रविवार, ६ एप्रिल, २०१४

...तर मच्छीमारांसाठी दिवसही वै-याचाच असेल…!

             लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी कोकणातही रंगु लागलीय. खर तर मच्छिमारी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसाय आहे. अनेक लोकांची रोजीरोटी मच्छिमारी व्यवसायावर अवलंबुन आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान मच्छिमारांचे प्रश्न अजेंड्यावर घ्यायला हवेत पण मतदारसंघातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र नेमकी याच्या उलट दिसतेय. सत्ताधारी काँग्रेस पक्ष स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना सावत्र वागणुक देताना दिसतोय. सिंधुदुर्गातील स्थानिक मच्छिमार गेली अनेक वर्षे पारंपारिक रापण पद्धतीने मच्छिमारी करुन आपले जीवन सुखाने व्यतित करत होते पण काँग्रेस पक्षाला हे बघवले नाही. 2011 साली काँग्रेसमधील एका नेत्याच्या क्रुपाशीर्वादाने सिंधुदुर्गात पर्सनीट पद्धतीने मच्छिमारी करणा-या  बड्या धेडांनी किनारपट्टीवर धुडगुस घातला. गेली 25 वर्षे निवडणुकांमध्ये आपले बहुमुल्य मत देऊन सिंधुदुर्गातील याच स्थानिक मच्छिमारांनी या नेत्याला 'कोकणचा वाघ' बनवत मंत्रीपद मिळवुन दिले होते. कु-हाडीचा दांडा गोतास काळ ठरावा त्याप्रमाणे मंत्रीपद मिळाल्यानंतर या नेत्याने धनदांडग्या पर्सनीट मच्छिमारांकडुन मिळणा-या आर्थिक लाभापायी स्थानिक पारंपारिक मच्छिमारांवर अत्याचार सुरु केले. गरीब मच्छिमारांनी दिलेल्या मतांच्या उपकाराची जाण नसलेल्या या नेत्याने फक्त पर्सनीट मच्छिमारांकडुन मिळणा-या पैशांखातर पारंपारिक मच्छिमारी संपवुन टाकण्याचे कारस्थान रचले. आपल्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने पारंपारिक मच्छिमारांनी कोर्टात केस दाखल केली. मात्र सत्तेचा माज आलेल्या या नेत्याने कधीही त्या केसचा पाठपुरावा केला नाही. किनारपट्टीवर गंभीर होत चाललेल्या पर्सनीट विरुद्ध पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नी डाँ.सोमवंशी अहवाल तयार केला गेला परंतु काँग्रेस सरकारने तो अहवाल जनतेसाठी खुला न करता दडपुन टाकण्याचे धोरण अवलंबले. पर्सनीट मच्छिमारीमुळे माशांचे बीजच नाहीसे होऊन मरीन इकाँलाँजीला धोका निर्माण झाला आहे. मच्छिमारांवर इतके अत्याचार करुनही काँग्रेसवाले शांत बसलेले नाहीत. त्यांनी जणु काही सिंधुदुर्गातील मच्छिमारी व्यवसाय संपवुन टाकण्याचा ठेकाच घेतलाय. मच्छिमारांच्या द्रुष्टीने त्यांचे पुढचे विनाशकारी पाऊल आहे ते म्हणजे जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प सुरु करण्याचे...! जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मच्छिमारांची एकी झाली तर आपल्याला पळता भुई थोडी होईल याची पुर्वकल्पना असल्याने सिंधुदुर्गातील मच्छिमारांना जैतापुर अणुप्रकल्पापासुन कोणताच धोका नाही हा गैरसमज काँग्रेसकडुन जाणीवपुर्वक पसरवण्यात आलाय. त्यामुळेच एरव्ही प्रत्येक प्रश्नी सजग होऊन आंदोलनासाठी उभे राहणारे सिंधुदुर्गातील मच्छिमार बांधव जैतापुर अणुप्रकल्पाविरोधात कोणतेही आंदोलन करताना दिसले नाहीत. यालाच म्हणतात, काँग्रेसचे तोडा फोडा आणि राज्य करा धोरण...!
           रत्नागिरीसह सिंधुदुर्गातीलच नव्हे तर गोवा राज्यातील मच्छिमारी व्यवसाय पुर्णपणे संपवण्याची क्षमता असलेल्या जैतापुर अणुप्रकल्पप्रश्नी बेफिकीर राहुन चालणार नाही. माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही ना...? तुम्ही तारापुर अणुप्रकल्पानजीक असलेल्या मच्छीमार बांधवांना कधीतरी नक्की भेट द्या. मग माझ्या बोलण्यावर तुम्ही फक्त विश्वासच ठेवणार नाही तर तारापुरमधील मच्छिमार बांधवांची काँग्रेस सरकारने केलेली दुरावस्था पाहुन एक मच्छिमार म्हणून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. जैतापुर अणुप्रकल्पात निर्माण होणारी उष्णता थंड करण्यासाठी समुद्रातुन दररोज 5200 कोटी लीटर पाणी आत घेतले जाईल आणि सहा अणुभट्ट्यांमध्ये फिरवुन निर्माण झालेल्या अतिरिक्त उष्णतेसह पुन्हा ते जैतापुरच्या समुद्रात सोडले जाईल. आता एवढ्या प्रचंड प्रमाणात उष्णता समुद्रात सोडल्यानंतर जैतापुरपासुन सिंधुदुर्गापर्यँत सर्वत्र समुद्राच्या पाण्याचे तापमान किमान 7 अंश सेल्सिअसने वाढणार आहे, असे जैतापुर अणुप्रकल्पाच्या अहवालात नमुद केले आहे. आजकाल ग्लोबल वार्मिँगमुळे तापमानात 1 अंश सेल्सियसने जरी वाढ झाली तरी मासे मरतात. मग जैतापुर अणुप्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याचे तापमान तब्बल 7 पटीने वाढल्यानंतर ह्या वाढलेल्या तापमानात माशांची अंडी टिकतील का...? पिल्ले जगतील का...? माशांची अंडी, पिल्ले जगली नाहीत तर माशांची पैदास कशी होणार...? रत्नागिरी सिंधुदुर्गच्या समुद्रात माशांची पैदासच झाली नाही तर तुमचा उदरनिर्वाह कसा काय चालणार...? शिवाय या पाण्याबरोबर प्रकल्पातील विषारी रसायने समुद्रात सोडली जातील. त्या घातक रसायनांचा परिणाम होऊन अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होतील. जैतापुर अणुप्रकल्पाने समुद्राच्या वाढलेल्या तापमानात बाजारात मागणी असणा-या माशांच्या जातीच्या जाती समुळ नष्ट होऊन स्थानिक मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत . जैतापुर अणुप्रकल्पाच्या भीषण दुरगामी परिणामांचे गांभीर्य समजण्याची किमान बौद्धिक कुवत नसलेले  काँग्रेसचे नेते आपल्या हेकेखोर आणि आततायी व्रुत्तीने सगळ्या मच्छिमार समाजाला विनाशाच्या खाईत लोटत आहे. इतक सगळ धडधडीत वास्तव, मच्छिमारांचा अंधारमय भविष्यकाळ समोर दिसत असताना मच्छिमारांनी काँग्रेस सरकारवर का म्हणुन विश्वास ठेवावा...? शेवटी हा केवळ  मच्छिमारांचा प्रश्न नाही तर त्यांच्यावर अवलंबुन असणारे हजारो इतर व्यावसायिक (वाहतुकदार, सुतार, मेकँनिक, कामगार, इत्यादी) यांचाही प्रश्न आहे.  सर्वात महत्वाचे म्हणजे कोकणचे वैशिष्ठ्य असलेले माशांसारखे पौष्टिक खाद्य जैतापुरच्या विनाशकारी अणुप्रकल्पामुळे कायमस्वरुपी नष्ट होत आहे. पुढच्या पिढीला मासे नाहीसे केले तर ती पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
           एकीकडे जैतापुरचा अणुप्रकल्प सुरु करत मच्छिमारीचा व्यवसाय संपुष्टात आणुन स्थानिक मच्छिमारांना उद्ध्वस्त करायची स्वप्ने पाहत असलेला काँग्रेसचा नेता दुसरीकडे धनदांडग्यांच्या मोठमोठ्या ट्राँलरना अनुदानित तत्वावर डिझेल पुरवताना दिसतोय. मात्र गरिबीत हलाखीचे जीवन व्यतित करणाऱ्या स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करायला यांच्या काँग्रेस सरकारला शक्य होत नाहीये. गेली दहा-बारा वर्षे स्थानिक पारंपारिक मच्छिमार अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करा म्हणुन कंठशोष करतायेत परंतु गरिबाची आर्त हाक सत्तेच्या गुर्मीत बहि-या बनलेल्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना ऐकु येत नाहीये.
           आता बस्स झाल...! मच्छिमारांनी आणखी किती अन्याय सहन करायचा...? आम्हाला पर्सनीट प्रश्नी सुप्रीम कोर्टातील केसचा पाठपुरावा करणारा नेता हवाय...! जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करुन रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील मच्छिमारी व्यवसाय वाचवणारा नेता हवाय...!! स्थानिक पारंपारिक मच्छिमारांना अनुदानित तत्वावर केरोसीनचा पुरवठा करणारा नेता हवाय...!!! एकंदरीतच आम्हाला स्थानिक मच्छिमारांचे प्रश्न आपले समजुन त्यासाठी संसदेच्या सभाग्रुहात लढा देणारा नेता हवाय. सत्ता आणि पदाच्या अहंकाराने माज आलेला काँग्रेसचा नेता नेमका याच्या उलट वागतोय. या लोकसभा निवडणुकीत समस्त मच्छिमार बांधव काँग्रेसविरोधी मतदान करुन काँग्रेसच्या उर्मट नेत्यांचा माज नक्कीच उतरवतील. लोकशाहीत मतदार राजा असतो या विधानावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील. काँग्रेसने इतकी वर्षी लुबाडल्यानंतरही निवडणुक प्रचारकाळातील त्यांच्या भुलथापांना बळी पडुन मच्छिमार बांधव काँग्रेसलाच मत देणार असतील तर मग देवच तुमचे भले करो. शेवटी इतकच सांगेन की येत्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्मधर्मसंयोगाने काँग्रेस पुन्हा निवडुन आली तर मच्छिमारांसाठी फक्त रात्रच नव्हे तर दिवससुद्धा वै-याचाच असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा