शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

मंगलाष्टक वन्स मोअर...


काल ब-याच दिवसांनी सहपरिवार थिएटरमध्ये 'मंगलाष्टक वन्स मोअर' चित्रपट बघितला. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही नावाजलेली जोडी असल्यामुळे कणकवली मल्टीप्लेक्सला चित्रपट मराठी असुनही गर्दी होती.

चित्रपटाबद्दल सांगायच तर 'मंगलाष्टक' ही कथा आहे सत्यजीत (स्वप्नील जोशी) आणि आरतीची (मुक्ता बर्वे). लग्नापुर्वीची प्रेयसी आणि लग्नानंतरची बायको या एकाच स्त्रीच्या दोन भुमिका कशा पुर्णपणे वेगळ्या असतात हे समजुन घेण्यासाठी खासकरुन नवविवाहित जोडप्यांनी आवर्जुन पाहावा, असा हा चित्रपट आहे. सत्यजीत आणि आरतीचा प्रेमविवाह असतो पण लग्नानंतर आरतीतील प्रेयसी अभावानेच दिसते आणि सत्यजीतला तिची 'बायकोगिरी' रोज सहन करावी लागते. आरतीची व्यक्तिरेखा 'अतिकाळजी घेणारी बायको' अशी अधोरेखित केली आहे. लग्नानंतर सत्यजीतची वाढलेली दारु किँवा वाढलेल वजन याची काळजी करत त्याच्या मागे वजनाचा काटा घेऊन फिरणारी, त्याला योगासन आणि भल्या पहाटे बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करणारी आरती सत्यजीतला आयुष्यातील कटकट वाटु लागते. त्यातच भर पडते ती सत्यजीतच्या नोकरीमधील व्यापांची...!
सत्यजीत रेडिओ कंपनीत कामाला असल्याने कंपनीला जास्तीत जास्त ग्राहक मिळवुन देण्यासाठी त्याची कडक बाँस (सई ताम्हणकर) सारख्या डेडलाईन्स देऊन हैराण करत असते. त्यात घरी आल्यावर अतिकाळजीपोटी बायकोची होणारी कटकट यामुळे सत्यजीतला आयुष्य नकोस वाटु लागत. वैवाहिक जीवनातील रोमान्स हरवल्यामुळे सत्यजीत- आरतीला अपत्य प्राप्ती होत नाही. सत्यजीत काही वेळा स्वतःहुन आरतीशी शारिरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो पण कामाच्या गडबडीत आरती त्याला संधी घेऊ देत नाही. एकदा तो दोघांना गोव्याला एकांतात फिरायला जाण्यासाठी तिकीट घेऊन येतो पण त्यावेळी सुद्धा आढेवेढे घेत आरती कारणे पुढे करते. सत्यजीतचा पारा चढतो आणि भांडण विकोपाला जाऊन आरतीला घराबाहेर काढतो. इकडे आरती आपल्या मैत्रिणीसोबत (कादंबरी कदम) राहु लागते. सत्यजीतने घराबाहेर काढल तरी तिच त्याच्यावरील प्रेम तसुभरही कमी झालेल नसत. तिची मैत्रीण आरतीला स्वावलंबी होऊन जगण्याचा सल्ला देते. आरती नोकरीला लागते, नोकरीचा ताण अनुभवते आणि आपल्या अतिकाळजीपोटी अगोदरच ताणतणावात नोकरी करणा-या सत्यजीतची काय अवस्था होत असेल याची तिला जाणीव होती. इकडे सत्यजीतही आरतीशिवाय एकाकी पडतो. शेवटी आरती कशीही वागली तरी त्याने तिच्यावर मनापासुन प्रेम केलेल असत. ते दोघे हाँटेलमध्ये भेटायच ठरवतात. इतके दिवस 'काकुबाई' टाईप पंजाबी ड्रेसवर वावरणारी आपली बायको अचानक स्कर्ट घालुन समोर येते तेव्हा सत्यजीत आवाक होतो. ( खर तर मुक्ता बर्वेला स्कर्टमध्ये पाहुन माझ तोँड उघड पडायच बाकी होत. शेवटी कँटरीना, जँकलीन सारख्या विदेशी बालांना बिकीनीमध्ये पाहण्यापेक्षा मराठमोळ्या मुक्ताला स्कर्टमध्ये पाहण मला तरी घायाळ करत बुवा...!) दोघ एकमेकांच्या चुका कबुल करतात. नंतर सत्यजित सकाळी सकाळी सायकलिँग करुन, भाज्या खाऊन, दारु पिण सोडुन देत आरतीला आपण सुधारलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी ते दोघे एकत्र येतात आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतात. म्हणुन चित्रपटाच नाव आहे मंगलाष्टक वन्स मोअर...!

स्वप्नील-मुक्ताने आपापल्या भुमिकांना यथायोग्य न्याय दिल्याने चित्रपट अप्रतिम वाटतो. निलेश मोहरीरच संगीत एकदम लाजवाब आहे. खास करुन अभिजीत सावंतच 'गुणगुणावे गीत' आणि स्वप्नील बांदोडकरचं 'दिवस ओल्या' गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. चालीइतकेच गीतकार गुरु ठाकुरचे शब्द ह्रुदयाला स्पर्शुन जातात. बाँस आणि सत्यजीतमध्ये काहीतरी अफेअर आहे अशा गोष्टी मुक्ताला सांगुन कथेत पाणी घालायची काहीच आवश्यकता नव्हती. तेवढीच एक गोष्ट खटकते. विशेषतः सत्यजीतच्या दारुड्या मित्राच्या तोँडच एक वाक्य मनात घर करुन राहत.
"लग्नानंतर हनीमुनला आपण नवरा-बायको एकमेकांसमोर कपडे काढत सगळ शरीर उघडं करतोच ना...! मग संसारात आपल्या जोडीदाराच्या खटकणा-या गोष्टी त्याच्यापासुन लपवुन ठेवत दोन मनांमध्ये दुरावा निर्माण का करतो...?"

जे प्रियकर-प्रेयसी आता एकमेकांच्या प्रेमात बुडुन गेले आहेत आणि नंतर लग्न करण्याच्या विचारात आहेत त्यांनीही एकदा पाहायलाच हवा असा हा चित्रपट आहे. लग्नाआधी लग्नानंतरची स्वप्ने रंगवत गार्डनमध्ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन बसण खुप सोपी गोष्ट असते. फक्त जोडीदारासोबत प्रत्यक्ष संसार करायची वेळ येते तेव्ही ख-या परिस्थितीचा अंदाज येतो. अशा वेळी एकमेकांमधील सामंजस्यच संसार तारु शकते. अगदीच दुरावा आल तरी एकमेकांमधील प्रेम खर असेल तर ते पुन्हा तुम्हाला एकत्र आणतच. फक्त आयुष्याची नवीन इनिँग पुन्हा नव्याने सुरु करताना कुठेतरी मनात म्हणावच लागत-

"मंगलाष्टक वन्स मोअर..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा