रविवार, ५ जानेवारी, २०१४

कार्यकर्ता : काल, आज आणि उद्या...

सुरेश प्रभुंविषयी चर्चा करताना फेसबुकवर मला एक प्रश्न विचारण्यात आला-

"प्रभुंनी कार्यकर्त्यांसाठी काय  काम केले...?"

प्रा. मधु  दंडवतेँच्या लेखावरही एक प्रतिक्रिया आली-

"त्यावेळी मी दंडवतेँचा कार्यकर्ता होतो पण आजकाल प्रवाहाच्या दिशेने अग्रेसर होत राणेँसाठी काम करतो."

हा प्रवाह नेमका कोणता...? कोकणच्या राजकरणात हा प्रवाह कधी सुरु झाला असेल...?? अशा अनेक प्रश्नांनी मनात काहुर माजवले. एवढ्यातच शिवसेनेशी कट्टर असलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याची म्हणजेच बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाची नशीबाने भेट झाली आणि त्यात अनेक गोष्टी उलगडत गेल्या.

वयाच्या 16 व्या वर्षीपासुन विभागप्रमुख झाल्यानंतर गेली कित्येक वर्षे हा माणुस शिवसेनेसाठी काम करतोय. मधल्या काळात शिवसेनेने अनुभवलेले अनेक चढ-उतार, सुख-दुःख या सगळ्यांचा तो साक्षीदार आहे. नारायण राणे शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्यासाठी मिळालेली पद आणि पैशांची आँफर त्याने शिवसेनेखातर धुडकारली, शिवसेनेकडुन दुर्लक्षिले गेलेले परशुराम उपरकर उर्फ जीजी मनसेत गेले. तरी जीजीँना मानणारा हा कार्यकर्ता शिवसेनेतच राहिला. आताच सोडुनच द्या. 30 वर्षापुर्वी जेव्हा शिवसेनेच अस्तित्व कोकणात तितकस नसतानाही प्रा.दंडवतेँसारख्या देवमाणसाने त्यांच्याकरीता काम करण्याबाबत विचारणा केली असता, दंडवतेँविषयी आदर बाळगणा-या या माणसाने बाळासाहेबच माझे सर्वस्व आहेत, असे सांगुन विनम्रतेने दंडवतेँना नकार दिला. जिल्ह्यात शिवसेनेची कमी होत चाललेली आक्रमता पुन्हा मिळवुन देण्यासाठी आजही वयाच्या 45 व्या वर्षी हा माणुस कणकवली राड्यात पोलिसांना थेट भिडुन पाठीवर काठ्यांचे वळ घेतोय आणि स्वतःच डोकं फोडुन घेत पक्षासाठी रक्त सांडतोय. इतक करुनही आज या माणसाच्या खात्यात लाख रुपये जमा असणे मुश्किल आहे. याउलट अशा कार्यकर्त्याँच्या जीवावर मोठे झालेले नेते शिवसेना पक्षाला केव्हाचीच सोडचिठ्ठी देऊन करोडो रुपयांच्या मालमत्तेसह दुस-या पक्षात मिरवत आहेत. मात्र पक्षाकडुन जे काही मिळाल त्यात हा कार्यकर्ता समाधानी आहे.

माझ्याच घरात माझे काका आणि बाबा त्यावेळी आपापल्या नोक-या सांभाळत मधु दंडवतेँच्या प्रचारासाठी मैलनमैल सायकलवरुन भटकले.

माझ्या काकांची तर निवडणुकीनंतर काँग्रेसने सुडबुद्धीने दुर्गम भागात बदली केली आणि केवळ दंडवतेँसाठी त्यांनी ती अगदी आनंदाने स्वीकारली. सलग पाच वेळा खासदार असताना दंडवते कामाच्या व्यापामुळे आपल्या कार्यकर्त्याँसाठी वेळ देऊ शकत नव्हते मात्र त्यांच्या कार्यकर्त्याँनी दंडवते मतदारसंघात फिरकत नाहीत अशी तक्रार कधीच केली नाही. सुधीर सावंतांनी पराभव केल्यानंतर पुढची पाच वर्षे दंडवतेँनी मतदारसंघाचा दौरा केला आणि मुद्दाम इतकी वर्षे एक पैसा न घेता त्यांच्यासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणा-या अनेक कार्यकर्त्याँना
भेट दिली. त्यात माझ्या घरातील लोकही सामील होते. दंडवतेँनी केलेल्या हस्तांदोलनाचे मुल्य आपल्याला करोडो रुपयांपेक्षा जास्त होते असे आजही ही मंडळी अभिमानाने सांगतात.
कुठुन येत असेल ही कट्टरता...? पक्षासाठी किँवा नेत्यासाठी सर्वस्व झोकुन देण्याची व्रुत्ती...?? या प्रश्नांच्या मुळाशी गेल्यास एखाद्या नेत्याचा किँवा त्याच्या विचारसरणीचा जनमानसात असलेला प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.
मग आजच्या राजकरणात असे कार्यकर्ते दुर्मिळ का झालेत...? कारण आज बाळासाहेब किँवा दंडवतेँसारखे नेते देखील दुर्मिळ झालेत.विचारसरणी तर केव्हाच्याच संपुन गेल्यात. समाजवाद केवळ मुस्लिमांची टोपी घालुन त्यांचे लांगुनलोचन करत मते मिळवण्यापुरता उरलाय. लालु-मुलायम सारखे समाजवादी नेते भ्रष्टाचाराचे मनोरे रचतायेत. हिँदुत्ववादी नेत्यांचा एक डोळा मुस्लीम मतांवर देखील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेला भाजपचा कोकणातील आमदार तिकडे मुंबईत अबु आझमीची टोपी घालुन त्याचा प्रचार करत फिरतोय. या तथाकथित अविचारी नेत्यांनाच कोणत्या विचारसरणी माहित नसतील, मग त्या विचारांना आपलस मानुन निःस्वार्थी भावनेने काम करणारा कार्यकर्ता तरी कुठुन जन्माला येणार...? दंडवतेँकडुन पैसा मिळत नसला तरी कार्यकर्त्याँची तक्रार नसायची कारण आपला नेता तत्वांशी प्रामाणिक राहत कितीही मोठ्या पदावर असला तरी भ्रष्टाचार करुन पैसे कमावत नाही, याची त्या कार्यकर्त्याला जाण असायची. आताच्या राजकरणात "खा आणि खाऊ द्या" पद्धत आरुढ झाल्याने, आपला नेता वर पैसे खातोय आणि त्याने त्यातील थोडा पैसा आपल्याला द्यावा, पदाच्या जोरावर आपली नियमबाह्य कामे करुन आपल्यालाही पैसा कमावु द्यावा अशा मानसिकतेचे कार्यकर्ते तयार होताना दिसतायेत.

दंडवतेँच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांची आठवण सांगताना कार्यकर्त्याने एक किस्सा सांगितला. प्रथमच दिल्लीत गेलेल्या 'त्या' कार्यकर्त्याचे पाकिटमारांनी पाकिट मारले. आता कोकण गाठायचे कसे असा यक्षप्रश्न उभा राहिला. दिल्लीत याला ओळखतील असे दंडवतेच होते पण दंडवतेँकडे त्यांचे बहुतेक कार्यकर्ते पैसे मागत नसत. शेवटी काहीच पर्याय नाही याची खात्री पटल्यावर त्याने दंडवतेँच्या आँफिसमध्ये जाऊन हजार रुपये तिकीटासाठी मागितले. दंडवतेँच्या खिशात तेवढे पैसे उपलब्ध नव्हते. त्यावेळी दंडवते खजील झाले आणि कार्यकर्ताही मनात चुकचुकला. मात्र कार्यकर्त्याची निकड भागवण्यासाठी दंडवतेँनी बँकेत जाऊन पैसे काढुन याला दिले. देशाच्या अर्थमंत्र्याच्या खिशात हजार रुपये नसावे याचा त्या कार्यकर्त्याला अभिमानच वाटला. दंडवतेँच्या घरातली कपाटे पैशांनी भरलेली नसतात तर ती पुस्तकांनी व्यापलेली असतात याची जाणीव त्यांच्या कार्यकर्त्यानाही असायची.
आजकाल आम आदमी पार्टीचे नेते मेट्रोने मंत्रीमंडळात गेले याच्या चर्चा चवीने चघळल्या जातात. चांगलीच गोष्ट आहे.फक्त त्यावेळीच आमचे दंडवते सायकलवरुन संसदेत जायचे ही गोष्ट विसरु नका. बस थांब्यावर बसची वाट पाहत रांगेत उभे राहायचे हे विसरु नका. रेल्वेत चढताना जो दरवाजा चढण्यासाठी असायचा त्यातुनच चढायचे आणि जो दरवाजा उतरण्यासाठी असायचा त्यातुन उतरायचे हे विसरु नका. त्याबाबत एका कार्यकर्त्याने कुतुहलाने प्रश्न विचारला असता दंडवते म्हणाले की, रेल्वेमंत्री असुन रेल्वेच्या नियमांचे पालन करणे मलाच जमत नसेल तर इतर जनता त्या नियमांचे पालन करेल अशी अपेक्षा करणे गैर आहे. आणि हो, दंडवतेँनी कँमेरे घेऊन किँवा पत्रकारांना बोलावुन आपल्या साधेपणाचे कधीच बाजारीकरण केले नाही.

कोणी सापडेल का आजच्या काळात दंडवतेँसारखा निस्प्रुह नेता...? कोकण रेल्वे सत्यात उतरवताना दंडवतेँऐवजी आजचा कोणी नेता असला असता तर काय झाले असते याचा कधी विचार केला आहे...??
दंडवतेँनी कोकण रेल्वे साकारणा-या ई.श्रीधरन यांना त्यांच्या पद्धतीने काम करु दिले आणि त्यामुळेच कोकण रेल्वेचे भव्यदिव्य स्वप्न साकार होऊ शकले. दंडवतेँच्या जागी आपल्या कार्यकर्त्याँचे कल्याण करणारा आजकालचा कोणी नेता असता तर त्याने पावला-पावलावर ई.श्रीधरन यांच्याकडे आपल्या कार्यकर्त्याँसाठी कंत्राटे मागुन कामात अडथळे आणले असते. नेत्यांनी शिफारस केलेल्या अर्धवट कंत्राटदारांना कंत्राटे बहाल केली असती तर आशियातील सर्वात मोठा बोगदा आणि सर्वात मोठा पुल दहा वर्षाच्या आत कोसळला असता. हजारो लोक नाहक प्राणाला मुकले असते. रस्त्यावर बांधलेले पुल उद्घाटनाची फित कापायच्या अगोदरच कोसळतात कारण ते पुल बनवाणारे कंत्राटदार स्थानिक नेतेमंडळीँनीच नेमलेले असतात. पुन्हा ते कंत्राट त्याच कंत्राटदाराला देण्यासाठी सरकारने पुलाला मंजुर केलेल्या निधीपैकी काही टक्के मागतो. नंतर कंत्राटदारही उरलेल्या पैशांपैकी काही टक्के स्वतः ठकवतो आणि शिल्लक राहिलेल्या रकमेत केलेले पुल पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळतात. सामान्य लोक आपले प्राण गमावतात. या म्रुत्युच्या तांडवाला जबाबदार कोण...? अर्थातच, कार्यकर्त्याँना नियमबाह्य कंत्राटे मिळवुन देणारा नेता आणि नेत्याकडुन कंत्राटे मिळाल्यावरच त्याच्याप्रती निष्ठा राखणारे कार्यकर्ते...!कार्यकर्त्याँना दिलेली कंत्राटे एकंदरीतच समाजाचे नुकसान करणारी ठरतात. तीच गोष्ट शिफारशीँची असते. मी केलेल्या शिफारशीने माझ्या कार्यकर्त्याला लाभ मिळुन नियमात वागणा-या अन्य कोणाचे नुकसान होणार असेल तर कार्यकर्त्याँसाठी अशा शिफारशी करणे मला जमणार नाही, असे वक्तव्य करणारे दंडवतेँसारखे नेते आजकाल अभावानेच आढळतात.

सुरेश प्रभुंनी कोकण विकासाची कामे केली नाहीत म्हणुन ते वाईट नेते आहेत असा आरोप जर कोणी केला असता तर त्यांचे कोकणच्या विकासात नेमके काय योगदान आहे याची यादीच तुमच्या समोर ठेवली असती. नव्हे पुढच्या काही दिवसात प्रभुंनी कोकणात केलेली विकासकामे मी सर्वाँसमोर ठेवणारच आहे. मात्र प्रभुंनी कार्यकर्त्याँना कंत्राटे मिळवुन दिली नाहीत किँवा त्यांनी कोणाच्या शिफारशी किँवा वैयक्तिक कामे केली नाहीत म्हणुन ते कोकणचे खासदार बनण्यायोग्य नाहीत असा निष्कर्ष कोणी मांडणार असेल तर मला अभिमानच आहे की मी एका योग्य नेत्याचेच समर्थन करतोय.मध्यंतरी एका आमदाराने कुतुहलाने प्रश्न विचारला होता, (मला वैयक्तिकरित्या ओळखणा-या कित्येक लोकांच्या मनातही हा प्रश्न नक्कीच घुटमळत असणार)

"सिँधुदुर्गातील अनेक राजकीय पक्ष, सक्रिय नेते यांची खास ओळख असताना, राजकरणातील बहुतेक काळ अलिप्त राहणा-या प्रभुंचे समर्थन करण्याचा निर्णय तुला विचित्र वाटत नाही का...? प्रभुंकडुन तुला कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही किँवा राजकरणात पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारी पदे देखील मिळणार नाहीत, मग प्रभुंचे समर्थन करण्यामागे नक्की उद्देश कोणता...?"

आमदार महाशयांना दिलेले उत्तर मी मुद्दामच सर्वाँसमक्ष ठेवणार आहे-
"लेखाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मी दंडवतेँचे निःस्वार्थी कार्यकर्ते असणा-या घरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे एक आदर्श कार्यकर्ता नक्की कसा असतो याच बाळकडु मला घरातच मिळाल. मला दारु, सिगारेट, गुटखा किँवा अन्य कोणतही व्यसन नसल्यामुळे मुळातच माझ्या गरजा कमी आहेत आणि गरजा कमी असल्यामुळे पैशाची निकड कमी आहे. माझ्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी इंजिनिअर आणि एमबीए या दोन पदव्या पुरेशा आहेत.  कोण्या राजकीय नेत्याकडुन मिळणा-या पैशांमध्ये मला काडीचाही रस नाही. जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध, पर्यावरण संरक्षण, सौरऊर्जेचा वापर, नदीजोड प्रकल्प आणि शाश्वत विकास या पाचही मुद्द्यांना प्रभुंचे समर्थन असल्याने त्यांची आणि माझी मते प्रचंड प्रमाणात एकमेकांशी जुळतात. कोकणातील इतर कोणत्याही नेत्याचे माझ्या या पाच मुद्द्यांना पुर्ण समर्थन नाही आणि म्हणुनच मी सुरेश प्रभुंचा समर्थक आहे. ज्या दिवशी सुरेश प्रभु या पाच पैकी कोणत्याही एका मुद्द्यावर माघार घेतील त्या दिवशी अन्य नेत्यांप्रमाणे प्रभुंवर जहरी टिका करायला मी मागेपुढे पाहणार नाही. मात्र जोपर्यँत प्रभु या पाचही मुद्द्यांवर ठाम आहेत तोपर्यँत जगातील कोणतीही शक्ती प्रभुंच्या वाटेत येऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही."
माझ्यासारख्या तरुणांनी राजकरणात उतरावे असे सल्ले अनेक मान्यवर लोकांनी दिले आणि मी सुद्धा ते नम्रपणे नाकारले कारण राजकरणात जी गत सुरेश प्रभुंची झाली तीच माझी होणार. प्रभुंच्या मागे बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिल्याने त्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक पुढे  सरसावले. मात्र बाळासाहेबांचे देहावसान होताच शिवसेनेने प्रभुंचा किती सन्मान ठेवला हे आपण सगळे बघतच आहोत. बाळासाहेब ठाकरेँच्या मर्जीतील प्रभुंना बाळासाहेबांच्या निधनानंतर लोकसभेची उमेदवारी  देण्यासंदर्भात कोणा विनायक राऊतांनी आव्हान द्यावे यापेक्षा बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेचे वेगळे दुर्देव ते कोणते...?

सांगायची गोष्ट एवढीच की तुमच्याकरिता निःस्वार्थीपणे काम करायला तयार असणारा कार्यकर्ता जोपर्यँत मिळत नाही तोपर्यँत राजकरणात उतरायची चुक कोणा शहाण्या माणसाने करु नये. शेवटी पश्चातापाशिवाय काहीच हाती उरत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा