सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

पक्षासमोर मतदार खरच इतके क्षुल्लक असतात का...?

गेल्या आठवड्यातच मतदारसंघाची पाहणी करुन आलो. अगदी ओळखपाळख नसलेल्या लोकांचे भेट घेण्याकरता फोन येत होते. प्रत्यक्ष भेटल्यानंतर एकच प्रश्न वारंवार विचारला जायचा-

"सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळवुन देण्यासाठी आमची काय मदत होऊ शकते...?"

काय उत्तर देऊ मी या लोकांना...? मी कोणी शिवसेनेचा पदाधिकारी नाही किँवा एखाद्या नेत्याला तिकीट मिळवुन देण्यासाठी पक्षांतर्गत काय प्रक्रिया असते याचीही मला माहिती नाही. बिचारे सामान्य लोक शिवसेनेच्या शाखाशाखांवर तिथल्या शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख किँवा जिल्हाप्रमुखांची भेट घेत होते. विनायक राऊतांची उमेदवारी फिक्स झाली हे माहित असुनही सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळावी म्हणुन लोकांनी स्वतःहुन केलेला हा केविलवाणा आणि अयशस्वी प्रयत्न होता. लोकशाहीत मतदार हा राजा असतो असे कुठेतरी ऐकल होत. मग याच मतदाराला एखाद्या पक्षासमोर एवढ हतबल व्हायची का वेळ यावी...? लोकशाहीत आपले बहुमुल्य मत देणा-या मतदाराला आपल्या आवडीचा उमेदवार पक्षाला सुचवण्याचे स्वातंत्र्य अद्याप का मिळाले नाही...?? या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न ऐरणीवर येतो की, पक्षांसमोर मतदार खरच इतका क्षुल्लक ठरतो का...???

रत्नागिरी-सिँधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेँविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. सभ्य आणि विद्वान उमेदवारांची परंपरा असलेल्या या मतदारसंघात लोकांना पुन्हा एकदा सुरेश प्रभूच खासदार म्हणुन हवे आहेत. एकीकडे सत्तापरिवर्तनासाठी लोकांच्या भावना तीव्र असताना शिवसेना मात्र उमेदवार निवडीबाबत आडमुठेपणाचे धोरण स्वीकारताना दिसतेय. राणे नको असतील तर शिवसेना लादेल त्या उमेदवारालाच लोकांनी निमुटपणे मत द्यावे. लोकांच्या भावनांशी आम्हाला काही देणघेण नाही. त्यामुळेच लोकांना जरी सुरेश प्रभु उमेदवार म्हणुन हवे असले तरी आम्ही विनायक राऊतांनाच उमेदवारी देणार. सत्ताबदल पाहिजे असेल तर मत द्या. बाकी तुमच्या भावना गेल्या खड्ड्यात...!

काय म्हणाव पक्षाच्या या हेकेखोरपणाला...? यापुढे लोकांना ग्रुहित धरुनच पक्ष चालणार असतील तर अशा पक्षांना लोकांनीच का म्हणुन अद्दल घडवु नये...??

निवडणुक ही मुद्द्यांवर लढवली जाते.मला शिवसेना नेत्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन उतरणार आहात...? राणेविरोध हा निवडणुकीचा मुद्दा असु शकत नाही. फक्त निलेश राणे खासदार म्हणुन अपयशी ठरले त्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या, हा प्रचाराचा मुद्दा असु शकत नाही. निलेश राणेँना अयोग्य ठरवण्यासाठी अगोदर शिवसेनेचा उमेदवार कसा योग्य आहे हे स्पष्ट कराव लागेल.

विनायक राऊत म्हणतात की त्यांनी 12.5 कोटीँचा निधी मतदारसंघासाठी आणला. या वक्तव्याबरोबरच विनायक राऊतांनी अजुन एक गोष्ट स्पष्ट करावी की जर निलेश राणेँनी मतदारसंघासाठी आणलेला निधी 12.5 कोटीँपेक्षा जास्त असला तर लोकांनी निलेश राणेँना मत द्यायच का...? मतदारसंघात निधी आणण्याच्या बाबतीत राणे परिवाराचा हात कोणीच धरु शकणार नाही, ही गोष्ट विरोधकांनाही मान्य करावीच लागेल. मात्र जो जास्तीत जास्त निधी आणेल तो चांगला नेता अस म्हणण शुद्ध मुर्खपणा आहे. नेत्याने जो निधी मतदारसंघात आणला त्याचा प्रत्यक्षात लोकांसाठी किती उपयोग झाला हे लोकांच्या द्रुष्टीने महत्वाचे आहे. राणेँनी मतदारसंघासाठी निधी आणला आणि त्यांच्या बगलबच्चांनी तो मधल्या मधे हडपला तर अशा निधीचा लोकांसाठी उपयोग काय...? आज सिँधुदुर्गातील लोकांना वैद्यकीय सुविधांसाठी शेजारील गोवा राज्याच्या भिकेवर जगायची वेळ येत आहे. इतक्या वर्षात आणलेल्या निधीतुन राणे लोकांसाठी एक सुसज्ज रुग्णालय उभारु शकले नाही तर तो निधी काय कामाचा...?

लोकसभा निवडणुकीच्या प्रसंगी बोलताना तुलना कोणी किती निधी आणला यापेक्षा कोणी किती विकास केला या मुद्द्यावर व्हायला हवी. माजी खासदार सुरेश प्रभूंनी 19 जानेवारीला अक्षरयात्रा पुरवणीत 'कोकण विकासाच्या दाहि दिशा' हा लेख लिहुन ख-या अर्थाने मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा पुढे आणला. या लेखात सुरेश प्रभूंनी विविध योजना राबवुन मतदारसंघाचा सर्वाँगीण, समतोल आणि शाश्वत विकास कसा केला याची मुद्देसुत मांडणी केली. याशिवाय भविष्यात कोकणचे पर्यावरण राखुन विकास कसा करता येऊ शकतो यासंदर्भात मार्गदर्शनही केले. सुरेश प्रभुंच्या या लेखानंतरच मतदारसंघाच्या विकासासाठी प्रभुंसारखी दुरद्रुष्टी असणारा नेता खासदार असायला हवा याची लोकांना जाणीव झाली आहे आणि म्हणुनच हे लोक प्रभुंना पाठिँबा देत आहेत. सुरेश प्रभू उमेदवार म्हणुन का महत्वाचे आहेत हे शिवसेनेने अगोदर समजुन घेतले पाहिजे. राणेँना त्यांच्या पातळीवर येऊन किँवा क्रिकेटच्या भाषेत राणेँच्या पिचवर राणेँना हरवणे कोणालाच शक्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर राडे करण्यासाठी लागणारे गुंड विनायक राऊतांपेक्षा राणेँकडे जास्त आहेत. जनसंपर्काच म्हणाल तर एका दिवसात राऊत जेवढ्या गावात संपर्क करु शकतात त्याच्या तिप्पट गावात तिघे राणे पितापुत्र एका दिवसात जनसंपर्क करु शकतात. सध्या सगळीकडेच क्रिकेट स्पर्धांना पेव फुटलाय. आता एखाद्या क्रिकेट स्पर्धेला राऊतांनी 1 लाखाचे बक्षीस दिले तर 2 लाख बक्षीसाची रक्कम असलेल्या अशा दहा स्पर्धा भरवायची राणेँची ऐपत आहे. एखाद्या मंदिराला राऊतांनी 10 लाख देणगी दिली तर त्याच मंदिराला 1 कोटी देण्याची राणेँची तयारी आहे. थोडक्यात काय तर राणेँकडे जेवढे गुंड, पैसा आणि जनसंपर्क करण्याची क्षमता आहे तेवढी सगळ्या विरोधी पक्षांकडे एकत्रितपणेही नाही. त्यामुळे जनसंपर्क ठेवण्याची किँवा राडे करण्याची आणि पैसे खर्च करण्याची क्षमता असलेला उमेदवार राणेँना हरवु शकेलच असे नाही.
राणेँना पराभुत करायच असेल तर त्यांची कमकुवत बाजु विरोधकांना शोधुन काढावी लागेल. सभ्यपणा आणि विद्वत्ता या दोनच अशा गोष्टी आहे ज्यांच कितीही सोँग राणेँनी घेतल तरी लोकांना त्यावर विश्वास बसुच शकत नाही. त्यामुळेच राणेँना पराभुत करण्यासाठी सभ्य आणि विद्वान अशा प्रभुंची उमेदवार म्हणुन निवड करणे अपरिहार्य आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर केँद्रात एनडीए सरकार येणार हे एव्हाना स्पष्ट झालाय. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात सर्वोत्क्रुष्ट केँद्रीय मंत्री म्हणुन नावाजल्या गेलेल्या प्रभुंना यावर्षी नक्कीच मंत्रीपद मिळेल. त्यामुळे प्रभुंचा प्रचार करताना तुम्ही भावी केँद्रीय मंत्र्याला मत देत आहात असा सकारात्मक प्रचार पक्षातर्फे केला जाऊ शकतो. राजापुर मतदारसंघाने देशाला नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारखे सभ्य आणि विद्वान खासदार दिले. सध्या देशाच्या संसदेतील खासदारांमध्ये सभ्यपणा दिसेनासा झालाय. टिम अण्णांच्या म्हणण्यानुसार 150 पेक्षा जास्त खासदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुंड प्रव्रुत्तीच्या खासदारांमुळे संसदेच्या पवित्र मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. सभ्य खासदारांमध्ये बुद्धिमत्तेचा अभाव प्रकर्षाने जाणवतोय. अशा वेळी सभ्यपणा आणि विद्वत्ता हे दोन्ही गुण ठासुन भरलेला खासदार नजरेला पडणे 'दुर्मिळ योग' बनलाय. कोकणातील लोकांच्या पुर्वजांनी खरच काहीतरी पुण्य केल असणार. त्यांच्या क्रुपेनेच सुरेश प्रभुंच्या रुपात या पठडीतला दुर्मिळ खासदार आपल्या मतदारसंघात अजुनही आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुसंस्क्रुत खासदारांना संसदेपर्यँत पोहोचुच द्यायचे नाही असा विडा शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीँनी उचललेला दिसतोय. सुरेश प्रभुंना शिवसेनेने सर्वप्रथम राज्यसभेवर पाठवले नाही आणि आता प्रभुंचे लोकसभेचे तिकीट कापुन एका सज्जन माणसाला राजकरणातुन कायमचा संपवण्याचा घ्रुणास्पद प्रकार शिवसेनेने केला आहे. अजुनही सामान्य लोक मुग गिळुन गप्प आहेत.शिवसेनेसारख्या पक्षाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता सामान्य लोकांनाच एकी दाखवावी लागेल. नाहीतर भविष्यात पुर्ण संसदच गुंडानी भरलेली दिसेल. या देशाचे दुर्देव इतकेच आहे की इकडे दुर्जनशक्ती स्वतःचे हित साधण्यासाठी एकत्र येतात पण सज्जनशक्तीँचे एकत्रिकरण कधीच होत नाही. सज्जनशक्ती नेहमीच अलिप्त राहतात. ज्या दिवशी सज्जनशक्ती एकवटतील तेव्हाच शिवसेनेसारखे पक्ष सुतासारखे सरळ होऊन सुरेश प्रभुंसारख्या सभ्य नेत्याला उमेदवारी देतील.

निवडणुकीतील सर्व बाजु प्रभुंसाठी अनुकुल असताना केवळ पक्षश्रेष्ठीँची मर्जी राखण्यासाठी राऊतांना उमेदवारी दिली तर जनतेने हताश होण्याची काही गरज नाही. निवडणुकीत प्रभुंना अपक्ष म्हणुन उभे करुन त्यांचा प्रचार ही स्वतःची नैतिक जबाबदारी समजुन पार पाडावी. त्यानंतर अपक्ष सुरेश प्रभुंनी मिळवलेला विजय हा लोकशाहीत मतदार राजा असतो या गोष्टीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारा असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा