रविवार, ८ डिसेंबर, २०१३

'स्मार्ट वर्क'चे महत्व विशद करणारा गुरु...!



        'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' मानणा-या पिढीत एखादा शिक्षक कडक शिस्तीचा मात्र उच्च प्रतीचे शिक्षण देणारा असला, तरी तो कित्येक विद्यार्थ्यांच्या 'आवडता शिक्षक' श्रेणीत सामील असायचा. परंतु काळाच्या ओघात विद्यार्थ्यांच्या शिक्षकांप्रती असलेल्या संकल्पना पुर्णपणे बदलत गेल्या. सध्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारा शिक्षक आवडतो. म्हणुनच साईल सर कित्येक विद्यार्थ्यांच्या 'फेव्हरिट लिस्ट' मध्ये आढळणे दुर्मिळच...!
                आपल्या विद्यार्थ्याँची विनाकारण स्तुती करणे म्हणजे आपणच त्यांच्या महत्वाकांक्षांच क्षितीज छोट करण्यासारख आहे, या मतावर सर नेहमीच ठाम राहिले. देशभरात 'द्रोणाचार्य' म्हणुन प्रसिद्ध असलेल्या रमाकांत आचरेकरांचा पट्टशिष्य सचिन तेँडुलकरने क्रिकेटमध्ये विक्रमांचे मनोरे रचल्याने त्याची अख्ख्या जगात स्तुती व्हायची परंतु सचिनचे कान आपल्या गुरुच्या तोँडुन 'Well Done' ऐकण्यासाठी आतुरलेले असायचे. आचरेकर सरांकडुन शाबासकीचे दोन शब्द ऐकण्यासाठी सचिन एकापेक्षा एक विक्रम करु लागला. निव्रुत्तीच्या दिवशी विक्रमादित्य सचिन 'क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट' बनला त्यावेळी आचरेकर सर म्हणाले- Well Done, Sachin. आचरेकर सर, प्रत्येक खेळीनंतर सचिनवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत राहिले असते तर सचिनला त्याचे इतके अप्रुप कधीच वाटले नसते. रमाकांत आचरेकरांप्रमाणेच स्तुती करताना 'कंजुषपणा' अंगी बाळगल्याने साईल सर बहुतांश विद्यार्थ्याँमध्ये 'फेव्हरिट' म्हणुन कधीच गणले गेले नाहीत परंतु त्याची तमा न बाळगता विद्यार्थ्याँना योग्य वयात योग्य शिस्त लावायचे अमुल्य कार्य ते नेहमीच करत राहिले. 'आदर्श' शिक्षकाच्या व्याख्येत बसणारी साईल सरांची कार्यपद्धती होती पण दुर्देवाने आजच्या पिढीतील आदर्श (?) विद्यार्थ्याँना ती कधीच उमगली नाही.
                दहावीसाठी उन्हाळी सुट्टीत घेण्यात येणा-या खाजगी क्लासेसना सरांचा तात्विक विरोध असायचा. दहावीचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी शासनाने आठ महिन्यांचा कालावधी दिलेला असताना तो खाजगी क्लासमध्ये फक्त दोन महिन्यात संपवणे म्हणजे 'एक ना धड, भराभर चिँध्या' यातला प्रकार आहे. मुद्दा कितीही पटणारा असला तरी दहावीच्या वर्षात धोका पत्करायची तयारी नसलेले आणि कळपातली मेँढरं बनलेले माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत खाजगी क्लासला गेले. क्लासच्या समाप्तीनंतर हाती काहीच न लागल्याचा पश्चाताप करत आम्ही परतलो. दोन महिन्याच्या दगदगीमुळे तब्येत बरीच खालावली होती आणि जुलैच्या सुरुवातीलाच मला टायफाँईड झाला. तब्बल एक महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागल्याने दहावी बाबतच्या माझ्या स्वप्नांचा चुराडा व्हायची वेळ आली. दहावीत साईल सर आम्हाला बीजगणित आणि विज्ञान भाग-1 हे विषय शिकवायचे. माझ्या स्वभावात जाणवणारे नैराश्य आपल्या विद्यार्थ्याँवर बारीक लक्ष असणा-या सरांच्या नजरेने केव्हाच हेरले होते. सरांशी चर्चा करताना मी त्यांना सांगितले की आजारात एक महिना पुर्णपणे वाया गेल्याने इतरांप्रमाणे गणित विषयाचा जास्तीत जास्त सराव करणे माझ्यासाठी केवळ अशक्य आहे. त्यावेळी दहावीच्या मुख्य लढाई आधीच शस्त्र खाली ठेवण्याच्या माझ्या मानसिकतेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. नंतर माझी समजुत घालताना सर म्हणाले की, "आयुष्यात 'हार्डवर्क' आवश्यक असते पण काही प्रसंग असे येतात ज्यावेळी 'स्मार्टवर्क' करणे अपरिहार्य बनुन जाते.'हार्डवर्क' आणि 'स्मार्टवर्क' या शब्दात पुसटशी रेषा असते आणि ती ओळखुन काम करणाराच आयुष्यात यशस्वी होतो.
बीजगणित विषयात बहुतांश विद्यार्थी जास्तीत जास्त सराव करण्याच्या द्रुष्टीने एकाच प्रकारची 50-50 गणिते सोडवतात. याला हार्ड वर्क म्हणतात. तुझ्याकडे आता वेळ कमी उरलाय त्यामुळे प्रत्येक प्रकारातली फक्त 5-5 गणिते सोडव पण त्यावेळी एकाग्रता अशी ठेव की याच प्रकारातल कोणतही गणित तुला केव्हाही सुटलच पाहिजे." एव्हाना स्मार्ट वर्कची महती समजुन मी दहावीचा अभ्यास नव्या जोमाने पुन्हा सुरु केला आणि बोर्डाच्या परीक्षेत बीजगणित विषयात 75 पैकी 72 गुण सुद्धा मिळवले. फोर्ड कंपनीचा मालक हेन्री फोर्ड म्हणाला होता की, प्रगती ही आळशी लोकांकडुन जास्त साध्य केली जाऊ शकते कारण ते नेहमीच कमीत कमी श्रमातुन जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा याचाच विचार करत असतात. सरांच्या स्मार्ट वर्क थिअरीतुन फोर्डला नेमके काय म्हणायचे असेल ते मला उमगले होते. विज्ञान विषय शिकवताना शास्त्रीय भाषेतील अवघड शब्द आपल्या रोजच्या जीवनातील भाषेत रुपांतरित करुन संकल्पना समजावुन देण्याकडे सरांचा कल असायचा. त्यांच्या मते विज्ञानातील व्याख्या संस्क्रुतमधील श्लोकांप्रमाणे घोकंपट्टी करुन पाठ न करता, त्यातील कन्सेप्ट समजुन घेतला तर विज्ञानासारखा सोपा विषय नाही. बीजगणितापाठोपाठ विज्ञान विषयातही बोर्डाच्या परीक्षेत 75 पैकी 73 गुण मिळवल्यानंतर सरांच्या तोँडुन कमी वेळा उच्चारला जाणारा 'शाब्बास' हा शब्द ऐकुन मी ख-या अर्थाने क्रुतक्रुत्य झालो.
                दहावीत बोर्ड परीक्षेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय पातळीवरच्या NTS (National Talent Search) सारख्या परिक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्याँनी भरीव कामगिरी करावी असा सरांचा नेहमी अट्टाहास असायचा. आजारपणामुळे मी NTS परीक्षेला काही बसु शकलो नाही पण आमच्याच वर्गातील म्रुणालिनी सिरसाट या विद्यार्थीनीला राष्ट्रीय स्तरावरील NTS शिष्यव्रुत्ती प्राप्त झाल्याने सरांच्या श्रमाचे चीज झाले. 'स्पष्टवक्तेपणा' हा सरांच्या व्यक्तिमत्वातील एक खास पैलु होता. एखाद्याशी काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर त्याच्यासमोर गोडगोड बोलुन, मागाहुन दुषणे लावण्यापेक्षा, जे काय असेल ते समोरासमोर बोलावे. यामुळे समोरच्याच्या मनाला काय वाटेल ते माहित नाही पण निदान आपण तरी आपल्या स्वभावाशी प्रामाणिक राहिलो, याचे  समाधान आपल्या मनाला मिळते. कोणतीही भीडभाड न बाळगता बोलण्याच्या सवयीमुळेच सरांचा स्वभाव कित्येकांना पटला नाही पण मला तो नेहमीच योग्य वाटला. आजही मी सरांना आदर्श मानत स्पष्टवक्तेपणा अंगी बाळगण्याचा प्रयत्न करतो.
                लेखाच्या शेवटी एवढच सांगावस वाटत की साईल सरांसारखे शिक्षकी पेशाला जागुन स्वतःचा विशिष्ट स्वभाव बनविणारे शिक्षक आजकाल खरच दिसेनासे झाले आहेत. अशा गुणी शिक्षकासोबत विद्यार्थीदशेतला मुख्य काळ व्यतित करुन आयुष्याची जडण-घडण करायची जी संधी मला परमेश्वराने प्राप्त करुन दिली, त्यासाठी मी स्वतःला खुप नशीबवान मानतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा