रविवार, ६ एप्रिल, २०१४

कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा...

रत्नागिरी-सिँधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊतांसमोर जाहिर पाठिँब्यासाठी मी घातलेल्या अटी-

"कोकणचे सर्वाँगिण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी वचननामा..."

1) बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या सभ्य आणि सुसंस्क्रुत नेत्यांची परंपरा लाभलेल्या रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात गुंडगिरी करुन दहशत माजवणार नाही, राडेबाजीला प्रोत्साहन देणार नाही. देशात सभ्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मतदारसंघाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे वर्तन मी करणार नाही.

2) आजही जिल्ह्यातील लोकांना उपचारांसाठी गोवा, बेळगाव, कोल्हापुरवर अवलंबुन राहावे लागते. जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालय उभारुन यावर कायमचा तोडगा काढेन.

3) विद्यार्थ्याँना शिक्षणासाठी नाइलाजाने मुंबई, पुणे, कोल्हापुरसारख्या शहरात जावे लागते. हे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केँद्र उभारेन आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणा-या सर्व पुस्तकांची भव्य ग्रंथालय उभारुन सोय करुन देईन.

4) उष्णता निर्माण करुन आंबा उत्पादकांचे नुकसान करणारे औष्णिक प्रकल्प मतदारसंघात येऊ देणार नाही. वीजेची गरज भागवण्यासाठी देवगडच्या पवनचक्की प्रकल्पाला मदत करुन त्याच धर्तीवर मतदारसंघात अन्य ठिकाणी तत्सम नुतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती करेन.

5) माझ्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याच्या राजकरणात आणुन घराणेशाही करण्याचा प्रयत्न करणार नाही.

6) सुरेश प्रभुंप्रमाणेच गौणखनिजधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी खासदारकीही पणाला लावेन.

7) मात्र कोकणच्या पर्यावरणाचा विध्वंस करणा-या कळणे मायनिँगसारख्या विनाशकारी प्रकल्पांना कडाडुन विरोध करेन. झोळंबे, असनिये, डोँगरपाल, सातार्डा, इत्यादी गावात प्रस्तावित असलेले मोठे मायनिँग प्रकल्प तातडीने रद्द करुन घेईन. त्याबरोबर भविष्यात अन्य गावात असे मोठे मायनिँग प्रकल्प अजिबात येऊ देणार नाही.

8) मी मतदारसंघात आणलेल्या एखाद्या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असेल तर कोणत्याही प्रकारे दमदाटी न करता, जनभावनेचा आदर करुन मी तो प्रकल्प रद्द करेन.

9) सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांना आवश्यकतेपेक्षा जास्त जमिनी घेऊन स्थानिकांना अक्षरशः लुबाडण्यात आले आहे. खासदार झाल्यावर प्रकल्पांसाठी आवश्यक तेवढीच जमिन घेऊन इतर जागा पुन्हा स्थानिकांकडे सुपुर्त करेन.

10) वेळाघरसारख्या ठिकाणी कित्येक वर्षापुर्वी भुसंपादन करुन अद्याप कोणताही प्रकल्प उभारलेला नाही. अशा पडीक जमिनी स्थानिकांना परत करेन.

11) धरणांसाठी यापुर्वी संपादित केलेल्या जमिनीत जोपर्यँत धरणे बांधुन पुर्ण होत नाहीत, तोपर्यँत नवीन धरणांसाठी जमिनी संपादित करणार नाही.

12) मतदारसंघामध्ये आणलेल्या नवीन उद्योगांमध्ये जनहिताव्यतिरिक्त माझा वैयक्तिक अथवा व्यावसायिक कोणताही स्वार्थ नसेल.

13) स्थानिक उद्योजकांशी स्पर्धा करुन किँवा त्यांच्या उद्योगांच्या ठिकाणी जाळपोळ करुन, सामान्य उद्योजकाला नेस्तनाबुत करत, माझे किँवा माझ्या समर्थकांचे उद्योग स्थापन करण्याचे मनसुबे मी कधीही बाळगणार नाही.

14) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्षातुन निवडुन आलेल्या उमेदवारांना, पैशाचे आमिष अथवा धाक दाखवुन माझ्या पक्षात आणत, राजकरणातील नैतिकता वेशीवर टांगण्याचे पाप मी कधीही करणार नाही

15) सिँधुदुर्ग जिल्हा 1997 साली देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित करुनही पर्यटनाच्या बाबतीत अद्यापही मागासलेलाच आहे. पर्यटन ही रोजगारांची जननी आहे. गोवा राज्याच्या धर्तीवर सिँधुदुर्गचा पर्यटन विकास करुन पर्यटनाभिमुख रोजगार निर्माण करण्यास मी प्राधान्य देईन.

16) महायुतीची सत्ता आल्यास तातडीने जैतापुरचा विनाशकारी अणुप्रकल्प रद्द करणे हे माझे परमकर्तव्य राहिल. यात अपयशी ठरलो तर खासदारकीचा त्याग करेन.

17) मळगावलाच कोकण रेल्वेचे टर्मिनस उभारेन. कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवतेँविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे नामकरण 'प्रा.मधु दंडवते रेल्वे टर्मिनस' असे करण्यात येईल.

18) वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी माझी राहिल.

19) मतदारसंघाच्या शाश्वत, सर्वाँगिण आणि समतोल विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिन.

20) सिँधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याची वीजेची गरज फक्त 500 M.W. असताना प्रत्यक्षात 5500 M.W. वीजनिर्मिती या दोन्ही जिल्ह्यातुन केली जाते. त्यामुळे खासदार झाल्यावर सिँधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हे लोडशेडिँगमुक्त करेन.

21) गेल्या वर्षी दुष्काळाची झळ कोकणलाही बसली. आदरणीय सुरेश प्रभू देशभरात नदीजोड प्रकल्प राबवुन दुष्काळाच्या समस्येवर उपाय काढत आहेत. माझ्या मतदारसंघात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणांची संख्या वाढवली तर पुराची भीती राहिल. त्यामुळे धरणे वाढवण्याच्या फंदात न पडता पोपटराव पवारांचे मार्गदर्शन घेत ओहोळ आणि नद्यांवर बंधारे बांधुन भुजलपातळी वाढवत पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यावर माझा अधिक भर राहिल.

22) सर्वात महत्वाचे म्हणजे वर नमुद केलेल्या अटीँपैकी कोणत्याही एका अटीची पुर्तता करण्यात काही कारणाने जर मी अपयशी ठरलो तर माझ्यावर जाहिर टिका करण्याचा पुर्ण अधिकार मतदारसंघातील पत्रकारांना आणि सजग नागरिकांना आहे. एवढेच नव्हे तर माझ्या अपयशाची पुर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी तात्काळ खासदारकीचा राजीनामा देईन आणि पुन्हा कधीही एक उमेदवार म्हणुन तुमच्याकडे मत मागायला येणार नाही.

(आयुष्यात तडजोडी करण मला माहित नाही. यापैकी एखादी अट जरी राऊतांना मान्य नसेल तर मी त्यांच्या विरोधातच प्रचार करेन. फक्त आमच्या वादात काँग्रेसचा फायदा होऊ नये म्हणुन विनायक राऊतांना सशर्त पाठिँबा देण्याचा निर्णय घेतला.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा