शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

".... आणि कणकवली 'वैभव'मय झाल्याचा मिळाला 'संदेश'..!"सिँधुदुर्गात नारायण राणे ऐन भरात असतानाही कणकवली शहरात 'आवाज कुणाचा' या घोषणेनंतर 'संदेश पारकरांचा' म्हणणा-यांची संख्या जास्त असायची. त्यावेळी कणकवली-मालवण हा राणेँचा विधानसभा मतदारसंघ असुनही कणकवली शहरात मात्र संदेश समर्थकांची संख्या जास्त असायची. खर तर पारकरांचा राजकीय जन्म हाच मुळी राणेविरोधातुन झाला होता. एखादी व्यक्ती, मग ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो, तिच्या हाकेला ओ देत वेळप्रसंगी धावणारा नेता अशीच पारकरांची ख्याती होती आणि त्यामुळेच कणकवलीत त्यांचा जनाधार कायम राहिला. त्याच वेळी वैभव नाईकांचे नाव राणेविरोधक म्हणुनच पुढे येत होते पण संदेश पारकर कणकवलीत एखाद्या राजकीय प्रस्थाप्रमाणे असल्याने 'कणकवली संदेशची' आणि 'संदेश कणकवलीचा' अशी आख्यायिका सर्वत्र पसरत राहिली.
2005 मध्ये शिवसेनेत असणा-या राणेँनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबरोबर वैभव नाईक आपल्या कार्यकर्त्याँना घेऊन शिवसेनेत डेरेदाखल झाले. राणेँशी तडजोड करत काँग्रेसमध्ये न थांबण्याच्या त्यांच्या क्रुतीमुळे 'राणेविरोधक' या वैभवच्या प्रतिमेला भक्कम पाठबळ आणि चालना मिळाली.दुसरीकडे दिपक केसरकरांशी असलेले वैर आणि पक्षांतर्गत कलहात संदेश पारकरांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होऊ लागली. पारकरांसमोर काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे असे चार पर्याय होते. यातील शिवसेनेत वैभव नाईक सुरुवातीपासुनच कार्यरत असल्याने एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नव्हत्या. मनसे नवखा पक्ष असल्याने त्यात पारकरांना हवी असलेली सत्तास्थाने त्यांना लवकरात लवकर मिळाली नसती पण एक कुशल संघटक असल्याने चांगलाच वाव होता. भाजप मधील प्रवेश पारकरांसाठी योग्य ठरला असता कारण राणेँना म्हणावा तसा विरोध करता न आल्याने आमदार प्रमोद जठारांची मतदारसंघात ढिली होत असलेली पकड, राणेविरोध तीव्र करत पारकरांना आपला वेगळा ठसा उमटवुन देण्यास मदत करणारी ठरली असती. कदाचित यातुन विधानसभा तिकीटाचा मार्गही मोकळा झाला असता. असे एकापेक्षा एक कित्येक पर्याय समोर असताना पारकर जे करायला नको होते तेच करुन बसले. संदेश पारकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण म्हणजे बुडत्याचा पाय अधिक खोलात जाण्यासारखी गोष्ट होती. ज्या 'राणेविरोध' संकल्पनेतुन पारकरांचा जन्म झाला होता ती संकल्पनाच 'राणेसमर्थक' बनुन पारकरांनी नष्ट केली.
राणेँना विरोध करण्यासाठी पारकरांसोबत उभ्या असलेल्या कणकवलीकरांची घोर निराशा झाली. पारकर त्यांना एक प्रकारे 'पोरक' करुन निघुन गेले. पोरकेपणा आलेल्या कार्यकर्त्याँना एखादा खमका 'नेता' बाप म्हणुन हवा असतो याची वैभवला जाणीव होती. 'मौके पे चौका' मारत काँग्रेसला 'आमने-सामने'च्या जाळ्यात अडकवुन वैभवने जबरदस्त राजकीय खेळी केली. 'आमने-सामने' जिँकला काय किँवा हरला काय, शेवटी विजय वैभवचाच होणार होता कारण या 'आमने-सामने' नंतर राणेविरोधक ही वैभवची प्रतिमा आणखीनच उजळ होत त्याला पारकरांच्या मागे राणेविरोधासाठी थांबलेल्या कार्यकर्त्याँचे समर्थन आपोआप मिळणार होते. ही गोष्ट काँग्रेस नेतेमंडळीँच्या लक्षातच आली नाही. काँग्रेससाठी 'दुष्काळात तेरावा महिना' असल्यागत पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला. त्यावेळी शिवसैनिकांच्या रक्षणाखातर वैभवने स्वतः पोलिसांवर धावुन जात 'राडा' केला. राडा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात वैभवच्या क्रुतीने नवचैतन्य पसरले. कणकवलीत राडा झाला आणि त्यात पारकरांचे चुकुनही नाव नाही, अशी ही एक दुर्मिळ घटना होती. कणकवलीकर पारकरांच्या काँग्रेसप्रवेशानंतर राणेँना त्यांच्याच भाषेत उत्तर देणा-या नेत्याच्या शोधात असतानाच वैभवने त्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्या. एका घटनेने वैभव नाईकचे नाव 'ढाण्या वाघ' म्हणुन थेट व्रुत्तवाहिन्यांवर झळकले. वयाची साठी ओलांडलेल्या राणे साहेबांनंतर सिँधुदुर्गचा वारसदार कोण, या प्रश्नाची चर्चा दबक्या आवाजात सुरु असायची. कणकवलीच्या राड्यानंतर शर्यतीत असलेल्या नितेश आणि निलेश या राणेपुत्रांना मागे टाकत वैभवने लोकांच्या ह्रुदयावर कब्जा केला. वैभवला अटक झाल्यानंतर कोणतेही आयोजन नसताना कणकवलीकरांनी उद्धव ठाकरेँच्या भेटीदरम्यान केलेली अनपेक्षित गर्दी नारायण राणेँचा वारसदार वैभव नाईक या गोष्टीवर शिक्कामोर्तब करणारी होती. ती गर्दी नुसत्या शिवसैनिकांची नक्कीच नव्हती. त्या गर्दीत राणेँना पोटतिडकीने विरोध करणारा सामान्य कणकवलीकर खास 'संदेश' देण्यासाठी आला होता- "कणकवली 'वैभव'मय झाली आहे. आता सिँधुदुर्ग 'वैभव'मय करायची सुवर्णसंधी आहे. तेव्हा लागलीच कामाला लागा."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा