मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षणातुन साकारेल रोजगाराचे वैभव..

शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील तरुणांना MPSC, UPSC, बँक आँफिसर्स आणि क्लर्क भरती, डी.एड भरती, इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने कायमस्वरुपी प्रशिक्षण केँद्र कुडाळात निर्माण करण्यात आले आहे, ही बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या वैभव नाईकच्या निर्णयाला मनापासुन दाद द्यावीशी वाटली. सिँधुदुर्गच्या निर्मितीवेळी 'चाकरमान्यांच्या मनीआँर्डरवर जगणारे लोक' अशी जिल्ह्याची प्रतिमा तयार झाली होती. आज 30 वर्षानंतर मनीआँर्डची जागा एटीएमने घेतली तरीही आपले विद्यार्थी शिक्षण आणि नोकरी यांकरिता अजुनही मुंबई, पुणे, बेँगलोर सारख्या शहरांवर अवलंबुन राहावेत ही या जिल्ह्याचीच नव्हे तर सिँधुदुर्गच्या तमाम जनतेची विटंबना आहे. या परिस्थितीला कारणीभुत आहे ती शैक्षणिक विकासाच्या बाबतीत उदासीनता दाखवणारी सिँधुदुर्गातील नेतेमंडळी...! जिल्ह्यात गुणवत्तेची कमी असती तरी या उदासीनतेला माफी देता आली असती, परंतु स्वतंत्र कोकण बोर्डाची स्थापना झाल्यावर दहावीच्या निकालात दरवर्षी महाराष्ट्रात आपण आघाडीवर आहोत. 'लातुर पँटर्न' मागे पडुन आता 'सिँधुदुर्ग पँटर्न' अस्तित्वात येऊ लागलाय. मात्र दुर्देवाने गुणवत्ता ठासुन भरलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्याँना दहावीनंतर सिँधुदुर्गातील अपु-या शैक्षणिक सुविधांमुळे मोठ्या शहरांचा आश्रय घ्यावा लागतोय. दरवर्षी हजारो विद्यार्थी जिल्हा सोडुन स्थलांतरित होतायेत आणि त्याच वेळी दरडोई उत्पन्न वाढल्याचे आकडे आपण अभिमानाने मिरवतोय. लोकसंख्या स्थलांतरित होऊन कमी झाली की दरडोई उत्पन्न वाढणारच हा साधा हिशोब आहे. त्यात करुन सिँधुदुर्गात एकीकडे मुठभर लोकांकडे करोडोँची संपत्ती एकवटली आहे तर दुसरीकडे बहुतांश लोक हलाखीच्या परिस्थितीत जगतायेत. अशा वेळी दरडोई उत्पन्नाचे आकडे दाखवुन जिल्ह्याचा विकास झाला असे सांगणे किती उचित ठरेल...? सध्याच्या स्पर्धात्मक युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी नुसती शैक्षणिक पदवी असुन भागत नाही तर प्रत्येक ठिकाणी 'स्पर्धा परीक्षा' पास होणे अनिवार्य बनले आहे.
मुंबई, पुण्यासारख्या शहरात मध्यम गुणवत्ता असलेली मुले मोठमोठे क्लास लावुन स्पर्धा परीक्षात यश मिळवण्याचे तंत्र शिकुन घेतात. मात्र सिँधुदुर्गातील गुणवान विद्यार्थ्याँना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षणच भेटत नसल्याने अपयशाला सामोरे जावे लागते. तीन वर्षापुर्वी डी-एड भरतीत 589 पैकी केवळ 14 जागा सिँधुदुर्गातील विद्यार्थ्याँना मिळाल्या. याला कारण त्यांना स्पर्धा परीक्षांचे मिळालेले अपुर्ण प्रशिक्षण होते. मात्र समस्येच्या मुळाशी न जाता परजिल्ह्यातुन सिँधुदुर्गात निवड होत नोकरी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याँना मारझोड करत सिँधुदुर्गाच्या डी.एड. भरतीतील अपयशावर पांघरुण घालण्यात आले. आजपर्यँत सिँधुदुर्गातील किती विद्यार्थी जिल्ह्यात राहुन MPSC, UPSC, राष्ट्रीयक्रुत बँकांसारख्या परीक्षांमध्ये पास होऊन उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत...? या प्रश्नाच उत्तर कोणी देणार आहे का...?? इतक्या वर्षात सिँधुदुर्गात आपण स्पर्धा-परीक्षा केँद्र निर्माण करु शकलो नाही याची विकासाच्या बाता मारणा-यांना खर तर लाज वाटली पाहिजे.
शिक्षणाच्या बाबतीत दयनीय अवस्था असल्याने जिल्ह्यात वैभव नाईकने उभारलेल्या स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केँद्राचे महत्व आणखीनच वाढते. आजही गावागावात क्रिकेट स्पर्धाँनी उच्छाद मांडलेला दिसतोय. खासदार चषक, आमदार चषक अशा गोँडस नावाखाली क्रिकेटच्या स्पर्धाँवर दरवर्षी नाहक लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. क्रिडा विकासाला माझा मुळीच विरोध नाही. जिल्ह्यातुन चांगले खेळाडु किँवा अगदी क्रिकेटर तयार झाले तर मला आनंदच होईल पण ते खेळाडु तयार करण्याऐवजी लाखो रुपयांची बक्षीसे देऊन त्यांना आपापसात झुंजवुन करमणुक करुन घेणे हा उपाय नक्कीच नाही. या स्पर्धाँमध्ये सामील होणा-या किती खेळाडुंना क्रिकेटचे योग्य तंत्र अवगत असते...? त्यापेक्षा हेच लाखो रुपये खर्च करुन एखादे क्रिकेट प्रशिक्षण केँद्र आणि राष्ट्रीय स्तराचे स्टेडियम उभारुन रमाकांत आचरेकरांसारखे गुरुवर्य उपलब्ध करुन दिल्यास भविष्यात सिँधुदुर्गात देखील चांगले क्रिकेटर निर्माण होतील. मात्र क्रिकेटच्या स्पर्धाँना भरघोस बक्षीसे प्रायोजित करुन निवडणुकांच्या वेळी गावोगावी कार्यकर्ते निर्माण करायचे उपटसुंभ धंदे सध्या सर्रास सुरु आहेत.
एक अख्खीच्या अख्खी पिढी क्रिकेटच्या नादी लावुन बिघडवायला या अशा स्पर्धाँना पैसे पुरवणारी नेतेमंडळी कारणीभुत आहे. लोकांनी सर्वप्रथम अशा स्पर्धा भरवणा-या नेत्यांनाच निवडणुकीत अद्दल घडवली पाहिजे म्हणजे वाट चुकुन भरकटलेली तरुण पिढी योग्य रस्त्यावर येईल. एखाद्या नेत्याच्या नादी लागुन त्याचा कार्यकर्ता म्हणुन मिरवत क्रिकेटच्या स्पर्धा खेळुन आपले आणि आपल्या परिवाराचे आयुष्य बरबाद करणा-या तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांचे महत्व समजावुन द्यायला हवे. त्याद्रुष्टीनेच स्पर्धा परीक्षांचा जिल्ह्यात प्रसार करण्याच्यासाठी अशी प्रशिक्षण केँद्रे उभारणा-या वैभव नाईक सारख्या तरुण नेत्याला राजकरणापलीकडे जाऊन आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पाठबळ द्यायला हवे. जैतापुरसारखा विनाशकारी अणुप्रकल्प कोकणच्या माथी मारताना त्यात वीस हजार लोकांना रोजगार मिळेल असे आमिष दाखवण्यात येत आहे. अणुप्रकल्पात चांगल्या पदावर नोकरी मिळवण्यासाठी फिजीक्स विषयात उच्च शिक्षण मिळवणे आवश्यक असते. सिँधुदुर्गात फिजीक्समधील उच्च शिक्षणाची सोय फारच कमी ठिकाणी उपलब्ध आहे.
त्यामुळे जैतापुर अणुप्रकल्पात कोकणातील लोकांच्या तोँडाला पाने पुसुन पुन्हा परप्रांतियांनाच नोक-या देण्यात येतील. त्याच वेळी गरम पाणी समुद्रात सोडल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील मच्छिमार आणि किरणोत्सारामुळे आंब्याचे व्यापारी देशोधडीला लागतील. मग असला विनाशकारी विकास काय कामाचा...? 2009 च्या निवडणुकीत आयटी पार्कचे दिलेले आश्वासन सत्ताधा-यांनी पुर्ण केले असते तर ख-या अर्थाने सिँधुदुर्गातील लोकांना रोजगार प्राप्त झाला असता पण निवडणुका जिँकल्यावर आयटी पार्कचे आश्वासन हवेतच विरले. सी-वर्ल्ड प्रकल्प रोजगार मिळवुन देण्याच्या द्रुष्टीने आदर्शवत असाच होता पण त्या प्रकल्पासाठीही 230 एकर जमिनीची गरज असताना वाढीव 1350 एकर जमीन जागा जबरदस्तीने लाटण्याच्या प्रयत्नात सिँधुदुर्गच्या विकासाची पाटी शेवटी कोरीच राहिली. सिँधुदुर्गातुन शहरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातच रोजगारांची उपलब्धता करुन देणे आणि स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षण केँद्रे जिल्ह्यात स्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी राजकीय हेवेदावे विसरुन युवा वर्गाच्या उद्धारासाठी सर्वपक्षीय एकी दाखवली गेली पाहिजे.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केँद्रात शहरांच्या धर्तीवर उच्च प्रतीचे शिक्षण देणारे किमान 10 ते 12 शिक्षक कायमस्वरुपी ठेवले पाहिजेत. विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके, संदर्भ-ग्रंथ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे लागतील. त्यासाठी किमान आठ लाख पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय स्पर्धा परीक्षा केँद्रासोबत तयार करावे लागेल. प्रशिक्षण केँद्रातच बसुन ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर करुन अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्याँना स्वतंत्र अभ्यासिकांची सोय करुन द्यावी लागेल. पुन्हा या सगळ्या सोयी माफक दरात विद्यार्थ्याँना उपलब्ध करुन द्याव्या लागतील आणि हेच वैभव नाईकसमोर मुख्य आव्हान असेल. जिल्ह्यातील बाकीची नेतेमंडळी शिक्षण विकासाच्या बाबतीत हातावर हात धरुन उदासीन असताना, जिल्ह्यातुन 100 विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण करुन आणण्याचा मानस जेव्हा वैभव व्यक्त करतो, तेव्हा त्याच्या धैर्याला सलाम करावासा वाटतो. पुढील काळात खेकडा प्रव्रुत्तीचे प्रदर्शन न करता सगळेच वैभव नाईकला या प्रयत्नात साथ देतील आणि भविष्यात सिँधुदुर्गातुन प्रशासकीय अधिकारी निर्माण होऊन 'वैभवमय' अशी पहाट उगवेल ही अपेक्षा व्यक्त करुन इथेच थांबतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा