रविवार, ६ एप्रिल, २०१४

झुंज दोन वाघांची...!"झुंज दोन वाघांची...!"

आठवतेय का 2005 साली झालेली मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक...? कागदोपत्री नारायण राणे विरुद्ध परशुराम उपरकर अशी लढत असली तरी प्रत्यक्षात नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असाच त्या लढतीचा नुर होता. शिवसेनेत असताना 'कोकणचा वाघ' म्हणुन ख्याती असलेले नारायण राणे अन्याय झाला अशी आवई उठवत सेनेला 'जय महाराष्ट्र' करुन बाहेर पडले होते. झुंजार व्रुत्ती आणि शत्रुला शिँगावर घ्यायची तयारी यामुळे शिवसेना संपवुन टाकण्याच्या हेतुनेच राणे त्वेषाने तुटुन पडले. राणेँच्या एकट्याच्या टेकुवर कोकणातील शिवसेना उभी करण्याची चुक एव्हाना बाळासाहेबांच्या लक्षात आली होती. राणेँनी पाठिँबा काढुन घेतल्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मात्र या प्रतिकुल परिस्थितीत हार मानतील तर ते बाळासाहेब कसले...? 'हार' शब्द बाळासाहेबांच्या डिक्शनरीत नव्हता. शारिरिक वयोमानाच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवत असल्या तरी बाळासाहेबांच्या मनातील वाघ नेहमीसारखाच तरुण होता.सिँधुदुर्गच्या मातीत पाय ठेवल्यानंतर पत्रकाराने केलेल्या प्रश्नाच उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले-

"किसने की है बगावत...?"

बाळासाहेबांची शैली मिश्किल असली तर सिँधुदुर्गात आल्यावर पराभवाची चाहुल लागली होती. तरी सुद्धा प्रचारसभेत बाळासाहेब राणेँवर तुटुन पडले. आयुष्यात प्रथमतः स्टेजवर नतमस्तक होऊन त्यांनी सिँधुदुर्गातील लोकांना शिवसेनेला मत देण्याचे आवाहन केले पण अखेरीस त्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम देखील बाळासाहेब वाचवु शकले नाही. कोकणच्या वाघासमोर शिवसेनेचा वाघ अक्षरशः चारी मुंड्या चीत झाला. त्यावेळी एका वर्तमानपत्रात आलेले व्यंगचित्र अगदी सुचक असे होते. एकीकडे वयाने व्रुद्ध आणि थकलेला वाघ दाखवलेला. समोर तरणाबांड वाघ डरकाळ्या फोडत होता. त्या वाघाला पाहुन व्रुद्ध वाघ "अरे बापरे, हा तर कोकणचा वाघ" असे उद्गार काढुन पळत होता.

मित्रांनो, इतिहासाची पुनराव्रुत्ती होतच असते फक्त पात्र तितकी बदलतात. 2005 साली कोकणात राणेँचा दबदबा होता. त्यावेळी कोणी भविष्यवाणी केली असती की,
"भविष्यात शिवसेनेचा एखादा नेता राणेँना हिँमत असेल तर माझ्याविरुद्ध निवडणुक लढवुन दाखवा."
असे आव्हान देईल. तर अशा भविष्यकारालाच लोकांनी वेडात काढले असते. शेवटी हे राजकरण आहे. इकडे कोणी कायमस्वरुपी नेता राहत नसतो. काळ बदलतो, वेळ बदलते आणि शेरास सव्वाशेर भेटतो. इतके दिवस नारायण राणे इतर नेत्यांना स्वतःविरुद्ध निवडणुक लढवण्याचे आव्हान देत असत. आज वैभव नाईक साक्षात नारायण राणेँना माझ्याविरुद्ध निवडणुक लढवुन दाखवा म्हणुन आव्हान देतोय आणि तेही राणेँच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात...! मालवण मतदारसंघात...!!

2005 निवडणुकीनंतर मधल्या काळात पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले. नारायण राणेँनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची अर्धी शक्ती स्वपक्षीयांशी लढे देण्यात खर्च होऊ लागली. त्याकाळात शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत वैभव नाईकने पक्ष पुन्हा एकदा नव्याने बांधुन काढला. परिणामी नव्या दमाची, सळसळत्या रक्ताची तरुण पोरे शिवसेनेत सामील झाली. जनसंपर्क इतका वाढवला की लोकांना आपल्यामध्ये मिसळणारा वैभव नाईक आपलासा वाटु लागला. दुसरीकडे अंतर्गत कुरघोडी करणा-यांना रोखताना राणेँची संघटनेवरील पकड सैल होत गेली. जुने काँग्रेस आणि राणे काँग्रेस या दोन्ही गटांचे कधीच मनोमिलन झाले नाही. त्यांच्यातील शीतयुद्धाने काँग्रेस नेहमीच धुमसत राहिली. त्यातच 2009 विधानसभा निवडणुकीत राणेँविरुद्ध वैभव नाईकलाच उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला ज्येष्ठ नेत्यासमोर पोरगा उभा राहिलाय म्हणुन अनेकांनी खिल्ली उडवली पण जसजशी निवडणुक जवळ आली तसतसा वैभवचा जोर वाढु लागला. निवडणुकीच्या दिवशी वैभववर पिस्तुल रोखायची वेळ विरोधकांवर आली. वैभव लौकिकार्थाने निवडणुक हरला असला तरी राणेँसारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध 50000 मते मिळवली यातच त्याचा विजय होता. लढवय्या वैभवने गेल्या 5 वर्षात मतदारसंघात असा जम बसवलाय की नारायण राणेँना येत्या विधानसभेसाठी कुडाळ-मालवण मतदारसंघ आपले पुत्र नितेश राणेँसाठी सोडला आहे. राज्यस्तरीय नेता असल्याने निवडणुकीच्या काळात राणेँना वैभव एवढा जनसंपर्क ठेवता येणार नाही. सी-वर्ल्ड विरोधामुळे वायंगणी-तोँडवलीसारखी गावे राणेँच्या पुर्ण विरोधात गेली आहेत. मच्छिमारांमध्ये राणेँविरोधात रोष आहे. अशा परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकविरुद्ध नारायण राणे उभे राहिले तर त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय.

नशीबाचे खेळ पण कसे असतात पहा ना...! नारायण राणे विरुद्ध बाळासाहेब ठाकरे ही लढत सुद्धा दोन वाघांची लढत होती. फक्त या लढतीत राणे तरणेबांड वाघ होते आणि बाळासाहेब आपल्या तारुण्यात अनेक नेत्यांना पुरुन उरलेले असले मात्र त्या पोटनिवडणुकीवेळी वय वाढलेले आणि प्रक्रुतीने थकलेले वाघ होते.
आता वैभव नाईक विरुद्ध नारायण राणे ही लढत सुद्धा दोन वाघांमधील लढत आहे. मात्र यावेळी वैभव नाईक तरणाबांड वाघ या प्रकारात मोडतात आणि नारायण राणे एकेकाळी कोकणचे वाघ असले तरी आता त्यांच्यात पुर्वीचा दम राहिलेला नाही.

नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात फरक एवढाच आहे की राणेँच्या डरकाळीला प्रत्युत्तर देताना बाळासाहेब ठाकरे मैदान सोडुन पळाले नव्हते. पराभव निश्चित असताना त्या वयात देखील त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी टाकुन ठाकरी गर्जना केली होती. वाघ हरला तरी लढाईतुन पळ काढत नाही ही गोष्ट अधोरेखित केली होती. आता डरकाळी कणकवलीचा ढाण्या वाघ वैभव नाईकने दिली आहे. नारायण राणेँना पहिल्यांदाच कोणीतरी खुले आव्हान देतोय. नारायण राणे वैभवचे आव्हान स्वीकारुन कुडाळ-मालवण मतदारसंघात निवडणुक लढतात की रणांगण सोडुन पळ काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा