रविवार, २९ सप्टेंबर, २०१३

व्यक्तीला माराल, विचारांच काय...?


विचारांना विचाराने मात देणे जेव्हा अशक्यप्राय होऊन बसते, तेव्हा त्या व्यक्तीलाच संपवुन विचार संपविण्याचा प्रयत्न माथेफिरु मंडळी करतात आणि आपण फार मोठी लढाई जिँकलो या अविर्भावात देखील वावरत असतात पण ज्याला ते विजय समजत आहेत तो विजय नसुन केवळ आभास आहे, हे त्यांना कोणी सांगावे...? गांधीजीँच्या निमित्ताने विचारांना गोळी घालुन संपवण्याचा प्रयत्न याअगोदर पुण्याच्या नथुराम गोडसेँनी केला आणि जगाच्या इतिहासतील ती भयावह राजकीय हत्या ठरली. योगायोगाने म्हणा किँवा दुर्देवाने, आज त्याच पुण्याच्या भुमीत समाजातील अंधश्रद्धांचे निर्मुलन व्हावे या एकाच विचाराने झपाटलेल्या नरेँद्र दाभोलकरांची दोन नराधमांनी गोळ्या घालुन निर्घुण हत्या केली. विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखली जाणारी पुण्याची भुमी दाभोळकरांच्या रक्ताने लाल झाली. जेव्हा दाभोळकरांसारखा समाजसुधारक अंधश्रद्धा निर्मुलनासारखा लढा एक व्रत म्हणुन जगतो तेव्हा त्यासाठी कोणतीही किँमत मोजायची त्यांच्या मनाची तयारी असते पण दाभोलकरांना आज आपले प्राण देऊन ती किँमत चुकवावी लागली.अंधश्रद्धा निर्मुलनासारख्या गंभीर विषयाला नरेँद्र दाभोलकरांनी हात घातला खरा पण जाती-धर्माची किड लागलेल्या या समाजात कट्टरवाद्यांना दाभोलकरांचा मुद्दा कितीही योग्य असला तरी कधीच पटला नाही. धर्माँध लोकांनी दाभोलकर फक्त हिँदु धर्मातील अंधश्रद्धांवर बोट ठेवतात असे बेछुट आरोप करुन त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न नेहमीच केला. धार्मिक रंग चढवुनही तत्वनिष्ठ दाभोलकरांना ध्येयापासुन विचलीत करणे कठीण आहे हे लक्षात आल्यावर वारकरी संप्रादायामध्ये दाभोळकरांच्या जादुटोणा विधेयकाबद्दल जाणीवपुर्वक गैरसमज पसरविण्यात आले. लोकशाहीत चर्चेने प्रश्न सुटतात यावर दाभोळकरांची श्रद्धा होती आणि त्यामुळेच वारकरी संप्रादयातील नेत्यांशी कितीही वेळा चर्चा करुन आपण आपले मुद्दे पटवुन देण्याची तयारी दाभोळकरांनी दाखवली होती. तर्काला अनुसुरुन ठामपणे मुद्दे मांडणा-या दाभोळकरांसमोर कट्टरवाद्यांचा कधीच निभाव लागला नाही कारण मुळातच दाभोलकरांच्या लढ्याचा पाया सत्यावर आधारलेला होता. धर्म किँवा श्रद्धा यांना त्यांनी कधीच विरोध केला नाही. दाभोलकरांचा विरोध होता धर्मातील अनिष्ट रुढीँना...!
आजही समाजातील फार मोठा वर्ग शिक्षणापासुन वंचित असल्याने मागासलेला आहे आणि त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन जादुटोणा करणारे भोँदुबाबा गंडेदोरे देऊन त्यांना लुबाडतात. फक्त अशिक्षित लोकच नव्हे तर सुशिक्षित लोक देखील भोँदुबाबांच्या भुलथापांना बळी पडतात. ग्रामीण किँवा आदिवासी भागात नरबळीची प्रथा जोरात सुरु आहे. संतान नसलेल्या बायकांना जाळ्यात ओढुन त्यांच्याशी लैँगिग संबंध ठेवण्याचे प्रकार भोँदुबाबा करतायेत. अशा अनिष्ट प्रकारांना कुठेतरी कायद्याचा धाक दाखवुन कायमस्वरुपी बंदी घालता यावी यासाठीच 'जादुटोणा विरोधी विधेयक' सरकारने मंजुर करावे असा आग्रह दाभोलकरांनी धरला आणि त्यासाठीच लढा देखील दिला. समाजातील विषमता आणि वैर दुर करण्यासाठी दाभोलकरांनी सर्वस्व पणाला लावले, यात त्यांची नेमकी चुक कोणती...? अगदी कोणी कट्टरपंथी किँवा प्रतिगामी असला तरी धर्माचा बाजार मांडणा-या या प्रथांना कोणी कसे काय समर्थन देऊ शकतो...?? प्रतिगाम्यांच्या म्हणण्याप्रमाणे दाभोलकर चुकीचेच होते असे काही वेळासाठी मान्य करु. मग दाभोलकरांचे मुद्दे प्रतिगाम्यांना कधीच का खोडता आले नाहीत...???भारताच्या संविधानाने आणि लोकशाहीने बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन दाभोलकर अगदी नम्रपणे, शांत राहुन आपले मुद्दे मांडत होते. आपले तेच खरे म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. मग एखाद्याच्या अभिव्यक्तीचा खुन तुम्ही कसा काय करु शकता...? हा फक्त दाभोलकरांचा नव्हे तर महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाचा खुन आहे...! भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणा-या लोकशाहीचा खुन आहे...!! संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या संस्क्रुतीचा खुन आहे...!!! एवढेच नव्हे तर महाराष्ट्राला वारसा लाभलेल्या शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांचाही हा खुनच आहे...!!!! महाराष्ट्रात बघाव तिकडे महापुरुषांची नावे रस्त्यांना द्यावीत, त्यांचे पुतळे उभारावेत किँवा रेल्वेस्टेशनचे नामकरण करावे यासाठी आंदोलन करताना त्या त्या महापुरुषांचे तथाकथित समर्थक दिसतात मात्र दाभोलकरांवरील भ्याड यातील कोणीच आंदोलनासाठी पुढे का आले नाहीत...? भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक इंदुमिलसाठी आक्रमक होत असतील तर मग त्यांनी आंबेडकरांनी तयार केलेले संविधान पायदळी तुडवले जात असताना निषेध हा नोँदवलाच पाहिजे. दाभोलकरांचा गोळ्या घालुन खुन करणारे नक्कीच खलनायक आहेत पण दाभोलकरांचा खुन झाला म्हणुन जे लोक सकाळपासुन सोशल नेटवर्किँग साईट्सवर विक्रुत आनंदोत्सव साजरा करतायेत ते त्यापेक्षा विघातक आहेत. यापुढे ते दोघे हल्लेखोर पकडले जातील की नाही किँवा त्यांना कडक शिक्षा होणार का नाही या प्रश्नांपेक्षा अशा प्रव्रुत्तीँची विक्रुत माणसे पुरोगामी महाराष्ट्रात तयार होणार नाहीत याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय" असे ब्रिटीशांना ठणकावणारे लोकमान्य टिळकही आज स्वतःलाच विचारत असतील की, "माझ्या महाराष्ट्रातील लोकांचे डोके ठिकाणावर आहे का...?" एखाद्या व्यक्तीला शिक्षा होण्यापेक्षा त्यासारख्या प्रव्रुत्तीँना आळा घालणे केव्हाही चांगले...! अशाच अनिष्ट प्रव्रुत्तीँविरोधात समाजातील सज्जनांनी एकत्रित व्हावे यासाठी दाभोलकर शेवटच्या श्वासापर्यँत झटले अन् प्राणासही मुकले कारण सज्जन कधी एकवटलेच नाही उलटपक्षी देवाला न मानणा-या दाभोलकरांसारख्या सज्जन माणसाविरोधात दुर्जनांनी एकी दाखवली. दुर्जनांच्या हल्ल्यांपेक्षा सज्जनांची शांतताच या सामाजिक -हासास कारणीभुत ठरली आहे.अजुन किती दिवस आपण अशा तालिबानी क्रुत्यांचे नुसते निषेधच नोँदवत राहणार...? अशाने एक दिवस भारताचा पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही. अशा प्रतिगामी विध्वंसक शक्तीँना वेळीच रोखले नाही तर देशात अराजक माजवुन , जातीधर्माच्या नावाखाली सामान्य लोकांचा जीव घेण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. आज प्रत्येकाने स्वतःला एक समाज म्हणुन आपण किती प्रगल्भ झालो आहोत हा प्रश्न विचारुन बघायलाच हवा. दाभोलकरांच्या म्रुत्युने मी व्यथित नक्कीच झालोय पण हताश कधीच होणार नाही. नरेँद्र दाभोलकर एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते की, महाराष्ट्र किती पुरोगामी आहे यापेक्षा देशाची लोकशाही किती संवेदनशील राहिली आहे हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. दाभोलकरांनी एका वाक्यात त्यांच्या समाजाकडुन असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या.देशातील युवा पिढीला विचारवंत 'मेणबत्ती संप्रादाय' म्हणुन हिणवत असतील पण ती संवेदनशील आहे, असे मी तरी मानतो. आडात नाही तर पोह-यात कुठुन येणार अशी म्हण आहे. त्याच न्यायाने जर संवेदनाच नसतील मग मेणबत्या तरी कुठुन येणार...? आज गरज आहे ती रस्त्यावर निषेध नोँदवायला उतरणा-या युवा पिढीला योग्य दिशा दाखवण्याची...! त्यांच्या हातातील मेणबत्यांचे मशालीत कसे रुपांतर करता येईल याची खबरदारी घेण्याची...!! मला वाटत आज दाभोलकरांच्या शरीरातुन पडलेला रक्ताचा एक-एक थेँब तरुणांच्या मनात क्रांतीचे बीज रोवण्यासाठी उपयोगी येईल आणि त्यांनी समाजासाठी दिलेले हे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही. त्यांनी पेटवलेल्या क्रांतीच्या ज्योतीच्या पुढील काळात ज्वाला बनतील आणि त्यातुनच भावी सामाजिक नेते निर्माण होतील. जे जादुटोणा विरोधी बिल मंजुर करण्यासाठी दाभोलकरांनी आयुष्य झिजवले ते मंजुर करुन घेण्यासाठी आता मतभेद विसरुन सर्वाँनी एकत्रितपणे लढा दिला पाहिजे आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. देह हा कधी ना कधी त्यागावाच लागतो पण समाजात कायमस्वरुपी जीवंत राहतात ते तुमचे विचार...!आज दाभोलकर शरीराने आपल्यात नसले तरी ज्या क्षणी त्यांना गोळ्या घालण्यात आल्या त्याच क्षणी त्यांच्या विचारांचा विजय निश्चित झाला कारण ते विचार खोडुन काढण्याची ताकद प्रतिगाम्यांमध्ये कधीच नव्हती. भ्याड हल्ला करुन माणसातल्या जनावरांचे दर्शन घडवणा-या प्रतिगामी लोकांना बहिणाबाई चौधरीँच्या ओळीँची आठवण करुन देत मी लेखाचा शेवट करतो- "अरे माणसा माणसा कधी होशील रे माणुस...?"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा