रविवार, ६ एप्रिल, २०१४

नाना पोटी, नाना कळा...!"नाना पोटी, नाना कळा..."

ऐकलत का...! आपला तथाकथित क्रांतिवीर नाना पाटेकर हल्ली व्यथित झालाय. का तर म्हणे नानाला गेल्या 60 वर्षात कोणी मराठी माणुस पंतप्रधान झालेला बघायचा होता. नाना पाटेकर काही महिन्यापुर्वी 'प्रहार' वर्तमानपत्राच्या समारंभात असाच दुःखी झाला होता. त्यावेळी 'कोकणचा वाघ' पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला नाही याच नानाला दुःख होत. नानाच्या लेखी पडिक आणि ओसाड असलेल्या जमिनी लोक जैतापुर अणुप्रकल्पाला देत नाहीत, याचही प्रचंड दुःख होत. मला वाटत चित्रपटात काम करता करता नानाने साईड बाय साईड अणुशास्त्रातील पदवी संपादन केली असावी. जैतापुर अणुप्रकल्प कोकणच्या फायद्याचा कसा यावर एखादा शास्त्रज्ञ असल्याच्या अविर्भावात तो मुक्ताफळे उधळीत होता. नंतर थोड्याच दिवसात नानाला सिँचन घोटाळेबाज तटकरे प्रेमाचे झटके येऊ लागले. आता वर दिलेला नानाचा पुर्वेतिहास पाहता नानाला अचानाक 'मराठी पंतप्रधान' का पाहिजेय, ते तुमच्या एव्हाना लक्षात आलच असेल. समझनेवालोँको इशारा काफी होता है. नानाची अवस्था सध्या झापड लावलेल्या घोड्यासारखी झालीय. काँग्रेस-एनसीपीच्या प्रेमात बुडाल्याने तो अशी बडबड करतोय. नाना पाटेकर ज्या 'मराठी पंतप्रधाना'कडे बोट दाखवतोय तो नेता कधीच पंतप्रधानपदाच्या आसपास देखील पोहोचला नाही. पंतप्रधान बनण्याची संधी मराठी माणसाकडे चालुन आली होती. राजापुर मतदारसंघाचे माजी खासदार मधु दंडवतेँकडे ती संधी चालुन होती आणि तत्वांच्या पुजा-याने ती विनम्रतापुर्वक नाकारली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर मागच्या दाराने राज्यसभेतुन निवडुन जात किँवा अन्य मतदारसंघातुन निवडणुक लढवुन पुन्हा निवडुन येत मधु दंडवते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. नाना ज्या नेत्याला पंतप्रधानपदी बसवु इच्छितो त्याच्याकडे ही संधी चालुन आली असती तर हव्या तशा राजकीय माकडउड्या मारुन पंतप्रधानपद पदरात पाडुन घेतले असते. मात्र तत्वांशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिल्याने दंडवतेनी पंतप्रधानपद नाकारले. माझ्या लोकांनी माझा पराभव केला तेव्हा मी पंतप्रधानपदी बसणे योग्य नव्हे हे दंडवतेँनी अवघ्या देशाला दाखवुन दिले. मराठी माणुस पंतप्रधान बनु शकला नाही कारण पंतप्रधानपद नाकारण्यासाठी लागणारे मोठे मन आणि निःस्वार्थी व्रुत्ती मधु दंडवतेँकडे होती. आम्हाला पंतप्रधानपद न मिळाल्याचे अजिबात दुःख नाही कारण पंतप्रधानपद विनम्रपणे नाकारणारा नेता देशा अन्यत्र कुठेच सापडणार नाही. तत्वांना प्राणापेक्षा जास्त जपणा-या दंडवतेँचा पुढच्या कित्येक पिढ्यांना अभिमानच राहिल. दंडवतेँचा उल्लेख आम्ही 'नाना' असाच करायचो आणि आज हे असले स्वार्थी आणि मिँधेगिरी करणारे 'नाना पाटेकर' जन्माला आले आहेत. नानाने किमान नावाची लाज बाळगली असती तरी खुप झाल असत.

आता नाना ज्या तथाकथित जाणत्या राजाला पंतप्रधानपद मिळाल नाही म्हणुन दुःखी आहे त्याबद्दल बोलु. नानाला आठवण करुन देऊ इच्छितो की काही शतकांपुर्वी महाराष्ट्रात जाणता राजा होऊन गेला होता.

'निश्चयाचा महामेरु, बहुत जनासि आधारु'
अशी त्याची ख्याती होती. तुमचा तथाकथित जाणता राजा
'भ्रष्टाचाराचा महामेरु, बहुत चोरांसि आधारु'
एवढ्या एकाच कामासाठी देशात ओळखला जातो.
म्हणे मराठी माणसे आपल्याच माणसांचे पाय ओढतात. अरे जा, जाऊन विचार त्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना की याला तुम्ही पंतप्रधानपदी पाहु इच्छिता का...? जा तिकडे लवासामध्ये जमिनी हडपलेल्या आदिवासी लोकांकडे आणि विचार त्यांना याला पंतप्रधान करुया का...?? असल्या भ्रष्टाचारी नेत्यास पंतप्रधान केल तर उद्या देश विकुन खायलाही मागेपुढे पाहणार नाही अशीच यांची व्रुत्ती आहे. मराठी लोक मुळातच समजुतदार आहेत आणि असल्या भ्रष्ट नेत्याला पंतप्रधानपदासाठी कधीच समर्थन करणार नाहीत.

भ्रष्टाचारी लोकांच्या व्यासपीठावर जाऊन भ्रष्टाचारविरोधी भाषणे कसली देतोस...? काय तर म्हणे लोक षंड आहेत आणि ते भ्रष्टाचारी नेत्यांना जाब विचारत नाहीत.
अरे जाब विचारत नसतीलही पण तुझ्यासारखी लाज-लज्जा सोडुन भ्रष्टाचारी नेत्यांसोबत दिवसा-ढवळ्या फिरत तरी नाहीत. आणखी किती लाचार होशील...? तु ज्या तटकरे, राणे, पवारांसोबत फिरतोस ते कोणी साधुपुरुष आहेत का...?? मग त्यांना का विचारत नाहीस की बाबांनो लोकांना अजुन किती लुबाडणार आहात...??? तिकडे तुझी बोबडी वळत असणार कारण त्यांची तळी उचलण्यासाठीच आजकाल तुला भरपुर मलिदा मिळतोय.

चित्रपटात देशप्रेम उफाळुन आले म्हणुन तुझ्यासारखा मतलबी मनुष्य देशभक्त होत नसतो. तस असत तर आज संजय दत्त तुरुंगात जाण्याऐवजी गांधीवादाचे धडे देत फिरला असता. चित्रपटात गांधीँचे धडे दिले म्हणुन संजय दत्त गांधी बनत नसतो, तो आतंकवादीच राहतो. अरे तुमच्यासारख्या चार कवडीच्या नटांची लायकीच काय असते...? फक्त भारतात मुर्खाँची कमी नाही म्हणुन ते चित्रपटातल्या भुमिका बघुन तुझ्यासारख्या तीनपाट नटाला देशभक्त समजण्याची चुक करुन बसतात. यापुढे चित्रपटातुन लोकांना देशभक्तीचे धडे देण्यापेक्षा काँग्रेस-एनसीपीच्या नेत्यांचा अधिक्रुत भाट बनलास तर आणखी पैसे मिळतील. बर झाल लवकरच तुझे खरे रंग दाखवलेस ते...! चित्रपटातुन देशभक्तीची नौटंकी पुरे झाली. तु सोँगाड्या आहेस आणि सोँगाड्याच राहशील. या नौटंकीच्या जोरावर तु सगळ्या लोकांना काही काळासाठी मुर्ख बनवु शकशील किँवा काही लोकांना कायमस्वरुपी मुर्ख बनवु शकशील पण सगळ्या लोकांना कायमस्वरुपी मुर्ख बनवु शकत नाहीस. यापुढे जनमानसात तुझी ओळख 'नाना लावतोय चुना' अशीच केली जाईल.

झुंज दोन वाघांची...!"झुंज दोन वाघांची...!"

आठवतेय का 2005 साली झालेली मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक...? कागदोपत्री नारायण राणे विरुद्ध परशुराम उपरकर अशी लढत असली तरी प्रत्यक्षात नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असाच त्या लढतीचा नुर होता. शिवसेनेत असताना 'कोकणचा वाघ' म्हणुन ख्याती असलेले नारायण राणे अन्याय झाला अशी आवई उठवत सेनेला 'जय महाराष्ट्र' करुन बाहेर पडले होते. झुंजार व्रुत्ती आणि शत्रुला शिँगावर घ्यायची तयारी यामुळे शिवसेना संपवुन टाकण्याच्या हेतुनेच राणे त्वेषाने तुटुन पडले. राणेँच्या एकट्याच्या टेकुवर कोकणातील शिवसेना उभी करण्याची चुक एव्हाना बाळासाहेबांच्या लक्षात आली होती. राणेँनी पाठिँबा काढुन घेतल्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मात्र या प्रतिकुल परिस्थितीत हार मानतील तर ते बाळासाहेब कसले...? 'हार' शब्द बाळासाहेबांच्या डिक्शनरीत नव्हता. शारिरिक वयोमानाच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवत असल्या तरी बाळासाहेबांच्या मनातील वाघ नेहमीसारखाच तरुण होता.सिँधुदुर्गच्या मातीत पाय ठेवल्यानंतर पत्रकाराने केलेल्या प्रश्नाच उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले-

"किसने की है बगावत...?"

बाळासाहेबांची शैली मिश्किल असली तर सिँधुदुर्गात आल्यावर पराभवाची चाहुल लागली होती. तरी सुद्धा प्रचारसभेत बाळासाहेब राणेँवर तुटुन पडले. आयुष्यात प्रथमतः स्टेजवर नतमस्तक होऊन त्यांनी सिँधुदुर्गातील लोकांना शिवसेनेला मत देण्याचे आवाहन केले पण अखेरीस त्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम देखील बाळासाहेब वाचवु शकले नाही. कोकणच्या वाघासमोर शिवसेनेचा वाघ अक्षरशः चारी मुंड्या चीत झाला. त्यावेळी एका वर्तमानपत्रात आलेले व्यंगचित्र अगदी सुचक असे होते. एकीकडे वयाने व्रुद्ध आणि थकलेला वाघ दाखवलेला. समोर तरणाबांड वाघ डरकाळ्या फोडत होता. त्या वाघाला पाहुन व्रुद्ध वाघ "अरे बापरे, हा तर कोकणचा वाघ" असे उद्गार काढुन पळत होता.

मित्रांनो, इतिहासाची पुनराव्रुत्ती होतच असते फक्त पात्र तितकी बदलतात. 2005 साली कोकणात राणेँचा दबदबा होता. त्यावेळी कोणी भविष्यवाणी केली असती की,
"भविष्यात शिवसेनेचा एखादा नेता राणेँना हिँमत असेल तर माझ्याविरुद्ध निवडणुक लढवुन दाखवा."
असे आव्हान देईल. तर अशा भविष्यकारालाच लोकांनी वेडात काढले असते. शेवटी हे राजकरण आहे. इकडे कोणी कायमस्वरुपी नेता राहत नसतो. काळ बदलतो, वेळ बदलते आणि शेरास सव्वाशेर भेटतो. इतके दिवस नारायण राणे इतर नेत्यांना स्वतःविरुद्ध निवडणुक लढवण्याचे आव्हान देत असत. आज वैभव नाईक साक्षात नारायण राणेँना माझ्याविरुद्ध निवडणुक लढवुन दाखवा म्हणुन आव्हान देतोय आणि तेही राणेँच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात...! मालवण मतदारसंघात...!!

2005 निवडणुकीनंतर मधल्या काळात पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले. नारायण राणेँनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची अर्धी शक्ती स्वपक्षीयांशी लढे देण्यात खर्च होऊ लागली. त्याकाळात शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत वैभव नाईकने पक्ष पुन्हा एकदा नव्याने बांधुन काढला. परिणामी नव्या दमाची, सळसळत्या रक्ताची तरुण पोरे शिवसेनेत सामील झाली. जनसंपर्क इतका वाढवला की लोकांना आपल्यामध्ये मिसळणारा वैभव नाईक आपलासा वाटु लागला. दुसरीकडे अंतर्गत कुरघोडी करणा-यांना रोखताना राणेँची संघटनेवरील पकड सैल होत गेली. जुने काँग्रेस आणि राणे काँग्रेस या दोन्ही गटांचे कधीच मनोमिलन झाले नाही. त्यांच्यातील शीतयुद्धाने काँग्रेस नेहमीच धुमसत राहिली. त्यातच 2009 विधानसभा निवडणुकीत राणेँविरुद्ध वैभव नाईकलाच उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ज्येष्ठ नेत्यासमोर पोरगा उभा राहिलाय म्हणुन अनेकांनी खिल्ली उडवली पण जसजशी निवडणुक जवळ आली तसतसा वैभवचा जोर वाढु लागला. निवडणुकीच्या दिवशी वैभववर पिस्तुल रोखायची वेळ विरोधकांवर आली. वैभव लौकिकार्थाने निवडणुक हरला असला तरी राणेँसारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध 50000 मते मिळवली यातच त्याचा विजय होता. लढवय्या वैभवने गेल्या 5 वर्षात मतदारसंघात असा जम बसवलाय की नारायण राणेँना येत्या विधानसभेसाठी कुडाळ-मालवण मतदारसंघ आपले पुत्र नितेश राणेँसाठी सोडला आहे. राज्यस्तरीय नेता असल्याने निवडणुकीच्या काळात राणेँना वैभव एवढा जनसंपर्क ठेवता येणार नाही. सी-वर्ल्ड विरोधामुळे वायंगणी-तोँडवलीसारखी गावे राणेँच्या पुर्ण विरोधात गेली आहेत. मच्छिमारांमध्ये राणेँविरोधात रोष आहे. अशा परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकविरुद्ध नारायण राणे उभे राहिले तर त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय.

नशीबाचे खेळ पण कसे असतात पहा ना...! नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे ही लढत सुद्धा दोन वाघांची लढत होती. फक्त या लढतीत राणे तरणेबांड वाघ होते आणि बाळासाहेब आपल्या तारुण्यात अनेक नेत्यांना पुरुन उरलेले असले मात्र त्या पोटनिवडणुकीवेळी वय वाढलेले आणि प्रक्रुतीने थकलेले वाघ होते.
आता वैभव नाईक विरुद्ध नारायण राणे ही लढत सुद्धा दोन वाघांमधील लढत आहे. मात्र यावेळी वैभव नाईक तरणाबांड वाघ या प्रकारात मोडतात आणि नारायण राणे एकेकाळी कोकणचे वाघ असले तरी आता त्यांच्यात पुर्वीचा दम राहिलेला नाही.

नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात फरक एवढाच आहे की राणेँच्या डरकाळीला प्रत्युत्तर देताना बाळासाहेब ठाकरे मैदान सोडुन पळाले नव्हते. पराभव निश्चित असताना त्या वयात देखील त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी टाकुन ठाकरी गर्जना केली होती. वाघ हरला तरी लढाईतुन पळ काढत नाही ही गोष्ट अधोरेखित केली होती. आता डरकाळी कणकवलीचा ढाण्या वाघ वैभव नाईकने दिली आहे. नारायण राणेँना पहिल्यांदाच कोणीतरी खुले आव्हान देतोय. नारायण राणे वैभवचे आव्हान स्वीकारुन कुडाळ-मालवण मतदारसंघात निवडणुक लढतात की रणांगण सोडुन पळ काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रभु सर्वत्र पुज्यते...!"प्रभु सर्वत्र पुज्यते...!"

काल 27 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये भारताचे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी अधिवेशन घेण्यात आल. भाजप पक्षात विचारवंतांची कधीच कमी नव्हती पण जेव्हा एनडीएचे आर्थिक धोरण ठरवायची वेळ आली तेव्हा भाजपने कमिटी स्थापन करुन शिवसेनेच्या सुरेश प्रभुंनाच त्या कमिटीच अध्यक्षपद दिल. देशातील आणि जगातील नामवंत अर्थतज्ञांसोबत एनडीएच आर्थिक धोरण ठरवण्यात आल आणि त्यात सिँहाचा वाटा माझ्या मतदारसंघातुन चार वेळा निवडुन गेलेल्या सुरेश प्रभूंचा होता याचा एक कोकणी म्हणुन मला सार्थ अभिमान राहिल. बर्लिन आणि मुंबई विद्यापीठाची पीएचडी, लँटिन अमेरिकेची डाँक्टरेट, चार्टड अकाऊटंट, एल एल बी इतक्या पदव्या हातात असताना सुरेश प्रभुंना राजकरणात यथायोग्य सन्मान मिळण यात नवल काहीच नाही. मात्र दुर्देवाने शिवसेनेन लोकसभेची उमेदवारी नाकारुन सुरेश प्रभुंचा अपमान केला आहे. कोणतेही सामाजिक कार्य नसणा-या धुत आणि काकडेँना राज्यसभेतुन खासदार केले आणि प्रभुंना लोकसभेतुन उमेदवारी नाकारली याचे नेमके कारण काय असेल...? यामागे खरच काही तर्कशास्त्र आहे की नुसतच अर्थशास्त्र आहे...??
पक्षाची वैचारिक बाजु सांभाळण्यासाठी एका विचारवंताची गरज असते आणि बाळासाहेबांनी दिलेली ही जबाबदारी प्रभुंनी इतकी वर्षे प्रामाणिकपणे पार पाडली. नाहीतर सपा, बसपा प्रादेशिक पक्षांसारखा शिवसेनेलाही राष्ट्रीय पातळीवर विद्वान नेता लाभला नसता. कदाचित बाळासाहेबांच्या पश्चात एकापेक्षा एक विद्वान विभुतीँनी पक्षात अवतरल्याने प्रभुंचीही पक्षातील गरज संपली असावी.

ऊर्जा आणि पाणी या देशातील दोन महत्वपुर्ण विषयांवर प्रभुंएवढ्या अधिकारवाणीने बोलणारा अन्य नेता संपुर्ण देशात सापडणार नाही. म्हणुनच भाजपने देशाचे आर्थिक धोरण बनवण्याची महत्वपुर्ण जबाबदारी प्रभुंकडे दिली. याअगोदरही वाजपेयीँच्या काळात एनडीए सरकारने प्रभुंकडे ऊर्जा आणि पर्यावरण अशी प्रमुख मंत्रीपदे देऊन विश्वास दाखवला होता. देशातल्या सर्वोत्क्रुष्ट काम करणा-या मंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवुन प्रभुंनी तो सार्थ ठरवला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा मसुदा तयार करुन गावागावांना जोडणारे सुरेश प्रभुच होते. पर्यावरण मंत्री असताना प्रभुंनी प्रकल्पांसाठी जनसुनावणीचा कायदा लोकांना उपलब्ध करुन दिला. त्या कायद्यामुळेच निदान आपण एखाद्या विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करुन जनसुनावणीने लोकांचा विरोध सरकारला दाखवु शकतोय. जेव्हा कर्नाटक, गोवा आणि सिँधुदुर्गच्या पट्ट्यात मायनिँग सम्राटांनी धुडगुस घातला तेव्हा वनसंज्ञेची तरतुद करुन जंगले वाचवु पाहणारे प्रभुच होते. पर्यावरणाचा असाच विध्वंस सुरु ठेवला तर भारतातील हरितक्षेत्र कमी होऊन निसर्गाचा समतोल ढासळेल यासाठी देशातील वनव्याप्त भाग इको-सेँसिटीव्ह करण्याची सुचना प्रभुंनी केली. आपल्या नेत्याची भुमिका सामान्यांपर्यँत पोहोचवणे हे पक्षाच्या कार्यकर्त्याँचे काम असते. मात्र प्रभुंच्या भुमिका समजु शकण्याची कुवत असलेला कार्यकर्ता त्यांना दुर्देवाने कधी मिळालाच नाही. सिँधुदुर्गातील काँग्रेसमधील अशिक्षित नेत्यांनी इको सेँसिटीव्ह झोनचा बागुलबुवा केला आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याच सुरात सुर मिळवुन इको सेँसिटीव्ह झोनला विरोध केला. काँग्रेसच्या पावलांवर पाऊल ठेवत गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवालाची होळी केली. सांगायची गोष्ट एवढीच की निलेश राणेँना पाडुन शिवसेनेचा उमेदवार निवडुन आणलात तरी मायनिँगने पर्यावरणाचा विध्वंस असाच सुरु राहणार.

वाजपेयीँनी प्रभुंवर नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्षपद देऊन महत्वपुर्ण जबाबदारी दिली होती. एनडीए सरकार आल्यास प्रभुंनी ती पार पाडावी. दुष्काळाची तीव्रता पाहता भविष्यात पाण्यासाठी तिसर महायुद्ध होईल आणि ते टाळण्याची कुवत फक्त नदीजोड प्रकल्पात आहे.

मधल्या काळात ऊर्जेचे नुतनीकरण स्त्रोत असलेल्या सौरऊर्जा क्षेत्रात प्रभुंनी अमुलाग्र संशोधन केल आहे. अणुऊर्जेचे विनाशकारी रुप जगाने पाहिले आहे, औष्णिक ऊर्जा अगोदरच बदनाम आहे, अशा परिस्थितीत देशाची वाढती वीजेची गरज भागवण्यासाठी प्रभुंनाच पुढाकार घ्यावा लागेल.

सुरेश प्रभुंसारखा अवलिया नेता आज संसदेत हवा होता पण पैशांच्या घाणेरड्या राजकरणाचा तो बळी ठरला. उमेदवारी मिळवण्यासाठी मतदारसंघात लाँबिँग करुन शक्तीप्रदर्शन करायची नवी पद्धत राजकरणात रुढ होतेय. मात्र आपली उमेदवारी हातातुन जात असतानाही शेवटपर्यँत प्रभुंनी लाँबिँगचा आधार घेतला नाही. तिकीट मिळाले नाही तर एका पक्षातुन दुस-या पक्षात उड्या घेणा-या बंडोबांना पेव फुटतो. शिवसेनेत होणारा अन्याय प्रभुंनी निमुटपणे सहन केला पण बाकीचे पक्ष एका पायावर तिकीट घ्यायला तयार असतानाही त्यांनी निवडणुक मात्र लढवली नाही. यासंदर्भात विचारणा केली असता प्रभु म्हणाले की "चार्टड अकाऊंटट म्हणुन व्यवसाय चांगला सुरु असताना फक्त बाळासाहेबांनी विचारणा केली म्हणुन समाजसेवा करण्यासाठी मी शिवसेनेतर्फे राजकरणात आलो. ज्या दिवशी राजकरणात आलो त्या दिवशी खासदार झालो आणि ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशी मंत्रीही झालो. उमेदवारीसाठी एका पक्षातुन दुस-या पक्षात उड्या मारायला राजकरण माझा धंदा नव्हे. यापुढेही शक्य तितक्या मार्गाँनी देशाची सेवा करुन भारताला महासत्ता बनवणे एवढे एकच माझे लक्ष्य राहिल."

आता अन्य पक्षातुन एखादा सभ्य आणि विद्वान उमेदवार उभा राहतो का याची मी वाट बघणार. अन्यथा प्रभुंना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मी निवडणुकीत नकाराधिकाराचा वापर करणार. काँग्रेस नको असेल तर आम्ही देऊ तोच उमेदवार झक मारत स्वीकारा ही हुकुमशाही कोकणची समंजस जनता कधीच खपवुन घेणार नाही. तसही शिवसेनेतुन लोकशाही संपवल्याची घोषणा त्यांच्या पक्षप्रमुखांनी केलीच आहे आणि आता प्रभुंवर प्रेम करणारी जनताच मतदानातुनच शिवसेनेला उत्तर देईल.

'राज'करण परिपक्वतेचे...!'राज'करण परिपक्वतेचे...!

आजच्या घडीला राज्याच्या राजकरणात शरद पवारांनंतर राजकीय चाली खेळण्यात जर कोणाला विशारद प्राप्त असेल तर ते नाव राज ठाकरेँचे आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाल. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेँची प्रत्येक राजकीय चाल फसत चालली होती पण आज मात्र त्यांनी एका दगडात चार-पाच पक्षी मारुन स्वतःचे राजकरण पुन्हा एकदा स्थिर केले. आता कसे ते पाहु.

राज ठाकरेँनी महायुतीत सामील होण्याचा प्रस्ताव अनेकदा धुडकारला कारण त्यांना स्वतःची वेगळी अशी स्पेस सोडायची नव्हती. शिवसेनेला विरोध करत मनसेचा जन्म झाला होता. त्यामुळेच महायुतीत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावुन बसणे राजना कधीच शक्य नव्हते. राज यांचा एक डोळा विधानसभा निवडणुकांवरही होता. मात्र महाराष्ट्रात असलेल्या मोदीँच्या लाटेमुळे महायुतीत सामील न होण्याचा निर्णय राजवरच शेकला. मध्यंतरी आपला मराठीचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी राजनी मोदीँवर गुजराती लोकांच्या अनुषंगाने टिका केली पण राज यांची ती खेळीसुद्धा अंगलट आली. राज ठाकरे काँग्रेस-एनसीपीचे एजंट असुन महायुतीचे नुकसान करण्यासाठी घाणेरडे राजकरण करतात, हा समज जनसामान्यांमध्ये पसरु लागला. त्यामुळेच मनसेचा जनाधार कमी होऊ लागला. त्यात करुन आम आदमी पार्टी राज्यात तिसरा पर्याय म्हणुन उभी ठाकल्याने मनसेची स्पेस व्यापु लागली. मध्यंतरी टोलचे फसलेले आंदोलन, त्याला लोकांचा मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या सर्वाँचाच परिपाक होता. सर्व्हेमध्येही मनसेला धड 1-2 जागाही मिळत नव्हत्या. आता अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करुन त्यांचा सगळीकडे पराभव झाला तर त्याचा विधानसभेत निश्चितच वाईट परिणाम होणार होता. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' म्हणत लोकसभेला उमेदवार उभे न करता थेट विधानसभा लढवणे हाच एक पर्याय राज समोर होता. निवडणुका लढवल्या नाहीत तर कार्यकर्ते फार काळ पक्षात टिकणार नाहीत याची राजना जाणीव होती. अशा रितीने राज ठाकरे सर्व बाजुंनी चक्रव्युहात अडकले होते.

त्या परिस्थितीतही त्यांनी नितीन गडकरीँसोबत असलेली जवळीक आणखी वाढवण्यासाठी सर्वप्रथम ते नाशिकला एका कार्यक्रमात गडकरीँसोबत एकत्र आले. नंतर पुन्हा गडकरीँना खाजगीत भेटले. महायुतीत सामील होण्याची दारे राज ठाकरेँनी स्वतःच बंद करुन घेतल्याने तिकडे पुन्हा प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे भाजपसोबतच्या या भेटीगाठी शिवसेना नेत्यांना वाकुल्या दाखवत त्यांना चिथावण्यासाठीच होत्या. सारासार विचार करण्याची कोणतीही कुवत नसलेल्या शिवसेना नेत्यांनी भाजप-राजच्या भेटीबाबत आकांडतांडव सुरु केले आणि आपोआप राजच्या जाळ्यात अडकले. राजला चक्रव्युहातुन बाहेर पडण्याचा मार्ग शिवसेनेनेच मोकळा करुन दिला. राजला जे पाहिजे होते ते मिळाले होते आणि त्याचाच प्रत्यय आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आला.

आज मनसेने लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर करुन एकच संदेश दिला की,
"भाजपने आपली मदत मागितली म्हणुन भाजपच्या उमेदवारांविरुद्ध मी माझे उमेदवार उभे करणार नाही. नरेँद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान व्हावेत ही माझी इच्छा आहे. मनसेचे निवडुन आलेले उमेदवार मोदीँनाच पाठिँबा देतील. याउलट देवु केलेली मदत उन्मतपणे धुडकारणा-या शिवसेनेविरुद्ध मनसे निवडणुक लढवुन आपली ताकद दाखवुन देईल."
या सर्व प्रकारात राज ठाकरेँनी मराठी लोकांची सहानुभुती पुन्हा एकदा मिळवली आहे. मोदीँना पाठिँबा जाहिर केल्याने काँग्रेस एजंट हा शिक्का आपोआप फुसला गेलाय. आता मोदीच्या लाटेचा फायदा थेट राज ठाकरेँनाही मिळणार आहे. निवडणुकीला मत देताना लोक एवढाच विचार करणार की उमेदवार शिवसेना किँवा मनसे कोणाचाही निवडुन आला तरी पाठिँबा मोदीँनाच देणार आहे. त्यामुळे मनसे उमेदवाराची मते नक्कीच वाढणार. शिवाय राज ठाकरे मोठ्या मनाने शिवसेनेला मदत करु पाहत होते पण अहंकारी शिवसेना नेत्यांनी ती मदत स्वीकारली नाही. त्यामुळे मराठी लोकांमध्ये शिवसेनेप्रती नक्कीच संताप असेल. थोडक्यात आपल्या आततायीपणाने निवडणुकांच्या तोँडावर शिवसेनेने कचाट्यात सापडलेल्या मनसेला फुकटची सहानुभुती मिळवुन दिली आहे.

सांगायची गोष्ट एवढीच की राजकरण कधीही संयमाने करावे लागते. इकडे कोणीच कोणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो. गडकरी-राज भेटीवर बोँब मारायची शिवसेनेला काहीच गरज नव्हती. इकडे राजने समर्थनासाठी कोणत्या अटी पुढे केल्या नव्हत्या किँवा महायुतीत येण्यास उत्सुकताही दाखवली नव्हती. या भेटीनंतर संयम दाखवत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसती तर राजच्याच अडचणी वाढल्या असत्या. राजला एकट्या शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे करण्याची चाल खेळताच आली नसती. राज आणि मोदीँचे चांगले संबंध ही गोष्ट उघड होती. फक्त तोँडदेखली टिका ते मोदीँवर करत होते. त्यामुळे भाजपविरुद्ध राज ठाकरे एरव्ही उमेदवार उभे करणारच नव्हते. त्यामुळे एकट्या शिवसेनेविरुद्ध मनसेचे उमेदवार उभे करणे राजना धोरणात्मकरित्या अवघड होणार होते. राजच्या भाजपशी असलेल्या याच जवळकीचा शिवसेनेने फायदा करुन घेणे गरजेचे होते पण शेवटी बोँबाबोँब करुन यांनी आपल्याच पायावर धोँडा मारुन घेतला. उद्धवजीँच्या आसपास जे थिँक टँक म्हणुन फिरतात त्यांची टाळकी तपासण्याची वेळ आली आहे.

राजकरण करणा-याने प्रत्येक पायरीवर धुर्त आणि धोरणी असणे अत्यावश्यक असते. घडणा-या प्रत्येक घटनेचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करुन घेता येईल हे ज्याला कळते तोच राजकरणात टिकतो. डार्विनचा Survial to the fittest सिद्धांत राजकरणालाही लागु पडतो.
ज्याच्याकडे धुर्तपणा नाही, राजकीय चाली ओळखण्याची कुवत नाही तो पक्ष किँवा नेता काळाच्या ओघात संपत जातो. बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करुन उभारलेली शिवसेना हिँदुत्वाच्या रक्षणाखातर टिकलीच पाहिजे. फक्त शिवसेना कुठे चुकते आहे हे दाखवण्यासाठी हा लेख लिहिला. शिवसेना नेते आपले राजकरण भविष्यात सुधारतील अशी अपेक्षा करुया.

"एकच साहेब, बाळासाहेब...!"

कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा...

रत्नागिरी-सिँधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांसमोर जाहिर पाठिँब्यासाठी मी घातलेल्या अटी-

"कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा..."

1) बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या सभ्य आणि सुसंस्क्रुत नेत्यांची परंपरा लाभलेल्या रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात गुंडगिरी करुन दहशत माजवणार नाही, राडेबाजीला प्रोत्साहन देणार नाही. देशात सभ्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे वर्तन मी करणार नाही.

2) आजही जिल्ह्यातील लोकांना उपचारांसाठी गोवा, बेळगाव, कोल्हापुरवर अवलंबुन राहावे लागते. जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालय उभारुन यावर कायमचा तोडगा काढेन.

3) विद्यार्थ्याँना शिक्षणासाठी नाइलाजाने मुंबई, पुणे, कोल्हापुरसारख्या शहरात जावे लागते. हे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केँद्र उभारेन आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणा-या सर्व पुस्तकांची भव्य ग्रंथालय उभारुन सोय करुन देईन.

4) उष्णता निर्माण करुन आंबा उत्पादकांचे नुकसान करणारे औष्णिक प्रकल्प मतदारसंघात येऊ देणार नाही. वीजेची गरज भागवण्यासाठी देवगडच्या पवनचक्की प्रकल्पाला मदत करुन त्याच धर्तीवर मतदारसंघात अन्य ठिकाणी तत्सम नुतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करेन.

5) माझ्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याच्या राजकरणात आणुन घराणेशाही करण्याचा प्रयत्न करणार नाही.

6) सुरेश प्रभुंप्रमाणेच गौणखनिजधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी खासदारकीही पणाला लावेन.

7) मात्र कोकणच्या पर्यावरणाचा विध्वंस करणा-या कळणे मायनिँगसारख्या विनाशकारी प्रकल्पांना कडाडुन विरोध करेन. झोळंबे, असनिये, डोँगरपाल, सातार्डा, इत्यादी गावात प्रस्तावित असलेले मोठे मायनिँग प्रकल्प तातडीने रद्द करुन घेईन. त्याबरोबर भविष्यात अन्य गावात असे मोठे मायनिँग प्रकल्प अजिबात येऊ देणार नाही.

8) मी मतदारसंघात आणलेल्या एखाद्या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असेल तर कोणत्याही प्रकारे दमदाटी न करता, जनभावनेचा आदर करुन मी तो प्रकल्प रद्द करेन.

9) सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांना आवश्यकतेपेक्षा जास्त जमिनी घेऊन स्थानिकांना अक्षरशः लुबाडण्यात आले आहे. खासदार झाल्यावर प्रकल्पांसाठी आवश्यक तेवढीच जमिन घेऊन इतर जागा पुन्हा स्थानिकांकडे सुपुर्त करेन.

10) वेळाघरसारख्या ठिकाणी कित्येक वर्षापुर्वी भुसंपादन करुन अद्याप कोणताही प्रकल्प उभारलेला नाही. अशा पडीक जमिनी स्थानिकांना परत करेन.

11) धरणांसाठी यापुर्वी संपादित केलेल्या जमिनीत जोपर्यँत धरणे बांधुन पुर्ण होत नाहीत, तोपर्यँत नवीन धरणांसाठी जमिनी संपादित करणार नाही.

12) मतदारसंघामध्ये आणलेल्या नवीन उद्योगांमध्ये जनहिताव्यतिरिक्त माझा वैयक्तिक अथवा व्यावसायिक कोणताही स्वार्थ नसेल.

13) स्थानिक उद्योजकांशी स्पर्धा करुन किँवा त्यांच्या उद्योगांच्या ठिकाणी जाळपोळ करुन, सामान्य उद्योजकाला नेस्तनाबुत करत, माझे किँवा माझ्या समर्थकांचे उद्योग स्थापन करण्याचे मनसुबे मी कधीही बाळगणार नाही.

14) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्षातुन निवडुन आलेल्या उमेदवारांना, पैशाचे आमिष अथवा धाक दाखवुन माझ्या पक्षात आणत, राजकरणातील नैतिकता वेशीवर टांगण्याचे पाप मी कधीही करणार नाही

15) सिँधुदुर्ग जिल्हा 1997 साली देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित करुनही पर्यटनाच्या बाबतीत अद्यापही मागासलेलाच आहे. पर्यटन ही रोजगारांची जननी आहे. गोवा राज्याच्या धर्तीवर सिँधुदुर्गचा पर्यटन विकास करुन पर्यटनाभिमुख रोजगार निर्माण करण्यास मी प्राधान्य देईन.

16) महायुतीची सत्ता आल्यास तातडीने जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करणे हे माझे परमकर्तव्य राहिल. यात अपयशी ठरलो तर खासदारकीचा त्याग करेन.

17) मळगावलाच कोकण रेल्वेचे टर्मिनस उभारेन. कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे नामकरण 'प्रा.मधु दंडवते रेल्वे टर्मिनस' असे करण्यात येईल.

18) वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी माझी राहिल.

19) मतदारसंघाच्या शाश्वत, सर्वाँगिण आणि समतोल विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिन.

20) सिँधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याची वीजेची गरज फक्त 500 M.W. असताना प्रत्यक्षात 5500 M.W. वीजनिर्मिती या दोन्ही जिल्ह्यातुन केली जाते. त्यामुळे खासदार झाल्यावर सिँधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हे लोडशेडिँगमुक्त करेन.

21) गेल्या वर्षी दुष्काळाची झळ कोकणलाही बसली. आदरणीय सुरेश प्रभू देशभरात नदीजोड प्रकल्प राबवुन दुष्काळाच्या समस्येवर उपाय काढत आहेत. माझ्या मतदारसंघात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणांची संख्या वाढवली तर पुराची भीती राहिल. त्यामुळे धरणे वाढवण्याच्या फंदात न पडता पोपटराव पवारांचे मार्गदर्शन घेत ओहोळ आणि नद्यांवर बंधारे बांधुन भुजलपातळी वाढवत पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यावर माझा अधिक भर राहिल.

22) सर्वात महत्वाचे म्हणजे वर नमुद केलेल्या अटीँपैकी कोणत्याही एका अटीची पुर्तता करण्यात काही कारणाने जर मी अपयशी ठरलो तर माझ्यावर जाहिर टिका करण्याचा पुर्ण अधिकार मतदारसंघातील पत्रकारांना आणि सजग नागरिकांना आहे. एवढेच नव्हे तर माझ्या अपयशाची पुर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी तात्काळ खासदारकीचा राजीनामा देईन आणि पुन्हा कधीही एक उमेदवार म्हणुन तुमच्याकडे मत मागायला येणार नाही.

(आयुष्यात तडजोडी करण मला माहित नाही. यापैकी एखादी अट जरी राऊतांना मान्य नसेल तर मी त्यांच्या विरोधातच प्रचार करेन. फक्त आमच्या वादात काँग्रेसचा फायदा होऊ नये म्हणुन विनायक राऊतांना सशर्त पाठिँबा देण्याचा निर्णय घेतला.)

अखेर पैशांसमोर धारातीर्थी पडली, प्रभुंच्या तत्वांची पुण्याई...!

सुरेश प्रभूंना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याची बातमी २८ फेब्रुवारीला निश्चित झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकांमध्ये असंतोष खदखदु लागला. याआधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सामान्य लोकांनी प्रभूंना उमेदवारी दिली जावी, यासाठी आग्रह धरला होता. मात्र राजकीय दबावापुढे नमते घेत लोकांच्या भावना पक्षश्रेष्ठीँपर्यँत पोहोचवण्यात शिवसेनेचे पदाधिकारी पूर्णतः अयशस्वी ठरले. त्यामुळे त्या सर्व लोकांच्या भावनांना लेखाच्या माध्यमातून शब्दबद्ध करणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो कारण इकडे प्रश्न फक्त प्रभूंच्या उमेदवारीचा नव्हता. प्रश्न होता तो कोकणच्या विद्वान मतदारसंघाच्या प्रतिष्ठेचा...!
सुरेश प्रभू मतदारसंघात कधीही फिरकत नाहीत असा आरोप सर्वप्रथम विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला गेला. नंतर प्रभूंची उमेदवारी काटायचीच आहे हे निश्चित झाल्यावर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही कॉंग्रेसच्या सुरात सुर मिसळत तेच कारण पुढे करू लागले. विरोधक आणि स्वकीय दोघांनीही प्रभुंवर जनसंपर्क ठेवत नसल्याचे आरोप केले तरी प्रभू नेहमीच चर्चेत राहिले कारण प्रभूंवर निस्सीम प्रेम करणारी कोकणची जनता आजही त्यांच्यासोबत होती. खासदाराचे काम मतदारसंघात येऱ्या-झाऱ्या करत फिरण्याचे नसून संसदेत मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहे. फक्त मतदारसंघाच्याच नव्हे तर देशहिताच्या प्रश्नांवर आपल्या विद्वत्तेच्या जोरावर चर्चा करून उपाय काढण्याचे आहे, ही समज कोकणच्या समंजस जनतेला नाथ पै, मधु दंडवते यांच्या काळापासून मिळाली होती. या सगळ्या गोष्टी सुरेश प्रभूशिवाय अन्य कोणताही उमेदवार करू शकणार नाही याची खात्री असल्यानेच लोकांनी 'प्रभूच खासदार हवे' ही भूमिका लावून धरली. मतदारसंघात फिरायचे काम खासदाराचे नसून त्यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात ही लोकशाहीची मुलभूत रचना संपूर्ण देशात 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' म्हणून नावाजल्या गेलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सुजाण नागरिकांना होती. अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही सुरेश प्रभूविरुद्ध टिका करायला काहीच हाती लागत नसल्याने 'प्रभू मतदारसंघात फिरत नाहीत', हा प्रचाराचा एकमेव मुद्दा होता. तरी सुद्धा ३ लाख लोकांनी प्रभूंना मत देऊन 'आम्हाला असाच खासदार' हवा या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले. थोडक्यात सांगायचे तर 'खासदार काय असतो आणि त्याचे नक्की काम काय' ही गोष्ट दुर्दैवाने कोकणातील कोणत्याही राजकीय पक्षाला समजलेली नसेल पण मी अभिमानाने सांगू इच्छितो की कोकणच्या आदर्श मतदाराला ती नक्कीच समजली. म्हणूनच प्रभूंना शिवसेनेने उमेदवारी डावलली तेव्हा या विद्वान मतदारसंघातील अनेक सुसंस्कृत लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुरेश प्रभू आपल्या नम्र स्वभावाला अनुसरून शांत राहिले, एवढ्या सुसंस्कृत लोकांचा पाठींबा एक गठ्ठा मते म्हणून सोबत असताना त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षातून निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र प्रभूंना मानणारा वर्ग आजही 'सुरेश प्रभू कुठे आहेत?' हा एकच प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारतोय. एव्हाना प्रभूंच्या समर्थनाशिवाय निवडणूक जिंकणे शक्य नाही याचा साक्षात्कार शिवसेना नेत्यांना झालेला दिसतोय. त्यामुळेच प्रभूंशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता 'प्रभू प्रचाराला येणार' अशी वक्तव्ये केली जातायेत. शिवसेनेने कितीही बेभान होत प्रभूंचे तिकीट कापले असले तरी आजही प्रभूंच्या तत्वांची पुण्याईच शिवसेनेला या निवडणुकीत तारू शकते. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही- सुरेश प्रभू ही नक्की काय चीज होती…? राजकारणात सक्रिय नसूनही कोकणातील लोक प्रभुंवर एवढा जीव कशासाठी ओवाळून टाकतात….?? या प्रश्नांच्या उत्तरातच काही प्रमुख गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
सुरेश प्रभुंचे व्यक्तिमत्व हे जनमानसात अफाट बुद्धिमत्ता, उच्चशिक्षण, कटिबद्धता, एखाद्या विषयाची खोलवर असलेली जाण अशा अनेक गोष्टीँसाठी प्रसिद्ध होते. सुरेश प्रभू C.A. परीक्षा देशात अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी 'वातावरणातील बदल' या विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची आणि 'अर्थशास्त्र' विषयात मुंबई विद्यापीठाची Phd मिळवली. याशिवाय B.Com, L.L.B. यांसारख्या पदव्या देखील प्राप्त केल्या. त्यांना लँटिन अमेरिका येथेही डाँक्टरेट पदवी प्राप्त आहे. युनायटेड नेशन्स (UN) सारख्या संघटनेचा सल्लागार म्हणुन त्यांनी भुमिका बजावली. 'राजापुर मतदारसंघ' अवघ्या देशात 'सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ' म्हणुन प्रसिद्ध आहे. सुरेश प्रभू या मतदारसंघाला साजेसे असेच खासदार होते. बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांसारख्या संसदपटुंचा वारसा त्यांनी अतिशय योग्य रितीने जपला होता. गेल्या निवडणुकीत सुरेश प्रभुंचा मतांच्या आकडेवारीत जरी लौकिकार्थाने पराभव झाला असला तरी त्या पराभवातही त्यांचा 'नैतिक विजय' दडलेला होता. मतांच्या घाणेरड्या राजकरणात जे घडते ते नेहमीच खरे नसते. सुरेश प्रभू हे पक्ष, धर्म, जात यांच्या पलीकडे गेलेले उमेदवार होते, हे त्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. पक्ष म्हणुन मतदारसंघात शिवसेनेची पुरती वाताहात झालेली असताना प्रभूंना 3 लाख मतांनी पाडण्याच्या बाता विरोधक करत होते. मात्र प्रत्यक्षात सुरेश प्रभूंचा अवघ्या 46 हजार मतांनीच पराभव झाला. प्रभुंनी प्रचारसभा घेतल्या नव्हत्या किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी दारु, मटणाचे तुकडे, पैसा अशी प्रलोभनेही लोकांना दाखवली नव्हती. तरी सुद्धा 3 लाख 7 हजार मते प्रभुंना मिळाली होती. प्रभूंना मिळालेल्या लोकांच्या अनपेक्षित प्रतिसादाने नारायण राणेसुद्धा अचंबित झाले. कुठुन आली असतील ही मते...? रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघातील तत्ववादी लोकांनी तत्वांच्या पुजाऱ्याला केलेले ते मतदान होते...!
आपल्या अफाट कर्तुत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर एका वेगळ्या उंचीवर पोहोचल्यानंतरही प्रभूंमध्ये असलेला नम्रपणा, सदा हसतमुख चेहरा, साधा-सरळ स्वभाव त्यांना प्रचाराविना मते मिळवुन देण्यास कारणीभुत ठरला. ती मते नव्हतीच मुळी...! प्रभुंच्या असामान्य व्यक्तिमत्वाला कोकणच्या समंजस मतदाराने दिलेला तो आशीर्वादच होता. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याँची आपुलकीने चौकशी करणारे प्रभू; एकीकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्वांनांसोबत डायनिँग रुममध्ये 'लंच' आणि 'डिनर' घेताना, दुसरीकडे मध्यमवर्गीय कुटुंबातही पंगतीत बसुन जेवणारे प्रभू; निवडणुक निकालानंतर विरोधी उमेदवार दंडवतेँचा चरणस्पर्श करणारे प्रभू, राजकरणात अन्यत्र कुठेच पाहायला मिळत नाहीत.
परमेश्वर संकल्पनेवर मतमतांतरे असतील पण मी परमेश्वर पाहिलाय आणि तो सुरेश प्रभूंच्या व्यक्तिमत्वात पाहिलाय. त्यांचा जन्म 'प्रभू' आडनाव असलेल्या कुटुंबात होणे, हा निश्चितच योगायोग नसावा. आज देशासमोरील वीज आणि पाण्याची समस्या उग्र रुप धारण करत आहे. वीजेअभावी खेड्यातील जनता अंधकारमय जीवन जगतेय तर दुष्काळात पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफडुन मरतायेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी साक्षात परमेश्वरानेच प्रभुंची नियुक्ती केली असावी. सौरऊर्जा क्षेत्रात प्रभुंनी केलेल्या अमुलाग्र संशोधनामुळे आज वीजनिर्मितीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत आणि प्रभुंच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होणा-या नदीजोड प्रकल्पामुळे देशातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी मिळणार आहे. मात्र अशा देवमाणसाला लोकसभेची उमेदवारी नाकारुन त्याचे राजकरण संपवण्याचा घ्रुणास्पद प्रयत्न केला गेला. आज रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघालाच नव्हे तर संपूर्ण देशाला सुरेश प्रभुंसारख्या दुरद्रुष्टी असलेल्या नेत्याची गरज होती. संसदेचे पवित्र मंदिर गुंडप्रव्रुत्तीच्या नेत्यांनी भरले आहे. लोकसभेत मिरचीची पुड डोळ्यात मारणारे नेते जावेत यापेक्षा वेगळे दुर्देव ते कोणते...? संसदेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सभ्य खासदार नजरेला पडत नाहीत आणि एखादा खासदार सभ्य असलाच तर त्याच्याकडे विद्वत्ता नसते. सभ्यता आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही गुण ठासुन भरलेला सुरेश प्रभुंसारखा 'दुर्मिळ नेता' माझ्या मतदारसंघात होता, ही किती अभिमानाची गोष्ट...! मात्र आज त्या नेत्यालाच लोकसभेची उमेदवारी नाकारली जावी...? सुरेश प्रभूंच्या उमेदवारीसाठी बहुतेक लोकांनी आपापल्या परिने केविलवाणे प्रयत्न केले. लोकशाहीत मतदार राजा असतो, असे म्हणतात. मग याच मतदाराला एखाद्या पक्षासमोर एवढ हतबल व्हायची वेळ का यावी...? लोकशाहीत आपले बहुमुल्य मत देणाऱ्या मतदाराला आपल्या आवडीचा उमेदवार पक्षाला सुचवण्याचे स्वातंत्र्य अद्याप का मिळालेले नाही...?? या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की, पक्षासमोर मतदार खरच इतका क्षुल्लक ठरतो का...???
सुरेश प्रभुंसारखा खासदार कोकणच्या राजकरणात असायलाच हवा, अशी बहुतांश लोकांची इच्छा होती. मात्र जेव्हा प्रभुंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घ्यायची वेळ आली तेव्हा यातील अनेक जणांनी पक्षाचा अंतर्गत प्रश्न समजुन अलिप्त राहणेच पसंत केले. ज्यांनी कोणी पुढाकार घेतला ते कधीच एकत्र आले नाहीत. या देशात आपापल्या हितासाठी दुर्जनशक्ती नेहमीच एकत्र येतात आणि सज्जनशक्ती अलिप्तच राहतात. सज्जनांच्या या अलिप्ततेमुळेच समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आपल्या आधीची पिढी देखील कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या दंडवतेँसारख्या कर्मयोग्याचा प्रथमतः पराभव होत असताना नामोनिराळीच राहिली आणि त्याचे भीषण परिणाम आज आपल्या पिढीला भोगावे लागतायेत.जेव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दंडवतेँसारख्या निस्प्रुह नेत्याला पराभुत करणाऱ्या मागच्या पिढीला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण करणाऱ्या दुःशासनाची इतिहासकारांनी निंदा केली. त्याचबरोबर ते वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी निमुटपणे पाहणाऱ्या पितामह भीष्मांनांही अपराधी ठरवले. इतिहासाची पुनरावव्रुत्ती होतच असते, फक्त पात्रे तितकी बदललेली असतात. फरक इतकाच की 1991 साली प्रा. मधु दंडवते होते आणि आज 2014 साली त्यांच्या जागी सुरेश प्रभू आहेत. प्रभूंना उमेदवारी नाकारुन कोकणातील सभ्यतेचे राजकरण संपवु पाहणाऱ्या शिवसेनेला भविष्यातील पिढ्या नक्कीच दोषी ठरवतील. त्याच वेळी प्रभुंचे राजकरण संपवले जात असताना स्वस्थ बसणाऱ्या आपल्या पिढीलाही इतिहास कधीच माफ करणार नाही.
अफाट वक्तुत्व आणि परिपुर्ण अभ्यासाच्या जोरावर संसदेत भाषण करुन जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करण्यासाठी कोकणला प्रभूंची नितांत गरज होती पण शिवसेनेने प्रभुंनाच राजकरणातुन संपवण्याचा करंटेपणा केला. पर्यावरण राखुन कोकणचा सर्वाँगीण, समतोल आणि शाश्वत विकास करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सुरेश प्रभुच कोकणचे खासदार हवे होते पण आता मायनिँग करुन निसर्ग ओरबाडु पाहणाऱ्याना आपण रान मोकळे करुन दिले. एकंदरीत सुरेश प्रभू या नेत्यालाच नव्हे तर पर्यायाने त्यांच्यासोबत कोकणच्या राजकरणातील नैतिकताच आपण संपवुन टाकली. 'कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली' या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आज आपण प्रत्यक्षात उतरवल्या. राजकरणात चांगल्या लोकांचा वावर वाढला पाहिजे यावर आपल्यातील अनेकजण व्याख्याने देताना दिसतात. मग आज याच लोकांसमोर प्रभुंसारख्या चांगल्या नेत्याच राजकरण संपवल जात असताना ही मंडळी गप्प का...? सुरेश प्रभुंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी ज्या सज्जन लोकांनी प्रयत्न केले त्यांनी हताश व्हायची काहीच गरज नाही. उमेदवारी कोणाला द्यावी हा जरी सर्वस्वी एखाद्या पक्षाचाच प्रश्न असला तरी कोणत्या उमेदवाराला मत द्यावे हे मतदारांच्या हातात आहे. येत्या निवडणुकीत संविधानाने नकाराधिकाराचा अधिकार आपणा सर्वाँना बहाल केला आहे. सुरेश प्रभूंसारखा सज्जन उमेदवार जर यादीत नसेल तर नकाराधिकाराचा वापर आपण सर्वजण करु शकतो. उमेदवाराची निवड करताना आपण कोणाला डावलत आहोत याचे किमान भान नसलेल्या आपमतलबी पक्षांना लोकशाहीत मतदारच श्रेष्ठ असतो हे दाखवुन देण्याची नकाराधिकार (NOTA) ही सुवर्णसंधी असेल.
लेखाचा शेवट करताना महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देतो. कार्लाइल म्हणाला होता की-
"खुज्या माणसांच्या सावल्या जेव्हा वाढु लागतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली असे समजावे."
कोकणच्या राजकरणात खुज्या नेत्यांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढलेल्या आहेत की कोकणचा अस्त मला नजीक भासु लागलाय. सुरेश प्रभुंसारख्या सभ्य नेत्याच्या राजकीय अस्तानंतर त्या सावल्या आणखीनच जोमाने वाढतील. मात्र कोकणास्त होऊ देण आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली...

भविष्यात सुरेश प्रभू राज्यसभेतुन खासदार होऊन मंत्री होतात कि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होतात, हे येणारा काळच ठरवेल पण या महान नेत्याची कोकणच्या सक्रिय राजकरणातुन कायमची निव्रुत्ती झाली एवढ मात्र नक्की...! पैशाने उन्मत झालेले सत्तापिपासु गोचिड प्रभुंना पुन्हा कोकणच्या राजकरणात येऊ देतील अस वाटत नाही. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू हे कोकणचे मानबिँदु होते आणि यापुढेही राहतील. जेव्हा कधी कोकणच्या राजकरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ही तीन नावे सर्वात वर सुवर्णाक्षरांनी कोरलेली दिसतील मात्र दुर्देवाने आज त्यांच्या महान सुवर्णपर्वाचा अस्त झाला.
असे म्हणतात, युधिष्ठिराने जेव्हा सर्वप्रथम 'नरोवा कुंजरोवा' अर्धसत्यकथन केले, तेव्हा त्याच्या रथाची चाके प्रथमतः जमिनीला टेकली. आज आमच्या कोकणच्या विद्वान मतदारसंघाचीही तीच अवस्था झालीय. भविष्यात आम्ही ताठ मानेने विद्वान मतदारसंघाचा वारसा सांगु शकणार नाही. अर्धशिक्षित आणि गुंडप्रव्रुत्तीच्या नेत्यांची नावे तोँडात घेताना आमची सर्वाँचीच मान शरमेने झुकेल. मनात कुठेतरी प्रभुंची आठवणही येईल, चुकचुकल्यासारखे वाटेल, पश्चाताप होईल पण त्यावेळी सुरेश प्रभू कोकणच्या राजकरणात नसतील. फारफार तर काँग्रेसचे गुंड बाजुला होऊन शिवसेनेचे गुंड राज्य करतील पण यापुढे आपले नेते मात्र गुंडप्रव्रुत्तीचेच असतील. बिहारच्या राजकरणालाच हसताना 'कोकणचा बिहार' कधी बनला, कोणाच्याच लक्षात आल नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही अर्धशिक्षित गावंढळ उमेदवारांकडुन एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जातील, तेव्हा कुठे लोकांना तोँडातुन एकही अपशब्द न उच्चारता मुद्द्यांवर भाषण करणारे सुरेश प्रभु आणि मधु दंडवते आठवतील. एखाद्या पिढीची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. आमच्या आधीच्या पिढ्यांनी निवडणुकीच्या बाजारात तत्वांची किँमत केली नाही, त्यामुळे त्यांच्या नशीबी नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू आलेत. आपल्या नशीबी दोन अर्धशिक्षित उमेदवारांपैकी एकाची निवड करणे तेवढे शिल्लक राहिले आहे.
नाथ पै साहेब, दंडवते साहेब बघताय ना तुमच्या मतदारसंघाकडे...! आम्ही तुमची इतक्या वर्षांची परंपरा कायमची संपुष्टात आणली आहे. बर झाल हे दिवस पाहण्याअगोदर तुम्ही या जगाचा निरोप घेतलात. तुमच्याने हे बघवले नसते. आजही स्वर्गात तुमच्या पवित्र आत्म्याला नक्कीच वेदना होत असतील पण काय करणार हेच कोकण राजकरणातील विदारक आणि भयाण वास्तव आहे. राजकरणातील नैतिकता वेशीला टाकुन आम्ही कोकणास्ताच्या उंबरठ्यावर येऊन थांबलोय.
सभ्य, सुसंस्क्रुत आणि विद्वान म्हणुन देशात नाही तर जगभरात नावाजलेल्या सुरेश प्रभुंसारख्या अवलिया नेत्याच्या राजकीय कारकीर्दीचा समारोप तशाच थाटात व्हायला हवा. सुरेश प्रभूंच्या निरोपासाठी खास ठेवणीतले शब्द वापरुन हा लेख मी लिहीला. लेख लिहिताना जड अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी सुरेश प्रभुंना एवढच सांगावस वाटतय. यापुढेही कोकणात किती नेते येतील आणि किती नेते जातील पण एक खासदार' म्हणुन नेहमीच तुमची प्रतिमा आमच्या ह्रुदयात कोरलेली राहिल. जेव्हा कधी खासदारच्या कर्तव्याची आम्हाला जाणीव होईल तेव्हा ओठी आपसुक शब्द येतील-
"प्रभू जी, तुम ही नाथ हमारे"

प्रभू सर, तुम्ही इतकी वर्षे उत्क्रुष्ट संसदपटु बनुन माझ्या मतदारसंघाची दिल्लीत आन-बान-शान कायम राखली. सर्वप्रथम तुमच्या या वैभवशाली कारकिर्दीला सलाम...!
उमेदवारी हिसकावुन घेतली जात असताना तोँडातुन चकार शब्द न काढता सगळ दुःख निमुटपणे एकाकी सहन करणा-या तुमच्या संवेदनशील मनाला सलाम...!
उमेदवारी डावलल्यानंतर अनेक पक्षांच्या आँफर समोर असताना, निवडणुक लढवेन तर बाळासाहेबांच्या शिवसेनेतुन अन्यथा राजकरण संपवेन, असे म्हणुन बंडखोर नेत्यांना नितीमत्तेचा धडा शिकविणा-या तुमच्या बाळासाहेबांवरील निष्ठेला सलाम...!
एकंदरीतच अनेक गुणांनी बहरलेल्या आणि तत्वांशी तडजोड न करणा-या तुमच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाला, जगात नावाजलेल्या कर्तुत्वाला माझा सलाम... सलाम... आणि फक्त सलाम...!!!

...तर मच्छीमारांसाठी दिवसही वै-याचाच असेल…!

             लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी कोकणातही रंगु लागलीय. खर तर मच्छिमारी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसाय आहे. अनेक लोकांची रोजीरोटी मच्छिमारी व्यवसायावर अवलंबुन आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान मच्छिमारांचे प्रश्न अजेंड्यावर घ्यायला हवेत पण मतदारसंघातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र नेमकी याच्या उलट दिसतेय. सत्ताधारी काँग्रेस पक्ष स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना सावत्र वागणुक देताना दिसतोय. सिंधुदुर्गातील स्थानिक मच्छिमार गेली अनेक वर्षे पारंपारिक रापण पद्धतीने मच्छिमारी करुन आपले जीवन सुखाने व्यतित करत होते पण काँग्रेस पक्षाला हे बघवले नाही. 2011 साली काँग्रेसमधील एका नेत्याच्या क्रुपाशीर्वादाने सिंधुदुर्गात पर्सनीट पद्धतीने मच्छिमारी करणा-या  बड्या धेडांनी किनारपट्टीवर धुडगुस घातला. गेली 25 वर्षे निवडणुकांमध्ये आपले बहुमुल्य मत देऊन सिंधुदुर्गातील याच स्थानिक मच्छिमारांनी या नेत्याला 'कोकणचा वाघ' बनवत मंत्रीपद मिळवुन दिले होते. कु-हाडीचा दांडा गोतास काळ ठरावा त्याप्रमाणे मंत्रीपद मिळाल्यानंतर या नेत्याने धनदांडग्या पर्सनीट मच्छिमारांकडुन मिळणा-या आर्थिक लाभापायी स्थानिक पारंपारिक मच्छिमारांवर अत्याचार सुरु केले. गरीब मच्छिमारांनी दिलेल्या मतांच्या उपकाराची जाण नसलेल्या या नेत्याने फक्त पर्सनीट मच्छिमारांकडुन मिळणा-या पैशांखातर पारंपारिक मच्छिमारी संपवुन टाकण्याचे कारस्थान रचले. आपल्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने पारंपारिक मच्छिमारांनी कोर्टात केस दाखल केली. मात्र सत्तेचा माज आलेल्या या नेत्याने कधीही त्या केसचा पाठपुरावा केला नाही. किनारपट्टीवर गंभीर होत चाललेल्या पर्सनीट विरुद्ध पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नी डाँ.सोमवंशी अहवाल तयार केला गेला परंतु काँग्रेस सरकारने तो अहवाल जनतेसाठी खुला न करता दडपुन टाकण्याचे धोरण अवलंबले. पर्सनीट मच्छिमारीमुळे माशांचे बीजच नाहीसे होऊन मरीन इकाँलाँजीला धोका निर्माण झाला आहे. मच्छिमारांवर इतके अत्याचार करुनही काँग्रेसवाले शांत बसलेले नाहीत. त्यांनी जणु काही सिंधुदुर्गातील मच्छिमारी व्यवसाय संपवुन टाकण्याचा ठेकाच घेतलाय. मच्छिमारांच्या द्रुष्टीने त्यांचे पुढचे विनाशकारी पाऊल आहे ते म्हणजे जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प सुरु करण्याचे...! जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मच्छिमारांची एकी झाली तर आपल्याला पळता भुई थोडी होईल याची पुर्वकल्पना असल्याने सिंधुदुर्गातील मच्छिमारांना जैतापुर अणुप्रकल्पापासुन कोणताच धोका नाही हा गैरसमज काँग्रेसकडुन जाणीवपुर्वक पसरवण्यात आलाय. त्यामुळेच एरव्ही प्रत्येक प्रश्नी सजग होऊन आंदोलनासाठी उभे राहणारे सिंधुदुर्गातील मच्छिमार बांधव जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात कोणतेही आंदोलन करताना दिसले नाहीत. यालाच म्हणतात, काँग्रेसचे तोडा फोडा आणि राज्य करा धोरण...!
           रत्नागिरीसह सिंधुदुर्गातीलच नव्हे तर गोवा राज्यातील मच्छिमारी व्यवसाय पुर्णपणे संपवण्याची क्षमता असलेल्या जैतापुर अणुप्रकल्पप्रश्नी बेफिकीर राहुन चालणार नाही. माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही ना...? तुम्ही तारापुर अणुप्रकल्पानजीक असलेल्या मच्छीमार बांधवांना कधीतरी नक्की भेट द्या. मग माझ्या बोलण्यावर तुम्ही फक्त विश्वासच ठेवणार नाही तर तारापुरमधील मच्छिमार बांधवांची काँग्रेस सरकारने केलेली दुरावस्था पाहुन एक मच्छिमार म्हणून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. जैतापुर अणुप्रकल्पात निर्माण होणारी उष्णता थंड करण्यासाठी समुद्रातुन दररोज 5200 कोटी लीटर पाणी आत घेतले जाईल आणि सहा अणुभट्ट्यांमध्ये फिरवुन निर्माण झालेल्या अतिरिक्त उष्णतेसह पुन्हा ते जैतापुरच्या समुद्रात सोडले जाईल. आता एवढ्या प्रचंड प्रमाणात उष्णता समुद्रात सोडल्यानंतर जैतापुरपासुन सिंधुदुर्गापर्यँत सर्वत्र समुद्राच्या पाण्याचे तापमान किमान 7 अंश सेल्सिअसने वाढणार आहे, असे जैतापुर अणुप्रकल्पाच्या अहवालात नमुद केले आहे. आजकाल ग्लोबल वार्मिँगमुळे तापमानात 1 अंश सेल्सियसने जरी वाढ झाली तरी मासे मरतात. मग जैतापुर अणुप्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याचे तापमान तब्बल 7 पटीने वाढल्यानंतर ह्या वाढलेल्या तापमानात माशांची अंडी टिकतील का...? पिल्ले जगतील का...? माशांची अंडी, पिल्ले जगली नाहीत तर माशांची पैदास कशी होणार...? रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्रात माशांची पैदासच झाली नाही तर तुमचा उदरनिर्वाह कसा काय चालणार...? शिवाय या पाण्याबरोबर प्रकल्पातील विषारी रसायने समुद्रात सोडली जातील. त्या घातक रसायनांचा परिणाम होऊन अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होतील. जैतापुर अणुप्रकल्पाने समुद्राच्या वाढलेल्या तापमानात बाजारात मागणी असणा-या माशांच्या जातीच्या जाती समुळ नष्ट होऊन स्थानिक मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत . जैतापुर अणुप्रकल्पाच्या भीषण दुरगामी परिणामांचे गांभीर्य समजण्याची किमान बौद्धिक कुवत नसलेले  काँग्रेसचे नेते आपल्या हेकेखोर आणि आततायी व्रुत्तीने सगळ्या मच्छिमार समाजाला विनाशाच्या खाईत लोटत आहे. इतक सगळ धडधडीत वास्तव, मच्छिमारांचा अंधारमय भविष्यकाळ समोर दिसत असताना मच्छिमारांनी काँग्रेस सरकारवर का म्हणुन विश्वास ठेवावा...? शेवटी हा केवळ  मच्छिमारांचा प्रश्न नाही तर त्यांच्यावर अवलंबुन असणारे हजारो इतर व्यावसायिक (वाहतुकदार, सुतार, मेकँनिक, कामगार, इत्यादी) यांचाही प्रश्न आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे कोकणचे वैशिष्ठ्य असलेले माशांसारखे पौष्टिक खाद्य जैतापुरच्या विनाशकारी अणुप्रकल्पामुळे कायमस्वरुपी नष्ट होत आहे. पुढच्या पिढीला मासे नाहीसे केले तर ती पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
           एकीकडे जैतापुरचा अणुप्रकल्प सुरु करत मच्छिमारीचा व्यवसाय संपुष्टात आणुन स्थानिक मच्छिमारांना उद्ध्वस्त करायची स्वप्ने पाहत असलेला काँग्रेसचा नेता दुसरीकडे धनदांडग्यांच्या मोठमोठ्या ट्राँलरना अनुदानित तत्वावर डिझेल पुरवताना दिसतोय. मात्र गरिबीत हलाखीचे जीवन व्यतित करणाऱ्या स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करायला यांच्या काँग्रेस सरकारला शक्य होत नाहीये. गेली दहा-बारा वर्षे स्थानिक पारंपारिक मच्छिमार अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करा म्हणुन कंठशोष करतायेत परंतु गरिबाची आर्त हाक सत्तेच्या गुर्मीत बहि-या बनलेल्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना ऐकु येत नाहीये.
           आता बस्स झाल...! मच्छिमारांनी आणखी किती अन्याय सहन करायचा...? आम्हाला पर्सनीट प्रश्नी सुप्रीम कोर्टातील केसचा पाठपुरावा करणारा नेता हवाय...! जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करुन रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील मच्छिमारी व्यवसाय वाचवणारा नेता हवाय...!! स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करणारा नेता हवाय...!!! एकंदरीतच आम्हाला स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न आपले समजुन त्यासाठी संसदेच्या सभाग्रुहात लढा देणारा नेता हवाय. सत्ता आणि पदाच्या अहंकाराने माज आलेला काँग्रेसचा नेता नेमका याच्या उलट वागतोय. या लोकसभा निवडणुकीत समस्त मच्छिमार बांधव काँग्रेसविरोधी मतदान करुन काँग्रेसच्या उर्मट नेत्यांचा माज नक्कीच उतरवतील. लोकशाहीत मतदार राजा असतो या विधानावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील. काँग्रेसने इतकी वर्षी लुबाडल्यानंतरही निवडणुक प्रचारकाळातील त्यांच्या भुलथापांना बळी पडुन मच्छिमार बांधव काँग्रेसलाच मत देणार असतील तर मग देवच तुमचे भले करो. शेवटी इतकच सांगेन की येत्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्मधर्मसंयोगाने काँग्रेस पुन्हा निवडुन आली तर मच्छिमारांसाठी फक्त रात्रच नव्हे तर दिवससुद्धा वै-याचाच असेल.

मायनिंगच्या विळख्यात गुदमरणारा दोडामार्ग…!

         लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाला मंजुरी देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ गावे इको सेँसिटीव्ह घोषित करून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. इको सेँसिटीव्ह झोनला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू कारणीभुत आहेत, असा खोटा आरोप करुन काँग्रेसच्या नेत्यांकडुन जिल्ह्यातील जनतेला निवडणुकांच्या तोँडावर संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्याने त्या आरोपाला या लेखातुन जाहिर उत्तर देण मी माझ परमकर्तव्य समजतो.
        मित्रांनो, इको सेँसिटीव्ह झोन आणि गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवाल या दोन भिन्न गोष्टी आहेत. हे सत्य आहे की, सुरेश प्रभुंनी जिल्ह्यातील पर्यावरणद्रुष्ट्या संवेदनशील असलेल्या काही भागात इको-सेँसिटीव्ह झोन लागु करण्याची शिफारस केली होती पण प्रभूंची शिफारस आणि गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवालाचा काडीमात्र संबंध नाही. गेली दहा वर्षे केँद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारनेच गाडगीळ कमिटी नेमली. त्यानंतर माधवराव गाडगीळांनी तयार केलेल्या अहवालावर टिकेची झोड उठवत गाडगीळ समितीचा अहवाल फेटाळुन लावत पुन्हा कस्तुरीरंगन समिती नेमली. आज त्यामुळेच सावंतवाडी शहर, बांदा शहर, कणकवली बाजारपेठ यासारख्या संवेदनशील पर्यावरणाशी कोणताही संबंध नसणा-या जिल्ह्यातील अनेक भागांना कस्तुरीरंगन अहवालाच्या जाचक अटींचा सामना करावा लागतोय. आता अनेकांच्या मनात प्रश्न येत असेल की जर इको सेँसिटीव्ह झोन इतकाच जाचक असेल तर सुरेश प्रभूंसारखे अभ्यासु खासदार त्याचे समर्थन का करत होते...? प्रभूंची भुमिका समजुन घेण्यासाठी जिल्ह्यातील काही वर्षाँपुर्वीची पार्श्वभुमी समजुन घ्यावी लागेल. त्यावेळी गिर्ये आणि धाकोरे याठिकाणी औष्णिक प्रकल्प प्रस्तावित होते. औष्णिक प्रकल्पांनी जिल्ह्यातील उष्णता वाढुन आंबा-काजु बागायतदार देशोधडीस लागणार होते. सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी विनाशकारी मेजर मायनिंग प्रकल्प प्रस्तावित केले गेले होते.कळणेतील विनाशकारी मायनिँग प्रकल्पविरोधात आंदोलन करणा-या ग्रामस्थांना पोलिसांच्या मदतीने अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याविरोधात खुनाचे खोटे गुन्हे दाखल केले गेले. सुरेश प्रभू हे कोकणच्या शाश्वत, सर्वाँगीण आणि समतोल विकासासाठी कटिबद्ध असलेले खासदार होते. त्यासाठीच त्यांनी जिल्ह्याच्या पर्यटनाभिमुख विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 1997 साली सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला 'पर्यटन जिल्हा' घोषित करुन घेतला. आता जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटन जिल्ह्यात मोठमोठे मायनिंग प्रकल्प आणुन येथील पर्यावरणाचाच विध्वंस केला गेला तर कोकणचे वैशिष्ठ्यच संपुन जाईल. मायनिंग माफियांना रान मोकळे करुन दिले तर सिंधुदुर्गचा विध्वंस होऊ शकतो, हे प्रभुंसारख्या दुरद्रष्टी असलेल्या नेत्याने केव्हाच हेरले होते. त्यामुळेच पर्यावरण विध्वंसाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना सुरेश प्रभूंनी मोठमोठे मायनिंग प्रकल्प आणि औष्णिक प्रकल्प प्रस्तावित असलेली सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील गावे इको सेँसिटीव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. त्यानंतरच्या काळात गोवा राज्यात खाणमाफियांनी घातलेला धुडगुस पाहुन काँग्रेस सरकारनेही गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समिती नेमली ज्याच्याशी सुरेश प्रभुंनी केलेल्या इको सेँसिटीव्हच्या शिफारशींचा काहीही संबंध नव्हता.
          एखाद्या भागासाठी इको सेँसिटीव्ह झोनचे निकष जाचक आहेत की वरदान आहेत, हे त्या त्या भागाची जैवविविधता पडताळुनच ठरवता येते. सिंधुदुर्गात आंबोली ते मांगेलीपर्यँतच्या पट्ट्यात सर्वाधिक जैवविविधता आढळते आणि यात मानवी हस्तक्षेप करुन निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भीषण परिणाम आपणा सर्वाँनाच भोगावे लागतील. याच पट्ट्यात वाघांचा वावर जास्त आहे. आंबोली ते मांगेली पट्ट्यात अलीकडच्या काळात मायनिंग करुन वाघांची निवासस्थाने नष्ट केल्याने तेच वाघ मानवी वस्तीत घुसुन जनावरे,माणसांवर हल्ले करु लागले आहेत. अगदी गाडगीळ कमिटीनेही दोडामार्ग तालुका इको सेँसिटीव्ह घोषित करण्याची शिफारस केली होती. मात्र कस्तुरीरंगन समितीने तयार केलेला  अहवाल हा 'आग सोमेश्वरी अन् बंब रामेश्वरी' अशातला प्रकार आहे. जो दोडामार्ग तालुका इको सेँसिटीव्ह घोषित करणे काळाची गरज होती, तोच तालुका कोणताही सर्व्हे न करता कस्तुरीरंगन यांनी इको सेँसिटीव्ह झोन मधुन वगळला आहे.त्याच वेळी सावंतवाडी शहर, बांदा, कणकवली बाजारपेठ अशा विकसनशील भागात इको सेँसिटीव्हचे जाचक निर्बँध लादले आहेत. कस्तुरीरंगन यांनी 'हम करे सो कायदा' पद्धतीने कोणताही सांगोपांग विचार न करता सरसकट 192 गावे इको सेँसिटीव्ह घोषित करुन टाकली आहेत. प्रभुंनी सुचवलेला इको सेँसिटीव्ह झोन सावंतवाडी-दोडामार्गच्या ज्या भागात मायनिँग प्रकल्प प्रस्तावित आहेत त्या गावांसाठी वरदानच होता. मात्र काँग्रेस सरकारने नेमलेल्या कस्तुरीरंगन समितीने विनाकारण ज्या 192 गावांचा इको सेँसिटीव्ह झोनमध्ये समावेश केला त्यासाठी तो शाप आहे. कस्तुरीरंगन समिती जेव्हा सिँधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आली तेव्हा पालकमंत्री नारायण राणेच कस्तुरीरंगन यांच्या सोबत होते. त्यामुळेच ज्या शिवडाव गावात राणेँचे क्रशर आहेत तो गाव, त्याचप्रमाणे ज्या दोडामार्ग तालुक्यात राणेँना कळणेसारखे विनाशकारी मायनिँग प्रकल्प करुन विध्वंस करायचा आहेत तो अख्खाच्या अख्खा दोडामार्ग तालुका राणेँनी आपले राजकीय वजन वापरुन कस्तुरीरंगन अहवालातुन वगळुन घेतला. त्यानंतर राजकीय नौटंकी करुन लोकांची सहानुभुती मिळवण्यासाठी 'कस्तुरीरंगन अहवाल मंजुर केला गेला तर प्रसंगी मंत्रीपदाचा राजीनामा देईन' अशी भंपक विधाने केली. प्रत्यक्षात कस्तुरीरंगन अहवाल जेव्हा केँद्र सरकारने स्वीकारला तेव्हा सत्ता आणि मंत्रीपदासाठी हपापलेल्या राणेँनी मंत्रीपद सोडण्यास नकार देऊन दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणा-या जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात केला. राणेँच्या राजकीय नौटंकीची ही पहिलीच वेळ नव्हे.याअगोदरही गेल्या वर्षी मतदारसंघात जेव्हा गौणखनिजधारकांचा प्रश्न गंभीर बनला तेव्हा खासदार या नात्याने संसदेत जनतेचा आवाज उठवुन केँद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा करुन गौणखनिज प्रश्न मार्गी लावणे, ही निलेश राणेँची नैतिक जबाबदारी होती. एरव्ही मतदारसंघात मोठमोठ्या बाता मारत फिरणा-या खासदाराचे तिकडे दिल्लीतील संसदेत आवाज थंड होतात. आपले खासदार महाशय पाच वर्षाच्या कारकिर्दीत संसदेत अवघे 52 सेकंद बोलले. संसदेत बोलण्यासाठी शब्दांना वजन आणि विषयाचा सखोल अभ्यास लागतो. गौण खनिज प्रश्नाची जाण नसल्याने त्यावर संसदेत बोलण्याऐवजी इकडे गौणखनिज धारकांकडुन पैसे घेऊन महामोर्चे काढण्याची नौटंकी त्यांनी केली. लोकशाहीत मोर्चा काढुन सत्ताधा-यांना प्रश्नांची जाणीव करुन देणे हे विरोधी पक्षाचे काम असते, सत्ताधा-यांचे नव्हे. निलेश राणे सत्ताधारी पक्षाचे खासदार असुन त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाण नसावी याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेने विरोधी पक्षाची भुमिका चोखपणे पार पाडत गौणखनिज बंदी विरोधात मोर्चा काढला.काँग्रेसने वर्षभर चिघळत ठेवलेला गौणखनिज बंदीचा प्रश्न शेवटी शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभुंनीच दिल्ली दरबारातील आपले राजकीय वजन वापरुन केँद्रीय पर्यावरण मंत्रालायला पत्र लिहुन तडीस नेला.
           दोडामार्ग तालुक्याच्या निर्मितीपासुन त्याला कॉंग्रेसने मागासच ठेवला मात्र त्यातील खनिजसंपन्न गावे इकोसेँसिटीव्ह करण्याची वेळ आली तेव्हा नेतेमंडळींना दोडामार्गच्या विकासाची आठवण झाली. हा विकास नक्की जनतेचा आहे की काँग्रेसच्या नेतेमंडळीँचा, याबाबत जरा स्पष्टीकरण मिळेल का...? महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान आणि डहाणुचा इको सेँसिटीव्ह झोन मध्ये समावेश होतो.  विकासाच म्हणाल तर महाबळेश्वरला 2010-11 या एका वर्षात 11 लाख पर्यटकांनी भेट दिली आणि 100 कोटी रुपयांची स्ट्राँबेरी विकली गेली. सिंधुदुर्गला देशातील एकमेव 'पर्यटन जिल्हा' घोषित करुन आज 17 वर्षे लोटली, मग अजुनही महाबळेश्वरच्या धर्तीवर इको-टुरिझमच्या द्रुष्टीने कोणतेही प्रयत्न का करण्यात आले नाहीत...? इको सेँसिटीव्ह झोनमध्ये सागरी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग, क्रुषी उत्पादनावर आधारित उद्योग, पर्यटन उद्योग, फर्निचर उद्योग, काजु कारखाना असे 16 प्रकारचे उद्योग करता येतात. फक्त मायनिंगसारखे 'नसते उद्योग' करता येत नाहीत.
          एखाद्या गावात  300-400 फुट खोल खाणी खणुन मायनिंग प्रकल्प केला गेला तर आजुबाजुच्या गावांमधील पाण्याचा प्रवाह खाणीच्या दिशेने वाहु लागतो आणि सगळे पाणी खाणीमध्ये जमा होते. परिणामी, फक्त 30-40 फुट खोल असलेल्या विहिरी कोरड्या पडु लागतात. सध्या मायनिंग प्रकल्पांमुळेच सिंधुदुर्गातील लोकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येची भीषणता अनुभवायची असेल तर शेजारील गोवा राज्याचे निरीक्षण करा. मायनिंगमुळे डोंगर बोडके झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांना निसर्ग म्हणुन आपण नक्की काय दाखवणार आहोत...? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून पहायला हवा.लेखाच्या शेवटी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की, येत्या लोकसभा निवडणुकीत आपले बहुमुल्य मत देताना मायनिंग माफियांना प्रोत्साहन देत विनाशकारी मायनिंग प्रकल्प जिल्ह्यात आणून कोकणचे कोकणपण नष्ट करू पाहणा-यांना मतदारसंघातील सुज्ञ आणि समंजस जनता नक्कीच अद्दल घडवेल.