रविवार, ३० जून, २०१३

प्रमोद जठार साहेब कोणाला श्रद्धांजली देत आहात….?

विलासराव देशमुखांचा अस्थिकलश संपूर्ण राज्यात फिरवून भावनेच्या लाटेवर स्वार होत सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस करत होती, त्यामुळे विलासरावांना अमरात्वही मिळाले आणि मते सुद्धा मिळाली. या अगोदर राजीव गांधींच्या वेळी असलीच थेड कॉंग्रेसने केली होती. जणू काही एखादा संत किंवा महात्मा गेला या प्रकारे विरोधी पक्षाचे आमदार प्रमोद जठार सुद्धा भ्रष्टाचारी विलासरावांच्या अस्थिकालाशाच्या दर्शनासाठी गेले. मृत्यू एखाद्याचे जीवन संपवतो त्यामुळे तो वाईट असतोच .पण केवळ मृत्यू झाला म्हणून एखादा माणूस महापुरुष,युगपुरुष ठरू शकत नाही .
विलासराव देशमुखाना अशा उपाध्या लावणे हे भाबडेपणाचे आहे .माध्यमाना काही औचित्य ,संकेत बाळगावे लागतात पण तशी अपरिहार्यता सामान्य माणसास नसते .

विलासरावांनी महाराष्ट्र सरकारमधील जवळपास सर्व मंत्रीपदे,कालावधीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपद सांभाळली .पण या त्यांच्या कालावधीतील केवळ ५ धोरणात्मक आणि पुरोगामी निर्णय विचारले ज्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला तर त्याचे उत्तर शून्य असे द्यावे लागेल. या उलट ५ भ्रष्टाचाराची प्रकरणे सांगा म्हणलं तर सहज सांगता येतील. त्यांनी एक वेगळाच आदर्शघालून दिलेला आहे आणि तो घातक आहे. मुख्यमंत्र्याचे काम सर्व खात्यांवर देखरेख ठेवणे,महसुली उत्पन्न वाढवणे,जनहिताचे निर्णय घेणे आणि ते राबवणे ,कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेणे हे असते .परंतु त्यानी मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त एफ.एस.आय वाढवणे,मोकळे भूखंड बिल्डर्स च्या घशात घालणे आणि काँग्रेस पक्षासाठी आणि स्वतःसाठी मलिदा कमावणे हे काम निष्ठेने केले.नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याने त्याची सर्व जबाबदारी यांची होती.त्या बदल्यात बिल्डर्स नी मुंबई,पुणे नाशिक सारख्या शहरातील घर बांधणी क्षेत्रातील प्रत्येक स्क्वेअर फुट मागे ५०० रुपये या यंत्रणेस दिले .त्यातील २०० रुपये काँग्रेस च्या निवडणूक फंडात ,२०० रुपये सोनिया गांधीच्या स्विस खात्यात आणि १०० रुपये याच्या स्विस खात्यात गेले .हिरानंदानी बिल्डर ने पवई येथे सर्व सामान्यांसाठी स्वस्तात लहान घरे बांधण्याचा प्रस्ताव देऊन तो मान्य करून घेऊन प्रत्यक्षात धन दांड्ग्यांसाठी मोठी घरे बांधली आणि हे विकास आराखडे मंजूर होत असताना ,अवैध बांधकाम होत असताना नगर विकास खाते शांत बसून होते .मा.उच्च न्यायालयाने या संदर्भात अत्यंत कडक ताशेरे ओढले आहेत.
फंड रेझिंग मध्ये निष्णात असल्या कारणाने काँग्रेसने ही त्यांची नेहमी पाठराखण केली .

आदर्शला नियमबाह्य परवानगी देणे,रस्ता रुंदी बाबतचा नगर विकास सचिवांचा शेरा रद्द करणे ,सी .आर.झेड. नियम उल्लंघन करणे हे सर्व निर्णय यांनी तत्परतेने घेतले आणि असे करताना शहिदांच्या वारसानसाठी असलेल्या जागेचा आपण गैरवापर करत आहोत,राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणत आहोत याचे देखील नैतिक भान राखले नाही .मालाड ,वर्सोव्या जवळील अनाथ,अंध मुलींच्या वसतीगृहासाठी राखीव असलेला भूखंड ,त्याचे आरक्षण बदलून स्वतःच्याच ट्रस्ट’ (या ट्रस्ट ची नोंदणी देखील अवैध असल्याचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने दिला आहे ) ला कवडी मोल दराने (५३ रुपये पर स्क्वेअर फुट मुंबई मध्ये) देणे आणि तेथे धन दांड्ग्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारणे हे यांचे समाजकार्य...!
आपल्या मुलाला फिल्म देण्याच्या बदल्यात चित्र नगरीतील भूखंड सुभाष घईला नियम डावलून देणे हे यांचे सांस्कृतिक कार्य...!!
दिलीप सानंदा या उद्दाम आमदारकम सावकाराच्या सावाकारीने नाडलेल्या ,खंगलेल्या आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा बायको पोलिसात तक्रार देत असता आणि कर्तव्यदक्ष अधिकारी ती नोंदवून घेत असता थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून ती तक्रार नोंदवून न घेण्याचा आदेश देणे हा यांचा शेतकर्‍याबाबतचा कळवळा...!!!

याबाबत सर्वोच्च न्यायालयानेराजधर्माचे पालन केले नाही असे कडक ताशेरे ओढून दंड म्हणून १०,००,००० रुपये महाराष्ट्र सरकारला भरायला लावले आणि सरकारने ते जनतेच्या खिशातून भरले. या सर्व संदर्भात त्यांना प्रतिक्रिया विचारली असता चेहऱ्यावरचा मिश्कीलपणा किंचीत कमी होऊ न देता माणूस चुका करतो, चुका करून माणूस शिकतोअसे उत्तर देणारे हे गेंड्याच्या कातडीचे तत्कालीन केंद्रीय ग्राम विकास मंत्री....!!!!

सहकार हद्दपार आणि नामशेष करण्याचे काम यांनी मराठवाड्यात जातीने केले. कापूस एकाधिकार योजनेचे तीन तेरा वाजले .मुख्यमंत्री मराठवाड्याचा असून ही त्याचा अनुशेष कधिही भरून निघाला नाही .सिंचनात वाढ झाली नाही.बोगस नोंदणी झालेले सर्वाधिक मजूर मराठवाड्यात निघाले आणि रोजगार हमी योजनेची पूर्ण वाट लावण्याचे काम या दिवंगत नेत्यांच्या कारकीर्दीत झाले .
आघाडीचे सरकार आणि महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती हे मान्य केले तरी सहकार खाते प्रथम पासून काँग्रेस कडे होते .यांच्या कारकीर्दीत सहकारी पतपुरवठयाच्या यंत्रणेचे तीन तेरा वाजले,राष्ट्रवादीने सहकारी ब्यांका लुबाडणे आधीच चालू केले होते ,त्यात त्रिस्तरीय पतरचना कोलमडून पडली आणि सावकारी फोफावली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत लक्षणीय वाढ झाली ,पुन्हा या ब्यांकानी दिलेल्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडला .या वेळी रिझर्व ब्यांकेने वेलो वेळी दिलेले इशारे केराच्या टोपलीत टाकले गेले .
पूर्वी लातूर प्याटर्न नावाचा शैक्षणिक प्रकार १९९५ ते १९९९ मध्ये जोरात होता .यात ९ वी तील मुलांना मे महिन्यात १-२ आठवडे सुट्टी देऊन १० वी चा अभ्यास सुरु केला जात असे .या प्याटर्न मधून अनेक मुले लातूर परिसरातून मेरीट मध्ये आली .हा प्याटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांनी राबवला होता .यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांचे खच्ची करण करणे ,निधी अडवणे आणि आपल्या टिल्लू-पिल्लुंच्या खासगी महागड्या इंग्रजी शाळांना मान्यता देण्याचे धोरण अवलंबले आणि ते राबवले (हे धोरण आता महाराष्ट्रात सर्वत्र राबवले जात आहे ).त्या मुळे शिक्षणाचा दर्जा अमुलाग्र घसरला .सामान्य प्रशासन विभाग थेट मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतो .सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीतयांनी सरसकट कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना साईड पोस्टींग ला टाकण्याचे आणि मर्जीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवाजेष्टता डावलून महत्वाच्या पदावर नेमले .चंद्रशेखर यांसारखे अधिकारी याच काळात सरकारी नोकरी ला राम राम करून निघून गेले .या मुळे धोरणात्मक पातळीवर गोंधळ होताच पण प्रशासन सुस्त आणि अकार्यक्षम झाल्याने अंमलबजावणी चा ही बोजवारा उडाला .
कृपाशंकरसिंह सारख्या व्यक्ती मोठ्या झाल्या त्या यांच्या कारकीर्दीत...!!! .


२६/११ ची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने यांची होते.आपल्या ४-४ वर्षाच्या २ टर्म मध्ये एकदाही वरिष्ठ पोलीस अधिकारी,गुप्त वार्ता विभाग आणि गृह विभाग यांची संयुक्त बैठक घेतली गेली नाही .माणसे मेली,पोलीस मेले आणि कसलीही चाड न बाळगता हे मुलाला आणि राम गोपाल वर्मा ला घेऊन शुटिंगलोकेशन बघायला गेले .शेवटी हाय कमांड ने सांगितल्यावर राजीनामा दिला ..पण चेहऱ्यावर निर्लज्जपणा तसाच ठेवून...!!!
पुढे फंड रेझिंग ची आणि शरद पवार यांना शह देण्याची क्षमता लक्षात घेवून काँग्रेसने त्यांचे राज्यसभेत पुनर्वसन केले .विधिमंडळातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाशवी बहुमतामुळे त्यांचा विजय निश्चित होता पण शिवसेना-भाजपाने ऐनवेळी उमेदवार मागे घेऊन अशा माणसाची बिनविरोध निवड होऊ दिली .केंद्रात अवजड उद्योग खात्यचा भार स्वीकारताना हा माणूस व्हीअशी खूण करत माझे कोणी काही उपटू शकत नाही आशा आविर्भावात जनतेला समोरा गेला. मराठवाडा मराठेशाहीचा भाग कधीच होऊ शकला नाही याचे कारण यांच्या पूर्वजांनी देखील स्वधर्म,स्वभाषा,स्वदेश यांना महत्व न देता आपली देशमुखी टिकवण्यात धन्यता मानली .बॉम्बस्फोट होवोत,अतिरेकी हमले होवोत ,राज्यात दुष्काळ पडो,विजेची अभूतपूर्व टंचाई निर्माण होवो,शेतकरी आत्महत्या करोत,सामान्य माणूस रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करो ..म्हणजेच काहीही होवो पण चेहऱ्यावरची स्मितहास्य रेषा ढळू न देणे..कोणत्याही प्रश्नाला हसण्यावारी नेणे किंवा सोडवायचा प्रयत्न करतो असे दाखवत तो टोलावणे आणि पूर्णपणे विधिनिषेध शून्यता बाळगणे हे यांच्या स्वभावाचे आणि कारकीर्दीचे व्यवछेदक् लक्षण म्हणावे लागेल ! त्यांच्या कडे उमदेपणा,दिलखुलासपणा,दिलदारपणा असेल पण सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीची समाजाप्रती असलेली बांधिलकी,निष्ठा,कर्तव्यदक्षता,जबाबदारीचे भान इ.गुणांच्या संदर्भात त्यांच्या इतर गुणांचा उल्लेख आणि आदर करणे क्रमप्राप्त ठरते .यांचे सामाजिक मूल्यमापन करता जमा शून्य असल्याचे खेदाने म्हणावे लागेल .अशा माणसासाठी ज्याने ज्या मूल्यांवर आधुनिक भारताची उभारणी झाली त्या मुल्यांचा ऱ्हास केला त्या माणसा साठी तिरंगा अर्ध्यावर फडकावा,सरकारी इतमाम आणि बंदुकीच्या फैरी झाडाव्या हे या देशाचे दुर्दैव आहे .पण हे दुर्दैव येथेच थांबणार नाही ..व्यक्ती पूजेचे स्तोम माजलेल्या या देशात यांची पोकळी लवकरच भरून निघेल ..हे या देशाचे अधिक मोठे दुर्दैव आहे...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा