सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

"रस्त्यावरच पोस्टर काढाल,
लोकांच्या मनातुन वैभवला कसा बाहेर काढणार...?"




सिँधुदुर्गात नक्की पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीत काँग्रेस समर्थक वावरतायेत तेच कळायला मार्ग नाही. कट्ट्यात वैभव नाईकांचा बँनर हटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. याअगोदरही कणकवलीत शिवाजी चौकात भाजपचा 'नमो नमन करुया' बँनर फाडला होता, कुडाळ प्रवेशद्वारावर लावलेला मनसेचा बँनर फाडण्याचा प्रयत्नही काही अज्ञातांनी केला. आता हे 'अज्ञात कार्यकर्ते' नेमके कोणाचे आहेत, हे वेगळ सांगायची गरज नाही. पक्षीय तेढ निर्माण करणा-या समाजकंटकांना अटक करुन शिक्षा करणे खुप दुरच राहिले, आता पोलिसयंत्रणा स्वतःच विरोधी पक्षांचे बँनर उतरवु पाहतायेत. पोलीसच सत्ताधा-यांना झुकते माप देणार असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडुन करायची...?

'पायाखालची वाळु सरकली की पक्षाचा तोल ढासळतो.' सध्या सिँधुदुर्गातील काँग्रेसची तशीच काहीशी बिकट अवस्था झाली आहे. त्यांना एवढच सांगु इच्छितो की,

'कोँबड झाकल म्हणुन सूर्य उगवायचा राहत नाही.'

त्यामुळे पोलिसांच्या मदतीने वैभव नाईकांचे बँनर हटवलात म्हणुन वैभव नाईकांना विधानसभा जिँकण्यापासुन तुम्ही रोखु शकणार नाही. गेली 10 वर्षे काँग्रेस सरकारने जी कुकर्म केली आहेत त्यांचा हिशेब चुकता करण्यासाठी लोक निवडणुकांची आतुरतेने वाट बघतायेत. येत्या निवडणुकांमध्ये सिँधुदुर्गची सुज्ञ जनता काँग्रेसला आडव पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यात विरोधकांचे बँनर हटवण्याच्या भ्याड कारवाया केल्यात तर उरलीसुरली मतेही गमावुन बसाल.

जे पोस्टर तुम्ही हटवु पाहत होता ती इतक्या दिवसात वैभवने सामान्य लोकांसाठी रस्त्यावर संघर्ष देऊन केलेली आंदोलने होती. म्हणुनच पोस्टरमधील आंदोलनाच्या छायचित्रांनी बिथरल्यानंतर ते पोस्टर हटवण्याचा घ्रुणास्पद प्रयत्न तुम्ही पोलिसांच्या मदतीने केला. अरे मुर्खाँनो, पोस्टर हटवाल पण वैभवने केलेल्या आंदोलनांच काय...? त्या आंदोलनांमुळेच वैभवने लोकांच्या मनात घर केले आहे. सिँधुदुर्गातील जनतेला वैभव नाईक आपलासा वाटु लागलाय आणि येत्या निवडणुकांमध्ये या आपुलकीचे रुपांतरच मतांमध्ये होणार आहे. आता लोकांच्या मनातुन वैभवला कसे हटवणार..??

काँग्रेसचा पराभव निश्चित झाला आहे त्यामुळे असली भ्याड क्रुत्ये करण्यापेक्षा मोठ्या मनाने पराभवाचा स्वीकार करा. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो.


वैभव नाईक, तुम्हाला 'लढ' म्हणा अस सांगायची गरज मला वाटत नाही कारण मला खात्री आहे की लढण्याचा गुण तुमच्या रक्तातच आहे. आज तुम्हाला 'सिँधुदुर्गचा ढाण्या वाघ' ही उपाधी जनतेनेच बहाल केली आहे. कणकवलीत तुमच्या एका डरकाळीने कधीकाळी कोकणात वाघ बनुन फिरणारे आता उंदीर बनुन बिळात जाऊन लपतात.

फारच थोड्या कालावधीत तुमच्या स्वभावाचा आणखी एक गुण माझ्या लक्षात येतोय की आंदोलन करताना तुमच्या स्वभावात जाणवणारी आक्रमकता इतर वेळी चुकुन सुद्धा दिसुन येत नाही. आंदोलन करताना शत्रुच्या अंगावर धावणारा वैभव इतर वेळी मात्र शांत, मनमिळाऊ आणि मुख्य म्हणजे सामान्यातल्या सामान्याशी आदराने बोलतो. राजकीय व्यक्तीँमध्ये हमखास आढळणारा अहंकार तुमच्या सावलीत सुद्धा दिसत नाही. कदाचित याच गुणामुळे तुम्ही लोकांना आपलेसे वाटत राहता. राजकरणात पुढे कितीही मोठी पदे मिळालीत तरी सामान्याशी जोडलेली ही नाळ अशीच सोबत ठेवा.
तुमच पुर्ण आयुष्यच समरांगण झालय आणि या लढाईत मी तुमच्या 'मागे' नाही तर खांद्याला खांदा देऊन तुमच्या 'सोबत' आहे. ही लढाई एवढ्यात संपणार नाही. बाळासाहेबांच्या जीवावर मोठे होऊन पुढे गद्दारी करणा-या खानदानाचा संपुर्ण राजकरणातुन बिमोड करत नाही तोपर्यँत ही लढाई चालुच राहिल. भविष्यात "जिल्हाप्रमुख वैभव नाईक" हे वाचण निदान मला तरी आवडणार नाही. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय जेव्हा या फोटोच्या खाली अभिमानाने लिहिलेले असेल-

"माननीय आमदार वैभवजी नाईक..."

इरादा आहे पक्का,
यंदाच देऊ धक्का...!!!

लेखांची माळ तुटली, भावना गुंतलेल्याच आहेत...!

कालच कणकवलीमध्ये तरुण भारतचा 'गुरवे नमः' सदराच्या निरोपाचा सोहळा पार पडला. काँलेजवाल्यांच्या कटकटीने कणकवली गाठु शकलो नाही. सोहळ्याला उपस्थित राहु शकलो नाही याच नक्कीच वाईट वाटतेय पण त्याहीपेक्षा अविनाश धर्माधिकारी सरांसारख्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्त्याचे विचार ऐकु शकलो नाही याच दुःख होतय.

आजच्या तरुण भारतमधील मेळाव्याला जमलेल्या श्रोत्यांचा फोटो पाहिला आणि मनातल्या मनात विजय शेट्टीँना सलाम ठोकला. एक पत्रकार म्हणुन विजय शेट्टी किती सरस आहेत हे वेगळं सांगायला नको पण कालच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील सर्वोत्क्रुष्ट आयोजकांमध्ये विजय शेट्टीँच नाव सामील झालय. 'गुरवे नमः' समारोप सोहळ्याच्या अगोदर पंधरा दिवस कार्यक्रमाच मार्केटिँग कस करायच असत याची शेट्टीँनी केलेली रचनाबद्ध आखणी भारावुन टाकणारी होती. आम्हाला एमबीए मार्केटिँगमध्ये शिकवले जाणारे कन्सेप्ट शेट्टीँनी पत्रकार पेशात राहुन प्रत्यक्षात आणुन दाखवले. खरच एका एमबीएच्या विद्यार्थ्याला लाजवेल असच विजय शेट्टीँच नियोजन होत. खास करुन रविवारच्या 'तरुण भारत'मध्ये विजय शेट्टीँनी लिहिलेला समारोपाचा लेख थेट भावनांना हात घालणारा होता. 'अश्रुंची झाली फुले' म्हणता म्हणता अलगद डोळ्यात अश्रु आणणारा होता. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात लोकांना प्रत्यक्ष सहभागी करुन घ्यायची किमया तरुण भारतने केली. 'गुरवे नमः' सदरात 382 लेख प्रसिद्ध झाले. म्हणजेच सिँधुदुर्गच्या कानाकोप-यात शिक्षणाचे पवित्र कार्य पार पाडत असलेल्या 382 गुरुंची संपुर्ण जिल्ह्याला ओळख झाली आणि त्या सर्वाँनाच एखाद्या पुरस्कारापलीकडचा पुरस्कार प्राप्त करुन दिला. महत्वाचे म्हणजे सामान्यातील सामान्य लोकांनी वर्तमानपत्रात व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखणीतुन गुरुप्रती असलेल्या भावना कागदावर उतरवल्या. या 382 पुष्पांपैकी 3 पुष्पे मी माझ्या गुरुंना अर्पण केली होती आणि शेवटच्या श्वासापर्यँत मला त्याचा अभिमानच राहिल. विजय शेट्टी या अवलिया पत्रकाराला, आयोजकाला मनापासुन धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!

पक्षासमोर मतदार खरच इतके क्षुल्लक असतात का...?

गेल्या आठवड्यातच मतदारसंघाची पाहणी करुन आलो. अगदी ओळखपाळख नसलेल्या लोकांचे भेट घेण्याकरता फोन येत होते. प्रत्यक्ष भेटल्यानंतर एकच प्रश्न वारंवार विचारला जायचा-

"सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी आमची काय मदत होऊ शकते...?"

काय उत्तर देऊ मी या लोकांना...? मी कोणी शिवसेनेचा पदाधिकारी नाही किँवा एखाद्या नेत्याला तिकीट मिळवुन देण्यासाठी पक्षांतर्गत काय प्रक्रिया असते याचीही मला माहिती नाही. बिचारे सामान्य लोक शिवसेनेच्या शाखाशाखांवर तिथल्या शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख किँवा जिल्हाप्रमुखांची भेट घेत होते. विनायक राऊतांची उमेदवारी फिक्स झाली हे माहित असुनही सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळावी म्हणुन लोकांनी स्वतःहुन केलेला हा केविलवाणा आणि अयशस्वी प्रयत्न होता. लोकशाहीत मतदार हा राजा असतो असे कुठेतरी ऐकल होत. मग याच मतदाराला एखाद्या पक्षासमोर एवढ हतबल व्हायची का वेळ यावी...? लोकशाहीत आपले बहुमुल्य मत देणा-या मतदाराला आपल्या आवडीचा उमेदवार पक्षाला सुचवण्याचे स्वातंत्र्य अद्याप का मिळाले नाही...?? या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की, पक्षांसमोर मतदार खरच इतका क्षुल्लक ठरतो का...???

रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेँविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. सभ्य आणि विद्वान उमेदवारांची परंपरा असलेल्या या मतदारसंघात लोकांना पुन्हा एकदा सुरेश प्रभूच खासदार म्हणुन हवे आहेत. एकीकडे सत्तापरिवर्तनासाठी लोकांच्या भावना तीव्र असताना शिवसेना मात्र उमेदवार निवडीबाबत आडमुठेपणाचे धोरण स्वीकारताना दिसतेय. राणे नको असतील तर शिवसेना लादेल त्या उमेदवारालाच लोकांनी निमुटपणे मत द्यावे. लोकांच्या भावनांशी आम्हाला काही देणघेण नाही. त्यामुळेच लोकांना जरी सुरेश प्रभु उमेदवार म्हणुन हवे असले तरी आम्ही विनायक राऊतांनाच उमेदवारी देणार. सत्ताबदल पाहिजे असेल तर मत द्या. बाकी तुमच्या भावना गेल्या खड्ड्यात...!

काय म्हणाव पक्षाच्या या हेकेखोरपणाला...? यापुढे लोकांना ग्रुहित धरुनच पक्ष चालणार असतील तर अशा पक्षांना लोकांनीच का म्हणुन अद्दल घडवु नये...??

निवडणुक ही मुद्द्यांवर लढवली जाते.मला शिवसेना नेत्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन उतरणार आहात...? राणेविरोध हा निवडणुकीचा मुद्दा असु शकत नाही. फक्त निलेश राणे खासदार म्हणुन अपयशी ठरले त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या, हा प्रचाराचा मुद्दा असु शकत नाही. निलेश राणेँना अयोग्य ठरवण्यासाठी अगोदर शिवसेनेचा उमेदवार कसा योग्य आहे हे स्पष्ट कराव लागेल.

विनायक राऊत म्हणतात की त्यांनी 12.5 कोटीँचा निधी मतदारसंघासाठी आणला. या वक्तव्याबरोबरच विनायक राऊतांनी अजुन एक गोष्ट स्पष्ट करावी की जर निलेश राणेँनी मतदारसंघासाठी आणलेला निधी 12.5 कोटीँपेक्षा जास्त असला तर लोकांनी निलेश राणेँना मत द्यायच का...? मतदारसंघात निधी आणण्याच्या बाबतीत राणे परिवाराचा हात कोणीच धरु शकणार नाही, ही गोष्ट विरोधकांनाही मान्य करावीच लागेल. मात्र जो जास्तीत जास्त निधी आणेल तो चांगला नेता अस म्हणण शुद्ध मुर्खपणा आहे. नेत्याने जो निधी मतदारसंघात आणला त्याचा प्रत्यक्षात लोकांसाठी किती उपयोग झाला हे लोकांच्या द्रुष्टीने महत्वाचे आहे. राणेँनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यांच्या बगलबच्चांनी तो मधल्या मधे हडपला तर अशा निधीचा लोकांसाठी उपयोग काय...? आज सिँधुदुर्गातील लोकांना वैद्यकीय सुविधांसाठी शेजारील गोवा राज्याच्या भिकेवर जगायची वेळ येत आहे. इतक्या वर्षात आणलेल्या निधीतुन राणे लोकांसाठी एक सुसज्ज रुग्णालय उभारु शकले नाही तर तो निधी काय कामाचा...?

लोकसभा निवडणुकीच्या प्रसंगी बोलताना तुलना कोणी किती निधी आणला यापेक्षा कोणी किती विकास केला या मुद्द्यावर व्हायला हवी. माजी खासदार सुरेश प्रभूंनी 19 जानेवारीला अक्षरयात्रा पुरवणीत 'कोकण विकासाच्या दाहि दिशा' हा लेख लिहुन ख-या अर्थाने मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा पुढे आणला. या लेखात सुरेश प्रभूंनी विविध योजना राबवुन मतदारसंघाचा सर्वाँगीण, समतोल आणि शाश्वत विकास कसा केला याची मुद्देसुत मांडणी केली. याशिवाय भविष्यात कोकणचे पर्यावरण राखुन विकास कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शनही केले. सुरेश प्रभुंच्या या लेखानंतरच मतदारसंघाच्या विकासासाठी प्रभुंसारखी दुरद्रुष्टी असणारा नेता खासदार असायला हवा याची लोकांना जाणीव झाली आहे आणि म्हणुनच हे लोक प्रभुंना पाठिँबा देत आहेत. सुरेश प्रभू उमेदवार म्हणुन का महत्वाचे आहेत हे शिवसेनेने अगोदर समजुन घेतले पाहिजे. राणेँना त्यांच्या पातळीवर येऊन किँवा क्रिकेटच्या भाषेत राणेँच्या पिचवर राणेँना हरवणे कोणालाच शक्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर राडे करण्यासाठी लागणारे गुंड विनायक राऊतांपेक्षा राणेँकडे जास्त आहेत. जनसंपर्काच म्हणाल तर एका दिवसात राऊत जेवढ्या गावात संपर्क करु शकतात त्याच्या तिप्पट गावात तिघे राणे पितापुत्र एका दिवसात जनसंपर्क करु शकतात. सध्या सगळीकडेच क्रिकेट स्पर्धांना पेव फुटलाय. आता एखाद्या क्रिकेट स्पर्धेला राऊतांनी 1 लाखाचे बक्षीस दिले तर 2 लाख बक्षीसाची रक्कम असलेल्या अशा दहा स्पर्धा भरवायची राणेँची ऐपत आहे. एखाद्या मंदिराला राऊतांनी 10 लाख देणगी दिली तर त्याच मंदिराला 1 कोटी देण्याची राणेँची तयारी आहे. थोडक्यात काय तर राणेँकडे जेवढे गुंड, पैसा आणि जनसंपर्क करण्याची क्षमता आहे तेवढी सगळ्या विरोधी पक्षांकडे एकत्रितपणेही नाही. त्यामुळे जनसंपर्क ठेवण्याची किँवा राडे करण्याची आणि पैसे खर्च करण्याची क्षमता असलेला उमेदवार राणेँना हरवु शकेलच असे नाही.
राणेँना पराभुत करायच असेल तर त्यांची कमकुवत बाजु विरोधकांना शोधुन काढावी लागेल. सभ्यपणा आणि विद्वत्ता या दोनच अशा गोष्टी आहे ज्यांच कितीही सोँग राणेँनी घेतल तरी लोकांना त्यावर विश्वास बसुच शकत नाही. त्यामुळेच राणेँना पराभुत करण्यासाठी सभ्य आणि विद्वान अशा प्रभुंची उमेदवार म्हणुन निवड करणे अपरिहार्य आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर केँद्रात एनडीए सरकार येणार हे एव्हाना स्पष्ट झालाय. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात सर्वोत्क्रुष्ट केँद्रीय मंत्री म्हणुन नावाजल्या गेलेल्या प्रभुंना यावर्षी नक्कीच मंत्रीपद मिळेल. त्यामुळे प्रभुंचा प्रचार करताना तुम्ही भावी केँद्रीय मंत्र्याला मत देत आहात असा सकारात्मक प्रचार पक्षातर्फे केला जाऊ शकतो. राजापुर मतदारसंघाने देशाला नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारखे सभ्य आणि विद्वान खासदार दिले. सध्या देशाच्या संसदेतील खासदारांमध्ये सभ्यपणा दिसेनासा झालाय. टिम अण्णांच्या म्हणण्यानुसार 150 पेक्षा जास्त खासदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुंड प्रव्रुत्तीच्या खासदारांमुळे संसदेच्या पवित्र मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सभ्य खासदारांमध्ये बुद्धिमत्तेचा अभाव प्रकर्षाने जाणवतोय. अशा वेळी सभ्यपणा आणि विद्वत्ता हे दोन्ही गुण ठासुन भरलेला खासदार नजरेला पडणे 'दुर्मिळ योग' बनलाय. कोकणातील लोकांच्या पुर्वजांनी खरच काहीतरी पुण्य केल असणार. त्यांच्या क्रुपेनेच सुरेश प्रभुंच्या रुपात या पठडीतला दुर्मिळ खासदार आपल्या मतदारसंघात अजुनही आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुसंस्क्रुत खासदारांना संसदेपर्यँत पोहोचुच द्यायचे नाही असा विडा शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीँनी उचललेला दिसतोय. सुरेश प्रभुंना शिवसेनेने सर्वप्रथम राज्यसभेवर पाठवले नाही आणि आता प्रभुंचे लोकसभेचे तिकीट कापुन एका सज्जन माणसाला राजकरणातुन कायमचा संपवण्याचा घ्रुणास्पद प्रकार शिवसेनेने केला आहे. अजुनही सामान्य लोक मुग गिळुन गप्प आहेत.शिवसेनेसारख्या पक्षाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता सामान्य लोकांनाच एकी दाखवावी लागेल. नाहीतर भविष्यात पुर्ण संसदच गुंडानी भरलेली दिसेल. या देशाचे दुर्देव इतकेच आहे की इकडे दुर्जनशक्ती स्वतःचे हित साधण्यासाठी एकत्र येतात पण सज्जनशक्तीँचे एकत्रिकरण कधीच होत नाही. सज्जनशक्ती नेहमीच अलिप्त राहतात. ज्या दिवशी सज्जनशक्ती एकवटतील तेव्हाच शिवसेनेसारखे पक्ष सुतासारखे सरळ होऊन सुरेश प्रभुंसारख्या सभ्य नेत्याला उमेदवारी देतील.

निवडणुकीतील सर्व बाजु प्रभुंसाठी अनुकुल असताना केवळ पक्षश्रेष्ठीँची मर्जी राखण्यासाठी राऊतांना उमेदवारी दिली तर जनतेने हताश होण्याची काही गरज नाही. निवडणुकीत प्रभुंना अपक्ष म्हणुन उभे करुन त्यांचा प्रचार ही स्वतःची नैतिक जबाबदारी समजुन पार पाडावी. त्यानंतर अपक्ष सुरेश प्रभुंनी मिळवलेला विजय हा लोकशाहीत मतदार राजा असतो या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारा असेल.

"...आणि 'दगड' लोकसभेचा उमेदवार झाला."


सेनेचे कट्टर समर्थक नेहमी मला उपहासाने सांगायचे की,
"पक्षाने 'दगड' जरी उभा केला तरी आम्ही त्याला निवडुन आणु."

आज तरुण भारतमधील बातमी वाचुन मी अवाकच झालो. कार्यकर्त्याँच्या शब्दांचा मान राखत पक्षश्रेष्ठीँनी लोकसभेसाठी चक्क दगडालाच उमेदवारी बहाल केली आहे.
आजपर्यँत दगडाला शेँदुर फासत देव करण्याच्या आख्यायिका ऐकल्या होत्या पण इकडे तर दगडालाच उमेदवार म्हणुन निवडणुकीत उतरवले. काय करणार...! कलियुगातील पक्षांकडुन यापेक्षा वेगळ्या उमेदवाराची अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

आम्ही दगडाला निवडुन आणु हे पक्षाप्रती भावनिक होऊन म्हणणे समजण्यासारखे आहे पण व्यावहारिक जीवनात दगड क्वचितच निवडुन येतात. अन्यथा एव्हाना संबंध महाराष्ट्रात भगवा फासलेले दगड नेतेपदी मिरवताना दिसले असते.

आता याच दगडाच बघा ना...! यापुर्वी विधानसभा निवडणुकीत मुंबईमधील मतदारसंघात या दगडाला लोकांनी एकदा नव्हे तर सलग दोनदा पायदळी तुडवले आहे. म्हणुनच मागच्या दाराने विधानपरिषदेत जायची वेळ आली. आता मुंबईसारख्या शहरात दगडाला उमेदवार मानणारे सेना कार्यकर्ते कमी आहेत का...?मग तरीसुद्धा या दगडाचा मुंबईत पराभव का झाला...? कारण निवडणुकांमध्ये कोणत्याही दगडाला मत द्यायला फक्त त्या त्या पक्षाचे भावुक कार्यकर्ते नसतात तर आमच्यासारखे सामान्य लोक देखील असतात. विचार करुन मत देणारे लोक पक्षाने उभ्या केलेल्या दगडांना त्यांची योग्य ती लायकी दाखवतात आणि एका चांगल्या उमेदवारालाच आपले बहुमुल्य मत देऊन निवडुनही देतात. जनतेने विधानसभेला दोनदा नाकारल्यानंतर माझ्यासारखा कोणी असता तर राजकरण सोडुन संन्यास घेऊन हिमालयात गेला असता. मात्र काही निर्लज्ज लोकांमध्ये कोडगेपणा ठासुन भरलेला असतो. विधानसभेत दोनदा पराभव झाल्यानंतर मुंबईतला मतदारसंघ सोडुन फरार झाले आणि इकडे कोकणात थेट लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी आले. हे म्हणजे बारावीत शास्त्र शाखेत नापास झालेल्या पोराने इंजिनिअरीँगची डिग्री मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे. अरे पोरा, अगोदर बारावी तर पास हो. मग इंजिनीअरीँगच बघु...! पण कोण काय करणार...? हे राजकरण आहे इकडे फक्त पैसा बोलतो. पक्षश्रेष्ठीँच्या समोर पैशांच्या पेट्या टाकल्या की त्यांचे कान बहिरे होऊन, सामान्य लोक कोणाला उमेदवारी द्यायला सांगतायेत ते ऐकुच येत नाही. त्याचबरोबर पैशांच्या बंडलांसमोर पक्षश्रेष्ठीँची द्रुष्टीदेखील अंध होऊन जाते. त्यांना स्पर्धेत असलेला 'सभ्य आणि विद्वान' उमेदवार दिसतच नाही. अरे, पैशाने विकले जाऊन दगडांना उमेदवारी द्याल पण निवडणुकीत मत देणा-या मतदारांना कसे विकत घ्याल...? अशा दगडांना उमेदवारी दिल्यामुळेच साहेबांनी रक्ताच पाणी करुन उभारलेल्या सोन्यासारख्या पक्षाचा आज 'दगड' व्हायची वेळ आली आहे. पैशांच्या धुंदीत मश्गुल होऊन भान हरपलेल्या मदांधांना हे कोणी समजवावे...? साहेबांनी रत्नपारख्याच्या नजरेने एक-एक हिरा जमवुन पक्ष बांधला आणि आज थिल्लर पैशांपायी साहेबांच्या त्या हि-यांनाच बाजुला करुन दगडांना पुढे आणुन तुम्ही नक्की काय साध्य करू पाहत आहात...? हरामखोरांनो, साहेबांनी ऊन्हातान्हात फिरुन, उभ आयुष्य खर्च करुन, उभारलेल्या पक्षाचा त्यांच्या पश्चात विध्वंस करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही...??

शिक्षणाचाच विषय आला म्हणुन एक गोष्ट सांगतो, राजापुर मतदारसंघाने आजपर्यँत नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू अशा विद्वान उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे C.A, L.L.B, Phd, B.Com अशा एकापेक्षा एक पदव्या मिळवलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या बुद्धिमत्तेने नावाजलेल्या उमेदवाराला नाकारुन ज्या दगडाला पुढे आणत आहात त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे...? की बुद्धिमत्तेच्या निकषावरही उमेदवाराच्या डोक्यात 'दगड'च भरलेले आहेत...?? कोकणच्या लोकांनी आजपर्यँत बुद्धिमान उमेदवारालाच आपले बहुमुल्य मत देऊन मतदारसंघाचा वारसा जपलेला आहे. त्यामुळे मतदानापुर्वी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाहिर करावीच लागेल.

अजुनही काही लोक प्रभुंना पक्ष राज्यसभेवर पाठवणार अशी खोटारडी आश्वासने देत आहेत. त्या अर्धवटांना एवढच सांगेन की राज्यसभेची जागा याअगोदरच उद्योगपती धुत आणि संजय काकडे यांना बहाल केलेली आहे. यातील संजय काकडेँनी इयत्ता सातवी पास एवढे उच्चशिक्षण घेतले आहे. आता राज्यसभेत एवढे उच्चशिक्षित उमेदवार पाठवणारा पक्ष लोकसभेला कोणत्या दर्जाचे उमेदवार देईल हे वेगळे सांगायला नको.

काही कार्यकर्ते सांगतात त्यानुसार धुत यांनी यापुर्वी खासदारकीच्या काळात फार मोठा जनसंपर्क ठेवला असेल किँवा काकडेँनी संघटना उभारली असेल. त्यामुळेच प्रभुंना डावलुन या दोन महाशयांना राज्यसभेची सीट बहाल केली असावी. नाही का...?

असो, मांजर डोळे बंद करुन दुध पिते कारण त्याला वाटते आपण दुध पितोय हे जगाला कळणार नाही. प्रत्यक्षात दुनियेला सगळ माहित असत. "ये पब्लिक है, सब जानती है." धुत किँवा काकडे यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी किती पेट्या देऊन पक्षसेवा केली हे शेँबड्या पोरालाही माहित आहे. त्याच पक्षाने लोकसभा उमेदवारी दगडांना कशी बहाल केली हे वेगळ सांगायची गरज वाटत नाही.

शेवटी इतकच सांगेन की, घोड्यांच्या शर्यतीत रंग फासलेल्या गाढवाला उतरवता येईलही पण शर्यतीला सुरुवात होताच जेव्हा तो गाढव आडवातिडवा धावु लागतो तेव्हा लोकांना लगेच कळत-

"अरेच्चा हा घोडा नाही...! हा तर गाढव आहे."

कोकणच दुर्देव इतकच की नाथ पै, मधु दंडवते यांच्या उमेदवारीने पवित्र झालेल्या या मतदारसंघात प्रथमच घोड्यांची नव्हे तर गाढवांची शर्यत होत आहे. फक्त आम्ही या 'गाढवांच्या शर्यतीत घोड्याला उतरवु पाहत होतो पण उमेदवारी देणा-या गाढवांना शेवटी 'दुसरा गाढव'च शर्यतीसाठी योग्य वाटला. दुर्देवाने आता कोणता गाढव शर्यतीत जिँकतोय, हे आम्हाला पाहायचय.

आपल्या मतदारसंघातील गाढवांच्या शर्यतीचे साक्षीदार होण्याअगोदर मधु दंडवतेँनी डोळे मिटले आणि मोठ्या संकटातुन सुटले. अन्यथा आज त्यांच संवेदनशील मन नक्कीच दुखावल असत.

"फिरुनी पुन्हा नवे, नाते मला हवे...!"



'प्रेम' या शब्दाला प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वपुर्ण स्थान आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर तरी नक्कीच प्रेम केले असेल. खास करुन ती व्यक्ती तुमची प्रियकर अथवा प्रेयसी असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला आपल्या तिच्यावर असणा-या प्रेमाची कबुली देण अपरिहार्य बनत. आता प्रेमाची कबुली नेमकी कधी द्यावी हे बहुतेक वेळा कळत नाही आणि मग गोँधाळल्यासारख व्हायला होत. पाश्चात्यांनी त्यासाठीच 'Valentine day' ची संकल्पना पुढे आणली. फक्त पाश्चात्यांनी संकल्पना आणली म्हणुन आपल्या महान संस्क्रुतीचे गोडवे गात Valentine day ला विरोध करुन नाक मुरडणारे अनेक तथाकथित संस्क्रुतीरक्षक भेटतील. त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन या दिवशी प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रेयसीसमोर प्रेमाची कबुली दिली पाहिजे. ती आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या स्थानी आहे याची जाणीव तिला करुन दिली पाहिजे. आजच्या दिवशी प्रेमाबद्दलचे माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करायला मला नक्कीच आवडेल.

"साधारण 5-6 वर्षापुर्वी 'ती' माझ्या आयुष्यात आली. वयच असत ते प्रेमात पडण्याच...!
प्रेमाची हुरहुर लागण्याच...!!
या जगात आपल अस हक्काच कोणी तरी असाव ही भावना बळावण्याच...!!! 'प्रेम' आणि 'आकर्षण' या शब्दातला फरक कळत नसतानाही मी तिच्या प्रेमात पडलो. आम्ही पहिल्यापासुनच एकमेकांचे चांगले मित्र होतो, नंतर फोनवर बोलण होऊ लागल आणि माझ्या नकळत 'ती' माझ्या आयुष्याचा 'अविभाज्य' भाग बनली. सुरुवातीचे काही महिने फोनवर तासनतास गोडगोड बोलण्यात गेले. एकीकडे लेक्चरला एक-एक मिनिट तासावानी वाटायचा आणि दुसरीकडे फोन ठेवल्यावर दोन-तीन तासांच बोलणही काही मिनीटांचच वाटायच. नंतरच्या काळात एकमेकांबाबत 'पझेसिव्हनेस' वाढत जातो आणि मग खटके उडणारच...! भांडणानंतरचा अबोला, काही दिवसांचा दुरावा, मग Sorry म्हणुन केलेली तडजोड हे सगळ काही नात्याचाच एक भाग बनुन जात. एरव्ही स्वतःची चुक असली तरी इतर कोणाला Sorry म्हणताना माझा Ego नेहमीच आड यायचा. कोणासमोर झुकण मला कधीच मान्य नसायच. मात्र तिच्या बाबतीत अनेकदा माझी चुक नाही हे माहित असतानाही मी Sorry म्हणायचो, नेहमी पडती बाजु घ्यायचो. कुठेतरी मला माझ्या आवडत्या व्यक्तीसमोर झुकण्यात फार मोठा आनंद वाटायचा. त्या तडजोडीत नात टिकवल्याच वेगळच समाधान मिळायच. या सर्व अनुभवानंतर आम्हा दोघांनाही नात उलगडत गेल. आम्हाला एकमेकांच्या स्वभावाची नीट ओळख झाल्यानंतर भांडणांच प्रमाण कमी झाल. काही काळानंतर फोनवरच बोलणही अपुर वाटायच. भेटण्याची ओढ स्वस्थ बसु द्यायची नाही पण भेटताना कोणी पाहणार तर नाही ना, हा यक्षप्रश्न नेहमीच पडलेला असायचा. खर तर आजच्या काळात जिथे मुल-मुली एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन बिनधास्त फिरतात त्या काळात लोकांना घाबरण्याच काहीच कारण असु नये. आज माझ्या एमबीएच्या वर्गातही अनेक जोडपी एकत्रच बसतात. प्रेमाच्या बाबतीत माझे विचार थोडे कालबाह्यच आहेत आणि योगायोगाने तसेच विचार असणारी मुलगी माझ्या आयुष्यात आली. प्रेम ही 'प्रदर्शनीय' गोष्ट नसावी. काही गोष्टी आपल्यापुरत्या ठेवलेल्या चांगल्या असतात. त्यामुळे अगदी भेटल्यानंतरही 10 मिनीटांपेक्षा जास्त आम्ही थांबत नसायचो. फोनवर तासनतास बोलत असलो तरी प्रत्यक्ष भेटीत तोँडातुन शब्दच बाहेर पडत नसायचे. माझ्यासमोर उभ असताना तिची झुकलेली नजर आणि गालातल्या गालात हसण्याची अदा आजही तिच्यावर पुन्हा जीव ओवाळुन टाकण्यास प्रव्रुत्त करते. अगदी कोणाचीही हमखास नजर लागावी असच आमच 'नात' होत. तळहातावरच्या फोडाप्रमाणे, गुलाबाच्या पाकळीवानी आम्ही दोघांनाही ते जोपासल होत. नंतरच्या काळात परिस्थितीच अशी बिकट झाली की ते नात पुढे नेण आम्हा दोघांनाही कठीण बनल. भांडण करुन कायमच दुर होण्यापेक्षा आजही आम्ही एकमेकांमधील मैत्री कायम ठेवण्याची प्रगल्भता दाखवली. आपण एकत्र येऊ शकत नाही हे माहित असताना दुसरी कोणीतरी शोध आणि स्वतःच आयुष्य स्थिर करण्याचा सल्ला तिने मित्रत्वाच्या नात्याने अनेकदा दिला. आपण पुर्ण दुनियेला फसवु पण स्वतःच्या मनाला कसे फसवु शकणार...? आयुष्यात काही जागांमुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन येत नसते कारण आपल्या मनानेच त्या जागा विशिष्ट व्यक्तीलाच बहाल केलेल्या असतात. अगदी तिच्या आयुष्यातीलही माझी जागा दुसरा कोणीच घेऊ शकला नाही कारण आम्ही मनाने एकच होतो. त्यामुळेच पुढील काळात दोघांच्या वाटा वेगवेगळ्या असुनही एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटते. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतोच. तिच्यावर भरभरुन प्रेम करण माझ्या हातात होत आणि मी ते प्रामाणिकपणे केल. आयुष्यात अनेकदा अपयश बघितले आणि या मनाने अगदी खंबीरपणे ते पचवले. मात्र तिचा हातात दुस-या कोणाच्या हातात पाहण्याची ताकद माझ्या नजरेत नाही. अस म्हणतात, मन मोठ असल की सार काही सामावुन घेता येत पण माझ सर्वस्वच दुस-या कोणाच्या मालकीच झालेल मी सहन करु शकणार नाही. तिच्यासोबत घालवेला प्रत्येक क्षण कुठेतरी आठवणीच्या कप्प्यात बंदिस्त झालाय. भविष्याबाबत सजवलेल्या स्वप्नांना निरोप तरी कसा द्यायचा, हेच मला समजत नाहीय. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवताना माझ्या नशीबी संघर्ष आलाय. यावेळी साक्षात नियतीशी संघर्ष करुन मी माझ प्रेम मिळवुनच दाखवेन कारण कोणत्याही परिस्थितीत हार मानुन हातपाय गाळण माझ्या रक्तातच नाही. फक्त यावेळी नात बांधण्यासाठी पुन्हा एकदा तिची साथ मला नव्याने लागेल.

लेखाचा शेवट 'तुझ्यावीना' गाण्याच्या ओळीँनी करतो.-

"फिरुनी पुन्हा नवे, नाते मला हवे,
जीव तुटतो हा, का असा रे, सांग ना,
तुझ्यावीना... तुझ्यावीना..."

'Happy Valentine Day...!'

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

तुला नाही मला, घाल कुत्र्याला...!

विनायक राऊतांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली तर काय परिणाम होतील याची मी आधीच कल्पना दिली होती. आता शिवसेनेकडुन राऊतांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यावर दिपक केसरकरांनी अपक्ष म्हणुन लोकसभेला आपली उमेदवारी जाहिर केली आहे. केसरकरांनी अगोदरच इशारा दिला होता की शिवसेनेने सभ्य आणि विद्वान अशा सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली नाही तर निलेश राणेँविरुद्ध तेच अपक्ष म्हणुन उभे राहतील. केसरकरांनी आपले शब्द खरे करुन दाखवले.

मनसेच्या परशुराम उपरकरांनीही शिवसेनेने सुरेश प्रभुंना वगळुन विनायक राऊतांना उमेदवारी दिल्यास मनसेकडुन लोकसभेला उमेदवार उभा करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिलीच होती आणि विनायक राऊतांच्या घोषणेनंतर मनसे लोकसभा उमेदवार नक्कीच उभा करेल.

विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी द्या असा कंठशोष ज्यावेळी मी करत होतो तेव्हा काही राऊत समर्थकांनी मला अस्तनीतला निखारा म्हणुन हिणवले, काहीँनी व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचे सल्ले दिले, काही तर थेट निलेश राणेँचा एजंट ठरवुन मोकळे झाले. राजकरण जास्तच समजणा-या एका आमदार महाशयांनी तुला राजकरणाची समज नाही, फक्त विनायक राऊतच ग्राऊंड लेवलवर नारायण राणेँना फाईट देवु शकतात, अशी विधाने केली. मला शहाणपणा शिकवण्याअगोदर विनायक राऊत लोकसभेला जिँकुन तरी येवु शकतात का, याचा अंदाज घेणे एका आमदाराला सुद्धा जरुरीचे वाटले नाही. अगदी आमदारापासुन कार्यकर्त्यापर्यँत प्रत्येक जण शिवसेनेने दगड जरी उभा केला तरी तो नक्कीच जिँकुन येणार या अंधविश्वासात वाहवत चालले होते. काँग्रेसची आणि राणेँची ताकद नक्कीच कमी झाली आहे म्हणुन राजकरणात मुरलेला राणेँसारखा नेता सहजासहजी हरत नसतो, याची किमान जाणीव विरोधकांना असणे जरुरीचे होते. त्यांना तीच जाणीव करुन देण्याचा मी प्रयत्न केला तर ते मलाच गुन्हेगार ठरवुन मोकळे झाले.

सुरेश प्रभु माझे काही नातेवाईक नव्हते किँवा विनायक राऊत खानदानी दुश्मनही नव्हते. नारायण राणेँना हरवणे कोणा एका पक्षाला शक्य नाही ही गोष्ट त्यांच्या कोणत्याही विरोधकाला मान्यच करावी लागेल. राणेँना हरवायचे असेल तर शिवसेना-भाजप-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस या चारही विरोधकांना एकत्र आणुन मोट बांधणे कोकणच्या राजकरणाची गरज होती.ही किमया करण्यासाठी राजकरणातील अजातशत्रु व्यक्तिमत्वाला निलेश राणेँविरोधात उमेदवारी देणे सर्वाँच्याच हिताचे होते. अशी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसुन शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभु हेच आहेत.

अगदी शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपसुद्धा सुरेश प्रभुंच्या उमेदवारीसाठी आग्रही होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश प्रभुंचा प्रचार करण्याची तयारी दाखवली होती. इतक्या सगळ्या गोष्टी सुरेश प्रभुंना अनुकुल असताना केवळ शिवसेना सचिवपदी आहेत म्हणुन विनायक राऊतांना उमेदवारी द्यायचा घाट घालणे हे आकलनापलीकडचे होते.

सुरेश प्रभु हे गेली 20 वर्षे कोकणच्या राजकरणात आहेत. त्यांचे नाव कोकणच्या घराघरात पोहोचले आहे. त्याउलट गेली दिड वर्षे मतदारसंघात फिरणा-या विनायक राऊतांना तितकस कोणी ओळखत नाही. मते मिळवण्यासाठी उमेदवार शेवटच्या मतदारापर्यँत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळेच आणखी पाच वर्षाँनी विनायक राऊत हे नाव तळागाळात पोहोचल्यावर त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर ते समजण्यासारखे होते. मात्र सुरेश प्रभुंसारखा सर्वश्रुत आणि प्रसिद्ध उमेदवार शिवसेनेकडे असताना विनायक राऊतांना उमेदवार म्हणुन पुढे करणे पुर्णपणे चुकीचे आहे.गेले वर्षभर कोकणात राणेपर्वाच्या अस्ताची स्वप्न लोक बघत होते मात्र विरोधक सवयीप्रमाणे आपल्या पायावर स्वतःच कु-हाड मारुन घेत ती स्वप्न भंगवतील अशीच चिन्हे दिसु लागली आहेत. निलेश राणेँना मत देणारे नेहमीच त्यांना पाठिँबा देतील मात्र त्याच वेळी राणेँच्या विरोधात पडणारी मते राऊत, केसरकर आणि मनसे यांच्यात दुभागली जातील. लोकसभेची लढत चौरंगी झाली तर निलेश राणेच विजयी होतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. शिवसेनेने फक्त विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी दिली असती तर प्रभुंना ज्येष्ठ बंधुचा सन्मान देणा-या दिपक केसरकर आणि परशुराम उपरकरांनी लोकसभेला उमेदवारी न स्वीकारता प्रभुंचा प्रचार करण्यात धन्यता मानली असती. विरोधकांची एकी अबाधित राहुन निलेश राणेँचा पराभव निश्चितच झाला असता आणि कोकणवासियांचे स्वप्न देखील पुर्ण झाले असते. विरोधकांनी आपला मुख्य शत्रु कोण आहे याची एकदा चाचपणी केली पाहिजे. आपापसात लढुन मुख्य शत्रुला विजय मिळत असेल तर ती गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे.अजुनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेकडुन उमेदवारीची अधिक्रुत घोषणा अजुन झालेली नाही. राऊत आणि केसरकर दोघेही लोकसभेला उभे राहिले तर दोघांचाही पराभव आणि निलेश राणेँचा विजय निश्चित आहे. त्यापेक्षा विनायक राऊतांनी पक्षहितासाठी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी द्यावी. त्यामुळे दिपक केसरकर आपोआप माघार घेतील किँवा केसरकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले तरी सुरेश प्रभुंची वोटबँकला ते हात लावु शकणार नाहीत. प्रभुंच्या अनुपस्थितीत शिक्षक, वकील, पदवीधर, सरकारी नोकर अशा सुशिक्षित वर्गाची मते राणे, राऊत किँवा अन्य कुणाला न मिळता आपल्यालाच मिळतील याची केसरकरांना खात्री आहे. त्याच विश्वासावर ते राऊतांना आव्हान देत आहेत. त्यामुळे राऊतांऐवजी प्रभुंना उमेदवारी दिली तर प्रभुंची पारंपारिक वोटबँक प्रभुंकडेच राहिल आणि केसरकरांनी माघार घेतली नाही तरी ते शिवसेनेच फार मोठ नुकसान करु शकणार नाही.

आता निवडणुकीला फारच थोडे दिवस उरले आहेत.सुरेश प्रभुंना सामान्य लोकांचा असलेला पाठिँबा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेँपर्यँत पोहोचवण्यासाठी मी त्यांना e-mail किँवा पोस्टाने पत्र पाठवायचे ठरवले आहे.

नदीजोड प्रकल्प - काळाची गरज...! (सुरेश प्रभू )

           लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू कागले आहेत. या निवडणुकीत सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकास हाच महत्वाचा मुद्दा राहणार आहे. मानवी नागर संस्कृतींचा विकास नाईल, सिंधू अशा नद्यांच्या आश्रयानेच झालेला आहे हे सर्वज्ञात आहे. मानव समाजाचे अस्तित्व आणि आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यावरणीय उन्नतीसाठी पाणी हा मुलभूत असा घटक आहे. त्यातून भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशात दरडोई पाण्याची उपलब्धता घटत असताना जलव्यवस्थापनाला असलेले महत्व वादातीत आहे. या प्रश्नाचे महत्व देशाचे माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयींनी जाणले होते आणि आता नरेंद्र मोदींनीही सत्तेत आल्यास देशाला समतोल आणि शाश्वत जलव्यवस्थापन देऊ शकणारा महत्वाकांक्षी असा नदीजोड प्रकल्प राबविण्याची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठबळाने आकार घेत असलेल्या नदीजोड प्रकल्पाचे सोनिया गांधींसह सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केले होते. मी अध्यक्ष असलेल्या कार्यगटाने सादर केलेल्या सर्वंकष अहवालाच्या आधारे मा. सर्वोच्च न्यायालयाने युपीए सरकारच्या कार्यकाळात गुंडाळून ठेवलेला नदीजोड प्रकल्प त्वरित राबवला जावा असा आदेश फेब्रुवारी २०१२ रोजी दिलेला आहे.


            दोन वर्षापुर्वी आसाम राज्यात एकदा नव्हे तर दोनदा महापुर आला. महापुरात अनेक लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. दुसरीकडे, गतवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात भीषण दुष्काळ पडला. काहींनी या दुष्काळाची तुलना १९७२ च्या दुष्काळाशी केली. दुष्काळग्रस्त भागात भर उन्हात पाण्याविना तहानेने तडफडनाऱ्या जनतेला टँकर मधुन पाणीवाटप करावे लागले. पश्चिम महाराष्ट्रात तहानभुकेने व्याकुळ जनावरांसाठी चारा-छावण्यांची व्यवस्था करावी लागली. दुष्काळ व महापुराने ग्रासलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रशासनाकडे ५० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या चर्चा रंगल्या आणि पाऊस पडल्यावर विरुनही गेल्या. एकंदरीतच काय तर दुष्काळावर तात्पुरते उपाय करुन आपण सर्वांनी भविष्यातील दुष्काळांचा प्रश्न तसाच लोंबकळत ठेवला. जखम साधी असेल तर ती मलमपट्टीने बरी होते पण एखाद्या जुनाट रोगावर तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नसते. असा रोग हा मुळापासुन बरा करावा लागतो. महापुर आणि दुष्काळ हे आपल्या देशाला गेली कित्येक वर्षे भेडसावणारे 'महारोग' आहेत. दुष्काळ-महापुरापासुन कायमची मुक्ती मिळवायची असेल तर 'नदीजोड प्रकल्प' हाच त्यावरील रामबाण उपाय आहे. तरीसुद्धा नदीजोड प्रकल्पासाठी निरुत्साह दाखवणारे सध्याचे सरकार या देशाची शोकांतिका आहे. हिच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात देशात पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम १० वर्षे राबवण्याचे काम हाती घ्यावे लागेल. केँद्र सरकार दरवर्षीच्या अर्थसंकल्पात करोडो रुपयांचा निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी राखुन ठेवते. दरवर्षी करोडो रुपयांचा निधी दुष्काळ आणि पुरग्रस्त भागात खिरापत म्हणुन वाटण्यापेक्षा नदीजोड प्रकल्पासारखी शाश्वत उपाययोजना राबवणे अत्यंत व्यवहार्य ठरेल.

            पाण्याला प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. १९४७ साली देशाच्या फाळणीनंतर पाण्याने संपन्न असलेला फार मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. त्याची भरपाई करण्यासाठी भारताने पुढील काळात नद्यांवर अनेक प्रकल्प उभारले. मात्र भारताच्या भौगोलिक परिस्थितीमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या प्रमाणात भिन्नता आढळुन येते. एकीकडे पश्चिम वाळवंटात राजस्थानमध्ये १०० मिमि इतकाच पाऊस पडतो तर दुसरीकडे ईशान्य भारतात चेरापुंजीमध्ये ११००० मिमि पाऊस पडतो. त्यामुळेच देशाच्या एकुण भुभागापैकी एक तृतीयांश (१/३) क्षेत्रात दुष्काळ पडतो आणि एक अष्टमांश (१/८) भागात नद्यांना पुर येतो. भारताच्या मान्सुन हवामानात १५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस १५ दिवस किंवा १०० तासांपेक्षा कमी वेळात पडुन जातो. त्यामुळे वाळवंटी प्रदेशात ५ पावसाळी दिवस पाहायला मिळतात आणि हेच प्रमाण ईशान्येकडे १५० दिवस एवढे असते. मान्सुन कालावधीतच भारतातील नद्यांचा जवळपास ८० ते ९० टक्के वार्षिक प्रवाह दिसुन येतो. कृषी आणि आर्थिक क्षेत्राची गरज भागवण्यासाठी, तसेच पुराचे अतिरिक्त पाणी वळवून साठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलाशयांची आवश्यकता आहे. दुर्देवाने दक्षिण भारतातील द्विकल्पीय भागात जलाशयांचे साठे मर्यादित असुन स्वच्छ पाण्याचे स्त्रोत प्रचंड प्रमाणात प्रदुषित केले जात आहेत.

            नदीजोड प्रकल्पाबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. देशात पाण्यासाठी होणारे राज्याराज्यातील संघर्ष टाळुन 'विविधतेतील एकतेचा' संदेश देण्यासाठी आणि अनेक समस्यांवर समतोल व शाश्वत उपाय म्हणुन एनडीए सरकारच्या काळात नदीजोड प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. माझ्या अध्यक्षतेखाली एनडीए सरकारची 'नदीजोड प्रकल्प कृती समिती' स्थापन केली गेली. केंद्र आणि राज्य पातळीवर जलव्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय स्थापित करणे हे या प्रकल्पातील प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी अत्यंत कमी कार्यकाळात संपुर्ण देशामधील शेतकरी, शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, श्री. राजेंद्र सिंह यांच्या सारखे जलनीतीतज्ञ, सर्व राजकीय पक्ष, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अशा संबंधित भागीदारांसोबत आम्ही तब्बल ५००० बैठका, चर्चासत्रे पार पाडली.

      देशातील नद्यांची जोडणी या कल्पनेचा विकास करताना मी देशातील ६.५ लाख गावे केंद्रबिंदू मानली होती. देशातील सर्व राज्यांच्या एकात्मिक व सर्वंकष जलव्यवस्थापनासाठी रिमोट सेन्सिंग व जीआयएस प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दूरदर्शी धोरणे व कालबद्ध मोहीम आखणे हा या प्रयत्नाचा मूळ गाभा होता. नदीजोड प्रकल्पाद्वारे मान्सुनमध्ये आलेल्या पुराचे जादा पाणी जलाशयामध्ये साठविण्यात येईल. पुढील ऋतुत एखाद्या प्रदेशाच्या गरजेनुसार ते पाणी त्या प्रदेशाला पुरविले जाईल.


      नदीजोड प्रकल्पामुळे २०५० सालापर्यँत देशातील १६ कोटी हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परिणामी देशातील अन्नधान्याचे उत्पादन दुप्पटीने वाढू शकेल. मानवाच्या प्रत्येक कृतीमुळे पर्यावरणात काही ना काही बदल घडतच असतात. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाचा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करत असताना, त्या प्रकल्पाने जमीन, पाणी अशा देशातील उपलब्ध साधनांचा पुरेपुर वापर करता येईल का, याचाही सर्वाँगाने विचार करावा लागतो. त्यासाठीच २००३ साली नदीजोड प्रकल्पाचा तांत्रिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय अशा सर्व बाजुंनी सर्वँकष विचार करण्यासाठी मी १७ कमिट्या नेमल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नद्यांच्या संदर्भात या प्रकल्पाचा विचार करता जागतिक स्तरावर पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भारताची शेजारी राष्ट्रे नेपाळ, बांगलादेश, भुतानची पाण्याची गरज भागवण्याची क्षमता देखील नदीजोड प्रकल्पात आहे. फक्त योग्य नियोजन करुन योग्य ठिकाणी जलाशय बांधणे गरजेचे आहे. गेली कित्येक दशके यासंदर्भात शेजारी राष्ट्रांशी बोलणी सुरु आहे. पुढील काळात बोलणीचे प्रयत्न असेच सुरु ठेवण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती समितीने नदीजोड प्रकल्प दोन विभागात राबवण्याची सुचना केली होती.

* दक्षिणेकडील द्विपप्रदेश आणि हिमालय पर्वतरांगातील उत्तरेकडील प्रदेश या दोन टप्प्यात हा प्रकल्प विभागावा.

* द्विपप्रदेशासाठी दक्षिण वॉटर ग्रीड तयार करुन मुख्य १६ नद्या जोडण्यात याव्यात. महानदी आणि गोदावरी नद्यातील अतिरिक्त पाणी हे पेन्नार, कृष्णा, वैगेई आणि कावेरी या नद्या व त्यांच्या उपनद्यांमध्ये सोडावे.

* केरळमधील पश्चिमवाहिनी नद्या आणि कर्नाटकातील पुर्ववाहिनी नद्या जोडाव्यात.

* तापीच्या दक्षिणेला आणि मुंबईच्या उत्तरेतील नद्या-उपनद्या जोडाव्यात.

* यमुना नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या जोडाव्यात.

* हिमालय पर्वतरांगांमध्ये गंगा आणि ब्रम्हपुत्रा या दोन प्रमुख नद्यांसह त्यांच्या उपनद्यांवर धरणे बांधावीत. या धरणांद्वारे सिंचन, ऊर्जानिर्मिती आणि पुरनियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य करावे.

* कोसी-घागरा, कोसी-मेश, घागरा-यमुना, गंडकी-गंगा, यमुना-राजस्थान, राजस्थान-साबरमती, शारदा-यमुना, फुराक्का-सुंदरबन, ब्रम्हपुत्रा-गंगा, सुवर्णरेखा-महानदी, गंगा-दामोदर-सुवर्णरेखा असे नदीजोड विकसित करावेत.



* गेल्या काही वर्षात वातावरणातील अनाकलनीय बदलांमुळे मान्सुनवर परिणाम होऊन पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. वाढलेल्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज लागेल आणि आपल्याकडे जगातील फक्त ४ टक्के स्वच्छ पाणी शिल्लक आहे. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाशिवाय पर्याय नाही.

* रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणात घट व्हावी, रेल्वेवाहतुकीवरील भार कमी व्हावा म्हणुन आपल्याला देशांतर्गत जलवाहतुकीवर भर द्यावा लागेल. यामुळे प्रवासाचा खर्च सुद्धा कमी होईल. नदीजोड प्रकल्पामुळे ५००० कि.मी. लांबीचे नद्या जोडणारे रुंद कालवे हे देशभरात स्वस्त जलवाहतुकीचे साधन ठरणार आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी ३००० कोटी रुपये इतक्या डिझेलची बचत होईल.

* देशाची वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जेसारख्या विनाशकारी ठरलेल्या पर्यायांचा पाठपुरावा सरकार करत आहे. नदीजोड प्रकल्प राबविला तर ३४००० मेगावॅट इतक्या प्रचंड प्रमाणात जलविद्युत मिळु शकेल.

* देशात बेरोजगारीचे वाढणारे प्रमाण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. नदीजोड प्रकल्पामुळे १० लाख लोकांना किमान १० वर्षे रोजगार निर्मिती म्हणजे कमीत कमी २५० दशलक्ष मनुष्य दिवस रोजगार दरवर्षी, याप्रमाणे १० वर्षात २५०० दशलक्ष मनुष्य दिवस रोजगार निर्मिती शक्य आहे.

* २००२ मध्ये गंगा ब्रम्हापुत्रा खोऱ्यामधील पुरामुळे २५००० कोटींचे नुकसान झाले होते. प्रतिवर्षी होणारे कोट्यावधी रुपयांचे नुकसान आपण नदीजोड प्रकल्प कार्यान्वित करुन टाळु शकतो.

      नदीजोड प्रकल्पासाठी सुमारे पाच लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. साऱ्या देशाचे भविष्य उजळण्याची क्षमता असलेला नदीजोड प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमाद्वारे राबविण्याचे आदेश भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०१२ रोजी केँद्र सरकारला दिले आहेत. माझ्या अध्यक्षतेखाली सादर झालेला अहवाल, समर्थक, विरोधक तसेच अनेक तज्ञांचे अभिप्राय अशा सर्व साधक बाधक बाबींचा २००२ ते २०१२ अशा दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळात सखोल परामर्श घेऊन सदर आदेश दिला गेला आहे. या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी, मंत्री, या क्षेत्रातील तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असलेल्या एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केँद्र सरकारला दिला आहे. या समितीने प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम पाहणे अपेक्षित आहे. आजवर हा प्रकल्प रेँगाळल्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

      नदीजोड प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १० ते १५ वर्षे काम करावे लागेल. त्यासाठी यापुर्वी गृहित धरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम लागेलही पण प्रतिवर्षी दुष्काळ-पुरांवर तात्पुरता उपाय म्हणुन दिल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयांवर नक्कीच कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. आपल्या देशात असे मोठे प्रकल्प राबवताना पर्यावरण संरक्षण व विस्थापितांचे पुनर्वसन, आणि लाभांचे समन्यायी वाटप याबाबत पारदर्शकता आणि गांभीर्य असलेले दिसत नाही. म्हणून नदीजोड प्रकल्पसारखा महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी प्रकल्प राबविताना या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात तिसरे महायुद्ध झाले तर ते नक्कीच पाण्यासाठी असेल. नदीजोड सारखा प्रकल्प राबविताना आपण भावी पिढ्यांच्या अस्तित्वासाठी आणि देशाच्या सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकासासाठी अपरिहार्य अशा पाण्याची तरतुद करतोय हा उदात्त हेतु समोर असायला हवा. देशात कोणचेही सरकार येवो, आपल्या भावी पिढ्यांना आपण उत्तरदायी आहोत, कमीत कमी इतके तरी राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवायला हवे.

लेखाचा शेवट संस्कृतमधील एका सुंदर श्लोकाने करु-

" ॐ सह नाववतु ! सह नौ भुनक्तु ! सह वीर्यं करवा वहै !
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ! !
ॐ शांति शांति शांति

अर्थात -

तो परमपिता परमेश्वर आपले रक्षण करो !
आपण एकत्रित ऐश्वर्य आणि विविध सुखोसमृद्धी लाभो !
आपण शक्तिमान बनु, एकत्र बलाची उपासना करु, सात्विक सामर्थ्य मिळवु !
आपले अध्ययन तेजस्वी असो, यातुन परस्पर देवत्वाची भावना प्रकटो, एकमेकांविषयी आदर आणि सहानुभूतीची ज्योत जागो !
आपल्यात परस्पर द्वेषाची भावना कधीही न येवो !
ॐ शांति शांति शांति


- सुरेश प्रभू
( माजी केंद्रीय मंत्री )