रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

तुला नाही मला, घाल कुत्र्याला...!

विनायक राऊतांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली तर काय परिणाम होतील याची मी आधीच कल्पना दिली होती. आता शिवसेनेकडुन राऊतांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यावर दिपक केसरकरांनी अपक्ष म्हणुन लोकसभेला आपली उमेदवारी जाहिर केली आहे. केसरकरांनी अगोदरच इशारा दिला होता की शिवसेनेने सभ्य आणि विद्वान अशा सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली नाही तर निलेश राणेँविरुद्ध तेच अपक्ष म्हणुन उभे राहतील. केसरकरांनी आपले शब्द खरे करुन दाखवले.

मनसेच्या परशुराम उपरकरांनीही शिवसेनेने सुरेश प्रभुंना वगळुन विनायक राऊतांना उमेदवारी दिल्यास मनसेकडुन लोकसभेला उमेदवार उभा करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिलीच होती आणि विनायक राऊतांच्या घोषणेनंतर मनसे लोकसभा उमेदवार नक्कीच उभा करेल.

विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी द्या असा कंठशोष ज्यावेळी मी करत होतो तेव्हा काही राऊत समर्थकांनी मला अस्तनीतला निखारा म्हणुन हिणवले, काहीँनी व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचे सल्ले दिले, काही तर थेट निलेश राणेँचा एजंट ठरवुन मोकळे झाले. राजकरण जास्तच समजणा-या एका आमदार महाशयांनी तुला राजकरणाची समज नाही, फक्त विनायक राऊतच ग्राऊंड लेवलवर नारायण राणेँना फाईट देवु शकतात, अशी विधाने केली. मला शहाणपणा शिकवण्याअगोदर विनायक राऊत लोकसभेला जिँकुन तरी येवु शकतात का, याचा अंदाज घेणे एका आमदाराला सुद्धा जरुरीचे वाटले नाही. अगदी आमदारापासुन कार्यकर्त्यापर्यँत प्रत्येक जण शिवसेनेने दगड जरी उभा केला तरी तो नक्कीच जिँकुन येणार या अंधविश्वासात वाहवत चालले होते. काँग्रेसची आणि राणेँची ताकद नक्कीच कमी झाली आहे म्हणुन राजकरणात मुरलेला राणेँसारखा नेता सहजासहजी हरत नसतो, याची किमान जाणीव विरोधकांना असणे जरुरीचे होते. त्यांना तीच जाणीव करुन देण्याचा मी प्रयत्न केला तर ते मलाच गुन्हेगार ठरवुन मोकळे झाले.

सुरेश प्रभु माझे काही नातेवाईक नव्हते किँवा विनायक राऊत खानदानी दुश्मनही नव्हते. नारायण राणेँना हरवणे कोणा एका पक्षाला शक्य नाही ही गोष्ट त्यांच्या कोणत्याही विरोधकाला मान्यच करावी लागेल. राणेँना हरवायचे असेल तर शिवसेना-भाजप-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस या चारही विरोधकांना एकत्र आणुन मोट बांधणे कोकणच्या राजकरणाची गरज होती.ही किमया करण्यासाठी राजकरणातील अजातशत्रु व्यक्तिमत्वाला निलेश राणेँविरोधात उमेदवारी देणे सर्वाँच्याच हिताचे होते. अशी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसुन शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभु हेच आहेत.

अगदी शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपसुद्धा सुरेश प्रभुंच्या उमेदवारीसाठी आग्रही होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश प्रभुंचा प्रचार करण्याची तयारी दाखवली होती. इतक्या सगळ्या गोष्टी सुरेश प्रभुंना अनुकुल असताना केवळ शिवसेना सचिवपदी आहेत म्हणुन विनायक राऊतांना उमेदवारी द्यायचा घाट घालणे हे आकलनापलीकडचे होते.

सुरेश प्रभु हे गेली 20 वर्षे कोकणच्या राजकरणात आहेत. त्यांचे नाव कोकणच्या घराघरात पोहोचले आहे. त्याउलट गेली दिड वर्षे मतदारसंघात फिरणा-या विनायक राऊतांना तितकस कोणी ओळखत नाही. मते मिळवण्यासाठी उमेदवार शेवटच्या मतदारापर्यँत पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळेच आणखी पाच वर्षाँनी विनायक राऊत हे नाव तळागाळात पोहोचल्यावर त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर ते समजण्यासारखे होते. मात्र सुरेश प्रभुंसारखा सर्वश्रुत आणि प्रसिद्ध उमेदवार शिवसेनेकडे असताना विनायक राऊतांना उमेदवार म्हणुन पुढे करणे पुर्णपणे चुकीचे आहे.गेले वर्षभर कोकणात राणेपर्वाच्या अस्ताची स्वप्न लोक बघत होते मात्र विरोधक सवयीप्रमाणे आपल्या पायावर स्वतःच कु-हाड मारुन घेत ती स्वप्न भंगवतील अशीच चिन्हे दिसु लागली आहेत. निलेश राणेँना मत देणारे नेहमीच त्यांना पाठिँबा देतील मात्र त्याच वेळी राणेँच्या विरोधात पडणारी मते राऊत, केसरकर आणि मनसे यांच्यात दुभागली जातील. लोकसभेची लढत चौरंगी झाली तर निलेश राणेच विजयी होतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. शिवसेनेने फक्त विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी दिली असती तर प्रभुंना ज्येष्ठ बंधुचा सन्मान देणा-या दिपक केसरकर आणि परशुराम उपरकरांनी लोकसभेला उमेदवारी न स्वीकारता प्रभुंचा प्रचार करण्यात धन्यता मानली असती. विरोधकांची एकी अबाधित राहुन निलेश राणेँचा पराभव निश्चितच झाला असता आणि कोकणवासियांचे स्वप्न देखील पुर्ण झाले असते. विरोधकांनी आपला मुख्य शत्रु कोण आहे याची एकदा चाचपणी केली पाहिजे. आपापसात लढुन मुख्य शत्रुला विजय मिळत असेल तर ती गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे.अजुनही वेळ गेलेली नाही. शिवसेनेकडुन उमेदवारीची अधिक्रुत घोषणा अजुन झालेली नाही. राऊत आणि केसरकर दोघेही लोकसभेला उभे राहिले तर दोघांचाही पराभव आणि निलेश राणेँचा विजय निश्चित आहे. त्यापेक्षा विनायक राऊतांनी पक्षहितासाठी सुरेश प्रभुंना लोकसभेची उमेदवारी द्यावी. त्यामुळे दिपक केसरकर आपोआप माघार घेतील किँवा केसरकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले तरी सुरेश प्रभुंची वोटबँकला ते हात लावु शकणार नाहीत. प्रभुंच्या अनुपस्थितीत शिक्षक, वकील, पदवीधर, सरकारी नोकर अशा सुशिक्षित वर्गाची मते राणे, राऊत किँवा अन्य कुणाला न मिळता आपल्यालाच मिळतील याची केसरकरांना खात्री आहे. त्याच विश्वासावर ते राऊतांना आव्हान देत आहेत. त्यामुळे राऊतांऐवजी प्रभुंना उमेदवारी दिली तर प्रभुंची पारंपारिक वोटबँक प्रभुंकडेच राहिल आणि केसरकरांनी माघार घेतली नाही तरी ते शिवसेनेच फार मोठ नुकसान करु शकणार नाही.

आता निवडणुकीला फारच थोडे दिवस उरले आहेत.सुरेश प्रभुंना सामान्य लोकांचा असलेला पाठिँबा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेँपर्यँत पोहोचवण्यासाठी मी त्यांना e-mail किँवा पोस्टाने पत्र पाठवायचे ठरवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा