रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

आठवणीतील बदल...!

बदल हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे कटु सत्य कोणालाही रुचत नसले तरी प्रत्येकाला ते पचवावेच लागते. आयुष्यात जेव्हा एकीकडुन दुसरीकडे स्थलांतरीत व्हायची वेळ येते तेव्हा त्या बदलाला सामोरे जायला आपले मन कधीच तयार होत नाही. आपल्या आसपास सावलीप्रमाणे वावरणारे जिवलग किँवा ज्या परिसरात इतकी वर्षे वास्तव्य केले तो परिसर, एकाएकी सोडुन जाणे मनाला जड होऊन जाते.लहान असताना शिकलो होतो की निर्जीव वस्तु असंवेदनशील आणि भावनाशुन्य असतात पण आज अनुभवाने समजते की जेव्हा त्या निर्जीव वस्तुंमध्ये आपल्या भावना गुंततात तेव्हा त्या निर्जीव वस्तुंचा कायमचा निरोप घेणे कठीण होऊन असते. एखाद्या घरात तुम्ही आयुष्याचा बराच काळ वास्तव्य केले असेल आणि काही कारणास्तव त्या घराला कायमचा निरोप देऊन दुसरीकडे स्थलांतर करणे तुमच्यासाठी अपरिहार्य असेल तेव्हा त्या राहत्या घरातील भिँती, दरवाजे, खिडक्या, एवढच नव्हे तर आसपासची झाडे देखील ती वास्तु कायमची सोडताना तुमच्याशी संवादच साधत आहेत, असे भास होऊ लागतात. इतक्या वर्षात त्या वास्तुमध्ये आणि आपल्यात जी नकळत भावनिक ओढ निर्माण झालेली असते तीच ओढ आपल्याला त्या वास्तुमध्येच खिळवुन ठेवण्यास कारणीभुत ठरते.निर्जीव वास्तुबाबत मनाची अशी अवघड अवस्था होत असेल तर सजीव गोष्टीँबाबत काय बोलायच...? इतक्या वर्षात अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही मित्र-मैत्रीणी एवढे जिवलग बनलेले असतात की त्यांचा कायमचा निरोप घेणे केवळ आणि केवळ अशक्यच असते पण त्याक्षणी त्याशिवाय दुसरा कोणता अन्य पर्यायही आपल्यासमोर नसतो. शेवटच्या दिवसाची मनःस्थितीच काही जगावेगळी असते. याअगोदर आपण आपल्या प्रिय व्यक्तीँना कितीही वेळा भेटत असलो तरी कायमचा निरोप देण्याअगोदरची 'ती' शेवटची भेट जीव व्याकुळ करुन टाकते. त्या भेटीवेळी मनात दाटलेल्या भावनांना अश्रुद्वारे वाट मोकळी करुन द्यावी की शेवटच का होईना, समोरच्या व्यक्तीला घट्ट मिठीत घेऊन तिचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे, याची तिला जाणीव करुन द्यावी, या द्विधा मनःस्थितीत मन सापडते. अंतिमतः यापुढे फोनवरुन तरी संपर्कात राहु अशी भाबडी आशा मनाला दाखवत, आपण मनाची समजुत घालतो खरी पण जसजसा काळ लोटतो, नव्या भागात नवे जीवलग बनतात, तसतशा या जुन्या नात्यांच्या आपल्या मनातील प्रतिमा हळुहळु धुसर होत जातात.कधीकाळी ज्यांच्याशिवाय एक क्षण घालवणे कठीण होऊन बसायचे, आता त्यांच्याशिवाय आयुष्याचा रहाटगाडा आपण नव्या मित्रांसह अगदी सहजरित्या रेटु लागतो. काळ हाच भावनिक गोष्टीँवर औषध बनुन आपल्या मदतीला धावुन येतो आणि आयुष्य आहे, ते चालतच राहणार, हा निसर्गनियम सगळ्यांनाच लागु पडतो. काळ कितीही पुढे सरकला, सहवासाची कोमल फुले कोमेजुन गेली, तरी मनाच्या कुठल्यातरी कोप-यात अजुनही शिल्लक असतात ते धुसर होत गेलेल्या हळव्या नात्याच्या आठवणीँचे काटे...! नंतर कधीतरी अचानक एकांतात जेव्हा आठवणीँच्या त्या कप्प्यावरील धुळ बाजुला होते, तेव्हा सोबत घालवलेले ते क्षण सूर्यप्रकाशाईतके स्वच्छ दिसु लागतात. त्यावेळी आपणच संभ्रमात पडतो की आठवणी आपल्यासाठी बनलेल्या असतात का आपणच आठवणीँसाठी बनलेले असतो...? काहीही म्हणा पण आयुष्याच्या दिर्घ प्रवासात आठवणीँची शिदोरीच उपयोगाला येते. जेव्हा मनात आठवणीँचा कल्लोळ साचतो तेव्हा एखाद्या चित्रपटातील फ्लँशबँकप्रमाणे एकत्रित व्यतित केलेले क्षण झपाझप नजरेसमोर पुन्हा जीवंत होऊन उभे राहतात. त्यातील काही क्षण चेह-यावर हास्याची कळी उमलवतात तर काही मात्र हसता हसता टचकन डोळ्यात अश्रु आणतात.त्याच क्षणी आपल्याला त्या खास व्यक्तीशी संवाद साधावासा वाटतो, अगदी लगेच फोनकडे हात देखील जातो पण त्याच वेळी लक्षात येते की अजुनही ती व्यक्ती आपल्या मनाच्या कितीही जवळ वाटत असली तरी मधल्या काळात दोन मनांमधील अंतरे खुप वाढलेली असतात. एकेकाळी वाटणारी ती अनाहुत ओढ कालांतराने कमी होत गेलेली असते. वेगाने बदलणा-या काळाच्या ओघात आपल्याला खास वाटत असणा-या व्यक्तीच्या आयुष्यातही आपल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढायला कोणीतरी दुसरा तयार झालेलाच असतो.आयुष्याच्या पटलावरचे काही ठसे मात्र कधीच मिटत नाहीत आणि अस्वस्थ अशा मनाला नेहमीच एक प्रश्न विचारतात की, आयुष्यात बदल इतके महत्वाचेच असतात का...? कधीकाळी आपल्याला सर्वात प्रिय असणा-या व्यक्तीला किँवा वास्तुला कायमचा निरोप देण्याची वेळ आपल्यावरच का यावी...?? आपल आयुष्य आपल्याला कायमस्वरुपी हव्या त्या व्यक्तीसोबत हव तस का जगता येत नाही...???
विचाराअंती एवढच उत्तर मिळत की आयुष्यात खुप उंच भरारी घ्यायची असेल तर बदल हे आवश्यकच असतात. कायमस्वरुपीत तलावात पोहुन स्वतःचे खरे अस्तित्व नाही दाखवता येत. जगाच्या स्पर्धेत आपण कोठे आहोत हे जाणुन घ्यायचे असेल तर तलावाला कायमचा निरोप देऊन कधी ना कधी समुद्रात उडी मारावीच लागते. अगदी चिमणीचाही आपल्या पिल्लांवर भरपुर जीव असतो पण ठराविक काळानंतर काळजावर दगड ठेवुन ती सुद्धा आपल्या पिल्लांना घरट्याबाहेर फेकुनच देते. त्याशिवाय पिल्लांना पंखांच्या बळाचे सामर्थ्य समजणार तरी कसे...?टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नसत अगदी त्याप्रमाणेच या जगात जगण्यासाठी चाललेल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकुन राहायच असेल तर ह्रुदय दगडाचच असाव लागत. निसर्गात आढळणा-या दगडालाही पाझर फुटायची मुभा असते पण 'दगडाच्या ह्रुदयाला' पाझर फुटला तर तो तुम्हाला कमजोर बनवतो, तुमच्या मार्गातील अडथळा बनु शकतो. आयुष्यात सुख, दुःख, प्रेम, विरह सगळ सगळ काही सहन कराव लागत. परमेश्वराने प्रत्येक माणसासमोर ठेवलेल जगातील सगळ्यात मोठ कोड हे आयुष्यच असत आणि आयुष्याच्या या खेळाचे नियम अनुभवताना एके दिवशी आयुष्यच आपल्याला जगायला शिकवत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा