शनिवार, ७ डिसेंबर, २०१३

कोकणात अवतरले आधुनिक गांधी'दादा'...!




ऐकलत ना...! गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन निघाली आहे. कोकणात गांधीँच्याच पक्षात सामान्य जनतेसाठी त्याग करणा-या नवीन गांधीँचा उदय झाला आहे. हे नवगांधी कस्तुरीरंगन अहवाल रद्द केला नाही तर म्हणे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. गांधीदादांचे 4 वर्ष नसते 'उद्योग' करुन झालेत, आता निवडणुकांआधी उरलेले 4 महिने मंत्रीपदापासुन दुर राहतायेत. बघा केवढा मोठा त्याग...! कुणी बघितली आहे का अशी त्यागाची मुर्ती...? तसही गांधीदादा कस्तुरीरंगन यांना पाहणी करण्यासाठी हेलिकाँप्टरमधुन स्वतःच सिँधुदुर्गात घेऊन आले होते. बंद खोलीत झालेल्या तात्विक चर्चेत कस्तुरीरंगन यांचे प्रबोधन करुन गांधीदादांच्या मोठ्या खाणी असलेला 'दोडामार्ग' तालुका हळुच कस्तुरीरंगन अहवालातुन वगळुन घेतला. आता जिल्ह्यातील 192 गावे जरी इको सेँसिटीव्ह झाली तरी पंचा नेसुन डंपर चालवणा-या गांधीवादी चालकांचे फार मोठे हाल होणार आहेत. त्याहीपेक्षा सेवाभावी खाण मालकांच्या उत्पन्नाचे साधनच बंद पडल्यामुळे गांधीदादांना निवडणुकांच्या वेळी मिळणा-या देणग्या आपोआप बंद होतील. आता देणग्याच बंद झाल्या तर निवडणुकांच्या आदल्या दिवशी मतदारांना दारुच्या बाटल्या, मटणाचे तुकडे देण्याचे सामाजिक कार्य गांधीदादांना करता येणार नाही. अशा दुरगामी परिणामांचा विचार करत गांधीदादांनी आपल्या सेवाभावी कार्यकर्त्याँसाठी मंत्रीपदाचा त्याग करण्याचा निर्णय घेत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. 'खाणीँचे रक्षण, पर्यावरणाचे भक्षण' या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहत सिँधुदुर्गाचा निसर्ग उद्ध्वस्त करायचे महान कार्य गांधीदादांनी अंगीकारले आहे. गेली पाच वर्षे गांधीदादा आणि त्यांचे गांधीवादी समर्थक दिवसरात्र एक करुन डोँगर फोडुन टाकत खनिज पळवण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करु पाहणा-या काही करंट्या लोकांनी गांधीदादांच्या महान कार्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हताश झालेल्या गांधीदादांनी 'विरोध करणा-यांना घराबाहेर पडु देणार नाही' अशी नम्र विनंती केली.(कदाचित गांधीदादा आणि त्यांच्या समर्थकांचे पर्यावरणवाद्यांच्या घरासमोर सत्याग्रह करुन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे ध्येय असावे.) लोकशाहीचा गाढा अभ्यास असणा-या आणि संविधानाची भक्ती करणा-या गांधीदादांच्या सौम्य व्यक्तिमत्वास शोभेल असेच ते वक्तव्य होते.अगदी काल राजीनामानाट्य करताना वन अधिका-यांना सिँधुदुर्गात फिरु देणार नाही, सिँधुदुर्गात इको सेँसिटीव्ह झोन लागु केल्यानंतर कायदा सुव्यवस्था बिघडली तर मी जबाबदार नाही, ही गांधीदादांची वक्तव्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनीधीत्व करणा-या सदविवेकी नेत्याची साक्ष देतात.गांधीदादांच्या नवीन संशोधनात नक्षलवादी महाराष्ट्रात गडचिरोली मध्ये राहत नसुन इको सेँसिटीव्ह घोषित केलेल्या महाबळेश्वर, माथेरान आणि डहाणु मध्ये राहतात. त्याच धर्तीवर सिँधुदुर्ग जिल्हा इको सेँसिटीव्ह घोषित केला तर गेली 24 वर्षे सत्य, अहिँसा यांची प्राणापेक्षा जास्त जोपासना करणारे त्यांचे समर्थक नक्षलवादी बनु शकतात. गेल्या 24 वर्षात सिँधुदुर्गात कधीच न घडलेल्या राजकीय खुन, अपहरण, शोरुमची जाळपोळ, जमिनी बळकावणे, इत्यादी नक्षली कारवाया जिल्हा इको सेँसिटीव्ह घोषित झाल्याबरोबर लगेच सुरु होऊ शकतात. आपल्या समर्थकांच्या कल्याणाखातर पर्यावरणवाद्यांच्या जाचातुन सिँधुदुर्गला वाचवण्यासाठी आणि पर्यावरणाचा विध्वंस करुन गांधीवादी कार्यकर्त्यांचे रक्षण करण्यासाठी गांधीदादा एसटी बसेस फोडुन आणि चक्काजाम करत अहिँसक आंदोलन करणार आहेत. तसा अहिँसेचा आणि गांधीदादांचा पुर्वाश्रमीच्या सेनेत असल्यापासुन खुपच जवळचा संबंध आहे. सेनेत असताना माणसे मारणे खुपच दुरची गोष्ट राहिली, आमच्या गांधीदादांनी साधी मुंगळी सुद्धा कधी पायाने चिरडली नव्हती. 'अहिँसेचे पुजारी' म्हणुन महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचेच नाव घेतले जाते. अपवाद म्हणुन लोककल्याण आणि सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी राडे केले खरे पण पुढच्या काळात गांधीँचे 'सत्याचा प्रयोग' पुस्तक वाचुन त्यांनी गांधीजीँच्याच पक्षात 'गांधीटोपी' घालत प्रवेश केला.( आता त्यांनी खरच डोक्यावर 'गांधीटोपी' घातलीय की जनतेला टोप्या घालतायेत ते त्यांचे त्यांनाच ठाऊक...!)गांधीदादांच्या परिवाराची महती तरी काय आणि कशी सांगु...?  गांधीदादांच्या उच्चशिक्षित आणि सुसंस्क्रुत अशा ज्येष्ठ पुत्राने तर सभ्यतेची अत्तुच्च्य पातळी दाखवताना पर्यावरणाचे रक्षण करु पाहणा-या गाडगीळांना 'विकासाच्या आड येणारा नरकासुर' असा बहुमुल्य सन्मान दिला. बडे मियाँ, बडे मियाँ, छोटे मियाँ, सुबहलल्ला...! गांधीदादांच्या छोट्या पुत्राविषयी तर काही विचारुच नका...!! शालीनतेचे दुसरे नाव म्हणजे गांधीदादांचे छोटे पुत्र...!!! संपुर्ण महाराष्ट्राला 'स्वाभिमानी' बनवण्याचे व्रत त्यांनी खुपच लहान वयात अंगीकारले आहे. गुजराती लोकांना मराठी स्वाभिमानाचे धडे शिकवत राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे रुप त्यांनी पेश केले. हल्लीच खिशात 250 रुपये नसताना गोव्यामध्ये टोलनाक्यावर काही उर्मट लोकांनी टोल मागितल्यावर यांच्यातल्या स्वाभिमानाला अचानक ठेच पोहोचली. नंतर उत्सफुर्तपणे किँवा अनाहुतपणे टोलनाक्याची यांच्या हातुन तोडफोड झाली. मात्र स्वाभिमान कसा जपायचा असतो याची शिकवण घेत अवघा महाराष्ट्र क्रुतक्रुत्य झाला. तर अशा या गांधीवादी परिवाराकडे पाहुन पुराणात जशा वाल्याचा वाल्मिकी झाल्याच्या कथा प्रसिद्ध होत्या अगदी तशाच वाल्मिकीतला वाल्या वेळोवेळी आपले असली रुप लोकांना दाखवत असल्याच्या आख्यायिका आमच्या कोकणात प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे देशासमोर त्यागाचे अनोखे उदाहरण पेश करणा-या कोकणातल्या गांधीदादांच्या डोक्यावरील 'गांधीटोपी'ला गहिवरुन आल्याने ती नशीबाच्या नावाने नेहमीच ओरड मारतेय. भुतलावर आपली पोकळी भरुन काढणा-या गांधीदादांना पाहुन हल्ली म्हणे स्वर्गात स्व.मोहनदास करमचंद गांधीँ नेहमीच रडण्यात व्यस्त असतात. फक्त कशाला ते विचारु नका...!

"जय हो कोकण के गांधीदादा...! जय हो...!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा