रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

खुज्या लोकांच्या, लांबलेल्या सावल्या...

5 डिसेँबर ,2011...! याच दिवशी वेँगुर्ल्यात लोकशाहीच्या अधःपतनाची सुरुवात झाली. वेँगुर्ला नगरपालिका निवडणुकीत राजकीय वैमनस्यातुन झालेल्या राड्याने इतके दिवस राजकीय दहशतवादाविरोधात लोकांच्या मनात धुमसत असणा-या ज्वालामुखीचा विस्फोट झाला. निवडुन आलेले उमेदवार फार मोठे कर्तुत्ववान नसले तरी ते फक्त दहशतवादाविरोधात उभे आहेत आणि त्यांना निवडुन दिलेच पाहिजे,या भावनेने लोकांनी मतदान केले. पुढील काळात सिँधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा सांगली आणि पुणे जिल्ह्यात दहशतवाद कसा जास्त आहे, हे पटवुन देण्याचे आटोकाट प्रयत्न नेतेमंडळीँनी केले पण दुस-यावर चिखलफेक करुन आपणाला स्वच्छ होता येत नाही, ही मुलभुत गोष्ट ते विसरले. सिँधुदुर्ग जिल्हा सुरुवातीपासुनच सभ्य, सुसंस्क्रुत लोकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे चोरी, दरोडे, बलात्कार यांचे प्रमाण इकडे मुळातच कमी आहे आणि म्हणुनच सांगली किँवा पुण्याशी तुलना करुन सिँधुदुर्गात दहशवाद नाही म्हणणे चुकीचे ठरेल. तुलना दोन समांतर गोष्टीँची होऊ शकते आणि इकडे विषय दहशतवादाचा नाही तर 'राजकीय दहशतवादा'चा आहे. राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांच्या क्रुपाशीर्वादाने जो दहशतवाद चालतो त्याला 'राजकीय दहशतवाद' म्हणतात आणि तुलना करायचीच असेल तर मधु दंडवते, नाथ पै यांच्या काळात सिँधुदुर्गात किती राडे किँवा राजकीय हत्या झाल्या आणि आताच्या काळात किती झाल्या, याची करा. तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल.
असो, तर वेँगुर्ला नगरपालिकेत लोकांनी धुडकारलेल्या पक्षाने, निवडुन आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी, काहीँना हाताशी धरत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आपल्या मर्जीतील नगराध्यक्ष बसवला. त्यानंतर त्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाची शहरात काढलेली मिरवणुक दहशतवादविरोधी मतदान केलेल्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होते. जनतेने दिलेल्या जनादेशाची, त्यांच्या विरोधी मताची, आम्हाला काडीचीही किँमत नाही आणि आमच्या विरुद्ध निवडुन आलेल्या विरोधी उमेदवारांशीही पुढे जाऊन समझौता करत आम्हाला हव्या असलेल्या सत्तेच्या चाव्या आम्ही मिळवु शकतो, हाच संदेश वेँगुर्ल्यातील जनतेला नगराध्यक्षपदाच्या निमित्ताने मिळाला होता. लोकशाहीतील हा किळसवाणा प्रकार लोकशाहीवर मनापासुन श्रद्धा असणा-या बाबु इनामदारांच्या जिव्हारी लागला आणि भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत इनामदारांनी आपल्या भावना तरुण भारत वर्तमानपत्रात शब्दाद्वारे व्यक्त केल्या. सिँधुदुर्गात लोकशाहीची कत्तलच करु पाहणा-याना सामान्यातील सामान्य माणसाने उघडपणे बोलणे कदापि मान्य नव्हते. मग काय खड्ड्यात गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ते नागरिकांना बहाल करणारे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान...!
दोनच महिन्यांपुर्वी डाँ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अम्रुतमहोत्सवानिमित्त आंबेडकरी विचारांचा गाढा अभ्यास करणा-यांनी कणकवलीत वक्तव्य केले होते की- "रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांनी राजकरणात घातलेले धुमशान पाहुन बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा तडफडत असेल." जर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्याच तत्वांचा विचार करायचे म्हटले तर मग संविधानाची पायमल्ली करत एका सामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी धिँड पाहुन बाबासाहेब आंबेडकर तडफडले नसतील का...? बाबासाहेब आंबेडकर खुप दुर राहिले पण सिँधुदुर्गची ओळख संपुर्ण देशात बँ.नाथ पै, मधु दंडवते यांसारख्या तत्वांचे पुजारी असलेल्या विद्वान नेत्यांचा मतदारसंघ अशी व्हायची. आज त्याच नाथ पै, दंडवतेँच्याच जिल्ह्यात एका व्रुद्धाची काढलेली धिँड पाहुन त्या दोन महान आत्म्यांचा 'आत्मा' लाखो वेळा मरण पावला असेल.
व्रुद्धांचा चरणस्पर्श करुन उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेणारी सिँधुदुर्गची संस्क्रुती, एका व्यथित व्रुद्धाला धिँड काढण्याइतपत कलुषित होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते पण आज या समाजकंटकांनी 'त्या' संस्क्रुतीचेच धिँडवडे उडवले आहेत. धिँड कोण काढतात आणि कशापायी काढतात याची तरी त्यांना जाणीव असायला हवी होती. आपल्या दिवाळखोर वागणुकीमुळे जे स्वतःच समाजासमोर नागवे झाले आहेत, ते दुस-या कोणाची धिँड काढुन त्याला काय नागव करणार...? एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा राजकीय आकसापोटी केलेला खुन परवडला कारण समोरची व्यक्ती त्याच क्षणी मरते, निदान पुढील परिणाम भोगण्यासाठी ती जिवंत तरी नसते पण आयुष्यभर आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलेल्या निरपराध व्यक्तीची जेव्हा व्रुद्धापकाळात तुम्ही विनाकारण धिँड काढता, तेव्हा त्या धिँडीतुन होणारी बदनामी त्यापेक्षाही भयानक असते. ते एक प्रकारचे मानसिक मरणच असते. त्या व्यक्तीचेच नव्हे तर त्याच्या परिवाराचेही तुम्ही मानसिक खच्चीकरण करता.
धिँडीच्या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सुसंस्क्रुत समजल्या जाणा-या सिँधुदुर्गात झुंडशाही बाळसे धरु लागली आहे आणि 'समजुतदारपणा' हा शब्दच कित्येकांच्या डिक्शनरीतुन लोप पावताना दिसतोय. दमबाजीने प्रश्न कधी सुटत नसतात, उलट ते वाढतात. समजुतदारपणा दाखवल्यानेच प्रश्न सुटु शकतात आणि हा समजुतदारपणा ज्याच्या अंगी आहे, तो जनावरांपेक्षा वेगळा आहे, म्हणुनच त्याला 'माणुस' म्हणतात, या माणुसकीच्या व्याख्येची माणसांमध्ये वावरणा-या जनावरांना जाणीव करुन देणे निकडीचे बनले आहे. तथाकथित विद्वांनांनी आपली लेखणी केव्हाचीच गहाण ठेवली आहे.सामान्य लोकही या समाजकंटकांना ही जाणीव करुन देण्यास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत आपण माणसांच्या वस्तीत राहतो का जिवंत मढ्यांमध्ये वावरतो, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. एका व्रुद्धावर होत असलेला अन्याय पाहुन जर आज आपण पुढाकार घेत त्याच्या बाजुने ठामपणे उभे राहणार नसु तर एक समाज म्हणुन आपण किती प्रगल्भ झालो आहोत, याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. संवेदनशीलता हरवत चाललेला समाज जिवंत लोकशाहीचे नक्कीच लक्षण नाही. जीवाच्या भीतीने अन्यायाविरुद्ध असेच गप्प राहिलात तर ही जीवघेणी शांतताच उद्या तुमचा कर्दनकाळ बनेल, यात वाद नाही. आज बाबु इनामदारांची धिँड काढली, उद्या त्यांच्या जागी तुमच्या-आमच्यापैकीच कोणीतरी असु शकतो, हे नेहमीच ध्यानात ठेवा. जिवंतपणेच मेलेली ही मढी विधानसभा-लोकसभा निवडणुकीपुरती तरी 'माणुस' बनुन माणुसकीच्या शत्रुविरुद्ध मतदान करतील आणि अमानवीपणे एका गरीब व्रुद्धाची विनाकारण धिँड काढुन सिँधुदुर्गात लोकशाहीचा खुन करु पाहणा-यांना त्यांची योग्य ती जागा दाखवतील, अशी अपेक्षा करतो. बाबु इनामदारांवरील पाशवी धिँडीची साक्ष म्हणुन 19 जुलै,2013 हा दिवस सिँधुदुर्गच्या इतिहासात नेहमीच 'काळा दिवस' म्हणुन गणला जाईल.
लेखाच्या शेवटी महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देत थांबतो-
"खुज्या लोकांच्या सावल्या जेव्हा मोठ्या व्हायला लागतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली असे समजावे."
मित्रहो, सिँधुदुर्गात खुज्या लोकांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढल्या आहेत की आता आपण अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत मात्र 'सिँधुदुर्गास्त' होऊ देणे आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा