गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

दंडवतेना 'दंडवत'



२१ जानेवारीला प्रा.मधु दंडवते यांची जयंती होती. खर तर एखाद्या नेत्याची किंवा महापुरुषाची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करताना त्याच्या विचारांचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवर पडावा, हा उदात्त हेतू असतो. मात्र काळाच्या ओघात त्या हेतूलाच तिलांजली देण्यात येत आहे. शिवजयंतीला डॉल्बीच्या तालावर विक्षिप्त नाच करून मिरवणुका काढणारी मंडळी याचीच तर साक्ष देतात. प्रा. मधु दंडवते या कर्मयोग्याचे कार्यच इतके महान होते की ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 'दंडवते कोण होते?' या प्रश्नातच काही उत्तरे प्रकर्षाने जाणवतात-
नैतिकता हरवत चाललेल्या काळात विचारांच आदर्शवत राजकरण करणारे दंडवते होते...!
'साधी राहणी, उच्च विचारसणी' अंगीकारणारे दंडवते होते...!!
आणि कोकण रेल्वेच अशक्यप्राय स्वप्न पाहताना विरोधकांची होणारी बोचरी टिका हिमालयाप्रमाणे शांत आणि स्तब्ध राहुन सहन करणारे 'आधुनिक युगातील महात्मा' दंडवतेच होते...!!!
एके काळी दंडवते, नाथ पै या नावातच अवघे कोकण सामावलेले असायचे. शब्द आणि वक्तुत्व यांचा मिलाफ असलेली या द्वयींची संसदेतील भाषणे अभ्यासाकरीता आजही जतन करुन ठेवलेली आहेत. देशभरात राजापुर मतदारसंघाची ख्याती 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' अशी पसरली होती. आजही पुण्यासारख्या शहरात कोण्या अनोळखी आजी-आजोबांना भेटल्यावर- "कोकण...? म्हणजे दंडवतेँच्या मतदारसंघातील आहात तर...??" असे गौरवोद्गार आपोआप ऐकु येतात.
स्मारकांना तात्विक विरोध असणा-या दंडवतेँचे कार्य आणि विचार एवढ्या उच्च दर्जाचे होते की ते स्मरणात ठेवण्यासाठी स्मारकांची गरज कधी भासली नाही आणि यापुढेही भासणार नाही. फक्त 'कोकण रेल्वेचा शिल्पकार' असलेल्या दंडवतेँचे तैलचित्र क्रुतज्ञता म्हणुन कोकण रेल्वेच्या आवारात लावणे गरजेचे होते. मात्र कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी क्रुतघ्नतेचा कळस करुन दंडवतेँचे तैलचित्र देखील काढुन टाकले. तशी क्रुतघ्नता जीवंतपणी नेहमीच दंडवतेँच्या नशीबी आली होती. अशक्यप्राय कोकण रेल्वे पुर्णत्वास नेल्यानंतर लगेचच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने क्रुतघ्नपणे दंडवतेँना पराभुत करुन परतफेड केली. कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी दंडवतेँना देशाचा पंतप्रधान बनण्याची नामी संधी चालुन आली होती. राज्यसभेतुन निवडुन जात पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले मिळाल्यावर तत्वांचा पुजारी विनम्रतापुर्वक पंतप्रधानपद नाकारताना म्हणाला-
"मागच्या दरवाजाने (राज्यसभेतुन निवडुन जात) पंतप्रधानपद स्वीकारण मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारल. तिथेच माझ राजकरण संपल."
केवढा हा त्याग...? कधी बघितली आहे का राजकरणात अशी त्यागमुर्ती...?? जीवंतपणी जपलेला हा त्याग मरणानंतरही कायम ठेवत दंडवतेँनी आपले शरीर दान केले. आकस्मिक पराभवामुळे दंडवतेँसारखा कर्मयोगी मनातुन दुखावत अस्वस्थ झाला होता. "मंदिराच्या पुर्णत्वानंतर शिल्पकाराची गरज भासत नाही" हे दंडवतेँचे उद्गार याचीच तर साक्ष देतात. 'का झाला असेल दंडवतेँचा पराभव...? का झाले असतील कोकणचे विचारी लोक इतके बेईमान...?' असे कित्येक प्रश्न मनात आल्यावाचुन राहत नाहीत. कोकणात नव्वदच्या दशकात नव्याने उदयाला आलेली चंगळवादी राजकीय संस्क्रुती उत्तरादाखल मिळते. इतके दिवस तात्विक मुद्द्यांवर खेळल्या जाणा-या निवडणुका आता राजकीय वादाचे उग्र रुप धारण करु लागल्या होत्या. कोकणची हिरवी भुमी प्रथमच रक्ताने लाल झाली होती. निवडणुक निकालानंतर एकमेकांना अलिँगन देत अभिनंदन करणारे उमेदवार आता दिसेनासे झालेत. नेता, त्याचे चेले आणि कार्यकर्ते अशी निर्माण झालेली राजकीय साखळीच कोकणच्या वैचारिक -हासास कारणीभुत ठरली. दंडवते आपल्या कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे कधीच करत नसत. माझ्या शिफारशीमुळे माझ्या कार्यकर्त्याच काम होऊन नियमात वागणा-या अन्य कुणाच नुकसान होणार असेल तर ते अन्यायकारक आहे. कोकण रेल्वेची कंत्राटे शिफारशी करत दंडवतेँनी आपल्या कार्यकर्त्याँना मिळवुन दिली असती तर कोकण रेल्वे साकारणारे ई.श्रीधरन सर्व शक्तिनीशी काम कधीच करु शकले नसते.आदर्श नेता आणि कार्यक्षम अधिकारी याचा अनोखा संगम म्हणजे कोकण रेल्वे...!
भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा त्याचे दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील. १९७७ मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन-आसमानाचा फरक होता. सेकंड क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून आणि झोपून प्रवास करावा लागत असे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या दंडवतेना लोकांचे हे हाल सहन होणे शक्यच नव्हते. त्यासाठीच भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरिब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतार देताना समाजवाद कोळून प्यायलेले दंडवते म्हणाले-
"मला फर्स्ट क्लासचे महत्व कमी करायचे नाही, मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे."
असा विचार करण्यासाठी एका समाजवाद्याचे मन असावे लागते. आजकाल समाजवाद फक्त निवडणुकामध्ये मतांचे राजकारण करण्यासाठी शिल्लक उरलाय. कदाचित ते 'समाजवादी मन' नाना आपल्या देहसोबत घेऊन गेले असावेत.
देशाच्या अर्थमंत्रीपदी असलेले दंडवते मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जाकरिता बँकेची पायरी चढले कारण दंडवतेँनी राजकरणातुन स्वतःसाठी कधीच पैसा कमावला नाही. आपल्या कार्यकर्त्याँनाही त्यांनी कधी पैसा उभारु दिला नाही. अशा दंडवतेँना पाडण्यासाठी गरीब जनतेला निवडणुकांच्या आदल्या दिवशी मटणाचे तुकडे, दारुच्या बाटल्या आणि पैशांची खैरात करण्यात आली. पैशांच्या सामर्थ्यापुढे दंडवतेँच्या तत्वांची पुण्याई अक्षरशः धारातीर्थी पडली. 'कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली' या सुरेश भटांच्या ओळी तंतोतंत ख-या ठरल्या. शेवटी एखाद्या पिढीतील लोकांची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. आमच्या पिढीने पैशांच्या म्रुगजळात मश्गुल होत दंडवतेँसारखा आदर्श नेता कोकणच्या राजकरणातुन संपवुन टाकत सत्तापिपासु गोचिडांना जन्म दिला. आपण काय करत आहोत हे समजण्याची किमान कुवत नसलेले आपमतलबी नेते पर्यावरणाचा विध्वंस करुन, कोकणला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. राजकीय दहशतवादाने कोकणची तुलना बिहारशी होऊ लागली आहे.
गाड्यांचा ताफा घेऊन न फिरता बसथांब्यावर बसची वाट पाहत रांगेत थांबलेले, जनतेचा सेवक म्हणुन आपला कार्य-अहवाल दरवर्षी लोकांसमोर ठेवणारे आणि कार्यकर्त्याँची कामे करण्यापेक्षा सर्वसमावेशक लोककल्याणावर भर देणारे दंडवते काळाच्या ओघात इतिहासजमा झाले आहेत. आताच्या नेतेमंडळीँना पाहुन दंडवतेँसारखा निस्प्रुह नेता कधी काळी राजकीय क्षितीजावर अढळ अशा ध्रुवता-याप्रमाणे चमकत होता, या गोष्टीवर कदाचित पुढच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. काळाची गरज म्हणुन राजकरणात 'दंडवतेँचे सुवर्णपुर्व' पुन्हा आणावेच लागेल. दंडवतेँचे विचार एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आपल्या सोबत राहुन पुढचा मार्ग दाखवतील. फक्त गरज आहे ती या विचारांना कालबाह्य न मानता, वर्तमानातील गडद अंधारातुन उज्वल भविष्याकडे नेणारे मानणा-या समविचारी लोकांच्या एकजुटीची...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा