रविवार, ६ एप्रिल, २०१४

प्रभु सर्वत्र पुज्यते...!



"प्रभु सर्वत्र पुज्यते...!"

काल 27 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये भारताचे आर्थिक धोरण ठरवण्यासाठी अधिवेशन घेण्यात आल. भाजप पक्षात विचारवंतांची कधीच कमी नव्हती पण जेव्हा एनडीएचे आर्थिक धोरण ठरवायची वेळ आली तेव्हा भाजपने कमिटी स्थापन करुन शिवसेनेच्या सुरेश प्रभुंनाच त्या कमिटीच अध्यक्षपद दिल. देशातील आणि जगातील नामवंत अर्थतज्ञांसोबत एनडीएच आर्थिक धोरण ठरवण्यात आल आणि त्यात सिँहाचा वाटा माझ्या मतदारसंघातुन चार वेळा निवडुन गेलेल्या सुरेश प्रभूंचा होता याचा एक कोकणी म्हणुन मला सार्थ अभिमान राहिल. बर्लिन आणि मुंबई विद्यापीठाची पीएचडी, लँटिन अमेरिकेची डाँक्टरेट, चार्टड अकाऊटंट, एल एल बी इतक्या पदव्या हातात असताना सुरेश प्रभुंना राजकरणात यथायोग्य सन्मान मिळण यात नवल काहीच नाही. मात्र दुर्देवाने शिवसेनेन लोकसभेची उमेदवारी नाकारुन सुरेश प्रभुंचा अपमान केला आहे. कोणतेही सामाजिक कार्य नसणा-या धुत आणि काकडेँना राज्यसभेतुन खासदार केले आणि प्रभुंना लोकसभेतुन उमेदवारी नाकारली याचे नेमके कारण काय असेल...? यामागे खरच काही तर्कशास्त्र आहे की नुसतच अर्थशास्त्र आहे...??
पक्षाची वैचारिक बाजु सांभाळण्यासाठी एका विचारवंताची गरज असते आणि बाळासाहेबांनी दिलेली ही जबाबदारी प्रभुंनी इतकी वर्षे प्रामाणिकपणे पार पाडली. नाहीतर सपा, बसपा प्रादेशिक पक्षांसारखा शिवसेनेलाही राष्ट्रीय पातळीवर विद्वान नेता लाभला नसता. कदाचित बाळासाहेबांच्या पश्चात एकापेक्षा एक विद्वान विभुतीँनी पक्षात अवतरल्याने प्रभुंचीही पक्षातील गरज संपली असावी.

ऊर्जा आणि पाणी या देशातील दोन महत्वपुर्ण विषयांवर प्रभुंएवढ्या अधिकारवाणीने बोलणारा अन्य नेता संपुर्ण देशात सापडणार नाही. म्हणुनच भाजपने देशाचे आर्थिक धोरण बनवण्याची महत्वपुर्ण जबाबदारी प्रभुंकडे दिली. याअगोदरही वाजपेयीँच्या काळात एनडीए सरकारने प्रभुंकडे ऊर्जा आणि पर्यावरण अशी प्रमुख मंत्रीपदे देऊन विश्वास दाखवला होता. देशातल्या सर्वोत्क्रुष्ट काम करणा-या मंत्र्यांच्या यादीत स्थान मिळवुन प्रभुंनी तो सार्थ ठरवला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा मसुदा तयार करुन गावागावांना जोडणारे सुरेश प्रभुच होते. पर्यावरण मंत्री असताना प्रभुंनी प्रकल्पांसाठी जनसुनावणीचा कायदा लोकांना उपलब्ध करुन दिला. त्या कायद्यामुळेच निदान आपण एखाद्या विनाशकारी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करुन जनसुनावणीने लोकांचा विरोध सरकारला दाखवु शकतोय. जेव्हा कर्नाटक, गोवा आणि सिँधुदुर्गच्या पट्ट्यात मायनिँग सम्राटांनी धुडगुस घातला तेव्हा वनसंज्ञेची तरतुद करुन जंगले वाचवु पाहणारे प्रभुच होते. पर्यावरणाचा असाच विध्वंस सुरु ठेवला तर भारतातील हरितक्षेत्र कमी होऊन निसर्गाचा समतोल ढासळेल यासाठी देशातील वनव्याप्त भाग इको-सेँसिटीव्ह करण्याची सुचना प्रभुंनी केली. आपल्या नेत्याची भुमिका सामान्यांपर्यँत पोहोचवणे हे पक्षाच्या कार्यकर्त्याँचे काम असते. मात्र प्रभुंच्या भुमिका समजु शकण्याची कुवत असलेला कार्यकर्ता त्यांना दुर्देवाने कधी मिळालाच नाही. सिँधुदुर्गातील काँग्रेसमधील अशिक्षित नेत्यांनी इको सेँसिटीव्ह झोनचा बागुलबुवा केला आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्याच सुरात सुर मिळवुन इको सेँसिटीव्ह झोनला विरोध केला. काँग्रेसच्या पावलांवर पाऊल ठेवत गाडगीळ-कस्तुरीरंगन अहवालाची होळी केली. सांगायची गोष्ट एवढीच की निलेश राणेँना पाडुन शिवसेनेचा उमेदवार निवडुन आणलात तरी मायनिँगने पर्यावरणाचा विध्वंस असाच सुरु राहणार.

वाजपेयीँनी प्रभुंवर नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्षपद देऊन महत्वपुर्ण जबाबदारी दिली होती. एनडीए सरकार आल्यास प्रभुंनी ती पार पाडावी. दुष्काळाची तीव्रता पाहता भविष्यात पाण्यासाठी तिसर महायुद्ध होईल आणि ते टाळण्याची कुवत फक्त नदीजोड प्रकल्पात आहे.

मधल्या काळात ऊर्जेचे नुतनीकरण स्त्रोत असलेल्या सौरऊर्जा क्षेत्रात प्रभुंनी अमुलाग्र संशोधन केल आहे. अणुऊर्जेचे विनाशकारी रुप जगाने पाहिले आहे, औष्णिक ऊर्जा अगोदरच बदनाम आहे, अशा परिस्थितीत देशाची वाढती वीजेची गरज भागवण्यासाठी प्रभुंनाच पुढाकार घ्यावा लागेल.

सुरेश प्रभुंसारखा अवलिया नेता आज संसदेत हवा होता पण पैशांच्या घाणेरड्या राजकरणाचा तो बळी ठरला. उमेदवारी मिळवण्यासाठी मतदारसंघात लाँबिँग करुन शक्तीप्रदर्शन करायची नवी पद्धत राजकरणात रुढ होतेय. मात्र आपली उमेदवारी हातातुन जात असतानाही शेवटपर्यँत प्रभुंनी लाँबिँगचा आधार घेतला नाही. तिकीट मिळाले नाही तर एका पक्षातुन दुस-या पक्षात उड्या घेणा-या बंडोबांना पेव फुटतो. शिवसेनेत होणारा अन्याय प्रभुंनी निमुटपणे सहन केला पण बाकीचे पक्ष एका पायावर तिकीट घ्यायला तयार असतानाही त्यांनी निवडणुक मात्र लढवली नाही. यासंदर्भात विचारणा केली असता प्रभु म्हणाले की "चार्टड अकाऊंटट म्हणुन व्यवसाय चांगला सुरु असताना फक्त बाळासाहेबांनी विचारणा केली म्हणुन समाजसेवा करण्यासाठी मी शिवसेनेतर्फे राजकरणात आलो. ज्या दिवशी राजकरणात आलो त्या दिवशी खासदार झालो आणि ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशी मंत्रीही झालो. उमेदवारीसाठी एका पक्षातुन दुस-या पक्षात उड्या मारायला राजकरण माझा धंदा नव्हे. यापुढेही शक्य तितक्या मार्गाँनी देशाची सेवा करुन भारताला महासत्ता बनवणे एवढे एकच माझे लक्ष्य राहिल."

आता अन्य पक्षातुन एखादा सभ्य आणि विद्वान उमेदवार उभा राहतो का याची मी वाट बघणार. अन्यथा प्रभुंना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मी निवडणुकीत नकाराधिकाराचा वापर करणार. काँग्रेस नको असेल तर आम्ही देऊ तोच उमेदवार झक मारत स्वीकारा ही हुकुमशाही कोकणची समंजस जनता कधीच खपवुन घेणार नाही. तसही शिवसेनेतुन लोकशाही संपवल्याची घोषणा त्यांच्या पक्षप्रमुखांनी केलीच आहे आणि आता प्रभुंवर प्रेम करणारी जनताच मतदानातुनच शिवसेनेला उत्तर देईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा