाला रोजगाराची 'गरज' भासते आणि या रोजगारापायीच कोणत्याही थराला जायची त्याची तयारी असते. मात्र कधीतरी हा बुमरँग आपल्यावरच उलटु शकतो या शक्यतेपासुन तो नेहमीच अनभिज्ञ असतो.
हल्लीच कुडाळात नोकरीचे आमिष दाखवुन सहा तरुणांकडुन प्रत्येकी अडीच लाख रुपये लंपास करण्यात आले. नोकरी मिळवण्याचा शाँर्टकट किती घातक ठरु शकतो याची प्रच......ीती लोकांना आली. आता या प्रकरणात दोष तरी नक्की कोणाला द्यावा...?
नोकरीपायी तरुणांकडुन पैसे उकळुन ते लंपास करणा-या भामट्याला...?
की पैसे देत कोणाच्या तरी शिफारशीने प्रामाणिक उमेदवाराच्या नाकावर धोँडा घालुन नोकरी बळकावु पाहणा-या ऐतखाऊ तरुणांना...??
की या तरुणांना नोकरीपासुन वंचित ठेवत त्यांच्यावर अनैतिक मार्गाने नोकरी मिळवण्याची वेळ आणणा-या सिँधुदुर्गातील राजकीय नेतेमंडळीँना...???
'प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे' ही शिकवण काळाप्रमाणे आऊटडेटेड ठरु लागली आहे. प्रयत्नांना आँप्शनल ठेवुन यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न तरुणाई बाळगु लागली आहे आणि त्यांच्या या असुरी महत्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे काम आधुनिक राजकरणातील तथाकथित 'रोजगारमहर्षी'नी केले आहे. गल्लीबोळातल्या नेत्याशी ओळख असली की त्याच्या शिफारशीने आपल्याला लगेच नोकरी मिळुन जाईल, या भाबड्या आशेवर त्याच्या आसपास घुटमळणा-या मिँध्या युवकांची फौज वाढु लागली आहे. एखाद्या नोकरीसाठी दिवसरात्र एक करुन मेहनतीने आपल्याला त्या योग्यतेचे बनवण्यापेक्षा लाचार बनुन एखाद्या बड्या नेत्याची पायचाटेगिरी करण्यात युवा पिढी धन्यता मानु लागली आहे.

प्रा.मधु दंडवतेँचा काळ सिँधुदुर्गच्या राजकरणातील सुवर्णकाळ म्हणुन ओळखला जातो. तत्वांच्या या पुजा-याने कधी आपल्या कार्यकर्त्याँसाठी शिफारशी केल्या नाही. परिणामी कार्यकर्त्यांची नाराजी ओढवुन घेत दंडवतेँसारख्या आदर्श नेत्याला एकदा नव्हे तर दोनदा पराभव स्वीकारावा लागला पण दंडवतेँनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. माझ्या शिफारशीमुळे माझ्या कार्यकर्त्याचे काम होत असेल पण त्याच वेळी त्या जागेसाठी योग्य असलेल्या प्रामाणिक माणसाचे काम रखडत असेल, तर त्या प्रामाणिक माणसावर एका नेत्याने आपल्या पदाचा वापर करुन केलेला अन्याय योग्यच नव्हे तर अक्षम्य आहे. आजकाल योग्यता असलेल्या उमेदवाराला नोकरी मिळाली नाही तरी चालेल पण कोण्या बड्या धेडाच्या शिफारशीने किँवा त्याला पैसे चारुन आपली योग्यता नसतानाही ती नोकरी आपल्यालाच मिळाली पाहिजे, ही व्रुत्ती बळावत चालली आहे.त्यामुळेच पैसे घेऊन नोकरी मिळवुन देणा-या भंपक एजंटचा सुळसुळाट झाला आहे. असे एजंट लोक नोकरी देण्याचे आमिष दाखवुन लाखो-करोडो रुपये उकळतात आणि कालांतराने फरार देखील होतात. शहरांमध्ये तर नोकरी मिळेल की नाही हे सांगण्यासाठी पावलापावलावर ज्योतिषी बसलेले आढळतात. एकविसाव्या शतकात वावरणारे तरुण जेव्हा तळहातावरच्या रेषा तपासुन नोकरीची अपेक्षा करतात तेव्हा खरच त्यांची किव येते. तळहातावरच्या रेषांपेक्षा मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवणे केव्हाही योग्य हे या पामरांना कोण समजावेल...? सिँधुदुर्गसारख्या सुसंस्क्रुत जिल्ह्यात पैसे देऊन तरुणांनी नोकरीची अपेक्षा करावी यापेक्षा वेगळे दुर्देव ते कोणते...? सिँधुदुर्गच्या विकासाच्या बाता मारणारी 'दादा'मंडळी तरुणांना रोजगार मिळवुन देण्यात सपशेल अपयशी ठरली याचा हा ठसठशीत पुरावा आहे. सिँधुदुर्गाचे दरडोई उत्पन्न वाढल्याच्या बढाया मारताना जिल्ह्यातील युवापिढी शिक्षण, रोजगार मिळवण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरात स्थलांतरीत होत आहे, हे वास्तव जनतेपासुन का लपवण्यात येतेय...? लोकसंख्या स्थलांतरित झाली की दरडोई उत्पन वाढणारच हे साधे गणित आहे.स्पर्धात्मक युगात टिकुन राहायचे असेल तर पदव्युत्तर शिक्षण घेणे अपरिहार्य बनले आहे परंतु अद्यापहि सिँधुदुर्गात MBA, MCA, M.Sc, M.Com असे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये नाहीत. सिँधुदुर्गचे दरडोई उत्पन्न वाढवुन दाखवण्यासाठीच जिल्ह्यातील विद्यार्थ्याँना पदव्युत्तर शिक्षणापासुन वंचित ठेवण्याची ही राजकीय कारस्थाने तर नाहीत ना...? चार वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये दिलेली सिँधुदुर्गातील आय.टी. पार्कची आश्वासने हवेतच विरली का...? अजुन पुढच्या किती निवडणुका सिँधुदुर्गातील लोकांना रोजगाराचे गाजर दाखवुन तुम्ही लढवणार आहात...??शहरांच्या धर्तीवर MPSC, UPSC, बँक भरती अशा स्पर्धात्मक परीक्षांचे योग्य प्रशिक्षण देणारी संस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरुन जिल्ह्यात राहुनच तज्ञ मार्गदर्शक, संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्याँना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. एकंदरीतच जिल्ह्याचे राजकीय नेत्रुत्व शैक्षणिक विकास करण्याच्या द्रुष्टीने उदासीनता दाखवत असताना सिँधुदुर्गातील महाविद्यालयांनी शहरांच्या धर्तीवर रविवारी किँवा सुट्टीच्या दिवशी स्पर्धापरीक्षांसाठी जादा अभ्यासवर्ग घेतले पाहिजेत. अभिनव फाऊंडेशन किँवा स्मार्ट अँकँडमी अशा सेवाभावी संस्था माफक दरात विद्यार्थ्याँना स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन मिळवुन देण्याचा स्तुत्य उपक्रम करत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्याँनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संस्थाचालकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नेतेमंडळी स्वतः शैक्षणिक विकासास हातभार लावु शकत नसतील तर निदान त्यांनी जे बदल घडवु पाहतायेत त्यांना आर्थिक पाठबळ देऊन सहकार्य करावे. 'आयत्या बिळात नागोबा' ही व्रुत्ती बाळगुन एका भामट्याच्या हातात अडीच लाख रुपये देत नोकरीची अपेक्षा बाळगण्यापेक्षा माफक दरात अशा स्पर्धात्मक प्रशिक्षण केँद्रात प्रवेश मिळवुन प्रयन्तांची पराकाष्ठा करत परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यास प्रयत्नशील राहावे. घाम गाळुन, कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे फळ कोणाच्या तरी शिफारशीने मिळवलेल्या नोकरीपेक्षा नक्कीच गोड असते. ज्याच्या यशाचा पाया सत्यावर आधारलेला असतो, त्याचे भविष्य नेहमीच मजबुत असते. बाकी हपापाचा माल गपापा होतो हे मी वेगळ सांगायला नको. समर्थ रामदासांच्या सुप्रसिद्ध वाक्यात थोडा बदल करुन लेखाचा शेवट करतो-

"सामर्थ्य आहे नोकरीचे। जो जे करील तयाचे॥"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा