रविवार, ६ एप्रिल, २०१४

अखेर पैशांसमोर धारातीर्थी पडली, प्रभुंच्या तत्वांची पुण्याई...!

सुरेश प्रभूंना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याची बातमी २८ फेब्रुवारीला निश्चित झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकांमध्ये असंतोष खदखदु लागला. याआधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सामान्य लोकांनी प्रभूंना उमेदवारी दिली जावी, यासाठी आग्रह धरला होता. मात्र राजकीय दबावापुढे नमते घेत लोकांच्या भावना पक्षश्रेष्ठीँपर्यँत पोहोचवण्यात शिवसेनेचे पदाधिकारी पूर्णतः अयशस्वी ठरले. त्यामुळे त्या सर्व लोकांच्या भावनांना लेखाच्या माध्यमातून शब्दबद्ध करणे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो कारण इकडे प्रश्न फक्त प्रभूंच्या उमेदवारीचा नव्हता. प्रश्न होता तो कोकणच्या विद्वान मतदारसंघाच्या प्रतिष्ठेचा...!
सुरेश प्रभू मतदारसंघात कधीही फिरकत नाहीत असा आरोप सर्वप्रथम विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला गेला. नंतर प्रभूंची उमेदवारी काटायचीच आहे हे निश्चित झाल्यावर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही कॉंग्रेसच्या सुरात सुर मिसळत तेच कारण पुढे करू लागले. विरोधक आणि स्वकीय दोघांनीही प्रभुंवर जनसंपर्क ठेवत नसल्याचे आरोप केले तरी प्रभू नेहमीच चर्चेत राहिले कारण प्रभूंवर निस्सीम प्रेम करणारी कोकणची जनता आजही त्यांच्यासोबत होती. खासदाराचे काम मतदारसंघात येऱ्या-झाऱ्या करत फिरण्याचे नसून संसदेत मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहे. फक्त मतदारसंघाच्याच नव्हे तर देशहिताच्या प्रश्नांवर आपल्या विद्वत्तेच्या जोरावर चर्चा करून उपाय काढण्याचे आहे, ही समज कोकणच्या समंजस जनतेला नाथ पै, मधु दंडवते यांच्या काळापासून मिळाली होती. या सगळ्या गोष्टी सुरेश प्रभूशिवाय अन्य कोणताही उमेदवार करू शकणार नाही याची खात्री असल्यानेच लोकांनी 'प्रभूच खासदार हवे' ही भूमिका लावून धरली. मतदारसंघात फिरायचे काम खासदाराचे नसून त्यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात ही लोकशाहीची मुलभूत रचना संपूर्ण देशात 'विद्वान लोकांचा मतदारसंघ' म्हणून नावाजल्या गेलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सुजाण नागरिकांना होती. अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही सुरेश प्रभूविरुद्ध टिका करायला काहीच हाती लागत नसल्याने 'प्रभू मतदारसंघात फिरत नाहीत', हा प्रचाराचा एकमेव मुद्दा होता. तरी सुद्धा ३ लाख लोकांनी प्रभूंना मत देऊन 'आम्हाला असाच खासदार' हवा या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले. थोडक्यात सांगायचे तर 'खासदार काय असतो आणि त्याचे नक्की काम काय' ही गोष्ट दुर्दैवाने कोकणातील कोणत्याही राजकीय पक्षाला समजलेली नसेल पण मी अभिमानाने सांगू इच्छितो की कोकणच्या आदर्श मतदाराला ती नक्कीच समजली. म्हणूनच प्रभूंना शिवसेनेने उमेदवारी डावलली तेव्हा या विद्वान मतदारसंघातील अनेक सुसंस्कृत लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुरेश प्रभू आपल्या नम्र स्वभावाला अनुसरून शांत राहिले, एवढ्या सुसंस्कृत लोकांचा पाठींबा एक गठ्ठा मते म्हणून सोबत असताना त्यांनी शिवसेना सोडून अन्य पक्षातून निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र प्रभूंना मानणारा वर्ग आजही 'सुरेश प्रभू कुठे आहेत?' हा एकच प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारतोय. एव्हाना प्रभूंच्या समर्थनाशिवाय निवडणूक जिंकणे शक्य नाही याचा साक्षात्कार शिवसेना नेत्यांना झालेला दिसतोय. त्यामुळेच प्रभूंशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता 'प्रभू प्रचाराला येणार' अशी वक्तव्ये केली जातायेत. शिवसेनेने कितीही बेभान होत प्रभूंचे तिकीट कापले असले तरी आजही प्रभूंच्या तत्वांची पुण्याईच शिवसेनेला या निवडणुकीत तारू शकते. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला तर एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही- सुरेश प्रभू ही नक्की काय चीज होती…? राजकारणात सक्रिय नसूनही कोकणातील लोक प्रभुंवर एवढा जीव कशासाठी ओवाळून टाकतात….?? या प्रश्नांच्या उत्तरातच काही प्रमुख गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
सुरेश प्रभुंचे व्यक्तिमत्व हे जनमानसात अफाट बुद्धिमत्ता, उच्चशिक्षण, कटिबद्धता, एखाद्या विषयाची खोलवर असलेली जाण अशा अनेक गोष्टीँसाठी प्रसिद्ध होते. सुरेश प्रभू C.A. परीक्षा देशात अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी 'वातावरणातील बदल' या विषयात जर्मनीतील बर्लिन विद्यापीठाची आणि 'अर्थशास्त्र' विषयात मुंबई विद्यापीठाची Phd मिळवली. याशिवाय B.Com, L.L.B. यांसारख्या पदव्या देखील प्राप्त केल्या. त्यांना लँटिन अमेरिका येथेही डाँक्टरेट पदवी प्राप्त आहे. युनायटेड नेशन्स (UN) सारख्या संघटनेचा सल्लागार म्हणुन त्यांनी भुमिका बजावली. 'राजापुर मतदारसंघ' अवघ्या देशात 'सभ्य आणि विद्वान लोकांचा मतदारसंघ' म्हणुन प्रसिद्ध आहे. सुरेश प्रभू या मतदारसंघाला साजेसे असेच खासदार होते. बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांसारख्या संसदपटुंचा वारसा त्यांनी अतिशय योग्य रितीने जपला होता. गेल्या निवडणुकीत सुरेश प्रभुंचा मतांच्या आकडेवारीत जरी लौकिकार्थाने पराभव झाला असला तरी त्या पराभवातही त्यांचा 'नैतिक विजय' दडलेला होता. मतांच्या घाणेरड्या राजकरणात जे घडते ते नेहमीच खरे नसते. सुरेश प्रभू हे पक्ष, धर्म, जात यांच्या पलीकडे गेलेले उमेदवार होते, हे त्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. पक्ष म्हणुन मतदारसंघात शिवसेनेची पुरती वाताहात झालेली असताना प्रभूंना 3 लाख मतांनी पाडण्याच्या बाता विरोधक करत होते. मात्र प्रत्यक्षात सुरेश प्रभूंचा अवघ्या 46 हजार मतांनीच पराभव झाला. प्रभुंनी प्रचारसभा घेतल्या नव्हत्या किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी दारु, मटणाचे तुकडे, पैसा अशी प्रलोभनेही लोकांना दाखवली नव्हती. तरी सुद्धा 3 लाख 7 हजार मते प्रभुंना मिळाली होती. प्रभूंना मिळालेल्या लोकांच्या अनपेक्षित प्रतिसादाने नारायण राणेसुद्धा अचंबित झाले. कुठुन आली असतील ही मते...? रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघातील तत्ववादी लोकांनी तत्वांच्या पुजाऱ्याला केलेले ते मतदान होते...!
आपल्या अफाट कर्तुत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर एका वेगळ्या उंचीवर पोहोचल्यानंतरही प्रभूंमध्ये असलेला नम्रपणा, सदा हसतमुख चेहरा, साधा-सरळ स्वभाव त्यांना प्रचाराविना मते मिळवुन देण्यास कारणीभुत ठरला. ती मते नव्हतीच मुळी...! प्रभुंच्या असामान्य व्यक्तिमत्वाला कोकणच्या समंजस मतदाराने दिलेला तो आशीर्वादच होता. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याँची आपुलकीने चौकशी करणारे प्रभू; एकीकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्वांनांसोबत डायनिँग रुममध्ये 'लंच' आणि 'डिनर' घेताना, दुसरीकडे मध्यमवर्गीय कुटुंबातही पंगतीत बसुन जेवणारे प्रभू; निवडणुक निकालानंतर विरोधी उमेदवार दंडवतेँचा चरणस्पर्श करणारे प्रभू, राजकरणात अन्यत्र कुठेच पाहायला मिळत नाहीत.
परमेश्वर संकल्पनेवर मतमतांतरे असतील पण मी परमेश्वर पाहिलाय आणि तो सुरेश प्रभूंच्या व्यक्तिमत्वात पाहिलाय. त्यांचा जन्म 'प्रभू' आडनाव असलेल्या कुटुंबात होणे, हा निश्चितच योगायोग नसावा. आज देशासमोरील वीज आणि पाण्याची समस्या उग्र रुप धारण करत आहे. वीजेअभावी खेड्यातील जनता अंधकारमय जीवन जगतेय तर दुष्काळात पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफडुन मरतायेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी साक्षात परमेश्वरानेच प्रभुंची नियुक्ती केली असावी. सौरऊर्जा क्षेत्रात प्रभुंनी केलेल्या अमुलाग्र संशोधनामुळे आज वीजनिर्मितीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत आणि प्रभुंच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होणा-या नदीजोड प्रकल्पामुळे देशातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी मिळणार आहे. मात्र अशा देवमाणसाला लोकसभेची उमेदवारी नाकारुन त्याचे राजकरण संपवण्याचा घ्रुणास्पद प्रयत्न केला गेला. आज रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघालाच नव्हे तर संपूर्ण देशाला सुरेश प्रभुंसारख्या दुरद्रुष्टी असलेल्या नेत्याची गरज होती. संसदेचे पवित्र मंदिर गुंडप्रव्रुत्तीच्या नेत्यांनी भरले आहे. लोकसभेत मिरचीची पुड डोळ्यात मारणारे नेते जावेत यापेक्षा वेगळे दुर्देव ते कोणते...? संसदेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सभ्य खासदार नजरेला पडत नाहीत आणि एखादा खासदार सभ्य असलाच तर त्याच्याकडे विद्वत्ता नसते. सभ्यता आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही गुण ठासुन भरलेला सुरेश प्रभुंसारखा 'दुर्मिळ नेता' माझ्या मतदारसंघात होता, ही किती अभिमानाची गोष्ट...! मात्र आज त्या नेत्यालाच लोकसभेची उमेदवारी नाकारली जावी...? सुरेश प्रभूंच्या उमेदवारीसाठी बहुतेक लोकांनी आपापल्या परिने केविलवाणे प्रयत्न केले. लोकशाहीत मतदार राजा असतो, असे म्हणतात. मग याच मतदाराला एखाद्या पक्षासमोर एवढ हतबल व्हायची वेळ का यावी...? लोकशाहीत आपले बहुमुल्य मत देणाऱ्या मतदाराला आपल्या आवडीचा उमेदवार पक्षाला सुचवण्याचे स्वातंत्र्य अद्याप का मिळालेले नाही...?? या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की, पक्षासमोर मतदार खरच इतका क्षुल्लक ठरतो का...???
सुरेश प्रभुंसारखा खासदार कोकणच्या राजकरणात असायलाच हवा, अशी बहुतांश लोकांची इच्छा होती. मात्र जेव्हा प्रभुंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घ्यायची वेळ आली तेव्हा यातील अनेक जणांनी पक्षाचा अंतर्गत प्रश्न समजुन अलिप्त राहणेच पसंत केले. ज्यांनी कोणी पुढाकार घेतला ते कधीच एकत्र आले नाहीत. या देशात आपापल्या हितासाठी दुर्जनशक्ती नेहमीच एकत्र येतात आणि सज्जनशक्ती अलिप्तच राहतात. सज्जनांच्या या अलिप्ततेमुळेच समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आपल्या आधीची पिढी देखील कोकण रेल्वेचे अशक्यप्राय स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या दंडवतेँसारख्या कर्मयोग्याचा प्रथमतः पराभव होत असताना नामोनिराळीच राहिली आणि त्याचे भीषण परिणाम आज आपल्या पिढीला भोगावे लागतायेत.जेव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दंडवतेँसारख्या निस्प्रुह नेत्याला पराभुत करणाऱ्या मागच्या पिढीला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण करणाऱ्या दुःशासनाची इतिहासकारांनी निंदा केली. त्याचबरोबर ते वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी निमुटपणे पाहणाऱ्या पितामह भीष्मांनांही अपराधी ठरवले. इतिहासाची पुनरावव्रुत्ती होतच असते, फक्त पात्रे तितकी बदललेली असतात. फरक इतकाच की 1991 साली प्रा. मधु दंडवते होते आणि आज 2014 साली त्यांच्या जागी सुरेश प्रभू आहेत. प्रभूंना उमेदवारी नाकारुन कोकणातील सभ्यतेचे राजकरण संपवु पाहणाऱ्या शिवसेनेला भविष्यातील पिढ्या नक्कीच दोषी ठरवतील. त्याच वेळी प्रभुंचे राजकरण संपवले जात असताना स्वस्थ बसणाऱ्या आपल्या पिढीलाही इतिहास कधीच माफ करणार नाही.
अफाट वक्तुत्व आणि परिपुर्ण अभ्यासाच्या जोरावर संसदेत भाषण करुन जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करण्यासाठी कोकणला प्रभूंची नितांत गरज होती पण शिवसेनेने प्रभुंनाच राजकरणातुन संपवण्याचा करंटेपणा केला. पर्यावरण राखुन कोकणचा सर्वाँगीण, समतोल आणि शाश्वत विकास करण्यासाठी पर्यावरणप्रेमी सुरेश प्रभुच कोकणचे खासदार हवे होते पण आता मायनिँग करुन निसर्ग ओरबाडु पाहणाऱ्याना आपण रान मोकळे करुन दिले. एकंदरीत सुरेश प्रभू या नेत्यालाच नव्हे तर पर्यायाने त्यांच्यासोबत कोकणच्या राजकरणातील नैतिकताच आपण संपवुन टाकली. 'कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली' या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आज आपण प्रत्यक्षात उतरवल्या. राजकरणात चांगल्या लोकांचा वावर वाढला पाहिजे यावर आपल्यातील अनेकजण व्याख्याने देताना दिसतात. मग आज याच लोकांसमोर प्रभुंसारख्या चांगल्या नेत्याच राजकरण संपवल जात असताना ही मंडळी गप्प का...? सुरेश प्रभुंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी ज्या सज्जन लोकांनी प्रयत्न केले त्यांनी हताश व्हायची काहीच गरज नाही. उमेदवारी कोणाला द्यावी हा जरी सर्वस्वी एखाद्या पक्षाचाच प्रश्न असला तरी कोणत्या उमेदवाराला मत द्यावे हे मतदारांच्या हातात आहे. येत्या निवडणुकीत संविधानाने नकाराधिकाराचा अधिकार आपणा सर्वाँना बहाल केला आहे. सुरेश प्रभूंसारखा सज्जन उमेदवार जर यादीत नसेल तर नकाराधिकाराचा वापर आपण सर्वजण करु शकतो. उमेदवाराची निवड करताना आपण कोणाला डावलत आहोत याचे किमान भान नसलेल्या आपमतलबी पक्षांना लोकशाहीत मतदारच श्रेष्ठ असतो हे दाखवुन देण्याची नकाराधिकार (NOTA) ही सुवर्णसंधी असेल.
लेखाचा शेवट करताना महान तत्ववेत्ता कार्लाइलच्या त्या जगप्रसिद्ध वाक्याची आठवण करुन देतो. कार्लाइल म्हणाला होता की-
"खुज्या माणसांच्या सावल्या जेव्हा वाढु लागतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली असे समजावे."
कोकणच्या राजकरणात खुज्या नेत्यांच्या सावल्या अगोदरच इतक्या वाढलेल्या आहेत की कोकणचा अस्त मला नजीक भासु लागलाय. सुरेश प्रभुंसारख्या सभ्य नेत्याच्या राजकीय अस्तानंतर त्या सावल्या आणखीनच जोमाने वाढतील. मात्र कोकणास्त होऊ देण आपल्यापैकी कोणालाच परवडणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा