गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

दंडवतेना 'दंडवत'



२१ जानेवारीला प्रा.मधु दंडवते यांची जयंती होती. खर तर एखाद्या नेत्याची किंवा महापुरुषाची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करताना त्याच्या विचारांचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवर पडावा, हा उदात्त हेतू असतो. मात्र काळाच्या ओघात त्या हेतूलाच तिलांजली देण्यात येत आहे. शिवजयंतीला डॉल्बीच्या तालावर विक्षिप्त नाच करून मिरवणुका काढणारी मंडळी याचीच तर साक्ष देतात. प्रा. मधु दंडवते या कर्मयोग्याचे कार्यच इतके महान होते की ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 'दंडवते कोण होते?' या प्रश्नातच काही उत्तरे प्रकर्षाने जाणवतात-
नैतिकता हरवत चाललेल्या काळात विचारांच आदर्शवत राजकरण करणारे दंडवते होते...!
'साधी राहणी, उच्च विचारसणी' अंगीकारणारे दंडवते होते...!!
आणि कोकण रेल्वेच अशक्यप्राय स्वप्न पाहताना विरोधकांची होणारी बोचरी टिका हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहुन सहन करणारे 'आधुनिक युगातील महात्मा' दंडवतेच होते...!!!
एके काळी दंडवते, नाथ पै या नावातच अवघे कोकण सामावलेले असायचे. शब्द आणि वक्तुत्व यांचा मिलाफ असलेली या द्वयींची संसदेतील भाषणे अभ्यासाकरीता आजही जतन करुन ठेवलेली आहेत. देशभरात राजापुर मतदारसंघाची ख्याती 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' अशी पसरली होती. आजही पुण्यासारख्या शहरात कोण्या अनोळखी आजी-आजोबांना भेटल्यावर- "कोकण...? म्हणजे दंडवतेँच्या मतदारसंघातील आहात तर...??" असे गौरवोद्गार आपोआप ऐकु येतात.
स्मारकांना तात्विक विरोध असणा-या दंडवतेँचे कार्य आणि विचार एवढ्या उच्च दर्जाचे होते की ते स्मरणात ठेवण्यासाठी स्मारकांची गरज कधी भासली नाही आणि यापुढेही भासणार नाही. फक्त 'कोकण रेल्वेचा शिल्पकार' असलेल्या दंडवतेँचे तैलचित्र क्रुतज्ञता म्हणुन कोकण रेल्वेच्या आवारात लावणे गरजेचे होते. मात्र कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी क्रुतघ्नतेचा कळस करुन दंडवतेँचे तैलचित्र देखील काढुन टाकले. तशी क्रुतघ्नता जीवंतपणी नेहमीच दंडवतेँच्या नशीबी आली होती. अशक्यप्राय कोकण रेल्वे पुर्णत्वास नेल्यानंतर लगेचच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने क्रुतघ्नपणे दंडवतेँना पराभुत करुन परतफेड केली. कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी दंडवतेँना देशाचा पंतप्रधान बनण्याची नामी संधी चालुन आली होती. राज्यसभेतुन निवडुन जात पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले मिळाल्यावर तत्वांचा पुजारी विनम्रतापुर्वक पंतप्रधानपद नाकारताना म्हणाला-
"मागच्या दरवाजाने (राज्यसभेतुन निवडुन जात) पंतप्रधानपद स्वीकारण मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारल. तिथेच माझ राजकरण संपल."
केवढा हा त्याग...? कधी बघितली आहे का राजकरणात अशी त्यागमुर्ती...?? जीवंतपणी जपलेला हा त्याग मरणानंतरही कायम ठेवत दंडवतेँनी आपले शरीर दान केले. आकस्मिक पराभवामुळे दंडवतेँसारखा कर्मयोगी मनातुन दुखावत अस्वस्थ झाला होता. "मंदिराच्या पुर्णत्वानंतर शिल्पकाराची गरज भासत नाही" हे दंडवतेँचे उद्गार याचीच तर साक्ष देतात. 'का झाला असेल दंडवतेँचा पराभव...? का झाले असतील कोकणचे विचारी लोक इतके बेईमान...?' असे कित्येक प्रश्न मनात आल्यावाचुन राहत नाहीत. कोकणात नव्वदच्या दशकात नव्याने उदयाला आलेली चंगळवादी राजकीय संस्क्रुती उत्तरादाखल मिळते. इतके दिवस तात्विक मुद्द्यांवर खेळल्या जाणा-या निवडणुका आता राजकीय वादाचे उग्र रुप धारण करु लागल्या होत्या. कोकणची हिरवी भुमी प्रथमच रक्ताने लाल झाली होती. निवडणुक निकालानंतर एकमेकांना अलिँगन देत अभिनंदन करणारे उमेदवार आता दिसेनासे झालेत. नेता, त्याचे चेले आणि कार्यकर्ते अशी निर्माण झालेली राजकीय साखळीच कोकणच्या वैचारिक -हासास कारणीभुत ठरली. दंडवते आपल्या कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे कधीच करत नसत. माझ्या शिफारशीमुळे माझ्या कार्यकर्त्याच काम होऊन नियमात वागणा-या अन्य कुणाच नुकसान होणार असेल तर ते अन्यायकारक आहे. कोकण रेल्वेची कंत्राटे शिफारशी करत दंडवतेँनी आपल्या कार्यकर्त्याँना मिळवुन दिली असती तर कोकण रेल्वे साकारणारे ई.श्रीधरन सर्व शक्तिनीशी काम कधीच करु शकले नसते.आदर्श नेता आणि कार्यक्षम अधिकारी याचा अनोखा संगम म्हणजे कोकण रेल्वे...!
भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा त्याचे दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील. १९७७ मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन-आसमानाचा फरक होता. सेकंड क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून आणि झोपून प्रवास करावा लागत असे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या दंडवतेना लोकांचे हे हाल सहन होणे शक्यच नव्हते. त्यासाठीच भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरिब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतार देताना समाजवाद कोळून प्यायलेले दंडवते म्हणाले-
"मला फर्स्ट क्लासचे महत्व कमी करायचे नाही, मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे."
असा विचार करण्यासाठी एका समाजवाद्याचे मन असावे लागते. आजकाल समाजवाद फक्त निवडणुकामध्ये मतांचे राजकारण करण्यासाठी शिल्लक उरलाय. कदाचित ते 'समाजवादी मन' नाना आपल्या देहसोबत घेऊन गेले असावेत.
देशाच्या अर्थमंत्रीपदी असलेले दंडवते मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जाकरिता बँकेची पायरी चढले कारण दंडवतेँनी राजकरणातुन स्वतःसाठी कधीच पैसा कमावला नाही. आपल्या कार्यकर्त्याँनाही त्यांनी कधी पैसा उभारु दिला नाही. अशा दंडवतेँना पाडण्यासाठी गरीब जनतेला निवडणुकांच्या आदल्या दिवशी मटणाचे तुकडे, दारुच्या बाटल्या आणि पैशांची खैरात करण्यात आली. पैशांच्या सामर्थ्यापुढे दंडवतेँच्या तत्वांची पुण्याई अक्षरशः धारातीर्थी पडली. 'कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली' या सुरेश भटांच्या ओळी तंतोतंत ख-या ठरल्या. शेवटी एखाद्या पिढीतील लोकांची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. आमच्या पिढीने पैशांच्या म्रुगजळात मश्गुल होत दंडवतेँसारखा आदर्श नेता कोकणच्या राजकरणातुन संपवुन टाकत सत्तापिपासु गोचिडांना जन्म दिला. आपण काय करत आहोत हे समजण्याची किमान कुवत नसलेले आपमतलबी नेते पर्यावरणाचा विध्वंस करुन, कोकणला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. राजकीय दहशतवादाने कोकणची तुलना बिहारशी होऊ लागली आहे.
गाड्यांचा ताफा घेऊन न फिरता बसथांब्यावर बसची वाट पाहत रांगेत थांबलेले, जनतेचा सेवक म्हणुन आपला कार्य-अहवाल दरवर्षी लोकांसमोर ठेवणारे आणि कार्यकर्त्याँची कामे करण्यापेक्षा सर्वसमावेशक लोककल्याणावर भर देणारे दंडवते काळाच्या ओघात इतिहासजमा झाले आहेत. आताच्या नेतेमंडळीँना पाहुन दंडवतेँसारखा निस्प्रुह नेता कधी काळी राजकीय क्षितीजावर अढळ अशा ध्रुवता-याप्रमाणे चमकत होता, या गोष्टीवर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. काळाची गरज म्हणुन राजकरणात 'दंडवतेँचे सुवर्णपुर्व' पुन्हा आणावेच लागेल. दंडवतेँचे विचार एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आपल्या सोबत राहुन पुढचा मार्ग दाखवतील. फक्त गरज आहे ती या विचारांना कालबाह्य न मानता, वर्तमानातील गडद अंधारातुन उज्वल भविष्याकडे नेणारे मानणा-या समविचारी लोकांच्या एकजुटीची...!

...तर इतिहास तुम्हाला जाब विचारेल

कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँचा जेव्हा 1991 साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तेव्हा जेमतेम मी 1 वर्षाचा असेन. तोँडातुन बोबडे बोल देखील बाहेर पडत नव्हते. जेव्हा 20 वर्षाँचा झालो, कोकणचा राजकीय इतिहास वाचनात आला तेव्हा मीच घरच्यांना प्रश्न विचारला-

"बाबा, दंडवतेँसारखा कर्मयोगी निवडणुकीत कसा पराभुत होऊ शकतो...? एका सभ्य, विद्वान आणि मुख्य म्हणजे कोकण रेल्वे सत्यात उतरवणा-या कार्यक्षम खासदाराला नाकारण्या इतपत तुमची पिढी कशी काय बेईमान होऊ शकते...??"

मला उत्तर देताना बाबा शांतपणे म्हणाले-
"दंडवतेँना आमच्या पिढीने पराभुत केल ही खरी गोष्ट आहे. हेही खर की दंडवतेना निवडुन आणण्यात आमचे प्रयत्न अपुरे पडले. तु आमच्या पिढीकडे बोट दाखवु शकतोस पण मला किँवा घरच्यांना आणि आमच्यासारख्या दंडवतेँच्या अनेक कार्यकर्त्याँना जाब विचारु शकत नाहीस. दंडवतेँना निवडुन आणण्यासाठी एकही पैसा न घेता उन्हात किती मैल सायकल चालवुन प्रचार केला असेल याचा हिशेब आता आमच्याकडे नाही पण दंडवतेँच्या प्रचारासाठी रक्ताच पाणी केल एवढ मात्र नक्की...!दुर्देवाने या जगात बहुतांश वेळा सज्जनशक्तीचे प्रयत्न दुर्जनशक्तीसमोर अपुरेच पडतात. याचा अर्थ प्रयत्न करायचेच नाहीत असा होत नाही. त्यावेळी दंडवतेँना निवडुन आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले म्हणुनच आज तुला ताठ मानेने सांगु शकतो की दंडवतेँना पाडण्याच 'पाप' कोकणात ज्या लोकांनी केल त्या 'पापाचे भागीदार' आम्ही नव्हतो."

बाबांचे ते शब्द मला खुप काही शिकवुन गेले. त्यावेळीच मनाशी एक गोष्ट पक्की केली होती की कोकणच राजकरण पुन्हा पुर्वपदावर आणायच असेल तर दंडवतेँसारखा सभ्य, अभ्यासु आणि आपल्या भाषणांनी संसद गाजवणारा 'संसदपटु' कोकणचा खासदार बनवायला हवा. नंतर पाठिँबा देण्यासाठी 'दंडवतेँचा वारसदार' कोण बनु शकेल अशा नेत्यांचा शोध सुरु केला. तेव्हा घरातल्यांनीच उत्तर दिले दंडवतेँचा वारसदार शोधायची गरज नाही. सुरेश प्रभु हेच दंडवतेँचे खरे वारसदार आहेत. पण मला राजकरण समजेपर्यँत 2009 च्या निवडणुकीत दंडवतेँच्या वारसदाराचा म्हणजे सुरेश प्रभुंचा पराभव झाला होता.

तीन वर्षापुर्वी राजकरणाशी माझा काडीचाही संबंध नव्हता पण कोकणच्या मातीला वाचवण्याची इच्छा मनात कुठेतरी प्रबळ होत होती.'इच्छा तेथे मार्ग' उक्तीचा प्रत्यय माझ्या बाबतीत आला आणि फेसबुकच्या रुपात विचार मांडण्याच मोठ व्यासपीठ माझ्या मदतीला आल.

अस म्हणतात, इतिहासाची पुनरावव्रुत्ती होत असते. जे 1991 साली दंडवतेँच्या बाबतीत झाल, तोच इतिहास 2009 साली सर्वोत्क्रुष्ट केँद्रीय मंत्र्यांपैकी एक म्हणुन देशभरात नावाजलेल्या प्रभुंच्या नशीबी आला. प्रभुंचा निवडणुकीत पराभव झाला पण अवघ्या पाच वर्षात प्रभुंविना कोकणचे काय हाल होतील याची लोकांना जाणीव झाली. यंदा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कोकणची जनता आपली चुक सुधारुन सुरेश प्रभुंना निवडुन देणार याची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली होती आणि अचानक शिवसेनेत माशी शिँकली. प्रभुंना शिवसेनेकडुन पक्षाच तिकीट मिळणार नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मला कोकणच्या राजकीय इतिहासातील चुक सुधारायची होती. दंडवतेँच्या वेळी माझ्या घरचे हतबल असतील पण प्रभुंच्या बाबतीत मी हतबल नव्हतो. फक्त यावेळी लढाई प्रभुंचे तिकीट कापु पाहणा-या शिवसेनेतील स्वकीयांशी होती आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठीच लेखणीचे शस्त्र वापरण्याचा निर्धार मी केला. प्रभुविरोधकांविरुद्ध शाब्दिक तोफ धडाडल्यानंतर साहजिकच मतदारसंघातुन प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रभुंना भाजप, मनसे, एनसीपीचा पुर्ण पाठिँबा आहे. अगदी काँग्रेसचे काही कार्यकर्ते प्रभुंना छुपा पाठिँबा देतात. प्रभुंना विरोध होतोय तो त्यांच्याच पक्षातुन...! शिवसेनेत तीन भिन्न मतप्रवाह आहेत. बहुतांश शिवसैनिकांना पक्षहितासाठी विजयाची खात्री असलेले प्रभु उमेदवार म्हणुन पाहिजे आहेत, कट्टर शिवसैनिक पक्षाने दगड दिला तरी निवडुन देऊ या भावनेने काम करतायेत आणि जे प्रभुंच्या उमेदवारीला विरोध करतायेत त्यांची एकच तक्रार आहे-

"प्रभु निवडणुकांवेळी कार्यकर्त्याँना पैसे देत नाहीत."

मला या शिवसैनिकांना अजिबात दोष द्यायचा नाही. आज त्यांच्यासारखे भगव्यासाठी रक्त देणारे शिवसैनिक आहेत म्हणुनच शिवसेना पक्ष मानाने उभा आहे. शिवाय घरात बसुन लेख लिहिणा-या माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी उन्हातान्हात भटकणा-या शिवसैनिकांची व्यथा कशी काय समजणार...? ज्या शिवसैनिकांचा चरितार्थ राजकरणावर अवलंबुन आहे त्या शिवसैनिकांना प्रभुंनी पैसा पुरवायलाच हवा या मताचा मी आहे.2009 च्या निवडणुकीत प्रभुंनी कार्यकर्त्याँना पैसा दिला नसेलही पण एवढ्या एका कारणासाठी त्यांना विरोध करायचा का...? कोकणात राणे कुटुंबीय आणि काँग्रेसला मुळापासुन उखडुन टाकत भगवा मानाने फडकवणे हे माननीय बाळासाहेबांचे अधुरे स्वप्न होते. प्रभुंना तिकीट दिल्यावर काँग्रेसचा नक्की पराभव होतोय आणि भगवा फडकवुन बाळासाहेबांचे स्वप्न देखील पुरे होतेय. अशा परिस्थितीत बाळासाहेबांच्या स्वप्नाला निवडणुकीतुन मिळणा-या पैशासाठी बगल देणे कितपत योग्य आहे याचा विचार एकदा करावाच लागेल. यंदाच्या निवडणुकीत प्रभुंचा विजय निश्चित असल्याने कार्यकर्त्याँवर कराव्या लागणा-या खर्चाची बोलणी प्रभुंना तिकीट देताना समोरासमोर बसुन करता येऊ शकते पण प्रभुंना तिकीट न देण्याचा टोकाचा निर्णय घेणे हा पर्याय असु शकत नाही.

प्रभुंच्या विजयाची राजकीय गणितं मी याअगोदरच्या लेखात मांडली आहेत आणि सिँधुदुर्गातील कित्येक पत्रकारांनाही ती ज्ञात आहेत. तरीही राणेँच्या भितीने म्हणा किँवा त्रयस्थाच्या भुमिकेत शिरल्यामुळे खाजगीत 'प्रभुच उमेदवार पाहिजेत' म्हणणा-या कोणत्याही पत्रकाराने आजतगायत वर्तमानपत्रात आपली भुमिका मांडलेली नाही. आज फेसबुकवरील माझ्या लेखांप्रमाणे वर्तमानपत्रात कोणीतरी पत्रकाराने लेख लिहुन शिवसेना पक्षश्रेष्ठीँना ग्राऊंड लेवलची जाणीव करुन देणे गरजेचे होते. जनतेचा काँग्रेसच्या उमेदवाराला तीव्र विरोध आहे याचा अर्थ असा नव्हे की शिवसेना कोणताही उमेदवार आमच्यावर लादेल आणि काँग्रेसला विरोध करण्यासाठी लोक झक मारत का होईना शिवसेनेच्या उमेदवाराला नंदीबैलाप्रमाणे माना डोलावतील. बाळासाहेबांप्रमाणे शिवसेना पक्षानेही कोकणच्या लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सुरेश प्रभूच शिवसेनेचे उमेदवार व्हावेत हिच जनसामान्यांची भावना आहे. मध्यंतरी संतापलेल्या लोकांना शांत करण्यासाठी प्रभुंना राज्यसभेवरुन खासदारकी देण्याच्या गोष्टी शिवसेनेकडुन केल्या जात होत्या. वेणुगोपाल धुत यांना राज्यसभा बहाल करुन सेनेने इकडेही लोकांच्या तोँडाला पाने पुसली आहेत.

केँद्रात मोदीँच सरकार येणार हे सांगायला आता कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. आपल्या कारकिर्दीत ऊर्जा आणि पर्यावरण खाते गाजवणा-या प्रभुंना मोदीसरकारमध्ये कँबिनेट दर्जाच महत्वाच खात मिळणार हेही निश्चितच आहे. 2002 नंतर तब्बल 12 वर्षानी कोकणच्या नशीबात केँद्रीय मंत्रीपदाचा योग आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर कोकण प्रांताचा होणारा विकास असा नजरेसमोर दिसतोय. अशा वेळी आपण सर्वाँनी शिवसेनेने प्रभुंनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षाकडे धरायला हवा. इतिहास चुक सुधारायची दुसरी संधी कोणालाच देत नसतो. दंडवतेँच्या राजकीय अस्तानंतर कोकणने खुप काही गमावले आहे आणि आता प्रभुंचा राजकीय अस्त उघड्या डोळ्यांनी बघण कोणालाच परवडणार नाही. 4 फेब्रुवारील शिवसेना उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वैयक्तिक संपर्क, फोन, पत्र, ईमेल वाट्टेल त्या माध्यमातुन शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख यांची भेट घ्या. त्यांना आम्हाला प्रभुच उमेदवार पाहिजेत अन्यथा मत मागायला येऊ नका ही गोष्ट ठासुन सांगा. गेले 2 महिने मी प्रभुंचा प्रामाणिकपणे प्रचार केला, मला शक्य असेल त्या सर्व मार्गाँनी प्रभुंना उमेदवारी मिळवुन देण्याचा प्रयत्न केला, तरी सेनेने प्रभुंना उमेदवारी दिली नाही तर मला वैयक्तिक अपराधी वाटण्याचे काहीच कारण नाही. माझ्या प्रयत्नात कुठेही कसुर झालेली नाही. अगदी बाजी प्रभुंसारखी दोन्ही हातात शब्दांच्या तलवारी घेऊन एकट्याने शेवटपर्यँत खिँड लढवली.भविष्यात माझा पोरगा मला विचारेल की,
"तुमच्या पिढीने प्रभुंसारखे विद्वान शिवसेनेत एकटे पडलेले असताना त्यांना पाठिँबा का दिला नाही...?"
तेव्हा माझ्या वडीलांसारखेच मी माझ्या मुलाला अभिमानाने उत्तर देऊ शकेन की,
"बेटा, प्रभुंना उमेदवारी मिळावी म्हणुन मी एकट्याने झुंज दिली होती."

मित्रांनो, तुम्ही पुढच्या पिढीला काय उत्तर देणार आहात...? प्रभुंची उमेदवारी सेनेकडुन काढुन घेतली जात असताना आम्ही शंडासारखे गप्प बसलो...?? नाही ना...??? मग अजुन चार दिवस शिल्लक आहेत. प्रभुनामाचा जप करुन शिवसेना नेत्यांना खडबडुन जागे करा. इतिहास घडवण्याची संधी वारंवार मिळत नसते. आपण एका ऐतिहासिक निवडणुकीचे जीवंत साक्षीदार असणार आहोत हे ध्यानात असु द्या.

लेखाच्या शेवटी 23 जानेवारीला प्रतिज्ञा करायला गेलेल्या शिवसेना तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुखांना एवढच सांगेन की बाळासाहेबांशी केलेल्या प्रतिज्ञेला जागा. त्वरित सेनाभवनात तिकीट वाटपासाठी बसलेल्या पक्षश्रेष्ठीँना मतदारसंघातील लोकांच्या प्रभुंप्रती असलेल्या भावना कळवा. प्रभुंना लोकसभेचे तिकीट मिळाले तर चिँता नसावी. विजय आपलाच आहे...!!!

तत्वांशी तडजोड प्रभूंना शक्य नाही...


तत्वांशी तडजोड प्रभूंना शक्य नाही...!"

आजकल एक नवीनच आरोप माजी केँद्रीय मंत्री सुरेश प्रभूंवर होतोय की-

"सुरेश प्रभू मतदारसंघात कधीच फिरत नाहीत."

एखाद्या नेत्यावर आरोप करायला काही मुद्देच शिल्लक नसतात तेव्हा असले फालतु आरोप केले जातात. त्यात प्रभुंचा काहीच दोष नाही.
आरोप करणा-या अर्धवटांना खासदाराचे नक्की काम काय असते याची साधी कल्पना तरी आहे का...? मतदारसंघात गहन बनलेले प्रश्न दिल्लीतील संसदेत मांडुन त्या प्रश्नावर अवघ्या देशाचे लक्ष वेधुन घेण्याचे काम खासदाराला संसदीय कार्यप्रणालीत बहाल केले आहे. सुरेश प्रभुंनी एका खासदाराचे कर्तव्य चोखपणे बजावत आपल्या कारकीर्दीत मतदारसंघातले विविध 900 प्रश्न मांडले. एवढेच नाही तर देशासाठी गंभीर बनलेल्या अनेक विषयांवर आपल्या अमोघ वक्त्रुत्वाच्या जोरावर संसदेने जतन करुन ठेवावीत अशी भाषणे केली. बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते अशा संसदपटुंनी राजापुर मतदारसंघाची 'सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ' अशी जी परंपरा तयार केली होती ती कायम ठेवली. सुरेश प्रभुंना 'दंडवतेँचा वारसदार' उगाच नाही म्हणत...!
अगदी अलीकडेच 'गौण खनिजाचा प्रश्न' जेव्हा मतदारसंघात गंभीर बनला तेव्हा माजी खासदार सुरेश प्रभुंनीच दिल्लीतले आपले वजन वापरुन केँद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन तो निकालात काढला. विद्यमान खासदार गौण खनिज प्रश्नी संसदेत का आवाज उठवु शकले नाहीत...? स्वतःच्या मतदारसंघात लोकांसमोर डरकाळ्या फोडणारे नेते संसदेत मात्र म्याव होऊन बसतात कारण संसदेत तोँड उघडण्यासाठी दिल्लीत शब्दाला वजन असावे लागते. सुरेश प्रभुंच्या शब्दाला दिल्लीत किँमत आहे म्हणुनच ते मतदारसंघातले प्रश्न संसदेत मांडु शकतात. विद्यमान खासदार पाच वर्षात केवळ 60 मिनीटे सुद्धा बोलले नाहीत. आता त्यांच्या शब्दाला दिल्लीत किँमत आहे का नाही ते तुम्हीच ठरवा. संसदेत बोलुन मतदारसंघाचे प्रश्न मांडता येत नसतील तर नक्की खासदार तरी कशासाठी बनलात याचे उत्तर द्या.

दिल्लीत संसदेत बोलता येत नसेल आणि जनतेचे प्रश्न मांडता येत नसतील तेव्हा त्या खासदाराला मतदारसंघात रिकामटेकपणा करत फिरल्यावाचुन आणखी काही काम राहत नाही. खासदाराने मतदारसंघात फिरायचे तर आमदार, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रा.पं.सदस्य यांचे काम काय याच उत्तर विद्यमान खासदार देतील काय..?जर खासदारानेच मतदारसंघात फिरायचे असेल तर यापुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची पदे नष्टच करुन टाकलेली बरी...! संविधान बनविणा-यांची आणि घटनादुरुस्ती करणा-यांची डोकी ठिकाणावर नव्हती अस विद्यमान खासदारांना म्हणायच आहे का...? अगोदर संविधानाचा नीट अभ्यास करा मग नाथ पै, दंडवते, प्रभू यांच्यासारखे संविधानाला पुज्य मानणारे विद्वान खासदार मतदारसंघात का फिरत नाहीत याचा प्रत्यय येईल.

नाथ पै,दंडवते कधी साकव, पुलांच्या फिती कापत मतदारसंघात फिरत नसत. दंडवतेँनी मतदारांना खडसावुन सांगितले होते की साकवाच्या फिती कापल्यामुळे तुम्ही मला मत देणार असाल तर मला एकही मत मिळता कामा नये. अशी काम करत फिरण खासदार म्हणुन माझ्या तत्वात बसत नाही. याला म्हणतात तत्वांचा पुजारी...! प्रभुंनी मतदारसंघात विनाकारण न फिरण्याची दंडवते, नाथ पै यांची परंपरा कायम राखली आहे.
एनडीए सरकारच्या काळात सुरेश प्रभु सर्वोत्क्रुष्ट काम करणा-या मंत्र्यांपैकी एक होते. त्यांना मिळालेल्या ऊर्जा आणि पर्यावरण खात्यात त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वाजपेयीँनी प्रभुंना महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्षपद दिले होते. या प्रकल्पामुळे देशाला दुष्काळ आणि पुरापासुन कायमची मुक्ती मिळणार आहे. आता नदीजोड प्रकल्पाचे काम करायचे सोडुन प्रभू मतदारसंघात फिरणार आहेत का...? अशा देशहिताच्या प्रकल्पाचा राजापुर मतदारसंघाचा खासदार अध्यक्ष होतो याचा खर तर कोकणवासियांना अभिमान वाटायला हवा पण इथेही खेकडाप्रव्रुत्तीच दिसुन येते. प्रभुंवर टिका करणा-यांनी अगोदर एका केँद्रीय मंत्र्याच्या जबाबदा-या काय असतात याचा विचार करा. कधीतरी मतदारसंघापुरता संकुचित विचार न करता देशहिताचा व्यापक विचार करा. अगदी मतदारसंघाचा विचार केला तरी सुरेश प्रभुंएवढा कोकणचा विकास आजपर्यँत कोणीही करु शकलेला नाही. प्रभुंनी केलेला कोकणचा विकास समजावुन घेण्यासाठी 19 जानेवारीला तरुण भारतच्या 'अक्षरयात्रा' पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा 'कोकण विकासाच्या दाहि दिशा' हा लेख वाचा.प्रभुंनी केलेला कोकणचा विकास लक्षात आल्यानंतरही 'सुरेश प्रभु मतदारसंघात फिरत नाहीत' असे आरोप ज्यांना करायचे असतील त्या खेडग्या लोकांना दंडवतेँच्या भाषेत उत्तर देताना एवढच सांगेन की-

तुम्हाला 'गाव तिथे दहीहंडी' किँवा 'गाव तिथे खासदार' म्हणत कामाशिवाय गावात भटकणारा, 'खासदार चषक' स्पर्धा भरवुन क्रिकेटचे फड रंगवणारा खासदार पाहिजे असेल तर क्रुपया तुम्ही सुरेश प्रभुंना तुमचे मत देऊ नका. प्रभु असली कामे करुन आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाहीत. प्रभु दंडवतेँचे वारसदार होते आणि यापुढेही राहतील. त्यासाठीच दंडवतेँची कार्यपद्धती अनुसरणे त्यांना अपरिहार्य आहे.

मतदारसंघातील एखाद्या गावात यायची खरच गरज असेल तर प्रभु नक्की त्या गावाला भेट देतील पण देशहितासाठी करावी लागणारी महत्वाची कामे बाजुला ठेवुन रिकामटेकडेपणा करत मतदारसंघात विनाकारण फिरणार नाहीत. मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांना दिल्लीत वाचा फोडुन न्याय मिळवुन घ्यायचा असेल तर आणि तरच प्रभुंना मत द्या.

मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षणातुन साकारेल रोजगाराचे वैभव..

शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील तरुणांना MPSC, UPSC, बँक आँफिसर्स आणि क्लर्क भरती, डी.एड भरती, इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने कायमस्वरुपी प्रशिक्षण केँद्र कुडाळात निर्माण करण्यात आले आहे, ही बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या वैभव नाईकच्या निर्णयाला मनापासुन दाद द्यावीशी वाटली. सिँधुदुर्गच्या निर्मितीवेळी 'चाकरमान्यांच्या मनीआँर्डरवर जगणारे लोक' अशी जिल्ह्याची प्रतिमा तयार झाली होती. आज 30 वर्षानंतर मनीआँर्डची जागा एटीएमने घेतली तरीही आपले विद्यार्थी शिक्षण आणि नोकरी यांकरिता अजुनही मुंबई, पुणे, बेँगलोर सारख्या शहरांवर अवलंबुन राहावेत ही या जिल्ह्याचीच नव्हे तर सिँधुदुर्गच्या तमाम जनतेची विटंबना आहे. या परिस्थितीला कारणीभुत आहे ती शैक्षणिक विकासाच्या बाबतीत उदासीनता दाखवणारी सिँधुदुर्गातील नेतेमंडळी...! जिल्ह्यात गुणवत्तेची कमी असती तरी या उदासीनतेला माफी देता आली असती, परंतु स्वतंत्र कोकण बोर्डाची स्थापना झाल्यावर दहावीच्या निकालात दरवर्षी महाराष्ट्रात आपण आघाडीवर आहोत. 'लातुर पँटर्न' मागे पडुन आता 'सिँधुदुर्ग पँटर्न' अस्तित्वात येऊ लागलाय. मात्र दुर्देवाने गुणवत्ता ठासुन भरलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्याँना दहावीनंतर सिँधुदुर्गातील अपु-या शैक्षणिक सुविधांमुळे मोठ्या शहरांचा आश्रय घ्यावा लागतोय. दरवर्षी हजारो विद्यार्थी जिल्हा सोडुन स्थलांतरित होतायेत आणि त्याच वेळी दरडोई उत्पन्न वाढल्याचे आकडे आपण अभिमानाने मिरवतोय. लोकसंख्या स्थलांतरित होऊन कमी झाली की दरडोई उत्पन्न वाढणारच हा साधा हिशोब आहे. त्यात करुन सिँधुदुर्गात एकीकडे मुठभर लोकांकडे करोडोँची संपत्ती एकवटली आहे तर दुसरीकडे बहुतांश लोक हलाखीच्या परिस्थितीत जगतायेत. अशा वेळी दरडोई उत्पन्नाचे आकडे दाखवुन जिल्ह्याचा विकास झाला असे सांगणे किती उचित ठरेल...? सध्याच्या स्पर्धात्मक युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी नुसती शैक्षणिक पदवी असुन भागत नाही तर प्रत्येक ठिकाणी 'स्पर्धा परीक्षा' पास होणे अनिवार्य बनले आहे.
मुंबई, पुण्यासारख्या शहरात मध्यम गुणवत्ता असलेली मुले मोठमोठे क्लास लावुन स्पर्धा परीक्षात यश मिळवण्याचे तंत्र शिकुन घेतात. मात्र सिँधुदुर्गातील गुणवान विद्यार्थ्याँना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षणच भेटत नसल्याने अपयशाला सामोरे जावे लागते. तीन वर्षापुर्वी डी-एड भरतीत 589 पैकी केवळ 14 जागा सिँधुदुर्गातील विद्यार्थ्याँना मिळाल्या. याला कारण त्यांना स्पर्धा परीक्षांचे मिळालेले अपुर्ण प्रशिक्षण होते. मात्र समस्येच्या मुळाशी न जाता परजिल्ह्यातुन सिँधुदुर्गात निवड होत नोकरी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याँना मारझोड करत सिँधुदुर्गाच्या डी.एड. भरतीतील अपयशावर पांघरुण घालण्यात आले. आजपर्यँत सिँधुदुर्गातील किती विद्यार्थी जिल्ह्यात राहुन MPSC, UPSC, राष्ट्रीयक्रुत बँकांसारख्या परीक्षांमध्ये पास होऊन उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत...? या प्रश्नाच उत्तर कोणी देणार आहे का...?? इतक्या वर्षात सिँधुदुर्गात आपण स्पर्धा-परीक्षा केँद्र निर्माण करु शकलो नाही याची विकासाच्या बाता मारणा-यांना खर तर लाज वाटली पाहिजे.
शिक्षणाच्या बाबतीत दयनीय अवस्था असल्याने जिल्ह्यात वैभव नाईकने उभारलेल्या स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केँद्राचे महत्व आणखीनच वाढते. आजही गावागावात क्रिकेट स्पर्धाँनी उच्छाद मांडलेला दिसतोय. खासदार चषक, आमदार चषक अशा गोँडस नावाखाली क्रिकेटच्या स्पर्धाँवर दरवर्षी नाहक लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. क्रिडा विकासाला माझा मुळीच विरोध नाही. जिल्ह्यातुन चांगले खेळाडु किँवा अगदी क्रिकेटर तयार झाले तर मला आनंदच होईल पण ते खेळाडु तयार करण्याऐवजी लाखो रुपयांची बक्षीसे देऊन त्यांना आपापसात झुंजवुन करमणुक करुन घेणे हा उपाय नक्कीच नाही. या स्पर्धाँमध्ये सामील होणा-या किती खेळाडुंना क्रिकेटचे योग्य तंत्र अवगत असते...? त्यापेक्षा हेच लाखो रुपये खर्च करुन एखादे क्रिकेट प्रशिक्षण केँद्र आणि राष्ट्रीय स्तराचे स्टेडियम उभारुन रमाकांत आचरेकरांसारखे गुरुवर्य उपलब्ध करुन दिल्यास भविष्यात सिँधुदुर्गात देखील चांगले क्रिकेटर निर्माण होतील. मात्र क्रिकेटच्या स्पर्धाँना भरघोस बक्षीसे प्रायोजित करुन निवडणुकांच्या वेळी गावोगावी कार्यकर्ते निर्माण करायचे उपटसुंभ धंदे सध्या सर्रास सुरु आहेत.
एक अख्खीच्या अख्खी पिढी क्रिकेटच्या नादी लावुन बिघडवायला या अशा स्पर्धाँना पैसे पुरवणारी नेतेमंडळी कारणीभुत आहे. लोकांनी सर्वप्रथम अशा स्पर्धा भरवणा-या नेत्यांनाच निवडणुकीत अद्दल घडवली पाहिजे म्हणजे वाट चुकुन भरकटलेली तरुण पिढी योग्य रस्त्यावर येईल. एखाद्या नेत्याच्या नादी लागुन त्याचा कार्यकर्ता म्हणुन मिरवत क्रिकेटच्या स्पर्धा खेळुन आपले आणि आपल्या परिवाराचे आयुष्य बरबाद करणा-या तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांचे महत्व समजावुन द्यायला हवे. त्याद्रुष्टीनेच स्पर्धा परीक्षांचा जिल्ह्यात प्रसार करण्याच्यासाठी अशी प्रशिक्षण केँद्रे उभारणा-या वैभव नाईक सारख्या तरुण नेत्याला राजकरणापलीकडे जाऊन आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पाठबळ द्यायला हवे. जैतापुरसारखा विनाशकारी अणुप्रकल्प कोकणच्या माथी मारताना त्यात वीस हजार लोकांना रोजगार मिळेल असे आमिष दाखवण्यात येत आहे. अणुप्रकल्पात चांगल्या पदावर नोकरी मिळवण्यासाठी फिजीक्स विषयात उच्च शिक्षण मिळवणे आवश्यक असते. सिँधुदुर्गात फिजीक्समधील उच्च शिक्षणाची सोय फारच कमी ठिकाणी उपलब्ध आहे.
त्यामुळे जैतापुर अणुप्रकल्पात कोकणातील लोकांच्या तोँडाला पाने पुसुन पुन्हा परप्रांतियांनाच नोक-या देण्यात येतील. त्याच वेळी गरम पाणी समुद्रात सोडल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील मच्छिमार आणि किरणोत्सारामुळे आंब्याचे व्यापारी देशोधडीला लागतील. मग असला विनाशकारी विकास काय कामाचा...? 2009 च्या निवडणुकीत आयटी पार्कचे दिलेले आश्वासन सत्ताधा-यांनी पुर्ण केले असते तर ख-या अर्थाने सिँधुदुर्गातील लोकांना रोजगार प्राप्त झाला असता पण निवडणुका जिँकल्यावर आयटी पार्कचे आश्वासन हवेतच विरले. सी-वर्ल्ड प्रकल्प रोजगार मिळवुन देण्याच्या द्रुष्टीने आदर्शवत असाच होता पण त्या प्रकल्पासाठीही 230 एकर जमिनीची गरज असताना वाढीव 1350 एकर जमीन जागा जबरदस्तीने लाटण्याच्या प्रयत्नात सिँधुदुर्गच्या विकासाची पाटी शेवटी कोरीच राहिली. सिँधुदुर्गातुन शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातच रोजगारांची उपलब्धता करुन देणे आणि स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षण केँद्रे जिल्ह्यात स्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी राजकीय हेवेदावे विसरुन युवा वर्गाच्या उद्धारासाठी सर्वपक्षीय एकी दाखवली गेली पाहिजे.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केँद्रात शहरांच्या धर्तीवर उच्च प्रतीचे शिक्षण देणारे किमान 10 ते 12 शिक्षक कायमस्वरुपी ठेवले पाहिजेत. विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके, संदर्भ-ग्रंथ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे लागतील. त्यासाठी किमान आठ लाख पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय स्पर्धा परीक्षा केँद्रासोबत तयार करावे लागेल. प्रशिक्षण केँद्रातच बसुन ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर करुन अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्याँना स्वतंत्र अभ्यासिकांची सोय करुन द्यावी लागेल. पुन्हा या सगळ्या सोयी माफक दरात विद्यार्थ्याँना उपलब्ध करुन द्याव्या लागतील आणि हेच वैभव नाईकसमोर मुख्य आव्हान असेल. जिल्ह्यातील बाकीची नेतेमंडळी शिक्षण विकासाच्या बाबतीत हातावर हात धरुन उदासीन असताना, जिल्ह्यातुन 100 विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण करुन आणण्याचा मानस जेव्हा वैभव व्यक्त करतो, तेव्हा त्याच्या धैर्याला सलाम करावासा वाटतो. पुढील काळात खेकडा प्रव्रुत्तीचे प्रदर्शन न करता सगळेच वैभव नाईकला या प्रयत्नात साथ देतील आणि भविष्यात सिँधुदुर्गातुन प्रशासकीय अधिकारी निर्माण होऊन 'वैभवमय' अशी पहाट उगवेल ही अपेक्षा व्यक्त करुन इथेच थांबतो.

रविवार, ५ जानेवारी, २०१४

500 कोटीची धुम...



धुम-3 चित्रपट 20 डिसेँबरला प्रदर्शित झाला पण नेमकी 21 डिसेँबरला माझी परीक्षा आडवी आल्याने परवा नववर्षाच्या शुभमुहुर्तावर 1 जानेवारीला 12 वाजता धुम-3 थिएटरमध्ये जाऊन बघितला. चित्रपट खास थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठी मी स्वतःला काही नियम बनवुन घेतले आहेत.
1) चित्रपट हिँदी असला आणि त्यात आमिर खान असला की तो मी बघणारच.
अगदी थ्री इडियट्स नंतर मी फक्त धोबीघाट हा आमिरचा लो बजेट चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये जाऊनच बघितला होता.
2)  आमिर खान प्रोडक्शनचा सिनेमा असेल तर तो सुद्धा आवर्जुन बघतो.
3) अभिनेत्रीच म्हणाल तर विद्या बालनचे बहुतेक (सगळेच नव्हे) चित्रपट मी आवर्जुन बघायचो.
4) मराठी चित्रटात एक तर सतीश राजवाडे दिग्दर्शक असेल किँवा स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी असेल किँवा अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, म्रुणाल कुलकर्णी, पल्लवी सुभाष यापैकी कोणीही असेल तर चित्रपट पाहण्याचा मी नक्कीच पाहायचा प्रयत्न करतो.

सांगायचा मुद्दा एवढाच की या सगळ्यांचे चित्रपट पाहिल्यावर मनात असो वा नसो ते तुम्हाला विचार करायला प्रव्रुत्त करतात किँवा विनोदी, रोमँटिक असतील तर निखळ आनंद जरुर देतात.मात्र तिकीटाचे पैसे वाया गेल्याचे दुःख कधीच देत नाहीत. गेल्या वर्षी आमिर खानने धुम-3 चित्रपट स्वीकारला आणि एक चाहता म्हणुन माझी घोर निराशा झाली. तिन्ही खानची माझ्या मनात एक इमेज तयार झाली आहे.

त्यापैकी शाहरुख खान हा नटीच्या जीवावर चालणारा किँवा नटीच्या मागे नाच्यावानी नाच करत पुढे आलेला अभिनेता आहे. ज्या लोकांना नट्यांसोबतचे माकडचाळे आवडतात ते त्याला उचलुन घेतात. मी त्याचा चित्रपट ढुंकुनही पाहत नाही.
अपवाद- स्वदेस, चक दे.

ज्यांच्या डोक्यात मेँदु हा अवयव नसतो किँवा ज्यांना मेँदु काढुन चित्रपट बघायला आवडतात त्यांना सलमान खान आवडतो. निव्वळ हाणामारी, पाणचट विनोद या पलीकडे सलमानच्या चित्रपटात अजुन काही पाहायला मिळत नाही. बाँडीबिल्डीँगची आवड असणारा सलमानचा चाहता वर्ग त्याचे दबंग, वाँटेड, रेडी, दबंग 2, एक था टायगर सारखे कथाहिन चित्रपट यशस्वी करतो.

तिसरा खान म्हणजे आमिर खान...! सरफरोश, लगान, रंग दे बसंती, मंगल पांडे, तारे जमीन पर, थ्री इडियट्स सारखे सामाजिक संदेश असणारे चित्रपट देऊन त्याने आमिर खान हा इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा का आहे याची प्रचीती दिली.अशा आमिरने धुम-3 चित्रपटात काम करणे त्याच्या माझ्यासारख्या दर्दी चाहत्याला पचणारे नव्हते.

दुसरीकडे चित्रपट चांगला की वाईट हे त्याच्या कमाईवर ठरवण्याचा नवीनच प्रकार सुरु झालेला.
थ्री इडियट्सने तीन वर्षापुर्वी 206 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर डाँलरच्या तुलनेत रुपयाची किँमत कितीतरी घसरली होती, मल्टिप्लेक्सची संख्या वाढली होती, तरीही आमिरचा विक्रम मोडणे सलमान किँवा शाहरुखला शक्य झाले नव्हते. शेवटी रडत-मरत शाहरुख खानच्या टुकार अशा चेन्नई एक्सप्रेसने 226 कोटी कमावुन आमिरचा विक्रम तोडला.  त्यानंतर क्रिश-3 248 कोटी कमावुन पहिल्या क्रमांकावर गेला. आता वेळ सरपटत चालणा-या सरड्यांना त्यांची धाव कुंपणापर्यँत असते हे दाखवण्याची होती.

हिँदी चित्रपटस्रुष्टीत आमिर खानला मात देणारा अभिनेता जन्माला यायचा आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त कमाई करुन दाखवणे हे आव्हान आमिरसमोर होते. आमिर धुम-3 चे शाहरुखप्रमाणे बेभान होऊन छोट्या पडद्यावर प्रमोशन करेल अशी अपेक्षा होती. माझे चित्रपट लोक स्वतःहुन थिएटरमध्ये जाऊन बघतात, त्यासाठी प्रमोशनची गरज नाही हे सांगुन आमिरने आपला आत्मविश्वास दाखवला. धुम-3 रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 36 कोटीची रेकाँर्डतोड कमाई करुन आमिर खानच्या प्रेक्षकांमध्ये असलेल्या विश्वासाहार्तेवर शिक्कामोर्तब केले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला होता की फिल्मच्या कमाईत शुक्रवार, शनिवार, रविवार या पहिल्या तीन दिवशी मिळणारी कमाई ही हिरोच्या क्रेडिबीलीटीवर ठरते. मात्र नंतर त्या चित्रपटाचे कथानक चांगले असेल तरच तो सुपर-डुपर हिट होतो. कदाचित धुमचे कथानक सर्वोत्क्रुष्ट दर्जाचे नाही याची आमिरसारख्या फिल्मच्या जाणकाराला अगोदरच कल्पना असावी. कमजोर कथानक असुनही गेले 2 आठवडे धुम-3 बाँक्स आँफिसवर जो धुमाकुळ घालत आहे यावरुनच आमिरच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

धुम-3 प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानवर फक्त टिका करायची या उद्देशानेच काही प्रतिक्रिया फेसबुकवर झळकल्या.
1) आमिरने फिजिक्सच्या नियमांची वाट लावली आहे.
2) दोरखंडावरुन कोणी बाईक चालवत का...?
3) बिल्डीँगवरुन कोणी धावु शकत का...?

क्रिश कोसळणारी बिल्डीँग हाताने धरु शकतो मग आमिर खान का करु शकत नाही...?
नव्हे क्रिश म्हणे 'सुपरहिरो' होता.म्हणजे या तथाकथित टिकाकारांच्या मते सुपरहिरो लेबल लावल्याशिवाय फिजीक्सचे नियम तुडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

मग मला वाटत सलमान खान पोलिस बनुन जवळजवळ सगळ्याच चित्रपटात हा अतिरंजीतपणा करतो आणि लोक त्याला शिट्ट्या मारुन भरघोस कमाई देखील मिळवुन देतात. त्यावेळी या टिकाकारांचा आक्षेप नसतो.
आता म्हणतील सलमान 'पोलिस' होता आणि आमिर 'चोर' आहे.

'धुम' आणि 'धुम-2' चा सिक्वेल असलेल्या 'धुम-3' कडुन नक्की या टिकाकारांची काय अपेक्षा होती...?
आमिर खान बँक लुटुन बँगेत पैसे घेऊन सायकलवर बसुन पळण्याचा प्रयत्न करेल. नंतर पोलिस बैलगाडीतुन त्याचा पिच्छा करतील.
हा प्रसंग तुम्हाला नक्कीच रिअँलिस्टिक वाटला असता आणि तोच थिएटर मध्ये जाऊन बघण्यासाठी तुम्ही 300 रुपये देऊन तिकीट खरेदी करणार होता का...?

'धुम-3' म्हणजे तद्दन गल्लाभरु आणि सलमानच्या चित्रपटाप्रमाणे डोक बाजुला ठेवुन पाहण्याचा चित्रपट होता, हे माहिती असताना असे चिकीत्सक लोक मुळात चित्रपटग्रुहात गेलेच कशासाठी...? कदाचित लवकरात लवकर चित्रपट पाहुन आमिरवर कशी टिका करता येईल यातच त्यांना स्वारस्य असावे.काहीँनी नवीनच युक्तीवाद केला. त्यांच्या मते यापेक्षा कितीतरी चांगले अँक्शनपट हाँलिवुडमध्ये असतात. धुम-3 मध्ये एवढ काय आहे...?
अरे, हाँलिवुडबद्दल एवढा अभिमान असेल मग तुम्ही हाँलिवुडपटच पाहा ना...! आमिर काय तुमच्या घरी श्रीफळ घेऊन निमंत्रण द्यायला आला नव्हता.

धुम-3 एँक्शनपट म्हणुन गाजला असे म्हणण्यापेक्षा ती अँक्शन करणारा आमिर खान होता म्हणुन गाजला. उदाहरणच द्यायचे झाले तर सनी लियोन, मल्लिका शेरावत, नेहा धुपिया अशा थर्ड क्लास अभिनेत्रीँना घेवुन प्रणयद्रुश्यांनी भरलेला एखादा चित्रपट असेल तरीही तो फ्लाँप होतो. त्याच वेळी ऐश्वर्या राय, करिना कपुर, विद्या बालन, दिपीका पादुकोन अशा नामवंत नट्यांनी एखादा किसीँग सीन दिला तरी लोक तिकीट काढुन चित्रपट बघतात कारण लोकांच्या द्रुष्टीने प्रणयद्रुश्ये महत्वाची नसतात तर ती देणारी अभिनेत्री महत्वाची असते. अगदी त्याचप्रमाणे अँक्शनपट अनेक अभिनेते करतात पण धुम-3 आमिरने केला म्हणुन तो खास होता.

सध्याच्या काळात टाँपवर असलेल्या कँटरिना कैफसारख्या अभिनेत्रीला धुम-3 मध्ये पुर्णपणे झाकोळुन टाकत आमिर खान स्वतःचे चित्रपट स्वतःच्या जीवावर चालवुन दाखवतो,हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आमिरच्या चित्रपटात नट्या फक्त नावालाच असतात. माझ्या मते धुम-3 सारख्या गल्लाभरु चित्रपटात कँटरिना कैफला घेतलच असेल तर तिला टु-पीस वर उतरवणे आणि बेडसीन्सचा समावेश करणे ही चित्रपटाची खरी गरज होती. कँटरीना अशा सीन्सना इन्कार देत असेल तर तिला हाकलुन देत दुस-या नटीचा समावेश करायला पाहिजे होता. शेवटी कँटरीना कैफ म्हणजे घरंदाज ऐश्वर्या राय किँवा माधुरी दिक्षित नव्हे. बुम चित्रपटात हिचे प्रताप सगळ्यांनीच पाहिले आहेत. धुम-3 चित्रपटा अगोदर कँटरीनाच्या पेहरावाबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या पण प्रत्यक्षात अनेकांचाच भ्रमनिरास झाला. कँटरीना कैफच्या नाँर्मल लुकमुळे धुम-3 चित्रपटाच उत्पन्न ब-याच प्रमाणात घटल.

प्रत्यक्ष चित्रपटाबद्दल बोलायच झाल तर मध्यांतरापर्यँत अभिषेक बच्चनच्या रिक्षामधुन एंट्रीचा एक सीन वगळता चित्रपट अप्रतिम वाटतो. आमिर खानने साहिर उत्क्रुष्टरित्या साकारला आहे. मध्यांतरानंतर आमिर खानचा डबलरोल उलगडण्याच्या नादात फ्लँशबँकचा भाडीमार करुन मध्यांतरापुर्वी पाहिलेली तीच तीच द्रुश्ये पुन्हा बघताना चित्रपट कंटाळवाणा वाटु लागतो. त्यात भर पडते ती वेशभुषा बदलुन पाणचट विनोदांचा भाडीमार करणा-या अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा या जोडगोळीची...! उदय चोप्राला अभिनेता का म्हणाव याच उत्तर त्याला तरी देता येईल का...? त्यात करुन 'तु ही जुनुन' हे बकवास गाण त्याच दरम्यान येत. अशा रितीने सलग 40 ते 45 मिनीटे अतिशय कंटाळवाणी वाटु लागतात आणि धुम-3 च्या नावे बोँब मारायला टिकाकारांना आयते कोलीत मिळते. त्या वाईट काळातही आमिर खानने तोतरेपणा, साधेपणा, निरागस चेहरा ठेवुन सर्वाँसमोर आणलेला समर प्रेक्षकांना आवडु लागतो. एखाद्या हळु गाडी चालवणा-याने अचानक गाडीचा गिअर बदलावा त्याप्रमाणे चित्रपट शेवटी कात टाकतो. साहिर आणि समरमधील वाद रंगवताना आमिर खानने अभिनयाची अत्त्युच्च पातळी दाखवली आहे. साहिरपेक्षा बुद्धिमान असुनही समरची नशीबाने केलेली वाताहात मन हेलावुन टाकते. वडीलांना आत्महत्या करण्यास प्रव्रुत्त करायला लावणारी बँक पुर्णपणे बरबाद केल्यानंतर पुर्ण चित्रपटभर बेभानपणे वावरणारा साहिर अचानक समरप्रती हळवा होतो. समरला त्याचे प्रेम म्हणजेच आलिया मिळुन दोघांनाही उर्वरित आयुष्य सुखात जगायला मिळावे त्याकरिता स्वतःवर सगळ्या आरोपांचा ठपका घेत आत्महत्या करायचे ठरवतो. आयुष्यभर 'दोन शरीर, एक जीव' म्हणुन जगत आलेल्या समर-साहिरपैकी जेव्हा साहिर आत्महत्या करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या भावाविषयी नितांत प्रेम असणारा समरही साहिरसोबत आपले जीवन संपवुन टाकतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही.

धुम-3 मध्ये आमिरने केलेल्या अभिनयाला खरच तोड नव्हती तरी सुद्धा आमिरच्या कँटेगरीतला हा चित्रपट नक्कीच नव्हता हे त्याचा कट्टर चाहता असुनही मला मान्य करावेच लागेल.
एकंदरीतच शाहरुख-सलमानच्या गल्लाभरु चित्रपटांपेक्षा धुम-3 कितीतरी पटीने चांगला होता कारण त्याला एक वेगळा भावनिक अँगल होता.

कमाईच्या बाबतीत परवापर्यँत भारतामध्ये 334 कोटी रुपये आणि परदेशात 147 कोटी रुपये कमावुन धुम-3 चित्रपट 500 कोटीच्या जादुई आकड्याजवळ येऊन पोहोचलाय. "सौ सुनार की और एक लोहार की" याचा दाखला पेश करत आमिरने इतर नटांना कमाईच्या बाबतीत कुठल्या कुठे भिरकावुन दिले आहे.

लेखाचा शेवट करताना आमिर खानसाठी एवढेच म्हणेन-
"बंदे है हम उसके,
हम पे किसका जोर,
उम्मीदो के सुरज,
निकले चारो और,
इरादे है फौलादी,
हिम्मती हर कदम,
अपने हाथो किस्मत लिखने,
आज चले है हम."

कार्यकर्ता : काल, आज आणि उद्या...

सुरेश प्रभुंविषयी चर्चा करताना फेसबुकवर मला एक प्रश्न विचारण्यात आला-

"प्रभुंनी कार्यकर्त्यांसाठी काय  काम केले...?"

प्रा. मधु  दंडवतेँच्या लेखावरही एक प्रतिक्रिया आली-

"त्यावेळी मी दंडवतेँचा कार्यकर्ता होतो पण आजकाल प्रवाहाच्या दिशेने अग्रेसर होत राणेँसाठी काम करतो."

हा प्रवाह नेमका कोणता...? कोकणच्या राजकरणात हा प्रवाह कधी सुरु झाला असेल...?? अशा अनेक प्रश्नांनी मनात काहुर माजवले. एवढ्यातच शिवसेनेशी कट्टर असलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याची म्हणजेच बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाची नशीबाने भेट झाली आणि त्यात अनेक गोष्टी उलगडत गेल्या.

वयाच्या 16 व्या वर्षीपासुन विभागप्रमुख झाल्यानंतर गेली कित्येक वर्षे हा माणुस शिवसेनेसाठी काम करतोय. मधल्या काळात शिवसेनेने अनुभवलेले अनेक चढ-उतार, सुख-दुःख या सगळ्यांचा तो साक्षीदार आहे. नारायण राणे शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्यासाठी मिळालेली पद आणि पैशांची आँफर त्याने शिवसेनेखातर धुडकारली, शिवसेनेकडुन दुर्लक्षिले गेलेले परशुराम उपरकर उर्फ जीजी मनसेत गेले. तरी जीजीँना मानणारा हा कार्यकर्ता शिवसेनेतच राहिला. आताच सोडुनच द्या. 30 वर्षापुर्वी जेव्हा शिवसेनेच अस्तित्व कोकणात तितकस नसतानाही प्रा.दंडवतेँसारख्या देवमाणसाने त्यांच्याकरीता काम करण्याबाबत विचारणा केली असता, दंडवतेँविषयी आदर बाळगणा-या या माणसाने बाळासाहेबच माझे सर्वस्व आहेत, असे सांगुन विनम्रतेने दंडवतेँना नकार दिला. जिल्ह्यात शिवसेनेची कमी होत चाललेली आक्रमता पुन्हा मिळवुन देण्यासाठी आजही वयाच्या 45 व्या वर्षी हा माणुस कणकवली राड्यात पोलिसांना थेट भिडुन पाठीवर काठ्यांचे वळ घेतोय आणि स्वतःच डोकं फोडुन घेत पक्षासाठी रक्त सांडतोय. इतक करुनही आज या माणसाच्या खात्यात लाख रुपये जमा असणे मुश्किल आहे. याउलट अशा कार्यकर्त्याँच्या जीवावर मोठे झालेले नेते शिवसेना पक्षाला केव्हाचीच सोडचिठ्ठी देऊन करोडो रुपयांच्या मालमत्तेसह दुस-या पक्षात मिरवत आहेत. मात्र पक्षाकडुन जे काही मिळाल त्यात हा कार्यकर्ता समाधानी आहे.

माझ्याच घरात माझे काका आणि बाबा त्यावेळी आपापल्या नोक-या सांभाळत मधु दंडवतेँच्या प्रचारासाठी मैलनमैल सायकलवरुन भटकले.

माझ्या काकांची तर निवडणुकीनंतर काँग्रेसने सुडबुद्धीने दुर्गम भागात बदली केली आणि केवळ दंडवतेँसाठी त्यांनी ती अगदी आनंदाने स्वीकारली. सलग पाच वेळा खासदार असताना दंडवते कामाच्या व्यापामुळे आपल्या कार्यकर्त्याँसाठी वेळ देऊ शकत नव्हते मात्र त्यांच्या कार्यकर्त्याँनी दंडवते मतदारसंघात फिरकत नाहीत अशी तक्रार कधीच केली नाही. सुधीर सावंतांनी पराभव केल्यानंतर पुढची पाच वर्षे दंडवतेँनी मतदारसंघाचा दौरा केला आणि मुद्दाम इतकी वर्षे एक पैसा न घेता त्यांच्यासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणा-या अनेक कार्यकर्त्याँना
भेट दिली. त्यात माझ्या घरातील लोकही सामील होते. दंडवतेँनी केलेल्या हस्तांदोलनाचे मुल्य आपल्याला करोडो रुपयांपेक्षा जास्त होते असे आजही ही मंडळी अभिमानाने सांगतात.
कुठुन येत असेल ही कट्टरता...? पक्षासाठी किँवा नेत्यासाठी सर्वस्व झोकुन देण्याची व्रुत्ती...?? या प्रश्नांच्या मुळाशी गेल्यास एखाद्या नेत्याचा किँवा त्याच्या विचारसरणीचा जनमानसात असलेला प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.
मग आजच्या राजकरणात असे कार्यकर्ते दुर्मिळ का झालेत...? कारण आज बाळासाहेब किँवा दंडवतेँसारखे नेते देखील दुर्मिळ झालेत.विचारसरणी तर केव्हाच्याच संपुन गेल्यात. समाजवाद केवळ मुस्लिमांची टोपी घालुन त्यांचे लांगुनलोचन करत मते मिळवण्यापुरता उरलाय. लालु-मुलायम सारखे समाजवादी नेते भ्रष्टाचाराचे मनोरे रचतायेत. हिँदुत्ववादी नेत्यांचा एक डोळा मुस्लीम मतांवर देखील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेला भाजपचा कोकणातील आमदार तिकडे मुंबईत अबु आझमीची टोपी घालुन त्याचा प्रचार करत फिरतोय. या तथाकथित अविचारी नेत्यांनाच कोणत्या विचारसरणी माहित नसतील, मग त्या विचारांना आपलस मानुन निःस्वार्थी भावनेने काम करणारा कार्यकर्ता तरी कुठुन जन्माला येणार...? दंडवतेँकडुन पैसा मिळत नसला तरी कार्यकर्त्याँची तक्रार नसायची कारण आपला नेता तत्वांशी प्रामाणिक राहत कितीही मोठ्या पदावर असला तरी भ्रष्टाचार करुन पैसे कमावत नाही, याची त्या कार्यकर्त्याला जाण असायची. आताच्या राजकरणात "खा आणि खाऊ द्या" पद्धत आरुढ झाल्याने, आपला नेता वर पैसे खातोय आणि त्याने त्यातील थोडा पैसा आपल्याला द्यावा, पदाच्या जोरावर आपली नियमबाह्य कामे करुन आपल्यालाही पैसा कमावु द्यावा अशा मानसिकतेचे कार्यकर्ते तयार होताना दिसतायेत.

दंडवतेँच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांची आठवण सांगताना कार्यकर्त्याने एक किस्सा सांगितला. प्रथमच दिल्लीत गेलेल्या 'त्या' कार्यकर्त्याचे पाकिटमारांनी पाकिट मारले. आता कोकण गाठायचे कसे असा यक्षप्रश्न उभा राहिला. दिल्लीत याला ओळखतील असे दंडवतेच होते पण दंडवतेँकडे त्यांचे बहुतेक कार्यकर्ते पैसे मागत नसत. शेवटी काहीच पर्याय नाही याची खात्री पटल्यावर त्याने दंडवतेँच्या आँफिसमध्ये जाऊन हजार रुपये तिकीटासाठी मागितले. दंडवतेँच्या खिशात तेवढे पैसे उपलब्ध नव्हते. त्यावेळी दंडवते खजील झाले आणि कार्यकर्ताही मनात चुकचुकला. मात्र कार्यकर्त्याची निकड भागवण्यासाठी दंडवतेँनी बँकेत जाऊन पैसे काढुन याला दिले. देशाच्या अर्थमंत्र्याच्या खिशात हजार रुपये नसावे याचा त्या कार्यकर्त्याला अभिमानच वाटला. दंडवतेँच्या घरातली कपाटे पैशांनी भरलेली नसतात तर ती पुस्तकांनी व्यापलेली असतात याची जाणीव त्यांच्या कार्यकर्त्यानाही असायची.
आजकाल आम आदमी पार्टीचे नेते मेट्रोने मंत्रीमंडळात गेले याच्या चर्चा चवीने चघळल्या जातात. चांगलीच गोष्ट आहे.फक्त त्यावेळीच आमचे दंडवते सायकलवरुन संसदेत जायचे ही गोष्ट विसरु नका. बस थांब्यावर बसची वाट पाहत रांगेत उभे राहायचे हे विसरु नका. रेल्वेत चढताना जो दरवाजा चढण्यासाठी असायचा त्यातुनच चढायचे आणि जो दरवाजा उतरण्यासाठी असायचा त्यातुन उतरायचे हे विसरु नका. त्याबाबत एका कार्यकर्त्याने कुतुहलाने प्रश्न विचारला असता दंडवते म्हणाले की, रेल्वेमंत्री असुन रेल्वेच्या नियमांचे पालन करणे मलाच जमत नसेल तर इतर जनता त्या नियमांचे पालन करेल अशी अपेक्षा करणे गैर आहे. आणि हो, दंडवतेँनी कँमेरे घेऊन किँवा पत्रकारांना बोलावुन आपल्या साधेपणाचे कधीच बाजारीकरण केले नाही.

कोणी सापडेल का आजच्या काळात दंडवतेँसारखा निस्प्रुह नेता...? कोकण रेल्वे सत्यात उतरवताना दंडवतेँऐवजी आजचा कोणी नेता असला असता तर काय झाले असते याचा कधी विचार केला आहे...??
दंडवतेँनी कोकण रेल्वे साकारणा-या ई.श्रीधरन यांना त्यांच्या पद्धतीने काम करु दिले आणि त्यामुळेच कोकण रेल्वेचे भव्यदिव्य स्वप्न साकार होऊ शकले. दंडवतेँच्या जागी आपल्या कार्यकर्त्याँचे कल्याण करणारा आजकालचा कोणी नेता असता तर त्याने पावला-पावलावर ई.श्रीधरन यांच्याकडे आपल्या कार्यकर्त्याँसाठी कंत्राटे मागुन कामात अडथळे आणले असते. नेत्यांनी शिफारस केलेल्या अर्धवट कंत्राटदारांना कंत्राटे बहाल केली असती तर आशियातील सर्वात मोठा बोगदा आणि सर्वात मोठा पुल दहा वर्षाच्या आत कोसळला असता. हजारो लोक नाहक प्राणाला मुकले असते. रस्त्यावर बांधलेले पुल उद्घाटनाची फित कापायच्या अगोदरच कोसळतात कारण ते पुल बनवाणारे कंत्राटदार स्थानिक नेतेमंडळीँनीच नेमलेले असतात. पुन्हा ते कंत्राट त्याच कंत्राटदाराला देण्यासाठी सरकारने पुलाला मंजुर केलेल्या निधीपैकी काही टक्के मागतो. नंतर कंत्राटदारही उरलेल्या पैशांपैकी काही टक्के स्वतः ठकवतो आणि शिल्लक राहिलेल्या रकमेत केलेले पुल पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळतात. सामान्य लोक आपले प्राण गमावतात. या म्रुत्युच्या तांडवाला जबाबदार कोण...? अर्थातच, कार्यकर्त्याँना नियमबाह्य कंत्राटे मिळवुन देणारा नेता आणि नेत्याकडुन कंत्राटे मिळाल्यावरच त्याच्याप्रती निष्ठा राखणारे कार्यकर्ते...!कार्यकर्त्याँना दिलेली कंत्राटे एकंदरीतच समाजाचे नुकसान करणारी ठरतात. तीच गोष्ट शिफारशीँची असते. मी केलेल्या शिफारशीने माझ्या कार्यकर्त्याला लाभ मिळुन नियमात वागणा-या अन्य कोणाचे नुकसान होणार असेल तर कार्यकर्त्याँसाठी अशा शिफारशी करणे मला जमणार नाही, असे वक्तव्य करणारे दंडवतेँसारखे नेते आजकाल अभावानेच आढळतात.

सुरेश प्रभुंनी कोकण विकासाची कामे केली नाहीत म्हणुन ते वाईट नेते आहेत असा आरोप जर कोणी केला असता तर त्यांचे कोकणच्या विकासात नेमके काय योगदान आहे याची यादीच तुमच्या समोर ठेवली असती. नव्हे पुढच्या काही दिवसात प्रभुंनी कोकणात केलेली विकासकामे मी सर्वाँसमोर ठेवणारच आहे. मात्र प्रभुंनी कार्यकर्त्याँना कंत्राटे मिळवुन दिली नाहीत किँवा त्यांनी कोणाच्या शिफारशी किँवा वैयक्तिक कामे केली नाहीत म्हणुन ते कोकणचे खासदार बनण्यायोग्य नाहीत असा निष्कर्ष कोणी मांडणार असेल तर मला अभिमानच आहे की मी एका योग्य नेत्याचेच समर्थन करतोय.मध्यंतरी एका आमदाराने कुतुहलाने प्रश्न विचारला होता, (मला वैयक्तिकरित्या ओळखणा-या कित्येक लोकांच्या मनातही हा प्रश्न नक्कीच घुटमळत असणार)

"सिँधुदुर्गातील अनेक राजकीय पक्ष, सक्रिय नेते यांची खास ओळख असताना, राजकरणातील बहुतेक काळ अलिप्त राहणा-या प्रभुंचे समर्थन करण्याचा निर्णय तुला विचित्र वाटत नाही का...? प्रभुंकडुन तुला कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही किँवा राजकरणात पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी पदे देखील मिळणार नाहीत, मग प्रभुंचे समर्थन करण्यामागे नक्की उद्देश कोणता...?"

आमदार महाशयांना दिलेले उत्तर मी मुद्दामच सर्वाँसमक्ष ठेवणार आहे-
"लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मी दंडवतेँचे निःस्वार्थी कार्यकर्ते असणा-या घरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे एक आदर्श कार्यकर्ता नक्की कसा असतो याच बाळकडु मला घरातच मिळाल. मला दारु, सिगारेट, गुटखा किँवा अन्य कोणतही व्यसन नसल्यामुळे मुळातच माझ्या गरजा कमी आहेत आणि गरजा कमी असल्यामुळे पैशाची निकड कमी आहे. माझ्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी इंजिनिअर आणि एमबीए या दोन पदव्या पुरेशा आहेत.  कोण्या राजकीय नेत्याकडुन मिळणा-या पैशांमध्ये मला काडीचाही रस नाही. जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध, पर्यावरण संरक्षण, सौरऊर्जेचा वापर, नदीजोड प्रकल्प आणि शाश्वत विकास या पाचही मुद्द्यांना प्रभुंचे समर्थन असल्याने त्यांची आणि माझी मते प्रचंड प्रमाणात एकमेकांशी जुळतात. कोकणातील इतर कोणत्याही नेत्याचे माझ्या या पाच मुद्द्यांना पुर्ण समर्थन नाही आणि म्हणुनच मी सुरेश प्रभुंचा समर्थक आहे. ज्या दिवशी सुरेश प्रभु या पाच पैकी कोणत्याही एका मुद्द्यावर माघार घेतील त्या दिवशी अन्य नेत्यांप्रमाणे प्रभुंवर जहरी टिका करायला मी मागेपुढे पाहणार नाही. मात्र जोपर्यँत प्रभु या पाचही मुद्द्यांवर ठाम आहेत तोपर्यँत जगातील कोणतीही शक्ती प्रभुंच्या वाटेत येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही."
माझ्यासारख्या तरुणांनी राजकरणात उतरावे असे सल्ले अनेक मान्यवर लोकांनी दिले आणि मी सुद्धा ते नम्रपणे नाकारले कारण राजकरणात जी गत सुरेश प्रभुंची झाली तीच माझी होणार. प्रभुंच्या मागे बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिल्याने त्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक पुढे  सरसावले. मात्र बाळासाहेबांचे देहावसान होताच शिवसेनेने प्रभुंचा किती सन्मान ठेवला हे आपण सगळे बघतच आहोत. बाळासाहेब ठाकरेँच्या मर्जीतील प्रभुंना बाळासाहेबांच्या निधनानंतर लोकसभेची उमेदवारी  देण्यासंदर्भात कोणा विनायक राऊतांनी आव्हान द्यावे यापेक्षा बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेचे वेगळे दुर्देव ते कोणते...?

सांगायची गोष्ट एवढीच की तुमच्याकरिता निःस्वार्थीपणे काम करायला तयार असणारा कार्यकर्ता जोपर्यँत मिळत नाही तोपर्यँत राजकरणात उतरायची चुक कोणा शहाण्या माणसाने करु नये. शेवटी पश्चातापाशिवाय काहीच हाती उरत नाही.