बुधवार, ३ जुलै, २०१३

दिग्दर्शक सतीश राजवाडे : प्रेमाचा खराखुरा अविष्कार


करियरच्या सुरुवातीलाच असंभव, अग्निहोत्र, गुंतता ह्रुदय हे अशा मालिकांमधुन दणक्यात पदार्पण करणा-या दिग्दर्शक सतीश राजवाडेँना खरी ओळख करुन दिली ती "मुंबई-पुणे-मुंबई" या अत्यंत फ्रेश अशा प्रेमकथेनेच...! त्यानंतर राजवाडेँनी कधी मागे वळुन पाहिलेच नाही.
मुंबई-पुणे-मुंबई या सुपरहिट चित्रपटात राजवाडे तरुण पिढीला सांगतात की, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला 'पर्याय' मिळत नसतो आणि ती गोष्ट जर दस्तरखुद्द 'प्रेम' असेल तर मग नाहीच नाही...!! बुट, चपला, कपडे या गोष्टी आपल्याला हव्या तशा मिळतात. जर मिळाल्याच नाहीत तर आपण त्या हव्या तशा तयार करुन घेऊ शकतो पण प्रेमाच तस नसत. प्रेमाची अजुन एक गंमत असते, ती म्हणजे ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्याशीच सर्वात जास्त भांडतो. ज्या माणसाने आपल्या आयुष्यातुन कधीही निघुन जावु नये किँवा जो माणुस आपल्या आयुष्यातुन निघुन गेला तर आपल्याला खुप त्रास होईल अस वाटत... आपल्याला जाणवत... त्याच्याशीच आपण खुप भांडतो...!!! प्रेमाची पुढची पायरी असते ती म्हणजे लग्न...! पुर्वी देवदेवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पाडला जायचा तो म्हणजे लग्न...!! त्यानंतर 'हनीमुन' नावाची एक संकल्पना असायची परंतु आताची पिढी इतकी पुढारलेली आहे की हल्ली लग्नाआधीच एकमेकांच्या खुप जवळ येऊन त्या नात्यातील गोडवा घालवतेय. "नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात आहे...!!!" तो हनीमुनचा पहिला स्पर्श... पहिली मिठी... त्या रुममधील ते दोघे नवरा बायको... दोघे अनोळखी असले तरी एकमेकांना समजुन घेण्याची सुरुवात लग्नानंतरच व्हायची... गर्दीतुन चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श... ते लाजण... वाट बघण... शिँकण्याच्या सवयीपासुन ते जेवणाच्या चवीपर्यँत एकेक गोष्ट हळु हळु समजत जायची. ती मजा आजकाल हरवत चाललीय. त्यावेळी 100 लग्न झाली तर त्यातील 80 टक्के लग्न टिकायची पण आता 80 टक्के लग्न मोडुन घटस्फोटात परिवर्तीत होत आहेत कारण आताची पिढी नात्यांना उलगडुच देत नाही.
'
गुंतता हृदय हे' या मालिकेत राजवाडेनी वरकरणी आदर्श वाटणारी जोडपी नेहमीच आदर्श असतात असे नाही, याची जाणीव समाजाला करून दिली. अनन्याचा तिच्या नवऱ्यासोबत खर तर प्रेम-विवाह होता मात्र तरीही ती विक्रमकडे म्हणजे परपुरुषाकडे आकर्षित झाली कारण प्रेम-विवाह केला म्हणजे प्रेम निभावल अस होत नाही. नवऱ्याने पत्नीला वेळ द्यायलाच हवा. फक्त व्यावहारिक गरजाच महत्वाच्या नसतात, त्याचसोबत भावनिक आणि शारीरिक गरजा देखील असतात आणि एखाद्या स्त्रीच्या या गरजा तिच्या नवऱ्याकडून पूर्ण होत नसतील तर तिने त्या गरजांच्या पूर्ततेसाठी एका पर-पुरुषाची मदत घेतली तर त्यात सगळीच चूक तिची नसते. तिच्या वागण्याला तिचा नवरा देखील तितकाच कारणीभूत असतो. पुरुषप्रधान संस्कृतीत प्रत्येक जण संस्कृतीच्या नावाने बोंबा मारत अशा परिस्थितीत स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मोकळे होतात. ती स्त्री प्रकरण उघडकीस आल्यावर सगळी बोचरी टीका सहन देखील करते पण हे दुष्कृत्य करताना तिची मानसिक स्थिती समजून घ्यायचा प्रयत्न आपण करायला हवा. नयनासारख्या पतीव्रता स्त्रीची विक्रमसोबत लग्नानंतर पूर्वाश्रमीचा प्रियकर अविनाशला मिळालेली सहानुभूती भावनिकदृष्ट्या योग्यच होती. लग्न झाल म्हणून पहिल्या प्रेमाच्या त्या नाजूक भावना कायम-स्वरूपी मनातून काढून टाकता येता नाहीत .जर मनावर कोणाच नियंत्रण नसत तर मग त्या मनातील भावनांवर तरी कोणी नियंत्रण कसा काय मिळवेल...? तरी सुद्धा नयनाच्या मनात काही पाप नव्हत तर तिला तिच्या पूर्वीच्या प्रियकराला भेटायच्या अगोदर विक्रमला सांगायला हरकत नव्हती. शेवटी नवरा-बायकोच नात विश्वासावर आधारलेलं असत. या मालिकेचा नायकच मला खलनायक वाटतो पण त्याला नायक म्हणून सर्वांसमोर आणण हे एकच गोष्ट सिद्ध करते की भारतात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच आहे.एका पुरुषाने एकाच वेळी दोन बायका फिरवल्या तर तो त्याचा पुरुषार्थ ठरतो...! विक्रमशी शारीरिक संबंध ठेवण अनन्यासाठी शारीरिक गरज असेल पण नयनासारखी सुंदर बायको घरी असताना विक्रमसाठी तो संभोग गरज नक्कीच नव्हती. तरी सुद्धा तो अनन्यावर मनापासून प्रेम करत होता. संस्कृतीच्या दृष्टीने विचार केला तर वरचे सगळे प्रश्न निरर्थक वाटतात आणि 'जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा ' या एका निकषावर फटाफट उत्तरे देखील मिळवून देतात. पण याच सर्व प्रश्नांचा भावनिक पातळीवरील गुंतागुंतीवर विचार करायचा म्हटला तर नेमकी उलट उत्तरे मिळतात. दिग्दर्शक सतीश राजावाडेंनी कार्यक्रमाच्या शेवटी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांना चांगलीच शिकवण दिली.जेव्हा अनन्या आणि नयना मध्ये एकाची निवड करायची वेळ येते तेव्हा अनन्यावर कितीही जीवापाड प्रेम असले तरी विक्रम नायानाचीच निवड करतो. 'घरोघरी मातीच्या चुली' या तत्वानुसार ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे की जेव्हा बायको आणि प्रेयसी यात एकाची निवड करयची वेळ येते तेव्हा बहुतेक पुरुष आपल्या बायकोची निवड करून प्रेयसीला उघड्यावर टाकून मोकळा होतो. तेव्हा कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीशी अजिबात पटत नसेल तर सरळ त्याच्याशी फारकत घ्यावी आणि मोकळे व्हावे पण खोट्या सुखाच्या मागे लागून कोणत्याही अनैतिक संबंधांचा आधार घेऊ नये. शेवटी पश्चाताप करणेच आपल्या हातात उरते.
"
एका लग्नाची, दुसरी गोष्ट" या मालिकेत आगळीवेगळी प्रेमकथा घेऊन राजवाडे लोकांसमोर आले आणि या मालिकेने "न भुतो, न भविष्यती" यश संपादन करत झी मराठीच्या इतिहासातील सुवर्णपान हा किताब पटकावला. रोजची सासु-सुनांची भांडणे, कटकारस्थाने, विवाहबाह्य संबंध या सगळ्या गोष्टी दुर ठेवत सतीश राजवाडेँनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा पण एकदम हलकाफुलका विषय निवडला. मुंबई-पुणे-मुंबईची सुपरहिट जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे मुख्य भुमिकेत असल्याने संवादाची नैसर्गिक शैली अभिप्रेत होती. या मालिकेत राजवाडेनी सर्वप्रथम एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व विशद केले आहे. पाश्चात्यांचे अनुकरण करुन स्वतःला आधुनिक समजणा-या तरुण पिढीला विभक्त कुटुंबपद्धतीत एक संकुचित आनंद वाटु लागला होता पण या मालिकेने थोड्या फार प्रमाणात का होईना तरुणाईला पुर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेल्या एकत्रित कुटुंबपद्धतीचे महत्व पटु लागले. तरुण स्वतःला कितीही शहाणे समजत असले तरी आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्यापेक्षा चार पावसाळे अधिक बघितलेल्या जाणत्यांची म्हणजेच माई आजीँची गरज वाटु लागली. आपण प्रत्येक वेळी बुद्धीला पटेल तो निर्णय घेऊन स्वतःला कितीही प्रक्टिकल म्हणवुन घेत असलो तरी बुद्धिने घेतलेला आयुष्यातील प्रत्येक निर्णय योग्य असतोच असे नाही. जेव्हा प्रश्न भावनांच्या गुंतागुंतीचा असतो तेव्हा बुद्धीपेक्षा आपल्या मनाला जे पटेल तेच करावे. करियर, करियरच्या मागे अधाशासारखे लागुन कमावलेला पैसा आपल्याला आयुष्यात क्षणिक आनंद मिळवुन देतो पण सुख-शांती देऊ शकत नाही. खर समाधान तर आजी-आजोबांच्या वटव्रुक्षाच्या छायेत, आई-वडीलांच्या आशीर्वादात आणि बायकोच्या नजरेतुन व्यक्त होणा-या भावनेमध्ये असते. कितीही पैसा खर्च केल्या, करियरच्या बढाया मारल्या तरी ते मिळु शकत नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे या मालिकेने तरुणांना प्रेमाची नवी परिभाषा शिकवली. आजच्या जमान्यात हिँदी चित्रपटस्रुष्टीत प्रेमाच्या नावाखाली जो नंगानाच चालु आहे त्यामुळे आमच्या पिढीला "खर प्रेम" आणि "फ्लर्टिँग" यामधला फरकच कळेनासा झालाय. प्रेमापुढे जगातील बाकी सर्व गोष्टी क्षुल्लक असतात हे या मालिकेने सप्रमाण सिद्ध केले. शिवाय प्रेम हा कन्सेप्ट फक्त नवरा-बायको किँवा प्रियकर-प्रेयसीपुरता मर्यादित नसुन आई-वडीलांचे मुलावर, आजीचे नातवावर आणि काका-काकुंचे पुतण्यावर असते ते प्रेमच असते. आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व नात्यांची किँमत ही करियरपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते.तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जसे ठरवुन प्रेम करु शकत नाही तसेच तिच्यावर कळत-नकळत करत असलेले प्रेम नाकारु पण शकत नाही. फक्त एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी की ते असलेले प्रेम योग्य वेळी व्यक्त होणे अत्यावश्यक असते कारण उगाच उशीर करुन अव्यक्त राहिल्यास ती व्यक्ती कायमची गमावण्याची शक्यता दाट असते. शिवाय जी व्यक्ती तुम्हाला मनापासुन आवडत असते तिला तुमच्या या दिरंगाईमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. भावार्थ असा की, एखादी व्यक्ती तुम्हाला खरच मनापासुन प्रेम करत असेल आणि त्याने आपले प्रेम तुमच्यासमोर अगोदरच व्यक्त केले असेल तर कोणताही उशीर न करता त्याच्या प्रेमाचा स्वीकार करा. प्रेम ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाप, पुण्य अशा जगातील बाकीच्या गोष्टी प्रेमासमोर शुल्लक आहेत. "I LOVE YOU" या तीन शब्दांमागील खरा अर्थ, त्यांची खरी किँमत तुम्हाला माहीत असेल तरच त्यांचे प्रकटीकरण तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर करा. एखाद्याला I LOVE YOU...म्हणायच आणि लग्न करुन प्रेमाच्या बंधनात अडकायच्या वेळी एखाद संकट आल तर पळ काढायची व्रुत्ती असलेल्यांनी या तीन शब्दांचा उल्लेख कधीच करु नये. जर तुमच्या प्रेमाच्या आड समाज किँवा अगदी तुमचे पालक जरी येत असतील तर तुमच्या ह्रुदयावर हात ठेवुन स्वतःला एकच प्रश्न विचारा, "ज्या व्यक्तीवर तुम्ही खर प्रेम केलय त्याच्याशिवाय उर्वरित आयुष्य तुम्ही जगु शकाल का...?" आणि या प्रश्नाच प्रामाणिक उत्तर मिळाल्यावर तुमचा पुढील निर्णय घ्या कारण तुमच्या आयुष्यावर फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे, तुमच्या पालकांचा किँवा समाजाचा नाही. जर तुम्ही तुमच्या मनातील उत्तराशी अप्रामाणिक वागुन समाज किँवा पालकांच्या हट्टापायी आपल्या आवडत्या व्यक्तीशी प्रेमसंबंध तोडले तर ती व्यक्ती पुढील आयुष्यात बरबाद होईल कि दुस-याशी सुखाने संसार करेल याची मला खात्री देता येत नाही पण एवढ मात्र नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यात 101% बरबाद व्हाल. प्रेम तुम्हाला चांगल आयुष्य जगायला शिकवते. आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या ध्यासापायी आयुष्यातील कठीणातील कठीण शिखरे तुम्ही सर करता. बाकी कोणत्याही गोष्टी मिळाल्या तरी आयुष्यात समाधान मिळत नाही कारण आपल्याला भरपुर गोष्टीँचा हव्यास असतो पण प्रेम मिळाल्यावर माणुस सुखी आणि समाधानी होतो कारण त्याला प्रेमासमोर बाकीच्या गोष्टी खुपच फिक्या वाटतात. आयुष्यात कोणावर तरी मनापासुन प्रेम करा आणि ते अर्ध्यावर सोडुन न देता पुर्णत्वास न्या. आपल सगळ आयुष्य पणाला लावत जर खरच कोणी तुमच्याकडुन कोणतेही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर मनापासुन प्रेम करत असेल आणि तुमची खात्री असेल की ती व्यक्ती पुढील आयुष्यात तुमचा चांगल्या रितीने सांभाळ करु शकते तर कोणत्याही खोट्या स्वाभिमानाला किँवा समाजाच्या भितीला बळी न पडता त्या व्यक्तीच्या प्रेमाचा स्वीकार करा आणि आपले आयुष्य सुखकर बनवा.
हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटात राजवाडे लग्न टिकवण आणि घटस्फोट घेण या संकल्पना स्पष्ट करताना दिसतात. चित्रपटाचा नायक रामच्या मते, "लग्न संपल तरी नात उरत आणि नातही संपल तरी प्रेम हे उरतच...!
आपल्याला कोणीतरी हव असत, आपला हात हातात धरणारं, आपली स्वप्न शेअर करुन त्याच स्वप्नात जगणार...!" दुसरीकडे दोन घटस्फोट घेतलेल्या नायिकेला लग्न ही एक किळसवाणी गोष्ट वाटते. लग्न यशस्वी होण्यासाठी बायकोशी असलेले संबंध मैत्रीणीसारखे असले तर संसारासाठी चांगले असते किँवा तुमची एखादी खास मैत्रीण जर पुढे जाऊन तुमची पत्नी होणार असेल तर त्याला दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. काही गोष्टी, काही निर्णय योग्य वेळीच लक्षात यावे लागतात अन्यथा पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही. आयुष्यात बहुतांश वेळा हि-याची किँमत असणारा माणुस आपल्या आजुबाजुसच वावरत असतो पण ज्याप्रमाणे चंदनाच्या जंगलात लोकांना चंदनाच्या लाकडाची किँमत कळत नाही आणि त्या लाकडांचा उपयोग ते जळावासाठी करतात अगदी तसेच आपल्यासोबत सतत राहणा-या त्या हि-याची खरी किँमत आपल्याला कधीच कळत नाही. आपण आयुष्यभर साध्या दगडातच हि-यांचा शोध घेत वेळ फुकट घालवतो. अन् एक दिवस एखादा रत्नपारखी आपल्यासोबत असणा-या त्या हि-याची योग्य ती पारख करतो आणि आपल्याकडुन तो हिरा हिरावुन नेतो. केवळ तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या हृदयात प्रथम प्रवेश केलाय म्हणून त्या व्यक्तीच्या प्रेमावर कायमस्वरूपी तुमचाच अधिकार राहत नाही. जर तुम्ही वेळीच त्या व्यक्तीच प्रेम समजू शकला नाही आणि त्याच दरम्यान दुसऱ्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रवेश करून त्या व्यक्तीवर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम केल तर त्या व्यक्तीच्या प्रेमावर अधिकार फक्त दुसऱ्याचाच असतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे "जर तुम्ही आहे तसेच ओढत राहिलात तर संसार होईल, सहवास नाही."
बांधीलकी आहे म्हणुन नात जपत बसायच का...? की पटत नाही तर वेगळे होऊन पुढे सरकू, या मताने पुढे जायच? अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्या काळात आजकालची तरुणाई वावरत आहे. समाजातील एक घटक हा मन आणि बुद्धी या वादात नेहमीच बुद्धीला महत्व देणारा आहे पण प्रेमात मनाच कोणीच ऐकत नाही. आता माझ्याकडची सायकल कधीही पंक्चर होऊ शकते, अगदी तसच माझ लग्नही कधीही पंक्चर होऊ शकत. घटस्फोट घेण्यासाठी म्हणुन जगात कोणीच लग्न करत नाही ना...! पण मग त्या पायरीपर्यँत एखाद नात पोहोचल असेल तर मग आयुष्यच संपल्यासारख वाटत. कुठेतरी खचल्यासारख होत. आयुष्यातील अत्यंत महत्वाची, एकमेकांवर तुटुन प्रेम करायची सोन्यासारखी वर्षे कोर्टात भांडण्यात वाया जातात. पण मग नात तोडुन वेगळ होण्यापेक्षा जोडीदाराला पुढे जाऊ देत आपुलकी तशीच ठेवुन वेगळ होण्यात काय चुक आहे. यदाकदाचित पुढे जाऊन जोडीदाराला त्याची चुक समजली, पश्चाताप झाला आणि निर्णय बदलला तर संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणताही येते. किँबहुना तशी धुसर शक्यता तरी नक्कीच दिसत राहते.
या सर्व कलाकृतीतून मिळणाऱ्या मेसेज मधून राजवाडेँची प्रेमाबद्दलची समज आता खुपच प्रगल्भ झालेली दिसते. राजवाडेँना नातेसंबंधांच्या गोष्टी सांगायला फार आवडतात कारण त्यांच्या मते असल्या गोष्टी प्रत्येकाला आपल्याशाच वाटु लागतात.प्रेक्षकांना साध्या सरळ गोष्टीच हव्या असतात. आधीच आपल्या अवतीभोवती एवढा ताण आहे की प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन विकतच दुखण घ्यायच नसत. त्यामुळेच राजवाडेँच्या सगळ्या चित्रपटात मानवी नातेसंबंध खुप महत्वाचे दाखवले आहेत. कोणतही नात, विशेषतः नवरा बायकोच किँवा स्त्री पुरुषाच नात हे खुपच गुंतागुंतीच आणि खुप पापुद्रे असलेल असच असत. ते खुप खाजगी देखील असत आणि अशी गुंतागुंतीची नाती सहज साध्या पद्धतीने पडद्यावर मांडायला दिग्दर्शक सतीश राजवाडेच लागतो. त्या वयोगटातील प्रेमाची हुरहुर, त्यांच्या आयुष्यातील ताण या सगळ्यांची मांडणी करण खुप कठीण काम असत.राजवाडेँना स्त्री-पुरुष नातेसंबंधामधील गंमत लवकरच कळते पण प्रत्येक वेळी या नातेसंबंधांची एक वेगळी चौकट घेऊन नवनवीन प्रकार हाताळण्याची काळजीही राजवाडे घेतात. मराठी चित्रसृष्टीतील दिग्दर्शक सतीश राजवाडे या उगवत्या ताऱ्याकडून मराठी रसिकांच्याही अपेक्षाही आता प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत आणि सतीश राजवाडेसारखा गुणी दिग्दर्शक आणि अभिनेता या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, यात तीळमात्र शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा