रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

हो... मी विश्वंभर चौधरीँना भेटलोय...!

परवाचा दिवस तर माझ्यासाठी एखाद्या पहाटे पडलेल्या स्वप्नासारखा होता. पश्चिम घाट आणि पर्यावरण हे माझ्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचे विषय असल्याने आरती कुलकर्णी यांनी तयार केलेली "नात पश्चिम घाटाशी" ही डाँक्युमेँट्री पाहण्यासाठी प्रभादेवीला रचना संसदमध्ये गेलो. तिकडे पोहोचल्यावर समजले की फिल्मनंतर परिसंवाद आहे पण त्यात भाग कोण घेणार याची खरच कल्पना नव्हती. फिल्म सुरु व्हायला थोडाच अवधी शिल्लक असताना मान्यवरांचे आगमन झाले. पाहतो तर काय निखील वागळे, विश्वंभर चौधरी, भारतकुमार राऊत, प्रताप आसबे, अनिल शिदोरे, कुमार कदम असे अनेक मान्यवर एकामागोमाग एक हजर झाले. फिल्म सुरु झाल्यावर काही क्षणातच एबीपी माझाचे अँकर प्रसन्न जोशी यांचे देखील आगमन झाले. आमच्या घरात बाबांना आणि काकांना रात्रीच्या राजकीय चर्चा ऐकायची सवय असल्याने अगदी लहानपणापासुन या मंडळीँनी टीव्हीवर बघायचो. मात्र कोणतीही अपेक्षा नसताना अचानक या सर्व मंडळीँना प्रत्यक्ष पाहता आल्याने मी हळुच स्वतःला एक चिमटा काढुन हे स्वप्न तर नाही ना याची खात्री करुन घेतली.कालांतराने 50 मिनिटांची ती छोटी फिल्म सुरु झाली. फिल्म कसली तो तर एक अविस्मरणीय अनुभवच होता.
आजपर्यँत पर्यावरण, जंगलातल्या प्राण्यांचे आयुष्य याचा अनुभव फक्त नँशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, अँनिमल प्लँनेट सारख्या चँनेलवरच घेतला होता. आफ्रिकेतली जंगल पाहुन आम्ही आपले घरात बसुन व्वा व्वा करायचो.
म्हणतात ना, चंदनाच्या जंगलात राहणारे लोक जळावासाठी चंदनाच्या सुगंधी लाकडाचा उपयोग करतात कारण त्यांना चंदनाचे मोल कधी समजलेलेच नसते. तीच गत आपली आहे. आपण पश्चिम घाटात राहतो खरे पण आपल्या आजुबाजुला निसर्गाचा किती अमुल्य ठेवा आहे याच अजिबात भान नसत. नैसर्गिक सौँदर्याची पारख नसलेल्यांना मग क्रुत्रिम सौँदर्याची भुरळ पडते आणि अशा लोकांनाच 'लवासा' प्रकल्पाला भेट देण म्हणजे आपण कोणत्या तरी स्वर्गीय सुखात आहोत असा आभास होतो. लवासाला भेट देऊन त्याचा मोठेपणा सांगणा-यांना मी खात्रीशीरपणे सांगतो की त्यांनी आरती कुलकर्णीची फिल्म पुण्यात नक्की बघा. निसर्गाच्या अदभुत किमयेपुढे तुम्ही अवाक व्हाल आणि लवासासारख्या प्रकल्पांना पाठिँबा देऊन आपण नक्की काय गमावतो आहोत याची जाणीव तुम्हाला होईल.गोव्यात मायनिँगने निसर्गाची लावलेली वाताहात आरतीच्या टीमने अशा रितीने चित्रीत केली की उपस्थितांपैकी प्रत्येकजण अस्वस्थ झाला.
पुढे परिसंवादात निखील वागळेँनी लोकांच्या मनातील ही अस्वस्थता शब्दात मांडताना म्हटले की पश्चिम घाटाचा विध्वंस अशाच प्रकारे सुरु ठेवला तर सगळ काही भस्मसात होईल आणि ही फिल्म ऐतिहासिक पुरावा म्हणुन उरेल. राज्यकर्त्याँना निसर्गाची कोणतीही पर्वा नसलेल्या दळभद्री देशात आपण जगतोय हेच आपले दुर्देव म्हणावे लागेल.
पुढे विश्वंभर चौधरी आपल्या भाषणात म्हणाले की आरतीने पश्चिम घाटातील चांगल्या गोष्टी आणि समस्या समतोल पद्धतीने चित्रीत केले आहेत. फक्त पश्चिम घाटातील समस्याच चित्रीत केल्या असत्या तर ती विश्वंभर चौधरीँची फिल्म झाली असती. चौधरीँच्या या वक्तव्याला प्रेक्षकांनी हसुन दाद दिली. चौधरी म्हणाले, पश्चिम घाटाचा 'उपयोग' करुन घेण्याला कोणाचाच आक्षेप नाही पण आपण त्याचा 'उपभोग' घेतोय आणि ते चुकीचे आहे. त्यालाच आमचा विरोध आहेविश्वंभर चौधरीँना टीव्हीवरील चर्चाँमध्ये आपल डोक थंड ठेवुन, आक्रस्ताळेपणा न करता आपल मत मांडताना मी पाहिल होत. हल्लीच फेसबुकच्या व्हर्चुअल दुनियेत त्यांची ओळख देखील झाली होती. पुढच्या शनिवारी 19 आँक्टोबरला जैतापुर अणुप्रकल्पाला विरोध करण्याच्या निमित्ताने आम्ही भेटणार देखील होतो पण परमेश्वराने एक आठवडा अगोदरच अनपेक्षितपणे मला विश्वंभर चौधरीँना प्रत्यक्षात भेटण्याचे भाग्य प्राप्त करुन दिले.
विश्वंभर चौधरीँचे माझ्या आयुष्यातील स्थान फार वेगळे आहे आणि त्याची कारणेही तशीच आहेत. ज्यावेळी फेसबुकवर मी प्रवेश केला तेव्हा साधारण 20 वर्षाँचा होतो. राजकरण, समाजकरण यांच्याशी काडीचाही संबंध होता. विचार करण खुपच दुरची गोष्ट होती. 'हिँदुत्व' शब्दाची तोँड ओळख देखील नसताना माझी ओळख कट्टर हिँदुत्ववाद्यांशी झाली. त्यांच्याकडुन गांधीजीनी पाकिस्तानला 55 कोटी देऊन देशाला कसे लुबाडले, ते कसे देशद्रोही आणि हिँदुद्वेष्टे होते, त्यांना मुसलमानांचा कसा पुळका होता या गोष्टी ऐकल्या. त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवुन कळपातील मेँढरांप्रमाणे 'होय महाराजा' म्हणत मी देखील त्यांच्यासोबत शिव्या देऊ लागलो.त्या शिव्या देण्यात आपण आपल्या हिँदु धर्मासाठी फार मोठे कार्य करत आहोत असा एक वेगळाच आनंद दडलेला असायचा. नंतरच्या एक वर्षाच्या काळात मी थोडफार लिखाण करु लागलो होतो. त्या निमित्ताने विचारही करावा लागायचा. दरम्यानच्या काळात माझी काही गांधीवाद्यांशी ओळख झाली पण ते आपला मुद्दा अशा प्रकारे रेटायचे की गांधीँबद्दलचा द्वेष आणखी तीव्र व्हायचा. अजित पिँपळखेरे यांनी सर्वप्रथम हिँदुत्ववादी असुनही गांधीना शिव्या न घालता हिँदुत्व जपता येत याची जाणीव करुन दिलेली आणि नेमके त्याच वेळी विश्वंभर सरांशी माझी ओळख झाली.
खर तर माझ्यासारख्या फेसबुकवरच्या अर्धवट अनोळखी पोरासोबत गांधी या विषयाबद्दल संवाद साधण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. याअगोदर मी हिटलरच प्रोफाईल पिक्चर ठेवल म्हणुन मला मित्रयादीतुन काढुन टाकणारे अनेक विचारवंत मी पाहिले होते पण चौधरीँनी मला हिटलरसहीत मार्गदर्शन केल हे महत्वाचा...! त्यांनी सर्वप्रथम मला शेषराव मोरेँच पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. फाळणीबाबत गांधीना दोषी धरणारे हिँदुत्ववादी बांग्लादेश, पाकिस्तानी घुसखोरांबाबत तावातावाने बोलतात हा विरोधाभास समजावुन सांगितला.त्यानंतरही त्यांनी तुला गांधीजीना शिव्या द्यायच्या की नाहीत हे स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला विचार एवढच सांगितल आणि ते मला पटलही. इतर विचारवंतांप्रमाणे मी मोठा आणि माझाच मुद्दा योग्य अस सांगुन तो अजिबात लादला नाही. कदाचित समोरच्या माणसाच वय, मनःस्थिती आणि बौद्धिक कुवत समजावुन घेत त्याला आपला मुद्दा पटवुन देण्याच कसब चौधरीँकडे असाव...! त्यानंतर त्यांनी मी कोणताच वाद (ism) मानत नाही कारण ism मानुन तत्वांची मोठेपण मारणारे कुठे ना कुठे तत्वांशी खेळलेलेच आहेत त्यापेक्षा प्रत्येक ism मधील चांगल तेवढ घ्याव आणि बाकी सोडुन द्याव, हा आधुनिक विचार त्यांनी माझ्यापुढे ठेवला. त्यांचे ख-या अर्थाने सर्वसमावेशक असलेले विचार ऐकुन मी त्यांच्या विचारांचा चाहता बनलो. त्यासाठी मला कितीतरी हिँदुत्ववादी मित्रांच्या शिव्या खाव्या लागल्या पण आता कुठे मी स्वतः विचार करुन क्रुती करतोय याची जाणीव मला होऊ लागली होती.तर ही जाणीव करुन देणा-या किँवा माझा पुर्णपणे कायापालट करणा-या विश्वंभर चौधरीँना कार्यक्रमानंतर भेटण्यासाठी मी स्टेजवर गेलो. पहिल्यांदाच भेटताना थोडी भिती वाटत असल्याने दबक्या आवाजातच माझ नाव त्यांना सांगितले. नेहमीप्रमाणे चेह-यावर स्मितहास्य ठेवुन त्यांनी हस्तांदोलन करत माझ स्वागत केल. नंतर जैतापुरच्या आंदोलनाशी निगडीत असलेल्या माझ्या सहका-यांची मी विश्वंभर सरांना ओळख करुन दिली आणि पुढे अर्धा ते पाऊण तास आमच्या गप्पा रंगल्या.
अगदी नाँर्मल गप्पा मारतानाही त्यांचा प्रत्येक शब्द मनाच्या कोणत्या तरी कप्प्यात रेकाँर्ड करुन ठेवण्यासारखा असतो. आचार्य विनोबा भावेँच्या निःपक्ष, निस्वार्थ आणि निर्भयता या त्रिसुत्रीवर आपण काम करत असल्याचे चौधरी म्हणाले. सरकार बदलुन देशातील समस्या सुटणार नाहीत तर त्यासाठी व्यवस्था परिवर्तन करावे लागेल. सरकार बदलणे म्हणजे पालखीचे भोई बदलण्यासारखे आहे. तरुणांनी पुढील काळात जातीद्वेष किँवा धर्मद्वेष यात वेळ न दवडता Sustainable development कडे वळले पाहिजे. भाजी घेताना पाच रुपयांची घासाघीस करणारा भारतातील माणुस करोँडोँचे घोटाळे करणा-यांना काहीच बोलत नाही.याचाच अर्थ तो स्वार्थी नाही पण मुर्ख नक्कीच आहे. त्याला शहाण बनवण हेच आपल ध्येय असेल. कोणतीही क्रांती एका फटक्यात होत नसते तर त्याला खुप वेळ जावा लागतो. फक्त त्यासाठी प्रयत्न करण आपल्या हातात असत.
चौधरीँशी गप्पांची मैफल संपुच नये असे वाटत होते कारण त्या पाऊण तासात समाजात एक चांगला नागरिक बनुन वावरायचे असेल तर आपली वागणुक कशी असावी याची शिकवण त्यात होती. कितीही घाई असली तरी चौधरी समोरच्याचा मुद्दा त्याला मधेच न तोडता, शांतपणे ऐकुन घेतात. समाजात एक विशिष्ट स्थान मिळाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवुन अगदी सामान्यातील सामान्याशी आदराने कसे वागायचे हे चौधरीँच्या वागणुकीतुन शिकायला मिळते.
पुस्तकी ज्ञानापेक्षा हे ज्ञान खुप काही शिकवुन जाते.
मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की इतक्या लहान वयात थोड्या वेळाकरिता का होईना मला विश्वंभर चौधरीँचा सहवास मिळाला.पुढच्या काळात पेट्रोल, डिझेलचे साठे उरतील की नाही ते देवच जाणे पण विश्वंभर चौधरीँसारखी सामाजिक भान असलेली माणसे नक्कीच दिसणार नाहीत.
योगायोग म्हणायचा तर परवाच दांडियाची शेवटची रात्र असल्याने मुंबईत सगळीकडेच लाखांनी रुपये उकळुन ठुमका लगावणा-या बाँलिवुडमधील अप्सरा मुंबापुरीत अवतरल्या होत्या. त्यातच माझ्या भावाच्या मुलीला सुश्मिता सेनशी हस्तांदोलन करता आल म्हणुन ती एवढी खुश होती की विचारुच नका...!
त्यावेळी लगेचच मनात एक विचार येऊन गेला की पुढच्या पिढीची पसंत हिच राहिली तर या देशाच भवितव्य तरी काय उरणार...? आदर्शवादी माणसांचा दुष्काळ पडलेल्या त्या पुढच्या पिढीतील कोणीतरी पोरगा कधीतरी मला नक्कीच प्रश्न विचारेल की तु आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहिलेल्या व्यक्तीला कधी भेटला आहेस का...?
आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना मी सुद्धा अभिमानाने सांगु शकेन,

"हो... मी विश्वंभर चौधरीँना भेटलोय...!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा