रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

गणेशोत्सवातील विक्रुती..

गणेशोत्सव आणि महाराष्ट्राचे नाते खुप जुने आहे. ब्रिटीशांच्या 'फोडा आणि राज्य करा' या नितीमुळे विखुरलेल्या भारतीय समाजाचे एकत्रीकरण व्हावे आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पाठबळ मिळावे, या उदात्त हेतुने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. सणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे लोक एकत्रित आल्याने भारतीयांच्या स्वभावात भिनलेला जातीभेद काही प्रमाणात दुर होण्यास मदत होईल, अशी टिळकांची अपेक्षा होती. पुढील काळात घराघरात गणपतीच्या मुर्तीची स्थापना होऊ लागल्याने नोकरीच्या निमित्ताने इतरत्र विखुरलेले घरातील लोक या कालावधीत एकत्रित येऊन गणेशोत्सव आनंदात साजरा करु लागले. अगदी आताच्या धावपळीच्या युगात देखील गणपती बाप्पा घराघरात विराजमान झालेले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सवाचे वेड अजुनही कमी झालेले नाही. फक्त काळाच्या ओघात सार्वजनिक गणेशोत्सावात अनेक प्रकारच्या विक्रुतीँनी जन्म घेतलाय. आता त्या विक्रुतीँची मुळे इतकी घट्ट रोवली गेली आहेत की गणेशोत्सवाचा मुळ उद्देशच भरकटु लागलाय.
चार वर्षापुर्वी गणेशोत्सवादरम्यान मिरजेत झालेली दंगल कोणी विसरु शकेल का...? निमित्त होते अफझलखान वधाच्या पोस्टरचे...! शिवरायांनी दुष्ट अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला, हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. शिवरायांची ही शौर्यकथा ऐकल्यानंतर धर्माने हिँदु किँवा मुस्लिम असलेल्या कोणाही मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही मुठभर समाजकंटक आणि त्यांना पोसणारे राजकीय नेते यांना हे हिँदु-मुस्लीम ऐक्य मानवत नाही. नव्हे, मतांच्या राजकरणात त्यांना ते परवडणारेही नाही. अशाच दुष्ट लोकांनी अफजलखान वधाच्या पोस्टरमुळे मुस्लीमांच्या भावना दुखावल्या गेल्या अशा बोँबा मारल्या. काही मुस्लिम समाजकंटकांना सांगुन गणपतीच्या समोर ताटात मोदकांऐवजी मटणाच्या तुकड्यांचा नैवेद्य ठेवला आणि दंगल पेटली. गणेशोत्सवाच्या पवित्र काळात तीर्थाच्या जागी सर्वत्र रक्ताचा अभिषेक झाला. कुठे सर्वधर्मीय लोकांचे एकत्रीकरण व्हावे म्हणुन सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करणारे लोकमान्य टिळक आणि कुठे त्याच गणेशोत्सवात जाणीवपुर्वक हिँदु-मुस्लीम दंगली पेटवणारे महाराष्ट्रातील नेतेमंडळी..!
टिळकांच्या महाराष्ट्रात असे तथाकथित 'अजाणते राजे' निर्माण व्हावेत, हे या मातीचच दुर्देव म्हणाव लागेल.
मुंबई, पुणे, कोल्हापुर यांसारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यासाठी गल्लीबोळात मंडळे स्थापन झाली आहेत. सण म्हटल्यावर स्पर्धेचा प्रश्न येतोच कुठे...? तुमचा देव तोच आमचा देव आणि अगदीच स्पर्धा करायचीच म्हटली तर ती निकोप असायला हवी. मात्र या मंडळामंडळांमधील वाद विकोपाला गेले आहेत की गणपतीच्या मुर्तीचा आकार, सजावट, गणेश विसर्जन मिरवणुकीतील मान-सन्मान अशा शुल्लक कारणांवरुन वाद निर्माण होताना दिसतात. पाच वर्षापुर्वी कोल्हापुरमध्ये गणपती विसर्जनाची मिरवणुक चालु असतानाच एका मंडळातील सदस्याने अन्य मंडळाच्या सदस्याचा सर्वाँसमक्ष चाकुने भोकसुन खुन पाडला.

आज गणेशोत्सवातील वादाच्या निमित्ताने एकमेकांचा खुन पाडण्याइतपत तुमची मजल पोहोचतेच कशी...? सार्वजनिक गणेशोत्सव काळात महाराष्ट्रातील लोकांचे हे खुनशी वर्तन पाहुन तो सुरु करणा-या लोकमान्य टिळकांचा आत्मा तिकडे स्वर्गात तडफडत असेल. टिळकांचा विचार सोडुनच द्या हो पण ज्या गणपतीची एवढ्या श्रद्धेने, आस्थेने तुम्ही पुजा करता त्या गणपतीला तरी तुमचे हे वर्तन आवडत असेल का...??

आता विषय वर्तनाचाच आहे मग गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीत डाँल्बीच्या तालावर बिभित्सतेचे जे किळसवाणे प्रदर्शन घडवले जाते ते विसरुन कसे चालेल...?
'गजानना श्री गणराया', 'गणनायकाय' अशी भक्तीमय गीते सणाच्या कालावधीत कुठे गडबच होतात आणि ऐन विसर्जनाच्या दिवशी 'मुन्नी बदनाम हुई', 'शीला की जवानी', 'हलकट जवानी' अशा एकापेक्षा एक कर्कश गाण्यांवर दारु पिऊन बेभान नाचणारे तरुण नजरेस पडतात. हीच का आपली भारतीय संस्क्रुती...? पुण्यासारख्या शहरात 24-24 तास विसर्जनाच्या मिरवणुका काढुन, वाहतुकीच्या समस्या निर्माण करुन, वेळेत कामावर जाणा-या लोकांना नाहक त्रास दिला जातो. एखाद्या जलाशयात गणपतीँच्या भव्य मुर्तीचे विसर्जन केले जाते. गणपती रंगवण्यासाठी वापरलेले रंग बहुधा क्रुत्रिम आणि विषारी असल्याने जलप्रदुषण होऊन पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. आपण ज्या जलाशयात गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करत आहोत तेथील पाणी माणसे किँवा अन्य प्राणी आपली तहान भागवण्यासाठी करत असतील याचे भान असु द्यावे. निर्माल्य थेट तलावात न टाकता 'निर्माल्यकक्षात' टाकल्याने आपण पाण्याचे प्रदुषण टाळु शकतो.2
'इकोफ्रेँडली गणपती' मुर्त्या आता बाजारात उपलब्ध आहेत. पुढील काळात त्यांचा वापर केल्यास आपण ब-याच प्रमाणात पर्यावरणाची हानी टाळु शकतो. पण भव्यतेची आणि चकाचकपणाची सवय अंगवळणी पडलेले आपले मन आपल्याला इकोफ्रेँडली गणपती मुर्ती वापरण्यास मज्जाव करत राहिल.
गणपती हे हिँदुंचे आराध्य दैवत आहे आणि या लेखातुन कोणाच्या श्रद्धेला दुखावण्याचा अजिबात हेतु नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे. फक्त तो नीतीमत्ता वेशीवर टांगुन साजरा न करता, पारंपारिक पद्धतीने आणि भक्तिमय मार्गाने साजरा व्हावा एवढी एकच माफक अपेक्षा आहे. आपल्या श्रद्धेचा इतरांना त्रास होऊ नये याची आपल्याला जाणीव असावी. सगळेच नियम कायद्याच्या चौकडीत बसवुन चालत नाही. निसर्गाचेही काही अलिखित नियम असतात आणि त्यांचे पालन करणे हे माणुसकीला धरुन आहे. बुद्धीची देवता गणपती तुम्हा सगळ्यांना सुबुद्धी देवो अशीच प्रार्थना त्या गजाननाकडे करतो आणि इथेच थांबतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा