रविवार, ६ एप्रिल, २०१४

कसे पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली...

भविष्यात सुरेश प्रभू राज्यसभेतुन खासदार होऊन मंत्री होतात कि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होतात, हे येणारा काळच ठरवेल पण या महान नेत्याची कोकणच्या सक्रिय राजकरणातुन कायमची निव्रुत्ती झाली एवढ मात्र नक्की...! पैशाने उन्मत झालेले सत्तापिपासु गोचिड प्रभुंना पुन्हा कोकणच्या राजकरणात येऊ देतील अस वाटत नाही. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू हे कोकणचे मानबिँदु होते आणि यापुढेही राहतील. जेव्हा कधी कोकणच्या राजकरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ही तीन नावे सर्वात वर सुवर्णाक्षरांनी कोरलेली दिसतील मात्र दुर्देवाने आज त्यांच्या महान सुवर्णपर्वाचा अस्त झाला.
असे म्हणतात, युधिष्ठिराने जेव्हा सर्वप्रथम 'नरोवा कुंजरोवा' अर्धसत्यकथन केले, तेव्हा त्याच्या रथाची चाके प्रथमतः जमिनीला टेकली. आज आमच्या कोकणच्या विद्वान मतदारसंघाचीही तीच अवस्था झालीय. भविष्यात आम्ही ताठ मानेने विद्वान मतदारसंघाचा वारसा सांगु शकणार नाही. अर्धशिक्षित आणि गुंडप्रव्रुत्तीच्या नेत्यांची नावे तोँडात घेताना आमची सर्वाँचीच मान शरमेने झुकेल. मनात कुठेतरी प्रभुंची आठवणही येईल, चुकचुकल्यासारखे वाटेल, पश्चाताप होईल पण त्यावेळी सुरेश प्रभू कोकणच्या राजकरणात नसतील. फारफार तर काँग्रेसचे गुंड बाजुला होऊन शिवसेनेचे गुंड राज्य करतील पण यापुढे आपले नेते मात्र गुंडप्रव्रुत्तीचेच असतील. बिहारच्या राजकरणालाच हसताना 'कोकणचा बिहार' कधी बनला, कोणाच्याच लक्षात आल नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही अर्धशिक्षित गावंढळ उमेदवारांकडुन एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या जातील, तेव्हा कुठे लोकांना तोँडातुन एकही अपशब्द न उच्चारता मुद्द्यांवर भाषण करणारे सुरेश प्रभु आणि मधु दंडवते आठवतील. एखाद्या पिढीची जशी लायकी असते तसेच नेते त्यांच्या नशीबी येतात. आमच्या आधीच्या पिढ्यांनी निवडणुकीच्या बाजारात तत्वांची किँमत केली नाही, त्यामुळे त्यांच्या नशीबी नाथ पै, मधु दंडवते आणि सुरेश प्रभू आलेत. आपल्या नशीबी दोन अर्धशिक्षित उमेदवारांपैकी एकाची निवड करणे तेवढे शिल्लक राहिले आहे.
नाथ पै साहेब, दंडवते साहेब बघताय ना तुमच्या मतदारसंघाकडे...! आम्ही तुमची इतक्या वर्षांची परंपरा कायमची संपुष्टात आणली आहे. बर झाल हे दिवस पाहण्याअगोदर तुम्ही या जगाचा निरोप घेतलात. तुमच्याने हे बघवले नसते. आजही स्वर्गात तुमच्या पवित्र आत्म्याला नक्कीच वेदना होत असतील पण काय करणार हेच कोकण राजकरणातील विदारक आणि भयाण वास्तव आहे. राजकरणातील नैतिकता वेशीला टाकुन आम्ही कोकणास्ताच्या उंबरठ्यावर येऊन थांबलोय.
सभ्य, सुसंस्क्रुत आणि विद्वान म्हणुन देशात नाही तर जगभरात नावाजलेल्या सुरेश प्रभुंसारख्या अवलिया नेत्याच्या राजकीय कारकीर्दीचा समारोप तशाच थाटात व्हायला हवा. सुरेश प्रभूंच्या निरोपासाठी खास ठेवणीतले शब्द वापरुन हा लेख मी लिहीला. लेख लिहिताना जड अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी सुरेश प्रभुंना एवढच सांगावस वाटतय. यापुढेही कोकणात किती नेते येतील आणि किती नेते जातील पण एक खासदार' म्हणुन नेहमीच तुमची प्रतिमा आमच्या ह्रुदयात कोरलेली राहिल. जेव्हा कधी खासदारच्या कर्तव्याची आम्हाला जाणीव होईल तेव्हा ओठी आपसुक शब्द येतील-
"प्रभू जी, तुम ही नाथ हमारे"

प्रभू सर, तुम्ही इतकी वर्षे उत्क्रुष्ट संसदपटु बनुन माझ्या मतदारसंघाची दिल्लीत आन-बान-शान कायम राखली. सर्वप्रथम तुमच्या या वैभवशाली कारकिर्दीला सलाम...!
उमेदवारी हिसकावुन घेतली जात असताना तोँडातुन चकार शब्द न काढता सगळ दुःख निमुटपणे एकाकी सहन करणा-या तुमच्या संवेदनशील मनाला सलाम...!
उमेदवारी डावलल्यानंतर अनेक पक्षांच्या आँफर समोर असताना, निवडणुक लढवेन तर बाळासाहेबांच्या शिवसेनेतुन अन्यथा राजकरण संपवेन, असे म्हणुन बंडखोर नेत्यांना नितीमत्तेचा धडा शिकविणा-या तुमच्या बाळासाहेबांवरील निष्ठेला सलाम...!
एकंदरीतच अनेक गुणांनी बहरलेल्या आणि तत्वांशी तडजोड न करणा-या तुमच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाला, जगात नावाजलेल्या कर्तुत्वाला माझा सलाम... सलाम... आणि फक्त सलाम...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा