रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

तत्वांपलीकडील प्रेम...

आपल आयुष्य विशिष्ट तत्वांशी प्रामाणिक राहुन जगणा-या माणसांना समाज नेहमीच आदरयुक्त नजरेने पाहतो पण सगळेच तत्ववादी लोक वैयक्तिक आयुष्यात यशस्वी किँवा सुखी होतातच असे नाही. कित्येकदा तत्वांनी तडजोड न केल्याने त्यांचे आयुष्य तारेवरच्या कसरतीचा खेळ बनुन जाते आणि कित्येकदा या तत्वांच्या खेळात त्यांना अनेक गोष्टी गमवाव्या लागतात. एवढेच काय तर काही वेळा कधीकाळी जीव ओवाळुन टाकत प्रेम केलेली आपली माणसे देखील त्यामुळे दुर जातात. सुखाचे क्षण पाहता पाहता आटतात आणि हाती येते ते वाळवंटासम शुष्क बनलेले रखरखीत आयुष्य...!आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तत्वांना तळहातावरील फोडापेक्षा जास्त जपणा-या राजची...! माझ्या कथेचा नायक राज एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला. लहानपणापासुनच राजला नाटक, सिनेमांची खुप आवड होती. तो शाळेत असल्यापासुनच नाटकात अभिनय करु लागला. कालांतराने त्याला अभिनयापेक्षा दिग्दर्शन करणे अधिक आव्हानात्मक वाटु लागले आणि पुढील आयुष्यात आपण एक चांगला दिग्दर्शक बनुन दाखवायचे त्याने मनाशी पक्के केले. राजचे काका सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांचे वाचन दांडगे होते. त्यांच्या सहवासात राहुन राजही अनेक प्रकारची पुस्तके अधाशासारखा वाचु लागला. परिणामी सामाजिक प्रश्नांशी तो नकळत जोडला जावु लागला. त्याचे मन आजुबाजुच्या समाजाप्रती संवेदनशील बनु लागले. एकीकडे सर्वोत्क्रुष्ट दिग्दर्शक बनायचे ध्येय आणि दुसरीकडे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची तीव्र इच्छा, अशा दुहेरी कत्रीत राज अडकला.शेवटी सुवर्णमध्य काढताना दिग्दर्शक बनुन, सामाजिक विषयांवरील कलाक्रुती दिग्दर्शित करुन, त्याद्वारे विविध सामाजिक प्रश्नांना समाजासमोर आणायचा त्याने चंग बांधला. काँलेज जीवनात शिक्षणाबरोबरच कला अकादमीत त्याने दिग्दर्शनाचे धडे गिरवले. काँलेजच्या शेवटच्या वर्षात राजने दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आणि राज ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. राजचा स्वभाव फारच एककल्ली होता आणि त्यामुळेच त्याच्या मित्रमैत्रीणीँची संख्या फारच कमी होती. तो सहसा मित्रांमध्ये मिसळत नसे. त्याच्या मोजक्याच मैत्रीणीँपैकी एक असलेल्या राधिकावर त्याचे मनापासुन प्रेम होते. राधिकालाही राज खुप आवडायचा पण राधिकाचा स्वभाव राजच्या नेमका विरुद्ध होता. बाँलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होण्यासाठी ती काहीपण करायला तयार होती.अगदी सर्वोत्तम अभिनय जमत नसला तरी आकर्षक देहयष्टी, गोरा रंग अशा बाह्यसौँदर्यामुळे बाँलिवुडमध्ये बस्तान बसवणे राधिकाला अजिबात कठीण नव्हते. राज आणि राधिका दोघांचेही ध्येय एकाच क्षेत्राशी संबंधित असल्याने प्रेमयुगुलांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांची खुप काळजी घ्यायचे, प्रेम करायचे आणि एकंदरीतच राजा-राणीचा सुखी संसार सुरु होता. इकडे करियरची अवस्था मात्र परस्परविरोधी होती. राजने मनाशी ठरवल्याप्रमाणेच सामाजिक आणि राजकीय विषयांशी संबंधित चित्रपट दिग्दर्शित केले. अपेक्षेप्रमाणे समीक्षकांची वाहवा मिळवली, त्याच्या एका चित्रपटाला तर मानाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला मात्र मायबाप समजल्या जाणा-या प्रेक्षकांनी अशा गंभीर विषयाकडे पाठ फिरवली. राजच्या चित्रपटांचे शो असलेली थिएटरे ओस पडु लागली आणि निर्माते राजच्या चित्रपटावर पैसे लावायला तयार होईनात.राधिकाने हलकेफुलके विषय हाताळत एक नटी म्हणुन विषय हाताळत सिनेस्रुष्टीत चांगला जम बसवला. आता अन्य अभिनेत्रीँना मात देत जास्तीत जास्त चित्रपट मिळवायचे असतील तर निर्मात्यांच्या मागणीप्रमाणे चित्रपटात भडक प्रणय द्रुश्ये द्यावी लागतील हे एव्हाना राधिकाच्या लक्षात आले होते. राधिका स्वतः प्रोफेशनल होती. करियर आणि संसार या वेगळ्या गोष्टी एकत्र करु नये या आधुनिक मताची होती. पडद्यावर दुस-या नटांसोबत प्रणयद्रुश्ये दिल्याने ख-या आयुष्यातील नवरा-बायकोच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही कारण तिचा नवरा राज चित्रपटस्रुष्टीतच काम करत असल्याने तो नक्कीच प्रोफेशनल असणार अशी तिची धारणा होती.राज एकविसाव्या शतकात वावरत असला तरी त्याच्या मनावर विसाव्या शतकातील विचारांचा पगडा जास्त होता. करियर म्हणुन पडद्यावर बायकोने दुस-या पुरुषाच्या शरीराशी केलेली लगट त्याच्या तत्वात बसत नव्हती. दुसरीकडे एकाच क्षेत्रात असुनही बायको यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आणि स्वतः मात्र अपयशी दिग्दर्शक ही सल राजच्या मनात कुठेतरी बोचत होती. प्रणयद्रुश्य असलेल्या चित्रपटात काम न करण्याचा आदेश त्याने राधिकाला दिला. प्रथमतः राधिकाने राजचा हात हातात घेऊन त्याला समजुतदारपणे विचारले की, "पडद्यावरील प्रणय पाहुन तुझ्या मनात संशय निर्माण व्हवा एवढे आपले प्रेम कमकुवत झाले का...? तुझ्या लेखी तुझी बायको व्याभिचारी आहे का...??" राधिकाच्या या उद्गारांनी हळवा झालेला राज तिला जवळ घेत म्हणाला, "इकडे प्रश्न प्रेमाचा नाही तर तत्वांचा आहे. माझ आजही तुझ्यावर खुप प्रेम आहे पण प्रेमासाठी तत्वांशी तडजोड करण मला जमणार नाही. माझ्या बायकोला माझ्याखेरीज अन्य पुरुषाने केलेला स्पर्श मला खपणार नाही. तु चित्रपटात काम करणे त्वरित बंद कर. या इंडस्ट्रीत एका स्त्रीकडे फक्त कामवासना शमवण्याची वस्तु एवढ्याच संकुचित नजरेने बघितल जात."हताश झालेली राधिका राजला म्हणाली की, "संकुचित द्रुष्टीकोन चित्रपटस्रुष्टीचा नव्हे तर तुमचा स्वतः आहे. तत्वांची ढाल पुढे करुन तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहात. नात्यामध्ये जेव्हा संशयाला जागा निर्माण होते तेव्हा विश्वास कधीचाच संपलेला असतो आणि विश्वास नसलेल नात टिकवण्यापेक्षा तोडलेल केव्हाही चांगल...! मी चित्रपटात अभिनेत्री म्हणुन काम करणार आहे. तुम्ही दिग्दर्शक म्हणुन अपयशी झालात आणि म्हणुनच माझ करियर संपवु पाहताय. त्यापेक्षा आपण घटस्फोट घेऊन एकमेकांपासुन कायमचे दुर जाऊ."

रडक्या आवाजात शेवटचे खडे बोल सुनावुन राधिकाने राजचे घर सोडले. एकमेकांवर प्रेम करणारे नवरा-बायको करियर आणि संसार या गोष्टीँची सांगड घालु शकत नसल्याने लग्नाचे पवित्र नाते घटस्फोटाचे लेबल लावुन कोर्टाच्या पायरीपर्यँत घेऊन आले. घटस्फोटानंतर राधिकाने आपले मन कामात गुंतवुन स्वतःला सावरले खरे पण राधिकाच्या विरहानंतर राज मानसिकद्रुष्ट्या खचु लागला. निर्मात्यांनी राजच्या चित्रपटास पैसे पुरवण्यास नकार दिल्याने राजला पुढची 4-5 वर्ष चित्रपट मिळेनासे झाले आणि तो आर्थिकद्रुष्ट्या देशोधडीला लागला.एकीकडे अपयशाचे दुष्टचक्र तर दुसरीकडे बायकोच्या विरहाने आलेला एकाकीपणा वयाच्या चाळीशीत राम सहन करु शकला नाही. तो दारु, सिगारेटच्या आहारी जाऊ लागला. घटस्फोटाच्या केसची कोर्टात तारीख असायची तेव्हा राज-राधिका समोरासमोर यायचे पण नजरेला नजर मिळवणे टाळत असत. नात शिल्लक नसल तरी राधिकाच्या मनात राजविषयीच प्रेम अजुनही तसच होत. राजची हालत तिला पाहवेना. आपल्या ओळखीच्या निर्मात्याला गळ घालुन तिने राजला नवीन फिल्म मिळवुन दिली. आपल्या बायकोमुळे मिळालेली फिल्म स्वाभिमानी राज कोणत्याही परिस्थितीत करणार नाही याची खात्री असल्याने तिने निर्मात्याला स्वतःच नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली.रखरखत्या उन्हात अचानक पावसाची थंड धार येऊन अनपेक्षित गारवा मिळावा अशी राजच्या मनाची अवस्था झाली. नवीन फिल्म मिळाल्याने राज पुन्हा एकदा नवीन उत्साहाने कामाला लागला. सामाजिक विषय आपल्या पद्धतीने हाताळणा-या एका लढवय्या टीव्ही पत्रकार तरुणीची ती गोष्ट होती. फिल्मसाठी एका तरुण नटीची गरज होती आणि त्यासाठी राजने आँडिशन घ्यायचे ठरवले. जवळपास 50 ते 75 तरुणीँची काळजीपुर्वक आँडिशन घेतल्यानंतर राजला भावली ती साक्षी...! साक्षीच्या डोळ्यात एक वेगळेच तेज होते. तिचा चेहरा बोलका होता. शब्दाशब्दात अंगार होता. राजने तिची निवड करुन तिला पुढील बोलणीसाठी आपल्या केबिनमध्ये बोलवले.एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाशी एकांतात भेटुन बोलायची ही काही साक्षीची पहिली वेळ नव्हती. या अगोदरही साक्षी 4-5 वेळा आँडिशनमध्ये निवडली गेली होती आणि पुढे जाऊन कास्टिँग काऊचच्या घाणेरड्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. सुरुवातीला एकंदरीतच या प्रकाराबद्दल घ्रुणा वाटत असल्याने तिने चित्रपटाच्या आँफर धुडकारने पसंत केले होते मात्र आता दिग्दर्शकाचे मुलाखतीवेळी एका नटीच्या शरीरावर वखवखलेल्या नजरेने पाहणे तिला परिचयाचे झाले होते. कास्टिँग काऊच शिवाय चित्रपटात प्रवेश मिळुच शकत नाही या निष्कर्षाप्रत ती पोहोचली होती. यावेळच्या चित्रपटाचे कथानकही स्त्रीप्रधान असल्याने आपल्या भुमिकेला प्रसिद्धी मिळेल याची तिला खात्री होती आणि त्यासाठीच तिने कास्टिँग काऊचला सामोरे जायचे ठरवले. मुलाखतीवेळी राज एकटाच होता पण साक्षीला त्याची नजर इतर दिग्दर्शँकाप्रमाणे अजिबात नाही वाटली. त्या नजरेतच एक विश्वास होता, प्रामाणिकपणा होता आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास होता.राजने साक्षीला तिचा पुर्ण रोल समजावुन सांगितला. तिचा अभिनय राजच्या करियरकरीता किँवा एकंदरीतच समाजातील अपप्रव्रुत्तीँविरोधातला आवाज तीव्र करण्याकरीता किती महत्वाचा आहे याची जाणीव करुन दिली आणि दोनच दिवसात चित्रपटाच्या शुटिँगला उपस्थित राहण्यास सांगितले. आँफिसमध्ये अन्य कोणीही उपस्थित नाही, समोर 21 वर्षाची गोरीपान तरुणी आणि राजने परिस्थितीचा अजिबात गैरफायदा घेतला नाही, याचे साक्षीला आश्चर्यच वाटले आणि राजविषयी कमालीचे कुतुहल निर्माण झाले. राजच्या टेबलवर समोरच त्याने ठेवलेला त्याच्या बायकोचा फोटो त्याचे बायकोप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा दर्शवत होता. आताच्या जमान्यात राजसारखे दिग्दर्शक अस्तित्वात आहेत यावर तिचा काही क्षण विश्वासच बसेना.आपल्याला देखील राजसारखा प्रामाणिक नवरा मिळावा अशी मनातल्या मनात प्रार्थना करुन ती घरी गेली. शुटिँग सुरु झाल्यानंतर थोड्याच दिवसात साक्षीला समजले की राजच्या बायकोने घटस्फोटासाठी कोर्टात केस केली आहे. राजच्या बायकोला दुर्देवी म्हणाव की मुर्ख हेच तिला समजेना. राजसारखा नवरा दुस-या कोणाला शोधुन सापडणार नाही तिथे राजची बायको त्याच्याकडे घटस्फोट कसा काय मागु शकते...? पुढील काळात कामाच्या निमित्ताने साक्षी आणि राजची मैत्री वाढु लागली तेव्हा तिने त्याला यासंदर्भात विचारले. त्यावेळी आपल्या पत्नीला अजिबात दोष न देता घटस्फोटासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असल्याचे राजने नम्रपणे कबुल केले. घटस्फोटानंतरही आपल्या बायकोचे गोडवे गाणा-या राजचा साक्षीला हेवा वाटु लागला.राजविषयी तिच्या मनात असलेला आदर द्विगुणीत झाला. या सर्व प्रक्रियेत ती राजकडे आकर्षिली जात होती. तिला राजचा सहवास हवाहवासा वाटु लागला होता. राजच दिग्दर्शनातील अदभुत कौशल्य या आकर्षणात आणखीनच भर टाकायच. शुटिँग संपल्यानंतरही तासनतास त्या दोघांच्या गप्पा रंगु लागल्या. राधिकाच्या जाण्यानंतर राजच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी साक्षीच्या येण्याने भरुन येऊ लागली. एव्हाना राजला साक्षी आवडु लागली होती पण तो स्वतःशीच भांडत होता. मन आणि बुद्धीमधील वाद त्याला भंडावुन सोडु लागला. साक्षीशी प्रेम केल तर आपण राधिकेशी केलेल्या प्रेमाशी बेईमानी करत आहोत अस राजच मन त्याला सांगत होत. तर दुसरीकडे जी राधिका आता आयुष्यातच नाही तिच्यासाठी थांबुन काय उपयोग असा इशारा बुद्धी देत होती. राजला आपले वय चाळीशीच्या घरात पोहोचल्याचे ठाऊक असल्याने 21 वर्षाच्या साक्षीला प्रपोज तरी कसे करावे, हे उमजत नव्हते. राजच्या नजरेत साक्षीलाही आपल्याप्रती असणा-या प्रेमाच्या भावना दिसत होत्या पण राजसारखा तत्वांशी बांधला गेलेला माणुस ते व्यक्त करु शकणार नाही याची जाणीव तिला झाली. शेवटी साक्षीने स्वतःच राजला प्रपोज करायच नक्की केल.एकदा असेच शुटिँग संपवुन राज आणि साक्षी रोजच्या प्रमाणे आँफिसमध्ये रात्री गप्पा मारत बसलेले असताना अचानक आभाळात ढग दाटुन आले आणि अनागोँदीचा पाऊस पडु लागला. रस्ते पाण्याने तुडुंब भरुन गेल्याने वाहतुक ठप्प झाली. आता आँफिसमध्ये रात्र काढण्यावाचुन दोघांसमोर पर्याय नव्हता. काही वेळानेच वीजांचा कडकडाट झाला आणि त्याच क्षणी आँफिसमधील लाईट गडब झाली. अंधाराला घाबरुन साक्षी राजच्या जवळ जाऊन बसली. काही वेळाने साक्षीने राजचा हात हातात घेतला आणि आपल्या प्रेमाची कबुली देताना म्हटले, "तुझ्यावर गेले कित्येक दिवस मी प्रेम करतेय पण आजवर तुला कधी सांगायची संधी नाही भेटली. तुझ्यासारख्या तत्वांशी प्रामाणिक राहणा-याची सहचारिणी बनुन राहण मला नक्कीच आवडेल." एवढ सांगुन साक्षीने लगेच राजला कडकडुन मिठी मारली. आजपर्यँत आपली पत्नी राधिका सोडुन कोणाही परस्त्रीला राजने कधी साधा स्पर्श देखील केला नव्हता. त्यामुळे साक्षीच्या त्या अनपेक्षित मिठीनंतर कसे रिअँक्ट व्हावे हेच त्याला कळत नव्हते.इतकी सुंदर मुलगी एका काळोख्या रात्रीत मिठीत असताना भावनांवर कंट्रोल करायला राज कोणी साधु संत नक्कीच नव्हता. शिवाय राज आता साक्षीवर प्रेमदेखील करु लागला होता. साक्षीने तर स्वतःला केव्हाच राजच्या अधीन केले होते. आता फक्त डोळे मिटुन राजचे ओठ ओठांना केव्हा स्पर्श करतात त्या रोमांचित क्षणाची ती वाट पाहत होती. तो नाजुक क्षण हाताळताना इकडे राजच्या मनात विचारांनी धुडगुस घातला होता. एका अनाहुत क्षणी पाय घसरायला साक्षी वयाने लहान होती पण राजचे तसे नव्हते. साक्षीच्या कोवळ्या वयात पुरुषांच्या शरीराविषयी आकर्षणाचा गैरफायदा घेऊन राजने त्या रात्री साक्षीशी शरीरसंबंध ठेवले असते तर ती फसवणुकच ठरली असती. कोणाचीही फसवणुक करणे राजसारख्या तत्ववादी पुरुषाला शोभणारे नव्हते. एका तरुण मुलीच्या आयुष्याशी खेळायचा आपल्याला मुळीच अधिकार नाही असे स्वतःला ठामपणे बजावत राज साक्षीपासुन अलग झाला.राजच्या स्पर्शासाठी, पहिल्या चुंबनासाठी आसुसलेली साक्षी हिरमुसल्या तोँडाने राजकडे पाहु लागली. साक्षीच्या प्रेमाने भारावुन जात गहिवरलेला राज डोळ्यात अश्रु आणुन साक्षीला म्हणाला की, "तु माझ्यावर प्रेम करतेस हे माझ सौभाग्य आहे पण आपल्या वयातील अंतर खुप असल्याने लग्न करण चुकीच ठरेल. माझ्याविषयी आकर्षण किँवा पहिल प्रेम असल्यामुळे तुझा जीव गुंतत गेला असेल परंतु तुझ्या भविष्यासाठी ते योग्य नाही. या वयात फारशी समज नसल्याने तुझा तोल ढासळतोय. स्वतःला लवकर सावर आणि तुला साजेसा ठरेल अशा तुझ्या वयाच्या तरुणाशी लग्न करा. तुझ्यासारख्या सुंदर मुलीशी लग्न करायला कितीतरी मुले एका पायावर तयार होतील."राजच्या या नकारार्थी उत्तरानंतर साक्षी ढसाढसा रडु लागली. "प्रेम करण्यासाठी वयाच बंधन आवश्यकच आहे का...? तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्यापेक्षा रुपाने सुंदर असणारे कितीतरी तरुण माझ्याशी लग्न करायला तयार होतीलही पण त्यातील किती जण तुझ्याएवढे मनाने स्वच्छ असतील...?? कितीजण काळोख्या रात्री आपल्या मिठीत आलेल्या सुंदर मुलीला तिच्या भविष्याखातर संभोगाशिवाय दुर जाऊ देतील...??? राज, तुझ वय काय किँवा तु दिसतोस कसा यापेक्षा तुझ्या नजरेत जो प्रामाणिकपणा आहे त्यावरच मी माझा जीव ओवाळुन टाकलाय. जर खरच तुझ माझ्यावर प्रेम नसेल तर ती नजर फक्त एकदा माझ्या नजरेला मिळवुन त्याची कबुली दे."राज साक्षीला जवळ घेऊन म्हणाला, "हे बघ साक्षी, मी एक घटस्फोटित तरुण आहे. तुझ्यासारख्या सुंदर मुलीने माझ्याशी लग्न केले तर समाज काय म्हणेल...?"

यावर उत्तर देताना साक्षी बोलली की, "समाज काय म्हणतो यापेक्षा मला स्वतःला काय वाटते ते महत्वाचे आहे. आजवर असे कित्येक तरुण मी पाहिलेय की ज्यांना एकाच वेळी अनेक महिलांशी संबंध ठेवताना पराकोटीचा आनंद होतो. असे लोक बायकोशी कितीही वेळा शरीरसंबंध ठेवला तरी कधीच तिचे होऊ शकत नाहीत आणि त्यांच्याशी लग्न करुन आपला पती फक्त आपलाच आहे या भ्रमात आयुष्यभर वावरण्यापेक्षा मी तुझ्याशी लग्न करेन. तुझ्या पुर्वीच्या बायकोशी तुझे नक्कीच शरीरसंबंध आले असतील पण जेव्हा आपण दोघे एकमेकांच्या मिठीत असु तेव्हा तु फक्त माझाच असशील याची मला खात्री आहे. तुझ्या होकाराची वाट बघत आयुष्यभर अविवाहित राहायला मी तयार आहे."साक्षीच्या या उत्तरावर राज निरुत्तर झाला. त्याला तिच्या बोलण्यातुन तिचे त्याच्याप्रती असणारे प्रेम जाणवले, तळमळ जाणवली. अशा परिस्थितीत शब्द सुचतच नसतात. त्याने तिला जोरात मिठी मारली. एकमेकांच्या मिठीत रडुन झाल्यानंतर दोघांनीही ओठांवर ओठ ठेवुन चुंबन घेतले, प्रेमाचा स्वीकार केला. आता चित्रपटाचे थोडेच काम बाकी राहिले होते आणि ते आटपुन लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतला. कितीही झाल तरी साक्षी आजच्या जमान्यात वावरणारी मुलगी होती. चित्रपटातील पुरुष सहकलाकरांना मैत्रीत्वाच्या नात्याने मिठी मारणे, गळ्यात गळे घालुन फिरणे तिच्यासाठी नाँर्मल होते. शुटिँगच्या सुरुवातीलाही तिचा स्वभाव असाच मनमिळावु होता पण त्यावेळी ती प्रेयसी नसुन फक्त मैत्रीण असल्याने राजला ते फारसे खटकत नव्हते. आता आपल्या प्रेयसीला मित्रांसोबत या अवस्थेत पाहुन राजमधील तत्ववादी जागा झाला. त्याला जेव्हा साक्षीचे वागणे सहन होईना झाले तेव्हा त्याने तिला जवळ घेतले आणि म्हणाला-"माझी वागणे योग्य की अयोग्य हे मला माहित नाही पण माझ्या प्रेयसीला किँवा बायकोला परपुरुषाने स्पर्श केला की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. माझी पहिली बायको तुझ्यासारखीच अभिनेत्री होती आणि प्रणयद्रुश्य समाविष्ट असलेले चित्रपट तिने नाकारावे एवढी एकच मागणी मी तिच्याकडे केली. या तात्विक हट्टापायीच आमच्यात कितीही प्रेम असले तरी आम्ही घटस्फोटापर्यँत येऊन पोहोचलो. योगायोगाने तुला देखील भविष्यात चांगली अभिनेत्री बनायच आहे आणि माझ्याशी लग्न केलस तर विनाकारण तुला तुझ्या स्वप्नावर पाणी सोडावे लागेल. पुढे जाऊन क्लेष करुन घटस्फोट घेत लग्न मोडण्यापेक्षा आपण अगोदरच लग्न केले नाही तर चांगले होईल. तुझ्यावर कितीही प्रेम असल तरी त्यासाठी माझ्या तत्वांशी मी नाही तडजोड करु शकत."त्यावर साक्षी राजला म्हणाली, "प्रेमात कोणा एकाला कुर्बानी द्यावीच लागते. माझ्यासाठी तुला तत्वांशी तडजोड करायची अजिबात गरज नाही. त्यापेक्षा आपल्या प्रेमाखातर मी माझ अभिनेत्री होण्याच स्वप्न सोडुन द्यायला तयार आहे. तुझ्याशिवाय आयुष्याचा विचार देखील मी करु शकत नाही. तु दिग्दर्शित केलेला माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल."

साक्षीचा त्याग पाहुन राजला स्वतःचीच लाज वाटली आणि रागपण आला. त्यानंतर काहीच दिवसात तो चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. राज आणि साक्षीवर पुरस्कारांची खैरात होऊ लागली. खर तर राजची पहिली बायको राधिकाने निर्मात्याला गळ घातल्याने राजला हा चित्रपट मिळाला होता. एका पुरस्कार सोहळ्याला राजचे कोडकौतुक करण्यासाठी राधिका आवर्जुन उपस्थित राहिली.त्याच पुरस्कार सोहळ्यात साक्षीला सर्वोत्तम अभिनेत्रीचे बक्षीस देताना अँकरने पहिल्याच चित्रपटात एवढे अभुतपुर्व यश मिळाल्यानंतर तिचा पुढचा चित्रपट कोणता असेल असा प्रश्न विचारला. त्यावर सर्वाँसमक्ष उत्तर देताना साक्षी म्हणाली, "मी राजवर मनापासुन प्रेम केलय. आम्ही दोघे लवकरच लग्न करतोय. लग्नानंतर मी चित्रपटात काम करु नये अशी राजची इच्छा आहे आणि त्याच इच्छेचा मान राखत मी यापुढे कोणताच चित्रपट करणार नाही. त्यांच्या प्रेमापुढे मला कोणतीच संपत्ती किँवा प्रसिद्धी कवडीमोल आहे."

साक्षीचे उत्तर ऐकुन प्रसिद्धिच्या मागे लागत, राजसारख्या नव-याला गमावुन आपण फार मोठी चुक केली याचा साक्षात्कार राधिकाला झाला. पुढील काळात तिने पैसा, मानमरातब सगळ काही मिळवल पण राजच्या प्रेमाला ती कायमची मुकली होती आणि त्यामुळेच इतक सार कमावुन आपण आपल सुखच गमावुन बसलो याचा पश्चाताप तिला आयुष्यभर सहन करावा लागला. साक्षीसारखा समजुतदारपणा दाखवत जर राजच्या आग्रहाखातर आपण चित्रपटांना रामराम केला असता तर आज राजच्या प्रेमावर आपला अधिकार असता, या भावनेने टचकन तिच्या डोळ्यात पाणी आले.नंतर मानाचा सर्वोत्क्रुष्ट दिग्दर्शक पुरस्कार राजला मिळाला त्यावेळी त्याने केलेल्या भाषणात म्हटले की, "लग्नानंतरही साक्षी चित्रपटात काम करतच राहणार. आजपर्यँत तत्व जपायच्या अट्टाहासात आपण ज्यांच्यावर मनापासुन प्रेम करतो त्यांच्याकरिता काही वेळा तत्वांमध्ये तडजोड करावीच लागते हे मी विसरुनच गेलो होतो. आज साक्षीने मला ख-या प्रेमाची आणि ते टिकवण्यासाठी कराव्या लागणा-या तडजोडीची जाणीव करुन दिली. याच तात्विक मतभेदांमुळे मी माझ पहिल प्रेम कायमस्वरुपी गमावल आहे पण देवाच्या क्रुपेने दुस-यांदा मिळालेल प्रेम गमावु इच्छित नाही. आज माझ्या पहिल्या पत्नीला या तत्वांमुळे जो मनःस्ताप सहन करावा लागला त्याबद्दल तिची सर्वाँसमक्ष माफी मागतो."

पुरस्कार सोहळ्यानंतर राधिकाने खास राज आणि साक्षीची भेट घेऊन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि डोळ्यात तरळत असलेले पाणी पदराने पुसत कधीकाळी जीवापाड प्रेम केलेल्या राजचा कायमस्वरुपी निरोप घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा