गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

‘इंग्रजी’ नव्हे... ‘इंग्लिश’ म्हणा ‘इंग्लिश’...



                मळगांवकर सरांच नाव तोँडी येताच आठवतो तो नेहमी हसतमुख असणारा त्यांचा चेहरा आणि त्याच वेळी नजरेमधुन जाणवणारी कडक शिस्त...! आमची शाळा 'न्यु इंग्लिश स्कुल ओरोस' बाल्यावस्थेत असताना प्रशालेच्या उज्वल भवितव्यासाठी मुख्याध्यापक कुसगावकर सर आणि मळगावकर सर संध्याकाळी शाळा सुटल्यावर कित्येक तास एकत्र काम करत असत. पंचक्रोशीत दोघेही 'राम-लक्ष्मणाची जोडी' म्हणुन प्रसिद्ध होते.   
        
                इयत्ता आठवीत मळगांवकर सरांनी आमच्या इंग्लिश विषयाची आणि पुढील 3 वर्षासाठी वर्गशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. सातवीपर्यँत इंग्रजीतला धडा आणि त्याचे नवनीत गाईड मधील मराठी भाषांतर पाहुन विषयाचे आकलन करुन घेण्याची घाणेरडी सवय आमच्या अंगवळणी पडली होती. आठवीच्या सुरुवातीलाच आमची मानसिकता बदलण्यासाठी 'इंग्लिश' शब्दाचे मराठीत भाषांतर करुन 'इंग्रजी' न म्हणता 'इंग्लिश'च म्हणायची सक्त ताकीद सरांनी दिली. इंग्लिशच्या पुस्तकातील धड्यांचे मराठीत भाषांतर वाचुन तुम्हाला त्या गोष्टी खुप चांगल्या प्रकारे समजत असतील पण इंग्लिश भाषा शिकण्याच्या द्रुष्टीने तुमची अधोगती झालेली असेल. अस्खलित इंग्लिश बोलायच असेल तर मनातल्या मनात मराठी वाक्य इंग्लिशमध्ये भाषांतरीत करुन बोलायची सवय टाळा. तुम्हाला इंग्लिशमध्ये विचार करण्याची जेव्हा सवय लागेल त्यावेळीच तुम्ही न अडखळता कितीही वेळ इंग्लिश बोलु शकता, ही गोष्ट सरांनी मुलांच्या मनावर ठसवली. इंग्लिशमध्ये विचार करण्याची प्रक्रिया जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे एकाएकी सुरु होणार नाही. त्यासाठी शब्दसंग्रह वाढवावा लागेल, इंग्लिश पेपर वाचावे लागतील. इंग्लिश बोलताना विद्यार्थ्याँच्या उच्चारांकडे सरांचे विशेष लक्ष असे. इंग्लिशमध्ये '' शब्दाचा उच्चार अस्पष्ट करायचा ही गोष्ट सरांनी पुन्हा पुन्हा सांगितली. उच्चार सुधारण्यासाठी इंग्लिश न्युज ऐकण्याचा सल्ला दिला. वर्गात शिकवताना सरांच्या आवाजातील चढ-उतार, आवश्यक त्या ठिकाणी ते घेत असलेला पाँज(pause) यामुळे त्यांचा तास कधी संपुच नये असे वाटे. आजही एमबीए शिकताना शंभर मुलांसमोर इंग्लिशमध्ये प्रेझेँटेशन देताना मी मळगावकर सरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो कारण माझ्या मनाच्या कोप-यात 'इंग्लिशमधील एक प्रभावी वक्ता' म्हणुन मळगांवकर सरांचीच प्रतिमा कोरलेली आहे.
                इंग्लिश व्यतिरिक्त शारिरीक शिक्षणचा तास मळगांवकर सर घ्यायचे. खेळांमुळे माणसाचे मन प्रसन्न राहते आणि एकाग्रता वाढुन त्याची अप्रत्यक्षरित्या अभ्यासातच मदत होते.डंबेल्स, लेझीम असे व्यायामाचे अनेक प्रकार सरांनी आम्हाला शिकवले. प्रजासत्ताक दिनी सिँधुदुर्गनगरीतील पोलिस ग्राऊंडवर याची प्रात्यक्षिके दाखवुन 'न्यु इंग्लिश स्कुल ओरोस'च्या विद्यार्थ्याँनी अनेक वेळा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसहीत लोकांची वाहवा मिळवली. यात मळगावकर सरांचा वाटा सिँहाचा होता. लहान वयातच सूर्यनमस्कारासारखे अनेक योगा प्रकार शिकवुन विद्यार्थ्याँचे शारिरीक स्वास्थ्य सुधारण्यास सरांनी हातभार लावला.
                शिस्त हा सरांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग होता. दर शनिवारी शाळा सकाळी 7:20 ची असल्याने उशीर झालेल्यांना सर न चुकता शाळेभोवती दोन प्रदक्षिणा मारायला लावत किँवा आवारातील कचरा गोळा करायला सांगत. प्रार्थनेच्या वेळी रांग सोडुन बाहेर उभ राहणा-यांची गय केली जात नसे. अगदी शाळेबाहेर मौजमजा करीत असताना मळगांवकर सरांची गाडी जरी दुरवर दिसली तरी त्यांच्याबद्दल वाटत असणा-या आदरयुक्त भीतीने आम्ही झाडाच्या आडोशाला लपत असु. आठवीत 'आदर्श' आणि 'हुशार' म्हणुन प्रसिद्ध असलेला आमचा वर्ग नववीत खोड्या करणा-यांचे प्रमाण वाढल्याने शाळेत 'बेशिस्त' म्हणुन गणला जाऊ लागला होता. मळगांवकर सरांसारखा कडक शिस्तीचा वर्गशिक्षक असताना आमच्या तक्रारी वाढल्यानंतर आम्हाला आता फटके मिळतात की काय असेच वाटु लागले.मात्र मळगावकर सर त्या दिवशी वर्गात येऊन भावुक होत जे काही बोलले तो प्रसंग आजही डोळ्यासमोर तसाच उभा आहे. सर ज्यावेळी बोलायचे थांबले तेव्हा सगळ्या विद्यार्थ्याँच्या माना शरमेने खाली झुकल्या होत्या, चेह-यावरील पश्चातापाचे भाव स्पष्ट दिसत होते, मुलीँना तर डोळ्यातील अश्रु लपवता येत नव्हते. काठीच्या मारापेक्षा शब्दांचा मार मनाला किती वेदना देतो ते त्या दिवशी अनुभवता आल. आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी वर्गशिक्षकांची माफी मागितली आणि पुढील काळात सरांना वर्गाचा पुर्वीचा रुबाब पुन्हा मिळवुन दिला. स्काऊट गाईडच्या कँम्पला तंबु बांधताना संघटनकौशल्य, एकीचे बळ काय असते याची जाणीव त्यांनी आम्हाला करुन दिली. दहावीत असताना माझ्या मराठी लिखाणाची शैली सरांना खुप आवडायची पण त्यामानाने माझे इंग्लिश लिखाण प्रभावशाली नव्हते. सहामाई परीक्षेनंतर मला सर म्हणाले, प्रत्येक भाषा ही म्हणी-वाक्प्रचार अशा अलंकाराने नटलेली असते. निबंध लिहिताना जेवढा जास्तीत जास्त या अलंकारांचा वापर करशील तेवढी तुझी मांडणी अधिकाधिक प्रभावी होत जाईल. अथांग अशा सागरातुन मोती वेचावेतत्याप्रमाणे अमर्याद शब्दसाठ्यातुन चोखंदळपणे शब्दांची निवड करायची असते.लेखाचा शेवट करताना एवढेच वाटते की मळगांवकर सरांचे व्यक्तिमत्व देखील परमेश्वराने एक-एक गुण वेचत खास फुरसतीत तयार केलेले असावे. शाळेतील सहवासात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु मी उलगडु शकलो, हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा