सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

निवडणुक निकालातुन उसळला तरुणाईचा उद्रेक...!

'बदल' हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो, तसाच तो निवडणुकांमध्येही असतो. सत्तापरिवर्तन हे जीवंत लोकशाहीचेच एक लक्षण आहे आणि ते एकाएकी नक्कीच घडुन येत नाही. त्यासाठी काळ लोटावा लागतो. सत्ताधा-यांची नाटके लोक बघुन घेत असतात आणि जेव्हा सत्ताधा-यांचा माज लोकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातो, तेव्हा तो संताप मतदानातुन व्यक्त केला जातो. काल राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि दिल्ली या चारही विधानसभेत काँग्रेसची जी वाताहात झाली तो लोकांचा उद्रेक होता. नव्हे, तो खास करुन तरुणांच्या संतापाचा उद्रेक होता.

तरुणाईच्या या उद्रेकाचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न केला तर
गेल्या 2-3 वर्षात सोशल मिडीयाचा जनमानसातील वाढलेला प्रभाव आणि अण्णा हजारेँच्या जनलोकपाल विधेयकाये आंदोलन ही दोन कारणे प्रामुख्याने समोर येतात.

तरुण वयात प्रस्थापितांविरुद्ध बंड करायची व्रुत्ती वाढीस लागते. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळले होते. त्यामुळे अण्णा हजारेँनी भ्रष्टाचाराविरुद्ध पूकारताच, आता लगेचच भ्रष्टाचार समाप्त होईल या भाबड्या आशेने 12 दिवस तरुणाई रस्त्यावर उतरली.आंदोलनाच्या यशासाठी बाळगावा लागणारा संयम या तरुणाईपाशी नव्हता. एव्हाना आंदोलनाने काहीच साध्य होणार नाही या निष्कर्षाप्रत येऊन ते पोहोचले. मात्र काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराविषयीचा असंतोष तसाच मनात खदखदत होता. आता भ्रष्टाचार संपवायचा असेल तर काँग्रेस संपवावी लागणार आणि काँग्रेस संपवायची असेल तर नवीन राजकीय पर्याय आणावा लागणार, यासाठी नव्या सुपरहिरोची शोधाशोध सुरु झाली आणि त्यातुनच राष्ट्रीय पातळीवर नरेँद्र मोदी आणि दिल्लीत अरविंद केजरीवाल या तरुणाईच्या नेत्यांचा उदय झाला. अण्णा हजारेँच्या मागे जमलेली तरुणाई आता नव्याने मोदी समर्थक आणि केजरीवाल समर्थक म्हणुन विभागली गेली.

नरेँद्र मोदीँच्या मागे भाजपसारखा पक्ष होता पण अरविँद केजरीवालांना नव्याने पक्ष उभारावा लागला. या दोघांमुळे तरुणाई मधील असंतोषाच्या उद्रेकाला एक नवीन दिशा मिळाली. या क्रांतीत सोशल मिडीयाचा, त्यातही फेसबुकचा वाटा सिँहाचा होता. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे एकंदरीतच राजकरणाबाबत निरुत्साही असणारे तरुण रोज उठुन देशातल्या छोट्या मोठ्या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया देऊ लागले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो मुक्त अविष्कार होता.नरेँद्र मोदीँसारख्या मार्केटीँगचा गुरु असणा-या चाणाक्ष नेत्याने काळाची पावले ओळखली आणि सोशल मिडीयाचा यथायोग्य वापर करुन घेतला. लोकसभा निवडणुकांना दोन वर्ष शिल्लक असतानाच मोदी पंतप्रधान पाहिजेत अशी फेसबुकवर लाट आली आणि त्या लाटेसमोर भाजप मधील वरिष्ठ नेतेमंडळीँनाही झुकावेच लागले. इकडे अरविँद केजरीवालांनी दिल्लीत सामान्य लोकांचे प्रश्न रस्त्यावर उतरुन हाताळत आपले संघटनकौशल्य दाखवले. सोबत सोशल मिडीयावरही आपला जम बसवला. निवडणुकांआधी बुरसटलेल्या विचारांचे राजकीय विश्लेषक फेसबुकवर व्यक्त होणारी तरुणाई प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये नेहमीप्रमाणेच उदासीनता दाखवणार. अशी खुळचट वक्तव्ये करत होते. मात्र चारही राज्यात विक्रमी मतदान झाल्यानंतर सोशल मिडीयावरील क्रांती इजिप्तप्रमाणे भारतातही होऊ शकते याचा प्रत्यय आला. अगदी निवडणुकांच्या निकालानंतरही 4-0 ने मिळवलेल्या भाजपच्या विजयात मोदीँचा वाटा नाही किँवा सत्ताबदल होणारच होता, अशी विधाने मोदीँच्या यशाने डोळे दिपलेले मोदीविरोधी राजकीय पंडीत करत आहेत. त्यांना एवढच सांगेन की, तुमच्या विश्लेषणाप्रमाणे सत्ताबदल नक्कीच झाला असता परंतु बहुमताच्याही कितीतरी पुढे जाऊन राजस्थान-मध्यप्रदेश मध्ये 160 पेक्षा जास्त जागा भाजप मिळवु शकली ती फक्त आणि फक्त मोदीँच्या लाटेमुळेच....! किँबहुना दिल्लीमध्ये मोदीँच्या रँली झाल्या नसत्या तर आज कदाचित आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये सरकार स्थापन केले असते. 'आप'ला ऐन निवडणुकांच्या वेळी झालेल्या स्टिँग आँपरेशन आणि अण्णा हजारेँनी मागितलेल्या हिशोबाचा फटका नक्कीच बसला, हे ही तितकेच खरे...! भाजपचा समर्थक असलो तरी काल मनापासुन वाटत होत की दिल्लीत आपची सत्ता यायला पाहिजे होती. निदान झाकलेली मुठ तरी उघड झाली असती. काँमेन्ट्रेटर बनुन फलंदाजाने बाऊन्सरला काय करायला पाहिजे ते सांगणे खुप सोपे असते पण प्रत्यक्षात मैदानात बँट घेऊन उतरल्यावरच बाऊन्सर खेळण काय असत याची खरी कल्पना येते. अगदी त्याप्रमाणेच सत्तेबाहेर राहुन इतरांना व्यवस्था परिवर्तनाचे डोस पाजणारे प्रत्यक्षात सत्ता हाती आल्यावर नक्की काय उजेड लावतात ते तरी लोकांना कळले असते.दिल्लीमध्ये सत्ताबदल होणार हे गेल्या वर्षी डिसेँबरमध्येच निश्चित झाल होत. निर्भया बलात्कार प्रकरणात आरोपीँना अटक व्हावी यासाठी तरुणाई उत्स्फुर्तपणे मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरली होती. आयुष्यभर रस्त्यावर न उतरता फक्त वैचारिक चर्चा करण्याचे काम करणारे बुद्धीबहाद्दर त्यांना 'मेणबत्ती संप्रदाय' म्हणुन हिणवले पण त्या मेणबत्तीँच्या ज्वालांमागे दडलेला वणवा त्यांना कधीच दिसला नाही. तर अशा चिडलेल्या तरुणाईवर 15 वर्षे सलग मिळालेल्या सत्तेचा माज आलेल्या शीला दिक्षीतने पाण्याचे फवारे मारुन पळवुन लावण्याचा घ्रुणास्पद प्रकार केला. जेव्हा लोकप्रतिनीधीँना माज येतो तेव्हा तो माज उतरवण्यासाठी लोकच पुढे येतात. शीला दिक्षितांचा 25 हजार मतांनी झालेला पराभव हेच दर्शवतो. मतदानाच्या आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे पैसा आणि दारु पाजुन लोकांची मते जिँकु अशी काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र संतापलेल्या लोकांना दिल्लीत काँग्रेसला फक्त 8 जागा देऊन तिकडे हा राष्ट्रीय पक्ष औषधालाही शिल्लक ठेवला नाही. राजस्थान, मध्यप्रदेशातील निकाल प्रस्थापित काँग्रेसविरुद्ध लोकांचीच चीड स्पष्ट करतो. या चार राज्यांचे निकाल येणा-या लोकसभा निवडणुकांची नांदी आहे. धर्म-प्रांत-जात या मुद्द्यांवर लोकांना आपापसात भांडत ठेवुन सत्तेचे लोणी चाखायचे नेतेमंडळीँचे दिवस आता संपले. शेवटी जातीयता आणि धार्मिकता ही गेली कित्येक शतके आपल्या देशाला लागलेली कीड आहे, त्यामुळे ती पुर्णपणे कधीच संपणार नाही. आजही 30-40 टक्के मते कट्टरवादीच आहेत. त्यासाठीच तरुणांचे नेते म्हणवुन घेताना नरेँद्र मोदीँना 'हिँदु राष्ट्रभक्त' आणि केजरीवालांना मुस्लीमांच्या 'टोपी'चा आधार घ्यावा लागत आहे. पण या निवडणुकीनंतर तरुणांनी धर्म-जात-प्रांत हे मुद्दे कालबाह्य ठरवत 'सुशासन' आणि 'भ्रष्टाचार निर्मुलन' हेच देशातील महत्वाचे मुद्दे असतील या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा